October 31, 2010

रैना बिती जाए..


राग तोडी..! हिंदुस्थानी रागसंगीतातला एक दिग्गज राग. ज्याला तोड नाही असा तोडी..!

सुरवातीलाच सारंगी. भाईकाकांच्या भैय्या नागपुरकराच्या भाषेत सांगायचं तर 'कलिजा खल्लास करणारी जीवघेणी सारंगी..!' 'नी़ नी़सा सा..' ने संपणारा दीदीचा केवळ अशक्य आलाप - तकदीरचा मारा असलेल्या कुणा आनंदबाबूला घायाळ करतो अन् त्याचे पाय थबकतात..! सुरांचा तो प्यासा त्या तोडीच्या झर्‍याच्या शोधात माडी चढतो..!
 
'रैना बिती जाए..!' - पंचमदांची अद्भूत प्रतिभा अन् दीदीचा स्वर.. हिंदुस्थानी सिनेसंगीतातलं एक माईलस्टोन गाणं जन्म घेत असतं..! 

संतूर, गिटार, आणि केहेरव्याचा वजनी ठेका.. सारंच भन्नाट..!

'निंदीया ना आए..' - तोडीच्या स्वरात संपूर्णत: वर्ज्य असणारे, विसंगत वाटणारे शुद्ध मध्यम, शुद्ध धैवत फक्त पंचमच टाकू शकतो. अन्य कुणाची ना तेवढी हिंमत, ना तेवढी प्रतिभा. खूप खूप मोठा माणूस..!

दुर्दैवाने घरात सुख न लाभलेला आमिरजादा आनंदबाबू आणि सुरांची मलिका असलेली त्याची पुष्पा..! 'आय हेट टियर्स, पुष्पा..!' असं म्हणणारा आनंदबाबू. शारिरीक वासनेचा नव्हे तर पुष्पाच्या स्वरांचा भुकेला, तिला प्रेमाने हलवा-पुरीची फर्माईश करणारा आनंदबाबू..! कोठेवालीचा व्यवसाय करणारी पुष्पा - जिच्या घरात नेहमी पूजा-फुलांनी मढलेला देव्हारा अन् सोबतीला रामकृष्ण परमहंसांची तसबीर..!

शब्दांचं प्रेम, स्वरांचं प्रेम, अमरप्रेम..! काय चूक, काय बरोबर हे ज्यानं-त्यानं ठरवू देत.. आमचा मात्र सलाम त्या दीदीला, त्या पंचमला, त्या आनंदबाबूला अन् शर्मिला टागोर नामक त्या पुष्पा कोठेवालीला..!

-- तात्या अभ्यंकर.

October 26, 2010

केनू संग खेलू होली..


केनू संग खेलू होली.. (येथे ऐका)

यमनचे स्वर, दीदीचा शांत स्वर. यमनच्या अनेक रुपांपैकी हे एक आगळं रूप.

राग यमन..! सार्‍या विश्वाला कवेत घेणारा, एकत्र बांधणारा..

राग यमन..! आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातलं एक अजब रसायन.. ज्याचा ठाव, आदी-अंत कुणालाही कधीही लागला नाही आणि लागणार नाही असा राग..!

राग यमन..! आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातली सार्‍या जगाला दिलेली एक अनमोल देणगी..

राग यमन..! केवळ शब्दातीत..!

'केनू संग खेलू होली
पिया त्यज गये है अकेली..!'

'त्यज गये है अकेली..' या शब्दांमधला भाव केवळ अनुभवा.. त्यातल्या शुद्ध गंधाराला, तीव्र मध्यमाला मुजरा करा..!

'भोजन भवन भलो नही लागे
पिया कारन भयी रे अकेली
मुझे दुरी क्यो मिली?'

गायकी, गायकी म्हणतात ती हीच..! शब्द, स्वर, भाव.. हे सारं शब्दातीतच, परंतु या ओळी, दीदीची गायकी, यमनचे स्वर हे अजूनही खूप काही सांगून जातात.. आपण त्यातलं देवत्व शब्दात नाही पकडू शकत.. हे फक्त अनुभवायचं.. ज्याने, त्याने..!

दोन कडव्यांमधली सतार फक्त वाजत नाही, ती यमन गाते..!

