November 04, 2013

केसरिया बालम...

केसरिया बालमा आओनी पधारो म्हारे देस..

हे राजस्थानी लोकगीत अनेक कलाकार, अनेक शब्द वापरून गातात. काही चित्रपटातूनही हे गाणं आपल्याला ऐकायला मिळतं.. 

केसरिया.. ज्याची कांती केशरी रंगाची. केशरासारखी आहे असा.. शिवाय केशरी रंग हे शुद्धतेचं आणि शौर्याचं प्रतिक.. 

ज्याची कांती केशरी रंगाची आहे, ज्याचं मन केशरासारखं शुद्ध आहे आणि ज्याच्या ठायी शौर्य आहे असा केसरिया बालमा किंवा केसरिया बालम.

देशांतराला, लढाईला गेलेल्या मांगनियार राजस्थान्याची प्रेयसी/पत्नी त्याला बोलवत आहे.. 

पधारो म्हारो देस..

राजस्थानातल्या पुरातन, प्राचिन हवेलीतलं प्रशस्त संगमरवरी अंगण किंवा सूक्ष्म कोरीव काम केलेल्या त्या हवेलीतला एखादा झरोका किंवा अनेक पायर्‍या असलेल्या विहिरीच्या एखाद्या पायरीवरून किंवा गरम वाळूच्या एखाद्या टेकडीवरून फुलणारं हे गाणं..

हे वर्णन माझे मित्र डॉ अग्रवाल यांचं..



या लोकगीताची तशी बरीच वेगवेगळी कडवी गायली जातात.. शेवटी हे गाणं म्हणजे एक साद आहे.. कधी कुठला रचनाकार त्याच्या प्रतिभेनुसार आणि कल्पनेनुसार ही पधारण्याची साद घालेल हे सांगता यायचं नाही.. राजस्थानातलं हे पारंपारिक लोकगीत, त्यामुळे कुणा एका रचनाकाराची यावर मालकी नाही..

परंतु मूळ गाण्यात काही सुंदर पंक्ति आहेत..त्या अलीकडे कुणी म्हणताना आढळत नाहीत..

जसे,

मारू थारे देस में निपूजे तीन रतन
एक ढोलो, दूजी मारवन , तीजो कसूमल रंग
पधारो म्हारे देस...

केसर सू पग ला धोवती घरे पधारो जी..
पधारो म्हारे देस...

और बढ़ाई क्या करू पल पल वारूगी
पधारो म्हारे देस आओ म्हारे देस...

आणि या ओळी तर सुरेखच आहेत..

आंबा मीठी आमरी,
चोसर मीठी छाछ.
नैना मीठी कामरी
रन मीठी तलवार

पधारो म्हारे देस नि...

आमच्या एका दोस्ताच्या लग्नाला जोधपूरला गेलो होतो तेव्हा ही डॉ अग्रवाल नावाची आसामी मला भेटली. डॉक्टरसाहेब राजस्थानी लोकगीताचे गाढे अभ्यासक. खूप गप्पा झाल्या त्याच्याशी. अगदी मोकळाढाकळा गप्पीष्ट माणूस. झकास मैफल रंगली त्यांच्यासोबत. खूप जोधपूर फिरलो आम्ही. सोबत डालबाटी आणि राजस्थानी मिठाई..! :)

त्याच्याकडून अगदी भरभरून ऐकायला मिळालं या गाण्याबद्दल.. आपल्याला आश्चर्य वाटेल, त्या अग्रवालांनी मला या गाण्याच्या एकूण ६ निरनिराळ्या चाली ऐकवल्या..!

आपलं भारतीय संगीत किती म्हणजे किती समृद्ध असावं? इतकी राज्यं, इतक्या भाषा.. प्रत्येक मातीतलं गाणं वेगळं आणि तेवढंच ढंगदार..मग ती मराठमोळी लावणी किंवा ठाकरगीत असू दे, किंवा राजस्थानातलं केसरिया असू दे, किंवा मध्यप्रदेशातल्या माळव्यातलं लोकगीत असू दे, किंवा पंजाबातल्या रंगेल मातीतल्या टप्प्याशी दोस्ती करणारं कुठलं कुडी-मुंडाचं प्रेमगीत असू दे.. किती वैभवशाली आहे आपलं संगीत..! विचार करू लागलो की मन थक्क होतं. ह्या सा-याचा अभ्यास करायला सातच काय, सातशे जन्म देखील पुरणार नाहीत.. पुन्हा पुन्हा या भारतीय मातीत जन्म घ्यावा लागेल..!

जोधपूरहून परतीच्या सूर्यनगरी एक्सप्रेसने निघालो. जानेवारीचे दिवस. संध्याकाळ उलटलेली. गाडी सुसाट मुम्बैकडे निघाली होती. बोचरं वारं होतं..आणि सोबत शब्दवेल्हाळ 'केसरिया बालम..' चे स्वर कानात रुंजी घालत होते...!

-- तात्या अभ्यंकर.

October 14, 2013

पिवाला बसू. बोंबिल खाऊ.. :)

या वर्षीच्या गणपतीत एके दिवशी दरवर्षीप्रमाणे अगदी पोटभर जेवून तृप्त होऊन आलो आमच्या साधनेकडून..

साधना कोळीण..

मी गेलो की भर मासळी बाजारत.."आला गं बाई माझा भट.." असं ओरडणारी साधना कोळीण.. 

दरवर्षी गणपतीत तिच्याकडे जेवायला जातो मी. आमच्या साधनेचं घर म्हणजे मूर्तीमंत उत्साह, प्रसन्नता.. 

अगदी थाटात गणपती बसवला होता साधनेनं. सगळी फुलांची सजावट..त्यामध्ये खास कोलीलोकांचा रंगीबेरंगीपणा. थोडा भडकपणा. गणपतीच्या दोन्ही बाजूल जिवंत चिंबोर्‍या (खेकडे) टांगलेल्या..!

