December 21, 2007

सुगम रूप सुहावे...

राम राम मंडळी,

गाणं शिकणार्‍या काही हौशी मंडळींकरता, तर काही विद्यार्थ्यांकरता एक छोटेखानी शिबिर नुकतेच ठाण्यामध्ये आयोजित केले गेले होते. त्या शिबिरात आयोजकांनी अस्मादिकांनाही दोन शब्द बोलायला आमंत्रित केले होते. कार्यक्रम तसा घरगुती स्वरुपाचाच होता. म्हटलं तर शिबीर, म्हटलं तर घरगुती स्वरुपाच्या गप्पाटप्पा आणि गाण्याची मैफल! अस्मादिकांनी त्यात नेहमीप्रमाणेच खूप भाव वगैरे खाऊन घेतला. 'तात्या अभ्यंकर' म्हणजे काय विचारता महाराजा? एकदम संगीततज्ञ की हो!!' अशी आमची प्रतिमा कायम राखण्यात आम्ही कालही यशस्वी झालो! :) विशारद, अलंकार शिकणारे काही होतकरू विद्यार्थी कार्यक्रम संपल्यानंतर चक्क आमच्या पायाबिया पडले! अर्थात, आम्हीही एक विद्यार्थीच असल्यामुळे ते सर्व नमस्कार आम्ही मुखाने गोविंद गोविंद म्हणत भीमण्णांच्या पायाशी रुजू केले!

पण मंडळी, एकंदरीतच कार्यक्रमाला खूप मजा आली. त्या कार्यक्रमात काही विद्यार्थी खरोखरंच चांगले गाणारे होते, मेहनत करणारे होते ही मला समाधानाची बाब वाटली. असो..

कालचा माझा विषय होता,
'

यमन रागातील बंदिशींचे सौंदर्य आणि विविधता!'

मंडळी, आजपर्यंत आंतरजालावर अनेक वेळेला मी यमनचे, यमनकल्याणचे अगदी भरभरून गोडवे गायले आहेत. तो रागच तसा आहे. अगदी अवीट. स्वभावाने अत्यंत तरल, हळवा आणि प्रसन्न! गेली अनेक वर्षे या रागाने संगीतकारांवर, गायकांवर, बंदिशकारांवर अक्षरश: मोहिनी घातली आहे. आमच्या अभिजात संगीताच्या दुनियेत तर असं मानलं गेलं आहे की ज्याला यमन गाता आला त्याला गाणं आलं! तसे आपल्या रागसंगीतात शेकडो राग आहेत. प्रत्येक कलाकार त्यातला प्रत्येक राग सादर करतोच असं नाही. परंतु असा क्वचितच कुणी कलाकार असेल की ज्याने यमनची साधना केली नाही, ज्याला यमनने भुरळ घातली नाही. म्हणूनच अभिजात संगीताच्या मैफलींतून आजही प्रत्येक लहानथोर गायक यमन गातो, यमनची साधना करतो. आमच्या भीमण्णांसारखा वयोवृद्ध कलाकार मैफलीच्या सुरवातीला आजही पटकन यमनची आलापी करू लागतो! असो..

तर मंडळी, अश्या या यमन रागात अभिजात संगीताच्या दुनियेत अनेक बंदिशी आहेत. माझ्यासारख्या यकश्चित कलाकारापासून ते अगदी दिग्गज कलाकारांपर्यंत प्रत्येकाला यमनमध्ये काही ना काही बांधावसं वाटलं, त्याच्या स्वरांच्या माध्यमातून काही ना काही अभिव्यक्त करावंसं वाटलं. कालच्या शिबिरात मी यमन आणि यमनकल्याणमधील एकंदरीत चार वेगवेगळ्या बंदिशींबद्दल विस्तृत बोललो, त्याचं सौदर्य, त्यातल्या जागा श्रोत्यांना उलगडून दाखवायचा प्रयत्न केला. अभिजात ख्याल संगीत अतिशय उत्तम रितीने सादर करणारी ठाण्यातली माझी मैत्रिण वरदा गोडबोले हिने मोठ्या मनाने मला मदत केली व वानगीदाखल त्या चारही बंदिशींचे प्रात्यक्षिक दाखवण्याचे मान्य केले. त्या चारही बंदिशी तिने अतिशय उत्तम तर्‍हेने गाऊन दाखवल्या. त्या चारही बंदिशींबद्दल मी इथे दोन शब्द लिहिणार आहे आणि ऐकवणार आहे. हां हां. घाबरू नका मंडळी, मी स्वत: गाणार नाहीये तर युट्युबच्या साहाह्याने वरदाने गायलेल्या आपल्याला ऐकवणार आहे! :)

