January 25, 2015

in built यूट्यूब किंवा mp३ player..!

माझ्या मते एखाद्याचा मृत्यू आपल्या मनाला जिंकू शकत नाही..

ठीक आहे..काळाच्या ओघात काही पानं..काही व्यक्ती विस्मृतीत जाऊ शकतात. थोडी धूळ जमू शकते.. परंतु एखादी आठवण, एखादी घटना, एखादा वास, एखादं गाणं. क्षणात ती धूळ पुसून टाकतं आणि ती अगदी २५-३० वर्षांपूर्वी गेलेली व्यक्ती जशीच्या तशी आपल्यासमोर उभी राहते..

मग तो प्रसंग, त्या व्यक्तीची ती आठवण जशीच्या तशी आपल्याला दिसते..ऐकू येते..आणि त्याकरता यूट्यूब किंवा mp३ player असं कुठलंही बाह्य साधन लागत नाही..

निसर्गानं ते यूट्यूब किंवा mp३ player आपल्या मनाला in-built दिलेलं असतं..!

अर्थात.. इथे मला मृत्यूला कुठेही degrade करायचं नाही.. त्याच्यासारखा दुसरा सखा नाही हेही तितकंच खरं..

असो.. मृत्यू या संकल्पनेविषयी पुन्हा केव्हातरी..

तूर्तास तुम्ही या रम्य सकाळी एखाद्या कसदार गायकाचा सात्विक अहिरभैरव ऐका.. तो तुम्हाला बरंच काही शिकवून जाईल..तुमच्याशी संवाद साधेल..आपल्या रागसंगीतात ती ताकद आहे..

वाटल्यास.. मन्नदांचं अहिरभैरावातलं 'पुछो ना कैसे..' हे गाणं ऐका..

बघा.. हे वाचल्यावर तुमच्या मनात लगेच हे गाणं सुरू झालं ना..? मन्नादांचा गोड आवाज कानात रुंजी घालायला लागला ना..?

म्हणूनच मगाशी म्हटलं होतं की निसर्गानं ते यूट्यूब किंवा mp३ player आपल्या मनाला in-built दिलेलं असतं..! :)

मन्नादांचा मृत्यू आजही आपल्याला जिकू शकलेला नाही.. आणि कधी शकणारही नाही..!

-- (महान तत्त्ववेत्ता) तात्या अभ्यंकर...

January 22, 2015

गरम वडापाव..

अधूनमधून फोरासरोडला चक्कर मारलेली बरी असते.. काल मलाही तोच अनुभव पुन्हा आला आणि माझ्यासकट आपल्या तमाम फेबू कम्युनिटीचं हसू आलं.. :)

आपण सगळे किती चिंताग्रस्त असतो..आणि त्या निमित्ताने एकमेकांच्या किती उखाळ्या-पाखाळ्या काढत असतो..एकमेकांचा द्वेष करत असतो..हमरीतुमरीवर येऊन आपापले मुद्दे मांडत असतो.. !

किरण बेदी भाजपात गेली म्हणून कुणाला आनंद तर कुणाला दु:ख, मोदी हा माणूस या देशाचं भलं करणार..कुणाला याची खात्री तर कुणाला शंका.. दिल्लीत किरण सी एम बनणार की अरविंदा..म्हणून आपण चितेत..२६ जानेवारीला ओबामा येणारे म्हणून आपण आनंदीत..! :)

पण कालच्या त्या फोरासरोडच्या दुनियेत या सगळ्यापासुन मी खूप दूर गेलो..तिथे किरण बेदी काय, शाजीया इल्मी काय.. फडणवीस काय आणि मोदी काय.. कुणाला त्यांच्याबद्दल काहीही पडलेली दिसली नाही..एवढी चर्चा करायला तिथे कुणाला वेळच नव्हता.. माझा आजचा वडापाव महत्वाचा. माझा आजचा भुर्जीपाव महत्वाचा.. वह सेठ बडा दयावान है.. उसने मेरेकू पचास रुपिया टीप दिया..!

बास.. That's All..!

