November 14, 2014

नीता रेवणकर..


सातवी-आठवीत असेन काहीसा.. तिचं आडनाव रेवणकर.. नीता रेवणकर.. वर्गात होती माझ्या.. छान दिसायची.. उजळ.. बोलके डोळे.. दोन वेण्या.. आणि शाळेतल्या मुलींच्या निळ्या-पांढ-या गणवेषातली..

छान दिसायची अगदी..

मी ब-याचदा तिच्याकडे पाहात बसायचो.. हळूच लाईन मारायचो तिच्यावर.. :)

कुठल्यातरी एका श्रावणी शुक्रवारी वर्गातल्या सगळ्या मुलांचा चण्यांचा बेत असायचा.. मग आम्ही मुलंच एक एक दोन दोन रुपये वर्गणी काढायचो..मग त्यातून चणे आणायचे..कांदा, मिरची, कोथमिर.. मग ते सगळं छान एकत्र करायचं आणि सगळ्यानी चणे खायचे.. :)

"ए तू येतोस आमच्यासोबत चणे आणायला..? मी आणि कुसुम चाललो आहोत.."

आई ग्गं.. आयुष्यात माझ्याशी पहिल्यांदा बोलली होती ती..!

तेव्हा FB असतं तर feeling awesome असं स्टेटसं टाकलं असतं.. पण मरायला १९८० साली कसलं आलंय FB..? :)

पुढे कॉलेजात अनेक जणीना बिनाधास्त भिडलो.. फ्रेंडशिप मागितली, इंट्रो मागितले.. होकार घेतले, नकार पचवले..! :)

पण सातवीतल ते वय.. तेव्हा फक्त ती आवडायची.. बस इतकंच.. डायरेक्ट भिडायचं वगैरे ते वय नव्हतं..! :)

पुढे आमचे वर्ग बदलले..

पण believe me.. आज इतक्या वर्षानंतरही श्रावणातल्या एखाद्या शुक्रवारी तिची आठवण येते.. तिचा निरागस चेहेरा डोळ्यासमोर येतो..

"ए तू येतोस आमच्यासोबत चणे आणायला..? मी आणि कुसुम चाललो आहोत.."

हेही आठवतं..! :)

उजळ.. बोलके डोळे.. दोन वेण्या.. आणि शाळेतल्या मुलींच्या निळ्या-पांढ-या गणवेषातली.. नीता रेवणकर..

मी हळूच लाईन मारायचो तिच्यावर.. :)

-- तात्या अभ्यंकर..

November 06, 2014

भटुरड्यांची फुकटची शेखी..!

भटुरड्यांची फुकटची शेखी..!

न ला न आणि ण ला ण म्हणणारा मुख्यमंत्री :

अलीकडे ही नवीनच शेखी मी ऐकतो आहे.. आणि ही फुकटची शेखी मिरवणार्‍यांना यातून असे सुचवायचे आहे की 'बघा..! आता ब्राह्मण मुख्यमंत्री झाला.. आता तो शुद्धच बोलणार..!"

इथे एक गोष्ट नमूद करू इच्छितो की मी स्वत:ही अगदी चित्तपावन कोकणस्थ ब्राह्मण आहे..परंतु मी केवळ ब्राह्मण आहे म्हणून मला दोनच्या ऐवजी तीन गोट्या आहेत आणि माझा बाबूराव सोन्याचा आहे असा माझा कोणताही गैरसमज नाही..! :)

परंतु माझेच काही ज्ञातीबांधव सध्या ही जी काही न आणि ण ची शेखी मिरवत आहेत.. ते मात्र हास्यास्पद आहे..

मुळात बोलीभाषा ही कुणाच्याही बापाची खाजगी मालमत्ता नाही.. ठीक आहे.. लिहिताना एक प्रमाणभाषा असावी, व्याकरणाचे काही नियम असावेत हे मीही मानतो..

परंतु बोलीभाषेत देखील आम्ही न ला न म्हणतो..आणि ण ला ण म्हणतो.. आणि इतरांनीही तेच करावे नाहीतर आम्ही त्यांची शेलकी कुचेष्टा करणार.. हा काय प्रकार आहे..??

बोलीभाषेचे एक आपले वेगळे सौंदर्य आहे.. प्रत्येक बोलीभाषेची स्वत:ची एक गोडी आहे.. मग तिथे न चा ण किंवा ण चा न होऊ शकतो.. त्यात केवळ ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून बहुजनांची कुचेष्टा करणे हा केवळ माज आहे..!

