November 10, 2011

वाजंत्री वाजतात, वाड्यात काय झालं?

राम राम मंडळी,

मासिक धर्म सुरू होणं ही कुठल्याही मुलीच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना. निसर्गाने तिला बहाल केलेलं ते सन्माननीय स्त्रीत्व. आजच्या काळात मासिक धर्म सुरू होऊन जेव्हा एखादी मुलगी वयात येते, ते तिच्या आईशिवाय कुणालाच फारसं कळत नाही. फार तर तिच्या वडिलांना किंवा मोठ्या ताईला हे कळणं शक्य आहे. या व्यतिरिक्त ती घटना फारशी कुणाला कळावी किंवा तिचा गाजावाजा व्हावा असं त्यात विशेष काही नाही. ती एक नैर्सर्गिक गोष्ट आहे.

परंतु दादासाहेब फाळके पारितोषक विजेत्या २२ जून १८९७ या सुंदर चित्रपटात दाखवलं गेल्याप्रमाणे मुलीचं हे ऋतुचक्र सुरू झालं की त्या घरात एक छोटेखानी समारंभवजा प्रसंगच साजरा केला जात असे. एक तर त्या काळात मुलगी वयात यायच्या आधीच तिचं लग्न केलं जात असे, (किंबहुना मुलगी वयात येईपर्यंत बिनलग्नाची राहिल्यास तो एक चर्चेचा विषय होई आणि प्रसंगी तिची व तिच्या आईवडिलांची कुचंबणाही होत असे - संदर्भ - शिरुभाऊंची तुंबाडचे खोत ही कादंबरी) त्यामुळे जेव्हा मुलगी वयात येत असे तेव्हा ती आईऐवजी सासूच्याच सान्निध्यात असे.

२२ जून १८९७ या चित्रपटात मात्र चाफेकरांच्या घरातील एक सूनबाई सीता, (बहुधा चाफेकर बंधुंपैकी वासुदेव हरि तथा बापुराव चाफेकर यांची पत्नी) जेव्हा वयात येते तो समारंभवजा प्रसंग चित्रित केला आहे आणि सोबत एक छान गाणंही आहे. माझा हा लेख मुख्यत्वेकरून त्या गाण्याबाबत आहे. त्या काळात मुलगी वयात आली म्हणजे तिला 'न्हाणं' अथवा 'नहाण आलं', 'ती मखरात बसली', 'तिला पदर आला', इत्यादी शब्दप्रयोग वापरात असायचे. त्यापैकीच 'न्हाणं आलं' हे शब्द सदर गाण्यात वापरले आहेत..

सीताबाईला चाफेकळीला न्हाणं आलं.. (येथे ऐका - चित्रफितीतील गाण्याची सुरवात ४ मिनिटे व १८ सेकंदांनी)

आता मंडळी, खरं सांगायचं म्हणजे या गाण्यात काही गहन अर्थबिर्थ आहे असं मुळीच नाही. आपण फार तर याला माजघरातलं एक गाणं, असं म्हणू शकतो. तरीही या गाण्याची चाल छान आहे, शब्द साधे परंतु मस्त आहेत आणि विशेष म्हणजे यातली यमकं एकदम फक्कड आहेत. लयीची गुंफण तर झकासच आहे. सोबत तालाकरता फक्त एक चौघडाटाईप वाद्य आणि चाळ किंवा घुंगरू. तरीही हे गाणं जमून गेलं आहे..! :)

हम्म. पुण्यातल्या एका रस्त्यावरून मी चाललो आहे. वाटेत खास सदाशिवपेठी एक वाडा लागला आहे. पण त्यातून हा वाजंत्य्रांचा कसला आवाज येतो आहे? काही लग्नबिग्न आहे क्काय त्या वाड्यात..?

छे हो..!

वाजंत्री वाजतात वाड्यात काय झालं?
सीताबाईल चाफेकळीला न्हाणं आलं..! :)

'वाड्यात काय झालं..' मधली 'पपप मगरेग' संगती एकदम मस्त! आणि 'न्हाणं आलं' चा षड्जावरचा न्यास एकदम खणखणीत बरं का. कुणी गायलंय ते माहीत नाही, पण बाईचा आवाज सुरेल आहे, मोकळा आहे. अगदी चित्पावनी आहे असं म्ह्टलंत तरी चालेल! :)

पहिल्यानं न्हाणं आलं सासू वाटिते साखर
सीताबाई हिचा दीर गुंफितो गं मखर..!

