October 04, 2010

झुणकाभाकरीची गोडी अन् वेडा कुंभार..

विठ्ठला तू वेडा कुंभार..(येथे ऐका)

वीर सावरकर चित्रपटाच्या निर्मितीचे दिवस होते. दादरला सेनाभवनाच्या अलिकडची गल्ली. तिथे रामचंद्र निवास ही इमारत आहे. तिच्या तिसर्‍या मजल्यावरती बाबूजींनी या चित्रपटाचे कार्यालय थाटले होते. मी अधनंमधनं तिथे दबकत जायचा.. आणि कधी कुठले कागदपत्र फाईल करून ठेव, एखादं बाड इकडून तिकडे पोचव, बँकेची कामं कर, बाबूजींकरता ठाण्याच्या भगवंतराव पटवर्धनांकडे काही काम असेल तर ते कर, अशी बाबूजी सांगतील ती फुटकळ कामं चुपचाप करायचा..कधीमधी उगाचंच त्या कार्याकयात बसून राहायचा.. मग बाबूजीच केव्हा तरी माझ्याकरता चहा मागवायचे.. कधी शांत असत, कधी कुणावर तरी भडकलेले असत, तर कधी कुठल्या विचारात असत..

अशीच एक टळटळीत दुपार.. तेथून जवळच एल जे रस्त्यावर नाना मयेकर नावाचा माझा मित्र राहायचा.. त्याच्याकडे काही कामानिमित्त गेलो होतो. त्याच्या आईनं फक्कडशी झुणकाभाकर केली होती. ती मला वाढू लागली. मी विचारलं, 'बांधून देता का? बाबूजींकडे जायचंय. तिथे खाईन व त्यांनाही देईन." त्या माउलीनं आनंदाने चार भाकर्‍या, लोणी, खर्डा आणि झुणका मला बांधून दिला. मी ती अमृततूल्य शिदोरी घेऊन सावरकर न्यासाच्या कार्यालयात पोहोचलो.

"अरे ये, तुझीच वाट पाहात होतो.."

कुठनंतरी काही कामाचे पेपर्स यायचे होते आणि ते बाड मला बाबूजी देणार होते. ते ठाण्याला भगवंतरावांकडे पोहोचवायचं होतं..

"थोडं जेवायचं आणलं आहे.. आपण जेऊया का?"

झुणकाभाकर पाहताच बाबूजी मनोमन सुखावले.. कार्यालयात आम्ही दोघंच होतो.

"अरे काय योग बघ, कालच मी थोडा वाळा आणून त्या मडक्यात ठेवला आहे.. आता झुणकाभाकर खाऊ अन् वाळ्याचं गार पाणी पिऊ.."

आम्ही तो भाकरतुकडा खाल्ला.. "कुठून आणलास रे? कोण या सुगरण बाई?" बाबूजींनी मनापासून दाद दिली..

आणि अचानक त्या दुपारी माझं भाग्य उजळलं..

'फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला तू वेडा कुंभार..'

जेवणानंतर बाबूजी खुर्चीत बसल्याबसल्या सहजच गुणगुणू लागले.. ! मी त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसलो होतो ते मला प्रशस्त वाटेना. मी उठून त्यांच्या पायाशी बसलो..



"फिरत्या, चाका.. आकारान्त शब्द आहेत. तो आकार स्वच्छ आला पाहिजे, निकोप पाहिजे. नारायणराव बालगंधर्वांच्या तोंडून कधी 'विठ्ठल' हा शब्द ऐकला आहेस का? ठ ला ठ असला तरी त्यात मार्दव हवं, ममत्व हवं.."

बाबूजी बोलत होते.. मी ते ऐकत होतो, शिकत होतो.. गाण्याच्या कुठल्याही क्लासात न शिकवली जाणारी अनमोल शिकवणी माझ्या पदरात पडू लागली..!