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय.. या प्रश्नावर..

आरं संगतीनं तुज्या मी येनार नाय..

हेच उत्तर हवं.. नाहीतर सगळ्या गाण्याचीच चव बिघडेल..!

माझा आगरी मित्र मला जेव्हा असं म्हणतो की.. "तात्या..तुंज्याकरता मोहाची आनतो आनी तुला मांदेली फ्राय पन खाऊ घालतो..

येव्हा त्या आनी आणि पन मधला न हा माझ्या कानाला सर्वाधिक गोड लागतो..!

-- (भाषावेल्हाळ) तात्या अभ्यंकर..

--------------------------

पोस्ट ढापणार्‍यांकरता एक विनम्र सूचना - पोस्ट अवश्य ढापा परंतु एकाच बापाचे आहात याची खात्री असेल तर कृपया पोस्ट ढापल्यावर माझे नावंही पोस्टच्या खाली लिहा..

-- (मूळ पोस्टकर्ता) तात्या.. :)

November 05, 2014

एक घाव दोन तुकडे...

व्यक्तिश: मला तरी शाटमारी असं वाटत नाही की सेनेने केलेली १० मंत्रीपदाची मागणी कमळी मान्य करेल..!

पण मला हेही कळत नाहीये की अजूनही सेनावाले वारंवार भाजपाशी हात मिळवण्याची स्वप्न का बघत आहेत..?

एक तर स्वबळावर लढून बहुमतच्या आसपासही नाही.. शिवाय भाजपाच्या तुलनेत फक्त अर्धे आमदार आले ही FACT आहे.. आणि दुसरं म्हणजे निवडणुकांपूर्वीच जी युती रीतसर तुटली आहे ती पुन्हा असं अर्ध्या आमदारांनिशी लाचार होऊन जोडण्यात काय अर्थ..?

मी पक्षप्रमुख असतो तर 'गाढवाच्या बोच्यात गेली ती सत्ता..जनतेचा कौल मान्य.. आम्ही विरोधात बसू..!' असं पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितलं असतं..!

५ वर्षांनी काही फरक पडत नाही.. पुन्हा नव्या जोमाने काम करू..पक्ष बांधू.. आई एकविरा पाठीशी आहेच..! असं सांगून मोकळा झालो असतो..!

बाळासाहेबांनी आम्हाला हाच बाणा शिकवला आहे.. परंतु सध्या उद्धव ठाकरेंचे हे जे तळ्यात-मळ्यात सुरू आहे, हे एक जुना शिवसैनिक म्हणून निदान मला तरी पसंद नाही..

भले चूक असो की बरोबर.. एक घाव दोन तुकडे..हीच खरी आमच्या जुन्या शिवसेनेची ओळख..!
असो..

-- (कंटाळलेला) तात्या..

November 04, 2014

ब्राह्मण-बहुजन वगैरे..!

व्यक्तिगत माझ्यापुरतं बोलायचं झालं तर देवेन्द्र ब्राह्मण आहे म्हणून मला त्याच्याबद्दल प्रेम नाही आणि नाथाभाऊ बहुजन आहेत म्हणून त्यांच्याबद्दल रागही नाही..

जो तो आपापल्या जागी मोठा आहे.. मला ब्रह्मणही प्रिय आहेत तेवढेच बहुजनही प्रिय आहेत..

कुणाचाच दुस्वास नाही.. दुस्वास करायचाच झाला तर तो मी फक्त ओवेसीचा करेन. ते सुद्धा तो केवळ मुसलमान आहे म्हणून नव्हे तर हिंदूंना कापून काढायची त्याची आणि त्याच्या भावाची राक्षसी महत्वाकांक्षा आहे म्हणून..!

दुस्वास करायचाच असेल तर तो मी अबू आझमीचा करेन.. कारण तो महाराष्ट्र आणि मुंबैचा द्वेष्टा आहे म्हणून..

एरवी आमच्या फोरासरोडवरचे अनेक मुसलमान मला तितकेच प्रिय आहेत..

राहता राहिला प्रश्न देवेंद्रला मुख्यमंत्रीपद मिळण्याचा तर ते त्यांना रीतसर लोकशाही पद्धतीनुसार मिळाले आहे असंच मी मानतो..