ही चिंबोर्‍या टांगण्याची पद्धतच आहे सोनकोल्यांची.. महादेव कोली आणि सोनकोली.. 

"आला गं बाई माझा भट. ये भटा.. बस.. "

आजदेखील तसंच दणकून स्वागत.. मुळात ह्या कोळणींचे आवाज चढे असतात.. त्यात साधनेचा आवाज म्हणजे काय विचारायलच नको..! 

घरात एक-दोघी म्हातार्‍या.. घट्ट कोली पद्धतीचं लुगडं नेसलेल्या..पोराबाळांची लगबग, धावपळ.. घरात सणाचं अगदी छान, प्रसन वातावरण..

खुद्द आमची साधना काय सुरेख दिसत होती आज.. ती खास कोलीलोकांची साडी...गळ्यात-हातात-कानात दगिने, मोठं ठसठशीत कुंकू, केसांमध्ये ती टिप्पीकल कोल्यांची वेणी.. 

"भटा..दर्शन घे.. मग जेवायला वाढते तुला...ओ, जरा भटाकडे लक्ष द्या.. त्याला प्रसाद द्या.."

ही सूचना महेन्द्रला.. महेन्द्र म्हणजे साधनेचा घो.. अगदी छान माणूस..आणि तितकाच साधा..

मल नेहमीच खूप आपलेपणा वाटतो साधनेच्या घरात. मी मनापासून रमतो अशा लोकांमध्ये. शाळेतदेखील घनसोलीचा अव्या पाटील, काल्या शिंदे, नाखवा, एकनाथ तांडेल.. हीच माझी जवळची मित्रमंडळी.. प्रतिष्ठित, व्हाईट-कॉलर्ड भटाब्राह्मणांच्या मुलांनी मला कधी फारसा जवळ केलाच नाही. मी मनापासून रमलो तो या आगरी-कोली पोरांच्यातच..!

काय सुंदर सैपाक केला होता आमच्या साधनेने..!

आज घरात गणपती असल्यामुळे सगळं शाकाहारी. गरमगरम चपात्या, उत्तम टोमॅटो-फ्लॉवर-बटाट्याचा रस्सा, काकडीची फर्मास कोशींबीर, खीर, वाफाळलेला भात, वरण ..

"पोटभर जेव रे भटा माझ्या.. देव बसलेत घरात..आज तूच आमचा भट.."

"मी कसला गं भट? तुझ्याकडनंच तर मांदेली-बोंबिल नेतो..." 

"मग? तं काय झालं? रक्त भटाचंच ना रे बाबा..!" 

आमच्या साधनेचे सोवळ्या-ओवळ्याचे, शुचिर्भूततेचे नियम खूप सोपे होते, साधे होते. त्यात जराही बेगडी कर्मठपणा नव्हता..! 

"अरे घे गरम चपाती अजून एक..!"..असं म्हणत तिनं ती पोळी डायरेक्ट तव्यावरून माझ्या पानात वाढलीदेखील..!

तिच्याकडची कुणी एक म्हातारी कोळीण मावशी जेवताना माझ्याजवळ येऊन बसली होती. तीही आग्रह करत होती. महेन्द्र उभा होता कडेला कृतज्ञतेने..!

जेवण झालं. महेन्द्रने, त्या भल्या माणसाने माझ्याकरता १२० पान आणून तयार ठेवलं होतं..!

"पुन्हा ये रे भटा.. ओ, तुमी काय बोला की..!"

पुन्हा महेन्द्रला दटावणी. महेन्द्र बापडा कसनुसा! दोन शब्द बोलला माझ्याशी..

"तुमी नेमी सणावारीच येता.. बाकी पन कदी या. थोडी पिवाला बसू. बोंबिल तलुया तुमच्याकरता. आता गणपतीनंतर म्हावरं चांगलं भेटल..!"

मला मजा वाटली महेन्द्रच्या त्या प्रेमळ 'पिवाला' बोलावण्याची.. 

साधना कोळीण..! 

मला माहीत नाही कुठल्या जन्मीचे हे आम्हा भावा-भैणीचे छान ऋणानुबंध आहेत ते..! एका टिप्पीकल सोनकोळणीचा मी चित्पावन कोकणस्थ भाऊ..  

"आला गं बाई माझा भट.." असं भर मासळीबाजारात प्रेमानं स्वागत होणारा कदाचित मी एकमेव चित्तपावन असेन..! 

-- तात्या अभ्यंकर.

सदर लेख माझे गुरु भाईकाकांना समर्पित...

August 30, 2013

पल्लवीताई...

"कसा आहेस रे तात्या? घरी ये ना रे एकदा.. आज येतोस? काहितरी छान खायला करते.."

पल्लवीताईचा असा अधनंमधनं फोन येतो..

"हो, येतो."

पल्लवीताईचं घर.. अतिशय स्वच्छ आणि तेवढंच साधं..घरातल्या इंचाइंचात तिनं राखलेलं घराचं घरपण..!

तीनच खोल्या..एक हॉल, एक स्वयंपाकघर आणि तिसरी एक खोली. त्या खोलीत पल्लवीचे अंथरुणाला खिळलेले वडील..वडिलांचं थोडंफार येणारं उत्पन्न आणि बाकी पल्लवीताईच्या घरातच चालणार्‍या सकाळ-संध्याकाळच्या शिकवण्या.. घरी आता पल्लवीताई आणि तिचे अधू वडील हे दोघेच..

"तात्या, तुझ्या आवडीची मोकळी भाजणी केली आहे.. आणि सोबत गोड दही.."

अतिशय साधा, घरगुती म्हणावा असा पंजाबी ड्रेस..कपाळाला न चुकता लावलेलं कुंकू..काना-गळ्यात आणि हातात अगदी मोजकं आणि तेवढंच साधं, शोभेलसं.. भडकपणा कुठेही नाही.. तरीही पल्लवीताई खूप छान दिसायची. साधेपणातलं सौंदर्य वेगळंच असतं हेच खरं..!

