राम राम मंडळी,
तसा मी जन्माने हिंदू बरं का! अगदी कोकणस्थ ब्राह्मण! पण एकूणच आपला जातीपातीवर, धर्मावर तसा विश्वास नाही! अहो नाहीतरी आपल्याला 'मनुष्य-प्राणी' असंच म्हटलं आहे. म्हणजे ऍडव्हान्स बुद्धीचे (म्हणजे 'प्रगत'मेंदू का काय ते म्हणतात ते हो! शिवाय आपला मेंदू 'प्रगत' वगैरे आहे हे आपणच ठरवलं, इतर प्राण्यांनी, वाघसिंह, कुत्रामांजर, एकपेशीय अमिबा वगैरे मंडळींनी ते अद्याप मान्य कुठे केलंय?! अहो सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय न दिसणार्या जंतूंमुळे आपल्याला साधी अमिबिक डिसेन्ट्री जरी झाली तरी आपण रात्रभर किमान दहा-पंधरा रेघोट्या तरी ओढतोच की! मग उगाच कशाला मारे प्रगत मेंदूची अन जातीधर्माची शेखी मिरवा? :)
हां, तर काय सांगत होतो? तर जरी आपण ऍडव्हान्स बुद्धीचे वगैरे असलो तरी शेवटी मनुष्यप्राणीच ना? आणि प्राण्याला कुठे असते जातपात? मग आपल्याला तरी जातीधर्माचं लेबल कशाला हवं?! 'कोकणस्थ वाघ' किंवा 'कुडाळ देशकर सिंह' किंवा 'गौड सारस्वत अस्वल' असं आपण कधी ऐकलं आहे का? किंवा 'मुस्लिमधर्मीय उंट' किंवा 'जैनधर्मीय हरणटोळ' किंवा 'बौद्धधर्मीय खवलेमांजर' असं तरी आपण कधी ऐकलं आहे का? मग तात्याची जात तेवढी कोकणस्थ! किंवा अमूक तेवढा सारस्वत कुडाळदेशकर! किंवा तमूक तेवढा देशस्थ दांडगा! अश्या जाती तरी का आणि कशाला हव्यात, ते सांगा पाहू! :))
तरीही मला या समाजात रहायचं आहे त्यामुळे समाजाच्या चालिरीती, जातपात, धर्म वगैरेची बंधने मला पाळावी लागणार आहेत. अहो समाजाचं सोडा, संकष्टी चतुर्थीला घरी ओल्या बोंबलाचं कालवण केलेलं माझ्या मातोश्रीला तरी चालणार आहे का? माझ्या कानाखाली दोन आवा़ज काढून 'मेल्या, तुला लाज नाही वाटत? कोकणस्थाच्या घरात जन्माला आलास ना? मग संकष्टीला आवर्तनं करायची सोडून ओल्या बोंबलाची कालवणं खायची स्वप्न बघतोस?' असं ती मला खडसावेल! :)
म्हणून मग मंडळी, मी काय गंमत केली आहे ते सांगू का? मी या सगळ्या जातीपाती, धर्म वगैरे माझ्या खाण्यापिण्याच्या सोयीसवयीनुसार ऍडजस्ट केल्या आहेत! सांगतो कसं ते...
