February 13, 2007

मन रामरंगी रंगले..राम राम मंडळी,

खालापूर! कर्जत-खोपोली जवळचं एक लहानसं गाव. अण्णा सोमठणकर हे खालापूरचेच राहणारे. अण्णा वृत्तीने भाविक माणूस. गेली अनेक वर्ष खालापूरला अण्णांच्या घरी दत्तयंतीचा उत्सव साजरा केला जातो, आणि त्या दिवशी रात्री त्यांच्या घरी गाण्याचा कार्यक्रम असतो. मंडळी, आज गेली ५३ वर्ष अण्णा सोमठणकरांच्या घरी हा उपक्रम अव्याहतपणे सुरू आहे ही गोष्ट मला खूप मोठी वाटते. अनेक कलाकारांनी तिथे आजपर्यंत हजेरी लावली आहे.

गेल्या वर्षी अण्णांच्या घरी दत्तजयंती उत्सवानिमित्त आयोजलेल्या मैफलीला उपस्थित राहण्याचा मला योग आला. त्या मैफलीचा हा थोडासा धावता वृत्तांत आज मी येथे देणार आहे. पण ती मैफल कशी रंगतदार होती हे एक श्रोता म्हणून (समिक्षक किंवा तज्ज्ञ म्हणून नव्हे!;) सांगण्यापूर्वी एक खवैय्या म्हणून अण्णा सोमठणकरांच्या घरी जे प्रसादाचं जेवण होतं त्याबद्दल मला आधी बोललं पाहिजे. आहाहा काय विचारता मंडळी!, अगदी मोजकाच, पण अतीव सुंदर आणि चविष्ट बेत होता हो. रस्साभाजी, मउसूत पोळ्या, जीव ओवाळून टाकावा अशी गुळ-गोडामसाला घातलेली आमटी आणि गरमागरम भात. नास्तिकतेला आस्तिकतेकडे नेणारा स्वयंपाक! अहो देव म्हणजे तरी अजून वेगळं काय असतं हो? हे नास्तिक लोक उगाचंच आमच्या विठोबाला घाबरतात! ;)

असो, खाण्याचा पोटोबा तर झाला. आता गाण्याच्या विठोबाकडे वळुया!

ठाण्याची राहणारी सौ वरदा गोडबोलेची मैफल होती ती. वयाच्या ६ व्या/७ व्या वर्षापासूनच वरदा गाणं शिकत आहे. किराणा घराण्याचे पं फिरोज दस्तूर यांचे ज्येष्ठ शिष्य पं अच्युतराव अभ्यंकर यांच्याकडे वरदाने १२ वर्ष गाण्याची रीतसर तालीम घेतली. अभ्यंकरबुवांनी वरदावर किराणा गायकीचे खूप चांगले संस्कार केले. त्यानंतरचा काही काळ तिने डॉ सुशिलाताई पोहनकर व पं अजय पोहनकर यांच्याकडेही तालीम घेतली. सुशिलाताईंकडे आणि पं अजय पोहनकरांकडे वरदाला विशेष करून ठुमरी-दादऱ्याच्या खासियती शिकायला मिळाल्या. सध्या वरदा पं यशवंतबुवा महाले यांच्याकडे अण्णासाहेब भातखंडे, आचार्य रातंजनकर, यांच्या अत्यंत समृद्ध परंपरेतील आग्रा घराण्याच्या गायकीचे, विशेष करून बंदिशींचे शिक्षण घेत आहे.

आजपर्यंत अनेक ठिकाणी वरदाची गाणी झाली आहेत. ख्यालगायनाच्या स्पर्धांतून अनेक बक्षिसं, आणि शिष्यवृत्त्या तिने मिळवल्या आहेत. खास करून केन्द्र सरकारची दिली जाणारी शिष्यवृत्ती, स्वरभास्कर पं भीमसेन जोशी शिष्यवृत्ती, राष्ट्रीय पातळीवर दिले जाणारे 'डागर पारितोषक', अण्णासाहेब रातंजनकर प्रतिष्ठानचे पारितोषक, पं रामभाऊ मराठे नाट्यसंगीत शिष्यवृत्ती, ह्या काही विशेष उल्लेखनीय गोष्टी तिच्या खात्यात जमा आहेत. रुईया महाविद्यालयातून संस्कृत विषय घेऊन बी ए च्या परीक्षेत मुंबई विद्यापिठात सर्वप्रथम येण्याचा मानदेखील तिने मिळवला आहे.