आपल्या सर्वांना हात जोडून वारंवार फक्त एकच विनंती.. यमनची भक्ति करा, साधना करा, उपासना करा.. यमनवर भरभरून प्रेम करा..!

सुखदु:खात आयुष्यभर जो साथ करतो तो फक्त यमन..! यमनसारखा अन्य सखा नाही, सुहृद नाही..!

'मीरा को प्रभू दरसन दिजो
मै तो जनम जनम की चेली
दरस बिना खडी दुहेली...'

'प़सासासां' या स्वरात जुळलेल्या तानपुर्‍यातून नैसर्गिक गंधार ऐकू येतो..

ज्या दिनानाथ मंगेशकरांनी आपल्या लेकीकरता कल्पवृक्ष लावला त्याच दिनानाथरावांच्या थोरलीच्या गळ्यात हा गंधार वस्ती करून आहे..!

मानाचा मुजरा त्या शुद्ध गंधाराला..!

-- तात्या अभ्यंकर.

October 13, 2010

अभंगवाणीची बिदागी - मुगाची उसळ अन् चपाती..!

राम राम मडळी,

'कलाश्री' बंगला, नवी पेठ, पुणे ही आमची पंढरी आणि स्वरभास्कर पं भीमसेन जोशी, अर्थात आमचे अण्णा हे त्या पंढरीतले विठोबा... आजवर अनेक वर्ष, अनेकदा त्या वास्तूत गेलो. अण्णांशी अनेकदा संवाद साधता आला. त्यांचा सहवास लाभला. अगदी त्यांच्या घरी बसून त्यांचं गाणं ऐकता आलं, चार गोष्टी शिकायला मिळाल्या. वत्सलाकाकूही तेव्हा हयात होत्या. त्यामुळे कधी शहापुरी कुंदा तर कधी थालिपिठासारखा कानडी पदार्थही हातावर पडायचा...
Smile
अण्णांची लेक शुभदा, मुलगा श्रीनिवास हेही आपुलकीने स्वागत करायचे. मी एकदोनदा खुलासा करण्याचा प्रयत्न केला परंतु 'ठाण्याचे अभ्यंकर' हे मुंबैच्या हायकोडतात वकील आहेत ही अण्णांची समजूत आजही कायम आहे!Smile

गेल्या बरेच दिवसात अण्णांकडे फारसे जाणे झाले नाही. काही वेळा सवड होती परंतु मुद्दामच गेलो नाही.. कारण म्हणजे अण्णा अलिकडे वरचेवर आजारी असतात. प्रकृती बर्‍याचदा खालावलेली असते. गात्र थकली आहेत. वयोमानही आहे त्यामु़ळे खरे तर एक सारखे कुणी ना कुणी भेटायला येणार्‍यांचा त्यांना आताशा उगाचंच त्रास होतो. हेच जाणून पुण्याच्या फेरीत मीही त्यांच्याकडे जाण्याचं टाळतो. त्यांना त्रास होऊ नये, आराम करू द्यावा इतकाच हेतू..

परंतु साधारण महिन्याभरापूर्वी एकदा अगदीच राहावले नाही म्हणून मुद्दाम त्यांच्या घरी गेलो होतो. अगदी दोनच मिनिटं त्यांच्यापाशी बसायचं आणि पाया पडून निघायचं इतकंच ठरवलं होतं..काका हलवायाकडची त्यांची आवडती साजूक तुपातली जिलेबी सोबत घेतली आणि त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या नातीनं मला आतल्या खोलीत नेलं. अण्णा खाटेवर पडूनच होते. निजलेल्या माणसाला नमस्कार करू नये म्हणतात. मी नुसताच त्यांच्या उशापाशी बसलो. त्यांना आताशा फारसं बोलवतही नाही..मी त्यांचा हात हातात घेतला, हलकेच दाबला.

"अण्णा, थोडी जिलेबी आणल्ये आपल्याकरता. कशी आहे तब्येत? काळजी घ्या.."

