March 31, 2011

पाकसिद्ध बल्लवाचार्य गणपा..!

फाईन आर्टस्. कोणत्या? संगीत, क्रीडा, साहित्य, शिल्प, चित्र, नाट्य आणि सर्वात महत्वाची फाईन आर्ट म्हणजे पाककला..! या कला परमेश्वर सर्वांच्याच हाती देत नाही, देत नसतो. लाखोकऱोडोत एक लता होते, एक भीमण्णा होतात, एक सचिन होतो. त्याचप्रमाणे असंख्य मराठी ब्लॉग्जवर एक ब्लॉग जन्म घेतो - खा रे खा..! आणि या ब्लॉगचा कर्ता असतो माझा मित्र गणपा..!
पाककला, पाककृती, किंवा पाकक्रिया या शब्दांच्याही वरचढ एक शब्द आहे आणि तो म्हणजे पाकसिद्धी..! गणपाचं पाककौशल्य पाहिलं की त्याला या कलेतील सिद्धी प्राप्त झाली आहे असंच म्हणावं लागेल. सिद्धी असल्याशिवाय अशी देखणी, चवदार पाककृती हातातून उतरत नाही. सिद्धीला वयाचं वावडं नसावं आणि म्हणूनच इतक्या तरूण वयात गणपा 'बल्लवाचार्य' या पदास पोहोचला आहे हे सांगायला मला सार्थ अभिमान वाटतो. 'पाककलेतील सिद्धपुरुष', 'बल्लवाचार्य', 'पाकसिद्धीमहामहोपाध्याय' अश्या अनेक पदव्या आमच्या गणपाला शोभून दिसतील..!
गणपाचा खारेखा हा ब्लॉग अक्षरश: बघत राहावा असा आहे. किती नानाविध पदार्थ? तेही सचित्र, सुरेख मांडलेले..! असं म्हणतात की एखादी सुंदर नटलेली, थटलेली बाई डयरेक्ट बघण्यापेक्षा ती जेव्हा तिचा तो साजशृंगार करत असते, तिचा केशसंभार सवारत असते, खोपा घालीत असते, नाकी नथ आणि गोर्‍यापान दंडावर छानशी जाळीदार वाक चढवत असते तेव्हाच तिला पाहावं..! भाईकाका म्हणायचे की गाण्याच्या सुरवातीला जेव्हा वाद्य लागत असतात, तबले-तानपुरे-सारंग्या जुळत असतात ते श्रवणसुख काही औरच..!
त्याचप्रमाणे गणप्याच्या पाककृती जेव्हा जन्म घेत असतात तेव्हापासूनच त्या पाहण्यात खरी गंमत आहे, मौज आहे, आनंद आहे. पाककृतीचं छानसं मांडलेलं साहित्य, नानाविध मसाले, कच्चामाल या सगळ्याची पूर्वतयारी याचेही अगदी स्टेप-बाय-स्टेप सुरेख फोटो गणप्याने दिले आहेत. आणि या सार्‍यासोबत गणपाची पाकवाणीही तेवढीच वाचनीय आणि चवदार .! 
चला आता एक लहानशी सफरच करू या गणपाच्या या ब्लॉगची..
काय? सुरवातीलाच गरमागरम आलूपराठा खायचा म्हणता..? हा घ्या..
हे त्याचं नटणं-थटणं पाहा किती लोभसवाणं..
आणि हा घा तैय्यार आलूपराठा. हा वाढताना गणपा म्हणतो - " ताज्या ताज्या दह्या /लोणच्या बरोबर , आवडी नुसार तळलेल्या / कच्या मिरच्यांसोबत लुफ्त घ्या गरमा गरम आलु के पराठे का " 
आता काय? डायरेक्ट दम बिर्याणी खायची म्हणता? अहो थांबा थांबा, जरा तैय्यार तर होऊ द्या. तिला जरा 'दम'देणं सुरू आहे..! 
हम्म.. आता खा मनसोक्त... 
तुम्हाला जयपूर गायकी आवडते का? म्हणजे तुम्हाला अनवट राग आणि अनवट पदार्थ नक्कीच आवडत असणार..! त्याकरता ही घ्या खास तुमच्याकरता सुरणाच्या वड्यांची देखणी पूर्वतयारी.. तेलात सूर मारण्यापूर्वीचे हे सुरणाचे वडे..! तैय्यार वडे पाहायला तुम्हाला त्या ब्लॉगवरच मी पाठवणार आहे..! 
असो..
अहो इथे किती आणि कशाकशाची झलक दाखवू? अजून खूप खूप खादाडी शिल्लक आहे गणप्याच्या ब्लॉगवर. कुठे युरोपियन डोसाच आहे, तर कुठे इदेचा शीरखुर्मा आहे. कुठे पेपर चिकन आहे तर कुठे शाकाहार्‍यांकरता व्हेज बिर्याणी आणि सुक्या मटणाची व्हेज व्हर्जन आहे. कुठे केळफुलाचे जोरदार कबाबच आहेत तर कुठे देशप्रेम जागृत करणारे तिरंगा कबाब आहेत. मधेच छानशी कोथंबीर वडी सजूनधजून उभी आहे! 
कुठे उडपी उत्तपा हुशारी करतो आहे तर कुठे बोंडाची भाकरी तुमचा जीव एवढुसा करते आहे. कुठे चिकन साते, तर कुठे पात्रानी मच्छी. कुठे लाजवाब वांग्याचं भरीत तर कुठे तुमचा आत्मा थंड करणारी मलई कुल्फी..!
हा ब्लॉग निर्माण करून 'देता किती घेशील दो कराने' अशी तुमची माझी अवस्था करून ठेवली आहे गणप्याने! खरंच खूप कौतुक वाटतं, कमाल वाटते..!
या ब्लॉगवर वावरत असताना सतत कुठेतरी एक प्रसन्नता डोकावत असते. ती एकापेक्षा एक अजोड पाकशिल्प पाहताना त्या मागे असलेला दैवी परीसस्पर्श सतत जाणवतो..
आमचे अण्णा माडगुळकर म्हणतात-
या वस्त्राते विणतो कोण?
एकसारखी नसती दोन
कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्‍याचे..!
त्याचप्रमाणे गणप्याच्या पाककृतींमागे असलेले साक्षात आई अन्नपूर्णेचे अदृष्य हात आपल्याला दिसत नाहीत इतकंच..!
-- तात्या अभ्यंकर.

