June 26, 2010

ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे..

माझे किती क्षण राहिले.. (येथे ऐका, येथे अनुभवा!)

दूर कुठेतरी आमिरखासाहेब मारवा आळवताहेत.. दूर कुठेतरी सुरेश भट मारवा उलगडून सांगताहेत..!

'माझे किती क्षण राहिले.. ' हा सुरेश भटांचा मारवा केवळ शब्दातीत आहे, अप्रतिम आहे!

ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे
मी मात्र थांबून पाहतो मागे कितीजण राहिले.!


स्वरांचं बॅलन्सिंग, स्वरांचं बेअरिंग जबरदस्त! अचूक स्वर लागले आहेत, नेमके लागले आहेत..! भटसाहेबांचा हा मारवा ऐकताना त्यांनी गाण्याची कुठे रीतसर तालीम घेतली आहे की काय, असं वाटतं अशी विलक्षण एकतानता, एकाग्रता..! सारं राज्य शब्दांचं, सारा अंमल सुरालयीचा!

भटसाहेबांचा कोमल रिषभ अंगावर येतो!

होता न साधा एवढा जो शब्द मी तुला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले..


मारव्याच्या सुरावटीकरताच केवळ हे शब्द जन्माला आले.. आणि म्हणूनच भटसाहेबांनी हे शब्द मारव्यात गुंफले.. हे विलक्षण अद्वैत आहे.. शब्दांचं आणि मारव्याच्या सुरांचं!

गझल-गायकी म्हणजे काय ते इथे कळतं.. हो, गायकीच ही.. हे फुटकळ गझल वाचन नव्हे.. आज मराठी गझलांच्या वाचनाचे/सादरीकरणाचे अनेक कार्यक्रम होतात.. या सगळ्या नवख्यांनी शिकावं की गझल कशी वाचावी, कशी मांडावी.! पण त्या करता जाण असावी लागते स्वरांची. स्वर जगावे लागतात, अनुभवावे लागतात! त्याशिवाय मुशायरा-गायकीची पेशकारी येत नाही!

Suresh Bhat

ह्या गझल गायकीला ताल नाही की ठेका नाही, परंतु लय कशी घट्ट पकडली आहे ते पाहा.. एक अदृश्य लय!
लय- शब्दसुरांचा श्वासोश्वास!

उदाहरणार्थ -
एकाच शब्दाला उभे, आयुष्य तारण राहिले!
'उभे' शब्दानंतरचा लयदार पॉज.. "ष्य' अक्षरावरचा लयदार आधात.. आणि 'ष्य' - 'तारण' वरचा म'गरेसा चा मारव्यातला भन्नाट अवरोह..! याला म्हणतात गाणं, याला म्हणतात लय, याला म्हणतात गायकी!

हे केवळ गझल-गायन वा वाचन नव्हे, हा तर मारव्याचा भन्नाट जमलेला विलंबित ख्याल! भटांची हा मारवा अन् त्याची गायकी भिनते सिस्टिममध्ये!
काळवंडलेलं आकाश.. तीन सांजा झालेल्या.. भयाण तीन सांजा आणि अंगावर सरसरून येणारी कातरवेळ..!
हा मारवा नाही, हे स्वगत आहे.. भटसाहेबांचं स्वगत!

'मागे कितीजण राहिले हा हिशेब मागतो आहे हा मारवा! पण हिशेब द्या किंवा नका देऊ.. दुनियेला फाट्यावर मारतो हा मारवा आणि म्हणतो..

ओसाड माझे घर मुळी नाही बघायासारखे
हे आसवांचे तेवढे तोरण अद्याप राहिले..!


गेंद्याच्या फुलांचं तोरण काय, कुणीही बांधतो हो.. पण आसवांचं तोरण केवळ भटसाहेबच बांधू शकतात, त्यांच्या मारव्याचे सूर हीच त्या तोरणाची पानं-फुलं!

आकाशातले सारे ग्रह उच्चीचे होतात आणि सुरेश भटांसारखा एक अवलिया गझल लिहून जातो, मारवा गाऊन जातो..!

-- तात्या अभ्यंकर.

June 24, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (३७) - रुठो ना...


रुठो ना...(येथे ऐका)

आलिकडच्या काळातलं एक गाणं. 'विथ लव्ह, तुम्हारा...' या चित्रपटातलं.

रुठो ना रुठो ना, बलमा रुठो ना..

सुदीप बॅनर्जीची अगदी शांत परंतु मनाची पकड घेणारी सुंदर चाल. त्याने गायलंयही अगदी मन लावून! अचानक फर्मान निघाल्यामुळे प्रियकराला सैन्याच्या नौकरीत रुजू व्हावे लागत आहे, त्यामुळे त्याची प्रेयसी रुसली आहे..
'बैरी अखिया मानेना केहेना..'या ओळीतली स्वरसंगतीदेखील खूप भावणारी..