आता संकष्टीचंच उदाहरण घ्या किंवा दत्तजयंतीचं उदाहरण घा! त्या दिवशी मी अगदी कोकणस्थ ब्राह्मण असतो. म्हणजे साबुदाण्याची गरमागरम खिचडी, खरवस, उत्तम दर्जाची ताजी मावा बर्फी (उपासाला चालते हो!), बटाट्याचा कीस, आमच्या गोखलेकडचं पियूष किंवा शिंगाड्याच्या पिठाचे किंवा साबुदाण्याचे गरमागरम वडे, उपासाची मिसळ असले पदार्थ अगदी मनसोक्त हाणतो! जिभेचे चोचलेही पुरले आणि जातीपारी जातही राहिली! उपास असलेला कोकणस्थ ब्राह्मण, तात्या अभ्यंकर! जोडीला एखादं आवर्तनही म्हणतो, साला गणपतीबाप्पा पण खुश!! :)
(ओल्या बोंबलाच्या कालवणाचा बदला पुन्हा केव्हातरी घेतोच!:)
मामलेदार कचेरीजवळची किंवा कोल्हापुरातली झणझणीत मिसळ चापतांना मात्र मी ब्राह्मण नसतो बरं का! सालं कुल्याला बेंड फुटेस्तोवर तिखट खाणं, ही भटाब्राह्मणांची कामं नव्हेत! :) मग त्या दिवशी मात्र मी मिसळीची तर्री चापणारा कुणी तात्या शिंदे, पाटील, किंवा तात्याबा म्हात्रे वगैरे असतो! :)
'अभ्यंकर' होऊन मिसळ खायला तेवढी मजा येत नाही हो! ती मजा कुणी शहाण्णव कुळी मराठा 'पाटील' बनूनच येते! त्यामुळे जसा खाद्यपदार्थ समोर असेल तशी जातपात, धर्म मी धारण करतो, मनाने त्या 'जाती'त जातो आणि मगच समोरचा पदार्थ चापतो! अगदी अस्स्ल चव लागते आणि वेगळीच मजा येते! आपणही अगदी अवश्य अनुभव घेऊन पाहा! नाहीतरी 'परकाया प्रवेश' नावाचा प्रकार असतोच ना! तसा माझा आपला 'परजात' किंवा 'परधर्म प्रवेश!' :)
छानपैकी सकाळची वेळ आहे, खास तमिळी उदबत्त्यांचा सुवास येतो आहे, कुठूनतरी एम एस सुब्बलक्ष्मींचं 'कौसल्या सुप्रजा' ऐकू येतंय, आणि समोर केळीच्या पानावर अस्सल तमिळी पद्धतीने केलेलं गरमागरम इडलीसांबार आहे! व्वा! तेव्हा मात्र मी तात्या सुब्रमण्यम असतो! मस्तपैकी तात्या सुब्रमण्यम किंवा तात्या अय्यर किंवा तात्या चिदंबरम बनून माटुंग्याच्या (पूर्वेला स्थानकाबाहेरच) श्रीकृष्ण बोर्डींग हाऊस मध्ये जावं आणि तमिळी भोजनावर यथेच्छ ताव मारावा! केळीच्या पानावर काय सुंदर जेवण वाढतात! अस्सल तमिळी चव असलेलं सांबार, गरमागरम रस्सम, भात, कच्च्या केळ्याची किंवा सुरणाची किंवा अश्याच कुठल्याश्या कंदाची सुंदर भाजी असते, कुठलंतरी छानसं तमिळ पद्धतीचं पक्वान्न असतं! तमिळ लोकांच्यात परजात प्रवेश करावा आणि गरमागरम सांबार भाताच्या राशीच्या राशी उठवाव्यात! मला तिथे बसून यथेच्छ रस्सम सांबार भात जेवताना श्रीकृष्ण बोर्डींग हाऊसचा मालक काय कौतुकाने माझ्याकडे पाहात असतो! समोरचं तमिळी अन्न भक्तिभावाने खातांना पाहून त्याला मी त्यांच्यातलाच कुणीतरी वाटतो! सोबत असलाच कुणी अस्सल तमिळी, तर जेवताजेवता त्याच्याशी 'ग्रॉस जी डी पी रेश्यो', 'बॅन्क रेट' यासारख्या विषयांवर विंग्रजीतून गप्पा माराव्यात! :) तीच तमिळी कथा रुईयाजवळच्या मणीजची! आहाहा, गरमागरम इडली खावी आणि उत्तम सांबार प्यावं ते 'मणीज'कडेच! साला 'मणीज'कडचं सांबार प्यायला नाही तो मुंबईकरच नव्हे!