March 29, 2011

मोहाली उपान्त्य सामना आणि मनमोहन सरकारची लाचारी...!


चेंडुफळीच्या विश्वचषक स्पर्धेत भारत-पाक हा सामना उद्या मोहालीत होणार आहे त्याबद्दल आमचे काहीही म्हणणे नाही. दोन्हीही संघ आयसीसीचे सभासद असल्यामुळे व हा सामना विश्वचषकातीलच एक असल्यामुळे त्याला आमचा विरोध नाही व तो करण्याचे काही कारणही नाही. आमचा मुद्दा वेगळाच आहे.
भारतासारख्या सार्वभौम देशाच्या पंतप्रधानांनी पाकच्या राष्ट्रप्रमुखांना हा सामना पाहण्याकरता मोहालीत येण्याचे जे प्रेमाने आणि उमाळ्याने आमंत्रण दिले आहे त्याबद्दल आम्ही अतीतीव्र शब्दात आमचा निषेध नोंदवतो. आमच्या मते भारतीय पंतप्रधानांचे हे अत्यंत लाचारीचे वर्तन आहे.
भारताच्या या निमंत्रणावर पाकने म्हणे अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. भारताची हद्द ओलांडून चुकून पाकिस्तानात घुसलेल्या गोपालदास नामक (चूभूदेघे) एक इसमाला पाकने त्यांच्या कैदेतून तात्काळ मुक्त केले आहे...!
यावर आम्ही भोळसट भारतीयांनी खुश व्हावे आणि मनमोहन सरकारची पाठ थोपटावी अशी सरकारची अपेक्षा आहे काय..?
सकारात्मकच जर प्रतिसाद द्यायचा असेल तर मग पाकने कसाबबद्दलची सगळी माहिती तात्काळ का नाही उपलब्ध करून दिली..? खंडणीची दहशत, गँगवॉर या सारखी कारस्थाने करून गेली अनेक वर्षे डोकेदुखी ठरलेल्या व सध्या पाकिस्तानात लपलेल्या दाऊद इब्राहिमला रातोरात भारताच्या हवाली का नाही केले..?
आम्ही असा अजून किती काळ लाचारीच्या मित्रत्वाचा हात पाकपुढे पसरणार आहोत? आणि का? कशासाठी..?
पाकच्या पंतप्रधानांना मोहालीत मारे प्रेमाचे आणि मैत्रीचे आमंत्रण देणारे पंतप्रधान मनमोहनसिंग मुंबै हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या संदीप उन्नीकृष्णनच्या घरी सांत्वनासाठी कधी गेले होते का हो..?
मुंबै सी एस टी स्थानकात, गेटवेला रक्ताची होळी खेळणार्‍या पाकिस्तानच्या राष्ट्रप्रमुखांपुढे ही लाचारी का..?
परंतु ज्या देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती एका इटालीयन मूळ असलेल्या स्त्रीकडून लीलया ठरवले जातात, स्थापित केले जातात त्या देशाला स्वाभिमान तरी का असावा..?
असो..
-- तात्या अभ्यंकर.
--
आई अंबे जगदंबे जातो सत्कर्मी जय दे
रिपुदमनाचा आईभवानी आम्हाला वर दे..!
(चित्रपट २२ जून १८९७)