'ओ मोरे पिया ये मोरा जिया... ' अंतराही अगदी कल्पकतेने बांधला आहे, 'ये मोरा जिया..'चे स्वर खूप हळवे आहेत..एकंदरीत सारं गाणंच खूप सुरेख झालं आहे.. गाण्याचं चित्रीकरणही छान.. पुढे तो प्रियकर लढाईत मारला जातो आणि त्याच्या मृत्यूची बातमी घेऊन त्याचाच एक अत्यंत सभ्य, सुशील मित्र त्याच्या घरी येतो..अखेरीस ती मुलगी त्या मित्राशीच लग्न करते..अर्थात, अनेक भावभावनांच्या कल्लोळानंतर..!


हा चित्रपटही चांगला आहे, सेन्सिबल आहे..हे गाणं तर नक्कीच चांगलं आहे!


-- तात्या अभ्यंकर.

June 17, 2010

बसंतचं लग्न..१२ (अहीरभैरव)


राम राम मंडळी,

आज बर्‍याच दिवसांनी बसंतच्या लग्नाचा हा बारावा भाग लिहिण्याचा योग आला आहे. बसंतच्या लग्नाच्या पहिल्या अकरा भागांना मनोगताने प्रसिद्धी दिली होती त्याबद्दल मी मनोगत प्रशासनाचा अत्यंत ऋणी आहे. मनोगतावर ही मालिका लोकांना खूप आवडली होती असे आठवते! असो, आज हे सर्व भाग इच्छुकांना आमच्या ब्लॉगवर वाचायला मिळतील. त्या सर्व भागांचे दुवे खाली देत आहे!


बसंतच्या लग्नाचा बारावा भाग आज लिहीत आहे. वाचकांनी कृपया गोड मानून घ्यावा, ही विनंती...

बसंतचं लग्न --भाग १२
राम राम मंडळी,
आधींच्या भागात म्हटल्याप्रमाणेच बसंतच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. मांडवात आता बर्‍याच रागरागिण्यांची गर्दी जमली आहे. प्रत्येकाचं सौंदर्य वेगळं, प्रत्येकाचा गोडवा वेगळी, प्रत्येकाची नजा़कत वेगळी! 

ती कोण बरं व्यक्ति नुकतीच आली आहे? बसंत त्या व्यक्तिला वाकून नमस्कार करत आहे! चेहेर्‍यावर एक वेगळंच तेज आहे तिच्या! सुरेख पांढर्‍याशूभ्र वेषातली, मस्तकी केशरमिश्रित गंध लावलेली ती व्यक्ति बसंतला कौतुकाने आशीर्वाद देत आहे! कोण आहे बरं ती व्यक्ति?!

मंडळी, ती व्यक्ति म्हणजे राग अहीरभैरव! आपल्या हिंदुस्थानी अभिजात संगीतातील सकाळच्या प्रहरी गायचा एक विलक्षण प्रभावी आणि भारदस्त असा राग, राग अहीरभैरव!! मंडळी, तुम्हाला सांगतो, भल्या सकाळी अहीरभैरव ऐकण्यासारखं सुख नाही! खूप शुभ आणि मंगलदायी वाटतं. अहीरभैरव अक्षरश: तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्वच भारून टाकतो, तुमच्या मनाचा संपूर्ण ताबा घेतो, इतके प्रभावी सूर आहेत त्याचे! माझ्या आजपर्यंतच्या श्रवणभक्तिमध्ये अनेक दिग्गजांचा अहीरभैरव ऐकण्याचं भाग्य मला लाभलं आहे त्यात किशोरीताईंचं नांव अगदी आवर्जून घ्यावं लागेल. किशोरीताई अहीरभैरवची मांडणी भन्नाटच करतात! क्या बात है....!

अहीरभैरव या रागाबद्दल क्या केहेने! या रागाबद्दल किती लिहू अन् किती नको! आपल्याला या रागाची थोडक्यात ओळख व्हावी म्हणून आयटीसी-एसआरए च्या संस्थळावरील हे क्लिपिंग ऐका. यात रागाच्या आरोह-अवरोहाची, रागाची पकड (रागस्वरूप) याची थोडक्यात ओळख करून दिलेली आहे. आणि त्यानंतर 'अलबेला साजन आये..' ही या रागात नेहमी गायली जाणारी पारंपारिक बंदिशही आपल्याला ऐकता येईल...

काय मंडळी, अजूनही या रागाची पुरेशी ओळख पटत नाहीये? मन्नादासाहेबांचं 'पुछो ना कैसे' हे गाणं ऐका. हे गाणं याच रागात बांधलेलं आहे! उत्तम लचीला आवाज लाभलेल्या, अभिजात संगीताची भक्कम बैठक असलेल्या आणि आवाजात अतिशय गोडवा भरलेल्या मन्नादांनी या गाण्याचं अक्षरश: सोनं केलं आहे. या गाण्याच्या सौंदर्यात गायक, संगीतकार, कवी, यांचा वाटा तर आहेच आहे परंतु अहीरभैरवासारख्या भारदस्त रागाचे स्वर या गाण्याला लाभले आहेत ही देखील या गाण्याची खूप मोठी जमेची बाजू म्हणावी लागेल!