छानशी दुपारची वेळ आहे, आणि मी गिरगावातल्या समर्थ भोजनालयात बसलो आहे! बर्याचदा खाकी हाफचड्डीत वावरणारा आमच्या शिंदुदुर्ग जिल्ह्यातला मालवणी बाल्या संज्या मला खास मालवणीत विचारतोय, "खय तात्यानू, बर्याच दिवसान? गरमगरम सुरमय देवू?" आहाहा! अहो संज्याच्या तोंडातली ती अमृतवाणी ऐकली की कान तृप्त होतात हो! मग काय, समोरचं ते परब्रह्म असलेलं मासळीचं भरलेलं ताट आणि मी! आता मात्र मी तात्या वालावलकर होतो! :) खाणावळीतली इतर मंडळीही ठार गिरणगावकर, गिरगावकर चाकरमानी. मासळीवर ताव मारता मारता मग सचिनच्या बॅटिंगवर चर्चा! भाईकाका म्हणतात त्याप्रमाणे अस्सल मुबईकर हा क्रिकेट हा खेळण्याचा नसून बोलण्याचा विषय आहे असं समजतो, या वाक्याचा अनुभव समर्थ भोजनालयात येतो. तिथे सगळेच रमाकांत आचरेकर असतात! :)
मुन्शिपाल्टीत लायसन डिपार्टमेन्टला असलेला कुणी पांडुरंग मालंडकर, "मायझव तिच्यायला तात्यानूऽऽ, सालं क्रिकेटमध्ये हल्ली सगळं राजकारणच शिरलंय हो!" असं म्हणत बांगड्यावर ताव मारत असतो, 'बीईएसटी'त कामाला असलेला कुणी सुरेश पेडणेकर "नाय पण मी काय म्हणतो तात्याऽ, त्या गांगुलीला सचिनचं काय पण चांगलं झालेलं बघवत नाय बघा!" असं म्हणत कोलंबीची आमटी चापत असतो किंवा "अरे संज्या, जरा गरम मांदेली आण रे, आणि मटणात नळी दे म्हणून सांगितलं तुका तर नळी दिलीसच नाऽय! " अशी कंपलेन्ट कुणी वयोवृद्ध गिरणीकामगार करत असतो!
आहाहा! समर्थ भोजनालयात या टाईपच्या गप्पाटप्पा ऐकत ऐकत मासळीचं जेवायला काय मजा येते म्हणून सांगू! हां, पण तिथे मात्र मी तनमनधनानं 'वालावलकर', किंवा 'प्रभू', किंवा 'सावंत' असतो बरं का! तिथे तात्या अभ्यंकर किंवा तात्या चिदंबरम बनून गेलो तर साली मच्छी अळणी आणि बेचव लागेल! :)
भातबाजारातल्या सुरती भोजनालयातील दूधपाक, पात्रा, डाळढोकली अने खमण खाताना मी कच्छी बनिया तात्याभाई पटेल असतो, तर कोलंबीची खिचडी, वालाचं बिरडं आणि कानवले खाताना मी तात्या गुप्ते असतो! ग्रँटरोडच्या बी मेरवान आणि मंडळी किंवा मेट्रो जवळील कयानी-बास्तानी मधला मावा केक, ब्रुम-मस्का, डब्बल आमलेट, आणि पावमस्का खातांना आपण 'तात्या इराणी' किंवा 'तात्या बाटलीवाला' असतो! :)
क्रॉफर्ड मार्केट जवळील ग्रँट हाऊस कॅन्टीन मध्ये वर तळलेली हिरवी मिरची असलेला खिमा आणि सोबत पाव, किंवा तिकडचा झिंगा फ्राय राईस, किंवा गावठी कोंबडी खाताना मी ग्रॅटहाऊस समोरीलच पोलिस कमिशनरच्या हापिसातला अकाउंटस डिपार्टमेन्टचा हेडक्लार्क 'तात्या कानविंदे' असतो तर सायनच्या मॉडर्न लंच होम मध्ये पापलेट मच्छी कढी खातांना मी 'तात्या शेट्टी' असतो!
'तात्या दुबे' किंवा 'तात्या मिश्रा' बनून व्हीटी समोरील बोराबाजार स्ट्रीटच्या तोंडावरील 'पंचम पुरी' मध्ये पुरी पात्तळभाजी खायला किंवा फोर्टातल्या मथुराभुवनमधले पेढे आणि आटीव दूध प्यायला मजा येते!
मित्तल टॉवरमधल्या २० मजल्यावरच्या एका मल्टीनॅशनल कंपणीचा शी ई ओ 'तात्या ओबेरॉय'बनून कुणा 'पायल वडेधरा' नावाच्या 'आयटम!' शेक्रेट्री सोबत नरीमन पॉईंटच्या स्टेटस मध्ये जेवायला खूप मजा येते तर म्हापश्यात सांजच्या टायमाला 'तात्या डिकास्टा' बनून म्हापश्यातच बनलेली देशी दारू प्ययला आणि 'तात्या चिखलीकर' बनून कर्लीचं कालवण खायला खूप मजा येते! :)
चला, आता मुंबईपासून थोडं दूर जाऊ आणि जरा वेळाने पुन्हा मुंबईत परत येऊ!