धन्यवाद.. माझ्यापुरता हा विषय संपला आहे..

-- तात्या बंदरकर,
मुंबै मच्छिमार समिती.. :)

आपण फक्त आपल्यापुरतं बोलावं...

हम्म.. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून आणि नाथाभाऊंनी केलेल्या विधानापासून एकंदरीतच गेल्या दोन दिवसात FB वर ब्राह्मण-बहुजन असा बराच राडा वाचायला मिळाला..

असो..

प्रत्येकाची मतं.. प्रत्येकाचे विचार...

माझ्यापुरतं बोलायचं तर आमचे गुरुवर्य पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या आज्ञेनुसार जातीपाती या फक्त खाद्यपदार्थांपर्यंतच मर्यादित असाव्यात हेच मी मानतो.. जातीपाती टिकाव्यात..परंतु त्या फक्त खाण्यापिण्यापुरत्या..

म्हणजे ब्राह्मणाकडे अळूचं फदफदं, डाळिंबी उसळ.. कायस्थाकडे वालाचं बिरडं, कानवले.. एखाद्या बावनकशी शाण्णव कुळी मराठ्याकडे झणझणीत मटण.. एखाद्या कुडाळ देशकराकडे तिरफळं घातलेलं बांगड्याचं कालवण..तर एखाद्या कोळ्याकडे किंवा आगर्‍याकडे त्यांच्या पद्धतीचं मटण किंवा मग सुक्या बांगड्याचं भुजणं..!

बास.. जातीपाती या इतपतच असाव्यात..

असो..

पण गेल्या दोन दिवसात FB वर एकंदरीतच जी काही गरळ वाचायला मिळाली त्याने जरा दु:खी झालो आहे.. अर्थात, मला दोष कुणालाच द्यायचा नाही.. प्रत्येकाची मतं.. आपण फक्त आपल्यापुरतं बोलावं...

-- (जातीने ब्राह्मण, मनाने कोळी) तात्या वेसावकर.. :)

October 30, 2014

अरुणा शानभाग..

चामारी.. एकंदरीत अंबानी रुग्णालय आणि के ई एम च्या रुग्णालयासंबंधीची माझी पोस्ट भन्नाटच चालली म्हणायची..

आत्तापर्यंत जवळपास शेकडो shares आणि whats up वर धुमाकूळ घातलाय या पोस्टने...

असो.. तरीही अगदी पहिल्यांदा ज्याने ही पोस्ट माझं नाव वगळून चोरली त्याला मी धन्यवादच देईन..

कारण एकच की त्या निमित्ताने गेली ३५ वर्ष के ई एम रुग्णालयात खिचपत पडलेल्या, मृत्यूची वाट पाहणार्‍या त्या बिचार्‍या दुर्दैवी अरुणा शानभागची निस्वार्थी परंतु आपुलकीची सेवा-शुश्रुषा के ई एम च्या परिचारिका करत आहेत ही गोष्ट पुन्हा एकदा social media मध्ये फिरली हेही नसे थोडके..

आजवर के ई एम रुग्णालयाच्या आसपास अनेकदा जाऊनही, के ई एम मध्ये ओळख असूनही आणि इच्छा असूनही त्या अरुणा शानभागला बघायला जाण्याचा धीर मला झालेला नाही..!

सोनीवर क्राईम पेट्रोल मध्ये या अरुणा शानभागच्या सत्यकथेवर एक भाग अतिशय संवेदनशीलतेने चित्रित केला होता तो पाहून मात्र मोकळा रडलो होतो..

असो..

-- तात्या अभ्यंकर..

July 11, 2014

आक्कामावशी...

आदरणीय गुरुवर्य भाईकाका...

शिरसाष्टांग नमस्कार....

एक छोटेखानी व्यक्तिचित्रं लिहायचा प्रयत्न केलाय तेवढा गोड मानून घ्या.. माझ्या गणगोतातली आक्कामावशी..!

तिचं हे व्यक्तिचित्रं तुम्हाला समर्पित...

--------------------------------------------------

आक्कामावशी दारावर यायची.. आम्ही तिला आक्कामावशी म्हणायचो.. एका मोठ्या टोपलीत नाना प्रकारची शेव, फरसाण, मस्का खारी आणि नानकटाई असं घेऊन आक्कामावशी यायची आणि दारोदार विकायची.. तिच्या त्या टोपलीतच दोन तव्यांचा तराजूही असे..