सुरवातीला मी तानपुरा उत्तम तर्‍हेने कसा लावावा, त्यात कोणकोणत्या गोष्टींना महत्व असतं याबद्दल दोन शब्द बोललो. एका विद्यार्थ्याने त्याचं लहानसं चित्रण केलं आहे ते आपल्याला खाली पाहा. मंडळी, तानपुरा कसा लागलाय ते ऐकून सांगा बरं का! जोड, खर्ज, पंचम सगळं बरोबर आहे ना बघा! :) असो..



=====================================================================================

पहिली बंदिश आहे -


अस्थाई -

मतवारी हू आज मै
स्वच्छंद मंद स्वर सुगंध
देत हृदय आनंद

अंतरा -

दिनरंग की कृपा
मोपे है आसिस
तब होवे ग्यान सुलभ
श्रुति, सूर, लय, राग


ऐका ही बंदिश!



मंडळी, ही बंदिश आग्रा गायकीचे बुजुर्ग असलेल्या पं दिनकरराव कायकिणींनी बांधली आहे. मुळात आग्रा गायकी ही उत्तमोत्तम बंदिशींकरता प्रसिद्ध. त्यात यमन रागातील बंदिश नसेल तरच नवल! कायकिणीबुवांनी या बंदिशीत काय सुरेख एकताल ठेवला आहे पाहा. 'मतवारी'त ल्या 'वा' वरच्या गंधारावर सम कशी अलगद येते! हा गंधार किती सुरेख आहे! 'स्वच्छंद मंद स्वर सुगंध' हे शब्द आरोही पद्धतीने किती सुंदर रितीने पुढे जातात! आणि 'देत हृदय आनंद' मधील 'आनंद' या शब्दात कायकिणीबुवांनी किती सुरेख शुद्ध मध्यम ठेवला आहे! क्या बात है.. 'आनंद' या शब्दात यमनातला हळवा भाव प्रकट होऊन तिथे यमनकल्याणची छानशी सावली पडते! अंतर्‍यातील 'दिनरंग की कृपा, मोपे है आसिस' या ओळीतील 'आसिस' शब्दावरील जागा कशी ठेवली आहे बघा! आणि श्रुति, सूर, लय, राग हे शब्द सुटे सुटे असून किती उत्तम तर्‍हेने चालीत बसले आहेत! मंडळी, माझं भाग्य हे की ही बंदिश खुद्द कायकिणीबुवांकडूनही मी मैफलीत ऐकली आहे...

=====================================================================================

मंडळी, गेल्या वर्षी होळीनिमित्त मी, माझ्या मैत्रिणी धनश्री लेले व वरदा गोडबोले, आम्ही तिघांनी मिळून मुंबईत काही ठिकाणी होळीवरील बंदिशिंचे कार्यक्रम केले होते. सवडीने मी या बंदिशींवर इथे विस्तृत लिहिणारच आहे. या सर्व बंदिशी धनश्री लेलेने रचल्या होत्या, मी त्या स्वरबद्ध केल्या होत्या आणि वरदाने त्या गायल्या होत्या. त्यात यमनकल्याण रागातलीही एक बंदिश होती. परवाच्या शिबिरात आम्ही प्रत्यक्षिकाकरता ही बंदिशदेखील घेतली होती. ही बंदिश मी अध्ध्या त्रितालात बांधली आहे. तात्या अभ्यंकरांनी धनश्रीच्या शब्दांना चाल कशी लावली आहे तेही सांगा हो! :)

ऐका ही बंदिश -




सजधज रंगत झुमे ब्रिजवा
नंदसुत खेलत होरी संगवा..

