सारं काही तेच ते अन् तेच ते..! विंदांची कुठलीशी कविता आहे म्हणे ही. इथेही तसंच आहे. तोच तो मुंबैचा फोरास रोड. तोच तो तिथला झमझम देशी दारूचा बार अन् तोच तो तिथला कॅशियर तात्या..!
सायंकाळचे वाजले असतील सताठनऊ.. तात्या बारच्या गल्ल्यावर बाटल्यांचा हिशेब करीत बसला होता. बारमधली मंडळी निवांतपणे पीत होती. शिव्या ओव्या गप्पा सुरू होत्या. नेहमीचाच रूटीन कार्यक्रम सुरू होता..
"ए तात्या भडव्या चकणा दे ना..केव्हापासनं मागतोय कोण ऐकायला कबूल नाय..!"
कुणा गिर्हाईकाने मला छानशी शिवी दिली होती.. मीही लगेच दुसरी एक सणसणीत शिवी हासडून बारच्या पोर्याला त्या इसमाला चकणा द्यायला सांगितला. पोर्याने माझी शिवी खाताच त्या इसमाम्होरं चणे नेऊन ठेवले..
'कोण हा मला नावानिशी ओळखणारा? तसा मी त्या फोरासरोडवर 'तात्यासाब' म्हणून प्रसिद्ध होतो. पण आता येथे येणारी नियमित गिर्हाईकंही मला वळखू लागली होती म्हणायची! पण हा चक्क मराठीत एकेरीवर येऊन मला 'तात्या..भडव्या..' अशी फुलं वाहणारा कोण?
ती संध्याकाळ तशीच मावळली. पुन्यांदा दोन्चार दिसात पुन्हा तो शिवी देणारा बारमध्ये पियाला आला. तो आला. टेबलापाशी बसला. जीएम डॉक्टरचा त्यानं फुल्ल खंबा मागवला. मग मीच पुन्हा शिवी खायच्या आत चपळाईनं थोडे चणे अन् भाजलेला पापड घेऊन त्याच्या टेबलापाशी गेलो..
"सॉरी बॉस.. परवा चुकून शिवी गेली तोंडातनं.. काय सांगू, डोकं जाग्यावर नसतं.." असं म्हणून तो थोडासा ओशाळा हसला..
त्याच क्षणी मला तो आवडला अन् मीही त्याच्या टेबलापाशी त्याच्यासमोर बसलो..त्याला गप्पात रंगवायचा यत्न करू लागलो. लौकरच त्यात मला यश आलं..
हा कोण? कुठला? याची उत्तरं मिळतील अश्या बेतानं त्याच्यासोबत गप्पा विणू लागलो. जी एम डॉक्टरचा पयला पेग भर्कन संपवला गड्यानं.. दुसरा पेग सुरू झाला. अधुनमधुन मी गल्ल्यावर जात होतो, तिथलीही कामं सांभाळत होतो..
भिवा शिवराम लोहारी असं कायसंसं त्याचं नाव मला समजलं..
"ए तात्या, मढ्याच्या टाळूवरचं लोणी खातो मी.. मा***द..!" भिवाच्या डोळ्यात आता पाणी होतं. स्वतःलाच त्यानं चांगली पंचाक्षरी छप्पर उडवणारी शिवी घातली होती..
"का रे बाबा? काय झालं..? रडतोस का? मला सांग की.."
माझ्या प्रश्नातली आपुलकी त्याला भावली असावी. त्यानंतर भिवा माझ्याशी बोलू लागला.. मोकळा झाला.
मुंबै शहर.. लाखोंच्या वस्तीचं.. हार्बर, मध्य व पश्चिम अश्या तीन तीन रेल्वेचं जाळं असलेलं. इथे हप्त्याला किमान सताठ रेल्वे अपघात ठरलेले... त्यात बरेचसे भिकारी-टाकारी, तर बरेचसे अगदी चांगल्या घरचेही. कुणी डोकं खांबाला आपटून चालत्या गाडीतनं पडलेले, कुणी जीव दिलेले, कुणी धावती गाडी पकडताना प्लॅटफॉर्मखाली गेलेले तर कुणी घाईघाईत रेल्वे रूळ ओलांडताना गाडीखाली आलेले..!
सर्वांवर उपाय एकच. पोलीस मयत व्यक्तीला त्याच्या तुटक्या अवयवांनिशी नजिकच्या मुल्शिपाल्टीच्या नायर/सायन/केम/कस्तुरबा इत्यादी रुग्णालयात पोचवतात. अन् तिथूनच नेमकं भिवाचं काम सुरू होतं.. ज्या डेडबॉडीज विविध रुग्णालयात पोहोचवल्या जातात, भिवा त्या सार्या रुग्णालयातला व्हिजिटिंग/फ्रीलान्सर मुडदा-शिंपी आहे.. !
एक जाडसर दाभण घेऊन त्याच्यात त्याच जाडीचा भक्कम दोरा ओवून प्रेतांचे तुटलेले हात-पाय-मुंडकी टेंपरवारी किंवा नेणार्याला बॉडी एकसंध नेता येईल इतपत शिवणे व त्या बदल्यात संबंधित रुग्णालयातून/मृतांच्या नातेवाईकांकडून पैसे घेणे हेच भिवाचं काम, त्याचं उत्पन्नाचं साधन, त्याचं मानधन, त्याची बिदागी...!