काल त्या नाजनीनकडे आम्ही सगळे होतो.. मी, नाजनीन, फरीदा, ढक्कन, मन्सूर.. पण ओबामा भारतात येतोय...ही गोष्ट कदाचित मला एकट्यालाच माहीत असावी..! :)

अरविंदा, शाजीया, मोदी, बेदी, फडणवीस, ओबामा, साक्षी महाराजम भाजपा, सेना, आप, पंजा..हे सगळे तुम्हाआम्हा लोकांचे भरल्या पोटी चघळायचे विषय..

फोरासरोडच्या दुनियेत १० रुपायाचा गरम वडापाव या सगळ्याहून अधिक महत्वाचा..!

-- तात्या अभ्यंकर.. 

साखरफुटाणे...

आज बरेच दिवसांनी आमच्या फोरासरोडला गेलो होतो.. नाजनीनचा आयुर्विम्याचा सहामाही हप्ता घेण्याकरता.. नाजनीनची जवानी आजही आहे..त्यामुळे आजही तिचा धंदा बरा आहे..

मी गेलो तेव्हा ती बसली होती एकासोबत..मला थांबावं लागलं..त्यांचा कार्यक्रम झाल्यावर नाजनीनने माझं हसत स्वागत केलं..

"आओ तात्यासेठ.. आप का हप्ता निकाल के रखेली है.."

नाजनीनकडेच मन्सूर भेटला.. जो मला एकेकाळी सर्वात प्रथम रौशनीकडे घेऊन गेला होता..जरा वेळाने तिथे डबल ढक्कन आला...

डब्बल ढक्कन.. एकेकाळी चरसी होता..रस्त्यात पडलेला असायचा.. मी त्याला तेव्हा Bombay Mercantile बँकेचा डेली कलेक्शन एजंट बनवला होता.. आता तो पोस्टाचंही काम करतो..मला आनद वाटला..

"अबे ढक्कन..इथर आ भोसडीके..जा एक IB हाफ लेके आ..सोडा और चन्ना भी.."

नाजनीनचा ठेवणीतला आवाज.. सोबत शिव्या..

मला खरं तर ते आवडलं नाही.. फोरासरोडच्या एका वेश्येकडे तिच्या खर्चाने मी कशाला दारू पिऊ..?
पण नाजनीनचा आग्रहच असा होता की तो मोडवेना..

मग मी आणि नाजनीनने दोघांनी मिळून ती हाफ मारली.. जुन्या गप्पा झाल्या. नाजनीनची कुणी एक भाचीही तिथे होती.. नुकतीच आली होती यु पी मधून.. किंवा आणली गेली होती..नव्यानेच धंदा शिकली होती..!

"तात्यासेठ.. ये फरीदा.. बोले तो एकदम गरम पावभाजी है.. बैठोगे क्या..?"

म्हातारीचे संस्कार.. मी ती २१ वर्षाची गरम पावभाजी कशी खाणार होतो..?

आणि गरम पावभाजी..? नाजनीन कुठून आणते हे असले शब्द..? साली आमच्या मुंबईची भाषाच अजब आहे..त्याकरता इथल्या अजब मातीशीच सलगी हवी.. त्याकरता पोटात आग हवी.. ती भडकल्याशिवाय एक स्त्री. दुस-या एका तरूण मुलीला "गरम पावभाजी" कसं म्हणेल..?

असो..

आमचं तिच्यायला mental constipation च जास्त..! सभ्य, सुशिक्षित पांढरपेशा सामाजातला होतो ना मी..!

खरंच..मुंबईचा तो बाजार म्हणजे वासनेचा तो एक अक्षय धंदा आहे..रोज तिथे नव्या नव्या मुली येत असतात.. आणल्या जात असतात.. नवे नवे कस्टमर येत असतात.. पैशाच्या बदल्यात शरीर..आणि पर्यायाने पोटाची आग..!

एक डाळभात किंवा भुर्जीपाव किंवा साधा एक वडापाव..याची खरी किंमत तिथेच कळते..!

खूप मोठी दुनिया आहे ती..! तिला काळगोरं, चांगलं वाईट ठरवणारा मी कोण..?