March 28, 2011

नाविका रे...

नाविका रे, वारा वाहे रे,
डौलाने हाक जरा आज नाव रे..
(येथे ऐका)
 हे सांगतांना त्या नविकाबद्दल एक विश्वास आहे. जणू काही तो नाविक कुणी माहेरचाच मनुष्य आहे, ज्याला विश्वासाने काही सांगावं!
डौलाने हाक जरा आज नांव रे..!
मग? मला जायचंय पैलतिरी असलेल्या माझ्या घरी! छान वारा वाहतोय, सुंदर मूड आहे. मनी एखादी आस असली तरी सुंदर मूड तयार होतो, अन् त्या मुडातूनच मनीचं गुज सहजासहजी असं ओठांवर येतं, एखाद्या नाविकासमोर उघड होतं!
मग नाव कशी हाकायला हवी? डौलानेच ना? 
त्यामुळे 'डौलाने हाक जरा आज नांव रे..' ही ओळही तशीच डौलदार वाटत. ज्या डौलाने नाव हाकणं अपेक्षित, तोच डौल त्या ओळीतही! की त्या ओळीतल्या डौलामुळे नाव खरोखरच डौलदारपणे हाकायला हवी हे पटतं? की हेच गाण्याचे शब्द अन् त्याची चाल यांचं अद्वैत?
सांजवेळ झाली आता पैल माझे गाव रे..!
'पैल माझे गाव रे..' हे सागताना 'अरे समजून घे रे जरा, तीन सांजा झाल्या अन् पैलतीरी असलेल्या माझ्या गावाला मला लौकर जायचंय रे.. अशी समजावणी, एक आर्जव! आणि कुण्या जवळच्या सुहृद मित्राला सांगावं असा विश्वास..! एका नाविकाचं आणि स्त्री प्रवाश्याचं इतकं सुंदर नातं असू शकतं? धाकल्या दिरासारखं किंवा पाठच्या भावासारखं!
आषाढाचे दिसं गेले, श्रावणाचा मास सरे, भादवा आला
माझा राऊ मनामंदी बोलुनि गेला
धाव घेई बघ माझे मन, नाही त्याला ठाव रे...!
काय संवाद साधला माझ्या राऊनी माझ्यापाशी? आता तो संवाद त्या नाविकाला सांगायचाय! 'पैल माझे गाव रे..' ह्या आर्जवाने त्याला कधीच आपलासा केलाय! मग आता मनातल्या राऊचे संवाद त्याला सांगायला काय हरकत आहे अशी एक स्वाभाविकता..!
आषाढ गेला, श्रावण गेला अन् आता भादवा आला! भादवा हा शब्द असा गाऊन ठेवलाय की त्या एका शब्दात आषाढ आणि श्रावणाची प्रतिक्षा उभी केली आहे! आषाढ-श्रावणातली ती मौनप्रतिक्षा अखेर झालीच शेवटी प्रकट भादवा या शब्दातून..! 
एक म्हणणं मांडलं आहे 'भादवा' ह्या शब्दातून..!
आणि आता नावेत बसल्यावर अवचित त्या नाविकासमोर आषाढ-श्रावणातला विरह ओठी आला आहे!
भादवाही येऊन उभा राहिला आहे त्यामुळे आता पुढल्या अश्विनातलं शरदाचं चांदणं अन् अश्चिनातल्या पौर्णिमेची आस आता चांगलीच जाणवू लागली आहे! आता नाही धीर धरवत..!
नेमकं हेच जाणवतं का हो 'धाव घेई बघ माझे मन, नाही त्याला ठाव रे...!' या ओळीतनं? Smile
असो..

