December 23, 2010

(४३) - आलो कुठून कोठे..


(येथे ऐका)
'आलो कुठून कोठे..' - नीधनीसां.. 
या संगतीने किंचितशी 
मल्हाराची आठवण करून देणारी सुरवात..परंतु पुढच्याच 'तुडवीत पायवाट..' ची 'मधध' ही संगती मल्हाराची पायवाट सोडून अचानक शहाण्यात (शहाणा कानडा) शिरते तेव्हा त्या बदललेल्या पायवाटेचं कौतुक वाटतं.. कानांना सुखावतं ते शहाण्यातलं वळण..!

काटे सरून गेले..उरली फुले मनात..! - यातला शुद्ध रिखभ आश्वासक वाटतो. पायवाटेत भेटलेले काटे सरून गेले. त्याचं आता दु:ख नाही.. मनात उरली आहेत ती फक्त त्या वाटेवरली फुलं..!

प्रत्येक पाउलाचे होते नवे इशारे..
सार्‍या ऋतूत लपला हृदयातला वसंत..!


गाण्याचा अंतराही छान. 'तू तिथे मी..' चित्रपटातले आयुष्यभर नौकरी करून, सोबत सार्‍या सांसारिक जिम्मेदार्‍या पार पाडून निवृत्त झालेले मोहन जोशी - ऊर्फ नाना आता निवांतपणे आरामखुर्चीत विसावले आहेत. सुहास जोशी ही त्यांची 'अगं..' देवापाशी काहीबाही पोथी वाचत बसली आहे. आता अगदी कृतार्थ आहेत म्हातारा-म्हातारी..! Smile

संगीतकार आनंद मोडकांचं हे एक छोटेखानी गाणं. गाण्याची चाल अगदी मोकळी परंतु तितकीच सुरेख. छान जमलेला अध्ध्या त्रितालाचा ठेका. गाण्यातली संतूरही अगदी प्रसन्न..! शेवटी काय हो, ' काटे सरून जाऊन मनात फुलं उरणं हेच महत्वाचं..!

-- तात्या अभ्यंकर.

December 22, 2010

कृष्णा नी बेगने..

कृष्णा नी बेगने..(येथे ऐका)

(हे माझं रसग्रहण हे मूलत: गाण्याच्या सांगीतिक भागावर आहे..काही वर्षांपूर्वी एकदा अण्णांशी निवांतपणे संवाद साधायची संधी मिळाली होती.. बोलताना अण्णांनी मला 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा' आणि 'कृष्णा नी बेगने..' या कन्नड गाण्यांचा मराठीत अर्थ समजावून सांगितला होता, तो पुसटसा आठवतो आहे, तसा लिहितो आहे. येथे कुणी कन्नड जाणणारा/जाणणारी असल्यास मी जे कानडी शब्द लिहिले आहेत, आणि पदाचा जो अर्थ लिहिला आहे त्यात अवश्य सुधारणा करावी. त्याचं स्वागतच आहे..)

कानडी भाषेतलं कृष्णावरचं फार सुंदर गाणं.. व्यासतीर्थांची रचना.. यमुना कल्याणी रागातलं.. कर्नाटक-संगीतातला यमुना कल्याणी, आपल्या हिंदुस्थानी संगीतातला यमन कल्याण! दाक्षिणात्य गायिका चित्राने गायलं आहे हे गाणं..

साजूक तुपातली मिठाई तीच.. यमनची! फक्त बॉक्सेस वेगवेगळे! :)

'कृष्णा नी बेगने बारो' - रे कृष्णा इकडे (माझ्याकडे ) ये रे लवकर..!

'ष्णा' अक्षरावरच्या शुद्ध गंधारात अक्षरशः देवत्व आहे.. साक्षात श्रीकृष्णच वस्ती करून राहिला आहे त्या स्वरात.. किती कौतुक आहे त्या 'कृष्णा' शब्दात.. किती गोडवा आहे! एखादी आई आपल्या लाडक्या लेकाला ज्या ममत्वाने हाक मारते तेच ममत्व या 'कृष्णा' च्या स्वरात आहे.. फक्त दोनच स्वर - सा आणि ग!
'बेगने बारो..' तल्या 'बारो' शब्दावरची 'प रे' संगती म्हणजे अगदी ऑथेन्टिक यमन! :)

'बेगने बारो मुखवन्ने तोरो' - रे कृष्णा लौकर इकडे ये रे आणि मला तुझं मुखावलोकन करू दे..