"ए तात्या, कशी झाल्ये रे मोकळी भाजणी? तू काय बुवा, मोठा बल्लवाचार्य..!"

असं म्हणतानाची पल्लवीताईची मिश्किलता आणि तिच्या चेहेर्‍यावरचं कौतुक. आणि एकंदरीतच, माझं काय किंवा इतर कुणाचं काय.. नेहमी कौतुक करणं, तुमच्यातल्या गुणांना प्रोत्साहन देणं हाच पल्लवीताईचा स्वभाव..

"कुणाचं गाणं ऐकलंस अलीकडे? येत्या रविवारी गडकरीला भावसरगम आहे. आपण जाऊया का रे? येशील माझ्याबरोबर? दोन-तीन तास मी तानीला बसायला सांगेन आप्पांजवळ.. जाऊया खरंच..?"

"आई गेल्यापासून कुठे असं बाहेरच जाणं झालं नाही रे.. आई गेली आणि आप्पांनीही त्याचा धसका घेऊन ते असे अंथरुंणाला खिळले.."

पल्लवीताई असं म्हणाली आणि झर्र्कन माझ्या डोळ्यासमोर पूर्वीची पल्लवीताई आली. अत्यंत हौशी.. ट्रेकिंग करणं, हौसेने नाटकात काम करणं.. अगदी हौशीहौशीने गणपतीची आरास करणं, दिवाळीचा तो झिरमिळ्यावाला कंदील करणं..मज्जा-मस्ती-गाणी-गप्पा-गोष्टी-भेंड्या- उत्साहाचा अगदी झरा होती आमची पल्लवीताई..

"अरे तात्या, कमल पाध्येचं हे पुस्तक वाचलंस बंध-अनुबंध? कालच आणलंय मी लायब्ररीतून.."

पूर्वीची पल्लवीताई आणि आता माझ्यासमोर बसलेली पल्लवीताई.. खूप फरक होता दोघांमध्ये.. तिच्या आईला कावीळ झाली..ती पोटातच फुटली आणि महिन्याभरातच ती गेली.. ती केवळ तिची अई नव्हती तर अगदी जवळची मैत्रिण होती.. उत्साहाचा झरा असलेल्या पल्लवीताईला नाही सोसला तो धक्का आणि त्यानंतर पल्लवीताई अगदी अबोलच झाली..पुढे लगेच वडिलांचं अंथरुणाला खिळणं.. एक कुणीतरी तिला खूप आवडत होता, तिच्या मनात भरला होता..तिथेही काही योग जुळून आला नाही.. असा सगळा अक्षरश: दोन-तीन महिन्यातला प्रकार आणि एक उत्साहाचा झराच आटला.. अकाली वृद्धत्व वगैरे नक्कीच आलं नव्हतं, तशी आजही ती काही नकारात्मक वागत नव्हती की सतत कुठले दु:खाचे उसासे टाकत नव्हती..पण मी एक वेगळीच पल्लवीताई पाहात होतो एवढं मात्र नक्की.. मॅच्युअर्ड नाही म्हणता येणार कारण मॅच्युअर्ड तर ती पूर्वीही होती..

"आत येतोस? आप्पांना भेटतोस? त्यांना जरा बरं वाटेल.."

मी आतल्या खोलीत आप्पांच्या पलंगापाशी गेलो.. पक्षाघाताने तोंड वाकडं झाल्यामुळे आप्पांना काही बोलता येईना.. आप्पांनी हात पुढे केला..मी त्यांचा हात हातात घेतला..आणि अंथरुणात पडल्यापडल्याच त्यांच्या दोन्ही डोळ्यातून धारा वाहू लागला..पल्लवीताईकडे बघू लागले.. 'माझ्यामुळे अडकली आता माझी पोर..' असं सांगणं होतं आप्पांच्या त्या अश्रुधारांमध्ये..स्वत:च्या लेकीबद्दल विलक्षण कृतज्ञता होती..!

"आप्पा, मी काय सांगितलंय तुम्हाला? रडायचं नाही म्हणून सांगितलंय ना? तुम्ही असे रडलात तर सांगा कोण येईल का आपल्याकडे? आणि मग अशाने तुम्ही लवकर बरे तरी कसे होणार..?"

"ए तात्या, म्हणतोस का रे जरा बाबूजींचं गाणं 'तुझे गीत गाण्यासाठी?' आप्पांना खूप आवडतं ते गाणं..आप्पा, तुम्हीही थोडी कॉफी घ्याल ना आमच्यासोबत..?"

मला खरंच खूप कौतुक वाटत होतं पल्लवीताईचं.. वास्तविक असं अकाली वृद्धत्व येण्याचं तर तिचं वयही नव्हतं..

"येत जा की रे अधनं मधनं.. पुढच्या वेळेला रम्या आणि मोहनला पण मी बोलावीन..एखाद्या रविवारी दुपारपासूनच या तुम्ही तिघे. आपण मनसोक्त कॅरम खे़ळूया आणि मग मी संध्याकाळी मस्तपैकी पावाभाजी करेन.."

हे ज्या उत्साहाने ती म्हणाली त्यात मला क्षणभर का होईना..पुन्हा पूर्वीची पल्लवीताई दिसली..

उगीचंच भरून आलं...

"येतो गं.."

"थांब जरा..हा घे रव्याचा लाडू.. अरे आप्पांना खूप आवडतात म्हणून केलेत.."

मी चपला घातल्या आणि निघालो.. मनात पल्लवीताईचा साधेपणा, सात्विकता घर करून राहिली होती आणि जिभेवर तिनं केलेल्या लाडवाचा गोडवा होता..

-- तात्या अभ्यंकर.

August 29, 2013

सुधा आणि खरवस..

काय पण म्हणा.. केळशी हे कोकणातलं एक फार सुरेख गाव आहे..

आपण साला जाम प्रेम करतो या गावावर..


काही वर्षांपूर्वी एक कुणी सुधा भेटली होती केळशीत.. तिच्यावरही जीव

जडला होता माझा..असेल विशीतली..


