August 27, 2006

बसंतचं लग्न..६ (मालकंस)

नमस्कार मंडळी,
बसंतच्या लग्नाची लगबग मांडवांत सुरूच आहे. विविधरंगी फुलांची सजावट केली आहे. अत्तराचा घमघमाट सुटला आहे. झकपक कपडे, दागदागीने घालून सगळी रागमंडळी नटुनथटून आली आहेत.
ते सर्वांत पुढे सोफ्यावर मल्हार महाराजांच्या बाजुलाच कोण बुजुर्ग व्यक्तिमत्वं बसलंय बरं? काय विलक्षण तेज आहे त्याच्या चेहेऱ्यावर!! एखादा योगी बसला आहे असंच वाटतंय! खुद्द आपला यमन त्यांच्या बाजुला अत्यंत अदबीने उभा राहून त्यांना काय हवं नको ते पाहतोय! इतर सगळे राग मोठ्या आदराने त्याला भेटत आहेत, वाकुन नमस्कार करत आहेत!! कोण, आहे तरी कोण ते?
मंडळी, ते आहेत मालकंसबुवा! राग मालकंस!!

मालकंसची थोरवी मी काय वर्णावी? धन्य ते आपलं हिंदुस्थानी रागसंगीत ज्यात मालकंस सारखा राग आपल्याला लाभला आहे! मालकंस, एक भक्तिरसप्रधान राग. समाधीचा राग. मंडळी, मालकंस तसा समजावून सांगायला कठीण आहे. यमन, भूप, हमीर, बिहाग जितक्या पटकन समजावून सांगता येतील तितक्या पटकन मालकंस नाही समजावता येणार! याचा अर्थ असा नव्हे की यमन खूप सोपा आहे, आणि मालकंस खूप कठीण आहे. याचा अर्थ असाही नव्हे की यातला एक मला जास्त आवडतो आणि एक कमी आवडतो. प्रश्न आहे तो हा, की मी आज भक्तिमार्गाच्या कितव्या पायरीवर उभा आहे? की अजून सुरुवातच झालेली नाहीये? कारण शेवटी प्रत्येक रागाचा प्रत्येक सूर त्या अंतीम शक्तीकडेच जातो, हे जर मान्य केलं तर आपण एवढंच म्हणू शकतो की आज यमनच्या प्रत्येक सुराबरोबर परमेश्वराशी संवाद साधणं मला जेवढं सोपं जात आहे तेवढं मालकंसमधून नाही!! माझी अजून तेवढी पोहोच नाही असं म्हणू आपण हवं तर!

भक्तिमार्गाच्या काही पायऱ्या असतांत. तात्या अभ्यंकरने विठोबाचं नांव घेणं, आणि तुकोबांनी विठोबाचं नांव घेणं यात जमीन-आस्मानापेक्षा सुध्दा कित्येक पट जास्त अंतर आहे की नाही?:) का आहे हे अंतर? तर तुकोबांची विठ्ठलापाशी जी लगन आहे, एकरुपता, एकतानता आहे, त्याच्या कित्येक मैल आसपासही तुमची माझी नाही! ती तुकोबांच्या पातळीची एकतानता, तेवढी एकरूपता, तेवढी लगन म्हणजे मालकंस!!!

गुंदेचाबंधू हे तरूण गायक माझे अत्यंत आवडते ध्रुपद गवय्ये आहेत. भोपाळला राहतात. त्यांचा प्रत्यक्ष मालकंस ऐकायचादेखील योग मला आला आहे. त्यांना इथे ऐका. गुंदेचाबंधूंनी मालकंसात केलेली आलापी आहे ही. बघा तरी ऐकून!

"जयती जयती श्री गणेश,शंकरसुत लंबोदर"

गुंदेचाबंधूंनीच गायलेली ही गणेशवंदना येथे ऐका. डोळ्यात पाणी येतं हो! अक्षरशः एखादा यज्ञ सुरू आहे असा भास होतो!!

