आज मी थोडं तात्विक चित्रविवेचन करणार आहे!
खालील चित्रांत मला काही राग दिसले. या चित्रांना आपण 'ऍब्स्ट्रॅक्ट रागचित्रे' असं म्हणू. आपल्या हिंदुस्थानी अभिजात संगीतातली 'राग', ही पूर्णत: भावनांशी निगडीत असलेली संकल्पना आहे. एकच राग प्रत्येकाला तसाच दिसेल असं नव्हे. रागदारी संगीत किंवा एकंदरीतच कुठलीही कला, ही अनुभवायची गोष्ट आहे. कलेच्या आस्वादाबाबत प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, प्रत्येकाच्या जाणिवा वेगळ्या असतात/असू शकतात! मला जे जे राग जसे जसे दिसले, जसे भावले, ते मी माझ्या बसंतचं लग्न या लेखमालिकेत शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे! माझ्यासारखा कुणी ते अनुभव शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. परंतु नुसताच शब्दात व्यक्त केल्याने हा शोध संपत नाही, तो सुरूच असतो. कारण मुळात कुठलीही कला ही अथांग असते, त्यामुळे आयुष्यभर तिचा शोध, मागोवा घेत राहणे यातच आनंद असतो. हा शोध कधीच संपू नये असं वाटतं आणि जेव्हा हा शोध संपतो तेव्हा आपली रसिकताही संपली असं समजायला हरकत नाही!
'शब्द' हे कला व्यक्त करण्याचं एक माध्यम झालं. तसंच 'चित्रं' हेही एक कलेची अभिव्यक्ति करण्याचं माध्यम आहे. परंतु माझं मन आपल्या रागसंगीतातच अधिकाधिक गुंतलेलं असल्यामुळे बर्याचदा मला एखादं चित्रं पाहूनदेखील चटकन एखादा रागच डोळ्यासमोर येतो! ही माझी व्यक्तिगत जाणीव झाली. आणि त्याच जाणिवेनुसार ही चित्रं पाहताना ते ते राग डोळ्यासमोर आले आणि या चित्रांच्या जागी मला काही 'ऍब्स्ट्रॅक्ट रागचित्रं' दिसायला लागली! ही रागचित्रं मी आपल्यासोबत शेअर करत आहे..
आता ह्या चित्रांतलं 'ऍब्स्ट्रॅक्ट रागस्वरूप' म्हटलं म्हणजे ते समजावून सांगायला पुन्हा शब्दही आले! ते शब्द मात्र माझे!
१)
हा तेजिनिधी लोहगोल मला भटियार रागाची आठवण करून देतो. प्रसन्न सकाळी कपाळाला केशरी टिळा लावलेल्या भटियाराचं राज्य असतं! भास्कर महाराजांसोबत अंबारीत बसून लालकेशरी प्रकाशकिरणांचे माणिकमोती उध़ळत हा भटियार अवतरतो! क्या केहेने! भटियारसारखा वैभवशाली राग दुसरा नाही!
२)
हा मुलतानी! आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातला एक स्वत:च्याच मस्तीत जगणारा राग! 'हम मुलतानी है...!' असं रगेल आणि रंगेलपणे सांगणारा! दुपारी आमरसपुरीचं यथेच्छ जेवून चांगलं ३-४ तास झोपावं, त्यानंतर उठून झकासपैकी माजुरड्या चहाची लज्जत चाखून त्या अंगावर आलेल्या दुपारच्या झोपेची धुंदी थोडी उतरवावी आणि चुना अंमळ जास्त असलेल्या १२० जाफरानी बनारसी पानाचा तोबरा भरून गाण्याच्या मैफलीत रुबाबात पुढे बसून अक्षरश: तुफ्फान जमलेला अण्णांसारख्या एखाद्या कसदार, खानदानी गवयाचा तेवढाच खानदानी मुलतानी ऐकावा! अद्भूत स्वरवैभव लाभलेला मुलतानी! खास किराणा पद्धतीचे निषादाचे तंबोरे झंकारावेत आणि मुलतानीने एका क्षणात सगळी मैफल स्वत:च्या ताब्यात घ्यावी, कह्यात घ्यावी, असा डौल त्या मुलतानीचा! आपणही एकदा हा अनुभव घेऊन पाहाच मंडळी!
एक रुबाबदार, देखणा, आणि खानदानी राग! वरील चित्रात्रला flames of forest ची आठवण करून देणारा तो डोंगर आणि त्याच्या लगतचं ते झोकदार, मस्तीभरं वळण आहे ना, ते वळण म्हणजे मुलतानी!
३)
३) आणि हा मारवा! हा म्हणजे केवळ अन् केव़ळ फक्त हुरहूर आणि दुसरं काही नाही! नेहमी कुठली अनामिक हुरहूर याला लागून राहिलेली असते तेच समजत नाही. या चित्रात पाहा, हा त्या समुद्राच्या किनारी बसला आहे आणि दूर क्षितिजापलिकडे जाणार्या सूर्याला, 'अरे थांब रे अजून जरा वेळ, इतक्यात माझी संगत सोडून जाऊ नकोस!' असं आर्तपणे सांगतो आहे. परंतु याची हाकच इतकी क्षीण आहे, की ती त्या सूर्यापर्यंत पोहोचतच नाही!
'आता जरा वेळाने अंधारून येईल!' ही भिती आहे का त्याला? की, 'काळजी कशाला? उद्या पुन्हा लख्ख उजाडणरच आहे', असा विश्वासच नाही त्याच्या ठायी?? जणू काही दिवसभर हा त्या सुर्याच्या सोबतीने किनार्यावर एकटाच बसला होता आणि आता तो सूर्यही याला सोडून चाललाय असंच वाटतं!
"कोकणातल्या त्या मधल्या आळीच्या ओसरीवर, भोवती माडाच्या काळ्या आकृती हालताना ती थकलेली, सुकलेली तोंड तत्वज्ञान सांगायला लागली की काळीज हादरतं!"
भाईकाकांच्या अंतुबर्व्यातल्या वरील ओळी अक्षरश: अंगावर येतात आणि मला नेहमी मारव्याचीच आठवण करून देतात!! आयुष्यभर फुरश्यासारख्या पायात गिरक्या घेणार्या कोकणी भाषेत पिंका टाकत हिंडणार्या अंतुबर्व्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी मला फक्त मारवाच दिसतो! कारण विचाराल तर ते मी सांगू शकणार नाही, कदाचित वरील चित्रं सांगू शकेल!
-- तात्या अभ्यंकर.
क्रमांक ३ पटला. बाकीचे दोन नाही पटले विशेष. पुन्हा रागचित्र व्यक्ति सापेक्ष आहे. मला भटियार वेगळा वाटतो मुलतानीचं वर्णन बरोबर केलं आहे तुम्ही चित्र अजून छान सापडू शकले असते.
ReplyDeleteअर्थात हे व्यक्ति सापेक्ष आहे त्यामुळे उत्तमच म्हणेन.
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteतात्या,
ReplyDeleteआपले गाणे ऐकायचे आहे हो.
केव्हातरी नक्की, धन्यवाद साहेब.. :)
ReplyDelete