ठुमकत नाचत आवत गिरिधर..
लुपतछुपत सब गोपी राधा.
बिनती करत अब,
छेडो ना मनवा, छोडोरी संगवा, डारो ना रंगवा,
पीत, हरीत, नील, धुमल, पाटल.


क्या बात है, धनश्रीने किती सुंदर शब्द लिहिले आहेत! डोळ्यासमोर बृजवासात होळीची धमाल सुरू आहे, नंदसुत कन्हैय्या गोपींसमवेत होळी खेळत आहे, छेडखानी करत आहे असं चित्र उभं राहतं. 'नंदसुत' हा शब्द मला अतिशय आवडला. 'झुमे' शब्दावरल्या पंचमाचे आणि 'खेलत' या शब्दातल्या शुद्ध गंधाराचे सौंदर्य पाहा.

'ठुमकत नाचत आवत गिरिधर'!

'ठुमकत नाचत'! किती छान शब्द आहेत हे! 'आवत गिरिधर' मधली वरदाच्या आवाजातली तार सप्तकातील गंधारापर्यंतची सहजता पाहा! ठुमकत, नाचत येणार्‍या गिरिधराला पाहून धनश्री पुढे लिहिते,


'लुपत छुपत सब गोपी राधा!'

'क्या बात है.... त्या सगळ्या गोपी कृष्णाला लाडिकपणे विनवत आहेत, की बाबारे आमच्यावर उगाच रंगांची उधळण करू नकोस! (म्हणजे खरं तर उधळण कर! :)

कुठले रंग?


'पीत, हरित, नील, धुमल, पाटल!...:)

वरदाने किती सुंदर तर्‍हेने या सगळ्या रंगांची नावं गायली आहेत!

मंडळी, धनश्रीची ही बंदिश म्हणजे केवळ रंगांचीच उधळण नव्हे तर यमनच्या स्वरांचीदेखील उधळण आहे! रचनाकार आमची धनश्री असो, वा कविकुलगुरू कालिदास असो, वा अगदी माडगुळ्याचे महाराष्ट्र वाल्मिकी असोत, आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतामध्ये कुठल्याही रचनेला सामावून घ्यायची ताकद आहे हेच खरं!

असो, मंडळी तात्या अभ्यंकरांचं हे कॉम्पोझिशन आपल्याला कसं वाटलं ते ऐकून अभिप्राय द्या बरं का! :)


=====================================================================================

त्यानंतर प्रात्यक्षिकादाखल आम्ही पं यशवंतबुवा महाले यांची एक बंदिश घेतली होती. तिचे शब्द आहेत,


जियरा नही माने,
उनबिन, जियरा नही माने...
कैसे कटे अब घडी पलछिन दिन

कासे कहू अब
जियाकी बिथा मोरी
चैन नाही मोहे, उनके दरस बिन..


ऐका ही बंदिश -



मंडळी, पं यशवंतबुवा महाले हे आग्रा परंपरेतलेच. अण्णासाहेब रातंजनकरांचे शिष्य. पण महालेबुवांचा परिचय एवढ्या दोन ओळीतच पुरा होत नाही, होणार नाही. महालेबुवांवर एक विस्तृत लेखच मी लिहिणार आहे. गाण्यातला खूप मोठा माणूस. आमच्या महालेकाकूही उत्तम गाणार्‍या. पं गजाननबुवा जोश्यांच्या शिष्या. महालेबुवांचं आणि काकूंचं मला खूप प्रेम लाभलं हे माझं भाग्य!

महालेबुवा एकदा राजधानी एक्सप्रेसने दिल्लीला चालले होते तेव्हा त्याना ही बंदिश सुचली. राजधानीने द्रुत लयीत अगदी सुरेखसा ठेका पकडला असणार आणि महालेबुवांनी अगदी बिनचूकपणे ती लय पकडली असणार असंच ही बंदिश ऐकताना वाटतं! अश्या वेळेस 'गाडीची लय म्हणजे 'कशासाठी पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी!' असं भाईकाका म्हणतात ते पटतं! :)


'जियरा नही माने..'

बंदिशीचा मुखडा तानेतला आहे. 'जियरा' शब्दावर बोलतान असून तिचं समेवर विसर्जन होतं! मंडळी, मुखड्यात तान असलेल्या बंदिशींचं सौंदर्यच वेगळं!