अण्णांनी डोळ्यातूनच ओळख दिली.. माझ्या डोळ्यासमोर सवाईगंधर्वात शेवटच्या दिवशी सकाळी ५-१० हजार श्रोत्यांसमोर, मागे विलक्षण सुरेल झंकारणारे चार तानपुरे घेऊन मंत्रमुग्ध करणारा तोडी गाणारे भीमसेन दिसू लागले आणि अगदी भरून आलं..! तिथे अधिक काळ बसवेना. शिवाय तिथे बसून अण्णांनाही उगाच त्रास देणं उचित नव्हतं..पुन्हा एकदा त्यांचा हात हातात घेतला, थोडे खांद्याचे बावळे दाबून दिले, पाउलं चेपून दिली. खूप कृतकृत्य वाटलं, समाधानी वाटलं आणि मी त्यांचा निरोप घेतला.

त्यांच्या बंगल्यातून बाहेर पडत होतो तोच दुसरे एक सत्तरीच्याही पुढे वटणारे गृहस्थ आत येत होते.. त्यांचा चेहेरा चांगला ओळखीचा वाटत होता..त्यांनी मला हसून ओळख दिली व ते आतमध्ये गेले.

'कोण हे गृहस्थ?!'

मला चटकन ओळख लागेना, नाव आठवेना. एक नक्की आठवत होतं, हे गृहस्थ अण्णांच्या अगदी घरोब्यातले आणि त्यांच्या गाण्याचे प्रेमी..त्यांच्याच गावाकडचे. अण्णांच्या बैठकीत अनेकदा भेटलेले.. मुंबैत अण्णांचं कुठेही गाणं असलं की गाण्याआधी ग्रीनरूममध्ये आम्ही ठराविक डोकी नेहमी भेटत असू..अगदी न चुकता. इतकी की अण्णांच्या एका मैफलीकरता मी थोडा उशिराने ग्रीनरूममध्ये पोहोचलो तेव्हा मला पाहून पेटीवाले तुळशीदास बोरकर थट्टेनं म्हणाले होते, "चला, तुम्ही आलेत. आता कोरम पुरा झाला!" Smile
मग ग्रीनरूममधलं गाण्यापूर्वीचे ते धीरगंभीर अण्णा. "नानजीभाई, पान जमवा पाहू.." असं नाना मुळेंना म्हणणार. तानपुरे लागत असणार. "हम्म.. पटकन जुळवा तानपुरे. छान जुळवा.." असं अण्णा म्हणणार. मग कधीमधी मीही घाबरत घाबरत त्या तानपुर्‍यांचे कान पिळायचा.. मग मी लावलेल्या तानपुर्‍याकडे नीट कान देउन अण्णा त्यात सुधारणा सुचवणार.. "हम्म.. खर्ज बघा जरा.. त्याची जवार का बोलत नाही नीट?!"

खूप आठवणी आहेत त्या मैफलींच्या..! असो.. विषयांतराबद्दल क्षमस्व..

तर 'आता भेटलेले हे गृहस्थ कोण?' असा विचार करताच थोड्याच वेळात आमची बत्ती पेटली. अरे हे तर कानडी मुलुखातलेच कुणीसे आप्पा..रामण्णाच्या परिवारातले..!

रामण्णा..! कोण बरं हे रामण्णा?

आणि क्षणात माझं मन १९८० च्या दशकात घडलेल्या एका प्रसंगाशी येऊन थांबलं..हा प्रसंग मला थोर व्याख्याते व माझे ज्येष्ठ स्नेही स्व. वसंत पोद्दारांनी सांगितला होता..

अण्णा तेव्हा सार्‍या भारतभर दौरे करत होते, गाणी करत होते. त्यांची ड्रायव्हिंगची आवड तर प्रसिद्धच आहे. तबले, तानपुरे घेऊन साथीदारांसह स्वत:च मैलोनमैल गाडी चालवायचे. गुलबर्ग्यात कुठंतरी त्यांचं गाणं होतं. ते आटपून अण्णांची गाडी परतीच्या प्रवासात होती. वेळ असेल रात्री दोनची वगैरे. गाडी चालवता चालवता अण्णांनी मुख्य रस्ता सोडला आणि एका आडगावाच्या वाटेला लागले. लौकरच ते एका गावात शिरले. साथिदारांना कळेचना..!

"आमचे एक गुरुजी येथून जवळच राहतात. आता अनायसे या वाटेनं चाललोच आहोत तर त्यांना भेटूया..!"

