March 28, 2011

नाविका रे...

नाविका रे, वारा वाहे रे,
डौलाने हाक जरा आज नाव रे..
(येथे ऐका)
 हे सांगतांना त्या नविकाबद्दल एक विश्वास आहे. जणू काही तो नाविक कुणी माहेरचाच मनुष्य आहे, ज्याला विश्वासाने काही सांगावं!
डौलाने हाक जरा आज नांव रे..!
मग? मला जायचंय पैलतिरी असलेल्या माझ्या घरी! छान वारा वाहतोय, सुंदर मूड आहे. मनी एखादी आस असली तरी सुंदर मूड तयार होतो, अन् त्या मुडातूनच मनीचं गुज सहजासहजी असं ओठांवर येतं, एखाद्या नाविकासमोर उघड होतं!
मग नाव कशी हाकायला हवी? डौलानेच ना? 
त्यामुळे 'डौलाने हाक जरा आज नांव रे..' ही ओळही तशीच डौलदार वाटत. ज्या डौलाने नाव हाकणं अपेक्षित, तोच डौल त्या ओळीतही! की त्या ओळीतल्या डौलामुळे नाव खरोखरच डौलदारपणे हाकायला हवी हे पटतं? की हेच गाण्याचे शब्द अन् त्याची चाल यांचं अद्वैत?
सांजवेळ झाली आता पैल माझे गाव रे..!
'पैल माझे गाव रे..' हे सागताना 'अरे समजून घे रे जरा, तीन सांजा झाल्या अन् पैलतीरी असलेल्या माझ्या गावाला मला लौकर जायचंय रे.. अशी समजावणी, एक आर्जव! आणि कुण्या जवळच्या सुहृद मित्राला सांगावं असा विश्वास..! एका नाविकाचं आणि स्त्री प्रवाश्याचं इतकं सुंदर नातं असू शकतं? धाकल्या दिरासारखं किंवा पाठच्या भावासारखं!
आषाढाचे दिसं गेले, श्रावणाचा मास सरे, भादवा आला
माझा राऊ मनामंदी बोलुनि गेला
धाव घेई बघ माझे मन, नाही त्याला ठाव रे...!
काय संवाद साधला माझ्या राऊनी माझ्यापाशी? आता तो संवाद त्या नाविकाला सांगायचाय! 'पैल माझे गाव रे..' ह्या आर्जवाने त्याला कधीच आपलासा केलाय! मग आता मनातल्या राऊचे संवाद त्याला सांगायला काय हरकत आहे अशी एक स्वाभाविकता..!
आषाढ गेला, श्रावण गेला अन् आता भादवा आला! भादवा हा शब्द असा गाऊन ठेवलाय की त्या एका शब्दात आषाढ आणि श्रावणाची प्रतिक्षा उभी केली आहे! आषाढ-श्रावणातली ती मौनप्रतिक्षा अखेर झालीच शेवटी प्रकट भादवा या शब्दातून..! 
एक म्हणणं मांडलं आहे 'भादवा' ह्या शब्दातून..!
आणि आता नावेत बसल्यावर अवचित त्या नाविकासमोर आषाढ-श्रावणातला विरह ओठी आला आहे!
भादवाही येऊन उभा राहिला आहे त्यामुळे आता पुढल्या अश्विनातलं शरदाचं चांदणं अन् अश्चिनातल्या पौर्णिमेची आस आता चांगलीच जाणवू लागली आहे! आता नाही धीर धरवत..!
नेमकं हेच जाणवतं का हो 'धाव घेई बघ माझे मन, नाही त्याला ठाव रे...!' या ओळीतनं? Smile
असो..

एक हृदयाला हात घालणारं गाणं! एखाद्या सर्जनशील, संवेदनशील चित्रकराला हे गाणं नुसत ऐकून हातात कुंचला घ्यावासा वाटेल आणि त्याच्या कॅन्व्हासवर डौलाने जाणारी ती छानशी शिडाची होडी उतरेल, मंद वारा वाहणारी ती सांजवेळ उतरेल.. त्या चित्रात पार्श्वरंग असतील भादवा आला ह्या म्हणण्याचे आणि असेल एक ओढ लगोलग येऊ घातलेल्या अश्विनातली...!
-- तात्या अभ्यंकर.

No comments:

Post a Comment