Showing posts with label तात्या अभ्यंकरांची खादाडी. Show all posts
Showing posts with label तात्या अभ्यंकरांची खादाडी. Show all posts

December 05, 2007

समर्थ भोजनालय, गिरगाव, मुंबई-४

राम राम मंडळी,

रामचंद्र सहदेव प्रभू, ऊर्फ रामभाऊ प्रभू!

हे नांव म्हणजे काही लोकमान्य टिळकांचे नांव नव्हे की ते सर्वांना माहीत असायला हवे! :) परंतु तरीही हे नांव माझ्याकरता खूप मोठे आहे. माझ्याकरताच नव्हे, तर माझ्यासारख्या अनेक मत्स्यप्रेमींकरता, खानावळीच्या जेवणावर दोन टाईम अवलंबून असण्यार्‍यांकरता या नांवाचे महत्व आहे.

रामभाऊ हे मुळचे आमच्या कोकणातल्या कुडाळचे! पत्ता- मुक्कामपोष्ट पाट, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग! रामभाऊ हे कुडाळदेशकर, परंतु कोकणातल्या 'बाल्या' समाजातले! कोकणातले बाले! :)

साठाच्या दशकात पोटापाण्याच्या उद्योगाकरता रामभाऊ कोकणातून मुंबईस आले अन् मुंबईत बाँबेडाईंग कंपनीत गिरणी कामगार म्हणून कामावर रुजू झाले. कोकणातला बाल्या आता मुंबईकर 'बाल्या' झाला! :) गिरगावातील दोन खोल्यांच्या भाड्याच्या जागेत रामभाऊंचा संसार सुरू झाला. रामभाऊंच्या पत्नी रजनीबाई म्हणजे साक्षात मालवणी अन्नपूर्णा! त्यांच्या हाताला जबरदस्त चव. मच्छीमटणाचे प्रकार तर सोडाच, पण रजनीबाईंनी साधा आमटीभात जरी केला तरी साक्षात भगवंत जगाच्या पाठीवर जिथे कुठे असेल तिथून रामभाऊंच्या गिरगावातल्या घरी जेवायला येईल! :)

रामभाऊंना तीन मुलं. एकट्याच्या पगारात भागेना म्हणून १९७२ साली रामभाऊंनी राहत्या घरातच पत्नीच्या मदतीने घरगुती स्वरुपाची खानावळ सुरू केली. स्वयंपाकाची संपूर्ण जबाबदारी अर्थातच रजनीबाईंनीं आपल्या अंगावर घेतली आणि अगदी घरगुती स्वरुपाच्या शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची ही खानावळ उत्तम तर्‍हेने सुरू झाली. जेवायला येणारी गिर्‍हाईकं म्हणजे आजुबाजूचे सर्व मध्यमवर्गीय मराठी गिरगावकर चाकरमानी! बरीचशी कनिष्ठ मध्यमवर्गीयच मंडळी. त्या काळात गिरगावात मराठी माणसांची वस्ती बर्‍यापैकी होती. आजुबाजूच्या चाळी बर्‍यायचश्या चाकरमानी मराठी कुटुंबियांनी भरलेल्या होत्या. त्या काळात गुजराती, मारवाडी समाजाचा गिरगावातील शिरकाव आजच्या मानाने अगदीच कमी होता. असो! तर काय सांगत होतो?

तर 'समर्थ भोजनालय' या नांवाने ही खानवळ सुरू झाली. सुरमई, बांगडा, पापलेट, बोंबिल, कोलंबी, मांदेली, मुडदुशा, गाबोळी, कुर्ल्या, आदी मत्स्यप्रकार तसेच मटणवडे, कोंबडी, सुकं मटण, कोकम कढी असा न्यारा बेत ह्या खानावळीत शिजू लागला. अप्रतिम अशी घरगुती चव, वातावरणही घरगुती, आणि दरही वाजवी, त्यामुळे रामभाऊंची ही खानावळ अगदी उत्तम रितीने चालू लागली. आजतागायत अनेक मंडळी येथून जेवून, पोटातला अग्नी शांत करून गेली आहेत/आजही जात आहेत!