सुरेख होती.. हनुवटीवर एक जीवघेणा तीळ.. छ्या..!


लेकडेमोचा घरगुती कार्यक्रम होता.. तात्या फार सुरेख गातो आणि गाणं

समजावूनही सुरेख सांगतो असा ठाम गैरसमज असलेल्या काही भल्या

लोकांनी तो कर्यक्रम ठेवला होता.. त्या कार्यक्रमाला आली होती सुधा..


हाताखाली उजवा गाल ठेऊन अगदी छान, एकाग्रचित्ताने आणि

भाबडेपणाने माझं गाणं ऐकत होती...


कार्यक्रम संपला.. गरमागरम पोळ्या, मटकीची उसळ..छानसा

वांगीभात होता.. 


सुधा आणि तिची आई माझ्यापाशी आल्या..


सुधाची आई.. छान होती अगदी. सुहास्य वदनी. ‌सुबक ठेंगणी.. 


"सुंदरच झाला हो कार्यक्रम तात्या... काय छान समजावून दिलात

पुरियाधनाश्री..! मी पण विशारद आहे 



तात्या.. पण आम्हाला असं कुणीच समजावून सांगितलं नाही.. आणि

तानपुऱ्यावर ऐकायला खूप छान वाटतं

हो तात्या. पण आमच्या विशारदच्या बाई पेटी घेऊनच शिकवायच्या..!"


मी मनातल्या मनात विष्णू दिगंबर पलुस्करांना नमस्कार केला आणि

त्या 'विशारदच्या बाईंना माफ करा' म्हणून सांगितलं..


"आमच्या सुधालाही फार आवड आहे तात्या.. तुमच्याकडेच शिकायला

पाठवली असती.. पण तुम्ही मुंबैला असता ना? कसं जमणार..?"


केळशीत काही व्यवसाय आणि भाड्याचं एखादं घर मिळेल का? हा

विचार वीज चमकावी त्याहीपेक्षा जलद गतीने क्षणार्धात माझ्या मनात

येऊन गेला... 


वांगीभातानंतर छान खरवस होता.. गुळाचा.. खमंग...!


मुंबैला परतीच्या वाटेला लागलो होतो.. सुधा आणि खरवस.. दोन्हींचा

गोडवा सोबत घेऊन..!


-- तात्या अभ्यंकर.

August 24, 2013

पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी..

संत तुकाराम चित्रपटातला एक विलक्षण मेलडियस, उत्साहाने, चैतन्याने भरलेला एक अभंग.. 
बिहागसारख्या रागात बांधलेला..

संत तुकाराम चित्रपटातला तुकोबांचा कट्टर विरोधक सालोमालो.. ह्या सालोमालोच्या तोंडी हा अभंग आहे.. 

ह्या सालोमालोचं काम करणारा नट कोण आहे देव जाणे, पण या नटाने अगदी झक्कास अभिनय केला आहे हा अभंग गाताना. हा अभंग कुणी गायला आहे हेही माहीत नाही.. कदाचित तो सलोमालोचं काम करणारा नटच गायकनटही असावा..

परंतु ज्याने कुणी हा अभंग गायला आहे त्याने हा अभंग केवळ अप्रतिम गायला आहे असंच म्हणावं लागेल.. हा जो कुणी आहे तो अतिशय सुरेल मनुष्य आहे... गाण्याची उत्तम तालीम घेतलेला आहे..





मुळत हा अभंग तुकोबांचा.. सालोमालो तो ढापून आपल्या नावावर खपवू पाहात आहे.. त्यांमुळे त्याच्या सादरीकरणात एक प्रकारचं नाट्य आहे, अभिनय आहे.. त्यामुळे त्याची चालही बदलली आहे.. मूळ तुकोबांची चाल ही अतिशय साधी, त्यांच्यासारखीच सात्त्विक आहे जी विष्णूपंत पागनीसांनी गायली आहे.. परंतू सालोमालोची चाल ही बिहागमधली, त्याच्यासारखीच रंगेल आणि राजस गुणांची आहे हे ध्यानात घेण्यासारखं आहे..!

कुठल्याही चित्रपटातल्या एखाद्या गाण्याकडे बघताना अशाच दृष्टीने पाहिलं पाहिजे..कारण ते नुसतं गाणं नसतं तर त्या गाण्याला एक पार्श्वभूमी असते हेही लक्षात घ्यावं लागतं.. आणि त्या दृष्टीने या अभंगाकडे पाहिल्यास आपलाच आनंद अधिक दुणावतो..

पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी..

गंधारावरची सुंदर सम.. वा!

सालोमालोबुवा छान नटूनथटून कीर्तनाला उभे आहेत.. हाती चिपळ्या आहेत.. 

एका श्रोत्याला छान डुलकी लागली आहे.. त्यामुळे सालोमालोबुवा त्याला,

'जागृती-स्वप्नी पांडुरंग..' असं म्हणत खणकन त्याच्या कानाशी चिपळी वाजवाताहेत.. मस्तच जमलंय हे टायमिंग.. 

आणि पांडुरंगातल्या त्या शुद्धनिषादाची क्वालिटी खास बिहागातली. अतिशय सुरेख..

स्वर नुसतेच छान आणि सुरेल लागून उपयोगाचं नाही तर ते त्या त्या रागाच्या क्वालिटीनुसार(च) लागले पाहिजेत..! असो.

'पहिले वळण ऐंद्रिया सकळा..'

वा..! सालोमालोच्या आवाजाचा पोत खरंच सुरेख आहे.. उत्तम फिरत आहे आवाजाला.. आवाजाची जात थोडी सुरेशबुवा हळदणकरांसारखी वाटते आहे.. 

'भाव तो निराळा नाही दुजा.. '

धत तेरीकी..! येथे तुकोबांना काय म्हणायचं आहे हेच मुळी सालोमालोला कळलेलं नाही.. नाहीतर त्याने तुकोबांशी असा दुजाभाव केलाच नसता..!