सूनबाईला न्हाणं आलं म्हणून आता सासू काय काय वाटते आहे पाहा. सर्वप्रथम ती साखर वाटते आहे. सीताबाईचा दीर आपल्या भावजयीला मखरात बसण्याकरता तिच्याकरता मखर गुंफतो आहे. इथे साखर आणि मखर हे साधं शिंपल यमक जुळवलं आहे. बाय द वे, दीर या शब्दातली 'मध' ही संगती अंमळ सुरेखच..! :)

पहिल्यानं न्हाणं आलं सासू वाटिते बत्तासे
सीताबाई जरी तुझ्या मखरी आरसे..!

साखर झाली. आता बत्तासे! मज्जा आहे बॉ सीताबाईची. मंडळी बाकी काय पण म्हणा, बत्तासे मात्र चवीला झकासच लागतात हो! आणि आरसे/बत्तासे हे यमकही मस्त! :)

बाय द वे, 'सीताबाई जरी तुझ्या मखरी आरसे..!' ह्या ओळीची लय मात्र विशेष सुरेख आहे. आणि सोबत छुन छुन छुन असा घुंगरांचा ठेका.. सी ता बा ई जरी तुझ्या मखरी आरसे हे शब्द किती सुरेख लयीत पडले आहेत पाहा..!

ह्या गाण्याची चाल कुणी बांधली आहे ते माहीत नाही. की पारंपारिकच आहे..?

पहिल्यानं न्हाणं आलं सासू करिते सोहळा
सीताबाई तरी नेस पाटव गं पिवळा..

अगो सीताबाई, अगो रांडच्ये तुझी सासू तुला न्हाणं आलं म्हणून एवढा सोहळा करत्ये, अगो तो पिवळा पाटव तरी नेस गो बये..! :)

मला 'पाटव' या शब्दाचा एक्झॅक्ट अर्थ माहीत नाही परंतु हा शब्द मात्र एकदम मस्त वाटतो. पुन्हा सोहळा-पिवळा हे यमक झकास..! :)

पिव्ळं पिवळं गं पातळ सार्‍यांना सांगितलं
सीताबाई हिला न्हाणं आलं आईकलं..!

धत तेरीकी..! अहो तिला नहाण आल्याचा एवढा सोहळा केलात आणि वर म्हणता काय? तर,

सीताबाई चाफेकरणीला नहाण आलं असं ऐकलं खरं! :)

'पिवळं पिवळं पातळ' हे शब्द लयीत छान बसावेत म्हणून 'पिव्ळं पि व ळं पातळ' असे टाकले आहेत. या गाण्याची सांगितिक बाजू वरकरणी जरी साधी सोपी वाटली, तरी तिला सुरालयीचा भक्कम पाया लाभला आहे हे निर्विवाद..!

'ऐकलं' या शब्दाकरता 'आ ई क लं' ही चार लयदार अक्षरं गाण्यात अधिक छान शोभतात..! :)

पण मंडळी, क्षणभर यातला मजेचा वा सांगितिक भाग सोडून द्या, पण ज्या पार्श्वभूमीवर हे गाणं चित्रित केलं आहे ती पार्श्वभूमी खूप गंभीर आणि भयानक आहे. चाफेकरांच्या घरातल्या आणि इतर चार घरच्या लेकीसुना हा नहाण प्रसंग त्याकाळची एक रीतभात म्हणून निभावतात खरा परंतु,

थोरले चाफेकर दामोदर हरि चाफेकर फासावर गेले आहेत, त्यांची विधवा गाण्यातल्या एका चित्रात सुन्न बसलेली दाखवली आहे. इतर दोघा चाफेकर बंधुंची फाशीही निश्चित आहे. एकाच घरातील तीन तीन तरूण मुलं फासावर जात आहेत त्या बापाची अवस्था काय असेल..? एक साधा कीर्तनकार तो. उद्या मुलं कीर्तन शिकतील, काही कामधंदा करतील यावरच सारी मदार असणारा..! गाण्यातल्या एका चित्रात तो खिन्न, हारलेला, हताश बापही बसलेला दाखवला आहे..!



असो..

कुठून विषय सुरू केला होता, अन् कुठे येऊन पोहोचलो पाहा..!