एक हृदयाला हात घालणारं गाणं! एखाद्या सर्जनशील, संवेदनशील चित्रकराला हे गाणं नुसत ऐकून हातात कुंचला घ्यावासा वाटेल आणि त्याच्या कॅन्व्हासवर डौलाने जाणारी ती छानशी शिडाची होडी उतरेल, मंद वारा वाहणारी ती सांजवेळ उतरेल.. त्या चित्रात पार्श्वरंग असतील भादवा आला ह्या म्हणण्याचे आणि असेल एक ओढ लगोलग येऊ घातलेल्या अश्विनातली...!
-- तात्या अभ्यंकर.

March 22, 2011

सजदा..

माय नेम इज खान सिनेमातलं एक वेगळंच गाणं. सुफी संगीताची पार्श्वभूमी असलेलं..
(येथे ऐका)

रोम रोम तेरा नाम पुकारे
एक हुए दिन रैन हमारे..

मिश्र खमाज म्हणता यावा अशी गाण्याची खानदानी सुरवात. (चूभूदेघे.)

'सजदा..'

ख्यालसंगीताची उत्तम बैठक असलेला राहत फतेचा आणि रिचा शर्माचा अविष्कार. आवाजाची जात, फेक ही सारी सुफी गायकीत जमा होणारी. सुरवतीची बोल आलापी संपल्यानंतर गाणं छानशी लय पकडतं..

तेरी काली अखियोसे जिंद मेरी जागे
धडकन से तेज दौडू सपनो से आगे..

शब्द आणि त्यांचा लहेजा उत्तमच..

अब जा लुट जाए
ये जहा लुट जाए..

यातली 'जहा' शब्दावरची जागा आणि गायकी खानदानी..! इथून पुढे गाणं केरव्याची छान लय पकडतं...

'संग प्यार रहे मै रहू ना रहू...'

या ओळीतली सुरावट म्हणजे या गाण्याचा प्राण, त्याचं मर्मस्थान. 'संग..' शब्दातली 'रेम'म' संगती आणि 'रहू ना रहू..' मधली 'रेग, गमधपरेसा..' ही संगती केवळ अप्रतिम..! त्यानंतरचा 'सजदा..' चा कोरसही सुरेख. त्याच्या पार्श्वभूमीवरील सजदा शब्दाची तार शड्जाशी संगती करणारी बोल आलापी आणि गायकी उत्तमच..
रिचा शर्मा या गायिकेची जोडही उत्तम. बाईनं खानदानी आवाज लावला आहे. नक्कीच सुरेल आहे. ही दुगल गाण्याला आवश्यक आणि तेवढीच शोभूनही दिसणरी..

एकंदर पाहता गाण्याला लाभलेली अभिजात गायकीची बैठक नक्कीच कौतुकास्पद आहे..शंकर एहेसान लॉयचं कौतुक वाटतं..

रांझणा नैनो के तीर चल गये
साजना सासो दिल सिल गये..

यातला शुद्ध मध्यम नेहमीप्रमाणेच अद्भूत आणि सुख देणारा..शाहरुख हा इसम आवडतो मला. लेकाचा तसा प्रो मुस्लिम आणि पाक-धार्जिणा वाटतो पण आवडतो मला. हा प्राणी टॅलेन्टेड आहे हे माझं मत. आणि आमच्या तनुजाच्या काजोलबद्दल काय बोलू? लै आवडते ती मला. हल्लीच्या नट्यांपैकी अभिनयाच्या बाबतीत एक तब्बू मला पयला नंबरवर आवडते आणि त्यानंतर काजोल. काजोलच्या चेहेरा विलक्षण बोलका आहे. तिचे यजमानही मला आवडतात. गंगाजल मध्ये छान काम केलं होतं त्यांनी..!

असो, सिनेमाच्या गप्पा पुन्हा केव्हातरी. तूर्तास सजदा हे गाण ऐका. छानच गाणं आहे..

-- तात्या अभ्यंकर.