हा राग मला एखाद्या साधूपुरुषासारखा दिसतो. विरागी वृत्तीचा. पण कसा आहे हा साधूपुरुष? हा नुसतीच जपमाळ घेऊन वैराग्याची भाषा करत नाही तर उलट 'आयुष्यातले सगळे भोग अगदी यथेच्छ भोगा परंतु चित्ती मात्र सतत वैराग्याचीच जाणीव असू द्या' हे सांगणारा आहे! मंडळी, अगदी नेमक्या शब्दात वर्णन करायचं म्हटलं तर,

'आहे मनोहर तरी गमते उदास!'

अश्याच वृत्तीचा हा राग आहे असं मला वाटतं!

मला हा साधूपुरुष थोडा प्रवासी, भटक्या वृत्तीचा, एका जागी फार वेळ न थांबणारा वाटतो. हा अवचित कधी दाराशी येईल आणि 'सांगेन गोष्टी युक्तिच्या चार..' या न्यायाने आपल्यालाच आयुष्य सावरणारे चार प्रेमळ सल्ले देईल आणि पुन्हा कुठेतरी दूर निघून जाईल!

वर उल्लेख केल्याप्रमाणे या रागात गायली जाणारी 'अलबेला साजन आये..ही पारंपारिक बंदिश इथे ऐका आणि पाहा. 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात संगीतकाराने या बंदिशीचा खूप छान उपयोग करून घेतला आहे. गाण्याचं पिक्चराझेशनही खूप चांगलं आहे! विक्रम गोखले गुरुजी ऐश्वर्याला आणि सल्लूबाबाला या रागाची तालीम देत आहेत! Smile

(अवांतर - हा शिणेमाही मला आवडला होता! असो..)

मंडळी, माणसाचं मन हे अनेक गोष्टींनी भरलेलं असतं. त्यात आनंद असतो, दु:ख असतं, लोभ, मत्सर, माया, ममता, अगदी सारं काही असतं. परंतु या सगळ्या भावभावानांकडे शेवटी एका विरागी वृत्तीनेच पाहावं, किंबहुना मनातील प्रत्येक भावभावनेला विरागी वृत्तीची झालर असावी, असंच अहीरभैरव हा राग आपल्याला सांगतो किंवा शिकवतो. मग ती भावभावना कुठलिही असो, आनंद असो वा दु:ख असो, अंगी जर मूलभूत विरागी वृत्ती असेल तर या सगळ्या भावनांचा समतोल योग्य रितीने राखला जातो आणि ही विरागीवृत्ती आपल्याला अहीरभैरवकडून मिळते असं मला वाटतं. 'आयुष्यात सगळं काही कर परंतु शेवटी वृत्ती मात्र विरागीच ठेव' असंच हा राग सतत सांगत असतो आणि हीच या रागाची फार मोठी ताकद आहे असं मला वाटतं! 

मंडळी, मी काही कुणी मोठा धर्माचा गाढा अभ्यासक नाही की मोठमोठे ग्रंथ पठण केलेला, गीता-ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलेला कुणी शास्त्री-पंडित नाही. आपलं हिदुस्थानी रागसंगीत हीच आमची गीता आणि त्यातले एकापेक्षा एक मौल्यवान असे राग हेच आमचे वेद! आणि हेच वेद व गीता आम्हाला बरंच काही शिकवून जातात असा माझा तरी अनुभव आहे! 

मंडळी, खरंच मला तरी अहीरभैरव असाच दिसला, असाच भावला!

मंडळी अहीरभैरव रागाच्या व्यक्तिमत्वाकडे पाहताना मला नेहमी भाईकाकांच्या 'तुझे आहे तुजपाशी' या नाटकातलं काकांजींचं व्यक्तिमत्व आठवतं! हे काकाजी म्हणजे वर वर पाहता अगदी जिंन्दादिल, बाईबाटलीपासून ते आयुष्यातल्या सर्व गोष्टींचा यथेच्छ आस्वाद घेणारं, आयुष्यावर, खाण्यापिण्यावर, गाण्यावर मनमुराद प्रेम करणारं असं व्यक्तिमत्व आहे. परंतु मी 'वर वर पाहता' हे शब्द अश्याकरता वापरतोय की मूलत: त्या नाटकातल्या 'श्याम' या तरूण पात्रासोबत गप्पा मारताना जवान होणारे काकाजी क्षणात हे सगळे भोग सोडून देऊन, "चला आचार्य, आपण दोघे आपले जंगलात जाऊन राहू. अहो या वयात पोरंसोरं देखील दाढ्या ओढतात!" असंही म्हणायला तयार असतात!