साथिदारांना पुन्हा काही पत्ता लागेना. गावात सामसूम. थोड्या वेळाने एक अंधार्‍या खोपटापुढे अण्णांची गाडी उभी राहिली.. मंडळी गाडीतून उतरली. अण्णांनी खोपट ठोठावलं..कुणा एका वयस्क बाईनं दार उघडलं.. चिमणी मोठी केली. त्या खोपटात एका खाटेवर एक वयस्कर गृहस्थ पहुडला होता. तोच रामण्णा..! अण्णा त्याच्यापाशी गेले.. त्याला हात देऊन बसता केला.. 'काय, कसं काय? ओळखलं का? बर्‍याच दिवसांनी आलो, अलिकडे वेळच मिळत नाही..' असा त्याला कानडीतनं खुलासा केला.. मग रामण्णाही ओळखीचं हसला..जरा वेळाने अण्णांनी अक्षरश: त्याच्या पायावर डोकं ठेऊन त्याला नमस्कार केला अन् खिशातलं २०-२५ हजारांचं बिदागीचं पाकिट त्याच्या हातात दिलं.. आणि त्याचा निरोप घेतला..

साथिदार मंडळींना हा प्रकार काय, हेच कळेना तेव्हा अण्णांनीच खुलासा केला -

"येथून जवळच्याच एका रेल्वे स्थानकात (होटगीच्या आसपासचं) मी तेव्हा बेवार्शी राहायचा. सायडिंगला जे डबे लागत त्यातच झोपत असे. तेथेच रेल्वेच्या थंड पाण्याने अंघोळ आदी आन्हिकं उरकायचो. खिशात दमडा नव्हता. घरातनं पळालो होतो. कानडीशिवाय अन्य कोणतीही भाषा येत नव्हती. भिकारी अवस्थाच होती. स्टेशनच्या बाहेरच तेव्हा हा रामण्णा त्याची हातगाडी लावत असे. मुगाची पात्तळ उसळ अन् चपात्या असं विकत असे. मस्त वास यायचा त्याच्या गाडीभोवती. मी तिथेच घुटमळायचा.. आमची ओळख झाली. गदगच्या जोशी मास्तरांचा मुलगा. गाणं शिकायचं आहे.. इतपत जुजबी ओळख दिली त्याला. तसा अशिक्षितच होता तो.."

"उसळ-चपाती पाहिजे काय?" असं मला तो विचारायचा. माझ्या खिशात दमडा नव्हता.

"तुला गाणं येतं ना? मग मला म्हणून दाखव. तरच मी तुला खायला देईन. फुकट नाही देणार..!"

"घरी माझी आई जी काही कानडी भजनं अभंग गायची तेवढीच मला येत होती. रामण्णाला दोन भजनं म्हणून दाखवली की तो मला पोटभर खायला द्यायचा..!"

"जो पर्यंत त्या स्टेशनात मुक्काम ठोकून होतो तो पर्यंत मला रामण्णा खायला द्यायचा. पण फुकट कधीही नाही. जेवायला पाहिजे ना? मग गाऊन दाखव बघू काही! तुला गाणं येतं ना? मग कशाला उगाच चिंता करतोस पोटाची?!"




गाडी पुन्हा भरधाव परतीच्या वाटेवर लागली होती.. साथिदार मंडळी गप्प होती.. धीरगंभीर चेहेर्‍याचे स्वरभास्कर गाडी चालवत होते..

रामण्णाच्या खोपटात भविष्यातला भारतरत्न येऊन मुगाची उसळ आणि चपातीच्या खाल्ल्या अन्नाला नमस्कार करून गेला होता..!

-- तात्या अभ्यंकर.

October 04, 2010

झुणकाभाकरीची गोडी अन् वेडा कुंभार..

विठ्ठला तू वेडा कुंभार..(येथे ऐका)

वीर सावरकर चित्रपटाच्या निर्मितीचे दिवस होते. दादरला सेनाभवनाच्या अलिकडची गल्ली. तिथे रामचंद्र निवास ही इमारत आहे. तिच्या तिसर्‍या मजल्यावरती बाबूजींनी या चित्रपटाचे कार्यालय थाटले होते. मी अधनंमधनं तिथे दबकत जायचा.. आणि कधी कुठले कागदपत्र फाईल करून ठेव, एखादं बाड इकडून तिकडे पोचव, बँकेची कामं कर, बाबूजींकरता ठाण्याच्या भगवंतराव पटवर्धनांकडे काही काम असेल तर ते कर, अशी बाबूजी सांगतील ती फुटकळ कामं चुपचाप करायचा..कधीमधी उगाचंच त्या कार्याकयात बसून राहायचा.. मग बाबूजीच केव्हा तरी माझ्याकरता चहा मागवायचे.. कधी शांत असत, कधी कुणावर तरी भडकलेले असत, तर कधी कुठल्या विचारात असत..