हाफ सोबत ढक्कनने माझ्याकरता बच्चूच्या वाडीतले कबाब आणले होते..नाजनीनने बाजूच्या गाडीवरचा तवा पुलाव मागवला..मन्सूरने १२० पान आणून दिलं..

कुठली ही अजब आपुलकी आणि माया..?

बस पकडून भायखळ्याला आलो.. तिथे अचानक काही भगवी निशाण घेतलेली मंडळी भेटली.. ते शिर्डीला चालत जाणारे लोक असतात ना.. ती मंडळी होती..त्यातील एकाने अचानक माझ्या हातावर प्रसादाचे साखरफुटाणे ठेवले..!

२०-२१ वर्षाच्या त्या गरम पावाभाजीकडे बघून ती न खाता माझं मन क्षणभर हळवं झालं..म्हणून तर लगेच बाबांनी मला प्रसादरुपी साखरफुटाणे दिले नसतील ना..?..!

-- तात्या अभ्यंकर..

January 18, 2015

स्वर आले दुरुनी..

हल्लीचा तो खूप काहीतरी चमत्कारिक अभ्यास.. वयाला न शोभणारा..!

पालकांचे इंटरव्ह्यू, महागड्या फिया.. पेरेंट्स डे वगैरे वगैरे.. छ्या..! सगळा बकवास..हे सगळं बघितलं की मी बापडा लगेच इतिहासात रमतो..!

प्रधान बिल्डींग, ठाणे स्थानकाजवळ..खंडेलवाल मिठाईवाल्याच्या समोर.. साल १९७५ की १९७६...

P E Society ची प्राथमिक शाळा..इयत्ता पहिलीत शिकणारा एक कुणी शेखर अभ्यंकर..

साधीसुधी शाळा.. वर्गात खाली बसायला चक्क जाजमं घातलेली..

गोडसे बाई, जोशी बाई..

आम्हा लहानग्यांची शी शू काढणा-या ताराबाई..कमलताई..

लाकडी जिने.. प्रशस्त वर्ग..

फळा..खडू.. आणि शाईचं पेन..वर्गातली धमाल मजा मस्ती..

शनिवारी शाळा लवकर सुटायची..माझा मामा मला न्यायला यायचा..मग समोरच्या खंडेलवाल मिठाईवाल्याकडे कधी सामोसा, तर कधी खमणी..

कधी गोखाल्याकडे मिसळ आणि पियुष..:)

आज वाटतं की एखादं गणित चुकांवं आणि गोडसेबाईनी माझा कान पकडावा..पण त्यांच्या कान पकडण्यातही त्यांचं प्रेमच दिसावं..!

काहीशा करारी चेहे-याच्या ताराबाई..गोड,स्वोज्वळ चेहे-याच्या ताराबाई..

वर्गातला तो एक सामुहिक वास..! मुलांचा, त्यांच्या दफ्तरांचा, वह्या-पुस्तकांचा, डब्यातल्या मटकीची उसळ आणि पोळीचा.. तूपगूळ पोळीच्या गुंडाळीचा..!

तेव्हा केलोग्ज वगैरे नव्हते..तूपगूळ पोळीची गुंडाळी.. लसूणचटणी पोळीची गुंडाळी..तेव्हा त्याला franky की कुठलासा फालतू शब्द वापरत नसत.. गुंडाळीचं म्हणत असतं..!

अवचित कधी बाबूजींचं 'स्वर आले दुरुनी..' हे गाणं कानी पडतं आणि मी हळवा होतो..

मग आजही गोडसेबाईंची आठवण होते..बाई आता कुठे असतील हो..? वयस्कर असतील खूप.. असंच जाऊन कडकडून त्यांना भेटावं वाटतं..

"बाई..मी शेखर.. आजपासून ३८-३९ वर्षांपूर्वी तुमचा विद्यार्थी होतो..असं म्हणावसं वाटतं..!

काळाच्या ओघात सगळं हरवलं..

पण मनात कुठेतरी ताराबाईच्या चेहे-यावरचा सोज्वळपणा आणि तूपगूळ पोळीच्या गुंडाळीतला गोडवा मात्र आजही जपून ठेवला आहे..!

-- तात्या अभ्यंकर...

