April 16, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (3१) - डोली मे बिठाई के कहार...



डोली मी बिठाई के कहार
लाए मोहे सजनाके द्वार..

(येथे ऐका)


'ओ रामा रे..!'

थोरल्या बर्मदांची खास बंगाली ढंगाची गायकी.. आवाजाची जात जरा वेगळीच, परंतु स्वर मात्र सच्चा, अगदी सुरेल! खेमट्याचा किंवा दुगुन रुपकचा छान ठेका.. बंगाली लोकसंगीतातून जन्माला आलेली चाल..सचिनदा अगदी मन लावून गाताहेत...एकतानतेने एका परित्यक्तेची कर्मकहाणी सांगताहेत!


खास करून पश्चिम बंगालचा सामाजिक आशय असलेलं गाणं.. मूल होत नाही म्हणून बायकोला अगदी सहजरित्या टाकून दुसरं लग्न करणे आणि पहिलीचा छळ सुरू होऊन तिची हकालपट्टी होणे. पुन्हा माहेरी जायची सोय नाही कारण माहेरी खाणार काय? माजोरी सरंजामशाही, सावकारी आणि त्यामुळे पश्चिम बंगालच्या खेड्यापड्यात उत्पन्न झालेली वर्षानुवर्षाची गरीबी आणि सहज दृष्टीस पडणारी अन्नान्न दशा..!

पतझड, ओ बन गयी पतझड, बैरन बहार..!

आणि परित्यक्तेपासून ते कोठ्यापर्यंतचा पुढला प्रवास! तिथे भेटणारा एक संगीतरसिक, द्रोणातून कचोरी-समोसे आणि मिठाई आणणारा, जीव ओवाळून टाकणारा कुणी आनंदबाबू..! 'रैना बिती जाए', 'चिन्गारी कोई भडके' यासारखी एकसे एक गाणी देणारे पंचमदा, किशोरदा आणि दिदि!

अमरप्रेम! सामाजिक आशय असलेली उत्तम कथा, उत्तम संगीत, उत्तम अभिनय! हिंदी चित्रपटसृष्टीला पुन्हा येतील का हो असे वैभवाचे दिवस?


-- तात्या अभ्यंकर.

March 31, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (30) - पान खाए सैंया..


उडत्या रंगाढंगाचं झक्कास गाणं -
पान खाए सैंया हमारो..
(येथे ऐका)

आशाताईंच्या गायकीकरताच केवळ जन्माला आलेलं गाणं.. त्यामुळे त्याला आशाताईंनी न्याय दिला नाही तरच नवल! काय सुंदर आवाज लागला आहे आशाताईंचा.. ! क्या केहेने..!


'सावली सुरतीया होठ लाल लाल..' या ओळीनंतर येणारे 'हाय हाय..' हे शब्द आशाताईंनी ज्या अंदाजाने गायले आहेत तिथे संगीतातल्या सार्‍या पदव्या, सारी बिरुदं अक्षरश: कुर्बान..!

ढंगदार गायकी म्हणजे काय, रंगतदार गायकी कशी असते, हे आशाताईंकडूनच ऐकावं.. त्यांच्या गाण्यातील हरकती, मुरक्या, नखरे..हे सारं केवळ लाजवाब.. आणि हे सारं करतांना सुरलयीवर तेवढीच जबदरस्त हुकुमत..!

जर्दायुक्त पानासारखीच रंगलेली ही उत्तर हिंदुस्थानी देहाती नौंटंकी क्लासच.. वहिदा रेहमान तर अशी दिसली आहे की कुणाचंही दिल फिदा व्हावं..केवळ खल्लास!
आशाताईंच्या गायकीला आणि वहिदाच्या सौंदर्याला सलाम..!

-- तात्या अभ्यंकर.

March 26, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (२९) -जबसे तेरे नैना..


सावरीया शिणेमातलं 'जबसे तेरे नैना.. '(येथे ऐका)
मध्यमातलं एक छान गाणं.. 'नैना' शब्दाचा शुद्ध धैवतावरचा न्यास आगळावेगळा..! एकट्या शुद्ध धैवतामुळे गाणं तरलं आहे, नव्हे छान झालं आहे. ही जादू स्वरांची! 'लागे रे.. 'वरचा षडज अगदी समाधानकारक. नि़ध़सा.. वा! एकंदरीत मुखड्याचा फील छानच आहे. गाण्याचं एरेजिंग, ठेका, कोरस इत्यादी सर्व गोष्टीही उत्तम!..