"काय करशील तात्या, हे काम पण कुणीतरी केलंच पायजेल ना? आपण करतो..!"
ती संध्याकाळही तशीच संपली.. पण भिवा हप्त्यातनं तीन्चार दिस तरी बारमध्ये येतच होता. "तात्या, फोकलीच्या आज आम्लेट मागव ना. पण तुझ्या पैशाने हां.!"," तात्या, तुझ्याकरताही मागवू का रे आज एक खंबा"? असे आमचे दोस्तीतले संवाद सुरू झाले, हायहॅलो सुरू झालं.. माझी अन् भिवाची वेव्हलेंथ जमली.. भिवा यायचा, तासभर बसायचा.. कधी रडायचा, कधी फुल्ल टाईट झाल्यावर काहीतरी कारणाने कुणाला तरी जाम शिव्या द्यायचा..
मध्यम उंची, कुरूप चेहरा..साधेसुधे कधी बरे तर कधी मळके कपडे, साफ हडकुळा..वगैरे वगैरे. हे भिवाचं वर्णन.. पण चेहरा मात्र विलक्षण बोलका..!
" तात्या, तुझ्याकरताही मागवू का रे आज एक खंबा?"
"नको रे. मी देशी पीत नाही.."
थोड्या वेळाने भिवा टाईट. "मायझंव, इंग्लिश मागवू का तुझ्याकरता? पी ना रे फुकनीच्या.. आज दोन दोन पाय शिवलेत.. एकेका पायाचे तीन-तीनशे रुपये भेटलेत..!"
एकेका पायाचे तीन-तीनशे रुपये भेटलेत..???????????????????
"तात्या, एक लै भारी मालदार पार्टी होती रे ती.. काय कसा माहीत पण त्यांचा तरुण पोरगा गाडीखाली आला रे.. अरे भल्या घरची माणसं होती रे ती.. मुलाचा बाप/भाऊ/काका/मामा अन् कोण कोण.. सारीजण बॉडी न्यायला आल्ते रे पोराची.."
"मग..?"
"मग काय? ते आले तेव्हा मी नायरच्या मॉर्गमध्येच होतो. पोस्टमॉर्टेम होऊन त्या पोराची ताजी बॉडी नुकतीच आणून ठेवली होती मॉर्गमध्ये.. सोबत तुटलेले दोन पाय..! भडवीचं कार्ट कसं काय ट्रेनखाली आलं असणार कोण जाणे..!"
मी बगितलं.. पार्टी भली होती, पैशेवाली पण वाटत होती. मग त्या पोराचा कोण काका की मामा आत आला. बॉडीची ओळख पटवून बॉडी पायजेल म्हणाला. मी म्हटलं "घ्या ही बॉडी अन् ते पाय..!"
"नेहमीचा अनुभव रे तात्या.. तुला काय लेका, तू मस्त इथे बारमध्ये गल्ल्यांवर बसलेला असतोस..!"
दुनियेत सगळं सापेक्ष आहे मंडळी.. मला तेव्हा माझा कुणी सखा-सवंगडी सी ए होऊन त्याच्या एसी हापिसात बसलेला असतो त्याचा हेवा वाटतो, तर भिवाला माझा हेवा वाटतो..!
"बॉडी शिवायचे पैशे होतील.." भिवानं सुचवलं अन् एक पाय शिवायचे तीनशे रुपये या प्रमाणे दोन पायाचे सहाशे असा सौदा ठरला..!
"एक पाय शिवायचे तीनशे रुपये? अरे शिवणारा काय एकच पाय शिवून घेईल का?" मला विनोदीच वाटला तो प्रकार..
"आमच्यात असाच रेट सांगतात..!"
पण त्या दिवशी मात्र भिवा जामच अस्वस्थ वाटला..
"तात्या, मला पचतील का रे हे सहाशे रुपये? पण मी काय करू? मी माझं काम केलं आहे.."
सारं काही भिवाच बोलत होता..!
मला नेमकं काय बोलावं ते सुचत नव्हतं..
"अरे तात्या, तसा मी या कामाला चांगला सरावलो आहे. आजवर इतक्या बॉड्या शिवल्या की आता या कामाचं काही वाटत नाही. शिवायचे पैशेपण घेतो चांगले.. पण कधी कधी लैच त्रास होतो.."
थोडा वेळ तसाच गेला.. भिवाने बाटली संपवली.. बेभान टाईट झाला अन् तिथेच भडाभडा ओकला..!
मी काहीच बोललो नाही.. बारच्या पोर्याला सांगून ते सगळं साफ करून घेतलं.. भिवाच्या चेहेर्यावर सोडा मारला. अजूनही भिवा टाईटच होता..बरळत होता -
"तात्या, मला नाय पचले रे ते सहाशे रुपये.. ओकून पडले बघ! भांचोत, त्या पोराच्या बापाचा चेहरा डोळ्यासमोर दिसतो. पोरगंही गोड होतं रे.."
