May 19, 2011

टकल्या बापटाचा संताप, मी आणि अण्णा - १

अण्णांना जाऊन आता चार महिने पुरे होतील. मागे उरल्या आहेत त्यांच्या मैफली आणि त्यांच्या आठवणी. आठवयला गेलो की साधारणपणे ८४-८५ सालापासूनचा काळ आठवतो. दोन तानपुर्‍यांमध्ये बसलेला तो स्वरभास्कर आणि त्याचा उत्तुंग स्वराविष्कार. आभाळाला गवसणी घालणारा तो बुलंद आवाज. त्याची गाज..!

वर्ष कुठलं ते आता आठवत नाही. परंतु असाच एकेदिशी डायरेक्ट त्यांना फोन लावला. कारण काहीच नाही. फोनवर त्यांचा आवाज ऐकला की बरं वाटायचं, भरून पावायचं एवढंच एकमेव कारण. आणि दुसरं म्हणजे माझ्यासारख्या सामान्याशी ते अगदी नावानिशी ओळख ठेऊन आपुलकीने दोन शब्द बोलयचे त्यामुळे भीडही चेपलेली. माझ्यातला त्यांचा चाहता, त्यांचा भक्त याच चेपलेल्या भिडेचा थोडा फायदा/गैरफायदा घेऊन त्यांच्याशी दोन शब्द बोलायचं धाडस करायचा इतकंच. पण बरं वाटायचं जिवाला. आणि गैरफायदा तरी कशाचा? तर एक दिग्गज गवई आपल्याशी अगदी साधेपणाने बोलतो याचंच खूप अप्रूप वाटायचं, धन्य वाटायचं..!

अण्णांच्या फोनची रिंग वाजत होती. पलिकडून फोन उचलला गेला.

"हॅलो..". खर्जातला घनगंभीर आवाज.! झालं, आम्ही अवसान आणून, धीर गोळा करून म्हटलं,

"नमस्कार अण्णा. ठाण्याहून अभ्यंकर बोलतोय. ओळखलंत का? सहजच फोन केला होता."

"ओळखलं तर! काय म्हणता? कसं काय?" फलाण्या दिवशी येतोय मुंबैला. तुमच्या मुंबै विद्यापिठात राजाभाई टॉवरला माझं गाणं आहे. तिथे या वेळ असला तर.."

"अहो पण अण्णा, त्या कार्यक्रमाचं तिकिट खूप महाग आहे.." मी घाबरत घाबरत उत्तरलो.

"धत तेरीकी! तुम्हाला काय करायचंय तिकिटाशी? तुम्ही या तर खरं. महाग की स्वस्त ते आपण नंतर पाहू..!"
अण्णा अगदी साधेपणाने म्हणाले.

झालं. आपण एकदम खुश. त्या कार्यक्रमाविषयी मला माहीत होतं परंतु किमान तिकिटच मुळी दोन हजार रुपये इतकं होतं. मुंबै विद्यापिठाचा तो कुठलासा एकदम प्रेस्टिजियस कार्यक्रम होता. परंतु तिकिट लै म्हाग असल्यामुळे माझं त्या कार्यक्रमाला हजेरी लावणं कठीणच होतं. परंतु आता साक्षात अण्णांनीच बोलावल्यामुळे आपण एकदम बिनधास्त!

ठरल्या दिवशी वेळेवर कार्यक्रम स्थळी पोहोचलो. लै झ्याकपाक मंडप होता. आसपास सगळी बडी बडी मंडळीच दिसत होती. वातावरण एकदम हायफाय. गुलबपाण्याच्या फवार्‍याचे, लोकांच्या सेंट-अत्तराचे कसले कसले सुगंध सुटले होते त्या वातावरणात. वास्तविक अश्या ठिकाणी माझं मन रमत नाही. परंतु तिथे माझा देव यायचा होता आणि मुख्य म्हणजे तोही तितकाच साधा होता, सादगीभरा होता. जागतिक कीर्तीच्या पं भीमसेन जोशींकरता ही झकपक काही नवीन नव्हती. देश-विदेशात अश्या अनेकानेक धुंद, श्रीमंत, हायफाय वातावरणातल्या मैफली त्यांनी जिंकल्या होत्या. पक्क कळीदार पान आणि काळ्या बारीक तंबाखू-चुन्याचा भक्कम बार भरून जमवलेला पुरिया वातावरणातली ही झकपक केव्हाच पुसटशी करायचा अन् तिथे उरायचा तो फक्त पंढरीनिवासी सख्या पांडुरंगाचा प्रासादिक अविष्कार..! असो.