अशीच एक टळटळीत दुपार.. तेथून जवळच एल जे रस्त्यावर नाना मयेकर नावाचा माझा मित्र राहायचा.. त्याच्याकडे काही कामानिमित्त गेलो होतो. त्याच्या आईनं फक्कडशी झुणकाभाकर केली होती. ती मला वाढू लागली. मी विचारलं, 'बांधून देता का? बाबूजींकडे जायचंय. तिथे खाईन व त्यांनाही देईन." त्या माउलीनं आनंदाने चार भाकर्‍या, लोणी, खर्डा आणि झुणका मला बांधून दिला. मी ती अमृततूल्य शिदोरी घेऊन सावरकर न्यासाच्या कार्यालयात पोहोचलो.

"अरे ये, तुझीच वाट पाहात होतो.."

कुठनंतरी काही कामाचे पेपर्स यायचे होते आणि ते बाड मला बाबूजी देणार होते. ते ठाण्याला भगवंतरावांकडे पोहोचवायचं होतं..

"थोडं जेवायचं आणलं आहे.. आपण जेऊया का?"

झुणकाभाकर पाहताच बाबूजी मनोमन सुखावले.. कार्यालयात आम्ही दोघंच होतो.

"अरे काय योग बघ, कालच मी थोडा वाळा आणून त्या मडक्यात ठेवला आहे.. आता झुणकाभाकर खाऊ अन् वाळ्याचं गार पाणी पिऊ.."

आम्ही तो भाकरतुकडा खाल्ला.. "कुठून आणलास रे? कोण या सुगरण बाई?" बाबूजींनी मनापासून दाद दिली..

आणि अचानक त्या दुपारी माझं भाग्य उजळलं..

'फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला तू वेडा कुंभार..'

जेवणानंतर बाबूजी खुर्चीत बसल्याबसल्या सहजच गुणगुणू लागले.. ! मी त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसलो होतो ते मला प्रशस्त वाटेना. मी उठून त्यांच्या पायाशी बसलो..



"फिरत्या, चाका.. आकारान्त शब्द आहेत. तो आकार स्वच्छ आला पाहिजे, निकोप पाहिजे. नारायणराव बालगंधर्वांच्या तोंडून कधी 'विठ्ठल' हा शब्द ऐकला आहेस का? ठ ला ठ असला तरी त्यात मार्दव हवं, ममत्व हवं.."

बाबूजी बोलत होते.. मी ते ऐकत होतो, शिकत होतो.. गाण्याच्या कुठल्याही क्लासात न शिकवली जाणारी अनमोल शिकवणी माझ्या पदरात पडू लागली..!

"वेडा कुंभार..!" हे शब्द म्हणताना त्यात प्रेम हवं, भक्ति हवी.. अगदी हळवेपणे म्हटले पाहिजेत हे शब्द.. बर्र का!"

'तूच मिसळसी सर्व पसारा..'

"हे गाताना आपण एखाद्या सख्याशी, सुहृदाशी जसं सहजच परंतु आपुलकीनं बोलतो ना, ते भाव आले पाहिजेत.. अरे तू विठ्ठलाशी बोलतो आहेस, त्याच्याशी संवाद साधतो आहेस असं वाटलं पाहिजे ना त्याला? तुझी हाक त्याच्यापर्यंत पोचायला तर हवी!"

"काय म्हमईवाले, कळतंय का आम्ही काय म्हणतोय ते?!" Smile

'तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार..'

"अण्णाची आठवण येते रे.. इतकं सुरेख आणि एकटाकी लिहायचा..!"



बाबूजी अचानक हळवे झाले.. ज्यांच्यासोबत अर्धाअधिक काळ केवळ भांडण्यातच गेला होता, त्या अण्णा माडगुळकरांच्या आठवणीनं त्या सावरकरभक्ताला अचानक भरून आलं.. मंडळी, मी साक्षिदार आहे या घटनेचा!

