राम राम मंडळी,
काही वैयक्तिक कारणांमुळे या वर्षी पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवात हजेरी लावू शकलो नाही, परंतु आजच त्या महोत्सवाला हजेरी लावलेले आमचे पुण्यातील मित्र चित्तोबा यांच्याशी फोनवर बोलणं झालं आणि त्यात आम्हाला एक अतिशय म्हणजे अतिशय आनंदाची बातमी समजली!
प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेली ३ वर्ष गाऊ न शकलेले भारतीय अभिजात संगीताचे अध्वर्यु, पद्मविभूषण, स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांनी या वर्षी या महोत्सवात आपली गानहजेरी लावून आपले गुरू रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ सवाईगंधर्व यांना स्वरांजली वाहिली!
मंडळी, संगीतक्षेत्रातल्या मंडळींकरता यापरीस दुसरी आनंदाची बातमी ती काय असू शकते?
आज वयाच्या ८५ व्या वर्षी अण्णांनी मुलतानी हा राग सादर केला आणि नारायणराव बालगंधर्वांचा 'अवधाची संसार' हा अभंग सादर केला. मुलतानी हा तर किराणा घराण्याचा खास राग आणि त्यावर अण्णांची असामान्य हुकूमत! तर 'अवघाची संसार' मधून त्यांच्या गुरूस्थानी असलेल्या नारायणरावांचं त्यांच्या जागा घेत घेत, त्यांची आठवण करून देणारं गाणं!
आत्ताच ईटीव्हीवरील बातम्यांवर ही बातमी दाखवली, अण्णांना गातांना बघितलं आणि धन्य धन्य झालो.
आजच्या फाष्ट, इन्स्टंट आणि एस एम एस ची भीक मागण्याच्या काळात अण्णांचा सच्चा सूर ऐकला आणि समाधान वाटलं! तोच सच्चा सूर, तीच श्रद्धा, तोच प्रामाणिकपणा, तीच सगळी तपस्या!! तीन वर्षच काय, परंतु तीनशे वर्ष जरी खंड पडला तरी अस्स्ल सोनं कधी बदलत नाही, त्याचा कस, त्याचा बावनकशीपणा कधी कमी होत नाही!!
मी संपूर्ण मिसळपाव परिवारातर्फे या स्वरभास्कराला वंदन करतो आणि परमेश्वर त्यांना उत्तम प्रकृतीस्वास्थ आणि उदंड आयुष्य देवो अशीच मनापासून प्रार्थना करतो! तमाम संगीतसाधकांवर, विद्यार्थ्यांवर, आणि आम्हा संगीत रसिकांवर त्यांची छत्रछाया आणि त्यांच्या आशीर्वादाचा वयोवृद्ध थरथरता हात असाच राहो हीच मनोकामना!
आपला,
(भीमसेनभक्त) तात्या.
No comments:
Post a Comment