आणि त्यामुळेच खिशात सेकंडक्लासचं तिकिट असलेला साध्या मळखाऊ शर्टप्यँटीतला मी तिथे बिनधास्तपणे कुठल्याश्या मर्सिडीजला टेकून पान चघळत उभा होतो!

कार्यक्रमाची वेळ झाली तशी तिकिट-पासेस असलेली, झकपक कापडं घातलेली बडी बडी श्रीमंत स्त्रीपुरुष मंडळी फुलांनी सजवलेल्या छानश्या पॅसेजमधून आत जाऊ लागली. माझ्याकडे ना तिकिट, ना पास. म्हणजे अण्णांच्याच भाषेत सांगायचं तर खरं तर मी फ्री पास होल्डरच होतो!

त्यामुळे बॅकष्टेजने कुठे आत घुसता येईल हे पाहायला मी मंडपाच्या मागल्या बाजूस गेलो. तिथे जरा एक साधासुधा दिसणारा भला इसम उभा होता.

"साहेब, हाच रस्ता रंगमंचाच्या मागल्या बाजूस जातो ना? मला अण्णांना भेटायचंय"

"हो. तिथे दारापाशी ते बापट उभे आहेत ना, त्यांना विचारा.."

मी बापटसाहेबांपाशी पोहोचलो. अक्षरश: सुवर्णकांती शोभावी असा लखलखीत गोरा असलेला, उच्च-हुच्च पेहेराव केलेला, सोनेरी काड्यांचा ऐनक लावलेला, तापट चेहेर्‍याचा आणि मुख्य म्हणजे साफ गरगरीत गुळगुळीत टक्कल असलेला बापट तिथे उभा होता. अण्णांचं गाणं राहिलं बाजूला, माझ्यातल्या व्यक्तिचित्रकाराला खरं तर या टकल्या बापटानेच पाहता क्षणी भुरळ घातली होती..!

त्या साध्यासुध्या माणसाकडनं मला हेही कळलं होतं की तो बापट मुंबै विद्यापिठातला कुणी बडा अधिकारी आहे. त्याच्याशी संवाद साधायला काहितरी जुजबी बोलायला पहिजे म्हणून मी सजहच विचारलं,

"नमस्कार. अण्णा आले आहेत ना?" ग्रीनरूममध्ये असतील ना?"

"अहो अण्णा आले आहेत ना म्हणून काय विचारता? आता ५-१० मिनिटात आम्ही कार्यक्रम सुरू करणार आहोत!"

हे बोलताना खेकसणे, भडकणे, ओरडणे, टाकून बोलणे, अपमान करणे, पाणउतारा करणे या सार्‍या क्रिया बापटाने एकदम केल्यान! टकल्या बापट अगदी सह्ही सह्ही माझ्या अपेक्षेप्रमाणेच निपजला. "भाईकाकाकी जय..!' असा माझे व्यक्तिचित्रकार गुरू पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना मी मनातल्या मनात दंडवत केला..!

आता पुढची पायरी होती ती रंगमंचावर ब्यॅकष्टेज प्रवेश मिळवण्याची. आणि गाठ टकल्या बापटाशी होती..!

क्रमश:...

-- तात्या अभ्यंकर.

May 11, 2011

रस्त्यावरचे सस्ते बालगंधर्व...