गाण्याच्या चित्रिकरणाबाबत मात्र न बोललेलंच बरं. रणबीर कपूर नामक प्राणी हा धड 'He मॅन'ही दिसत नाही आणि धड 'She मॅन'ही दिसत नाही.. आमच्या ऋषी आणि नितू या गुणी दांपत्याच्या पोटी हे असं अंमळ खुळं कार्ट कसं काय निपजलं देव जाणे!
जब से तेरे नैना मेरे नैनों से लागे रे
तबसे दीवाना हुआ, सबसे बेगाना हुआ
रब भी दीवाना लागे रे..

या ओळी छान.. मात्र,

जबसे तेरा आँचल ढला, तबसे कोई जादू चला..


ही ओळ जरा उथळच वाटते.. कवीला जळ्ळी बाईचा पदर ढळण्यात कसली जादू वाटते देव जाणे..! खरी जादू, खरा शृंगार हा पदराआडच आहे, झाकलेल्यातच आहे हे हल्लीच्या उघड्याबागड्या दुनीयेला कळत नाही हेच खरं! Smile अनीलची मुलगी सोनम मात्र चांगली दिसते हो!
Smile

असो, एकंदरीत गाणं म्हणून विचाराल तर छानच गाणं!
Smile

-- तात्या अभ्यंकर.

March 23, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (२८) - होली के दिन..



युगायुगांचे नाते आपुले...
(येथे ऐका..)

'तू तिथे मी..' चित्रपटातलं एक सुंदर गाणं..
युगायुगांचे नाते आपुले नको दुरावा
सहवासाची ओढ निरंतर, नको दुरावा..


छान, संथ लयीतलं, शांत चालीचं सुंदर गाणं..प्रियकर-प्रेयसीतलं, पतीपत्नीतलं युगायुगांचं अतूट नातं सांगणारं!

'नाते आपुले नको दुरावा' मधल्या रिषभ, गंधार आणि मध्यमाची गुंफण खूप सुंदर..आनंद मोडकांनी खूपच हळवा बांधला आहे गाण्याचा मुखडा.. अगदी मनाची पकड घेणारा!
भासे सारे सुने तुझ्यावीण, तुझ्याचसाठी आसुसले मन
तोडून बेड्या सर्व जगाच्या, कधी आपुले होईल मिलन
उन सावल्या झेलत हासत जन्म सरावा!

अंतराही अगदी क्लास बांधला आहे..गाणं लिहिलंही छान आहे. प्रशांत दामले, कविता लाड, मोहन जोशी आणि सुहास जोशी यांच्यावरील चित्रिकरण सुंदर.. त्यांच्या भावमुद्राही अगदी चालीला साजेश्या! व्हायलीन आणि बासरीचे तुकडे सुरेखच. ओव्हरऑल जमून गेलं आहे गाणं..!

मराठी चित्रसंगीतात अशीच चांगली गाणी यापुढेही व्हावी एवढीच इच्छा..

-- तात्या अभ्यंकर.

March 16, 2010

कर सुमिरन मन..


सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! Smile

वर्षाची सुरवात 'सुमिरन' करूनच करायची, तीही साक्षात यमनमध्ये!
गुढीपाडव्याच्या दिवशी पानात श्रीखंड असावं आणि कानात यमन असावा! अजून काय पाहिजे?
Smile

यमनाबद्दल काय बोलावं? रागांचा राजा यमन! हळव्या स्वभावाचा प्रसन्न यमन! माणसाचं माणूसपण म्हणजे यमन!

कर सुमिरन मन.. (येथे ऐका)

हिंदुस्थानी संगीतातील आजच्या तरूण पिढीच्या, लयदार-पेचदार अश्या जयपूर गायकीची उत्तम तालीम लाभलेल्या अत्यंत गुणी गायिका सौ अश्विनी भिडे देशपांडे यांनी ही बंदिश गायली आहे..अगदी भावपूर्णतेने! अश्विनीताईंना उत्तम आवाज लाभला आहे आणि गातातही अगदी मन लावून, हळवेपणाने!

कर सुमिरन मन मेरो
व्याप,ताप, संताप सब नासे..

खूप सुंदर शब्द आहेत या बंदिशीचे. गंधारावर अलगद उतरणारी सम असलेली मुखड्याची पहिली ओळ अगदी शांत..आणि त्यानंतर 'व्याप ताप..'चं अगदी तार षड्जा/रिषभापर्यंत जाणारं आणि 'नीपरेसा' या अवरोही संगतीने पुरं होणारं सुंदर नक्षिकाम!

आन पडी मझधार,
हरिनाम केवटही पार करे
तोरी नैय्या, भवसागर उतार!

