सुगम रूप सुहावे...
राम राम मंडळी, गाणं शिकणार्या काही हौशी मंडळींकरता, तर काही विद्यार्थ्यांकरता एक छोटेखानी शिबिर नुकतेच ठाण्यामध्ये आयोजित केले गेले होते. त्या शिबिरात आयोजकांनी अस्मादिकांनाही दोन शब्द बोलायला आमंत्रित केले होते. कार्यक्रम तसा घरगुती स्वरुपाचाच होता. म्हटलं तर शिबीर, म्हटलं तर घरगुती स्वरुपाच्या गप्पाटप्पा आणि गाण्याची मैफल! अस्मादिकांनी त्यात नेहमीप्रमाणेच खूप भाव वगैरे खाऊन घेतला. 'तात्या अभ्यंकर' म्हणजे काय विचारता महाराजा? एकदम संगीततज्ञ की हो!!' अशी आमची प्रतिमा कायम राखण्यात आम्ही कालही यशस्वी झालो! :) विशारद, अलंकार शिकणारे काही होतकरू विद्यार्थी कार्यक्रम संपल्यानंतर चक्क आमच्या पायाबिया पडले! अर्थात, आम्हीही एक विद्यार्थीच असल्यामुळे ते सर्व नमस्कार आम्ही मुखाने गोविंद गोविंद म्हणत भीमण्णांच्या पायाशी रुजू केले!
पण मंडळी, एकंदरीतच कार्यक्रमाला खूप मजा आली. त्या कार्यक्रमात काही विद्यार्थी खरोखरंच चांगले गाणारे होते, मेहनत करणारे होते ही मला समाधानाची बाब वाटली. असो..
कालचा माझा विषय होता, '
यमन रागातील बंदिशींचे सौंदर्य आणि विविधता!' मंडळी, आजपर्यंत आंतरजालावर अनेक वेळेला मी यमनचे, यमनकल्याणचे अगदी भरभरून गोडवे गायले आहेत. तो रागच तसा आहे. अगदी अवीट. स्वभावाने अत्यंत तरल, हळवा आणि प्रसन्न! गेली अनेक वर्षे या रागाने संगीतकारांवर, गायकांवर, बंदिशकारांवर अक्षरश: मोहिनी घातली आहे. आमच्या अभिजात संगीताच्या दुनियेत तर असं मानलं गेलं आहे की ज्याला यमन गाता आला त्याला गाणं आलं! तसे आपल्या रागसंगीतात शेकडो राग आहेत. प्रत्येक कलाकार त्यातला प्रत्येक राग सादर करतोच असं नाही. परंतु असा क्वचितच कुणी कलाकार असेल की ज्याने यमनची साधना केली नाही, ज्याला यमनने भुरळ घातली नाही. म्हणूनच अभिजात संगीताच्या मैफलींतून आजही प्रत्येक लहानथोर गायक यमन गातो, यमनची साधना करतो. आमच्या भीमण्णांसारखा वयोवृद्ध कलाकार मैफलीच्या सुरवातीला आजही पटकन यमनची आलापी करू लागतो! असो..
तर मंडळी, अश्या या यमन रागात अभिजात संगीताच्या दुनियेत अनेक बंदिशी आहेत. माझ्यासारख्या यकश्चित कलाकारापासून ते अगदी दिग्गज कलाकारांपर्यंत प्रत्येकाला यमनमध्ये काही ना काही बांधावसं वाटलं, त्याच्या स्वरांच्या माध्यमातून काही ना काही अभिव्यक्त करावंसं वाटलं. कालच्या शिबिरात मी यमन आणि यमनकल्याणमधील एकंदरीत चार वेगवेगळ्या बंदिशींबद्दल विस्तृत बोललो, त्याचं सौदर्य, त्यातल्या जागा श्रोत्यांना उलगडून दाखवायचा प्रयत्न केला. अभिजात ख्याल संगीत अतिशय उत्तम रितीने सादर करणारी ठाण्यातली माझी मैत्रिण वरदा गोडबोले हिने मोठ्या मनाने मला मदत केली व वानगीदाखल त्या चारही बंदिशींचे प्रात्यक्षिक दाखवण्याचे मान्य केले. त्या चारही बंदिशी तिने अतिशय उत्तम तर्हेने गाऊन दाखवल्या. त्या चारही बंदिशींबद्दल मी इथे दोन शब्द लिहिणार आहे आणि ऐकवणार आहे. हां हां. घाबरू नका मंडळी, मी स्वत: गाणार नाहीये तर युट्युबच्या साहाह्याने वरदाने गायलेल्या आपल्याला ऐकवणार आहे! :)
सुरवातीला मी तानपुरा उत्तम तर्हेने कसा लावावा, त्यात कोणकोणत्या गोष्टींना महत्व असतं याबद्दल दोन शब्द बोललो. एका विद्यार्थ्याने त्याचं लहानसं चित्रण केलं आहे ते आपल्याला खाली पाहा. मंडळी, तानपुरा कसा लागलाय ते ऐकून सांगा बरं का! जोड, खर्ज, पंचम सगळं बरोबर आहे ना बघा! :) असो..
अस्थाई -
मतवारी हू आज मै
स्वच्छंद मंद स्वर सुगंध
देत हृदय आनंद
अंतरा -
दिनरंग की कृपा
मोपे है आसिस
तब होवे ग्यान सुलभ
श्रुति, सूर, लय, राग ऐका ही बंदिश!
1 comment:
राजाधिराज यमनवर लिहिलेला हा लेख फारच छान. वरदांच्या गाण्यातील सहजता भावली. आपण बांधलेली बंदिशही आवडली.
Post a Comment