कालपरवाच जालावर खालील फोटो पाहायला मिळाला आणि माझं मन एकदम काही वर्ष मागे गेलं. एच एम व्ही च्या याच मालिकेतली एक फिरती संगीत थाळी (Record) माझ्याकडे आहे त्याची आठवण झाली.
मुंबैचा चोरबाजार. म्हणजे गोल देउ़ळ, भेंडीबाजारचा भाग. या चोरबाजाराबद्दल पुन्हा केव्हातरी सवडीने आणि डिट्टेलमध्ये. इथे काय काय मिळू शकतं, त्याचे भाव काय असतात, भावाची घासाघीस कशी चालते, अवचित गुंडगिरी-दादागिरी कशी चालते ते सगळं मी अनुभवलं आहे. पण एकुणात चोरबाजारात विंडो शॉपिंग करणं हा खूप इंटरेस्टिंग प्रकार आहे. नानाविध जुन्यापुराण्या वस्तू पाहायला मिळतात आणि मन नॉस्टॅल्जिक होतं. एच एम व्ही च्या जुन्या जुन्या दुर्मिळ संगीतथाळ्या आणि जुने परंतु चांगल्या अवस्थेतले फोनोही इथे पाहायला मिळतात. काही थाळ्या तर बर्‍यापैकी महागड्या मिळतात. खूप भाव करायला लागतो. असो..
असाच एकदा जुन्या वस्तू पहात या चोरबाजारात हिंडत होतो. पावसाळ्याचे दिवस होते. एक स्टँडसारखी मोठीशी छत्री घेऊन पदपथावरच एक माणूस नानाविध जुन्या वस्तू घेऊन विकायला बसला होता. पाऊस होता त्यामुळे जिथे शक्य होतं तिथे त्याने प्लॅस्टिकचं कव्हर आच्छादलं होतं. सहज माझी नजर गेली ती त्याने जी चटई अंथरली होती तिच्या टोकाला असलेल्या, अर्धवट पावसात भिजत असलेल्या ७८ आर पी एम च्या एच एम व्ही च्या एका जुन्या जीर्ण संगीत थाळीकडे. मी सहजच ती थाळी उचलून पाहू लागलो, तिच्यावरची अक्षरं निरखून पाहू लागलो. पुसटशीच अक्षरं होती.
'नाथ हा माझा' - स्वयंवर - यमन - sung by BalGnadharva.
"ही रेकॉर्ड? कितनेको दिया??"
त्या विक्रेत्याने माझ्याकडे दयाबुद्धीने पाहिलं. 'अरेरे, बिच्चारा गरीब दिसतो आहे. पावसात भिजत उभा आहे. काय सांगावी बरं ह्याला किंमत?'
"दो दो, १५-२० रुपीया..!"
थोडक्यात, 'तुझ्याकडे काय असतील ते १५-२० रुपये दे आणि टळ इथून एकदाचा भोसडीच्या' - असाच भाव होता त्याच्या चेहेर्‍यावर..! स्मित
आभाळातून संततधार सुरू होती. आता माझ्याही डोळ्यातून अश्रुधारा वाहण्याच्या बेतात होत्या. खूप भरून आलं. आसपासचं जग आपापल्या उद्योगात मग्न होतं. माझ्या मनात काही विचार आले आणि मी त्या विक्रेत्याकडे पाहिलं. मनातल्या मनात त्याच्याशी संवाद सुरू केला..
'मला भोसडीच्या म्हणतोस काय? अरे, तुला माहित्ये का की तू काय विकतो आहेस? किती मौल्यवान वस्तू तुझ्या पदरी आहे? आणि ती अशी रस्त्यावरच्या पाण्यात तू अर्धवट भिजत्या अवस्थेत विकायला ठेवली आहेस?'
'पण तुझा तरी काय दोष म्हणा? तुझी रोजीरोटी आहे. रस्त्याने येणारे-जाणारेही फोकलीचे कपाळ करंटेच..! या अश्या जुनाट भिजत्या संगीतथाळीकडे कुणीच पाहायला तयार नाही, ना कुणी चौकशी करतोय. त्यापेक्षा समोर हा इसम उभा आहे त्यालाच ही थाळी विकावी. तेवढेच १०-१५ रुपये भेटले तर भेटले..!'
'तुझंही बरोबरच आहे म्हणा..'
मीच काय तो येडाखुळा. भ्रांतचित्त झालो होतो आणि वरील स्वगत बडबडत होतो. प्रत्येकालाच त्या संगीतथाळीविषयी ममत्व हवं असा आग्रह मी तरी का धरावा?
चुपचाप खिशातनं १५ रुपये काढले आणि त्या विक्रेत्याला दिले.
नारायणराव रस्त्यावर भिजत पडले होते. त्यांना स्वच्छ पुसले, आणि छातीशी धरून थोडी उब देत घरी आलो. आजही ती थाळी माझ्यापाशी आहे, परंतु जाहीर फोटो टाकावा अश्या अवस्थेत नाही..!
-- तात्या अभ्यंकर,