खूप छान गायली आहे ही ओळ.. ह्यातल्या शुद्ध मध्यमाबद्दल मी काय बोलावं? यमनकल्याणातल्या शुद्ध मध्यमाबद्दल मी काय बोलावं? इतकंच सांगेन की तो शुद्ध मध्यम म्हणजे यमनाच्या गालावरचा सुरेखसा तीळ! हवं तर आपण त्याला बाळकृष्णाच्या गालावरील तीट म्हणू.. जी असते दृष्ट लागू नये म्हणून, कुठलंही अमंगल टाळण्याकरता असते ती.. परंतु ती तिट स्वत: मात्र अतिशय पवित्र.. सुमंगल आणि देखणी! तसा आहे यमनकल्याणातला शुद्ध मध्यम! :)

'बेगने बारो' गाताना चित्राने 'ध़नी़रेग..' ची एक सुरावट अशी घेतली आहे की नारायणरावांच्या 'नयने लाजवीत..' पदातल्या 'जणु धैर्यधर धरित धनदासम धन' मधल्या 'धनदासम' ची आठवण व्हावी! :)

काशी पितांबर कैयल्ली कोळलू
मीयोळू पुसिद श्रीगंध घमघम..



रे कृष्णा, तू सुरेखसं काशीचं केशरी पितांबर नेसला आहेस आणि तुझ्या हातात बासरी आहे..चंदनलेपाने अभ्यंगित अशी तुझी कांती आहे!..

मंडळी, हे अभ्यंग चंदनलेपाचं नव्हे, ते आहे यमनकल्याणच्या स्वरांचं.. काशीच्या भरजरी केशरी कदाचं जे सौंदर्य, तेच सौंदर्य यमनकल्याणचं..! :)

तायिगे बायल्ली मुज्जगवन्ने तोरिद
जगदोद्धारक नम्म उडुपीय श्रीकृष्ण..

कृष्ण, ज्याने बालपणी आपल्या मातेला आपल्या मुखात सार्‍या विश्वाचं दर्शन घडवलं होतं, असा सार्‍या जगाचा उद्धार करणारा असा उडुपीचा श्रीकृष्ण!



कृष्णाने सार्‍या जगाचा उद्धार केला आहे की नाही ते माहीत नाही, परंतु हिंदुस्थानी रागसंगीताचा प्रसाद वाटून सार्‍या संगीत रसिकांचा मात्र त्याने उद्धार केला आहे.. आपलं रागसंगीत हे त्यानं आपल्या पदरी घातलेलं सर्वात मोठं दान!

असो,

कन्नड भाषेतलं हे फार सुंदर गाणं.. याचं हरिहरनने फ्यूजन केलं आहे तेही खूपच सुंदर आहे.. येशूदासही सुंदर गातो हे गाणं..

सदरच्या ध्वनिफितीत चित्रानेही हे गाणं अगदी मन लावून गायलं आहे.. सोबतची बासरी आणि सतारदेखील खूप छान! बरं वाटतं हे गाणं ऐकून, समाधान वाटतं, पवित्र वाटतं, मंगल वाटतं..! हे देणं देवाघरचं, हे स्वरसामर्थ्य यमनकल्याणाचं..!

अण्णांशी जेव्हा या गाण्याबद्दल बोललो तेव्हा अर्थ सांगताना अण्णांनीही सहजच गुणगुणलं होतं हे गाणं. पण अक्षरश: शब्दातीत गुणगुणलं होतं..! फक्त माझ्यासाठी.. मी एकटा श्रोता, त्या अलौकिक स्वरांचा साक्षीदार!
अहो, सबंध गाणं तर सोडाच.. अण्णांनी सुरवातीचे नुसते 'कृष्णा नी ' हे शब्द गायले आणि मी जागीच संपलो.. कल्पना करा - अण्णांचा आवाज आणि कृष्णा नी मधले षड्ज, गंधार! अक्षरश: शंखध्वनी, नादब्रह्म!