कामधंद्याच्या निमित्ताने मला बरीचशी मुंबई फिरण्याचा योग आला. मासे, मटण खायची आवड असल्यामुळे बोरीबंदर जवळच्या पलटणरोड पोलिस ठाण्याजवळचं उत्तम खिमा मिळणारं आमच्या लक्ष्मणशेठचं 'ग्रँट हाऊस कँटीन', गिरगावातलंच ठाकुरद्वारचं 'सत्कार हॉटेल', त्याच्याच भावाचं डोंबिवलीतलं हॉटेल 'श्रीसत्कार', गिरगावातलंच उत्तम मटण-भाकरी मिळणारं 'भारतीय लंच होम', लालबागेतील गिरण्यांमधल्या कोकणी चाकरमानी गिरणी कामगारांचं आश्रयस्थान असलेलं 'क्षिरसागर हाटेल', बजारगेट स्ट्रीटवरचं 'संदीप भोजनालय', त्याच्याच भावाचं हॉर्निमन सर्कलचं 'प्रदीप भोजनालय', खोताच्या वाडीतलं खडपेबंधुंचं 'अनंताश्रम' (येथे प्रसिद्ध लेखक जयवंत दळवी नेहमी जेवायला यायचे. दळवी हे आमच्या कोकणभूमीचेच सुपुत्र! :) अश्या अनेक ठिकाणी माझा नेहमीचा राबता असे. (या सगळ्या हॉटेलांवर मी सवडीने, परंतु अगदी भरभरून लेखन करणार आहे!)

अश्यातच एके दिवशी गिरगावातील गायवाडी बस स्टॉप जवळच्या गल्लीतील 'समर्थ भोजनालयात' जेवायचा योग आला आणि जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटलं! मी समर्थ भोजनालयाचा झालो आणि समर्थ भोजनालय माझं झालं! तिथली माशाची आमटी खाल्ली, तळलेली मांदेली खाल्ली अन् अण्णांच्या अभंगातील,

'याचसाठी केला होता अट्टाहास,
शेवटचा दिस गोड व्हावा'


च्या ऐवजी 'शेवटचा दिस गोड झाला!' असे म्हणावेसे वाटले! :)

मंडळी, आमचे रामभाऊ हा वृत्तीने देव माणूस! खानावळ चांगली चालली आहे म्हणून हावरेपणाने वाट्टेल तसे दर वाढवणारा, जेवणात काहीतरी चालू माल वापरून गिर्‍हाईकांना फसवणारा किंवा लुटणारा नव्हे! सगळ्यांशी आपलेपणाने वागणारा, प्रसंगी दाराशी आलेल्या एखाद्या गरीबाला स्वतः आस्थेने जेवू घालणारा! कधी कधी पुढे बरीच कामाची गडबड असे म्हणून मी सकाळी ११ वाजताच त्यांच्या खानवळीत जेवायला जायचो. त्या सुमारास फारशी गर्दी नसायची. मग रामभाऊ हळूच गल्ल्यावरून उठून माझ्या शेजारी येऊन बसायचे. "काय तात्या, आज लवकर? आज सुरमई अगदी ताजी फडफडीत मिळाली आहे. देऊ?" मग माझ्या उत्तराची वाट न पाहताच, "अरे संज्या, तात्याला एक सुरमई ताट आण रे" असा मुदपाकखान्यातील त्यांचा मुलाला, संजयला हुकूम सोडायचे! :)

मंडळी, शेवटी काहीही झालं तरी रामभाऊ हा आमच्या कोकणातला. त्यामुळे कोर्टकचेर्‍या न करेल तरच नवल! रामभाऊचा आणि त्यांच्या भाड्याच्या जागेच्या मालकाचा काही कारणावरून कोर्टात खटला सुरू होताच! 'मग आता मी अन् माझा वकील काय काय कारवाया करणार आहोत, 'ही केस आपणच कशी जिंकणार', 'आपले सगळे मुद्दे कसे स्ट्राँग आहेत', हे सगळं सांगायला रामभाऊंना आस्थेने ऐकणारं कुणीतरी हवं असे! मी ते काम जेवता जेवता एकदम चोख करीत असे! :) मग मध्येच बोलण्याच्या भरात रामभाऊंचं माझ्या पानाकडे लक्ष जात असे. "अरे तात्या, अजून चपाती घे रे. हे काय? फक्त दोनच चपात्या? अरे संज्या, तात्याला गरम गरम चपाती आण रे. आणि थोडंसं कोलंबीचं कालवण पण घेऊन ये. बघ तरी तात्या, आज कोलंबी किती छान मिळाली आहे ती. अरे बाबा, कोलंबीच्या कालवणाचे पैशे नको देऊ फार तर! ते वाटल्यास माझ्याकडून भेट समज!" असं हसून म्हणायचे! आणि बिल देतेवेळी खरोखरंच ते पैसे रामभाऊ माझ्याकडून घेत नसत! आज रामभाऊ या जगात नाहीत. १९९९ साली रामभाऊ वारले. ती बातमी समजल्यावर घरचंच कुणीतरी गेल्यासारखं मला वाटलं आणि खूप भरून आलं!