March 20, 2011

वसंता पोतदार..!

अण्णांना जाऊन आता जवळ जवळ दोन महिने पूर्ण होतील. अण्णा गेले तेव्हादेखील मनात कुठेतरी वसंताचीही आठवण झाली. वसंता अण्णांच्या बराच आधी गेला होता.

वसंता पोतदार!

"ए तात्या, मला चक्क 'अरे वसंता' असं म्हणायचं बरं का! वसंतराव किंवा अहो-जाहो ची भानगङ नाय पाहिजे!"
वास्तविक वसंता माझ्यापेक्षा वयाने. ज्ञानाने कितीतरी मोठा! तरीही मी त्याला केवळ त्याच्या आग्रहाखातर 'वसंता' अशी एकेरीच हाक मारायचा.

अण्णांचं गाणं आणि त्यावर आत्यंतिक प्रेम हाच माझ्या आणि वसंताच्या मैत्रीचा मुख्य मुद्दा. अण्णांच्या गाण्याला वसंता अनेकदा भेटायचा आणि मग गप्पा रंगायच्या, धमाल चालायची!

वसंता हा अत्यंत व्यासंगी आणि विद्वान माणूस. एक चांगला लेखक, उत्तम वक्ता! स्वामिजींवरचं 'योद्धा सन्यासी', भाईकाकांवरचं 'एका पुरुषोत्तमाची गाथा', गाडगेबाबांवरचं 'तोचि साधू ओळखावा', अण्णांवरचं 'भीमसेन' ही त्याची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. वसंता स्वामिजींवर व्याख्यानही फार छान द्यायचा.
अण्णांवर पुस्तक लिहिण्याकरता म्हणून वसंता काही काळ सतत अण्णांसोबत असे. आणि अण्णांचं मुंबईत कुठेही गाणं असलं म्हणजे तिथे माझी हजेरी ही असायचीच. त्यातूनच माझी आणि वसंताची ओळख झाली, परिचय वाढला, दोस्ताना वाढला.

एकदा एका कार्यक्रमाच्या वेळी ग्रीनरूममध्ये साक्षात अण्णांनीच,

"हे अभ्यंकर. मुंबैच्या हायकोर्टात वकील आहेत आणि आमचे चाहते आहेत..!"
(मी मुंबैच्या हायकोर्टात वकील आहे हा अण्णांचा समज शेवटपर्यंत तसाच होता. मी एकदोनदा खुलासाही करून पाहिला होता. असो.)
तर,"हे अभ्यंकर. मुंबैच्या हायकोर्टात वकील आहेत आणि आमचे चाहते आहेत..!" अशी आपल्या खर्जातल्या धीरगंभीर आवाजात अण्णांनी वसंताला माझी ओळख करून दिली होती. वास्तविक मी अण्णांच्या लाखो भक्तांपैकीच एक, तसा नगण्यच! परंतु साक्षात अण्णांनीच ओळख करून दिल्यावर आणखी काय पायजेल?!

"क्या बात है, मिलाव हाथ!"

हे त्यावेळचे वसंताचे मनमोकळेपणे आणि आनंदाने उच्चारलेले शब्द मला आजही आठवताहेत!


एका कार्यक्रमानंतर चालायला त्रास होत असल्यामुळे मी आणि वसंता अण्णांना सोबत घेऊन जात आहोत.

त्यानंतर मुंबैतल्याच अण्णांच्या एका चाहत्याच्या घरी अण्णांचा मुक्काम होता. त्या घरी जाऊन विसावतो न विसावतो तोच बुवांचा पुन्हा मूड लागला आणि तंबोरे गवसणीच्या बाहेर निघाले! आणि काय सांगू मंडळी, पुन्हा एकदा जमलेल्या त्या बहारदार मैफलीबद्दल! अण्णांनी आमच्या पुढे दरबारीचा अक्षरश: महाल उभा केला होता! ऐकायला गिनेचुने श्रोते. भाईकाकांच्या शब्दात सांगायचं तर बेहोश झाला होता सारा मामला! वसंता आणि मी बाजूबाजूला बसलो होतो आणि अण्णांच्या दरबारीच्या सुरासुरांवर जीव ओवाळून टाकत होतो!

असो,

आज वसंता हयात नाही, अण्णाही गेले.

आठवणी फक्त उरल्या आहेत..!