'भाव तो निराळा.. ' नंतरची थोडी लयकारीवजा गोलाकार आलापी सुंदर आणि त्यानंतर 'नाही दुजा.. ' वरचा पुन्हा एकदा बिहागचा देखणा निषाद आणि त्यानंतर त्या अज्ञात गायकाने धैवत, पंचम आणि मध्यमावर अनुक्रमे केलेला ठेहेराव देखील सुरेख.. मध्यमावरच्या ठेहेरावावरती त्याची डोळ्यातनं टिपं गाळायची नाट्यमयता.. सगळंच सुंदर..!

सालो म्हणे नेत्री केली ओळखण..

हा हा हा.. इथे' तुका म्हणे' च्या ऐवजी त्याने 'सालो म्हणे' टाकलं आहे. ‌शिवाय 'सालो म्हणे.. ' या शब्दांवर विशेष जोर देऊन ते तो ठासून सांगायचा प्रयत्न करतोय तेही मस्त.. त्यावेळची तोड, तिहाया, चौथाया. ‌सगळंच मस्त ..

'तटस्थ ते ध्यान विटेवरी..' असं म्हणताना त्याने कमरेवर हात ठेऊन घेतलेली विठोबाची पोझ.. पण त्याचा तो म्हातार नोकर जो आहे तो हे सगळं ओळखून आहे.. तो आपल्या मालकाच्या 'ध्याना'लाच नमस्कार करतो आहे..! 

गायकीचे बारकावे आणि सुरेलता तर आहेच परंतु इतरही अनेक बारकावे आहेत या गाण्यात..त्यामुळेच एकदा या गाण्यावर भरभरून लिहायचं ठरवलं होर्त.. आज योग आला..

आज इतके वर्ष झाली या चित्रपटाला परंतु त्यातल्या या अभंगाची नोंद कुणी घेतली आहे की नाही माहीत नाही..आणि म्हणूनच मी ती आवर्जून घेतो आहे..

सालोमालोंनी गायलेला हा सुंदर अभंग ऐकून स्वतः तुकोबा इतकंच म्हणाले असते..

"बाबारे, काय छान गातोस.. पांडुरंगाने तुला काय गोड गळा दिला आहे.. वाटल्यास मी माझे सगळे अभंग तुला देतो.. फक्त तुझ्यातला दुजाभाव तेवढा बाजूला ठेव म्हणजे झालं..! "

-- तात्या अभ्यंकर.

मध्येच कुठेतरी हरवून जातो मी...

मध्येच कुठेतरी हरवून जातो मी.. अचानक शाळेच्याच आठवणी येऊन घेरतात..

शाळेत केलेली धमाल, मजामस्ती, वांडपणा.. अभ्यास सोडून केलेलं सर्व काही..

बाईंनी, मास्तरांनी बाकावर उभं केलं अनेकदा.. ते तेव्हाही आवडायचंच.. पण आता तर ते बाकावर उभं 
राहणं आठवलं की पार हळवा होतो मी..

वर्गात सगळी मुलं बसलेली आहेत.. आपण एकटेच बाकावर उभे आहोत.. बाई मला बाकावर उभं करून 
पुन्हा आमच्याकडे पाठ करून फळ्यावर काही लिहित आहेत.. बाईंची पाठ वळताच माझ्या इतर द्वाड 
सवंगड्यांनि मला चिडवणं.. मीही मग बाकावर उभ्या उभ्या त्यांच्या टिवल्याबावल्या करणं..

मध्येच कुठेतरी हरवून जातो मी आणि माझ्यापुढे दृश्य येतं.. वर्गाबाहेर अंगठे धरून उभा असलेला मी... 
छान रग लागायची पायाला आणि पाठीला.. 

मधल्या सुट्टीत डबे उघडल्यावर येणारा पोळीभाजीचा निरनिराळा वास.. कुणाकडे कोबी, तर कुणाकडे 
बटाट्याची भाजी.. कुणाकडे फर्मास मटकीची उसळ.. तर कुणाच्या आईनं तूप-गूळ-पोळीचा छानसा करून 
दिलेला कुस्करा .. त्या कुस्कऱ्याच्या गोडव्यात पार हरवून जातो मी..!

श्रावणी शुक्रवारी आम्ही एक-एक, दोन दोन रुपये काढून आणलेले चणे.. आणी इतर साहित्य.. मग वर्गात 
सगळ्यांनी सामुहिकपणे केलेला चणे खायचा प्रोग्राम..

मला आठवतात ती वर्गातली बाकडी.. त्या बाकड्यावर पेन्सिल्ने, खडूने काहीबाही लिहिलेलं.. तास सुरू 
असताना कधी अगदी एकाग्रतेने कर्कटकाने त्या लाकडावर केलेली छानशी कलाकुसर खूप अस्वस्थ करते 
आहे आज..!

पेन आणि पेनातली शाई.. हे तर विलक्षण हळवे विषय.. 

'तुझ्यामुळे माझ्या शर्टावर शाईचा डाग पडला..' मग मी पण त्याच्यावर माझं पेन शिंपडणार..मग आमची 
जुंपणार.. मग बाई दरडावून मध्ये पडणार..

'बाई, मी नाही.. आधी त्याने माझी खोडी काढली..'

मग बाई दोघांपैकी कुणा एकाचा, किंवा दोघांचे कान पिळणार..!

त्यानंतर आज खूप वर्ष झाली.. शर्टाला एखादा छानसा निळा शाईचा डाग पडलाच नाही..!

डस्टर, खडू आणि फळा.. या तर म्हणजे अतिशय जिव्हाळ्याच्या वस्तू होत्या. सकाळी सकाळी शाळेच्या 
डस्टरने फळा छान स्वच्छ करून सर्वात वरती एखादा छान सुविचार लिहायचा..ते फळ्याच्या डाव्या की 
उजव्या कोपऱ्यात असलेलं हजर-गैरहजर-एकूण.. असं एक लहानसं कोष्टक असायचं.. ते कोष्टक आजही 
जसंच्या तसं आठवतं..!

