August 28, 2006

बसंतचं लग्न..१० (तोडी)

बसंतच्या लग्नाच्या स्वरोत्सवाचा आज दहावा भाग! आपल्या सर्वांच्या सहकार्याने येथपर्यंत येऊ शकलो याचा आनंद वाटतो. या दहाही भागातलं जे काही चुकलेलं असेल तर ते माझं, आणि जे काही बरं, चांगलं असेल ते माझ्या गुरुजनांचं अशीच माझी भावना आहे. ही लेखमाला म्हणजे भीमसेनअण्णा आणि बाबूजी यांचीच पुण्याई, असं मी मानतो.

आजपर्यंत बसंतच्या लग्नात आपण ९ राग पाहिले. आज कोण येणार आहे बरं? मंडळी, आज एक खूप खूप मोठा पाहुणा आपल्या बसंतला आशीर्वाद द्यायला येणार आहे. अगदी 'झाले बहु,....परंतु यासम हा' असं म्हणावं, अशीच या पाहुण्याची थोरवी आहे!
मांडवाच्या बाहेर नुकताच एक रथ येऊन थांबला आहे. मांडवात क्षणभर एकदम स्तब्धता पसरली आहे. मांडवातली बरीचशी रागमंडळी रथातून आलेल्या रागाला अगदी अदबीने उतरवून घ्यायला आली आहेत. का बरं अशी स्तब्धता, एवढी अदब? कुठला बरं राग उतरत आहे त्या रथातून? मंडळी, त्या रागाचं नांव आहे 'तोडी'!

तोडीची पुण्याईच मोठी!

राग तोडी! आपल्या हिंदुस्थानी राग संगीतातला एक दिग्गज राग. ऐकणाराची अगदी समाधी लागावी असा. या रागाला माझ्यामते एक 'माईलस्टोन राग' असंच म्हणावं लागेल. विलक्षण स्वरसामर्थ्य अंगीभूत असलेला एक करूणरसप्रधान राग. आपल्याला या रागाची पटकन ओळख पटावी म्हणून हे लहानसे ध्वनिमुद्रण ऐकावे.

आज मी तोडीच्या स्वभावाबद्दल/व्यक्तिमत्त्वाबद्दल थोडं बोलणार आहे. तोडीच्या स्वरांत काय विलक्षण ताकद आहे हे माहीत नाही, पण ते ऐकताच मनुष्य एकदम स्तब्धच होतो. अंतर्मुख होतो. मंडळी, तोडीचा विलंबित ख्याल ऐकताना नेहमी अज्ञात असं एक व्यक्तिमत्त्व माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं. त्या व्यक्तिमत्त्वाचं वर्णन मी आज करणार आहे. तोडी या रागाबद्दल मला जे काही सांगायचं आहे ते या वर्णनातूनच सांगायचा प्रयत्न मी करणार आहे. कशी आहे ही तोडी नांवाची व्यक्ती?

आयुष्यभर अनेक टक्केटोमणे, खस्ता खाल्लेली ही व्यक्ती आहे. या व्यक्तीकडे नुसतं पाहूनच आयुष्यात हिने काय काय भोगलं आहे याची कल्पना यावी. पण मंडळी, काही वेळेला आयुष्याचे भोग भोगता भोगताच बरेच जण कोलमडतात, दुर्दैवाने शेवटपर्यंत निभावून नेऊ शकत नाहीत. पण मला तोडीत दिसणारी व्यक्ती तशी नाही. अनेक वादळं पचवून ही व्यक्ती तेवढ्याच स्वाभिमानाने अगदी खंबीरपणे उभी आहे. आणि म्हणूनच ती मला मोठी आहे. मंडळी, परिस्थितीमुळे काही काही व्यक्तींना दिवसेंदिवस उपाशी रहावं लागतं. पण त्या कधी कोणापुढे लाचारीचा हात पसरत नाहीत. ध्येयापासून न ढळता यांची तपश्चर्या सुरूच असते. या तपश्चर्येतूनच स्वाभिमानाचं, कर्तृत्वाचं असं एक तेज यांच्या चेहऱ्यावर झळकतं. मंडळी, तोडी रागाच्या व्यक्तिमत्त्वात (खास करून पंचमात!) असंच एक तेज मला नेहमी दिसतं. त्या तेजाला कर्तृत्वाचा गर्व नाही, उलट गतआयुष्यातल्या कारुण्याची, भोगलेल्या हाल-अपेष्टांची एक झालर आहे! मंडळी, मला तरी तोडी हा राग नेहमी असाच दिसला, असाच भावला. प्रत्येकाला तो तसाच दिसावा असा आग्रह मी तरी का करू? शेवटी गाणं ही प्रत्येकाने स्वतः अनुभवायची गोष्ट आहे हेच खरं!