असो..
हा लेख मी त्या जादुगार कृष्णाच्या, कानडाऊ विठ्ठलू असणार्‍या आमच्या पांडुरंगाच्या आणि कानडाऊ भीमसेनूंच्या चरणी अर्पण करत आहे..

-- तात्या अभ्यंकर.

December 21, 2010

भेट आभाळांची..!

नुकताच सचिनने टेस्ट मालिकेत ५० शतकांचा सुवर्ण महोत्सव साजरा केला. या अभूतपूर्व विक्रमाबद्दल सर्वप्रथम त्याचे मन:पूर्वक अभिनंदन..!त्याची डोळे दिपवून टाकणारी उत्तमोत्तम फटकेबाजी आम्हाला यापुढेही बघायला मिळावी हीच शुभकामना..

इथे मी काही सचिनच्या खेळाबद्दल भाष्य करणार नाही. मी सांगणार आहे एक आठवण.. खुद्द सचिननेच कुठल्याश्या दिवाळी अंकात सांगितलेली. तो कुठलासा मुलाखतवजा लेख होता एवढं नक्की आठवतंय. पण कुठला दिवाळी अंक हे आता आठवत नाही.. परंतु १९९५/९६चा सुमार असेल.. कारण अण्णा तेव्हा हवाईगंधर्व म्हणून कार्यरत होते!

ती आठवण अशी होती, की सचिन एकदा काही खाजगी कामाकरता मुंबैहून कलकत्त्याला विमानाने निघाला होता. हा साधारण दीड तासाचा प्रवास. मंडळी स्थिरस्थावर झाली होती.. विमान नभात होतं. सचिनला बसल्याबसल्या डुलकी लागली..काही वेळाने झोपेतच आपल्या जवळ कुणी उभं आहे अशी त्याला जाणीव झाली आणि त्याने डोळे उघडले..पाहतो तर जवळच एक सद्गृहस्थ उभे होते.. त्यांची व सचिनची नजरानजर झाली आणि ते सद्गृहस्थ दोन्ही हात जोडून सचिनला म्हणाले,

"नमस्कार. माझं नांव भीमसेन जोशी. आपला खेळ मला फार आवडतो, मी आपला चाहता आहे. आज अशी विमानात अचानक आपली भेट झाली याचा मला आनंद वाटतो!"

त्या आठवणीत सचिन पुढे असं लिहितो की 'मी बसल्याजागी उडालोच अक्षरशः! एवढा मोठा माणूस आणि इतका साधा आणि नम्र! मी पटकन उठून उभा राहिलो. त्यांनी माझे दोन्ही हात हातात घेतले व स्मितहास्य करून ते आपल्या जागेवर निघून गेले!'

मंडळी, 'गुणीजन जाने गुणकी बात' असं म्हणतात ते खरंच.. वास्तविक जेव्हा ही भेट झाली तेव्हा सचिनच्या ऐन भरारीचा तो काळ होता, सचिन घडत होता.. पण त्याला अभिवादन केलं ते एका सिद्ध पुरुषाने, एका योग्याने, एका स्वरभास्कराने! तेही आपल्या मानमरातबाचा, वयाचा, नावाचा कसलाही मोठेपणा न बाळगता! एक भारतरत्न, तर एक होऊ घातलेलं भारतरत्न!Smile



मंडळी, ही भेट खरंच दुर्मिळ.. ही भेट अनमोल.. ही भेट दोन आभाळांची, आभाळातच झालेली!

-- तात्या अभ्यंकर.

December 20, 2010

काही स्वरचित्रे काही शब्दचित्रे (४१).. तुम हो मेरे दिलकी धडकन..


तुम हो मेरे दिल की धडकन.. (येथे ऐका)

मंझील चित्रपटातलं 'रिमझिम गिरे सावन' हे गाणं सगळ्यांनाच माहित्ये. परंतु हे गाणं त्या मनानं अनवट...पंचमदांच्या या गाण्याचा स्वभाव, चाल, अगदी शांत.. शब्दही छान..हास्य

बच्चनसाहेबांची मैफल सुरू आहे.. पुढ्यात हार्मोनियम घेऊन गवयाचं जॅकेट वगैरे घालून बच्चनसाहेब शांतपणे गाताहेत..