हैद्राबादेतल्या चारमिनार परिसरात मिळणारं हलीम किंवा लखनऊच्या हनीफभाईची आख्ख्या लखनवात घमघमाट सुटणारी 'दम' केलेली गोश्त बिर्याणी खाताना मात्र मला जातच काय पण धर्मही बदलावा लागतो! छ्या, त्याशिवाय ती चव अनुभवताच येत नाही! जुन्या हैद्राबादेत रोज्याच्या दिवसात मिळणारं हलीम! आहाहा.. काय विचारता मंडळी! गव्हाची कणीक आणि मटण वापरून केलेला गुरगुट्या भातासारखा हा एक अजब पदार्थ! मग मी 'तात्या खान' किंवा कुणी 'अस्लम मुहम्मद तात्या' बनतो आणि गरमागरम हलीम अगदी चवीचवीने आणि अलगदपणे चमचा चमचा जिभेवर ठेवतो! आहाहा काय साली चव असते हलीमला!
तिच कथा हनीफभाईकडच्या लखनवी बिर्याणीची. संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेला लखनवात मनसोक्त भटकावं आणि किंचित दमून हनीफभाईकडे बिर्याणी खायला यावं! (जुनं लखनौ, बडीचावडी, मीरामहलच्याजवळ!) इथे मात्र मनानं 'तात्याशहा जफर' बनल्याशिवाय मला बिर्याणी खाताच येत नाही! आहाहा, मऊ लुसलुशीत गोश्त, कणीकेचा दम, मंद चवीचे, मुस्सलमानी ढंगाचे हनीफभाईच्याकडच्या पिढ्यानपिढ्यांचा वारसा सांगणारे ते पुश्तैनी मसाले! उगवती-मावळतीचे रंग फिके पडावेत अशी रंगसंगती असलेली, केशराचे पाणी शिंपडलेली ती गोश्त दम बिर्याणी! काय सांगू मंडळी तुम्हाला! जाऊ द्या झालं!...
तर मंडळी, अशी सगळी मजा! अजूनही माझ्या बर्याच जातीपातींबद्दल मला भरभरून लिहायचे आहे पण ते पुन्हा कधितरी मूड लागेल तेव्हा! :)
'माणूस शेवटी जातीवर जातो' असं म्हणतात. त्यामुळे सगळं फिरून झाल्यावर मीही पुन्हा एकदा 'कोकणस्थ तात्या अभ्यंकर' ही जात धारण करणार आहे आणि आपल्याला घेऊन जाणार आहे देवगडातल्या सकाळची कोवळी उन्हं पडलेल्या ओसरीवर! शिपणाच्या आवाजाच्या पार्श्वसंगीताच्या साथीने केळीच्या पानावरचा मऊभात खायला! गरमागरम मऊ गुरगुट्या भात, वर तुपाची धार, आणि सोबत पोह्याचा भाजलेला पापड व आंबोशीचं लोणचं!
घेऊन जाणार आहे आपल्याला भाईकाकांचा 'तात्या बर्वा' बनून रत्नांग्रितल्या मधल्या आळीत गर्यांची कढी खायला आणि बरक्या फणसाची सांदणं खायला! :)
असो...
गुरुवर्य भाईकाका म्हणतात ते खरंच आहे! इतर कुठल्याही कारणांसाठी नकोत परंतु खाद्यपदार्थांचे वैविध्य टिकविण्यासाठी तरी जातीपाती हव्यात!
मंडळी, कालच माझ्या स्वप्नात भाईकाका आले होते. म्हणाले, "तात्या गधड्या, तुझं ते रौशनी वगैरे पुरे आता, काहीतरी चांगलं खाण्यापिण्यावर, संगीतावर लिही रे! मी ते वाचेन कौतुकाने!":)
म्हणूनच हा एक मोडकातोडका, वेडावाकडा लेख भाईकाकांच्या चरणी समर्पित!
जय भाईकाका!
जय देवी अन्नपूर्णा!
