काल संध्याकाळीच मुंबैतील स्फोटांच्या बातम्या विविध वाहिन्यांवरून पाहिला मिळाल्या. निरपराध नागरिकांवरील अमानुष हल्ल्यामुळे मन सुन्न झाले. २६/११ च्या आठवणी जाग्या झाल्या.
२६/११ च्या वेळी रात्री उशिरा जशी रक्तदानाकरता धावपळ केली होती तेच विचार पुन्हा एकदा मनात घोळू लागले. झाल्या प्रकारात आपण काय करू शकतो तर ते इतकंच की रक्तदानाकरता थोडीशी धावपळ. अस्वस्थ मनाने दादर विभागातल्याच ४-५ ओळखिच्यांना, मित्रांना फोन केले आणि आम्ही एकूण ३ मंडळी रात्री ९ च्या सुमारास जे जे ला पोहोचलो.
पोटात खड्डा पडावा, तुटावं अशी तेथील काही दृष्य बघितली. जखमींकडे बघवत नव्हते. पोलिस, डॉक्टर्स, परिचारिका यांची धावपळ सुरू होती. आम्ही प्रवेशद्वारातून आत पोहोचलो. आजूबाजूला गर्दी तर बरीच होती. रक्तदानाबाबत कुणाला विचारावं, रक्त कुठे घेत आहेत हा विचार सुरू असतानाच माझ्या पाठमोर्या एका खोलीतून जे जे चा काही कर्मचारी वर्ग बाहेर आला. मागून माझ्या खांद्यावर हलकेच एक हात पडला आणि गर्दीतून वाट काढत असताना माझ्या खांद्यावर हात ठेऊन ती व्यक्ति मला म्हणत होती..
"जरा वाट द्या प्लीज. जाऊ द्या प्लीज.."
मी त्या व्यक्तिकडे बघितलं आणि त्या प्रसंगात, त्या गर्देतदेखील मला क्षणभर भरून आलं. माझ्या खांद्यावर हात ठेवत वाट काढू पाहणारी ती व्यक्ति होती डॉ तात्याराव लहाने..! ते सध्या जेजे रुग्णालयाचे डीन आहेत.
"कृपया नातेवाईकांनी काळजी करू नये. येथे दाखल झालेल्या व्यक्ति या आमच्या भाऊबहिण आहेत याच भावनेने आम्ही सर्व ते उपचार करत आहोत. आमच्याकडून कसलिही कसूर होणार नाही.."
डॉ तात्याराव लहाने गर्दीला उद्देशून सांगत होते...!
किती मृदु परंतु आश्वासक स्वर! किती विनम्रपणा! किती साधेपणा..! आजपावेतो अक्षरश: हजारो डोळ्यांना प्रकाश दाखवणारा तो देवमाणूस..! भला माणूस, लाख माणूस..!
खरं तर एकदा मिपावर त्यांचं व्यक्तिचित्र/व्यक्तिमत्वचित्र या बद्दल एखादा विस्तृत मुलाखतवजा लेख लिहायचा असं डोक्यात होतंच परंतु काल असं अचानक त्यांचं क्षणिक दर्शन झालं, हजारोंना दृष्टी देणारा त्यांचा हात माझ्या खांद्यावर पडला आणि धन्य झालो. देवाघरचाच हात तो..!
त्यानंतर रक्तदानाकरता माहिती मिळाली आणि आम्हाला ..'तूर्तास जरूर नाही, तरीही वाटल्यास बाहेरच्या व्हरांड्यात थांबा..' असं सांगण्यात आलं. बाहेर येऊन पाहतो तर जवळ जवळ दीड-दोनशे माणसं आधीच तेथे रक्तदान करण्याकरता आली होती. अगदी स्वखुशीने, कुणीही न बोलावता, कुणीही कसलंही आवाहन न करता..!
पाऊस जोरावर होता. मुख्य व्हरांड्यात रुग्णवाहिकांमधून जखमींना दाखल करणारे अनेक सामान्य मुंबैकर आणि रक्तदानाकरता जमलेलेही सामान्य मुंबैकर..!
कालच्या घटनेत सामान्य परंतु धीरोदात्त मुंबैकराने पावसापाण्यात केलेली धावपळ बघितली, अनुभवली. आणि म्हणूनच आम्हाला अभिमान आहे मुंबै नामक या आमच्या अजब-गजब नगरीचा..! म्हणूनच आमचं विलक्षण प्रेम आहे आमच्या मुंबापुरीवर..! जियो मुंबै..!
कालच्या मुंबै हल्ल्यात शहीद झालेल्यांना विनम्र आदरांजली आणि जखमींना लौकरात लौकर आराम मिळो, हीव आई मुंबादेवीपाशी प्रार्थना..!
-- तात्या अभ्यंकर.
tatya!! tatya!!
ReplyDeleteFar laaganara....
ReplyDelete