May 09, 2011

बालगंधर्व...

नारायणराव बालगंधर्वांची नाटकं जोरात सुरू आहेत. नुकताच एका कर्जाचा डोंगर उतरून कधी नव्हे ते रु ३०००० इतकी रक्कम नारायणरावांच्या सहकार्‍यापाशी शिल्लक आहे. नारायणराव बसले आहेत. त्यांच्या पुढ्यात नानाविध उंची अत्तरं मांडलेली आहेत. नारायणरावांनी नुकतीच अत्तरांची खरेदी आटोपली आहे. माझ्या नाटकाला येणार्‍या रसिकांकरता उंची अत्तर हवंच, हा नारायणरावांचा अट्टाहास आहे. नारायणराव रसिकतेने अत्तराचा सुवास घेत आहेत.

"नारायणराव, आता हे ३०००० रुपये बँकेत जमा करतो.."

"हो, चालेल. एवढं अत्तरांचं बील चुकतं करा आणि उरलेली रक्कम बँकेत टाका.."

"किती झाले अत्तरांचे..?"

"२५०००..!!"

याला म्हणतात रसिकता, याला म्हणतात षौक..!

गडकरी मास्तर तसे जरा आजारीच वाटताहेत. नारायणराव त्यांना भेटायला आले आहेत. "मास्तर, मला एक नाटक द्या.." नारायणरावांच्या चेहेर्‍यावर मास्तरांबद्दलची भक्ति आणि आदर..!
मास्तर म्हणतात, "अहो नारायणराव, द्रौपदी, सुभद्रा, भामिनी या सगळ्या तुमच्या नायिका. भरजरी वस्त्र नेसणार्‍या. माझ्या नाटकाची सिंधू गरीब आहे. चालेल तुम्हाला?"
"मास्तर, तुमच्या नाटक मिळणार असेल तर फाटक्या वस्त्रातली नायिकाही मी करायला तयार आहे. पण मला नाटक द्या."
'ठीक आहे' असं म्हणून गडकरी मास्तर 'एकच प्याला'ची वही नारायणरावांच्या हाती ठेवतात.
एकच प्याल्याच्या तालमी सुरू होतात आणि त्याच वेळेला गडकरी मास्तर गेल्याची बातमी येते. नारायणराव हात जोडत आभाळाकडे पाहात 'मास्तर....!" असा टाहो फोडतात. अक्षरश: गलबलून येतं असं दृष्य.

ऐन प्रयोगाच्या वेळेस स्वत:च्या मुलीच्या निधनाची वार्ता समजूनही 'शो मस्ट गो ऑन..' या न्यायानुसार 'रसिकजनांच्या सेवेत जराही कुचराई होणे नाही..' असं म्हणत रंगमंचावर 'नाही मी बोलत..' हे पद लडिवाळपणे रंगवणारे नारायणराव बालगंधर्व आणि सुबोध भावेचा त्यावेळचा अप्रतिम अभिनय..!