तुम्ही काय शेव, फरसाण घ्याल ते वजन करून कागदातच बांधून द्यायची.. सोबत तो लाँड्रीमध्ये असतो तसा दोर्‍याचा एक मोठा गुंडा असे.. प्लॅस्टिकच्या पिशव्या नाहीत की स्टॅपलर नाही..! :)

"शेव देऊ का रे..? खाऊन तर बघ..."

"आजची भावनगरी.. एकदम मस्त.. खाऊन तर बघ.."

"अरे नानकटाई देऊ का..? एकदम ताजी आहे.. तोंडात विरघळेल.."

आक्कामावशीचं मार्केटिंग मस्त असायचं.. सोबत प्रत्येक गोष्टीचं आमच्या हातावर सँपल ठेवायची.. :)

"अगं आक्कामावशी.. आता कशी काय आलीस तू..? बघतेस ना.. दफ्तर भरतोय..."

आकाशवाणी मुंबई ब वर कामगार विश्व संपलेलं असायचं आणि नंदूरबारचे वगैरे बाजारभाव सांगत असायचे.. आमची पांढरा शर्ट आणि खाकी हाफ पॅन्ट चढवून झालेली असायची.. दफ्तर भरायचा कार्यक्रम सुरू असायचा..

"अरे ते पलीकडचे जोशी आहेत ना.. त्यांच्या घरी रेडियोवर 'तुझे गीत गाण्यासाठी..' हे गाणं लागलं होतं.. तेवढी ऐकत बसले बघ.. म्हणून उशीर झाला.."

आक्कामावशी मनमोकळेपणाने उशीर होण्याचं कारण सांगायची..

आमचं घर काय, जोश्यांचं काय, भडसावळ्यांचं काय.. आक्कामावशीचा सर्वत्र हक्काचा राबता होता...

"आज शाळेत डबा काय नेतो आहेस रे..?"

"अगं मावशी.. आज फोडणीची पोळी आहे.."

हे ऐकल्यावर आक्कामावशीने लगेच मूठभर शेव कागदात बांधून दिली..

"दुपारी डबा खाताना तुझ्या त्या फोडणीच्या पोळीवर ही शेव घाल.. छान लागेल.." असं म्हणून छानशी हसलेली आक्कामावशी मला आजही जशीच्या तशी आठवते...!

असाच एक दिवस.. आज आक्कामावशीच्या डोक्यावरच्या त्या टोपलीसोबत हातात एक दुधाची बरणीही होती..

"आई आहे का रे घरात..? उत्तम चीक आणलाय बघ.. खरवस करून खा.."

मध्येच केव्हातरी आक्कामावशी उत्तम प्रतीचा चीक आणायची.. मग काय आमची मजाच मजा.. छान वेलची, जायफ़ळ वगैरे घातलेला गुळाचा उत्तम खरवस खायला मिळायचा.. :)

"मेल्या खरवस खाऊन वर लगेच भसाभसा पा़णी नको पिऊस हो.. नाहीतर मारशील रेघा... हा हा हा.."

मनमुराद, निष्पाप हसायची आक्कामावशी..!

असाच एक दिवस.. बाहेर गडबड ऐकू आली म्हणून डोकावलो तर शेजारच्या भडसावळ्यांना फीट आली होती.. नेमकी तेव्हाच आकामावशीही आली होती.. भडसावळे जमिनीवर आडवे पडून थरथरत होते...

आक्कामावशीने ताबडतोब प्रसंगाचा ताबा घेतला...

"धाव जा पहिला आणि कंगवा घेऊन ये.."

"स्मिता..कांदा आण एक फोडून पटकन..!"

आक्कामावशी आम्हा सगळ्यांना हक्काने आदेश देऊ लागली..  लगेच तिने भडसावळळ्यांचा तोंडात कंगवा घातला.. फोडलेला कांदा नाकाशी धरला.. हातपाय रगडले.. डॉक्टर येईस्तोवर आक्कामावशीच आमची MD FRCS होती...!

कोण होती हो आक्कामावशी..? कुठली होती..?

माहीत नाही...!

कुलकर्ण्यांच्या मुलाच्या लग्नात आक्कामावशी आली होती.. कुलकर्ण्यांनी तिला खास आमंत्रण दिलं होतं..!

