April 23, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (३४) - व्हायलीन ब्रदर्सची बंदिश सिंफनी...


व्हायलीन ब्रदर्सची
बंदिश सिंफनी..
(येथे ऐका)


उस्ताद अमज़द अली खान. हिंदुस्थानी संगीत क्षेत्रातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व..त्यांचे शिष्य देबशंकर आणि ज्योतीशंकर हे 'व्हायलीन ब्रदर्स' म्हणून प्रसिद्ध आहेत.. हे व्हायलीन बंधु हिंदुस्थानी आणि पाश्चिमात्य अभिजात संगीतात खूप चांगलं काम करत आहेत..पं रविशंकर, उस्ताद अमजदालि खासाहेब, त्याचप्रमाणे झुबिन मेहता यांच्याकडूनही त्यांना उत्तम मार्गदर्शन मिळालं आहे..

'बंदिश सिंफनी'ची मूळ संकल्पना आणि संगीत उस्ताद अमजद अलींचे. राग यमन! यमनाची अगदी सुंदर सुरावट बांधली आहे खासाहेबांनी. आलाप-जोड-झाला आणि गत या अंगाने जाणारं प्रत्येक स्वरावलीतलं स्वरांचं नक्षिकाम आणि लयीची गुंफण अतिशय सुरेख..लयीचं काम तर विशेष छान झालं आहे! व्हायलीन ब्रदर्सनी अर्थातच अगदी लयदार, सुरेल, वाजवलं आहे. तानक्रिया सफाईदार आहे. तबला-मृदुंगासहीतचा सारा वाद्यमेळही त्यांनीच बांधला आहे..

अवघ्या तीन-साडेतीन मिनिटांचा हा यमन निश्चितच भव्यदिव्य आहे, श्रवणीय आहे.. यमनची ही सुरेख हार्मनी-सिंफनी मनाला आनंद देऊन जाते!

-- तात्या अभ्यंकर.

April 21, 2010

स्वामी नित्त्यानंद, स्वामी तात्यानंद आणि आपली रंजिता... :)

हल्लीच्या दुनियेत 'स्वामी', 'बाबा' किंवा तत्सम कुणीही धर्मोपदेशक म्हटला की तो अंमळ बाईलवेडा असतो असे आमच्या पाहण्यात आले आहे.. मग तो स्वामी नित्त्यानंद असो की आणखी कुणी स्वामी तात्यानंद असो.. त्यातूनही ती बया जर दाक्षिणात्य नटी असेल तर मग बघायलाच नको..; )





अलीकडेच स्वामी नित्त्यानंद आणि आपली सर्वांची लाडकी दाक्षिणात्य नटी रंजिता यांच्या काही चित्रफिती एक तमिळ वाहिनीने प्रसिद्ध केल्या आणि गूगलची पानंच्या पानं ओसंडून वाहू लागली! तूनळीवर चित्रफितीही प्रसिद्ध झाल्या आहेत..


आता ही बातमी खरी का खोटी?


स्वामींच्या संस्थळाने अर्थातच ह्या प्रकरणात स्वामीजींना विनाकारणच फसवलं गेलं आहे असा खुलासा आहे..


बाकी अन्यत्र तमाम ब्लॉग्जवर मंडळी चवीचवीने चर्चा करताहेत.. अहो पण मी म्हणतो की समजा असेल ही बातमी खरी तर त्यात इतका गहजब करण्याजोगं काय आहे? स्वामींना काही भावना नाहीत? असेल त्यांचा त्या रंजिता शिष्येवर अंमळ लोभ.. आणि म्हणूनच तिच्यावर विशेष अनुग्रह करण्याचे वेगवेगळे मार्ग ते अवलंबत असतील! कुणी सांगावं?! :)



पाहा बरं किती छान शिक्षण सुरू आहे ते!; )


आणि अहो आमची रंजिता तर आहेच छान, अगदी कुणालाही आवडावी अशी.. छानच दिसते ब्वॉ! अंगापिंडाने सशक्त, तारुण्याने मुसमुसलेली आणि अगदी उफाड्याची! :)





तर मला सांगा, असं काय मोठं विशेष चुकलं हो आपल्या नित्त्यानंद स्वामींचं?! :)


हे स्कँडल खरं की खोटं?
खरं असल्यास आपल्याला हे कितपत गंभीर वाटतं? की यात काही विशेष गैर नाही असं आपलं म्हणणं आहे? :)


होऊ द्यात पाहू अंमळ विस्तृत आणि साधकबाधक चर्चा! :)





धन्यवाद,


आपला,
स्वामी तात्यानंद!
देवासकरांची कोठी,
इंदौर.

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (३३) - बीज अंकुरे अंकुरे..


प्रभातच्या संत तुकाराम चित्रपटातला अभंग..
'वृक्षवल्ली आम्हा..' (येथे ऐका)


अगदी साधीसरळ आणि तितकीच गोड चाल, चिपळ्यांचा ठेका, आणि विष्णुपंत पागनीसांची सुरेल, प्रासादिक गायकी. अतिशय सुरेख..! 