तुम जो़ नही तो कैसी खुशी
मायुसियोंमे डुबी है जिन्दगी..


बच्चनसाहेब गाताहेत परंतु मैफलीत त्यांचं मन नाही. कारण गाणं ऐकायला त्यांची प्रेयसी मौशमी चॅटर्जी अजून आलेली नाहीये.. Sad

तुम्हे जो देखा तो पलको तले
लाखो दियेसे देखो जलने लगे!


आली! सुंदर, प्रसन्न दिसणारी मौशमी मैफलीत आली आणि बच्चनसाहेबांचा चेहरा खुलला! हास्य

म्हटलं तर अगदी साधंच गाणं, पण तितकंच सुरेख आणि शांत! अमिताभ बच्चन.. एक खूप मोठा कलाकार.. अगदी साधा, सुंदर परंतु बोलका अभिनय केला आहे हे गाणं म्हणताना त्यांनी..

मै हू 'झुम झुम झुम झुम झुमरू' किंवा 'देखा ना हाए रे सोचाना..' या सारखी गाणी गाणारेही किशोरदाच आणि हे शांत गाणं गाणारेही किशोरदाच! असा कलावंत होणे नाही..!
 
-- तात्या अभ्यंकार.

December 10, 2010

फेसबुकातलं ' तुम्हाला रस आहे का? ' हा काय प्रकार आहे..? ! :)

राम राम मंडळी,

आज फेसबुकावर हिंडत असताना अचानक मी http://apps.facebook.com या पानाकडे कुठुनसा ओढला गेलो. समोर विचारणा होती - तुमचा देश, तुम्हाला कोणत्या वयोगटाची आवड ( हास्य ) आहे वगैरे वगैरे..

साहजिकच आणि नैसर्गिकरित्याच मला या प्रकरणात रस वाटू लागला. आता मी चाळीशी प्लस असलेला. म्हटलं उगाच १८ ते २४ ही वयाची रेंज देऊन आपल्या वडीलकीला लाज येईल असं का उगाच काही करा ?..! हास्य

म्हणून मी मग ३१-३५ ही अनुभवी व ऐन तारुण्य बहरत असलेली रेंज निवडली आणि माझ्यासमोर एकेक फोटो येऊ लागले. प्रत्येक फोटोच्या वर तीन पर्याय -

१) तुम्हाला रस आहे का? (पक्षी - आर यू इंटरेष्टेडचं मराठी भाषांतर)
२) हो
३) पुढे चला (पक्षी - स्कीप!)

मी फटाफट हो किंवा स्कीप हे ऑप्शन क्लीक करू लागलो. माझ्या पुढ्यात आलेले वानगीदाखल हे काही फोटो आणि मनातले काही प्रश्न, शंका -



ही मुलगी अभ्यास करते आहे ना? मग फेसबुकात ' तुम्हाला रस आहे का..' या संदर्भात स्वत:चे फोटो कशी काय देते? अभ्यासात लक्ष नाही का हिचं? हास्य
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


आता ही आमची हैद्राबादची ३१ वर्षाची अमिना. पण ही तर ऑलरेडी एका काळसर इसमाला चांगली खेटून उभी आहे. मग आता मला सांगा, माझ्या पुढ्यात हिचं प्रोफाईल आलं असताना मी 'रस आहे..' या पर्यायावर टिचकी कशी मारणार?! हास्य तो काळा इसम एक तर तिला तरी किंवा मला तरी मारील नाय? ! हास्य
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


पुढल्या पानावर गेलो तर अचानक दिल्लीच्या एक भैय्याचंच चित्र पुढ्यात आलं! छ्या..! आता भय्ये फेसबुकावर पण येऊ लागले की काय..! हास्य
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


पुढल्या पानावर गेलो तर ३२ वर्षाच्या निलूचा फोटो पुढ्यात आला. हा फोटो पाहून मात्र मी लगेच ' रस आहे..! ' हा पर्याय निवडला.