January 11, 2015

बुवा..बाई आणि बोवा..

पंडित किंवा पंडितजी.. वगैरे पदव्या आमच्या भीमाण्णाना खरं तर आवडत नसत..अगदी मनापासून आवडत नसत..

मुंबईच्या नेहरू सेंटरच्या हायफाय वातावरणात एकदा अण्णांचं गाणं होतं.. आता नेहरू सेंटर म्हणजे काही गिरगाव ब्राह्मण सभा नव्हे, की कोल्हापुराचा देवल क्लब नव्हे की एखादी जुनी गायन सभा नव्हे.. नेहरू सेंटर काय किंवा NCPA काय.. तिथे दिखाऊपणाच जास्त.. गाणं समजण्यापेक्षाही "आम्ही क्लासिकलची concert attend केली.." असं म्हणण्यात धन्यता मानणारे लोकच अधिक..:)

नेहरू सेंटरला सगळंच हायफाय वातावरण.. पंडितजी पंडितजी म्हणून अण्णाना फुकट परेशान करणारं पब्लिकच जास्त.. आणि आमचे अण्णा अगदी म्हणजे अगदीच साधे हो.. सादगीभरे..!

चामारी, भक्कम चुना-तंबाखूवालं पान जमवलं..आणि एकदा का तंबोरे लागले की गाणं सुरू.. कुठे माईकच चेक कर..त्याचा बासच कमी-अधिक करायला सांग.. उगाच उजवा हात छातीवर ठेऊन लोकांकडे पाहून नाटकी हास.. अशी नाटकं अण्णांना जमत नसत..:)

मी नेहरू सेंटरला पोहोचलो..ग्रीनरूममध्ये गेलो.. स्वारी पान जमवत बसली होती..तबले-तंबोरे जुळत होते..

मी पायावर डोकं ठेवलं..

"या..अभ्यंकर..काय म्हणतंय ठाण..?" -- अण्णांनी त्यांच्या खास खर्जाच्या आवाजात नेहमीची चौकशी केली..

"ठाण ठीक आहे.. तुम्ही कसे आहात बुवा..?"

आणि इथे मात्र कधी फारसं न बोलणा-या अण्णांना एकदम बोलावसं वाटलं.. ते कुठेतरी नेहरु सेंटरच्या त्या दिखाऊ हायफाय वातावरणाला आणि पंडितजी पंडितजी ला कंटाळले असावेत.. ते एकदम म्हणाले,

"व्वा..! बुवा हाच खरा शब्द..! पंडितला काही अर्थ नाही.. हल्ली बाजारात गल्लोगल्ली पंडित झालेत.. आमच्या वेळेला बुवा, बोवा आणि बाई हे तीनच शब्द होते.. गाणारा तो बुवा..वझेबुवा, भास्करबुवा.. आणि गाणारी ती बाई.. मोगुबाई, हिराबाई.. आणि कीर्तन करणारे ते बोवा..!"

असं म्हणून छान समाधान पसरलं त्यांच्या चर्येवर.. पंडितजी पंडितजीच्या त्या हायफाय वातावरणात माझं बुवा म्हणण त्यांना कुठेतरी सुखावून गेलं होतं..!

कानडाउ भीमसेनु करनाटकु
तेणे मज लावियला वेधू..

असं एकदा कविवर्य वसंत बापट म्हणाले होते..!

असो.. अनेक आठवणी आहेत आणि आता त्याच फक्त उरल्या आहेत..!

-- (कानडाउ भीमसेनुचा भक्त) तात्या..

January 02, 2015

माझा वाढदिवसं...

आज म्हणे माझा वाढदिवस आहे..

एका वर्षाने वाढलो, अजून थोडा गधडा झालो... दुनियाही बदलली.. संगणक, मोबाईल, Tab, whatsapp सगळं काही आलं..

Moll आले, Multiplex आले.. सारं काही आलं.. बोलबोलता मुंबई पुणे express way ही झाला.. लहानपणी दिसणा-या केवळ फियाट आणि आम्बासेडर, या व्यतिरिक्त इतरही अनेक छान छान गाड्या दिसू लागल्या..

