November 11, 2013

मेहेंदी...

....तिचं नाव मेहेंदी... 

फोरासरोडवर अंजुमन बिल्डिंमध्ये नसीमआपाकडे मेहेंदी धंदा करायची. दिसायला इतर वेश्यांपेक्षा थोडी बरी, थोडी रेखीव, थोडी उजळ..

आमच्या झमझम देशीदारूच्या बारसमोरच नसीमआपाचा कुंटणखाना होता. नसीमआपा यायची आमच्या बारमध्ये पार्सल न्यायला. कधी आमलेट-पाव, तर कधी भूर्जीपाव, तर कधी दालफ्राय आणि रोट्या.. तिच्यामुळेच माझी मेहेंदीशी ओळख झाली. मी मेहेंदीचा 'न्यूजनरक्षा पॉलीसी' हा विमा उतरवला होता..

चार पैशे बरे भेटायचे मेहेंदीला. तिला कुणापासून तरी एक अनौरस मुलगाही होता. त्याला सगळे दिपू म्हणायचे. मुंबैच्या फोरासरोडवर शरीरविक्रयाचा धंदा करून, नसीमआपाचं भाडं देऊन उरलेल्या पैशांमध्ये मेहेंदी स्वत:चं आणि तिच्या दिपूचं पोट भरत असे..

कुठल्याही दुकानात तो शंभर-दिडशे रुपयांपर्यंत पॅ पॅ वाजणारा कॅसिओचा छोटा डबडा मिळतो बघा.. दिपूला बरेच दिवसांपासून तो डबडा हवा होता..परंतु मेहेंदीचं पैशांचं गणित काही जुळेना..

त्यानंतर मेहेंदी आजारी पडली. विषमज्वराने अगदी सणसणीत आजारी पडली. आमच्या फोरासरोडवरचाच एक सेक्स स्पेशालीस्ट डॉ बशीर याची तिला ट्रीटमेन्ट सुरू झाली. 

मुंबैचा फोरासरोड काय, फॉकलंड रोड काय.. इथे सेक्स स्पेशालिस्टांचे दवाखाने बरेच आहेत. त्यातले बरेचसे डॉक्टर हे चक्क बोगस आहेत. पण बशीर मात्र खरोखरंच वेल क्वालीफाईड होता. पंधरा-वीस दिसांमध्ये मेहेंदी पूर्ण बरी झाली. इतर वेश्या आणि नसीमआपा यांनी सगळी तिची देखभाल केली. काय सांगू तुम्हाला, मी ती सगळी माणूसकी, जगण्याची आणि एकमेकांना जगवण्याची धडपड खूप जवळून पाहिली आहे..!

आमच्या झमझम बार मध्ये आम्हा नोकरांच्या चहापाण्याकरता जे दूध येत असे, त्यातलंच एक गरमागरम कपभर दूध मी मेहेंदीकडे ती आजारी असेपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली होती. तिला औषधं गरम पडत असत.. दूध प्यायलं की बरं वाटे..!

मेहेंदी बरी झाली. पुन्हा धंद्याला लागली. कुठ-कुठल्या ओळखीच्या, अनोळखी बेवड्यांसमोर, मदांधांसमोर पाय फाकवायला तयार झाली. अशातच मेहेंदीचा विम्याचा तिमाही हप्ता आला. ३५० रुपये..!

""तात्यासाब, अगर मै ये हप्ता थोडा लेट देगी तो चलेंगा? इस बार पैसा नही है, भोत तंगी है.."

एल आय सी मध्ये हप्ता भरण्याकरता ड्यू डेटपासून एक महिना ग्रेस पिरियड मिळतो..

"हा चलेंगा, लेकीन एक महिने के अंदर पैसा भरो.."

"हां हां.. एक महिने में मै पक्का भर सकेगी.." - मेहेंदी आनंदाने म्हणाली..

त्याच दिवशी रात्री आठच्या सुमारास मेहेंदी आणि तिच्या दिपूला घेऊन आमच्या बारमध्ये आली. मी गल्ल्यावर बसलो होतो. दिपूच्या हातात त्या कॅसिनोचं पार्सल होतं..!

"तात्यासाब. हप्ता नही भरना था ना, तो मैने उन पैसोंसे थोडा पैसा आपा को दिया और दिपू के लिये ये बाजा लेके आयी.." - मेहेंदीच्या चेहेर्‍यावर निरागसता होती. 

"मन देवाचे पाऊल..' या ओळीचा अर्थ मला त्या दिवशी कळला..!

दिपू आणि मेहेंदी.. दोघेही माझ्याकडे निरागसपणे पाहात होते. ते कॅसिनोचं खेळणं मिळाल्याचा दिपूच्या चेहेर्‍यावरचा आनंद..!

मूर्त तू मानव्य का रे
बालकाचे हास्य का
या इथे अन त्या तिथे रे 
सांग तू आहेस का?

त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का....!

मला तरी Art of Living ची इतपतच व्याख्या समजते.. इतर पंचतारांकीत आणि सप्ततारांकीत व्याख्या मला माहीत नाहीत..!

-- तात्या अभ्यंकर.

3 comments:

  1. तात्या, अशी 'माणस' खरच असतात का रे!?

    ReplyDelete
  2. मस्तच लिहिता राव तुम्ही... कुठेही खोटे पणाचा किंवा मी तर तसा नाहीये असं दुट्टपीपणाचं वागण नाही. जे आहे ते आहे. धन्यवाद अजून एक मनाला भावणारी पोस्ट केल्याबद्दल...

    ReplyDelete
  3. अलिकडे मी अंतर्नाद या मासिकाच्या सर्वेसर्वा भानू काळे यांना भेटलो तेव्हा तुमच्या blog विषयी सांगितलं. Main stream मुद्रीत प्रकाशनात तुम्हा सारखे लेखक यावेत, हा विषय होता.

    ReplyDelete