हे आमचे रामभाऊ प्रभू. मुंबईच्या खानावळ संस्कृतीचे एक प्रतिनिधी!



आज रामभाऊंच्या पश्चात आमच्या रजनीमावशी अन् त्यांची दोन मुलं संजय (संज्या) आणि विश्वनाथ (नाथा) आता ही खानावळ चालवतात. मंडळी, ही सगळी मंडळी त्यांच्या कुटुंबातलाच एक असल्यासारखं मला वागवतात. संज्याचं तर माझ्यावर भारी प्रेम. मी अजून लग्न केलं नाही याची माझ्यापेक्षा संज्यालाच अधिक चिंता! :) अगदी आजही कधी त्यांच्या खानावळीत जेवायला गेलो की संज्या मला मुली सुचवतो. "तात्या, अरे अमूक अमूक मुलगी आहे. आमच्या नात्यातलीच आहे. तुला चांगली मच्छी करून खाऊ घालेल आणि तुझ्या आईचीही काळजी घेईल. लग्न करून टाक बाबा आता. किती दिवस असा राहणार?!":)

माझ्या लग्नाच्या चिंतेत असलेला आमचा देवभोळा संज्या! :)



मंडळी, रामभाऊ, रजनीमावशी, संज्या, नाथा, ही सगळी कोण आहेत माझी? ना रक्ताच्या नात्याची, ना गोत्याची! पण एक धागा आहे ज्याने मला व त्यांना जोडलं आहे, अगदी घट्ट बांधून ठेवलं आहे. तो धागा आहे परब्रह्म अश्या अन्नाचा, घरगुती चवीचा, अन् खानावळ संस्कृतीचा! आजच्या लोप पावत चाललेल्या या खानावळ संस्कृतीत हा धागा अजूनच घट्ट होत जाईल याची मला खात्री आहे!

तात्या जेवायला बसला आहे. तो मुंबईच्या खानावळ संस्कृतीचा एक वारकरी आहे!


आज मुंबईतच काय, तर सार्‍या जगात शेट्टी हाटेलांचे साम्राज्य पसरले आहे. अत्यंत महाग दर आणि तीच तीच पंजाबी चव! कधी टॉमेटोच्या मिश्रणात काजू पेस्ट, तर कधी काजूपेस्टमध्ये टोमेटो प्युरी वापरून केलेल्या त्या महागड्या पंजाबी भाज्या! मंडळी, हे सगळं पाहिलं की गिर्‍हाईकाला आस्थेने, घरगुती चवीचे पदार्थ वाजवी दरात जेवू घालणार्‍या रामभाऊंसारख्या किंवा अनंताश्रमच्या खडप्यांसारख्या खानावळवाल्यांचं महत्व लक्षात येतं. आजही अशी अनेक मंडळी आहेत की काही कारणांमुळे त्यांना घरचं जेवण मिळत नाही. अश्या मंडळींचं समर्थ भोजनालय सारख्या घरगुती खानावळी म्हणजे एक मोठं आश्रयस्थान आहे, आधार आहे. अहो नाहीतर रोज रोज पोटातली आग विझवायची कुठे? शेट्टीच्या हॉटेलातील महागड्या सोडा मारून केलेल्या पदार्थांनी तर साली पोटाची वाट लागायची!

असो, आता पुन्हा एकदा समर्थ भोजनालयात जाईन आणि आमचा नाथा मला फक्कडसं बोंबलाचं कालवण वाढेल, अन् संज्या पुन्हा एखादी चांगल्याश्या सालस, सोज्वळ अश्या मुलीचं स्थळ मला सुचवेल! मी 'अन्न हे पूर्णब्रह्म' असं म्हणत जेवून तृप्त होईन आणि नकळत माझं लक्ष भिंतीवरील रामभाऊंच्या तसबिरीकडे जाईल आणि त्यांच्या आठवणीने मन भरून येईल!