-- तात्या अभ्यंकर.

March 17, 2011

जीव झाडाले टांगला...!

अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला..!

यशवंत देवांनी संगीत दिलेलं आणि उत्तरा केळकरांनी गायलेलं हे अप्रतीम गाणं इथे ऐका!

खोपा हे वास्तविक सुगरणीचं घर, घरटं! त्या घरट्याला झोक्याची किती सुंदर उपमा बहिणाबाईंनी दिली आहे! एखाद्या घरट्याला तुम्हीआम्ही झोका, झोपाळा असं म्हणू शकतो का हो? परंतु बहिणाबाई त्याला किती सहजपणे झोक्याची उपमा देतात! क्या केहेने..!

पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला

झुलता बंगला?!

एखाद्या झाडावरील सुगरण पक्ष्याच्या घरट्याला बहिणाबाई 'बंगला!' असं संबोधतात! किती ही शब्दांची श्रीमंती, मनाची श्रीमंती! तुम्हीआम्ही एखादा बंगला बांधतो आणि 'आमचा काय, बंगला आहे बॉ!' म्हणून स्वत:चं आणि स्वत:च्या बंगल्याचं कित्ती कित्ती कौतुक करत बसतो..! परंतु बहिणाबाई मात्र त्या खोप्याला अगदी सहजपणे बंगला असं संबोधून जातात! प्रत्यक्षात एखाद्या बंगल्यात स्वत: बहिणाबाई तरी कधी गेल्या असतील का हो?


आणि बंगला कसा? तर झुलता बंगला! बहिणाबाईंनी सुगरणीला नुसत्या नव्हे तर झुलत्या बंगल्याचं आर्किटेक्ट बनवलं आहे!

तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला

नि:शब्द...!!!

'जीव झाडाले टांगला' ह्या ओळीतील 'झाडाले' या शब्दात यशवंत देवांनी किती सुरेख आस ठेवली आहे! क्या बात है...!

अहो त्या सुगरणीची पिल्लं असतात हो त्या खोप्यात! का नाही तिचा जीव टांगणीला लागणार? एखादी चाकरमानी स्त्री जेव्हा स्वत:च्या चार सहा महिन्याच्या पिल्लाला एखाद्या पाळणाघरात ठेऊन आठ आठ दहा दहा तास घराच्या बाहेर असते तेव्हा तिचा जीवही त्या पिल्लाकरता टांगणीला लागतच असेला ना? मग सुगरणीचा का बरं लागू नये? भले मग ती पिलं एखाद्या झुलत्या बंगल्यातच का असेनात!

जीव झाडाले टांगला ह्या ओळीतली आस, ममत्व यामुळे गाण्यात ही ओळ ऐकतांना क्षणात डोळ्यात पाणी येतं, क्षणभर का होईना, परंतु जिवाची घालमेल होते!
त्या सुगरणीचा खोपा हा शब्दश: झाडाला टांगलेला असतो..

'लौकर ये बाबा, उगाच जीव टांगणीला लावू नकोस..' असं आपण नेहमी म्हणतो. इथे बहिणाबाईंनी हा वाक्प्रचार किती सुंदररित्या कवितेत वापरला आहे!

असो...

पुढल्या कडव्यांबद्दलचं रसग्रहण/प्रवचन पुन्हा कधितरी! आज जरा मूड लागला म्हणून तात्याने ह्या वेड्यावाकड्या चार ओळी खरडल्या आहेत. तुम्हाला आवडल्या तर छानच, नाय आवडल्या तर राहिलं!

जीव झाडाले टांगला.. ही ओळीला, त्याच्या चालीला, त्यातल्या गायकीला आपला सलाम..!

बराय तर मंडळी, आता आपला निरोप घेतो.. पुढची कविता तात्यामास्तरांकडून पुन्हा केव्हातरी शिका!

घरट्याची उब ती घरट्याचीच उब! मग ते उबदार घरटं कुणा तुमच्याआमच्यासारख्यांचं असो, काऊचिऊचं असो, वा बहिणाबाईंच्या लाडक्या कुण्या सुगरणीचं असो. पंचतारांकीत हाटेलातल्या सुसज्ज खोल्यांना त्याची सर नाही!

-- तात्या अभ्यंकर.

March 04, 2011

मंगेश....!

राम राम मंडळी,

तानपुरा, तंबोरा...!