"ही? ही तुझी गणिताची वही आहे?? काहीही व्यवस्थित लिहिलेलं नाही.. तुझं तुला तरी समजतंय का काय 
लिहिलं आहेस ते.. ही बघा रे याची गणिताची वही.. "

असं म्हणून त्या मारकुट्या मास्तरांनी सगळ्या वर्गात उंचावून फडकावून दाखवलेली माझी गणिताची वही 
आजही जशीच्या तशी आठवते मला..आणि डोळ्याच्या कडा नकळत ओल्या होतात..

शाळेची घंटा.. जनगणमन च्या रोजच्या रेकॉर्डचे स्वर..

आजही ते स्वर दूरून कुठूनतरी ऐकू येतात.. आणि सगळ्या आठवणी जुळतात..!

-- तात्या अभ्यंकर.

July 23, 2013

आकाश पांघरूनी...


आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे
घेऊन एकतारी गातो कबीर दोहे...





संगीताच्या नावाखाली आज बराचसा सुरू असलेला थिल्लरपणा, उथळपणा, जाहिरातबाजी, रातोरात होणारे इंडियन, चायनीज, जॅपनीज आणि कुठलेकुठले आयडॉल्स, महागायक, महागायिका, महागुरु, रातोरात झालेले गौरव महाराष्ट्राचे...!

या सगळ्यांपासून दोन-पाच मिनिटं का होईना, थोडं दूर जायचं आहे? केवळ आणि केवळ तृप्ती आणि समाधान देणारं एक अतिशय साधं परंतु तितकंच सुरेख गाणं ऐकायचंय?

मग मधुकर जोशींनी लिहिलेलं, दशरथ पुजारींनी बांधलेलं आणि हळव्या स्वराच्या सुमनताईंनी गायलेलं हे गाणं कृपया ऐका..

गगनात हासती त्या स्वप्नील मंद तारा
वेलीवरी सुखाने निजला दमून वारा
कालिंदीच्या तिरी या जळ संथ संथ वाहे..

कुठे २-४ गाणी धड नाही गायलीत तर लगेच दूरदर्शनद्वारा मिळणारी डोक्यात हवा जाणारी, संगीताला घातक असणारी अनाठायी, अवाजवी प्रसिद्धी..मग लगेच मोठमोठाले झगमगटाचे दिमाखदार संगीत सोहळे, ज्यांना गाण्यातला सा देखील माहीत नाही, परंतु नाट्यचित्रसृष्टीतले केवळ सेलिब्रिटी आहेत म्हणून, परंतु संगीताच्या दृष्टीने सर्वथा केवळ अपात्र असणार्‍या व्यक्तिंच्या कॉमेन्ट्स, त्यांची कवतिकं, आणि त्याच संगीतसंध्येच्या निमित्ताने त्यांच्या नवीन येणार्‍या एखाद्या चित्रपटाची जाहिरातबाजी किंवा प्रोमोज..!

संगीतसाधना करणार्‍या माझ्या प्रिय मित्रमैत्रिंणींनो, दमलेल्या त्या वार्‍यासारखीच कदाचित तुमची अवस्था झाली असेल.. तेव्हा त्याच्याच प्रमाणे एखाद्या वेलीवर जरा सुखाने विसावा.. थोडं चिंतन-मनन करा.. केवळ आनि केवळ निखळ, निर्व्याज साधना कशी करता येईल याचा थोडा विचार करा इतकाच विनम्र सल्ला..!

भरला स्वरात त्याच्या भक्तीतला सुगंध
ओठांत आगळाच आनंद काहि धुंद
त्याच्या समोर पुढती साक्षात देव आहे

सारं जग शांत निजलेलं आहे.. कुठलीही जाहिरातबाजी, गोंगाट न करता केवळ एक एकतारी घेऊन दोहे गाणार्‍या त्या कबीराकडून खूप शिकण्यासारखं आहे.. तो फक्त स्वत:च्या समाधानाकरता, स्वानंदाकरता गातो आहे, आणि म्हणूनच पर्यायाने तो त्या श्रीहरीकरता गातो आहे.. आणि त्यामुळेच त्याच्या स्वराला भक्तीचा सुगंध आहे..

सारं जग शांत निजलेलं असताना तो श्रीहरी मात्र त्याचं गाणं तल्लीनतेने ऐकतो आहे... वर म्हटल्याप्रमणे,

त्याच्या समोर पुढती साक्षात देव आहे..!

काहूर अंतरीचे भजनात लोप होई
भक्तीत श्रीहरीच्या मन हे रमून जाई

मला किती एस एम एस मिळतील?, मी जिंकेन का?, मग लगेच मला रातोरात एखाद्या अल्बममध्ये गाण्याचा चान्स मिळेल का?..

नसू देत असं कुठलंही भयानक काहूर तुमच्या अंतरी..!

बघा बुवा पटलं तर.. नायतर द्या सोडून.. पण हे गाणं मात्र नक्की ऐका..

-- तात्या.

July 14, 2013

एकलम खाजा...

हल्ली च्यामारी गोटे कुठेच मिळत नाहीत..

आमच्या लहानपणी गोटे मिळायचे.. गोट्या नव्हेत..

गोटे.

छानसे सिमेन्टने बनवलेले गोल, गु़ळगुळीत गोटे..त्यांना 'ढप' असेही म्हणत..आम्ही सताठ जण मग रोज गोटे खेळायचो..

मातीतच गोट्याच्या आकाराची आणि तेवढीच खोल अशी लहानशी गोलाकार खळी खणायची. त्याला गल किंवा गली म्हणत..

मग सर्वांनी एका ठराविक अंतरावरून त्या गलीच्या दिशेने चकायचं.. ज्याचा गोटा गलीच्या जास्ती जवळ जाईल त्याची पहिली पाळी..