मधोमध किंचित सुदृढ आक्कामावशी आणि वरवधू यांचा एक फोटोही काढल्याचं आठवतंय मला..!

आमची पंगत बसली होती.. बघतो तर श्रीखंडाचं पातेलं घेऊन आक्कामावशी येत होती आग्रह करायला..!

माझ्या पानात चांगलं भरभक्कम श्रीखंड वाढत म्हणाली...

"अरे घे मेल्या.. संपवशील आरामात.. लाजतोस काय..?"

दारावर येणारी, शेव फरसाण विकणारी आक्कामावशी..

भडसावळ्यांच्या फीटवर उपचार करणारी आक्कामावशी...

जोश्यांच्या घरी घटकाभर बसून 'तुझे गीत गाण्यासाठी..' ऐकणारी आक्कामावशी...

माझ्या फोडणीच्या पोळीवर मूठभर शेव बांधून देणारी आक्कामावशी...

कुलकर्ण्यांच्या मुलाच्या लग्नात घरचं कार्य समजून श्रीखंडाचा आग्रह करणारी आक्कामावशी...!

पण काय गंमत असते पाहा.. आक्कामावशी दारावर यायची तेवढीच तिची आठवण असायची.. ती केव्हापासून येत नाहीशी झाली हे कळलंच नाही...!

आता आक्कामावशी कुठे असेल हो..?

असेल की नसेल..?..!

आक्कामावशी.. ये की गं फरसाण घेऊन..

आक्कामावशी.. लवकर ये.. तुला बाबूजींची 'तुझे गीत गाण्यासाठी..', स्वर आले दुरुनी..' अशी म्हणशील ती गाणी ऐकवतो..

काय गं आक्कामावशी.. आकाशवाणी मुंबई ब चा कामगार विश्व कार्यक्रम, ते नंदूरबारचे बाजारभाव...यांच्यासोबत काळाच्या ओघात तूही कुठे नाहीशी तर झाली नाहीस ना..??.

आक्कामावशी.. आज फोडणीची पोळी केल्ये.. थोडी शेव हवी होती गं...!

-- तात्या अभ्यंकर..

June 30, 2014

घनःशाम सुंदरा श्रीधरा..

घनःशाम सुंदरा श्रीधरा..

हे गाणं किती सुरेख आणि सात्त्विक आहे हे मी आजपर्यंत अनेकदा शब्दात मांडायचा प्रयत्न केला..परंतु प्रत्येक वेळा लिहिलेले कागद चुरगाळून टाकले..संपूर्ण लिहायला कधी जमलंच नाही..!

काय शब्द योजावेत, होनाजींच्या काव्यावर लिहावं, की वसंतराव देसाईंच्या चालीवर लिहावं? गायकीवर लिहावं, की दीदी आणि पंडितराव नगरकर यांच्या सुरांवर लिहावं..? त्यातल्या भूपावर आणि किंचितश्या देसकारावर लिहावं..की त्या गाण्यात असलेल्या कमालीच्या प्रसन्नपणावर लिहावं..?. काही समजतच नाही...!

आजपर्यंत मी देवमाणूस हा शब्द ऐकला आहे.. त्याच शब्दाचा आधार घेऊन मी पंडितराव नगरकरांच्या गळ्याला देवगळा असं म्हणेन..या माणसाच्या गळ्यात जगातली सगळी सगळी सात्त्विकता भरून राहिली होती हो..!

जाता जाता एकच म्हणावंसं वाटतं.. की साक्षात श्रीकृष्णाने सरस्वतीच्या अंगणात छान सडासंमार्जन करून सुरालयीची घातलेली सुरेख रांगोळी म्हणजे हे गाणं..!

-- तात्या अभ्यंकर..

June 28, 2014

बिती ना बिताई..

आयुर्विमा महामंडळाच्या एका बड्या साहेबांनी आज मला त्यांची गाडी आणि चालक दिला..

"तात्या.. जा.. आज गाडी तुझी..!"

ठाण्याहून गाडी घेऊन थेट निघालो तो डायरेक्ट पंचमदांचा घरासमोर..!

स्वस्थपणे ५-१० मिनिटं एकटाच उभा होतो त्यांच्या घरासमोर.. 

जिंदगी के सफर में
मुसाफिर हु यारो..
कुछ तो लोग कहेंगे
रैना बिती जाए
बिती ना बिताई रैना
इस मोड से जाते है..