आपल्या भारतीय संगीताचा आधार...!आपलं भारतीय अभिजात संगीत हे अक्षरश: तानपुर्‍याच्या चार तारांवर उभं आहे असं म्हटल्यास ती अतिशोयोक्ति ठरू नये...

या वाद्याचा इतिहास काय, जन्म केव्हा, याबद्दल मला माहीत नाही. परंतु गेली २५ वर्ष तरी मी हे वाद्य हाताळतो आहे, या आधारावर तानपुर्‍याविषयी ढोबळ असे माहितीप्रद चार शब्द लिहू इच्छितो म्हणून या लेखाचे प्रयोजन..!

ही माहिती मला पं अच्युतराव अभ्यंकर, किराणा गायकीचे दिग्गज पं फिरोज दस्तूर, स्वरभास्कर पं भीमसेन जोशी यांच्याकडून मिळालेली आहे. त्याचप्रमाणे मिरज या बीनकारांच्या माहेरघर असलेल्या शहरातील काही कारागिरांकडूनही मला या वाद्याविषयी, विशेष करून याच्या ट्युनिंगविषयी खूप काही शिकायला मिळालं आहे. हा लेख लिहितांना मी या सर्वांचे ऋण व्यक्त करू इच्छितो...

१) तानपुर्‍याच्या खुंट्या.तानपुरा लावताना (ट्यून करताना) सर्वप्रथम या खुंट्यांचा वापर केला जातो. तानपुरा खूप उतरला किंवा चढला असल्यास ज्या स्वरात तो लावायचा असेल (उदा काळी ४/५, १/२, पांढरी ४ इत्यादी,) त्या स्वरात लावण्याकरता या खुंट्यांचा वापर केला जातो..

२) तानपुर्‍याचा भोपळा.तानपुरा या वाद्याचा जो आवाज असतो तो आवाज येण्याकरता हा भोपळाच अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो. तानपुर्‍याची तार छेडल्यावर त्यातनं जो टणकार उमटतो तो टणकार या पोकळ भोपळ्यात घुमतो आणि एका घुमार्याच्या स्वरुपात हा आवाज आपल्याला ऐकू येतो..

तानपुर्‍याकरता लागणार्या भोपळ्यांची विशेष मशागत केली जाते. त्यानंतर ते भोपळे ७५ टक्के कापून त्यातील मगज बाहेर काढला जातो व ते रिकामे भोपळे कडकडीत उन्हात वाळवले जातात..

३) घोडी किंवा ब्रिड्ज.ह्याला तानपुर्‍याचा प्राण म्हणता येईल. तानपुर्‍याच्या तारा ह्या खुंटी ते भोपळ्याची मागील बाजू, अश्या बांधलेल्या असतात. त्या तारा ह्या घोडीवरून गेलेल्या असतात. तार छेडल्यानंतर तारेतून टणकार उत्पन्न करण्याचं काम ही घोडी करते.

४) जवार आणि मणी.जवार किंवा जवारी हिला तानपुरा वादनात अनन्यसाधारण महत्व आहे. आपण जर वरील चित्र नीट पाहिलंत तर त्यात तानपुर्‍याच्या तारा आपल्याला घोडीवरून गेलेल्या दिसतील आणि घोडीच्या मधोमध तारेच्या खाली आपल्याला एक बारील दोरा दिसेल. तानपुर्‍यातून गोळीबंद व गोलाकार आवाज येण्याकरता हा दोराच अत्यंत महत्वाची भूमिका निभावतो. त्याकरता तानपुर्‍याची घोडी कानसेने, पॉलिश पेपरने एका विशिष्ठ पद्धतीने घासावी लागते. ह्यालाच तानपुर्‍याची 'जवार काढणे' असे म्हणतात. हे अत्यंत कठीण काम आहे. ही जवार अतिशय सुपरफाईन पद्धतीने काढावी लागते. त्यामुळे दोरा तारेतून आत सरकवल्यावर घोडीच्या मध्यभागी एका विशिष्ठ ठिकाणी अडतो आणि बरोब्बर त्याच जागेवर तार छेडली असता घोडीतून गोलाकार, गोळीबंद असा टणकार उत्पन्न होतो. हा दोरा घोडीच्या एका ठराविक जागी असतांनाच तानपुर्‍यातून सुरेल व मोकळा टणकार ऐकू येतो. ह्यालाच "जवारी लागली" असे म्हणतात.