--तात्या अभ्यंकर.

माझ्या जातीपाती, माझे धर्म, माझा 'परजात'प्रवेश! :)

राम राम मंडळी,

तसा मी जन्माने हिंदू बरं का! अगदी कोकणस्थ ब्राह्मण! पण एकूणच आपला जातीपातीवर, धर्मावर तसा विश्वास नाही! अहो नाहीतरी आपल्याला 'मनुष्य-प्राणी' असंच म्हटलं आहे. म्हणजे ऍडव्हान्स बुद्धीचे (म्हणजे 'प्रगत'मेंदू का काय ते म्हणतात ते हो! शिवाय आपला मेंदू 'प्रगत' वगैरे आहे हे आपणच ठरवलं, इतर प्राण्यांनी, वाघसिंह, कुत्रामांजर, एकपेशीय अमिबा वगैरे मंडळींनी ते अद्याप मान्य कुठे केलंय?! अहो सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय न दिसणार्‍या जंतूंमुळे आपल्याला साधी अमिबिक डिसेन्ट्री जरी झाली तरी आपण रात्रभर किमान दहा-पंधरा रेघोट्या तरी ओढतोच की! मग उगाच कशाला मारे प्रगत मेंदूची अन जातीधर्माची शेखी मिरवा? :)

हां, तर काय सांगत होतो? तर जरी आपण ऍडव्हान्स बुद्धीचे वगैरे असलो तरी शेवटी मनुष्यप्राणीच ना? आणि प्राण्याला कुठे असते जातपात? मग आपल्याला तरी जातीधर्माचं लेबल कशाला हवं?! 'कोकणस्थ वाघ' किंवा 'कुडाळ देशकर सिंह' किंवा 'गौड सारस्वत अस्वल' असं आपण कधी ऐकलं आहे का? किंवा 'मुस्लिमधर्मीय उंट' किंवा 'जैनधर्मीय हरणटोळ' किंवा 'बौद्धधर्मीय खवलेमांजर' असं तरी आपण कधी ऐकलं आहे का? मग तात्याची जात तेवढी कोकणस्थ! किंवा अमूक तेवढा सारस्वत कुडाळदेशकर! किंवा तमूक तेवढा देशस्थ दांडगा! अश्या जाती तरी का आणि कशाला हव्यात, ते सांगा पाहू! :))

तरीही मला या समाजात रहायचं आहे त्यामुळे समाजाच्या चालिरीती, जातपात, धर्म वगैरेची बंधने मला पाळावी लागणार आहेत. अहो समाजाचं सोडा, संकष्टी चतुर्थीला घरी ओल्या बोंबलाचं कालवण केलेलं माझ्या मातोश्रीला तरी चालणार आहे का? माझ्या कानाखाली दोन आवा़ज काढून 'मेल्या, तुला लाज नाही वाटत? कोकणस्थाच्या घरात जन्माला आलास ना? मग संकष्टीला आवर्तनं करायची सोडून ओल्या बोंबलाची कालवणं खायची स्वप्न बघतोस?' असं ती मला खडसावेल! :)

म्हणून मग मंडळी, मी काय गंमत केली आहे ते सांगू का? मी या सगळ्या जातीपाती, धर्म वगैरे माझ्या खाण्यापिण्याच्या सोयीसवयीनुसार ऍडजस्ट केल्या आहेत! सांगतो कसं ते...

आता संकष्टीचंच उदाहरण घ्या किंवा दत्तजयंतीचं उदाहरण घा! त्या दिवशी मी अगदी कोकणस्थ ब्राह्मण असतो. म्हणजे साबुदाण्याची गरमागरम खिचडी, खरवस, उत्तम दर्जाची ताजी मावा बर्फी (उपासाला चालते हो!), बटाट्याचा कीस, आमच्या गोखलेकडचं पियूष किंवा शिंगाड्याच्या पिठाचे किंवा साबुदाण्याचे गरमागरम वडे, उपासाची मिसळ असले पदार्थ अगदी मनसोक्त हाणतो! जिभेचे चोचलेही पुरले आणि जातीपारी जातही राहिली! उपास असलेला कोकणस्थ ब्राह्मण, तात्या अभ्यंकर! जोडीला एखादं आवर्तनही म्हणतो, साला गणपतीबाप्पा पण खुश!! :)
(ओल्या बोंबलाच्या कालवणाचा बदला पुन्हा केव्हातरी घेतोच!:)