मंडळी, धनश्री लेले नावाची माझी एक ठाण्याचीच मैत्रीण आहे. उच्चशिक्षित आहे. संतसाहित्याची, गीतेची, भाषेची खूप व्यासंगी आहे. वक्तृत्वही छान करते, आणि लिहितेही छान. तीच्याशी बोलतांना एकदा मालकंसचा विषय निघाला. मी लगेच माझं पांडित्य सुरू केलं!:) आणि मालकंस मला कसा भावतो हे सांगीतलं. मला एकदा मालकंस गुणगुणतांना एक एकतालातली धून सुचली होती, ती मी तिला गुणगुणून दाखवली. लगेच त्यावर तिने पहा काय छान शब्द रचले!

अस्थाईः
गुणीजन कर नित वंदन,
मन समाए सुख बसंत,
गुणीजन हरिसम जानत
अंतराः
रसिक रंग, मन उमंग,नवतरंग छायत हो,
नमो नमो, नमो नमो,गुणीजन सबको!

मालकंसमधली ही एक छान बंदीश झाली असं म्हणता येईल. वरदा गोडबोले नावाची माझी अजून एक मैत्रीण आहे. शास्त्रीय संगीत खूप छान गाते. आम्ही तिघांनी एके ठिकाणी होळीनिमित्त एक कार्यक्रम सादर केला होता, त्यात वरदाने ही बंदीश फार सुरेख गायली होती.
अजून काय काय नी किती दाखले देऊ मालकंसचे महाराजा?!! दिनानाथरावांनी गायलेलं तात्याराव सावरकरांचं "दिव्य स्वातंत्र्य रवि" येथे ऐका. म्हणजे मालकंसची Depth काय आहे ते लक्षात येईल. बाबुजींनी तर कमालच केली आहे. बाबुजींना तर मालकंसमध्ये देव, आणि देश हा एकच दिसला, आणि त्यांनी "वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदेमातरम्" हे फार अप्रतीम गाणं याच रागात बांधलं! या संकेतस्थळावर बैजुबावरा या चित्रपटातलं "मन तरपत" हे मालकंसातलं गाणं ऐका. नौशादसाहेबांना आणि रफीसाहेबांना आपला सलाम! फार सुरेख गाणं आहे हे!

मंडळी, अजून काय सांगू मालकंसबद्दल? मनुष्य अक्षरशः गुंग होतो. आत्मानंदी होतो! मालकंस आपल्याला परमेश्वरी अस्तित्वावर विश्वास ठेवायला भाग पाडतो. आयुष्यात केव्हातरी अशी वेळ येते की जिथे मनुष्य जरा थांबतो आणि त्याला थोडसं मागे वळून पहावसं वाटतं. इथपर्यंत आलो खरे. काय चुकलं आपलं? आपल्याकडून कोणी उगीचच्या उगीच दुखावलं तर नाही ना गेलं? आता पुढचा प्रवास कसा होईल? कुठेतरी जरा काही क्षण डोळे मिटुन स्वस्थ बसावसं वाटतं, आणि थोडसं आत्मचिंतन करावसं वाटतं. हे आत्मचिंतन म्हणजे मालकंस! मंडळी, मालकंसच्या सुरांत एवढी विलक्षण ताकद आहे की, हेवे-दावे, द्वेष-मत्सर, तुझं-माझं, यासारख्या गोष्टी क्षणांत क्षूद्र वाटायला लागतात! वाल्मिकी होण्यापूर्वी वाल्याने रामनामाचा जो जप केलान ना, तो जप म्हणजेच मालकंस!!

आणि Last, but not least!

"अणुरणीया थोकडा, तुका आकाशाएवढा" हे गाण्याकरता भीमण्णांना मालकंस रागासारखा दुसरा आधार नाही. ते सामर्थ्य फक्त मालकंसमध्येच! अण्णांसारखा स्वरभास्कर जेव्हा दोन तंबोऱ्यांमध्येबसून "तुका म्हणे आता, उरलो उपकारापुरता" अशी आळवणी करतो ना, तेव्हा त्या सभागृहात तो "सावळा"कमरेवर हात ठेऊन प्रसन्न मुद्रेने उभा असतो!!

--तात्या अभ्यंकर.

1 comment: