माझे मन तुझे झाले..(येथे ऐका)
अनेक वर्षांपूर्वी आलेल्या स्वामी मालिकेतलं हे सुरेख गाणं. शब्द व संगीत सुधीर मोघेंचं. सुचित्रा बर्वेने खूप सुंदर गायलं आहे हे गाणं..
थोरले माधवराव पेशवे आणि रमाबाई. कधी नव्हे ते निवांतपणाचे दोन क्षण माधवरावांना व त्यांच्या पत्नीला मिळाले आहेत.. हे गाणं म्हणजे एक मूक संवाद, एक अनामिक ओढ, एक हुरहूर..! गूज एका प्रियकर-प्रेयसीतलं, एका पतिपत्नींतलं. विश्वास एका पतिपत्नीतला.. जगातल्या सर्वात सुंदर नात्यातला..!
खरं तर पुरीयाधनश्री रागातली एक विराणीच ही. राग पुरीयाधनश्री. पुरियाधनाश्री म्हणजे प्रार्थना, पुरियाधनाश्री म्हणजे आर्तता! केवळ अन् केवळ समर्पणाची भावना असलेला, असा हा एक विलक्षण स्वरसामर्थ्य असलेला राग!
पुरीयाधनाश्रीतलं हे गाणं म्हणजे केवळ एका प्रियकराचं आणि प्रेयसीचं बागेतलं गाणं नव्हे! माधवरावांच्या ऐन तारुण्यात जाण्याने रमामाधवाचं सहजीवन, त्यांच्यातला प्रेमसंवाद अपुराच राहिला. अतृप्तीच राहिली. अतृप्तीची भावना वाईट नसते! आयुष्याच्या सार्थकतेची, भरभरून जगलेल्या सहजीवनाची किनार जर त्या भावनेला असेल तर त्या अतृप्तीतही कुठेतरी एक आनंद असतो, एक समाधान असतं! परंतु अकाली, ऐन तारुण्यात आलेल्या मृत्युची एक भकास किनार जर तिथे असेल तर त्यातून आलेली अतृप्ती ही जीवघेणी ठरते, सरभैर, बेचैन करणारी ठरते!
वेदना जेवढी सुंदर बोलते तेवढं कुणीच बोलत नाही! आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की चांगलं गाणं हे बर्याचदा वेदनेपोटीच जन्माला येतं! आणि त्यातूनच पुरीयाधनाश्रीतली ही विराणीही जन्म घेते व जीवाला चटका लावून जाते!
-- तात्या अभ्यंकर.
हे गाणं ऐकायला जितके गोड वाटतं, तितकेच ते मालिका संपतानाचे दु:खी मोडमधले गाणं ऐकताना जीव तुटतो हो.. माधवरावांची चिता पेटते आणि माझे मन तुझे झाले म्हणतच दोन पक्षी क्षितिजाकडे झेप घेतात!!! एकदाच पाहिले.. नि दुसर्यांदा ते ऐकायचा/पाहायचा धीर नाही झाला!!!
ReplyDeleteमराठीवर्ल्ड.कॉम वरती पूर्ण गाणं उपलब्ध आहे..
बाकी, मिपाच्या मुपृवर हे गाणं पाहायला निश्चितच आवडेल!!
तात्या, हे स्वरचित्र आवडलं. नॉस्टॅल्जिक करून गेलं. स्वामी या मालिकेतलं हे गाणं १० सप्टेंबर १९८७ रोजी प्रसारित झालं होतं. तारीख पक्की लक्षात आहे त्याची काही 'खास' कारणं आहेत. त्या कारणांना या स्वरचित्रामुळे उजाळा मिळाला.
ReplyDelete- पपा