'वृक्षवल्ली आम्हा..' (येथे ऐका)
अगदी साधीसरळ आणि तितकीच गोड चाल, चिपळ्यांचा ठेका, आणि विष्णुपंत पागनीसांची सुरेल, प्रासादिक गायकी. अतिशय सुरेख..!
'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे आळविती..'
आज तुम्हीआम्ही जंगलतोड वाचवा, झाडं लावा, झाडं जगवा असं म्हणून जिवाचा आटापिटा करत असतो.. परंतु तुकोबांचा द्रष्टेपणा पाहा..त्यांनी फारा वर्षापूर्वीच वृक्षवल्लींची महती गायली आहे.. नव्हे, त्यांना आपले सगेसोयरे मानले आहे!
'पक्षीही सुस्वरे आळविती..!'
किती सुंदर शब्द आहेत, सुंदर भाषा आहे! गाण्याच्या पार्श्वभूमीवर ही पक्षांची सुस्वर गायकी कानाला फार छान लागते!
'आमचा ना, चांगला ६००० स्क्वे.फुटाचा ब्लॉक आहे!', 'आमचं हे भलं मोठ्ठं फार्महाऊस आहे बरं का!' अश्या बढाया तुम्हीआम्ही मारत असतो. परंतु तुकोबांची श्रीमंती पाहा.. ते म्हणतात,
आकाश मंडप, पृथिवी आसन
रमे तेथे मन क्रीडा करी!
सहा-सात हजार स्क्वे.फुटांचा संकुचितपणा तुकोबांना जमत नाही!
तुका म्हणे होय मनासी संवाद
आपुलाचि वाद आपणासि!
किती मोठी गोष्ट सांगून गेलेत तुकोबा! 'मनासी संवाद..' असला म्हणजे पुरे.. कुणाचं कौन्सिलिंग नको, कधीही न संपणार्या चर्चा नकोत, मतमतांतरे नकोत, तंटेबखेडे नकोत..
'आपुलाचि वाद आपणासि!'.... हेच खरं!
-- तात्या अभ्यंकर.
No comments:
Post a Comment