वरदाने मैफलीची सुरवात पुरियाकल्याण रागाने केली. "आज सो बन" ही पारंपारिक विलंबित एकतालातली अस्थाई तिने भरायला सुरवात केली. पुरियाकल्याण हा खास किराणा घराण्याचा राग असं म्हटलं जातं ते फारसं वावगं नाही. पुरियाकल्याण! आलापप्रधान गायकी गाता येण्याजोगा एक खानदानी राग. पुरियाकल्याण म्हणजे पुरिया आणि कल्याण या दोन रागांचं अद्वैत. पुरियाचा स्वभाव तसा गंभीर. मला तर पुरिया म्हणजे एखाद्या जबाबदार, बुजुर्ग अशा अनुभवसंपन्न व्यक्तिचं मनोगतच वाटतं. पण पुरियाची सगळी सत्ता फक्त पूर्वांगातच बरं का मंडळी. आपला अवखळ, लोभसवाणा 'कल्याण' त्याला उत्तरांगात नेमकेपणाने गाठतो आणि त्याचा छानसा पुरियाकल्याण होतो!

आपल्या घरात अशीच एखादी अनुभवसंपन्न, पण थोडी गंभीर अशी बुजूर्ग व्यक्ती असते. कुणी फारसं तिच्याजवळ गप्पाबिप्पा मारायला जात नाही. पण तिच्या नातवाला मात्र नेमकं कळतं की आजोबांना काय आवडतं आणि काय नाही ते! ;) नातू अवखळपणाने धावत त्यांना बिलगतो आणि या गंभीर आजोबांच्या चेहऱ्यावर पटकन स्मित हास्य उमटतं! ;) पुरिया काही क्षणाकरता स्वत:चा स्वभाव विसरतो आणि त्याचा पुरियाकल्याण बनतो! ;) मंडळी, किती समृद्ध आहे आपलं संगीत! क्या केहेने..

वरदाने किराणा गायकीच्या पद्धतीनुसार एकेका स्वराची बढत करत विलंबितात पुरियाकल्याण छानच रंगवला. त्यानंतर "पार करो नाव मोरी" ही पुरियाकल्याणातली पं फिरोज दस्तुरांनी बांधलेली द्रुत बंदिशीही तिने फार सुरेख म्हटली. अर्धापाऊण तास अगदी झकास माहोल जमला होता पुरियाकल्याणचा!
त्यानंतर मैफलीमध्ये केदार महाराजांचा रथ मोठ्या दिमाखात डेरेदाखल झाला. केदार राग म्हणजे काय विचारता महाराजा? स्वरांचा उत्सवच तो! 'सोच समझ मनमीत पिहरवा' ही गुरूमहात्म्य सांगणारी केदारातली मध्यलयीतली एक बंदिश. वरदाने ही बंदिश अगदी जमून गायली. मंडळी, 'मध्यलयीत गाणं सर्वात कठीण' असं बुजुर्ग सांगतात. वरदाने मात्र मध्यलयीचं तंत्र चांगल्या तऱ्हेने हाताळत ही बंदिश उत्तम तऱ्हेने सादर केली. केदाराने मैफलीच्या शोभेला चार चांद लावले!


त्यानंतर वरदाने 'मधुकर वन वन', 'सोहम हर डमरू बाजे', यांसारखी काही नाट्यपदं, 'हरी मेरो जीवनप्राण आधार', 'मन हो रामरंगी रंगले' हे अभंग सादर केले. उत्तरोत्तर मैफल चढत्या भाजणीने रंगतच गेली! श्री समय चोळकर यांनी तबल्यावर अत्यंत रंगतदार साथ केली व श्री निरंजन लेले यांनी संवादिनीवर समर्पक संवाद साधला.

मंडळी, एकूण कालची मैफल ऐकून माझ्यासारख्या श्रोत्यांना वरदासारख्या तरूण मंडळींकडून खूपच आशा आहेत. वरदाही ठाण्याचीच असल्यामुळे गेली अनेक वर्ष तिची मेहनत आणि लगन मी फार जवळून पाहतो आहे. सुरेख आणि सुरेल आवाज, स्वच्छ दाणेदार तान, लयतालावर चांगली पकड, सरगम आलापी, उत्तम तालीम मिळाल्यामुळे रागावरची पकड, ह्या गोष्टी तर वरदाच्या गाण्यात आहेतच. पण घराण्यांच्या परंपरा राखून गाण्यात स्वत:चे विचार मांडण्याची, आणि त्यादृष्टीने अत्त्यावश्यक ते चिंतन-मनन-अभ्यास व रियाज करत राहण्याची तिची वृत्ती नक्कीच कौतुकास्पद आहे.

sms मागवून मांडला जातो तो संगीताचा बाजार! ते संगीत नव्हे! 'माझं गाणं आपल्याला आवडलं असेल तर please please please मला मत द्या' असा सांगितिक जोगवा मागणाऱ्या कलाकारांची मला अक्षरश: कीव येते. कुठल्याही कलाकाराची कला ही कुठल्याही sms ची मिंधी नसते, नसावी असं मला वाटतं! वीणाधारी, श्वेतवस्त्र परिधान केलेल्या प्रसन्न व तेज:पुंज मुद्रेच्या सरस्वतीला असं फाटक्या वस्त्रानिशी sms द्वारा मतांची भीक मागताना पाहिलं की खरंच खूप वाईट वाटतं! पण मंडळी, खरं तर ही सरस्वती नव्हेच, असंच म्हणायला हवं. ही तर संगीताच्या बाजारातली रस्त्यावर बसलेली एक बटीक! झी वाहिनीच्या दरबारातील एक बाजारबसवी रांड!