कित्येक गाणी रुंजी घालू लागली कानात.. 

तिथून निघालो तो थेट जुहू किनार्‍यावरील किशोरदांच्या घरापाशी..!

कारण किशोरदा, पंचम, गुलजार... हे सगळे एकच आहेत..यांचा आत्मा एकच आहे..शरीरं वेगवेगळी आहेत..! 

मला माहीत नाही..कुठल्या जन्मीचे ऋणानुबंध हे...!

ही मंडळी तुम्हा-आम्हाला किती आनंद देऊन गेली... आपण वर्षातून एकदा ५ मिनिटं पण त्यांच्याकरता काढू नयेत..?..!

किशोरदांच्या घरासमोरच्या समुद्राच्या पुळणीवर एकटाच उभा होतो ५ मिनिटं...

समोर अंधारलेला समुद्र... त्याची गाज.. पाऊस नाही... वातावरण कोंडलेलं.. खूप घुसमटलेलं..!

पाऊस पडायला हवा जोरदार.. मुसमुसून..हमसूनहमसून.. छान..मोकळा.. धुवाधार...!

पंचमदा, किशोरदा...बाबूजी..भीमण्णा... सगळे सगळे खूप अस्वस्थ करतात मला.. ही माणसं मला भरपूर छान कोवळं ऊन देऊन गेली.. शीतलछाया देऊन गेली...मनमुराद पाऊस देऊन गेली...

तरीही पुन्हा पुन्हा तृषार्त वाटतं.. छे..! खूप पाऊस पडायला हवा आहे... वातावरण मोकळं हवं आहे.. कुणाच्यातरी खांद्यावर डोकं ठेऊन मनसोक्त रडायचं आहे मला.. त्यानंतरचा मोकळेपणा हवा आहे मला.. त्या रडण्यातलं समाधान हवं आहे मला..!

"वो गोलिया क्या खतम हो गई..?"

परिचय या चित्रपटात डॉक्टरांच्या या प्रश्नावर हरिभाई उत्तरतो..

"सासे खतम हुई..!"

परतीच्या वाटेवर होतो.. कानात 'बिती ना बिताई..' सुरू होतं..!

-- तात्या अभ्यंकर..

June 15, 2014

पुरिया...

पुरिया रागाचा स्वभाव आणि आमच्या भीमण्णांचा स्वभाव यात नेहमीच मला एक साम्य दिसत आलेलं आहे..

धीरगंभीर, टक्केटोणपे खाल्लेला, अनुभवी असा एक बुजुर्ग पुरिया..

जो मूलत: अबोल आहे.. सततचं फक्त आत्मचिंतन.. आणि त्यायोगे स्वत:मधल्या आत्मिक शक्तिचा सतत विकास..!

पुरिया.. एक तेजस्वी योगी.. जो चाललाय आपल्याच वाटेने.. आपलीच वाट शोधत...

चेहेर्‍यावर एक आश्वासक परंतु घनगंभीर भाव.. एक निर्भयता...

उगीच कुठे हॅ हॅ नाही.. की हू हू नाही..

काही गहन प्रश्न विचारावा.. आणि अगदी मोजक्याच शब्दात परफेक्ट उत्तर यावं असा पुरिया.. उगीच कुठे भारंभार चर्चा नाहीत की परिसंवाद नाहीत...!

अण्णाच एकदा म्हणाले होते,

मी आणि माझं संगीत.. आम्ही प्रवासी आहोत.. अनोळखी वाटेवरचे..! आकाशाची उंची, सागराची खोली उगाच कशाला तपासून पाहा..?

अण्णा.. आणि अण्णांचा पुरिया...!

एक अद्वैत..!

अण्णा.. आणि अण्णांचा पुरिया...!

माझ्या आयुष्यातला एक अनमोल ठेवा..

सावल्या लांबतील... तिन्ही सांजा होतील... तंबोरे लागतील... आणि कोमल रिखबाला अगदी हलका स्पर्श करून अण्णा शुद्ध निषादावर कृपा करतील आणि त्याच्यावर विसावतील..

ज्यावरून तानपुर्‍यातला निषाद जुळवावा.. असा तेजस्वी निषाद..!

आणि पुरियाची व्रतस्थ वाट सुरू होईल...!

-- तात्या अभ्यंकर..