अंतराही सुरेख! मत्ततालातली मध्यलयीची ही बंदिश स्वत: अश्विनीताईंनीच बांधली आहे..मत्तताल हा सहसा गायला न जाणारा तसा अनवट ताल. त्यामुळे ही बंदिश ऐकायला जरी सहजसोपी वाटली तरी ताला-लयीला तशी अवघडच आहे, अनवट आहे. आणि म्हणूनच अश्विनीताईंच्या या बंदिशीचं विशेष कौतुक वाटतं!

भागवत धर्मात सांगितलेलं नामस्मरणाचं जे महत्व, अगदी तेच महत्व यमनचं! ईश्वरप्राप्ती अगदी निश्चित!

सर्वांना गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा शुभेच्छा! Smile

-- तात्या अभ्यंकर.

March 01, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (२७) - होली के दिन..


होली के दिन..(येथे ऐका)

जय आणि वीरूने नुकतंच कालिया आणि मंडळींना हाकलून लावलं आहे त्यामुळे रामगढचे गावकरी आता खुशीने होळी खेळताहेत. गळ्यात हार वगैरे घातलेला देखणा वीरू आणि गोडगुलाबी अशी आमची बसंतीभाभी या जोडीचं हे होळीचं गाणंदेखील अतिशय सुरेख! पंचमदांच्या संगीताचा परीसस्पर्श लाभला आणि हे गाणं होळीच्या रंगात उत्साहाने रंगून गेलं..दिदि आणि किशोरदा खण्डवेवाल्यांची स्वर्गीय गायकी!

गोरी तेरे रंग जैसा थोडासा मै रंग बनालू
आ तेरे गुलाबी गालोसे थोडासा मै गुलाल चुरालू!


वीरूदादा बसंतीवर बाकी जामच फिदा आहेत..
:)

जा रे जा दिवाने तू होली के बहाने तू
छेड ना मुझे बेसरम!...


'बेसरम' या शब्दाचा उच्चार केवळ आमच्या दिदिनेच करावा! एकाकी जयदादाला देखील गावकरी आग्रहाने रंगात नाचायला बोलावतात आणि जयदादाही दोन घटका अगदी छान नाचतात.. इमामचाचाही खुश होऊन होळीचा नजारा पाहताहेत.. सारं गाव खुशीत आहे..इकडे रंगबेरंगी होळी सुरू आहे आणि तिकडे ठाकूरची पांढर्‍या साडीतली विधवा सून उभी आहे.. जयदादांचा जीव आहे तिच्यावर! :)

शोले शिणेमातलं काय गाजलं नाही? अभिनय, संवाद, गाणी, पात्रांची नावं..! एखाद्याने अगदी डॉक्टरेट करावी असा शिणेमा! मारे ऑस्कर्ड विजेते शिणेमे जगभर निघाले, अजूनही निघतील.. पण जयवीरूच्या दोस्तीचा, ठाकूर-गब्बरच्या दुश्मनीचा, बसंती-धन्नो-मौसीचा, सांभा-कालिया-रामलालचा हा सिनेमा पुन्हा होणे नाही! :)

-- तात्या अभ्यंकर.

February 26, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (२६) - प्यार के मोड पे..


प्यार के मोड पे..(येथे ऐका)

चित्रपट परिंदा.. आशाताई-पचमदा जोडीचं एक Rich गाणं!


गाण्याची चाल, एरेंजमेन्ट वगैरे सगळं अगदी खास पंचमदा ष्टाईल. या गाण्याबद्दल आशाताईंना दाद द्यावी तितकी कमीच.. ज्या अंदाजाने त्यांनी हे गाणं गायलं आहे तो अगदी खासच.. पंचमदांच्या चालीला अगदी पुरेपूर न्याय दिला आहे.. सुरेलता, शब्द टाकण्याची पद्धत, गाण्यातल्या खास जागा.. ! आशाताईंची जादुई सुरेलता आणि गायकी.. खूप सुंदर भाव ओतले आहेत त्यांनी या गाण्यात..सुरेश वाडकरांनीही छान संगत केली आहे..

सांजवेळचं समुद्रकिनार्‍यावरचं सुंदर चित्रिकरण!.. स्वप्नसुंदरी माधुरी तर केवळ लाजवाब! तेजाब, परिंदा, बेटा, साजन.. माधुरी खासच दिसली आहे..

'अन्ना'नानाचा परिंदा चित्रपटही मस्तच होता..! एका जमान्यात हिंदी चित्रसृष्टीत नंबर वन स्थान प्राप्त करणार्‍या माधुरीचा आणि स्वत:चा खास ठसा उमटवणार्‍या मराठमोळ्या नानाचा मिसळपावला अभिमान वाटतो..