असो! विषयांतर पुरे करतो.

तर मंडळी सांगायचा मुद्दा असा, की गाणं ही इंस्टंट येणारी गोष्ट नव्हे. आणि इंस्टंट गोष्टी टिकत नाहीत असं आमचं ठाम मत आहे. आणि म्हणूनच आजच्या जमान्यात दूरदर्शनवरील निरनिराळ्या वाहिन्यांवरील सांगितिक कार्यक्रमात (की बाजारात?) रातोरात प्रसिद्ध व्हायचे मार्ग उपलब्ध असतांना, किंवा इतर काही इंस्टंट प्रलोभनांना बळी न पडता वरदासारखी तरूण मंडळी रियाज करत आहेत, साधना करत आहेत ही गोष्ट मला खूप मोठी वाटते! अभिजात संगीतासारख्या दुर्लभ विद्येच्या प्रवासाकरता माझ्या वरदाला अनेकोत्तम शुभेच्छा!


परवाच्या मैफलीत वरदाने 'मन हो रामरंगी रंगले' हा अभंग गायला. छान गायला, रंगवून गायला. मुळात सवाई गंधर्वांनी गायलेला हा अभंग! त्यानंतर त्यांचे शिषोत्तम पं भीमसेन जोशी यांनीही अत्यंत भावोत्कटतेने गायला, हे मी वेगळं सांगायची गरज नाही. वरदाकडून हा अभंग ऐकत असताना नकळत मला पुण्याच्या आमच्या या स्वरविठोबाची आठवण झाली आणि डोळ्याच्या कडा ओलावल्या. भीमण्णा आता थकले आहेत. आयुष्यभर गाण्यालाच 'राम' मानून भीमण्णांनी साधना केली. गानविद्या साध्य केली. आमचं मन त्यांनी रामरंगी रंगवलं!

त्यांचा थरथरता हात वरदासारख्या तरूण मंडळींच्या डोक्यावरही सतत राहो हीच प्रार्थना!

--तात्या अभ्यंकर.

17 comments:

Anonymous said...

तात्यासाहेब,
सुंदर लेख. वरदाताईंना शुभेच्छा! एसेमेस पद्धतीचेही आपण अगदी योग्य शब्दात वाभाडे काढले आहेत.
-अभिजित साने.

Shielesh said...

Sundar Lekh. Words on sms would have been better but I agree with the comment on sms

तात्या अभ्यंकर. said...

Dear Abhijit & Shailesh,
Thx a lot for ur replies..

-Tatyaa.

Sai said...

Tatya,
Tumche he ase lekh vachun amchyasarkhya KAANSEN lokanna aplya Sangitik Nirakshartechi vilakshan LAAJ vatate...Tumchya sarkhe GAAN Darbaaratale Manyawarache Nasheeb pahun khara tar Hevaaa vatato...
Amhi Pamar Jeevanachya Rahatgadyatun kadhitari Puriya, Pilu, Malhar ase aikiv Raag aikanyacha prayatna karat asto...
Tumchi hi Gaan (Aani Khaan) Sadhana Ashich Baharat Raaho hich Aajchya (Jagadguru Sant Shreshtha Ha. Bh. Pa. Valentine BABA Jayanti) Diwashi Sadichha...

K.L.A.,
Saiprasad

Anonymous said...

तात्या
नेहमीप्रमाणेच हा लेख पण एकदम सही आहे
फक्त SMS बद्दल एक सांगावेसे वाटते
तुम्ही म्हणता त्यात खूप तत्थ्य आणि अर्थ आहे.
पण आजच्या जगात मागितल्याशिवाय काही मिळते का?
आणि ज्या संगीत क्षेत्रात ही मुले करिअर करणार आहेत तेथे गुणवत्तेपेक्षा चांगल्या संबंधांना प्राधान्य आहे.
मग या मुलांनी तरी काय करावे?