"मला लोकांनी आचार्य केला हो! लोक जणूकाही काठावर काठ्या घेऊन उभेच होते, मी जरा जवळ आलो की मला पुन्हा पाण्यात ढोसत होते. त्यांनाही नमस्कार करायला कुणीतरी बुवा हवाच होता!"
असा शेवटी भडभडून आक्रोश करणार्‍या आचार्यांना "शांत व्हा आचार्य!" असा धीर काकाजीच देतात! आचार्य त्यांना म्हणतात, "काय गंमत आहे पहा काकाजी, अहो आयुष्यभर मी शांतीचे पाठ बडबडत आलो परंतु शेवटी तुम्ही मला शांत व्हायचा सल्ला देताय! कारण तुम्ही शांत आहात!! तुम्ही आयुष्यभर सगळं काही केलं परंतु अंगाला काहीच लावून नाही घेतलं!"

शेवटी खरा वैरागी कोण? गीतेचे पाठ बडबडणारा आचार्य की आयुष्याचे सगळे भोग यथेच्छ भोगलेला काकाजी? हा प्रश्न प्रेक्षकांवर सोडून हे नाटक संपतं!

सांगायच मुद्दा पुन्हा तोच की, अहीरभैरव हा रागदेखील माणसाला नेमकी हीच वैरागीवृत्ती अंगी बाणवायला शिकवतो. आनंद, भोगापभोग, याला त्याची कधीच ना नाहीये! 

'गुंतुनी गुंत्यात सार्‍या पाय माझा मोकळा!'

भटसाहेबांच्या या फार सुरेख ओळीत जो अर्थ सांगितला आहे, तोच अर्थ हा रागही सांगतो असं मला वाटतं!
खरंच मंडळी, आपलं रागसंगीत म्हणजे नुसते केवळ स्वर नव्हेत किंवा आरोहा-अवरोहाचं, चलनाचं व्याकरण नव्हे! तर या व्याकरणाच्या कितीतरी पुढे जाऊन हे रागसंगीत आपल्याशी संवाद साधतं! आपल्या मनातील भावभावनांचा ठाव घेतं आणि हेच माझ्या मते आपल्या रागसंगीताचं गमक आहे. अहीरभैरव हा राग मला जसा दिसला तसाच प्रत्येकाला दिसेल असंही नव्हे परंतु तो प्रत्येकाच्या थेट हृदयाशी काही ना काही संवाद साधेल, त्याला आपलंसं करेल एवढं मात्र निश्चित!

हिंदुस्थानी रागसंगीताचा हा अनमोल ठेवा आपण सर्वांनी मनसोक्त लुटला पाहिजे. ह्या ठेव्याची व्याप्ती एवढी अफाट आहे, एवढी अमर्याद आहे की कितीही जरी लुटला तरी तो जराही कमी होणार नाही, उलट आपण मात्र अधिकाधिक समृद्ध होऊ, संपन्न होऊ, श्रीमंत होऊ! 

बसंतचं लग्न ही मालिका मी केवळ याच हेतूने लिहीत आहे. खरं सांगायचं तर ही मालिका म्हणजे माझ्या पदरचं काहीच नाही, मी फक्त एक माध्यम बनून हा रागसंगीताचा खजिना मला जसा भावला तसा मुक्तहस्ते आपल्यापुढे लुटायचं काम करतोय, हे माणिकमोती उधळायचं काम करतोय!

असो....

अहीरभैरवचा हा भाग मी रामुभैय्या दाते यांच्या जिन्दादिल स्मृतीस अर्पण करत आहे!

आपला,
तात्या अभ्यंकर,
प्रचारक व प्रसारक,
हिंदुस्थानी रागदारी संगीत.

June 15, 2010

काही ऍब्स्ट्रॅक्ट रागचित्रे!


आज मी थोडं तात्विक चित्रविवेचन करणार आहे!

खालील चित्रांत मला काही राग दिसले. या चित्रांना आपण 'ऍब्स्ट्रॅक्ट रागचित्रे' असं म्हणू. आपल्या हिंदुस्थानी अभिजात संगीतातली 'राग', ही पूर्णत: भावनांशी निगडीत असलेली संकल्पना आहे. एकच राग प्रत्येकाला तसाच दिसेल असं नव्हे. रागदारी संगीत किंवा एकंदरीतच कुठलीही कला, ही अनुभवायची गोष्ट आहे. कलेच्या आस्वादाबाबत प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, प्रत्येकाच्या जाणिवा वेगळ्या असतात/असू शकतात! मला जे जे राग जसे जसे दिसले, जसे भावले, ते मी माझ्या बसंतचं लग्न या लेखमालिकेत शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे! माझ्यासारखा कुणी ते अनुभव शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. परंतु नुसताच शब्दात व्यक्त केल्याने हा शोध संपत नाही, तो सुरूच असतो. कारण मुळात कुठलीही कला ही अथांग असते, त्यामुळे आयुष्यभर तिचा शोध, मागोवा घेत राहणे यातच आनंद असतो. हा शोध कधीच संपू नये असं वाटतं आणि जेव्हा हा शोध संपतो तेव्हा आपली रसिकताही संपली असं समजायला हरकत नाही!