समस्त जातीधर्मांचा विजय असो...
--तात्या अभ्यंकर.
हाच लेख येथेही वाचता येईल!
ek number lihilay...tondala pani sutala vachun! :)
ReplyDeleteithe amhala roj sala pizza, burger khava lagtoy! :-( mala vaatata tumchi idea vaprun dharma badalun aani american banun khalla tar maja yeil khayla! ;-)
छान आहे. मजा आली.
ReplyDeleteBaryach diwasani bindhast ani rokhthok kahitari wachayla milale. tatyasaheb khadadi suru theva ani amhala pan sanga kuthe kuthe khata te...
ReplyDelete- prashant
मी पण आता non veg खाईन म्हणतो...!
ReplyDeleteमी पण आता non veg खाईन म्हणतो...!
ReplyDeleteतात्यानु एकदम जबरी हा.............
ReplyDeleteतात्यानु एकदम जबरी हा.............
ReplyDeleteतात्यानु एकदम जबरी हा.............
ReplyDeleteCHHAN LIHILE AAHE..
ReplyDeletebapre, tumacha khanyasathich janm jhala ahe..!! evadhe prachand prem khanyavar..!!
ReplyDeleteमाटुंगा सेंट्रल स्टेशन च्या बाहेर असलेले श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊस हे तामिळ भाषिकांचे नाही. ते कर्नाटकातील "राम नायक" कुटुंबाचे, म्हणजे GSB लोकांचे आहे. १९२० सालाच्या सुमारास सुरु झालेली सर्वात जुनी दक्षिणात्त्य खानावळ आहे.
ReplyDeleteतामिळ, तेलगू, मल्याळम आणि कानडी लोकांच्या स्वयंपाकात खूप प्रचंड फरक असतो. नाव "सांबार" जरी तेच असले तरी त्यांची चव अगदी पूर्ण भिन्न असते. तुम्ही मणिज मधले सांबार खाल्ले असेल. ते मल्याळम हॉटेल आहे त्यामुळे तिथे मिळणाऱ्या सांबारच्या चवीत आणि "उडपी" च्या हॉटेल मध्ये मिळणाऱ्या सांबारच्या चवीत खूप फरक असतो.
१९७० सालानंतर महाराष्ट्रात जन्मलेल्या मराठी लोकांची ही समजुतीत नेहमी घोडचूक होते की, त्यांना वाटते कोल्हापूरच्या पलीकडे सर्व तामिळ संस्कृती आहे!
अभ्यंकर, तुम्ही खवय्ये दिसतंय म्हणून तुम्हाला लिहीत आहे. नाहीतर मी पण लोकांच्या ज्ञानात फुकट भर टाकायच्या भानगडीत जात नाही!
किशोर कट्टी
माटुंगा सेंट्रल स्टेशन च्या बाहेर असलेले श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊस हे तामिळ भाषिकांचे नाही. ते कर्नाटकातील "राम नायक" कुटुंबाचे, म्हणजे GSB लोकांचे आहे. १९२० सालाच्या सुमारास सुरु झालेली सर्वात जुनी दक्षिणात्त्य खानावळ आहे.
ReplyDeleteतामिळ, तेलगू, मल्याळम आणि कानडी लोकांच्या स्वयंपाकात खूप प्रचंड फरक असतो. नाव "सांबार" जरी तेच असले तरी त्यांची चव अगदी पूर्ण भिन्न असते. तुम्ही मणिज मधले सांबार खाल्ले असेल. ते मल्याळम हॉटेल आहे त्यामुळे तिथे मिळणाऱ्या सांबारच्या चवीत आणि "उडपी" च्या हॉटेल मध्ये मिळणाऱ्या सांबारच्या चवीत खूप फरक असतो.
१९७० सालानंतर महाराष्ट्रात जन्मलेल्या मराठी लोकांची ही समजुतीत नेहमी घोडचूक होते की, त्यांना वाटते कोल्हापूरच्या पलीकडे सर्व तामिळ संस्कृती आहे!
अभ्यंकर, तुम्ही खवय्ये दिसतंय म्हणून तुम्हाला लिहीत आहे. नाहीतर मी पण लोकांच्या ज्ञानात फुकट भर टाकायच्या भानगडीत जात नाही!
किशोर कट्टी