January 18, 2014

दु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनात..?

भाईकाकांचा गजा खोत हा हार्मोनियमवर 'उगीच का कांता..' हे पद वाजवायचा प्रयत्न करतो आणि त्या नादात 'उगीच..' या शब्दातील उ गी च ही अक्षरं हार्मोनियमच्या बटणांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो.. :)

वास्तविक कुठलीही अक्षरं ही त्या त्या स्वरांमध्येच वाजतात आणि स्वर तर फक्त सातच आहेत हे आपल्याला माहीत आहे.. सारेगमपधनीसां.. या ७ स्वरातला हा सारा खेळ आहे..

परंतु गाण्याचा अभ्यास करताना मला हे जाणवलं की क्वचित काही योग असेही येतात जेव्हा काव्यातलं एखादं अक्षर हे नेमकं सारेगमपधनीसां या स्वरात बसतं आणि तेव्हा तो माझ्या मते 'सोने पे सुहागा..' असा योग असतो..

सांगतो कसं ते.

गीत रामायणतल्या 'पराधीन आहे जगती..' या अजरामर गाण्यामधल्या एका कडव्यातल्या ओळी आहेत..

जरा मरण यातून सुटला कोण प्राणिजात
दु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनात..?

आता गंमत बघा.. की 'दु:खमुक्त जगला का रे..' या ओळीतल्या 'रे' या अक्षरावर नेमका शुद्ध रिषभ पडला आहे.. शुद्ध रिषभ म्हणजे 'सारेगमपधनीसां..' मधला रे..!

म्हणजे मूळ काव्यातलं अक्षरही 'रे' आणि त्याचा स्वरही 'रे' च..!

आणि रे या अक्षरावर असलेला रे हा स्वर मला विलक्षण आकर्षित करतो, खूप काही सांगून जातो..!

कुणाकडे मयत झालं तर आपण काय करतो..? त्या घरातल्या लहान-थोरांची,

'काय इलाज आहे सांगा पाहू? जन्माला आलेला प्रत्येक जण जाणारच आहे की नाही? तुम्ही असा धीर सोडू नका.. होईल सगळं काही ठीक.. आम्ही आहोत ना तुमच्यासोबत.."

असं काहितरी म्हणून आपण त्या कुटुंबियांचं सांत्वन करतोच की नाही?

नेमकं तेच सांत्वन इथे श्रीराम भरताचं करताहेत.. त्याची समजूत काढताहेत.. आणि ती समजूत काढताना ते म्हणताहेत..

"दु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनात..?"

आणि या ओळीतलं ते 'रे' हे अक्षर आणि त्यावरचा 'रे' हा स्वर.. मला खूप खूप इंटिमेन्ट वाटतो.. भावनेच्या खूप जवळ घेऊन जातो..

काय सांगतो तो रे हा स्वर..?

हेच की श्रीराम खूप म्हणजे खूप प्रगल्भ विचारांचे आहेत.. ते भरताच्या पाठीवरून हात फिरवून त्याची समजूत काढत आहेत, त्याला धीर देत आहेत..

"दु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनात..?..!'

मंडळी, म्हणूनच असं नेहमी म्हटलं जातं की गाणं ही अनुभवायची गोष्ट आहे..

काल मी कुसुमाग्रजांच्या 'सरणार कधी रण..' या गाण्याबद्दल दोन ओळी लिहिल्या होत्या.. आज पुन्हा 'पराधीन आहे जगती..' याबद्दल दोन ओळी लिहिल्या..

मी आजतागायत गाणं आणि खास करून गीतरामायण या विषयावर भरपूर डोकेफोड केली आहे, सततचं चिंतन-मनन केलं आहे आणि त्यातूनच क्वचित असे काही माणिक-मोती हाती लागतात. सतत त्या प्रशांत महासागरात न कंटळता श्रद्धेने डुबक्या मारत रहायचं हेच आपलं काम..!

माझ्या मते 'सरणार कधी रण..' किंवा 'पराधीन आहे जगती..' ही केवळ गाणी नाहीत, तर हे संदर्भ ग्रंथ आहेत.. सर्जनशील, सृजनशील आयुष्याच्या ह्या पोथ्या आहेत.. यांना एखाद्या धर्मग्रंथाइतकं मोल आहे..!

-- (बाबूजींचा शिष्य) तात्या अभ्यंकर.

January 05, 2014

लय म्हणजे काय हो? :)

तात्याचं गाणं.. या कार्यक्रमातील तात्यांचे लय-ताल विषयक अगदी साधेसोपे विचार..

गाण्यातली लय म्हणजे काय?