'कैसे कटे अब, घडी पलछिन दिन'

'कैसे कटे अब' मधल्या 'कैसे' तला फर्म पंचम आणि 'कटे' तला छानसा शुद्धमध्यम! या बंदिशीची अस्थाई ऐकताना असं वाटतं की 'जियरा'च्या तानेतल्या मुखड्यानंतर ही बंदिश 'कैसे कटे अब' च्या फलाटावर आमच्या शुद्धमध्यमाला गाडीत चढू देण्याकरता क्षणभर विसावली आहे! :) पण अगदी क्षणभरच बरं का! त्यानंतर लगेच समेला ऑफबिट पकडून 'घडी पलछिन दिन, जियरा नही माने' असं म्हणत बंदिशीतल्या राजधानीने पुन्हा आपली मूळ लय पकडली असावी!

'कासे कहू अब, जिया की बिथा मोरी' मधला तार षड्ज फारच सुरेख. 'चैन नाही मोहे' मधली अस्वस्थता पुढे 'उनके दरस बिन..'मधून फारच उत्तम रितीने अभिव्यक्त होते आणि त्याला जोडूनच गाडी पुन्हा 'जियरा नही माने..' या तानेतल्या मुखड्यावर येते! क्या केहेने..!

खरंच मंडळी, गाण्याकडे आपण जसं पाहू तसं आपल्याला गाणं दिसतं! फक्त गाण्याकडे पाहण्याची नजर हवी! आणि ती नजर बुजूर्ग कलाकारांना ऐकूनच मिळते, सतत गाण्यात राहूनच मिळते, गाण्यावर विचार करूनच मिळते! महालेबुवांनी किती सुरेख बंदिश बांधली आहे आणि वरदानेही ती तेवढीच छान गायली आहे. सध्या वरदाला महालेबुवांचीच तालीम मिळत आहे.

=====================================================================================

And now, Last but not the least...


सुगम रूप सुहावे, सलोने
माई, सुगम रूप सुहावे..
जलक ज्योत चित चोरत नित
सखिया संग मिल गाओ, रिझाओ
माई सुगम रूप सुहावे

जो देखेत चित, सोहिरी झरत
बिन देखे अमर, जिया आकुलावे,
माई सुगम रूप सुहावे....


मंडळी, ऐका ही भेंडीबाजार घराण्यातली पारंपारिक बंदिश!



इस बंदिश के बारेमे क्या केहेने! माझी ही अत्यंत आवडती बंदिश आहे. या बंदिशीचा मूड किती सुरेख आहे बघा! क्या बात है..

मंडळी, राग जरी एकच असला तरी त्यातल्या वेगवेगळ्या बंदिशींमुळे त्याच रागाच्या विविध छटा आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक बंदिशीचा एक मूड असतो, एक स्वभाव असतो हेच मी या लेखातून सांगायचा प्रयत्न केला आहे. आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातील 'आग्रा गायकी' म्हणजे बंदिशींचा खजिनाच. भातखंडेबुवा, रातंजनकरबुवा, जगन्नाथबुवा, कायकिणीबुवा, गिंडेबुवा अश्या एकापेक्षा एक दिग्गजांच्या बंदिशींमुळे आग्रा गायकी समृद्ध झाली आहे, संपन्न झाली आहे.

बंदिशींमधली ही विविधता पाहिली की 'हम राग नही, बंदिश गाते है' असं आग्रावाली मंडळी नेहमी म्हणतात ते पटतं. वर आपण दिनकररावांच्या 'मतवारी आज मै..' मधला प्रासदिकपणा पाहिला, 'सजधज रंगत झुमे ब्रिजवा' मध्ये वृंदावनातली होळी अनुभवली, 'जियरा नही माने..' मधली अस्वस्थता, ओढ पाहिली. त्याचप्रमाणे 'सुगर रूप सुहावे..' मधल्या अनामिक ओढीवर मला तरी जान निछावर कराविशी वाटते!