'शब्द' हे कला व्यक्त करण्याचं एक माध्यम झालं. तसंच 'चित्रं' हेही एक कलेची अभिव्यक्ति करण्याचं माध्यम आहे. परंतु माझं मन आपल्या रागसंगीतातच अधिकाधिक गुंतलेलं असल्यामुळे बर्‍याचदा मला एखादं चित्रं पाहूनदेखील चटकन एखादा रागच डोळ्यासमोर येतो! ही माझी व्यक्तिगत जाणीव झाली. आणि त्याच जाणिवेनुसार ही चित्रं पाहताना ते ते राग डोळ्यासमोर आले आणि या चित्रांच्या जागी मला काही 'ऍब्स्ट्रॅक्ट रागचित्रं' दिसायला लागली! ही रागचित्रं मी आपल्यासोबत शेअर करत आहे..

आता ह्या चित्रांतलं 'ऍब्स्ट्रॅक्ट रागस्वरूप' म्हटलं म्हणजे ते समजावून सांगायला पुन्हा शब्दही आले! ते शब्द मात्र माझे!
१)
हा तेजिनिधी लोहगोल मला भटियार रागाची आठवण करून देतो. प्रसन्न सकाळी कपाळाला केशरी टिळा लावलेल्या भटियाराचं राज्य असतं! भास्कर महाराजांसोबत अंबारीत बसून लालकेशरी प्रकाशकिरणांचे माणिकमोती उध़ळत हा भटियार अवतरतो! क्या केहेने! भटियारसारखा वैभवशाली राग दुसरा नाही!
२)
हा मुलतानी! आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातला एक स्वत:च्याच मस्तीत जगणारा राग! 'हम मुलतानी है...!' असं रगेल आणि रंगेलपणे सांगणारा! दुपारी आमरसपुरीचं यथेच्छ जेवून चांगलं ३-४ तास झोपावं, त्यानंतर उठून झकासपैकी माजुरड्या चहाची लज्जत चाखून त्या अंगावर आलेल्या दुपारच्या झोपेची धुंदी थोडी उतरवावी आणि चुना अंमळ जास्त असलेल्या १२० जाफरानी बनारसी पानाचा तोबरा भरून गाण्याच्या मैफलीत रुबाबात पुढे बसून अक्षरश: तुफ्फान जमलेला अण्णांसारख्या एखाद्या कसदार, खानदानी गवयाचा तेवढाच खानदानी मुलतानी ऐकावा! अद्भूत स्वरवैभव लाभलेला मुलतानी! खास किराणा पद्धतीचे निषादाचे तंबोरे झंकारावेत आणि मुलतानीने एका क्षणात सगळी मैफल स्वत:च्या ताब्यात घ्यावी, कह्यात घ्यावी, असा डौल त्या मुलतानीचा! आपणही एकदा हा अनुभव घेऊन पाहाच मंडळी!
एक रुबाबदार, देखणा, आणि खानदानी राग! वरील चित्रात्रला flames of forest ची आठवण करून देणारा तो डोंगर आणि त्याच्या लगतचं ते झोकदार, मस्तीभरं वळण आहे ना, ते वळण म्हणजे मुलतानी!

३)
३) आणि हा मारवा! हा म्हणजे केवळ अन् केव़ळ फक्त हुरहूर आणि दुसरं काही नाही! नेहमी कुठली अनामिक हुरहूर याला लागून राहिलेली असते तेच समजत नाही. या चित्रात पाहा, हा त्या समुद्राच्या किनारी बसला आहे आणि दूर क्षितिजापलिकडे जाणार्‍या सूर्याला, 'अरे थांब रे अजून जरा वेळ, इतक्यात माझी संगत सोडून जाऊ नकोस!' असं आर्तपणे सांगतो आहे. परंतु याची हाकच इतकी क्षीण आहे, की ती त्या सूर्यापर्यंत पोहोचतच नाही!
'आता जरा वेळाने अंधारून येईल!' ही भिती आहे का त्याला? की, 'काळजी कशाला? उद्या पुन्हा लख्ख उजाडणरच आहे', असा विश्वासच नाही त्याच्या ठायी?? जणू काही दिवसभर हा त्या सुर्याच्या सोबतीने किनार्‍यावर एकटाच बसला होता आणि आता तो सूर्यही याला सोडून चाललाय असंच वाटतं!