जमिनीत काही अंतरावर खोदकाम केल्यावर जसा छानसा पाण्याचा झरा लागतो, अगदी तीच उपमा "जवारी लागण्याला" देता येईल! हा दोरा जरा थोडासा जरी आपल्या जागेवरून हालला तर तारेतून मोकळा टणकार उत्पन्न न होता बद्द आवाज ऐकू येतो. जवारीच्या जागी उत्पन्न झालेला टणकार पोकळ भोपळ्यात घुमून त्या भोपळ्यातनं अतिशय सुंदर असा गोलाकार ध्वनी ऐकू येतो...!

वर उल्लेख केल्याप्रमाणे तानपुरा कारागिरीत पिढ्यान पिढ्या असलेले मिरजेतील काही कारागीर, दस्तूरबुवा यांच्याकडून मला जवारी काढण्याचे धडे मिळाले हे माझं भाग्य! काही वेळेला अण्णांकडूनही मला उत्तम जवारी कशी असावी, कशी लावावी, तानपुरा कसा गोळीबंद बोलला पाहिजे, कसा मिळून आला पाहिजे याबाबत थोडंफार शिकायला मिळालं आहे!

घोडीच्या पुढे दिसणारे मणी हे तानपुर्‍याच्या फाईन ट्युनिंगकरता वापरले जातात. स्वरांचे सूक्ष्म फरक या मण्यांच्या साहाय्यानेच सुधारले जातात.

५) तानपुर्‍याचे लागणे.

अरे देवा! हा तर खूप म्हणजे खूप मोठा विषय आहे आणि याबाबत अधिकारवाणीने काही लिहिणे ही माझी पात्रता नाही! उत्तम तानपुरा लावणे ही आयुष्यभर करत रहायची साधना आहे.

असो, इथे फक्त ढोबळ मानाने इतकंच लिहू इच्छितो की तानपुर्‍याच्या पहिल्या तारेवर रागानुसार मंद्र पंचम, किंवा मंद्र शुद्ध मध्यम, किंवा मंद्र शुद्ध निषाद लावला जातो, मधल्या दोन तारांना 'जोड' असं म्हणतात आणि या तारांवर मध्य षड्ज लावला जातो आणि शेवटची तार ही खर्जाची असते आणि त्यावर खर्जातला षड्ज (मंद्र षड्ज) लावला जातो. शेवटची खर्जाची तार ही नेहमी तांब्याची असते आणि इतर तीन तारा या स्टीलच्या असतात.

वर उल्लेखलेल्या गुरु मंडळींकडून थोडाफार तानपुरा लावायला शिकलो आहे, त्याची एक झलक आपल्याला इथे पाहता येईल..


असो,

तर मंडळी, असं हे एक ढोबळ तानपुरा आख्यान! उत्तम जवारीदार तानपुरा लागणे आणि त्यावर त्याच तानपुर्‍याशी मिळताजुळता, एकरूप होणार स्वर मानवी गळ्यातून उमटणे ह्याला मी तरी केवळ अन् केवळ "देवत्वा"चीच उपमा देईन..

सुरेल तानपुर्‍याइतकेच सुरेल बाबुजी!स्वरभास्कर तानपुरा जुळवताहेत...!


मंडळी, असं म्हणतात की तानपुर्‍यात ईश्वर वास करतो. काही ठिकाणी अशीही मान्यता आहे की तानपुरा हे शंकराचं रूप आहे! ह्यातला आध्यात्मिक किंवा खरंखोटं, हा भाग सोडून द्या कारण या लेखाचा तो मुख्य मुद्दा नाही. परंतु गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या लहानपणीची एक आठवण या निमित्ताने जाता जाता सांगाविशी वाटते...

लतादिदींना लहानपणी अगदी थोडा म्हणजे अगदी थोडा काळ त्यांच्या वडिलांकडून - मास्टर दिनानाथरावांकडून गाण्याचं शिक्षण मिळालं. मास्टर दिनानाथ नेहमी लतादिदींना म्हणत,
"तो तानपुरा आहे ना, तो मंगेश आहे बरं का! त्यावर नेहमी श्रद्धा ठेव, तो तुला निश्चित प्रसन्न होईल...!-- तात्या अभ्यंकर.