रंगमंचावर 'रवी मी..' रंगलं आहे. संगीतसूर्य केशवराव भोसल्यांच्या भूमिकेत असलेला वसंतरावांचा नातू राहूल देशपांडे मस्त झुपकेदार मिश्या, फेटा वगैरे बांधून धैर्यधर झाला आहे. रंगमंचावर त्याच्यासोबत साक्षात नारायणराव बालगंधर्वांची भमिनी उभी आहे. संयुक्त मानापमानाचा प्रयोग सुरू आहे. राहूल 'रवी मी' त मस्त फिरतो आहे. श्रोत्यांमधून मनमुराद दाद येते आहे. 'खर्चाची पर्वा नाही, रसिकांकरता जे जे उत्तम, उदात्त, उच्च असेल तेच मी देईन..' या सततच्या ध्यासापायी आमचे नारायणराव नेहमी कर्जात बुडालेले. संयुक्त मानापमानाच्या प्रयोगामुळे बर्‍यापैकी रक्कम जमते. पण स्वत:च्या कर्जाची पर्वा न करता नारायणराव ती रक्कम टिळकांच्या स्वराज्य फंडाला देतात. पण उदार, उमद्या मनाचे केशवराव नारायणरावांना म्हणतात, "तुम्ही काळजी कशाला करता? मी आहे तुमच्यासोबत. आपण अजून प्रयोग करू आणि तुमचं कर्ज फेडू!" पण नारायणराव बालगंधर्व या शापित यक्षाच्या नशीबी काही वेगळंच. हे सगळं ठरतं आणि खुद्द केशवराव भोसलेच निवर्ततात...!

बोलपटाचा जमाना येतो आणि नाटकधंदा मागे पडतो. मराठी रसिकांच्या पदरात अलौकिकतेचं, संपन्नतेचं, समृद्धीचं, श्रीमंतीचं दान टाकणार्‍या, एका जमान्यात उत्तुंग वैभवाचे दिवस पाहिलेल्या नारायणराव बालगंधर्व या शापित यक्षाच्या आयुष्याला उतरती कळा लागते. महाराष्ट्र वाल्मिकी गदिमांचं एक वचन आहे - 'जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे..' तेच खरं..!

... आणि अखेरीस वार्धक्याने झुकलेले, थकलेले, खचलेले, किंचित लंगडणारे बालगंधर्व मावळत्या सूर्याला नमस्कार करताहेत आणि पडदा पडतो. नो रिग्रेटस्!

जा बाई नियती, तुला माफ केलं मी..!

मंडळी, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'बालगंधर्व' या सिनेमाबद्दल मी काय अन् किती बोलू? शुक्रवार ६ मे, २०११ या दिवशी मराठी रजतपटाच्या पत्रिकेत उच्चीचे सारे ग्रह एकवटले आणि नितीन देसाई कृत बालगंधर्व हा चित्रपट प्रदर्शित झाला...!

नितीन देसाईने हे अवघड, अजोड शिवधनुष्य फार सुरेखरित्या पेललं आहे. अक्षरश: भव्यदिव्य, आभाळाएवढं मोठं काम नितीनने आणि त्याच्या सार्‍या टीमने केलं आहे. नितीन देसाई हा स्वत: एक उच्च दर्जाचा कलादिगदर्शक. त्यामुळे जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते सारं काही आपल्या चित्रपटात हवंच हा नितीनचा अट्टाहास, हे वेड. परंतु या वेडापायीच 'बालगंधर्व' हा उच्च दर्जाचा चित्रपट निर्माण होतो. चित्रपटातील बालगंधर्वांच्या उंची, भरजरी पैठण्या, दागदागिने, केशभूषा, वेशभूषा हे सगळं अतिशय नेत्रसुखद! चित्रपटात दाखवल्या गेलेल्या गंधर्व नाटक मंडळींच्या त्या रोजच्या शे- दिडशे माणसांच्या चांदीच्या ताटातल्या त्या जिलबीयुक्त जेवणावळी..! काय सांगू? किती बोलू..?

दिगदर्शक रवी जाधव, पटकथा संवादकार अभिराम भडकमकर, महेश लिमयेची अप्रतीम सिनेमॅटोग्राफी, चित्रपटातले सारे कलाकार. खूप खूप मेहनत घेतली आहे या सगळ्यांनी.

