August 27, 2006

बसंतचं लग्न..८ (भीमपलास)

बसंताच्या लग्नाची धामधूम मंडपात सुरू आहे. आतापर्यंत भले भले राग आपल्या बसंतला आशिर्वाद, शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत, स्थानापन्न झालेले आहेत. आणीही काही राग येत आहेत, येणार आहेत. हिंदुस्थानी रागसंगीताची एक मांदियाळीच आहे ही!.
एक राग मात्र कौतुकाने बसंतच्या लग्नाची ही सगळी लगबग पहात उभा आहे. फार गोड राग आहे तो. वा! काय प्रसन्न मुद्रा आहे त्याची! मंडळी, काही काही माणसं अशी असतात, की त्यांना कधी रागावताच येत नाही. त्यांच्या मनात प्रत्येकाबद्दल फक्त कौतुक आणि कौतुकच भरलेलं असतं. तसाच हा राग आहे. कोण आहे बरं हा?

मंडळी हा आहे राग भीमपलास..!!

भीमपलास म्हणजे सात्त्विकता. मी काय वर्णावी भीमपलासची गोडी! आपला भीमपलासशी पटकन परिचय व्हावा म्हणून हे एक लहानसं क्लिपींग ऐका.

"बीरज मे धूम मचावत कान्हा
कैसे के सखी जाऊ अपने धाम"
ही भीमपलासातील पारंपारिक बंदिश आपल्याला ऐकायला मिळेल. कान्ह्याने आपल्या लीलांनी एवढी धूम मचावून ठेवली आहे की घरी कसं जायचं हा प्रश्न गोपींना पडला आहे. कधी वाट रोखून तो खोड्या काढील, हे काही सांगता यायचे नाही. पण मंडळी, खरं पाहता या गोपींची ही तक्रार काही खरी नाही. त्यांना खरं तर कान्ह्याने खोडी काढलेली हवीच आहे. त्यांची आंतरिक इच्छा तीच आहे. ही आंतरिक इच्छा म्हणजेच भीमपलास..!
मंडळी, काय काय सांगू भीमपलासाबद्दल? कसा आहे भीमपलासचा स्वभाव? अत्यंत सात्त्विक, प्रसन्न. मला तर भीमपलास म्हटलं की शनिवारचा उपास, साबुदाण्याची खिचडी, गरम मसाला दूध, आणि छानसा बर्फीचा तुकडा या गोष्टी आठवतात..!
आपण आजपर्यंत बसंतच्या लग्नात अनेक राग पाहिले. गोडवा, प्रसन्नपणा हा यातील प्रत्येकाचा स्थायीभाव आहे. तरीही या प्रत्येकाचं वेगळं असं एक वैशिष्ट्य आहे. त्यातले काही यमन सारखे हळवे असतील, बिहाग, हमीर सारखे शृंगारिक असतील, मालकंसासारखे साधूजन असतील, तर काही मिया मल्हारासारखे अद्भुत असतील. तसंच भीमपलास हा राग प्रसन्न, गोड तर आहेच, पण त्यातली सात्विकता ही मला विशेष भावते. आज आपल्या मराठी संगीतात या रागात अगदी भरपूर गाणी आपल्याला ऐकायला मिळतील. तरी या रागाची गोडी तसूभरही कमी होत नाही.

"स्वकुल तारक सुता,
सुवरावरूनी वाढवी वंशवनिता"
स्वयंवरातल्या नारायणराव बालगंधर्वाच्या वरील पदातला भीमपलास पहा काय सुरेख आहे. असा भीमपलास झाला नाही, होणे नाही. भास्करबुवांचं संगीत, अत्यंत लडिवाळ गायकी असणारे नारायणराव आणि राग भीमपलास! मंडळी, अजून काय पाहिजे?

"अमृताहुनी गोड नाम तुझे देवा
मन माझे केशवा, का बा न घे?"

माणिकताईंचं हे गाणं ऐका. आहाहा! अरे काय सांगू माझ्या भीमपलासाची थोरवी! अहो, देवाचं नांव तर अमृताहूनी गोड आहेच, पण यातला भीमपलासही अमृताहुनी गोड आहे! भीमपलासमधील सात्त्विकता, गोडवा समजून घ्यायचा असेल तर या गाण्याचा अवश्य अभ्यास करावा. एक तर माणिकताई या नारायणरावांच्याच पठडीतल्या. त्यामुळे हे गाणंदेखील 'स्वकुल तारका' इतकंच भावतं! यातली 'सांग पंढरीराया काय करू यासी' ही ओळ ऐका. ही ओळ ऐकतांना तो कर कटावरी ठेवूनी विटेवरती उभा असलेला प्रसन्नमुद्रेचा पंढरीराया अगदी डोळ्यासमोर येतो हो!! भीमपलास राग हा त्या विठोबाने दिलेला प्रसादच आहे. चाखून तर बघा एकदा..