"कोकणातल्या त्या मधल्या आळीच्या ओसरीवर, भोवती माडाच्या काळ्या आकृती हालताना ती थकलेली, सुकलेली तोंड तत्वज्ञान सांगायला लागली की काळीज हादरतं!"
भाईकाकांच्या अंतुबर्व्यातल्या वरील ओळी अक्षरश: अंगावर येतात आणि मला नेहमी मारव्याचीच आठवण करून देतात!! आयुष्यभर फुरश्यासारख्या पायात गिरक्या घेणार्‍या कोकणी भाषेत पिंका टाकत हिंडणार्‍या अंतुबर्व्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी मला फक्त मारवाच दिसतो! कारण विचाराल तर ते मी सांगू शकणार नाही, कदाचित वरील चित्रं सांगू शकेल!
 
-- तात्या अभ्यंकर.

June 13, 2010

अल्लाजान..

त्याला सारे अल्लाजान असं म्हणायचे. कोण होता तो? एका घरवालीचा हरकाम्या. कुणाचा? रौशनी नावाच्या एका घरवालीचा हरकाम्या.. रौशनीआपा आणि तिच्या साऱ्या वेश्या मुली यांचा हरकाम्या. अजून एक हरकाम्या होता मन्सूर. आणि हा अल्लाजान. रौशनीआपाचा वेश्याव्यवसाय चालायचा फोरासरोडला.

तिथे हरकाम्या होता अल्लाजान..

आणि काय ओळख होती या अल्लाजानची? स्त्री? नाही. पुरुष? नाही! अल्लाजान तृतीयपंथी होता.
उभट, किंचित दाढीचे खुंट वाढलेला काळसर बायकी चेहरा.. हावभावही बायकी.. अंगात सदैव कुठलातरी मळका पंजाबी ड्रेस घालायचा.. डोक्याचं साफ टकलं त्यामुळे एक कुठली तरी मळकट ओढणी नेहमी डोक्यावर ओढलेली असायची! चेहऱ्यावर तसं निरागसच परंतु सततचं एक लाचार हास्य! खूप दयनीय दिसायचा अल्लाजान.. माझ्या पोटात नेहमी खूप तुटायचं त्याच्याकडे पाहून!

त्याचं अल्लाजान हे नाव खरं की पडलेलं? तो त्या वस्तीत केव्हापासून आला, कसा हरकाम्या झाला? मला माहीत नाही! या जगात एका दमडीचीही किंमत नसलेल्या अल्लाजानची माहिती कोण ठेवतो? आणि कशाकरता??

रौशनीच्या चाळीशेजारीच झमझम हा देशी दारूचा बार. मी तिथे कॅशियर कम मॅनेजर. एके दिवशी हा अल्लाजान डायरेक्ट बारमध्येच घुसला आणि एकदम माझ्या काउंटरपाशीच भिडला!.. अंगाला जाम वास मारत होता त्याच्या. दळिद्रतेचा, गरिबीचा, लाचारीचा! मला किळसच आली त्याची..

"दो बोईल अंडा पार्सल! "

लाचारीने हसत अल्लाजानने बोईल अंड्यांची पार्सल ऑर्डर दिली..

"आप तात्यासाब है ना? मन्सूरने बताया! " पुन्हा एकदा लाचारी.. बोलताना स्वत:ची लाळ गळते आहे याचीदेखील त्याला लाज नव्हती, शुद्ध नव्हती..!

"शी! कुठल्या घाणेरड्या वस्तीत आपण काम करतो आहोत? ते देखील पोटाकरता? " माझं सुसंस्कृत पांढरपेशी स्वगत!

हरकाम्या म्हणजे कामं तरी को़णकोणती करायचा हा अल्लाजान? पडतील ती कामं करायचा. वेश्यांना लागणाऱ्या पिना-पावडरी-कंगव्यांपासूनच्या साऱ्या वस्तू बाजारातून आणणे, चहापाणी, भुर्जी-आम्लेट पार्सल आणून देणे.. झाडूपोता करणे.. 

वेश्यांचे कपडे धुणे.. त्यात घाणेरडी, पिवळसर डाग पडलेली त्यांची अंतर्वस्त्रं देखील जमा! साऱ्या जगाची वासना जिथे सांडायची त्या वासनेचे वेश्यांच्या अंतर्वस्त्रांना पडलेले डाग अल्लाजान धुवायचा..!

अगदी पडेल ती कामं करायचा अल्लाजान!

त्या बदल्यात वेश्या त्याला ५-१० रुपयांची रोजी द्यायच्या.. त्या रोजीत अल्लाजान खूश असायचा. आता खूश असायचा असंच म्हटलं पाहिजे..

दुपारच्या फावल्या वेळात, म्हणजे जेव्हा वेश्यांना वासनेचे दणकट घाले सहन करण्यापासून थोडा निवांतपणा मिळायचा त्या वेळेस कधी व्हरांड्यात सगळ्या वेश्या एकत्र जमून अल्लाजानशी हसीमजाक करायच्या.. अल्लाजानही तेव्हा जमेल तसा नाचेपणा करून हसायचा, हसवायचा, खिदळायचा. त्या दुनियेतले हेच काय ते जरा करमणुकीचे, सांस्कृतिक कार्यक्रम!

अल्लाजानशी थट्टामस्करी हीच त्या वेश्यांची करमणूक आणि त्या वेश्या, त्यांची कामं, आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या चार दमड्या हीच अल्लाजानची दुनिया!

"तात्यासाब... पहला पानी पिओ... घबराव मत. पोलिस अब उस मादरचोदकी चमडी उधेडेगा! " असं म्हणून अल्लाजानने पाण्याचा ग्लास माझ्या पुढ्यात धरला होता..

दारू पिऊन, विना पैसे देता बारमधून निघून जाणाऱ्या फोरासरोडवरील एका गुंडाशी माझी हातापायी झाली होती.. मी त्याला जाम मारला होता, त्यानेही मला धुतला होता.. लगेचच तिथे पोलिस आले.. आमचा हप्ता बांधलेला असल्यामुळे त्या गुंडाचा जबरदस्त बंदोबस्त होणार होता..

मी रस्त्यात धुळीत किंचित कोलमडलो होतो. थोडं खरचटलंही होतं. बावरलो होतो, घाबरलो होतो.. अश्या परिस्थितीत भर रस्त्यात माझ्या पुढ्यात पाण्याचा गिल्लास धरला होता तो अल्लाजानने!

तेव्हा कुठे गेली होती माझी किळस? लाज वाटली होती तिला.. तेव्हा मला त्याच्या अंगाचा दर्प आला नाही.. त्याच्या. दळिद्रतेचा, गरिबीचा, लाचारीचा दर्प नाही जाणवला मला! दिसली ती फक्त निरागसता, आणि माणूसकी!. कुठल्याही मिनरल, बिसलेरीच्या बाटलीतल्या पाण्यापेक्षा अल्लाजानने पुढे केलेल्या त्या ग्लासातलं पाणी अधिक स्वच्छ होतं, शीतल होतं, निर्मल होतं!

अजून काय लिहू? अल्लाजानबद्दल अधिक भरभरून लिहावं असं काही नाही माझ्याकडे.. आणि ज्याच्यावर पानंच्या पानं संपवावीत असं अल्लाजानचं व्यक्तिमत्त्वही नव्हतं..

"तात्यासाब, चिकनका प्लेट और दो रोटी कितनेको? "

मी रक्कम सांगितली.. हातातल्या पैशांची जुळवाजुळव करत अल्लाजान पुन्हा एकदा लाचार हसला होता आणि थोडा वेळ रेंगाळून निघून गेला होता. त्याला चिकन खायचं होतं पण त्याच्यापाशी पैसे होते ते पुरेसे नव्हते, जुळत नव्हते..

असेच काही दिवस गेले. चार दमड्या माझ्या खिशात होत्या. मला अचानक आठवण झाली ती अल्लाजानची.. तो रौशनीआपाच्या चाळीच्या बाहेरच रेंगाळत बसला होता..

"ए अल्लाजान... " मी हाक मारली..

"बोलो तात्यासाब" तो धावतच माझ्यापाशी आला..

"चल मेरे साथ.. "

टॅक्सी केली आणि जवळच असलेलं दिल्ली दरबार गाठलं..

मी आणि एक मळकट, गलिच्छ तृतीयपंथी असे दोघे दिल्ली दरबार मध्ये जेवत होतो..

चिकन मसाला, बिर्याणी, गरमागरम रोट्या, सोबत दहीकांद्याची कोशिंबीर..

हाटेलातले सारे लोक अत्यंत चमत्कारिक नजरेने आमच्याकडे पाहात होते..

सुरवातीला लाजलेला, मुरकलेला अल्लाजान नंतर अगदी मनसोक्त जेवत होता..

धुळीत पडलेल्या तात्याला पाणी आणून देणारा अल्लाजान मनसोक्त जेवत होता..!

-- तात्या अभ्यंकर.

June 11, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (३६) - घाल घाल पिंगा..

घाल घाल पिंगा.. (येथे ऐका)



सुमन कल्याणपुरांचा अत्यंत सुरेल, थेट काळजाला भिडणारा आवाज


घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात
माहेरी जा, सुवासाची कर बरसात..


भादव्यातच जेमतेम वर्ष झालेल्या सासरी सखा तरी कोण मिळणार? त्यामुळे वार्‍यालाच सखा मानलं आहे आणि त्याच्याशी संवाद साधला आहे..


'सुखी आहे पोर' सांग आईच्या कानात..


अतिशय म्हणजे अतिशय हळवी ओळ! इतका सुंदर रिषभ आणि गंधार फार क्वचितच पाहायला मिळतो. 'रे सख्या वार्‍या, माझ्या माहेरी गेलास तर घरात इतर काही मंडळी असतील, वडीलधारी मंडळीही असतील.. त्यांच्यासमोर काही बोलू नकोस.. तसाच थेट माजघरात जा. तिथं माझी आई असेल.. माझं इकडचं सुख हळूच, हलकेच तिच्या कानात सांग.. खूप सुखावेल रे ती..! लगेच तुला खरवस किंवा बेसनाचा लाडू खायला देईल! खूप छान करते रे माझी आई बेसनाचे लाडू!