मामलेदार कचेरीजवळची किंवा कोल्हापुरातली झणझणीत मिसळ चापतांना मात्र मी ब्राह्मण नसतो बरं का! सालं कुल्याला बेंड फुटेस्तोवर तिखट खाणं, ही भटाब्राह्मणांची कामं नव्हेत! :) मग त्या दिवशी मात्र मी मिसळीची तर्री चापणारा कुणी तात्या शिंदे, पाटील, किंवा तात्याबा म्हात्रे वगैरे असतो! :)

'अभ्यंकर' होऊन मिसळ खायला तेवढी मजा येत नाही हो! ती मजा कुणी शहाण्णव कुळी मराठा 'पाटील' बनूनच येते! त्यामुळे जसा खाद्यपदार्थ समोर असेल तशी जातपात, धर्म मी धारण करतो, मनाने त्या 'जाती'त जातो आणि मगच समोरचा पदार्थ चापतो! अगदी अस्स्ल चव लागते आणि वेगळीच मजा येते! आपणही अगदी अवश्य अनुभव घेऊन पाहा! नाहीतरी 'परकाया प्रवेश' नावाचा प्रकार असतोच ना! तसा माझा आपला 'परजात' किंवा 'परधर्म प्रवेश!' :)

छानपैकी सकाळची वेळ आहे, खास तमिळी उदबत्त्यांचा सुवास येतो आहे, कुठूनतरी एम एस सुब्बलक्ष्मींचं 'कौसल्या सुप्रजा' ऐकू येतंय, आणि समोर केळीच्या पानावर अस्सल तमिळी पद्धतीने केलेलं गरमागरम इडलीसांबार आहे! व्वा! तेव्हा मात्र मी तात्या सुब्रमण्यम असतो! मस्तपैकी तात्या सुब्रमण्यम किंवा तात्या अय्यर किंवा तात्या चिदंबरम बनून माटुंग्याच्या (पूर्वेला स्थानकाबाहेरच) श्रीकृष्ण बोर्डींग हाऊस मध्ये जावं आणि तमिळी भोजनावर यथेच्छ ताव मारावा! केळीच्या पानावर काय सुंदर जेवण वाढतात! अस्सल तमिळी चव असलेलं सांबार, गरमागरम रस्सम, भात, कच्च्या केळ्याची किंवा सुरणाची किंवा अश्याच कुठल्याश्या कंदाची सुंदर भाजी असते, कुठलंतरी छानसं तमिळ पद्धतीचं पक्वान्न असतं! तमिळ लोकांच्यात परजात प्रवेश करावा आणि गरमागरम सांबार भाताच्या राशीच्या राशी उठवाव्यात! मला तिथे बसून यथेच्छ रस्सम सांबार भात जेवताना श्रीकृष्ण बोर्डींग हाऊसचा मालक काय कौतुकाने माझ्याकडे पाहात असतो! समोरचं तमिळी अन्न भक्तिभावाने खातांना पाहून त्याला मी त्यांच्यातलाच कुणीतरी वाटतो! सोबत असलाच कुणी अस्सल तमिळी, तर जेवताजेवता त्याच्याशी 'ग्रॉस जी डी पी रेश्यो', 'बॅन्क रेट' यासारख्या विषयांवर विंग्रजीतून गप्पा माराव्यात! :) तीच तमिळी कथा रुईयाजवळच्या मणीजची! आहाहा, गरमागरम इडली खावी आणि उत्तम सांबार प्यावं ते 'मणीज'कडेच! साला 'मणीज'कडचं सांबार प्यायला नाही तो मुंबईकरच नव्हे!