-- तात्या अभ्यंकर.

February 23, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (२५) - मालवून टाक दीप..


सारेगपसां
सांपगरेसा

हा आरोह-अवरोह. कुणा संगीतकाराला जीवनाची क्षणभंगुरता दिसते या स्वरात आणि तो बांधतो.. चढता सूरज धीरे धीरे!
सांस टुटतेही सब रिश्ते छुट जाएंगे
बाप-मा-बेहेन-बिबि-बच्चे छुट जाएंगे..!

 हे विदारक सत्य सांगण्याकरता तो वरील स्वरांचा आधार घेतो. परंतु स्वरांची ताकदच अमर्याद.. अगदी कुठलेही शब्द गुंफा वरील स्वरावलीत, त्यांना पुरेपूर न्याय मिळेल! आणि म्हणूनच हृदयनाथ मंगेशकरांसारख्या प्रतिभावंताला नाही वाटले हे स्वर क्षणभंगूर! आणि त्यांनी याच स्वरांचा आधार घेतला आणि 'मालवून टाक दीप' चा जन्म झाला! 

मालवून टाक दीप!
गाण्याच्या सुरवातीलाच दिदिचा अक्षरश: खल्लास, जीवघेणा आलाप! भटसाहेबांचे अनावर झालेले शब्द!
दूरदूर तारकात
बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून
एक एक रूपरंग!

मराठी संगीतातलं हे माईलस्टोन गाणं.. यापेक्षा अधिक शृंगार असूच शकत नाही..पुरं करतं हे गाणं शृंगाररसाच्या सर्व अपेक्षा, अन् त्याच्या सर्व व्याख्या!
दोन्हीही गाण्यांचे तेच स्वर.. परंतु अर्थ अगदी वेगळे! नमस्कार असो त्या स्वरसामर्थ्याला!
--तात्या अभ्यंकर.

February 22, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (२४) - देखे छो की ताके ..


देखे छो की ताके (येथे ऐका)

एक छान, फ्रेश चालीचं बंगाली गाणं. शुभोमिता या गुणी बंगाली गायिकेनं गायलेलं..

अगदी सहज स्वत:शीच गुणगुणावं असं गायलं आहे..

मध्यलयीतला एकताल.. हा सहसा अभिजात संगीतातल्या बंदिशींकरता वापरला जातो परंतु या लाईट मूडच्या गाण्यातही त्याचा अगदी चपखल वापर केला गेला आहे..

अगदी तार सप्तकातल्या गंधार-मध्यमापर्यंत जाऊन आल्यानंतर कालानंतरच्या एका छान पॉजनंतर येणारी सम खासच..

मंडळी, संगीत ही जागतिक भाषा आहे.. सारेगमपधनीसां हीच तिची अक्षरं.. ही अक्षरं मनाला भावली की झालं! मग भाषा मराठी असो, हिंदी असो, बंगाली असो किंवा अन्य कोणती असो...!

--तात्या अभ्यंकर.

February 20, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (२३) - अखियोमे छोटे छोटे..


अखियोमे छोटे छोटे..(येथे ऐका)

एक अतिशय सुंदर अंगाई गीत..


दिदि काही वेळेला इतकं सुरेख गाते की त्याचा त्रास होतो. पार हळवे करतात तिचे स्वर!

आपण खरंच एखाद्या लहानग्याला झोपवताना ज्या लयीने त्याला हाताने थोपटू, अगदी तीच लय पंचमदांनी या गाण्याला ठेवली आहे. खूप मोठा माणूस!

अखियोमे छोटे छोटे सपने सजायके,
बहियोमे निंदियाके पंख लगायके


अगदी थोपटल्यासारखी, काळजाला हात घालणारी चाल..केवळ ममत्व! 'सजायके' आणि 'लगायके' या शब्दांतल्या शुद्ध गंधाराकरता शब्द नाहीत! आणि 'चांदनी रे झूम' मधला शुद्ध मध्यम? हा मध्यम गाण्याला क्षणात एका उच्च दर्जावर नेऊन ठेवतो...!

सुंदर शब्द, पंचमदांची केवळ अप्रतीम चाल, दिदिची गायकी. खूप जीव लावतात ही गाणी. हेच गाणं गुरुवर्य किशोरदांनीही तेवढ्याच सुंदरतेने गायलं आहे हे वेगळं सांगायला नको..

पंचमदा. तुम्हाआम्हाला खूप काही दिलं या माणसानं!

-- (नतमस्तक) तात्या अभ्यंकर.