काल आणी परवाच मी अभिजीत कोसंबीचे गाणे ऎकले.
दुर्दैवाने तो कोल्हापूरचा असल्याने पुण्या-मुंबईच्या स्पर्धकांइतके SMS त्याला मिळत नाहियेत.
केवळ कमी SMS मुळे तो स्पर्धेबाहेर जाणार हे परिक्षकांनाही पटले नाही. त्यांनी हस्तक्षेप करून नियमात बदल करवला.
आणि त्यांनी स्वत: प्रेक्षकांना विनंती केलेली आहे की गुणवत्तेची कदर करा म्हणून.
त्यामुळे अंतिम फेरीपर्यंत लोकांनी स्वत: देखील गुणवत्तेला प्राधान्य देऊन अभिजीतला मत दिले पाहिजे असे मला वाटते.
प्रेक्षक म्हणजे कोण? तुम्ही - आम्हीच की.
जर हेच प्रेक्षक गुणवत्तेपेक्षा प्रादेशिकतेला किंवा इतर गोष्टीला प्राधान्य देणार असतील तर तुमच्या म्हणण्यातली आग या लोकांना जाणवल्याशिवाय राहणार नाही. कलाकाराने नम्र असावे पण अगतिक असू नये या तुमच्या मतास मी पूर्णपणे सहमत आहे
पण हे चित्र एका कलाकाराच्या वागण्याने बदलणार नाही हो हीच खरी शोकांतिका आहे.
राजकारण आणि वशिलेबाजी जोपर्यंत आपल्या देशातून नष्ट होत नाही तोपर्यंत संगीतच काय पण सर्वच क्षेत्रांत असेच होत राहणार आणि गुणवान लोकांना नाईलाजाने अगतिक व्हावे लागणार अशी भीती आणि खंत दोन्ही वाटते.

तुमचे विचार एकदम जाज्वल्य आहेत आणि मला व्यक्तिश: प्रत्येक शब्द एकदम पटला आहे.
तात्या एकदम परखड सत्य लिहितात हे मला माहीत आणि मान्यही आहे. पण सर्वांनाच हे पटणार नाही.
कारण आपल्या समाजात सभ्य भाषेचे पोवाडे गाणारेही खूप आहेत. ते सर्वस्वी खरेपणाने वागत असतील तर ते योग्यही म्हणता येईल.
पण दुर्दैवाने आपला समाज फक्त बोलबच्चन करत बसतो कृती नाही.
असो. मला मात्र तुमचे विचार एकदम पटतात
धन्यवाद
(तात्याप्रेमी) सागर

तात्या अभ्यंकर. said...

प्रिय साई आणि सागर,

प्रतिसादाकरता अनेक अनेक धन्यवाद..

--तात्या.

Shirish said...

Really your thoughts on music contests are forthright. you are very much correct in treating these contests as business. I fully agree. If it was a genuine contest, why go for SMS from common public? Most of them just vote for the candidate of their area or caste or just to disqualify one of the contestants. When there are judges capable of judging the contestants what is the need of public opinion? I just do not believe that the results are really based on the SMSes. There could be many other parameters deciding the winner.

keep on writing Tatya

Shirish Gogate

तात्या अभ्यंकर. said...

Dear Shirish,
Thx a lot for reading my article, and for ur kind reply..

Rgds,
-Tatyaa.

Shirish said...

Dear Tatya
I read your articles on Manogat as well. The articles are very good and studied ones.
I want to become a member on Manogat.
I could not find the link on the web for enrolling as a new menber on Manogat.
Can you help me out? How to get new membership?
My email address is shirishgogate@gmail.com

Shirish

D D said...

तात्यासाहेब,
एस.एम.एस. बद्दलचे तुमचे मत अगदी योग्य आहे. तुमचं मत वाचतांना अगदी माझ्या मनातले विचार मी वाचत आहे असंच मला वाटत होतं.

Abhijit said...

Your views regarding singing competitions are hard hitting and valuable. One more thing your attention is required is the lack of new lyrics and newer music presented by the participants. Everyone seems to be stuck to songs sung by Babuji, Lata, Usha etc. Why there should not be competitions of lyricists and music directors also?
With regards,

Ityaadi

तात्या अभ्यंकर. said...

Dear Abhijit chaaywaala,

Wht u say is correct..
Thx for coming to my blog,

Tatyaa.

Anonymous said...

tatyaa,

khaas tumachyaa saathi www.ekbhasha.com, aapli gaani upload kara tumachya aavaajaatila / video asle tari chalel

mi ekbhashi :)
phachan kon ???? :))))

तात्या अभ्यंकर. said...

प्रतिक्रियांसाठी सर्व रसिक वाचकजनांचे आभार..

तात्या.

प्रा.डॊ.दिलीप बिरुटे said...

सुंदर लेख,sms चे फटके तर जबराच.वरदांचे गाणे आणि तुम्ही अनूभवलेली मैफील,फारच सुंदर चित्रण.

तात्या अभ्यंकर. said...

बिरुटेसाहेब,

प्रतिसादाकरता मनापासून आभार..

तात्या.

Anonymous said...

I think this is one of the most important information for me. And i am glad reading your article. But should remark on few general things, The website style is perfect, the articles is really nice