>>शेवटी एकदाचे आलो आम्ही रौशनीच्या खोलीपाशी. खोलीत समोरच सोफ्यावर रौशनी बसली होती! पन्नाशीच्या आसपासची, गोरी, आणि देखणी!! <<
भाग ३ -
"आओ तात्याभाई, बैठो. शर्माना मत!" रौशनी माझ्याकडे पाहात हसून म्हणाली.
माझं नांवबिव सगळं बहुधा या बयेला माहीत होतं. मी तिच्या खोलीत शिरलो. आत जाताचक्षणी माझ्या कल्पनेला पहिला धक्का बसला. 'वेश्याबाजाराच्या एका मावशीचं घर ते कसं असणार? जसा तो बाजार गलिच्छ, त्यात वेश्याव्यवसाय करणार्या मुली जश्या गलिच्छ आणि कळकट, तशीच त्यांची मावशी व तिचं घरही कळकट, कुबट आणि ओ येणारं असणार!' या माझ्या कल्पनेला पार तडा गेला. एक तडा रौशनीच्या घरात शिरण्यापूर्वी तिच्या रुपाकडे पाहून गेलाच होता! दुसरा तडा तिच्या घरात शिरल्यावर गेला! अतिशय स्वच्छ, नीटनेटकं, छान आवरलेलं घर. घरात मंद उदबत्त्यांचा वास सुटलेला. तिच्या घरात जाऊन तेथील सोफ्यावर मी बसलो. समोर पाहतो तर भिंतीवर विवेकानंदांचा फोटो, एका लहानश्या शोकेसवजा कपाटात काही पुस्तकं ठेवलेली, कोपर्यात उभा केलेला तानपुरा! वेश्याव्यवसाय चालणार्या मुंबईच्या एका गलिच्छ वस्तीत मी बसलो होतो या गोष्टीचा माझा माझ्यावरही विश्वास बसेना!
बाजूच्याच सोफ्यावर रौशनी बसलेली होती. तिचं सौंदर्य नक्कीच खानदानी वाटत होतं, गोरपान रंग आणि पन्नाशीच्या पुढची असूनही आकर्षक बांधा राखून होती!
साधारणपणे वेश्यावस्तीतल्या मावश्याही तशाच कळकट, कजाग, ओबडधोबड, भयानक शिवराळ, बथ्थड चेहेर्याच्या, अक्षरशः कैदाशिणी वाटाव्यात अश्या, अत्यंत स्थूल शरीरमानाच्या, अस्ताव्यस्त आणि शेप गेलेल्या ओथंबलेल्या स्तनांच्या, नेसलेल्या साड्यांमधून दिसणारी त्यांची ती सुटलेली काळी पोटं दाखवणार्या असतात असा माझा समज होता! पण रौशनी एकदम वेगळी होती. चेहेरा सुरेख होता पण करारी होता, त्यात एक जरब वाटत होती! ती असणारच म्हणा. वेश्या वस्तीतील ३०/३५ मुलींची मावशी होणे, त्यांना सांभाळणे, पोलिस, गुंड, दारुवाले यांच्याशी नेहमी संबंध असणार्या बायका या! यांना साधं, गरीब राहून चालणारच नव्हतं!
ते काहीही असो, मला मात्र रौशनीकडे पाहताच क्षणी तिचे आकर्षण वाटले होते. 'च्यामारी, बाई पन्नाशीच्या घरातली दिसते पण अजूनही चांगला दमखम राखून असावी असा एक विचार माझ्या मनात डोकावून गेला! कोण असेल ही? इथे कुठून आली असेल? च्यायला रंडीबाजारातली मावशी ही, हिच्या घरात स्वामींचा फोटो कसा काय? काय संबंध? स्वामी हिने वाचले आहेत काय? हिच्या घरात इतरही पुस्तकं दिसताहेत? किती शिकलेली असेल ही? आणि कोपर्यातला तो तानपुरा? ही गाणं शिकलेली आहे की काय? की इतर कुणी यांच्या घरात गातं? मला हिने का बोलावलं असेल? आत्ता आपण ज्या कॉमन गॅल्लरीतून हिच्या घरात प्रवेश केला तिथून आमचा झमझम बार दिसतो खरा, परंतु तिथे येजा करताना असं किती वेळा हिने मला पाहिलं असेल? मलाच हिला का बोलवावासं वाटलं असेल? मन्सूरने माझ्याबद्दल हिला काय सांगितलं असेल?
सगळे प्रश्न! फक्त प्रश्न!! च्यामारी सुशिक्षित/सुसंस्कृत मंडळींना प्रश्नच फार पडतात! :)
"काय घेणार शेठ? काही दूध, लस्सी, कॉफी मागवू का? की थोडी व्हिस्की घेणार? सगळा बंदोबस्त आहे आपल्याकडे!" रौशनी कधी मराठीत बोले, तर कधी बंबैय्या हिंदीत तर कधी अस्खलित हिंदीत.