"आणि बर्र का, 'नसे अंत, ना पार..' ची तान अगदी छान गेली पाहिजे बर्र का. तिथं घसरून पडता उपेगाचं न्हाई!" Smile

बाबूजी मुडात असले म्हणजे मधुनच कलापुरी शब्द वापरायचे! Smile

'घटाघटाचे रूप आगळे,
प्रत्येकाचे दैव वेगळे.."

"एकेक स्वर तोलूनमापून लावायला हवा..तसा तो लागायला हवा. तसा मी प्रयत्न केला आहे.."!

'प्रत्येकाचे' चा उच्चार प्रत्त्येकाचे..' असाच आला पाहिजे.. तो शब्द फ्लॅट लागता कामा नये.. 'दैव' शब्दाचा उच्चारदेखील अगदी वळणदार हवा..!"

'मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार..'

"आता हेच बघ रे म्हमईवाल्या.. मला काय म्हाईत की तू भाकरतुकडा आणशील अन् माझ्या तोंडात लोणी पडेल?! पण आत्ता या क्षणी अशी किती माणसं आहेत की त्यांच्या मुखी हे लोणी नाही..आहे तो फक्त अंगार..! खरं सांग, आहे की नाही?!"

गाणं म्हणजे काय. ते शिकणं म्हणजे काय, हे मला कळत होतं..!

गाण्यातले भाव, शब्दोच्चार, स्वर लावण्याची पद्धत, बालगंधर्व, हिराबाई... अनेक विषयावर ते बोलत होते, मी ऐकत होतो, शिकत होतो..

अजूनही शिकतोच आहे.. कारण बाबूजींचं प्रत्येक गाणं हे त्या पांडुरंगाच्या घटांप्रमाणेच आहे.. ज्याच्या उतरंडीला अंत नाही, ना पार..!


आपण आपलं शिकत रहायचं, ऐकत रहायचं..!

त्यातलीच थोडीशी झुणकाभाकर घेऊन मी ती ललीमावशीला नेऊन दिली. तिथून जवळंच घर होतं बाबूजींचं.. विठ्ठलाकडची शिकवणी संपली होती.. झुणकाभाकर घेऊन रखुमाईकडं चाललो होतो..!

-- तात्या अभ्यंकर.

October 03, 2010

लाभले आम्हास भाग्य..

'लाभले आम्हास भाग्य.. '
भटसाहेबांच्या सिद्ध लेखणीतून उतरलेलं, अभिमानानं उर भरून यावा असं मायमराठीचं यथार्थ गुणगान करणारं हे काव्य आणि कौशल इनामदारचं संगीत असलेलं हे समूहगीत.. कौशलच्या हातून घडलेलं एक खूप चांगलं काम, मोठं काम! उत्तम हार्मोनियम वादक आदित्य ओक हा आम्हा दोघांचा कॉमन मित्र.. काही वर्षांपूर्वी एकदा आदित्यच्या घरी कौशल आला होता तेव्हा मलाही जेवायचं आमंत्रण होतं.. मला आठवतंय, जेवणानंतर हार्मोनियम पुढ्यात घेऊन कौशलने अगदी हौशीहौशीने त्याच्या डोक्यात घोळत असलेल्या अनेक चाली मला ऐकवल्या होत्या. तेव्हाही मला त्या वेगळ्या वाटल्या होत्या, कल्पक वाटल्या होत्या..

काहीच दिसांपूर्वी कौशलने बांधलेलं हे समूहगीत कानी पडलं आणि श्रवणसुख लाभलं..कौशलने अनेक गायक-गायिकांकडून गाऊन घेऊन या काव्याची एकेक ओळ गुंफली आहे हे नक्कीच खूप कल्पक आहे.. प्रत्येक गायक-गायिकेची आवाजाची जात वेगळी, शब्दस्वरांचा अंदाज वेगळा, शब्द - आवाज टाकण्याची, गाण्याची पद्धत वेगळी.. परंतु असं असलं तरी गाण्याचा भाव एकच.. हा भाव अर्थातच मायमराठीच्या प्रेमाचा, अभिमानाचा, आणि गौरवाचा!.. आणि त्यामुळेच ही गुंफण विशेष सुरेख झाली आहे, कौतुकास्पद झाली आहे..