बघुया आता काय होतं ते..! हास्य

नीलू मात्र अंमळ मोहक आहे हे खास..! हास्य

--(क्षणभंगूर का होईना, परंतु नीलूवर जीव जडलेला) तात्या.

December 04, 2010

काही स्वरचित्रे काही शब्दचित्रे (४०).. बिती ना बिताई..



बिती ना बिताई..(येथे ऐका)
हे केवळ एक गाणं नाही..,हे गाणं म्हणजे बरंच काही..!
हे गाणं म्हणजे जगातला सारा चांगुलपणा, सारी सृजनशिलता, सर्जनशिलता..! हे गाणं म्हणजे गुलजार-पंचमदांची प्रतिभा, दीदी-भुपेन्द्रसिंगची गायकी, जया-हरिभाईचा अभिनय! हे गाणं म्हणजे मृदुता, हे गाणं म्हणजे हळवेपणा..!
हे गाणं म्हणजे बरंच काही..!
हे गाणं म्हणजे पूर्वस्मृति, हे गाणं म्हणजे जे जे काही उत्तम, उदात्त, उन्नत ते सर्व.. हे गाणं म्हणजे गायकी, हे गाणं म्हणजे लयकारी, हे गाणं म्हणजे हार्मनी, हे गाणं म्हणजे केरव्यातला वजनदार ठेका!
हे गाणं म्हणजे, 'वो गोलिया क्या खतम हो गई?' या डॉक्टरांच्या प्रश्नावर 'सासें खतम हो गई!' हे हरिभाईचं उत्तर! हे गाणं म्हणजे पतीपत्नीचं गूज, बापलेकीचं गान, पितापुत्राचं अबोल, मुकं प्रेम!
'तुम्हाला 'मेथी का साग' खूप आवडायचं, असं बाबूजी नेहेमी सांगायचे..' असं जया भादुरी प्राणला सांगते..त्यावर 'वो मुझे याद करता था?' हा प्राणचा सवाल..त्यावर 'मेरे बाबूजी जैसा उसुलोंका पक्का और कोई नही..! असं माझे बाबूजी नेहमी म्हणायचे!' हे जयाचं उत्तर.. त्यावर भितीवरील हरिभाईच्या फोटोकडे पाहताना आलेलं प्राणच्या डोळ्यातलं पाणी..! त्याच्या पोटातलं तुटणं..!
हे गाणं म्हणजे बरंच काही..!

-- तात्या अभ्यंकर.

December 02, 2010

बम्बई मेरी जान..१ - मुंबैच्या लोकलगाड्यांच्या लाईनी..


राम राम मंडळी,

आजवर पोटापाण्याच्या निमित्तानं सारी मुंबै फिरलो. अगदी अनेकदा..

ह्या भटकंतीत प्रामुख्यानं साथ मिळाली ती आमच्या बेस्ट बसेसची आणि मुंबैच्या लोकल ट्रेन्सची. मुंबैच्या उपनगरी गाड्या म्हणजे मुंबैच्या धमन्या. मध्य रेल्चे, पश्चिम रेल्चे, हार्बर रेल्वे, अलिकडे निघालेली पनवेलपुतुरची रेल्वे वगैरे वगैरे..


अफाट जाळं आहे हे सगळं. नानाविध ठेसनं, क्रॉसिंग. छोटी मोठी जंक्शन्स, तर कधी मध्य-पश्चिम, तर मध्य-हार्बर तर कधी हार्बर-पश्चिम असं हे रेल्वेचं अंतर्गत छोटंमोठं क्रॉसिंग, रेल्वे रुळांचा परस्पर काटशह आणि या काटशहाचे उडाणपूल..

मुंबै फिरताना हे सगळं खूप अनुभवलं, पाहिलं. मुंबै उपनगरीय रेल्चे प्रवासाला कंटाळून न जाता कधी डब्यातल्या लोकांचे चेहेरे वाचायचा प्रयत्न केला तर कधी खिडकीबाहेर पाहात तर कधी मस्त मजेत फुटबोर्डावर उभं राहून आपण घाटातून जाताना कशी मजा बघतो तसं मनसोक्त मुंबै दर्शन घेतलं..भरभरून प्रेम केलं मुंबै नावाच्या अजब शहरावर..