"वेडा कुंभार..!" हे शब्द म्हणताना त्यात प्रेम हवं, भक्ति हवी.. अगदी हळवेपणे म्हटले पाहिजेत हे शब्द.. बर्र का!"

'तूच मिसळसी सर्व पसारा..'

"हे गाताना आपण एखाद्या सख्याशी, सुहृदाशी जसं सहजच परंतु आपुलकीनं बोलतो ना, ते भाव आले पाहिजेत.. अरे तू विठ्ठलाशी बोलतो आहेस, त्याच्याशी संवाद साधतो आहेस असं वाटलं पाहिजे ना त्याला? तुझी हाक त्याच्यापर्यंत पोचायला तर हवी!"

"काय म्हमईवाले, कळतंय का आम्ही काय म्हणतोय ते?!" Smile

'तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार..'

"अण्णाची आठवण येते रे.. इतकं सुरेख आणि एकटाकी लिहायचा..!"



बाबूजी अचानक हळवे झाले.. ज्यांच्यासोबत अर्धाअधिक काळ केवळ भांडण्यातच गेला होता, त्या अण्णा माडगुळकरांच्या आठवणीनं त्या सावरकरभक्ताला अचानक भरून आलं.. मंडळी, मी साक्षिदार आहे या घटनेचा!

"आणि बर्र का, 'नसे अंत, ना पार..' ची तान अगदी छान गेली पाहिजे बर्र का. तिथं घसरून पडता उपेगाचं न्हाई!" Smile

बाबूजी मुडात असले म्हणजे मधुनच कलापुरी शब्द वापरायचे! Smile

'घटाघटाचे रूप आगळे,
प्रत्येकाचे दैव वेगळे.."

"एकेक स्वर तोलूनमापून लावायला हवा..तसा तो लागायला हवा. तसा मी प्रयत्न केला आहे.."!

'प्रत्येकाचे' चा उच्चार प्रत्त्येकाचे..' असाच आला पाहिजे.. तो शब्द फ्लॅट लागता कामा नये.. 'दैव' शब्दाचा उच्चारदेखील अगदी वळणदार हवा..!"

'मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार..'

"आता हेच बघ रे म्हमईवाल्या.. मला काय म्हाईत की तू भाकरतुकडा आणशील अन् माझ्या तोंडात लोणी पडेल?! पण आत्ता या क्षणी अशी किती माणसं आहेत की त्यांच्या मुखी हे लोणी नाही..आहे तो फक्त अंगार..! खरं सांग, आहे की नाही?!"

गाणं म्हणजे काय. ते शिकणं म्हणजे काय, हे मला कळत होतं..!

गाण्यातले भाव, शब्दोच्चार, स्वर लावण्याची पद्धत, बालगंधर्व, हिराबाई... अनेक विषयावर ते बोलत होते, मी ऐकत होतो, शिकत होतो..

अजूनही शिकतोच आहे.. कारण बाबूजींचं प्रत्येक गाणं हे त्या पांडुरंगाच्या घटांप्रमाणेच आहे.. ज्याच्या उतरंडीला अंत नाही, ना पार..!


आपण आपलं शिकत रहायचं, ऐकत रहायचं..!

त्यातलीच थोडीशी झुणकाभाकर घेऊन मी ती ललीमावशीला नेऊन दिली. तिथून जवळंच घर होतं बाबूजींचं.. विठ्ठलाकडची शिकवणी संपली होती.. झुणकाभाकर घेऊन रखुमाईकडं चाललो होतो..!

-- तात्या अभ्यंकर.

3 comments:

  1. ..ती झुणकाभाकरी तुमची आयुष्यभराची शिदोरी ठरली. अत्यंत सुंदर, तात्या. बाबुजींच्या आठवणींचा वेगळा विषय तयार करा की!

    ReplyDelete
  2. खरंच तात्या, ग्रॆट आण्णा आणि ग्रेट बाबूजी.

    ReplyDelete