दशरथा घे हे पायसदान,
तुझ्या यज्ञी मी प्रगट जाहलो,
हा माझा सन्मान...

मंडळी, अहो या भीमपलासाने बाबुजींना मोहिनी नसती घातली तरच नवल! वरील गाणं ऐकावं म्हणजे या रागाचा आवाका लक्षात येईल. या गाण्यातलं एक कडवं आहे-
'श्रीविष्णूंची आज्ञा म्हणूनी,आलो मी हा प्रसाद घेवूनी,या दानासी, या दानाहून अन्य नसे उपमान....दशरथा घे हे पायसदान....
या ओळी ऐकतांना भीमपलासबद्दल 'या रागासी, या रागाहून अन्य नसे उपमान..' असंच म्हणावसं वाटतं! :)
गीतरामायणातलंच अजून एक गाणं-

"मुद्रिका अचूक मी ओळखिली ही त्यांची
मज सांग अवस्था, दूता रघुनाथांची"

हादेखील फार सुरेख भीमपलास आहे. गीतरामायणातल्या गाण्यातल्या गाण्यांवर एक स्वतंत्रच लेखमालाच लिहावी लागेल!

इंद्रायणी काठी, देवाची आळंदी
लागली समाधी ज्ञानेशाची....

ओहोहोहो..!! मंडळी, काय बोलू मी यावर? आपणच ठरवा भीमपलासचं सामर्थ्य! भाईकाकांचं संगीत, राग भीमपलास आणि साक्षात स्वरभास्करांचा आवाज..!!
मंडळी, अण्णांचा तसंच अनेक गवयांचा भीमपलासातील फार सुरेख ख्याल मला माझ्या सुदैवाने अनेकवेळा ऐकायला मिळाला आहे. अण्णांचे 'सुखाचे हे नाम आवडीने गावे', 'याच साठी केला होता अट्टाहास', 'यादव नी बा रघुकुलनंदन' यासारखे अनेक मराठी, कानडी अभंग भीमपलास रागात आहेत. ते त्यांच्या संतवाणी या कार्यक्रमातून अनेक वेळेला अगदी भरभरून ऐकले आहेत. कविवर्य वसंत बापट फार सुरेख निरूपण करीत. संतवाणी म्हणजे अण्णांचं दैवी गाणं आणि वसंत बापटांचं फार रसाळ निरूपण असं केशर घातलेलं आटीव दूधच!

असो..

मंडळी, खरंच सांगतो आपलं हिंदुस्थानी रागसंगीत एक खजिना आहे. उगाच इकडे तिकडे कुठे जाऊ नका. आपल्याच पोतडीत थोडं डोकावून पहा!

सरते शेवटी भीमपलासातल्या अभंगातील,

"अवघाची संसार सुखाचा करीन,
आनंदे भरीन, तिन्ही लोकी"
एवढेच सांगणे आहे...!

--तात्या अभ्यंकर.

1 comment:

  1. Anonymous12:40 PM

    माझ्या मते भीमपलास म्हणजे अगदी साध्या,सरळ वळणाचा राग आहे.त्याला मनातल्या मनात ठेवणं वगैरे काही जमत नाही. जे काही वाटतं ते तो लगेच सांगून मोकळा होतो. कधी कोणाची छेड काढण्याची तर बातच सोडा,याला त्याची गंमत केलेलीही कळत नाही.लगेच लहान मुलासारखं ’ए मी सांगंणारे तुझं नाव बाबांना’ असं म्हणणाऱ्यातला तो आहे. कोणी रस्त्यावर घसरून पडला तर हा त्याला हसणार नाही, उलट त्याला उठायला मदत करेल आणि जाताजाता इतरांना ’अश्या वेळी हसायचं नसतं’ वगैरे उपदेश करून जाईल. हा तसा काही आध्यात्मिक राग नाही, पण पुरेपूर सात्विक आहे.हा कधी कुठल्या रागिणीवर लाईन मारणार नाही.रोज दुपारी १२ आणि रात्री ८.३० वाजता जेवायला बसणारा, आधी वरणभात आणि मागाहून ताकभात न चुकता खाणारा हा राग आहे.

    ReplyDelete