आता सुरवातीपासनंच जशी आठवेल तशी सुरवात करतो आमच्या मुंबैच्या रेल्वे जाळ्याची उकल करण्याची.


या लेखाचा हेतू?

फक्त थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न या पलिकडे काहीही नाही. यामुळे झालाच तर या माहितीचा थोडाफार उपेग मुंबैत येणार्‍या काही नवख्यांना होऊ शकेल. माझ्यासारखे जाणते मुंबैकर उगाचंच डोळ्यासमोर क्षणभर तो रेल्वेमार्ग आणतील आणि मी लिहिलेली माहिती चूक की बरोबर हे तपासून पाहतील इतकंच..!हास्य

मुंबैच्या उपनगरीय गाड्यांची उकल संपली की मग सार्‍या आशिया खंडात जी उत्कृष्ट मानली जाते ती आमच्या मुंबैच्या बेस्ट बशींची रोचक माहिती मी देईन.. आणि त्याचसोबत जमलंच तर मुंबैच्या रस्त्यांबद्दल लिहिन. आजतोवर जवळजवळ सारीच मुंबै कधी बेस्टच्या संगतीत तर कधी पायी तुडवली आहे.

हा सगळा लेखनप्रपंच का? कारण एकच. मंडळी, खूप पिरेम करतो आम्ही या शहरावर..! हास्य

असो.. तर आता सुरुवात करुया..

चर्चगेटाहून पश्चिम रेल्चेने तुम्ही निघालात की तुम्हाला पहिलं जंक्शन भेटतं ते दादर. हे मध्य आणि पश्चिम रेल्वेचें एक कॉमन स्टेशन. तूर्तास दादरला बाजूला ठेउया. त्याच पश्चिम रेल्वेने तुम्ही दादरहून फुडे सरकलात की पुढे माटुंगारोड नावाचं एक लहानसं, निरुपद्रवी स्टेशन लागतं. ते ओलांडून पुढे सरकलात की तुमच्या पश्चिम रेल्वेला पहिला काटशह बसतो तो आमच्या हार्बर रेल्वेचा. वडाळा-किंग्जसर्कल कडून येणारी मध्यरेल्वेची लाईन माटुंगारोडच्या पुढे पश्चिम रेल्वेला पूर्वेकडून येऊन काटते आणि मग येथून पुढे मध्य व पश्चिम रेल्वेच्या ह्या दोन्ही लाईनी गुण्यागोविंदाने एकत्र धावतात व माहिम स्टेशनात विसावतात. त्यामुळे माहिम स्टेशनला 'जंक्शन' ही पदवी मिळाली आहे. म्हणजे माहिमहून येताना एक लाईन चर्चगेटाकडे तर एक लाईन वडाळ्याकडे..

इथून मग पुढे ह्या दोन्ही लाईनी खार, सांताक्रुज, विलेपार्ले करत थेट अंधेरीपर्यंत एकत्र धावतात. मी जेव्हा जेव्हा माहिम ते अंधेरी हा पश्चिम रेल्वेचा प्रवास करतो तेव्हा खिडकीबाहेर माझ्यासंगती धावणार्‍या मध्य रेल्वेच्यादेखील लाईनी पाहून मला खूप भरून येतं. अहो या तर माझ्या माहेरच्या लाईनी. कारण मी ठाण्याचा, म्हणजे शेन्ट्रल रेल्वेचा..! हास्य

आता जरा वेळ अंधेरीला थांबुया. हम्म..का थांबुया? तर तूर्तास नाही परंतु आज ना उद्या अंधेरी स्टेशनलादेखील पूर्व पश्चिम असा एक काटशह बसणार आहे..! हास्य