'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे आळविती..'


आज तुम्हीआम्ही जंगलतोड वाचवा, झाडं लावा, झाडं जगवा असं म्हणून जिवाचा आटापिटा करत असतो.. परंतु तुकोबांचा द्रष्टेपणा पाहा..त्यांनी फारा वर्षापूर्वीच वृक्षवल्लींची महती गायली आहे.. नव्हे, त्यांना आपले सगेसोयरे मानले आहे!

'पक्षीही सुस्वरे आळविती..!' 

किती सुंदर शब्द आहेत, सुंदर भाषा आहे! गाण्याच्या पार्श्वभूमीवर ही पक्षांची सुस्वर गायकी कानाला फार छान लागते!

'आमचा ना, चांगला ६००० स्क्वे.फुटाचा ब्लॉक आहे!', 'आमचं हे भलं मोठ्ठं फार्महाऊस आहे बरं का!' अश्या बढाया तुम्हीआम्ही मारत असतो. परंतु तुकोबांची श्रीमंती पाहा.. ते म्हणतात,

आकाश मंडप, पृथिवी आसन
रमे तेथे मन क्रीडा करी!


सहा-सात हजार स्क्वे.फुटांचा संकुचितपणा तुकोबांना जमत नाही! Smile

तुका म्हणे होय मनासी संवाद
आपुलाचि वाद आपणासि!


किती मोठी गोष्ट सांगून गेलेत तुकोबा! 'मनासी संवाद..' असला म्हणजे पुरे.. कुणाचं कौन्सिलिंग नको, कधीही न संपणार्‍या चर्चा नकोत, मतमतांतरे नकोत, तंटेबखेडे नकोत..

'आपुलाचि वाद आपणासि!'.... हेच खरं!

-- तात्या अभ्यंकर.

April 16, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (३२) - बीज अंकुरे अंकुरे..


बीज अंकुरे अंकुरे..(येथे ऐका)

बीज अंकुरे अंकुरे
ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे
माळरानी खडकात?


एक अतिशय सुंदर, हळवं गाणं..अगदी ओल्या मातीचाच ओलावा असलेलं, तिची माया असलेलं! गाण्याची चाल जेवढी गोड तेवढीच समजावणीची..अशी की ओल्या मातीची महती सांगताना माळरानी खडकाची कुठेही अवहेलना नाही.. परंतु त्यात बियाणं मात्र रुजू शकत नाही इतकंच सांगणं! याचं कारण 'माळरानी खडकात' ची 'मनीरे ममपप' ही सुरेख स्वरसंगती..

हवी अंधारल्या राती
चंद्रकिरणांची साथ
कसे रुजावे बियाणे
माळरानी खडकात..


मधुकर आरकड्यांचे सुंदर शब्द, अशोक पत्की/सुरेशकुमार यांचं संगीत असलेलं हे गाणं अरुण इंगळेनी अगदी हळवेपणाने, जीव लावून गायलं आहे.. यात ओल्या मातीचा सुवास आहे, हळवेपणा आहे, गोडवा आहे, ममत्व आहे..गाण्यातली बासरीही फार सुरेख..!

मन तृप्त करणार्‍या या गाण्याचं हे दोन ओळींचं वेडंवाकडं विवेचन कविवर्य विंदा करंदीकरांना सादर समर्पित.. आणि त्या आभाळाइतक्या मोठ्या माणसाला मानाचा मुजरा..!


-- तात्या अभ्यंकर.

मम सुखाची ठेव..



ती आली, तिनं पाहिलं, तिनं जिंकलं!

ती स्वरलता आहे, ती गानसम्राज्ञी आहे, ती मेलडीक्वीन आहे.....!

षड्ज पंचम भावातला सुरेल जुळलेला तानपुरा,
अन् त्यातला नैसर्गिक शुद्ध गंधार..
तो तर तिच्या गळ्यातच आहे...!
नव्हे, तर त्या गंधाराचं तंबोर्‍यातलं स्वयंभुत्व
हे तिच्या गळ्यानेच सिद्ध केलेलं आहे...!

कोमल अन् शुद्ध रिखभ, हे एरवी एकमेकांचे वैरी,
स्वभावाने अगदी एकदुसर्‍याच्या विरुद्ध,
परंतु दोघेही तिचेच आहेत...!

तोडीत दिसणारं कोमल गंधाराचं कारुण्य
हे तिनंच दाखवलं आम्हाला...
आणि बागेश्रीतला शृंगारिक कोमल गंधारही
तिनंच शिकवला आम्हाला...!

तिने स्वर लावल्यावर
तीव्र मध्यमातली अद्भुतता दिसली आम्हाला...
आणि शुद्ध मध्यमाचं गारुडही तिनंच घातलं आम्हाला...!

तिच्या पंचमातली अचलता आम्ही अनुभवली...
महासागराच्या ऐन मध्यावर एखाद्या जहाजाला
जसा एक आश्वासक सहारा मिळावा,
तसा सहारा, तसा आधार हा तिचाच पंचम देतो....!
हा पंचम एक आधारस्तंभ स्वर आहे,
आरोही-अवरोही हरकतींचं ते एक अवचित विश्रांतिस्थान आहे,
हे तिनं गायल्यावरच पटतं आम्हाला...!