चित्रपटात जरी नारायणरावांचीच जुनी पदं घेतली असली तरी त्याचं उत्तम संगीत संयोजन कौशलने केलं आहे आणि या कामात त्याला मोलाची मदत झाली आहे या चित्रपटाचा सह-संगीत संयोजक आदित्य ओक याची. डॉ विद्याधर ओक यांच्या घरात अभिजात शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीत याचीच पूजा केली जाते त्यामुळे आदित्य या त्यांच्या चिरंजिवाकडे ही परंपरा चालतच आलेली. अगदी पदं निवडण्यापासून ते ऑर्गनची साथसंगत करण्यापर्यंत आदित्यने या चित्रपटाकरता परिश्रम घेतले आहेत..!

नारायणरावांच्या पदांव्यतिरिक्त कौशलची स्वत:चीही तीन गाणी या चित्रपटात आहेत तीही सुंदर. खास करून 'परवर दिगार..' ही प्रार्थना. 'नाथ हा माझा..' हे पद आणि बालगंधर्व हे समानार्थी शब्द आहेत. अभिजात संगीतातली आजची आघाडीची तरूण गायिका वरदा गोडबोलेने हे पद फार सुरेख गायले आहे. सुरेल आवाज आणि सुंदर तान ही वरदाची खासियत..! बेला शेंडेही नेहमीप्रमाणे छानच गायली आहे. खूप गुणी मुलगी आहे ती.

आनंद भाटे! सॉरी, आनंद भाटे नव्हे, आनंद गंधर्वच तो..! नारायणरावांची पदं गाणं हे या चित्रपटातलं सर्वात मोठं आव्हान. आणि तेच आनंदने लीलया पेलंलं आहे. या मुलाच्या गळ्यातून नारायणराव खूप छान उतरतात. सुरेल, भावपूर्ण, लडिवाळ गायकी असलेला आनंद..!

आनंदा, जियो रे...!

आणि सुबोध भावे? हे माझ्या महाराष्ट्रातल्या आया-बहिणींनो, दृष्ट काढा रे त्या पोराची..! नारायणराव बालगंधर्वांच्या स्त्री वेषातला, भरजरी पैठणी नेसलेला, सुरेख, सुंदर, अप्रतिम, देखणा असा सुबोध भावे..! सुबोधच्या रंगमंचावरील सिंधू, द्रौपदी, भामिनी, सुभद्रा एकापेक्षा एक देखण्या जमल्या आहेत..!



बाबारे नितीन देसाई, अरे तू किती मोठं काम केलं आहेस हे तुझं तुला तरी महित्ये का रे? नारायण श्रीपाद राजहंस, अर्थात साक्षात बालगंधर्व आणि त्या निमित्ताने मराठी संगीत, मराठी कला, वैभवशाली असलेली मराठी संगीत रंगभूमी, मराठी माणसाची कला आणि त्याची कलासक्ति याची समर्थ ओळख तू आजच्या तरूण पिढीला करून दिलेली आहेसच, परंतु केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर सार्‍या जगालाही करून दिली आहेस..! मराठी रजतपटाची मान तू सार्‍या जगतात उंचावली आहेस. खूप धन्य वाटलं रे तुझा हा चित्रपट पाहून...!



चटकाच लावून जातात बालगंधर्व. स्वयंवरात 'दादा ते आले ना..? अशी एन्ट्री घेत जगाला 'नाथ हा माझा'चं स्वरामृत भरभरून पाजणार्‍या नारायणराव बालगंधर्वांना अखेरीस रंगमंचावर संवाद म्हणताना ठसका लागतो आणि त्यांची तोंडातली कवळी खाली पडते. आणि तेव्हाचा सुबोध भावेचा तो चेहेरा..! अपमानीत, खिन्न, रडवेला..!

कोण आहे ही नियती? काय आहे तिचा न्याय? माहीत नाही..! तुमच्याआमच्या पदरी शेवटी उरतं ते फक्त यमनातलं 'नाथ हा माझा..' आणि तेच अमृत आहे, तेच अक्षय आहे, तेच चिरंतन आहे..!

-- तात्या अभ्यंकर.