या समुहगीताचा अजून एक विशेष असा की या गुंफणीतले काही काही गायक मला व्यक्तिश: आवडत नाहीत, तरीही त्यामुळे गाण्याच्या सौंदर्यावर त्याचा खटकण्याजोगा असा काहीच परिणाम जाणवत नाही.. कारण एक तर प्रत्येकाला एकच ओळ गायची आहे आणि कौशलने लावलेली मूळ चाल खूप छान असल्यामुळे माझे काही नावडते गायकदेखील अगदी सहज खपून गेले आहेत.. Smile

प्रत्येकाच्या आवाजाची जात ओळखून, त्याची गायकी ओळखून त्याप्रमाणे कौशलने प्रत्येकाकडून गाऊन घेतलं आहे, हेही विशेष..

या लेखाच्या निमित्तानं मला या गाण्यातलं काय काय आवडलं हे सांगण्याचा एक प्रयत्न..त्याचप्रमाणे यातील गायकांवर माझी काही मतंही नोंदवण्याची संधी मी या निमित्ताने साधणार आहे..
-----------------------------------------------------------------------------------------
लाभले आम्हास भाग्य.. (येथे ऐका)

'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' - रविंद्र साठे आणि अश्विनी भिडे -देशपांडे.

रविंद्र साठे. 'अत्यंत गुणी' या एकाच शब्दात ज्याचं वर्णन करता येईल असा गायक. साठेसाहेबांचा बेसचा आणि मुळातलाच गोडवा असलेला आवाज..स्पष्ट शब्दोच्चार - 'बोलतो मराठी..'तला गंधार छान लागला आहे साठेबुवांचा.
अश्विनी भिडे -देशपांडे. जयपूर गायकीची तालीम मिळालेली गुणी गयिका. आवाजाची जात हळवी.. एरवी या गायिकेकडून ख्यालगायकीतलं हिंदीच अधिक कानावर पडलं आहे त्या पार्श्वभूमीवर तिचे मराठीतले बोल ऐकायला खूप छान वाटतात.. 'बोलतो' तल्या 'तो' वरची लहानशी हरकतवजा तान छान..

'जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..' - सुरेश वाडकर.

सुरेशबाप्पांबद्दल मी काय बोलणार? जादुई, सुरीला आवाज..! मोठा माणूस..!

'धर्म पंथ जात एक जाणतो मराठी' - पद्मजा फेणाणी जोगळेकर - नो कॉमेन्टस्! विशेष काही न गाता उगाचंच मोठी झालेली एक गायिका..!

'एवढ्या जगात माय मानतो मराठी..' - हरिहरन.

सुरवातीलाच _/\_ अशी खुण करतो.. गझलगायकीच्या दुनियेतला अत्यंत सुरीला, रसिला गवई. तलम, जादुई आवाज. खूप कष्टानं स्वत:चं गाणं सिद्ध केलेला.. 'जगात' आणि 'मानतो' शब्दांवरील जागा खासच. अगदी हरिहरन ष्टाईल!

'बोलतो मराठी, ऐकतो मराठी..' - आरती अंकलीकर टिकेकर.

'नो कॉमेन्टस्' असं म्हणणार नाही. मूळची खूप गुणी गायिका. ख्यालगायकीची उत्तम तालीम घेतलेली. पूर्वी गायचीही छान. परंतु नंतर नंतर हिचं गाणं बिघडलं.. गाण्यात रुक्षपणा येऊ लागला. काही वेळेला शब्दोच्चारांमध्ये विनाकारणच लाडिकपणा येऊ लागला. अर्थात, ही माझी व्यतिगत मतं..

'जाणतो मराठी, मानतो मराठी..' - सत्यशील देशपांडे. - नो कॉमेन्टस्. हे कुमारांचे शागीर्द आहेत असं ऐकून आहे. असतीलही! एक मात्र खरं की कुमारांचं गाणं जरी यांच्याकडे नसलं तरी त्यांचं पुष्कळसं ध्वनिमुद्रण मात्र त्यांच्या संग्रही आहे! Smile

'आमुच्या मनामनात दंगते मराठी..' - श्रीधर फडके.