तिच्याइतका सुरेख, तिच्या इतका गोड
शुद्ध धैवत गाऊच शकत नाही कुणी....
आणि तिच्याइतकं कुणीच दाखवू शकत नाही,
कोमल धैवताचं प्रखरत्व आणि त्याचं समर्पण....!

कोमल निषादाचं ममत्व अन् देवत्व,
तिच्यामुळेच सिद्ध होतं...
आणि तिच्या शुद्ध निषादामुळेच कळली आम्हाला
गाण्यातली मेलडी...!

आणि तिचा तार षड्ज?

गायकी म्हणजे काय, पूर्णत्व म्हणजे काय,
गाण्याचा असर म्हणजे काय,
हे तिथंच कळतं आम्हाला, तिथंच जाणवतं...तिच्या तार षड्जात..!

तिचा तार षड्जच पूर्ण करतो आमच्या
सगुण-निर्गुणाच्या अन् अध्यात्माच्या व्याख्या...
आणि तोच भाग पाडतो आम्हाला,
ईश्वरी संकल्पनेवर विश्वास ठेवायला....!
ती गाते आहे, आम्ही ऐकतो आहोत...

सलीलदा, सचिनदा, पंचमदा, मदनमोहन, नौशादमिया
अन् कितीतरी अनेक..
तिच्या गळ्याकरताच केवळ,
पणाला लावतात आपली अलौकिक प्रतिभा...!
अन् तिच्याकडे पाहूनच
खुला करतात बाबुजी
"ज्योती कलश छलके"चा अमृतकुंभ...!

तिचं गाणं हा आमचा अभिमान आहे...
तिचं गाणं हा आमचा अहंकार आहे...
तिचं गाणं ही आमची गरज आहे...
तिचं गाणं ही आमची सवय आहे....
तिचं गाणं हे आमचं व्यसन आहे....
तिचं गाणं हे आमचं औषध आहे...
तिचं गाणं ही आमची विश्रांती आहे...
आणि
तिचं गाणं हेच आमचं सुख-समाधान आहे...

इतकंच म्हणेन की,

अन्न, वस्त्र, निवारा ह्या आमच्या मूलभूत गरजा.
त्यात आता तिच्या गाण्याचीही भर पडली आहे...!

शब्द खूप तोकडे आहेत,
तेव्हा पुरे करतो आता हे शाब्दिक बुडबुडे...

शेवटी एवढंच सांगून थांबतो की तिचं गाणं ही
"मम सुखाची ठेव" आहे!
"मम सुखाची ठेव" आहे!

--(तिचा भक्त, तिचा चाहता, तिचा प्रेमी!) तात्या अभ्यंकर.

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (3१) - डोली मे बिठाई के कहार...



डोली मी बिठाई के कहार
लाए मोहे सजनाके द्वार..

(येथे ऐका)


'ओ रामा रे..!'

थोरल्या बर्मदांची खास बंगाली ढंगाची गायकी.. आवाजाची जात जरा वेगळीच, परंतु स्वर मात्र सच्चा, अगदी सुरेल! खेमट्याचा किंवा दुगुन रुपकचा छान ठेका.. बंगाली लोकसंगीतातून जन्माला आलेली चाल..सचिनदा अगदी मन लावून गाताहेत...एकतानतेने एका परित्यक्तेची कर्मकहाणी सांगताहेत!


खास करून पश्चिम बंगालचा सामाजिक आशय असलेलं गाणं.. मूल होत नाही म्हणून बायकोला अगदी सहजरित्या टाकून दुसरं लग्न करणे आणि पहिलीचा छळ सुरू होऊन तिची हकालपट्टी होणे. पुन्हा माहेरी जायची सोय नाही कारण माहेरी खाणार काय? माजोरी सरंजामशाही, सावकारी आणि त्यामुळे पश्चिम बंगालच्या खेड्यापड्यात उत्पन्न झालेली वर्षानुवर्षाची गरीबी आणि सहज दृष्टीस पडणारी अन्नान्न दशा..!

पतझड, ओ बन गयी पतझड, बैरन बहार..!

आणि परित्यक्तेपासून ते कोठ्यापर्यंतचा पुढला प्रवास! तिथे भेटणारा एक संगीतरसिक, द्रोणातून कचोरी-समोसे आणि मिठाई आणणारा, जीव ओवाळून टाकणारा कुणी आनंदबाबू..! 'रैना बिती जाए', 'चिन्गारी कोई भडके' यासारखी एकसे एक गाणी देणारे पंचमदा, किशोरदा आणि दिदि!

अमरप्रेम! सामाजिक आशय असलेली उत्तम कथा, उत्तम संगीत, उत्तम अभिनय! हिंदी चित्रपटसृष्टीला पुन्हा येतील का हो असे वैभवाचे दिवस?


-- तात्या अभ्यंकर.