आता अधिक काही लिहित नाही.. माझा त्या तिघा चाफेकर बंधुंना मानाचा मुजरा..!

-- तात्या अभ्यंकर.

November 01, 2011

..पर अंधेरे से डरता हु मै मां..!

मेरी मां.. (येथे ऐका)


"आई नको ना गं मला इथे एकट्याला ठेऊन जाऊस! मी तसं कधी बोलून दाखवत नाही पण मी अंधाराला खूप घाबरतो गं आई. इथे खूप अंधार आहे.
हो, आहे मी थोडासा खोडकर, पण तू मला खूप आवडतेस आणि मला तुझी खूप काळजीही वाटते. आता हे कसं तुला समजावून सांगू..? पण तुला तर हे सगळं माहित्ये ना आई? मग मला इथे एकट्याला का ठेऊन जातेस? आता खरंच मी चांगला वागेन. मस्ती, द्वाडपणा करणार नाही. प्रॉमिस..! पण मला इथे नाही रहायचं..!"

tjp

"इथे सगळी खूप अनोळखी मुलं आहेत. मला भिती वाटते इथली.. मला इथे ठेऊन जाऊ नकोस. ही गर्दी आहे ना, ती मला काहितरी करेल मग मी परत घरी कसा येऊ शकेन..? मला तुझ्यापासून इतका दूर करू नकोस की माझी आठवणही तुला येणार नाही.. खरंच मी इतका वाईट आहे का गं आई..? सांगा ना..!"

"आई, मला माहित्ये मी तुझा खूप लाडका आहे. बाबा जेव्हा जेव्हा मला जोरांने ओरडतात ना, तेव्हा तू येऊन माझी बाजू घेशील, मला सांभाळशील याची खात्री असते मला! तू जवळ असलीस ना आई, की खूप सुरक्षित वाटतं मला! पण मी बाबांना हे काही सांगू शकत नाही. तुला हे सगळं माहित्ये ना आई..? मला भिती वाटते त्यांची. खरंच भिती वाटते.."

tjp

चवथी-पाचवी पर्यंत आईच्या पदराखाली लाडाकोडात वाढलेला ईशान अवस्थी. एक खोडकर मुलगा. अक्षरं/आकडे समजण्याची आकलनशक्ती क्षीण असलेला, ती समजून घेतांना गडबड होणारा आणि त्यामुळेच 'लेटर्स आर डान्सिंग' असं म्हणणारा ईशान.. तो सुधारावा म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला आता शाळेतून काढून लांब बोर्डिंग शाळेत ठेवला आहे. तिथे सगळं नवीन. मुलं/सवंगडी नवीन. जाड चश्मावाले अन् मिश्यावाले कडक मास्तर. तिथे आता लाड करणारी आई नाही..!

हे गाणं म्हणजे त्या लहानग्याचं मनोगत..! आईवेडं पोर आहे ते. गाण्याचं चित्रिकरण केवळ अप्रतिम...रडवेलं झालेलं ते पोरगं, आता एकटं, एकाकी. आत्तापर्यंत अगदी सकाळी उठवण्यापासून ते पायात मोजे-बुट चढवणारी आई होती. आता हे लाड नाहीत. कडक मास्तरांच्या निगराणीखाली सगळं आपलं आपण करायचं! आत्तापर्यंत कौतुकानं गरम गरम भरवायला आई होती, आता मेसच्या शिस्तीत आपलं आपण जेवायचं! :)

पोरगं खरंच बावरलं आहे, घाबरलं आहे. शेवटी नळ सोडून आपला रडवेला चेहेरा घुतं आणि चुपचाप झोपतं आणि आईविना पहिला दिवस संपतो..! :)

'तारे जमी पर'. एक सुरेख, देखणा, अप्रतिम चित्रपट आणि त्यातलं शंकर महादेवन ने गायलेलं हे अप्रतिम गाणं. जियो..!

पण खरंच मंडळी, हे गाणं ऐकताना/पाहताना पोटात कुठेतरी खूप तुटतं..पडद्यावर हे गाण पाहताना कुठेतरी आपल्या आईची आठवण होते आणि पडद्यावरचं चित्र क्षणभर धुसर होतं.. परमेश्वराने आई अन् तिचं लेकरू हे नक्की कसलं नातं निर्माण करून ठेवलं आहे हे खरंच समजत नाही...!

-- तात्या अभ्यंकर.