साला मी कसला तिच्याकडे काही दूध-लस्सी वगैरे घेणार होतो? मला खरं तर वेश्याव्यवसाय सांभाळणार्या एका मावशीच्या घरात आपण बसलो आहोत हेच अजून पचवायला कठीण जात होतं. त्यातच अधनंमधनं बाहेरून त्या परकर पोलक्यातल्या, काळपट रंगाच्या, ओठ सुजलेल्या विशीपंचविशीतिशी तल्या वेश्या माझ्याकडे पिजर्यातला प्राणी पाहावा अश्या पद्धतीने पाहात होत्या, एकमेकांकडे पाहून टिंगलीच्या सुरात हासत होत्या! 'ये कौन चुतिया इधर आ गया' असंच त्या आपापसात म्हणत असणार! 'च्यामारी झक मारली आणि इथे आलो. का आलो? इथून उठून ताडकन चक्क निघून जावं की काय?' असेच विचार माझ्या मनात येत होते! संस्कार! दुसरं काय? सुशिक्षित, सुसंस्कृत घराण्यातले पांढरपेशा संस्कार! रामरक्षा, पर्वचा, पाढे, शाळा, शिक्षक, मोतोपंत, बालकवी, या सगळ्या गोष्टी मला रौशनीच्या घरच्या सोफ्यावर आरामशीरपणे बसू देत नव्हत्या. कुल्याला फोड आलेला नसतानही मी त्या सोफ्यावर अवघडलेपणाने बसलो होतो!
तेवढ्यात, "एऽऽऽ क्यो खडी है सब लोग इधर? क्या नाटक है? ये सेठ इधर सो ने को नही आया है! चलो, निचे जाव सब लोग मादरचोद! धंदा करना नही करना क्या आज? यहा किसिको फोकट का खाना नही मिलेगा. धंदा नही करना है तो भागो यहासे और अपना रास्ता सुधारो! मन्सूर, तू अब जा और निचे जाके रुक. सेठको भेजती है मै थोडी देर के बाद!"
अरे बापरे माझ्या! बहुतेक माझं अवघडलेपण रौशनीच्या ध्यानात आलं असावं आणि तिने तिच्या ठेवणीतल्या आवाजात त्या बाहेर घुटमळणार्या रांडांना दम भरला असणार! 'ये सेठ इधर सोने के लिये नही आया?? बाबारे माझ्या..:) सानेगुरुजींची 'खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अरपावे' ही कविता म्हणणारा मी. एका सरळमार्गी शिक्षिकेचा मुलगा होतो मी. नोकरीधंद्याच्या निमित्ताने त्या भागात वावरत असे. हा इथे आपल्याबरोबर झोपायला आला आहे असं त्या मुलींना वाटलंच तरी कसं? अर्थात, वाटलं असेल तरी त्यांची काय चूक म्हणा! तिथे जाणारी माणसं केवळ त्या एकाच कामाकरता तिथे जात! ते काही स्वरुपानंदांच्या पावसचं किंवा गुहागरच्या व्याडेश्वराचं मंदिर नव्हतं! :)
"थोडी लस्सी तरी घ्या शेठ आमच्याकडची! हमभी आपही की तरह इन्सान है, थोडी लस्सी लोगे तो हमारीभी इज्जत रहेगी!"
रौशनीचा आवाज पुन्हा एकदन नॉर्मल. एका क्षणापूर्वी ही बया केवढ्या मोठ्यांने ओरडली होती! एवढं या बाईला स्वीच ऑन, स्वीच ऑफ तंत्र अवगत होतं? :)
"अरे कृष्णा, जा धोबीसेठ को एक लस्सी उपर भेजनोको बोल!"
आतल्या खोलीतून एक काळासावळा, १७-१८ वर्षांचा मुलगा बाहेर आला. चौकडीचा शर्ट आणि हाफ चड्डी घातलेला. तो पटकन माझ्यासमोरून जात लस्सीची ऑर्डर द्यायला खाली निघून गेला.
"बसा तात्याशेठ. लस्सी मागवली आहे. हा कृष्णा. इसिके बारेमे आपसे जरा बात करनी है!"
आता मात्र रौशनीचं बोलणं मला थोडं आश्वासक वाटू लागलं आणि हळूहळू माझा धीर चेपू लागला. मंडळी, आपल्याला खोटं वाटेल पण त्या बाईच्या चेहेर्यावर एक विलक्षण आत्मविश्वास होता, वागण्याबोलण्यात अदब होती! समोरच्या माणूस कितपत पाण्यात आहे हे अवघ्या एका नजरेत ओळखण्याचं कसबही तिच्यात अनुभवाने आलेलं असावं. माझ्या नजरलेला नजर देऊन बोलत होती. उलट मीच थोडासा भांबावलो होतो, उगाच इकडेतिकडे पाहिल्यासारखं करत होतो. तिच्या नजरेला नजर देणं मला जमत नव्हतं. वास्तविक मला guilty वाटण्याचं काहीच कारण नव्हतं. ना मी तिचे चारचव्वल देणं लागत होतो, ना कुठल्या गुन्ह्यात मला तिच्यासमोर उभं केलं गेलं होतं, ना मी तिच्यासोबत लाळघोटेपणाकरून झोपायला निघालो होतो! पण च्यामारी बाईचा चेहेराच साला भारी होता, आव्हानात्मक होता, एक प्रकारची हुकुमत होती तिच्या चेहेर्यावर!
क्रमशः..
तात्या अभ्यंकर.
No comments:
Post a Comment