सुरवातीची एकलम खाजाची गल कंपलसरी.. एकलम करण्यापूर्वी वीतेला परवानगी नाही..एकलम झाल्यानंतर मग वीत घेऊन गोटा मारायला परवानगी.. त्यातदेखील वीत ढापणं हा प्रकार असे. हळूच, सगळ्यांच्या नकळत करंगळीच्या पुढे आंगठा टाकायचा आणि वीत वाढवायची..त्याला वीत ढापणं असं म्हणत.. मग 'ए..वीत ढापतो का रे..? या वरून भांडणं..

एकदा एकलम झाला की मग दोन नंबर पासून ते दहा नंबरापर्यंत म्हणजे धोबीराजा पासून दस्सी गुलामापर्यंत दुस-यांचे गोटे मारायचे.. गल भरून देखील नंबर वाढवत येत असे..

मग अकरा नंबर म्हणजे अक्कल खराटाला गल कंपलसरी.. तिथे चुकून जर कुणाच्या गोट्याला टोला मारला तर पुन्हा पनिशमेन्ट म्हणून एकलमपासून खेळायचं. अक्क्लची गल जशी कंपलसरी तसं बाराचा म्हणजे बक्कल किंवा बाल मराठाचा टोला कंपलसरी..तिथे जर चुकून गोटा गल्लीत गेला तरी पुन्हा एकलमची पनिशमेन्ट..

एकलमच्या गलीआधीपासून ते एकलम झाल्यापसून ते बक्कलपर्यंत केव्हाही जर दुस-याच्या गोट्याला टोला मारून आपला गोटा जर गल्लीत गेला तर कॉम्प्लीमेन्टरी सुटका..!

या खेळातल्या १ ते १२ आकड्यांची नावंही मजेदार होती. मला आज ती इतक्या वर्षांनीही जशीच्या तशी आठवतात..

एकलम खाजा
धोबी राजा
तिराण बोके
चारी चौकटे
पंचल पांडव
सैय्या दांडव
सप्तक टोले
अष्ठक नल्ले
नवे नवे किल्ले
दस्सी गुलामा
अक्क्ल खराटा
बाल मराठा..

अशी छान यमकबिमक असलेली नावं होती..शिवाय साईड सबकुछ, नो कुछ, हलचूल..असे काही खास परावलीचे शब्दही होते..

सर्वात शेवटी जो उरेल त्याच्यावर पिदी.. त्याने शिक्षा म्हणून धावत जाऊन तीन लांब उड्या मारायच्या. तिसरी उडी जिथे पडेल तिथे त्याने आपला गोटा ठेवायचा. इतरांनी मग त्याच्या गोट्याच्या जास्तीत जास्त जवळ जाईल असं चकायचं आणि त्याचा गोटा मारायचा..पुन्हा मग पिदी सुरू.. एखाद्याला पिदवणे..त्यावरून पिदी हा शब्द पडला असावा.. जेव्हा कुणाचाच गोटा लागणार नाही तेव्हाच त्याची पिदीची शिक्षा पूर्ण व्हायची आणि मग पुन्हा सगळ्यांनी चकून नवा डाव सुरू करायचा..एखाद्याची एकलमची गलदेखील भरली गेली नसेल तर त्याच्यावर डबल पिदी..पिदीचा गोटा ठेवल्यावर जर चकताना कुणाचा डायरेक्ट नेम लागला तर ६ उड्यांची पिदी..!

काय साली मजा यायची हे गोटे खेळताना..! कुठल्याही वाण्याकडे हे गोटे अगदी सहज मिळत.. मला ती हे सिमेन्टचे गोटे भरलेली वाण्याकडची काचेची बरणी आजही आठवते, डोळ्यासमोर दिसते..!

टणट्णीत सिमेन्टच्या गोट्याने दुस-या गोट्याला नेम मारताना जाम मजा यायची.. कडक मस्त असा आवाज यायचा.. उकिडवं बसून डावा हाताचा आंगठा जमिनीवर टेकून डाव्या हाताच्या मधल्या बोटात उजव्या हाताने गोटा धरून कडक नेम मारायचा..

तेव्हा आम्हाला आता मिळतात तसे मोठमोठ्या मॉलमधून घेतलेले महागडे छान छान रंगीत कपडे नव्हते.. साधी हाफ प्यॅन्ट आणि गंजीफ्रास..खेळता खेळता अगदी भरपूर मळून जायचे हे कपडे..कारण घामेजलेले मातीचे हात हाफप्यॅन्टीला किंवा गंजिफ्रासालाच पुसायची साधीसोपी रीत होती तेव्हा.. स्वच्छतेच्या अतिरेकाच्या वगैरे भयानक कल्पना नव्हत्या....

"तंदुरुस्ती की रक्षा करता है लाईफबॉय, लाईफबॉय है जहा तंदुरुस्ती है वहा.." हे छानसं गाणं म्हणत अतिशय साधीसुधी अशी लाईफ बॉयची अंघोळ करायची पद्धत होती...

आज मला कुठेच कुणी मुलं हे गोटे खेळताना दिसत नाही याचं दु:ख होतं खूप. वाईट वाटतं..

स्वतःच्या घरी छान छान एसीमध्ये बसून अत्यंत कृत्रीम असे संगणकीय व्हिडियो गेम की कुठलेसे खेळ खेळायची पद्धत आहे आता..

चालायचंच.. कालय तस्मै नमः..

काळाच्या ओघात आमचे एकलम खाजा, धोबीराजा कधी, कुठे नाहिसे झाले, कुठे हरवले ते कळलंच नाही..!

-- डब्बल पिदितला तात्या.

July 02, 2013

ओले अंजीर आणि बेळगावी कुंदा..!