का माहीत नाही, पण भिवाचा माझ्यावर लोभ होता..एकदा केव्हातरी मी चिंचपोकळीला असणार्या त्रिवेणीसदन या त्याच्या चाळीतही गेलो होतो. भिवानं तेव्हा माझ्याकरता इंग्लिश मागवली होती..!
त्यानंतरही भिवा बारमध्ये येतच गेला, येतच गेला..
कधी कुणाचा पाय शिवून, तर कधी हात शिवून तर कधी पायाची जोडी किंवा हाताची जोडी शिवून व जोडीच्या हिशेबात पैसे घेऊन...!
- तात्या अभ्यंकर.
April 14, 2012
April 02, 2012
मैने तेरे लिये ही...
मैने तेरे लिये ही.. (येथे ऐका)
बाबूमोशाय अमिताभ, रमेश देव-सीमा, नोकर परंतु घरात एखाद्या वडीलधाऱ्यासारखा मान असणारा कुणी रामुकाका आणि राजेश खन्ना ऊर्फ आनंद सेहगल..
छान, सुंदर कौटुंबिक घरगुती वातावरण. असं घरगुती वातावरण तुमच्या-आमच्या घरातही अगदी सहज दिसू शकतं. आणि तुमच्या-आमच्या जीवनातल्या अशा साध्यासुध्या, आपुलकीच्या गोष्टी पडद्यावरही अगदी सहजसुंदरतेने दाखवणं हेच तर हृषिदांचं वैशिष्ट्य..!
आनंद सेहगल गाणं म्हणतो आहे - 'मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने..'
छोटी बाते, छोटी छोटी बातों की है यादे बडी..!
ही खूप मोठी गोष्ट सांगतो आहे आनंद सेहगल. "बाबूमोशाय, जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहीये..! " -- असं म्हणणारा आनंद सेहगल. पण बाबूमोशायच्या चेहऱ्यावर कुठेतरी उदासी आहे. त्याला आनंदचं मरण स्पष्ट दिसतंय..!
दिल्लीहून उपचारांकरता मुंबईला आलेला आनंद सेहगल. आयुष्य भरभरून जगणारा, माणसांचा वेडा आनंद सेहगल. 'रोगाचं नाव असावं ते देखील कसं भारदस्त असावं..!', असं म्हणून आपल्याला Lymphosarcoma of the intestine झाला आहे असं सांगणारा आनंद सेहगल..!
मौत तू एक कविता है
मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको.. -- असं म्हणणारा आनंद..!
मुकेशचा हळवा, गोड गळा - सलीलदांचं संगीत, उत्तम कथा-पटकथा-अभिनय.. सारंच क्लासिक..
हृषिदा, तुम्ही प्लीज परत या हो.. तुमच्यासारखी माणसं सिनेजगताला कायमस्वरूपी हवी आहेत..!
"आनंद मरा नही, आनंद मरते नही..! "
हेच खरं..!
-- तात्या अभ्यंकर.
बाबूमोशाय अमिताभ, रमेश देव-सीमा, नोकर परंतु घरात एखाद्या वडीलधाऱ्यासारखा मान असणारा कुणी रामुकाका आणि राजेश खन्ना ऊर्फ आनंद सेहगल..
छान, सुंदर कौटुंबिक घरगुती वातावरण. असं घरगुती वातावरण तुमच्या-आमच्या घरातही अगदी सहज दिसू शकतं. आणि तुमच्या-आमच्या जीवनातल्या अशा साध्यासुध्या, आपुलकीच्या गोष्टी पडद्यावरही अगदी सहजसुंदरतेने दाखवणं हेच तर हृषिदांचं वैशिष्ट्य..!
आनंद सेहगल गाणं म्हणतो आहे - 'मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने..'
छोटी बाते, छोटी छोटी बातों की है यादे बडी..!
ही खूप मोठी गोष्ट सांगतो आहे आनंद सेहगल. "बाबूमोशाय, जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहीये..! " -- असं म्हणणारा आनंद सेहगल. पण बाबूमोशायच्या चेहऱ्यावर कुठेतरी उदासी आहे. त्याला आनंदचं मरण स्पष्ट दिसतंय..!
दिल्लीहून उपचारांकरता मुंबईला आलेला आनंद सेहगल. आयुष्य भरभरून जगणारा, माणसांचा वेडा आनंद सेहगल. 'रोगाचं नाव असावं ते देखील कसं भारदस्त असावं..!', असं म्हणून आपल्याला Lymphosarcoma of the intestine झाला आहे असं सांगणारा आनंद सेहगल..!
मौत तू एक कविता है
मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको.. -- असं म्हणणारा आनंद..!
मुकेशचा हळवा, गोड गळा - सलीलदांचं संगीत, उत्तम कथा-पटकथा-अभिनय.. सारंच क्लासिक..
हृषिदा, तुम्ही प्लीज परत या हो.. तुमच्यासारखी माणसं सिनेजगताला कायमस्वरूपी हवी आहेत..!
"आनंद मरा नही, आनंद मरते नही..! "
हेच खरं..!
-- तात्या अभ्यंकर.