बिलासखानी, गुजरी-गुर्जरी, भूपाली, ही तोडीची काही नातलग मंडळी. ही सर्वच मंडळी फार सुरेख आहेत. यावर पुन्हा कधीतरी विस्तृतपणे लिहायचा प्रयत्न करेन. आपण आज बोलतोय ते 'मिया की तोडी' याबद्दल. उत्तर हिंदुस्थानात हिला काही ठिकाणी 'पंचमवाली तोडी' असंही गाण्यातल्या बोलीभाषेत म्हटलं जातं. बाकी हिचा इतिहास काय, उगम काय, पुस्तकात हिला काय म्हणतात ते मला माहीत नाही.

सुरश्री केसरबाई केरकर! जयपूर घराण्याच्या एक समर्थ गायिका. विलंबित त्रितालाचा भारीभक्कम दमसास, गोळीबंद आवाज, आणि निकोप तान या केसरबाईंच्या गाण्यातील खासियती. अगदी ऐकत रहावं असं बाईंचं गाणं! त्यांनी गायलेला तोडी रागाचा एक तुकडा येथे ऐका. किती सुरेख आहे पहा हा तोडी. बाईंनी मध्यलयीतील बंदिश काय सुरेख धरून ठेवली आहे! क्या बात है..

भारावलेलं वातावरण. वडिलांच्या इच्छेप्रमाणे मर्यादापुरुषोत्तम श्रीराम वनवासात निघाले आहेत. अवघी अयोध्या शोकाकुल झाली आहे, आणि गदिमांची लेखणी लिहू लागली आहे,

राम चालले तो तर सत्पथ,
थांब सुमंता, थांबवी रे रथ.

थांबा रामा, थांब जानकी,
चरणधूळ द्या धरू मस्तकी,
काय घडे हे आज अकल्पित?
थांब सुमंता, थांबवी रे रथ.

मंडळी, बाबूजींसारख्या प्रतिभावंताला त्या अयोध्येच्या शोकाकुल, भारावलेल्या वातावरणात जे दिसलं ना, त्यालाच तोडी म्हणतात!

सवाईगंधर्व संगीतमहोत्सव. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक मानाचं पान! तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. सकाळची वेळ आहे. पुण्याच्या रमणबाग येथील न्यू इंग्लिश स्कूलचं पटांगण दहा-बारा हजार श्रोत्यांनी तुडुंब भरलं आहे. तीन दिवस चाललेल्या गानयज्ञाची सांगता करण्यास मंचावर स्वरभास्कर पं भीमसेन जोशी सिद्ध आहेत.

विलंबित आलापी संपवून अण्णांनी तोडीची मध्यलयीतली बंदिश सुरू केली आहे, आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत साऱ्या त्रिखंडाकरता शुभ, आणि मंगलदायी ठरत आहे!
--तात्या अभ्यंकर.

2 comments:

  1. Anonymous4:56 AM

    vaa taatyaa

    ReplyDelete
  2. प्रतिसादाबद्दल आभार..

    -तात्या.

    ReplyDelete