छानशी दुपारची वेळ आहे, आणि मी गिरगावातल्या
समर्थ भोजनालयात बसलो आहे! बर्‍याचदा खाकी हाफचड्डीत वावरणारा आमच्या शिंदुदुर्ग जिल्ह्यातला मालवणी बाल्या संज्या मला खास मालवणीत विचारतोय, "खय तात्यानू, बर्‍याच दिवसान? गरमगरम सुरमय देवू?" आहाहा! अहो संज्याच्या तोंडातली ती अमृतवाणी ऐकली की कान तृप्त होतात हो! मग काय, समोरचं ते परब्रह्म असलेलं मासळीचं भरलेलं ताट आणि मी! आता मात्र मी तात्या वालावलकर होतो! :) खाणावळीतली इतर मंडळीही ठार गिरणगावकर, गिरगावकर चाकरमानी. मासळीवर ताव मारता मारता मग सचिनच्या बॅटिंगवर चर्चा! भाईकाका म्हणतात त्याप्रमाणे अस्सल मुबईकर हा क्रिकेट हा खेळण्याचा नसून बोलण्याचा विषय आहे असं समजतो, या वाक्याचा अनुभव समर्थ भोजनालयात येतो. तिथे सगळेच रमाकांत आचरेकर असतात! :)

मुन्शिपाल्टीत लायसन डिपार्टमेन्टला असलेला कुणी पांडुरंग मालंडकर, "मायझव तिच्यायला तात्यानूऽऽ, सालं क्रिकेटमध्ये हल्ली सगळं राजकारणच शिरलंय हो!" असं म्हणत बांगड्यावर ताव मारत असतो, 'बीईएसटी'त कामाला असलेला कुणी सुरेश पेडणेकर "नाय पण मी काय म्हणतो तात्याऽ, त्या गांगुलीला सचिनचं काय पण चांगलं झालेलं बघवत नाय बघा!" असं म्हणत कोलंबीची आमटी चापत असतो किंवा "अरे संज्या, जरा गरम मांदेली आण रे, आणि मटणात नळी दे म्हणून सांगितलं तुका तर नळी दिलीसच नाऽय! " अशी कंपलेन्ट कुणी वयोवृद्ध गिरणीकामगार करत असतो!

आहाहा! समर्थ भोजनालयात या टाईपच्या गप्पाटप्पा ऐकत ऐकत मासळीचं जेवायला काय मजा येते म्हणून सांगू! हां, पण तिथे मात्र मी तनमनधनानं 'वालावलकर', किंवा 'प्रभू', किंवा 'सावंत' असतो बरं का! तिथे तात्या अभ्यंकर किंवा तात्या चिदंबरम बनून गेलो तर साली मच्छी अळणी आणि बेचव लागेल! :)

भातबाजारातल्या सुरती भोजनालयातील दूधपाक, पात्रा, डाळढोकली अने खमण खाताना मी कच्छी बनिया तात्याभाई पटेल असतो, तर कोलंबीची खिचडी, वालाचं बिरडं आणि कानवले खाताना मी तात्या गुप्ते असतो! ग्रँटरोडच्या बी मेरवान आणि मंडळी किंवा मेट्रो जवळील कयानी-बास्तानी मधला मावा केक, ब्रुम-मस्का, डब्बल आमलेट, आणि पावमस्का खातांना आपण 'तात्या इराणी' किंवा 'तात्या बाटलीवाला' असतो! :)

क्रॉफर्ड मार्केट जवळील ग्रँट हाऊस कॅन्टीन मध्ये वर तळलेली हिरवी मिरची असलेला खिमा आणि सोबत पाव, किंवा तिकडचा झिंगा फ्राय राईस, किंवा गावठी कोंबडी खाताना मी ग्रॅटहाऊस समोरीलच पोलिस कमिशनरच्या हापिसातला अकाउंटस डिपार्टमेन्टचा हेडक्लार्क 'तात्या कानविंदे' असतो तर सायनच्या मॉडर्न लंच होम मध्ये पापलेट मच्छी कढी खातांना मी 'तात्या शेट्टी' असतो!

'तात्या दुबे' किंवा 'तात्या मिश्रा' बनून व्हीटी समोरील बोराबाजार स्ट्रीटच्या तोंडावरील 'पंचम पुरी' मध्ये पुरी पात्तळभाजी खायला किंवा फोर्टातल्या मथुराभुवनमधले पेढे आणि आटीव दूध प्यायला मजा येते!

मित्तल टॉवरमधल्या २० मजल्यावरच्या एका मल्टीनॅशनल कंपणीचा शी ई ओ 'तात्या ओबेरॉय'बनून कुणा 'पायल वडेधरा' नावाच्या 'आयटम!' शेक्रेट्री सोबत नरीमन पॉईंटच्या स्टेटस मध्ये जेवायला खूप मजा येते तर म्हापश्यात सांजच्या टायमाला 'तात्या डिकास्टा' बनून म्हापश्यातच बनलेली देशी दारू प्ययला आणि 'तात्या चिखलीकर' बनून कर्लीचं कालवण खायला खूप मजा येते! :)

चला, आता मुंबईपासून थोडं दूर जाऊ आणि जरा वेळाने पुन्हा मुंबईत परत येऊ!