आम्ही काय बोलणार? आमच्या गुरुजींचे आणि ललीमावशीचे चिरंजिव! परंतु अत्यंत गुणी. यांनी बांधलेल्या काही काही चाली छानच आहेत..

'आमुच्या रगारगात रंगते मराठी..' - साधना सरगम.

एक गुणी गायिका. अनेक वर्ष गाते आहे, चांगलं गाते. परंतु अजून स्वत:ची अशी काही खास ओळख नाही.. गुणी असूनही अमूक आवाज म्हणजे साधनाचा आवाज, अमूक गाणं केवळ साधनानेच गावं, अशी दुर्दैवाने ओळख नाही..

वरील ओळीपाशी तबला सुरू होतो ते छान वाटतं..

'आमुच्या उराउरात स्पंदते मराठी..' - स्वप्निल बांदोडकर.

मुलगा गुणी आहे. पण अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. त्याला शुभेच्छा!

'आमुच्या नसानसात नाचते मराठी..' - बेला शेंडे.

पुन्हा एक गुणी आणि सुरीली गायिका.. आवाजाची जात खूप चांगली आहे. हिनं तिचं सोशल लाईफ थोडं कमी करून गाण्याकडे, रियाजाकडे अधिकाधिक लक्ष द्यायला हवं. चांगले चांगले संगीत दिग्दर्शक मिळाल्यास ही मुलगी त्यांच्या चालींचं सोनं करेल यात शंका नाही..

'नाचते मराठी'तला शुद्ध मध्यम केवळ सुरेख. शुद्ध मध्यम हा स्वरच अद्भूत आहे.. एकदा केव्हातरी सवडीनं या शुद्ध मध्यमावर आणि त्यातील गाण्यांवर एक लेखच लिहायचा मानस आहे. 'पायी घागर्‍या करीती रुणझुण..' ह्या शब्दांनंतर 'नाद स्वर्गी..' मधल्या 'नाद' शब्दावर दीदी जो शुद्ध मध्यम लावते तिथे नादब्रह्माचा साक्षात्कार होतो.. असो!

'आमुच्या पिलपिलात जन्मते मराठी..' - देवकी पंडीत.

मुळची गुणी गायिका परंतु हिचं ख्याल गायन मला फारसं आवडलं नाही.. आवाजाची जात खूप छान. परंतु हिला बर्‍याचश्या मालिकांची शीर्षकगीतंच गात बसावं लागलं, हे दुर्दैव..

हुश्श.. दमलो बुवा.. अजून गेलाबाजार बरेच म्हणजे बरेच गायक शिल्लक आहेत. त्यापैकी शंकर महादेवन या गुणवंताची आवर्जून नोंद घेतो आणि हा लेख संपवतो..

एकंदरीत मात्र कौशलचं खूप कौतुक वाटतं.. भटसाहेबांचं हे आभाळाइतकं मोठं काव्य, मध्येच यमनाची आठवण करून देणारी कौशलची अनोखी चाल, गायक-गायकांनी केलेली गुंफण, सारंच सुरेख. गाणं अगदी लयदार झालं आहे. व्हायलीन आदींचं वाद्यसंयोजन, सुंदर कोरस, वापरलेले ठेके.. बहुत अच्छा काम किया है कौशलने..अगदी भारदस्त काम केलं आहे..! जियो...

बाबारे कौशल,

मी अश्याच चांगल्या चांगल्या गाण्यांचा भुकेला आहे.. माझ्या झोळीत असंच काही चांगलं वाढ.. आजपर्यंत बाबूजी, हृदयनाथ मंगेशकर, खळेसाहेब, वसंत प्रभू, राम कदम, आनंद मोडक, भास्कर चंदावरकर अश्या अनेक दिग्गजांनी माझ्या झोळीत दान टाकलं आहे. मध्येच कधी 'शब्द शब्द जपून ठेव..' ह्या जबरदस्त गाण्याचं दान देऊन विश्वनाथ मोरे यांनी, तर कधी 'केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर..' या हळव्या गाण्याचं दान देऊन अशोक पत्कींनी माझी झोळी भरून टाकली आहे..

यापुढेही असंच काही मोठं काम कर, सुरीलं काम कर, इतकंच सांगणं..

या गाण्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील सांगितिक वाटचालीकरता शुभेच्छा..

तुझा,
तात्या.