परसात पारिजातकाचा सडा पडे,
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे?


धाकटा दीर असावा तसा संवाद आहे हा वार्‍याशी.. 'अरे माझं माहेरही खूप समृद्ध आहे रे.. तेथल्या परसातला पारिजातक मी इथं बसून पाहते आहे.. मला हवी आहेत रे ती सारी फुलं!


कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय..


इथे शब्द संपतात..!


मराठी भावसंगीतातलं एक अतिशय सुरेख गाणं..नव्यानेच सासरी गेलेल्या मुलीचं यापरीस हळवं मनोगत ते कोणतं?!


-- तात्या अभ्यंकर.





एक निवेदन...



मी सुरू केलेल्या मिसळपाव डॉट कॉम या संकेतस्थळावर आजपर्यंत मुखपृष्ठाची जिम्मेदारी मी माझ्या कुवतीनुसार जे सुचेल, जे रुचेल ते लिहून सांभाळली.. इतकेच नव्हे तर मराठी संस्थळांच्या इतिहासात रोज निराळे मुखपृष्ठ व खादाडी सदर याचीही कल्पना राबविली व ती सर्वप्रथम मिपावरच सुरू केली..


परंतु या पुढे काही व्यक्तिगत कारणांमुळे मिपाचे मुखपृष्ठ व 'खादाडी सदर' ही जिम्मेदारी मला निभावता येणार नाही असे नमूद करू इच्छितो..


आजपर्यंत मिपावर सादर केलेल्या निरनिराळ्या मुखपृष्ठांबाबत अनेकांनी ती आवडल्याचे कळवले व कौतुकही केले. त्या सर्वांचा मी ऋणी आहे..


त्याचप्रमाणे मिपावर आजवर सादर केलेली मुखपृष्ठे ही या माझ्या ब्लॉगवर तसेच मनोगत डॉट कॉम या संस्थळावर 'काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे' या सदराअंतर्गत वाचायला मिळतील..


मिपाला अनेक शुभेच्छा..


धन्यवाद,


--तात्या.

June 04, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (३५) - माझे मन तुझे झाले..

माझे मन तुझे झाले..(येथे ऐका)

अनेक वर्षांपूर्वी आलेल्या स्वामी मालिकेतलं हे सुरेख गाणं. शब्द व संगीत सुधीर मोघेंचं. सुचित्रा बर्वेने खूप सुंदर गायलं आहे हे गाणं..

थोरले माधवराव पेशवे आणि रमाबाई. कधी नव्हे ते निवांतपणाचे दोन क्षण माधवरावांना व त्यांच्या पत्नीला मिळाले आहेत.. हे गाणं म्हणजे एक मूक संवाद, एक अनामिक ओढ, एक हुरहूर..! गूज एका प्रियकर-प्रेयसीतलं, एका पतिपत्नींतलं. विश्वास एका पतिपत्नीतला.. जगातल्या सर्वात सुंदर नात्यातला..!

खरं तर पुरीयाधनश्री रागातली एक विराणीच ही. राग पुरीयाधनश्री. पुरियाधनाश्री म्हणजे प्रार्थना, पुरियाधनाश्री म्हणजे आर्तता! केवळ अन् केवळ समर्पणाची भावना असलेला, असा हा एक विलक्षण स्वरसामर्थ्य असलेला राग!

पुरीयाधनाश्रीतलं हे गाणं म्हणजे केवळ एका प्रियकराचं आणि प्रेयसीचं बागेतलं गाणं नव्हे! माधवरावांच्या ऐन तारुण्यात जाण्याने रमामाधवाचं सहजीवन, त्यांच्यातला प्रेमसंवाद अपुराच राहिला. अतृप्तीच राहिली. अतृप्तीची भावना वाईट नसते! आयुष्याच्या सार्थकतेची, भरभरून जगलेल्या सहजीवनाची किनार जर त्या भावनेला असेल तर त्या अतृप्तीतही कुठेतरी एक आनंद असतो, एक समाधान असतं! परंतु अकाली, ऐन तारुण्यात आलेल्या मृत्युची एक भकास किनार जर तिथे असेल तर त्यातून आलेली अतृप्ती ही जीवघेणी ठरते, सरभैर, बेचैन करणारी ठरते!

वेदना जेवढी सुंदर बोलते तेवढं कुणीच बोलत नाही! आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की चांगलं गाणं हे बर्‍याचदा वेदनेपोटीच जन्माला येतं! आणि त्यातूनच पुरीयाधनाश्रीतली ही विराणीही जन्म घेते व जीवाला चटका लावून जाते!

-- तात्या अभ्यंकर.