हैद्राबादेतल्या चारमिनार परिसरात मिळणारं हलीम किंवा लखनऊच्या हनीफभाईची आख्ख्या लखनवात घमघमाट सुटणारी 'दम' केलेली गोश्त बिर्याणी खाताना मात्र मला जातच काय पण धर्मही बदलावा लागतो! छ्या, त्याशिवाय ती चव अनुभवताच येत नाही! जुन्या हैद्राबादेत रोज्याच्या दिवसात मिळणारं हलीम! आहाहा.. काय विचारता मंडळी! गव्हाची कणीक आणि मटण वापरून केलेला गुरगुट्या भातासारखा हा एक अजब पदार्थ! मग मी 'तात्या खान' किंवा कुणी 'अस्लम मुहम्मद तात्या' बनतो आणि गरमागरम हलीम अगदी चवीचवीने आणि अलगदपणे चमचा चमचा जिभेवर ठेवतो! आहाहा काय साली चव असते हलीमला!

तिच कथा हनीफभाईकडच्या लखनवी बिर्याणीची. संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेला लखनवात मनसोक्त भटकावं आणि किंचित दमून हनीफभाईकडे बिर्याणी खायला यावं! (जुनं लखनौ, बडीचावडी, मीरामहलच्याजवळ!) इथे मात्र मनानं 'तात्याशहा जफर' बनल्याशिवाय मला बिर्याणी खाताच येत नाही! आहाहा, मऊ लुसलुशीत गोश्त, कणीकेचा दम, मंद चवीचे, मुस्सलमानी ढंगाचे हनीफभाईच्याकडच्या पिढ्यानपिढ्यांचा वारसा सांगणारे ते पुश्तैनी मसाले! उगवती-मावळतीचे रंग फिके पडावेत अशी रंगसंगती असलेली, केशराचे पाणी शिंपडलेली ती गोश्त दम बिर्याणी! काय सांगू मंडळी तुम्हाला! जाऊ द्या झालं!...

तर मंडळी, अशी सगळी मजा! अजूनही माझ्या बर्‍याच जातीपातींबद्दल मला भरभरून लिहायचे आहे पण ते पुन्हा कधितरी मूड लागेल तेव्हा! :)

'माणूस शेवटी जातीवर जातो' असं म्हणतात. त्यामुळे सगळं फिरून झाल्यावर मीही पुन्हा एकदा 'कोकणस्थ तात्या अभ्यंकर' ही जात धारण करणार आहे आणि आपल्याला घेऊन जाणार आहे देवगडातल्या सकाळची कोवळी उन्हं पडलेल्या ओसरीवर! शिपणाच्या आवाजाच्या पार्श्वसंगीताच्या साथीने केळीच्या पानावरचा मऊभात खायला! गरमागरम मऊ गुरगुट्या भात, वर तुपाची धार, आणि सोबत पोह्याचा भाजलेला पापड व आंबोशीचं लोणचं!

घेऊन जाणार आहे आपल्याला भाईकाकांचा 'तात्या बर्वा' बनून रत्नांग्रितल्या मधल्या आळीत गर्‍यांची कढी खायला आणि बरक्या फणसाची सांदणं खायला! :)

असो...

गुरुवर्य भाईकाका म्हणतात ते खरंच आहे! इतर कुठल्याही कारणांसाठी नकोत परंतु खाद्यपदार्थांचे वैविध्य टिकविण्यासाठी तरी जातीपाती हव्यात!

मंडळी, कालच माझ्या स्वप्नात भाईकाका आले होते. म्हणाले, "तात्या गधड्या, तुझं ते रौशनी वगैरे पुरे आता, काहीतरी चांगलं खाण्यापिण्यावर, संगीतावर लिही रे! मी ते वाचेन कौतुकाने!":)

म्हणूनच हा एक मोडकातोडका, वेडावाकडा लेख भाईकाकांच्या चरणी समर्पित!

जय भाईकाका!
जय देवी अन्नपूर्णा!
समस्त जातीधर्मांचा विजय असो...

--तात्या अभ्यंकर.

हाच लेख येथेही वाचता येईल!