August 24, 2013

मध्येच कुठेतरी हरवून जातो मी...

मध्येच कुठेतरी हरवून जातो मी.. अचानक शाळेच्याच आठवणी येऊन घेरतात..

शाळेत केलेली धमाल, मजामस्ती, वांडपणा.. अभ्यास सोडून केलेलं सर्व काही..

बाईंनी, मास्तरांनी बाकावर उभं केलं अनेकदा.. ते तेव्हाही आवडायचंच.. पण आता तर ते बाकावर उभं 
राहणं आठवलं की पार हळवा होतो मी..

वर्गात सगळी मुलं बसलेली आहेत.. आपण एकटेच बाकावर उभे आहोत.. बाई मला बाकावर उभं करून 
पुन्हा आमच्याकडे पाठ करून फळ्यावर काही लिहित आहेत.. बाईंची पाठ वळताच माझ्या इतर द्वाड 
सवंगड्यांनि मला चिडवणं.. मीही मग बाकावर उभ्या उभ्या त्यांच्या टिवल्याबावल्या करणं..

मध्येच कुठेतरी हरवून जातो मी आणि माझ्यापुढे दृश्य येतं.. वर्गाबाहेर अंगठे धरून उभा असलेला मी... 
छान रग लागायची पायाला आणि पाठीला.. 

मधल्या सुट्टीत डबे उघडल्यावर येणारा पोळीभाजीचा निरनिराळा वास.. कुणाकडे कोबी, तर कुणाकडे 
बटाट्याची भाजी.. कुणाकडे फर्मास मटकीची उसळ.. तर कुणाच्या आईनं तूप-गूळ-पोळीचा छानसा करून 
दिलेला कुस्करा .. त्या कुस्कऱ्याच्या गोडव्यात पार हरवून जातो मी..!

श्रावणी शुक्रवारी आम्ही एक-एक, दोन दोन रुपये काढून आणलेले चणे.. आणी इतर साहित्य.. मग वर्गात 
सगळ्यांनी सामुहिकपणे केलेला चणे खायचा प्रोग्राम..

मला आठवतात ती वर्गातली बाकडी.. त्या बाकड्यावर पेन्सिल्ने, खडूने काहीबाही लिहिलेलं.. तास सुरू 
असताना कधी अगदी एकाग्रतेने कर्कटकाने त्या लाकडावर केलेली छानशी कलाकुसर खूप अस्वस्थ करते 
आहे आज..!

पेन आणि पेनातली शाई.. हे तर विलक्षण हळवे विषय.. 

'तुझ्यामुळे माझ्या शर्टावर शाईचा डाग पडला..' मग मी पण त्याच्यावर माझं पेन शिंपडणार..मग आमची 
जुंपणार.. मग बाई दरडावून मध्ये पडणार..

'बाई, मी नाही.. आधी त्याने माझी खोडी काढली..'

मग बाई दोघांपैकी कुणा एकाचा, किंवा दोघांचे कान पिळणार..!

त्यानंतर आज खूप वर्ष झाली.. शर्टाला एखादा छानसा निळा शाईचा डाग पडलाच नाही..!

डस्टर, खडू आणि फळा.. या तर म्हणजे अतिशय जिव्हाळ्याच्या वस्तू होत्या. सकाळी सकाळी शाळेच्या 
डस्टरने फळा छान स्वच्छ करून सर्वात वरती एखादा छान सुविचार लिहायचा..ते फळ्याच्या डाव्या की 
उजव्या कोपऱ्यात असलेलं हजर-गैरहजर-एकूण.. असं एक लहानसं कोष्टक असायचं.. ते कोष्टक आजही 
जसंच्या तसं आठवतं..!

"ही? ही तुझी गणिताची वही आहे?? काहीही व्यवस्थित लिहिलेलं नाही.. तुझं तुला तरी समजतंय का काय 
लिहिलं आहेस ते.. ही बघा रे याची गणिताची वही.. "

असं म्हणून त्या मारकुट्या मास्तरांनी सगळ्या वर्गात उंचावून फडकावून दाखवलेली माझी गणिताची वही 
आजही जशीच्या तशी आठवते मला..आणि डोळ्याच्या कडा नकळत ओल्या होतात..

शाळेची घंटा.. जनगणमन च्या रोजच्या रेकॉर्डचे स्वर..

आजही ते स्वर दूरून कुठूनतरी ऐकू येतात.. आणि सगळ्या आठवणी जुळतात..!

-- तात्या अभ्यंकर.

No comments:

Post a Comment