जेव्हा जेव्हा मी ही बंदिश ऐकतो तेव्हा तेव्हा एका निवांत अश्या एखाद्या फार्महाऊसवरची सुंदर संध्याकाळ माझ्या डोळ्यासमोर येते. तिन्ही सांजांची वेळही उलटली आहे. बाहेरच्या लॉनवरच खुर्ची टाकून मंद दिव्याच्या प्रकाशात आपण बसलो आहोत, समोर जीव ओवाळून टाकावा अशी लावण्यवती बसली आहे. समोरच्या प्याल्यातली ग्लेनफिडिच मला म्हणते आहे,

'अरे तात्या, तुझ्या समोर बसलेली लावण्यवती जेवढी सुरेख आहे, तेवढीच मीही सुरेख सोनेरी आहे रे! माझं माहेर स्कॉटलंड! तेथील मावळतीने मला हा सोनेरी रंग बहाल केला आहे! मला ऑन द रॉक्सच पी, त्यात सोडा किंवा पाणी टाकून माझी सोनेरी छटा, माझं 'स्कॉचपण' गढूळ नको करूस रे! :)

'सुगम रूप सुहावे..' या बंदिशीतल्या मध्यलयाची चैन जिवाला वेड लावते. या बंदिशिचा मूड थोडासा गझलेकडे झुकणारा आहे. पतियाळा, भेंडिबाजार गायकीचा खास बाज या बंदिशिला आहे. या बंदिशीचा नुसता अस्थाई-अंतरा मांडणं देखील वाटतं एवढं सोपं नाही. परंतु वरदाने मात्र ही बंदिश चांगलीच मांडली आहे. किराणा, पतियाळा गायकीचे बुजूर्ग कलाकार पं अजय पोहनकर ही बंदिश अतिशय सुरेख गातात. वरदालादेखील काही काळ पोहनकरांची तालीम मिळाली असल्यामुळे त्यांचाकडून तिने ह्या बंदिशींचे विधिवत शिक्षण घेतले आहे!

'रंजिश ही सही..' चा जो मूड आहे ना, तोच या बंदिशीचा मूड आहे. 'सुहावे' हा शब्द काय ठेवलाय! वा वा! 'सलोने माई' मधल्या पंचमाचा, रिषभाचा आणि गंधाराचा आपापसातला समजूतदारपणा पाहा! मंडळी, माणसं जर एकमेकांशी या स्वरांप्रमाणे समजुतदारपणे वागू लागली तर अजून काय पाहिजे?

जाऊ द्या मंडळी, या बंदिशीबद्दल किती लिहू आणि किती नको! आणि कितीही लिहिलं तरी ते कमीच पडणार आहे! या बंदिशीच्या सौंदर्यापुढे माझं शब्दसामर्थ्य अगदीच तोकडं आहे!

असो..

तर असा एकंदरीत हा बंदिशींच्या दुनियेतला प्रवास.. आपलं रागसंगीत आणि त्यातल्या बंदिशी हा कधीही न संपणारा एक अनमोल खजिना! ऐकणार्‍याने अगदी मनसोक्त ऐकत रहावं, बंदिशींच्या माध्यमातून रागांचे विविध रंग न्याहाळावेत, अनुभवावेत..!

मंडळी, या बंदिशींच्या दुनियेतला, रागसंगीताच्या दुनियेतला मी एक आनंदयात्री! काही प्रमाणात आपल्या सारख्या रसिकांनाही ही आनंदयात्रा घडावी याच हेतूने हा लेख लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे. परंतु एकंदरीतच गाणं ही अनुभवायची गोष्ट आहे हेच खरं! कारण जिथे शब्द संपतात, तिथे सूर सुरू होतात! ह्या बंदिशी मला जश्या दिसल्या ते मी शब्दात मांडायचा प्रयत्न केला आहे. माझे शब्द आपल्याला कदचित आवडतील, न आवडतील. परंतु ह्या बंदिशी मात्र ऐकून कश्या वाटल्या हे अगदी अवश्य सांगा!

आपलाच,
(गाण्यातला!) तात्या अभ्यंकर.

1 comment:

  1. राजाधिराज यमनवर लिहिलेला हा लेख फारच छान. वरदांच्या गाण्यातील सहजता भावली. आपण बांधलेली बंदिशही आवडली.

    ReplyDelete