एकदा सहजच अण्णांना भेटायला कलाश्रीमध्ये गेलो होतो. बाहेरच्या खोलीत अण्णा निवांतपणे बसले होते. 'काय कसं काय, मुंबई काय म्हणते, केव्हा आला ठाण्याहून..' असे जुजबी प्रश्न अण्णा विचारत होते. जरा वेळाने तेथे वत्सलाताई आल्या. त्यांनी मला ओले अंजीर दिले. अतिशय गोड आणि सुरेख होते.. मी ते अंजीर पटापट मटकावले परंतु मला प्रश्न असा पडला की त्याची देठं टाकायची कुठे? मग बाहेर जाताना ती सोबत न्यायची आणि टाकून द्यायची असं मी ठरवलं आणि तसाच बसून राहिलो..

माझी चुळबुळ वत्सलाताईंच्या लक्षात आली.. 

'माझ्याजवळ द्या ती देठं इकडे.. मी टाकते.."

त्या इतक्या सहजतेने म्हणाल्या की मलाच ती देठं त्यांच्या हातात देतांना अवघडल्यासारखं वाटलं..

"यांना तो बेळगावी कुंदापण दे.." अण्णा म्हणाले..

ताईंनी लगेच तत्परतेने आत जाऊन माझ्याकरता तो कुंदा आणला..

मग निरोप घेतला..

अण्णांनी विचारलं, "कसे जाणार?" 

अण्णांना एकूणच रस्ते, गाड्या यात विलक्षण इंटरेस्ट.. :)

"साडेचारची कोयना आहे.. ती पकडणार.."

हां हां बरोबर.. कोयना आठपर्यंत जाईल ठाण्याला.."

जगभर प्रवास केलेल्या अण्णांनी 'मी कोयना एक्सप्रेस पकडून ठाण्याला जाणार..' या प्रवासातदेखील इतकी उत्सुकता दाखवली की मला गंमतच वाटली..! :)

असो.. आता फक्त आठवणी आहेत..!

तात्या.

July 01, 2013

बुड बुड घागरी.. :)

स्नान, अंघोळ आणि तिचे नानाविध प्रकार आणि नानाविध रुपं..

"छ्या लेका दूर हो..४-४ दिवसात अंघोळ कर नाहीस.." इथपासून ते रोज छान छान श्रीमंती टबात ऊन ऊन पाण्यात अंघोळ करणारे..!

मुंबै उपनगरी रेल्वेतून जाताना बरेच वेळा काही भय्ये साधारणपणे लालसर चड्डीवर अंघोळ करताना फार सुरेख दिसतात.. डोक्याला शांपूबिंपू असली श्रीमंती भानगड नाही. ‌साबणच लावतात डोक्याला आणि थंड पाण्यानेच अंघोळ करतात..

पण मी एक पाहिलं आहे.. बारा महिने थंड पाण्याने अंघोळ करणारे बरेचवेळा स्वताःचीच बढाई मारताना दिसतात..

"कितीही थंडी असो.. मी बारा महिने थंड पाण्याने अंघोळ करतो..ह्या ह्या ह्या... "

अशी फुशारकी मारतात..

अंघोळ.. एक प्रसन्न प्रकार..

पूर्वी बंब असायचे. झकासपैकी कढत कढत पाणी देणारे बंब.. आता गिझर, गॅसगिझर आले..

'काय पण म्हणा.. बंबातल्या पाण्याने अंघोळ करायची मजाच वेगळी.. ' हे म्हणणारे आता फार कमी राहिलेत..

उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला मनसोक्त केलेली विहिरी-नदीतली अंघोळ.. व्वा..! आडातलं पाणी बाकी काय आल्हाददायक गार असतं..!

गंगा-गोदावरी आदी तिर्थात केलेली अंघोळ.. हरिद्वार-अलाहाबाद आदी कुंभात केलेली अघोळ... व्वा..!

सहज लिहायला बसलो.. पण किती प्रकार सुचताहेत अंघोळीचे.. साला, लेखणी प्रसन्न आहे आपल्याला.. भाईकाकांचा भक्कम आशिर्वाद आहे.. :)

ब्राह्मणात नाही, पण इतर बऱ्याच जातीत मयताला घालतात ती अंघोळ.. तेव्हाची रडारड.. भसाभस पाणी ओतत असतात त्या मयतावर.. त्याला बिचाऱ्याला पत्ताच नसतो.. माझ्या ओळखीच्या एका म्हाताऱ्याचं मयत. चमत्कारिक कुबड होतं त्या बिचाऱ्याला. त्याच्या पायावर पाणी घातलं की तो डोक्याकडनं उठून बसायचा.. आणी डोक्यावर पाणी घातलं की पाय वर करायचा..!

लहानपणीची आई-आज्जीने घातलेली काऊचीऊची अंघोळ.. नंतर तीट-पावडर.. व्वा..!

नरकचतुर्दशीची दिवाळीच्या पहाटे छान सुगंधी तेल-उटण्याचं अभ्यंग स्नान..

डोक्याला छान खोबरेल तेल लावून छान कढत पाण्याने बहिणीने घातलेली भाउबिजेची अंघोळ..!

"अरे जा आता अंघोळीला.. "

"हे काय, तुमची अंघोळ वगैरे झाली वाटतं.. "

"आज पाणी नाही.. अंघोळीला बुट्टी.. "

"लांबून प्रवासाहून आलाय. घ्या जरा अंघोळ वगैरे करून.. आमटीभात तयार आहे.. "

"साल्याच्या नावाने अंघोळ केली.. "

अंघोळीच्या बाबतीतले असे असंख्य संवाद..

एक अंघोळ मात्र खूप उदास. नकोशी वाटणारी.. स्मशानात अग्नी देण्यापूर्वीची किंवा मयताहून आल्यानंतरची अवेळी अंघोळ..

पण त्या अंघोळीने आप्तस्वकियांच्या आठवणी, त्यांचे प्रेमळ स्पर्श, त्यांची शाबासकी, माया, ममत्व.. कधीच वाहून जात नाही. बादलीभर पाण्याची ती ताकद नाही..!

बराय तर मंडळी.. पाणी तापलं आहे. आलोच दोन तांबे घेऊन..! :)

-- तात्या अभ्यंकर.