मुळात लय म्हणजे काय?

ढोबळ मानाने सांगायचं तर लय म्हणजे एक ठराविक गती. घड्याळाची टिकटिक, नाडीचे ठोके..

एखाद्या निरांजनातली ज्योत शांतपणे तेवत असते तेव्हा तिच्यातही एक लय असतेच की.. एक शांत, सुंदर लय..!

मुळात लय म्हणजे सजीवता, लय म्हणजे जिवंतपणा.. परंतु गती मात्र ठराविक..

तुम्ही तळ मजल्याला उभे असता तेव्हा तुमच्या नाडीचे ठोके ७२ असतात. आता धावत तीन जिने चढा पाहू.. लगेच लय बदलते..! :)

"अहो बातमी ऐकून काळजाचा ठोकाच चुकला हो.." असं आपण म्हणतो ना..तेव्हा चुकलेली असते ती लयच..!

रोजच्या व्यवहारात तर लयीची किंवा लयबद्धतेची अनेक उदाहरणं देता येतील. मग एखाद्या राजधानी एक्स्प्रेसने आता दोन तास कुठल्याच स्थानकात थांबा नाही म्हणून झकासपैकी पकडलेला स्पीड असो. तो स्पीडसुद्ध छान लयदार असतो.. गाडीचा वेग, चाकं आणि रूळ यांचं आपसात एक छान लयदार नातं जमतं.. किंवा मग अत्यंत मोहक अशी घोड्यांच्या टापांची लय असो.. मग हीच लय ओ पी नैय्यरसारख्या एखाद्या प्रतिभावंताला आकर्षित करते आणि तो 'मांग के साथ तुम्हारा, मैने मांग लिया संसार..' हे रफी-आशाचं एक सुरेख गाणं बांघून जातो..!

एवढंच कशाला.. एखादा हलवाई चुलीवर मोठी कढई ठेवून रबडी करण्याकरता म्हणून दूध आटवत असतो.. तुम्ही बघा..मोठ्या झार्‍याने कढईतलं ते दूध तो ढवळत असतो त्याला देखील एक छान लय असते.. ती लय बिघडली तर सबंध रबडीच बिघडेल ना..! :)

एखादा राजबिंडा गरूड अवघे दोन-चार पंख लयीत फडकवतो आणि उंच आभाळी जातो.. ह्याला लयीचं एक छान इग्निशन नाही म्हणायचं तर दुसरं काय म्हणायचं..?

लय बदलणं किंवा लय बिघडणं हे फारसं चांगलं नव्हे.. गाण्यात तर नव्हेच नव्हे..!

आता गाण्यातली लय म्हणजे काय हो?

स्वर, लय आणि ताल ही कोणत्याही गाण्यातली दत्तमूर्ती.. पण मुळात स्वर आणि लय हे वेगळे नाहीतच, असूच शकत नाहीत.. लयीला स्वरापासून किंवा स्वराला लयीपासून वेगळं काढता येतच नाही.. मग तुम्ही एखाद्या सेकंदापुरता षड्जाचा उच्चार करा.. किंवा चांगलं मिनिटभर षड्ज लावून ठेवा.. लय त्याच्या अंगभूतच असते.. राहता राहिला ताल.. तर तो त्या लयीचं एक मीटर ठरवतो.. तो त्या लयीला एक बंधन घालतो..जणू तो लयीला म्हणतो,

"बाई गं.. हा चार मात्रांचा केरवा.. लक्ष ठेव आणि पटकन परत ये.. बाई गं हा सात मात्रांचा रुपक बरं का.. लक्ष ठेव जरा.. बाई गं हा बारा मात्रांचा विलंबित एकताल किंवा १६ मात्रांचा विलंबित त्रिताल.. ये जरा निवांतपणे फिरून..!" :)

असो..

लयीचे आघात, लयीचे पॉज या विषयी पुन्हा केव्हातरी..

गाण्यातले स्वर, ताल किंवा शब्द हे आपल्याला ऐकू येतात.. त्यामुळे ते तसे सगुण म्हटले पाहिजेत.. परंतु लय ही अदृष्य असते, निर्गुण असते.. तिचा शोध म्हणजे अनंताचा शोध.. आणि या अनंताच्या शोधाकरताच गाण्याची अखंड साधना करावी लागते.. एरवी गाणं हा प्रकार खूपच सोप्पा आहे..! :)

असो..

सदरच्या लयविषयक दोन ओळी भीमण्णा, बाबूजी, पुलं आणि कुसुमाग्रज यांना समर्पित..!

-- (संगीताचा विद्यार्थी) तात्या.