आमच्या मध्यरेल्वेवरच्या गुज्जूभाईंचं घाटकोपर स्टेशन हे जंक्शन होणार आहे कारण घाटकोपर ते थेट पश्चिमेला वर्सोव्यापर्यंत अश्या एका नव्या मोनो रेल्वेलाईनची आखणी/कामकाज तूर्तास प्रस्तावित आहे. मज्जा मज्जा आहे बरं का मंडळी य लाईनीवर. कोण-कोणती स्टेशनं असणार आहेत या लाईनीवर? ऐकाल तर खुश व्हाल. कारण या अत्यंत गजबजलेल्या आणि ट्राफिक जामने सदैव हैराण असलेल्या या मार्गावर रेल्वेमार्गाची कृपा होणार आहे. असल्फा, सुभाषनगर, साकिनाका, मरोळनाका, एयरपोर्ट रोड, चकाला, त्यानंतर अंधेरीला काटशह देत डीन एन रोड आणि वर्सोवा..! आहे की नाही मज्जा? त्यात पुन्हा मरोळनाका ते साक्षात छत्रपति शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत एक लाईन जाणार आहे. त्यामुळे वर्सोव्याकडून व घाटकोपर मार्गे ज्यांना विमानतळावर जायचं आहे ते बापडे ट्रॅफिक जाम मधून कायमचे वाचतील..

पण काय सांगावं मंडळी? ही मुंबै आहे. आणि आमचे मुंबैकर एकेदिशी ही मोनोरेलदेखील पार जाम करून टाकतील.. हास्य

तर कुठे होतो आपण?

येस्स. अंधेरीला होतो. (अंधेरी म्हणजे आपल्या माधुरीचं गाव बर्र का..! या लेखमालेत मी जाता जाता काही हिंदी-म्हराटी नट्यांचीही उपनगरं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.. हास्य

तर अंधेरीहून आता पश्चिम रेल्वेनं सरळ फुडे चला. जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली (अस्सल मुंबैकरांच्या उच्चारी बोरोली. जसं डोंबिवलीचं डोंबोली तस्सच बोरिवलीचं बोरोली..! हास्य , आणि मग दहिसर.

इथेच थांबा मंडळी. कारण दहिसर चेकपोस्टाच्या पुढे मुंबै पालिकेची हद्द संपते अन् आमचा ठाणे जिल्हा सुरू होतो. मुंबै महापा संपून मिरारोड-भाईंदर महापा सुरू होते.. (भाईंदर उच्चारी - भैंदर!) आणि त्यानंतर नायगाव हे स्टेशन घेऊन गाडी येते वसईला. वसई..! माझं एक अतिशय लाडकं गाव. वसईची ताजी मच्छी, तिथली लोकल दारू, वसईची खाडी..! नक्की लिहीन एकदा केव्हातरी वसईच्या गंमती.. हास्य कोणे एकेकाळी वसईच्या मर्लीन नावाच्या एका बाटग्या खिरिस्तावणीच्या पिरेमात पडलो होतो. आहाहा..! काय रसरशीत दिसायची आमची मर्लीन..! हास्य

काय सांगू मंडळी, गोरेगाव हा शब्द लिहिताना गोरेगाव पूर्वला स्टेशनच्या बाहेरच असलेलं आमच्या गाळवणकरशेठचं हॉटेल सत्कार आठवलं हो. फारा वर्षांपूर्वी जेव्हा फक्त मुंबै दूरदर्शन होतं तेव्हा मनाली दीक्षित नावाची एक सुंदर स्त्री दूरदर्शनवर निवेदिका होती. वा वा! काय दिसायची छान. तर सांगायचा मुद्दा काय तर आमची मनालीही गोरेगावचीच..! हास्य

मालाडला असलेले भैय्यांचे तबेले-गोठे आठवले, आणि कांदिवली? एका वेड्या वयात चित्रा जोशी नावाच्या मुलीवर जीव जडला होता माझा. चित्राला आता कांदिवलीला दिल्यालादेखील अनेक वर्ष झाली. पण जेव्हा जेव्हा कांदिवली क्रॉस करतो तेव्हा तेव्हा मिश्किल चेहेर्‍याची चित्रा आठवते. असो.. हास्य

अजून बरीचशी माहिती बाकी आहे मंडळी. ती 'मुंबै मेरी जान..'च्या ती फुडल्या भागात.. हास्य

तोवर हे गाणं ऐका....

आपला,
(हाडाचा मुंबैकर) तात्या.