पण मी मात्र अजून मुंबई ब वर सकाळी ६ वाहता लागणा-या अण्णांच्या अभंगातच अडकलो आहे.. मी मात्र अजून बाबूजींच्या स्वर आले दुरुनी मध्येच अडकलो आहे..मी मात्र अजून भाईकाकान्च्या म्हैस आणि अंतू बर्व्यातच अडकलो आहे..

मी अजून शाळेतल्या त्या फौंटन पेन मध्येच अडकलो आहे..

माझे कान मात्र अजून सकाळी सात वाजता "सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत.." हे खणखणीत शब्द ऐकण्याकरताच आसुसले आहेत...

मला मात्र अजून सकाळी ११ वाजताचं कामगार विश्व ऐकता ऐकता जेवायचं आहे आणि शाळेचं दफ्तर भरायचं आहे..

मला प्रसन्न जोशी, निखिल वागळे कुणी कुणी नकोत.. मला आजही ते दाढीवाले अनंत भावे आणि प्रदीप भिडेच माझे वाटतात..

मी आजही आसुसलो आहे सुहासिनी मुळगावकरने सादर केलेल्या गजरा ह्या कार्यक्रमाकरता..

मी मात्र आजही अडकलो आहे संध्याकाळी मुंबई ब वर फक्त १५ मिनिटं लागणा-या घाल घाल पिंगा वा-या किंवा तीनही सांजा सखे मिळाल्या या गाण्यात..

नारळ वीस रुपये झाला म्हणे..! मला मात्र आजही नाक्यावारच्या वाण्याकडून २ रुपायाची नारळाची वाटी आणायची आहे..!

मला २४ तास टीव्ही नको आहे..वाहिन्या तर कोणत्याच नको आहेत.. मला फक्त मुंबई दूरदर्शन केंद्रावरचं गुरुवारी लागणारं छायागीत हवं आहे..

मला नको आहेत कोणतेही संगणक आणि व्हिडियो खेळ.. मला फक्त हवे आहेत ऐकलंम खाजा धोबी राजा वाले ढप आणि गोट्याचे खेळ..

मला कोणतेही Realty show नको आहेत.. मला हवी आहे फक्त संध्याकाळची रामरक्षा आणि पर्वाचा आणि पाढे..!

मला बाकावर उभं राहायचं आहे,,मला वर्गाबाहेर आंगठे धरून उभं राहायचं आहे..

म्हणे आज माझा वाढदिवस आहे..! मग गिफ्ट म्हणून काय हवं आहे मला..?

मला संध्याकाळी ७ वाजताच घरोघरी लागणा-या कुकरच्या शिट्या ऐकायच्या आहेत.. त्यात शिजणा-या सात्विक वरणभाताचा घास मला हवा आहे.. आणि हो.. पोळीसोबत थोडी शिक्रणही हवी आहे मला.. आईनं केलेली..!

-- तात्या अभ्यंकर..

December 06, 2014

एक गाणं...

एक गाणं आहे.. ते फक्त आणि फक्त deadly गाणं आहे..

माफ करा.. ते गाणं छानबीन नाहीये बरं का.. गोड वगैरे तर मुळीच नाहीये..

ते गाणं काळजावरून फक्त धारदार सुरा चालवतं.. ते गाणं पोटात खोल खड्डा पाडतं..

या गाण्यात नुसता अंधार नाहीये.. तर अंधाराला पुर आलेला आहे.. या गाण्यात अवेळी चुकचुकणारी अपशकुनी पाल आहे....!

या गाण्याला घरातल्या चिल्ल्यापिल्ल्यांचा कोलाहल हवा आहे.. त्यांची मजा मजामस्ती,गडबडगुंडा हवा आहे...

हे गाणं अंधाराला घाबरतं.. अंधारलेल्या वाटांना घाबरतं......

या गाण्याचे शब्द आहेत...

या चिमण्यांनो परत फिरा रे..

काही काही गाणी साफ भकास करतात तुम्हाला.. ही ताकद सुरांची.. ही ताकद शब्दांची..!

आपलं मराठी संगीत किती श्रीमंत आहे, किती समृद्ध आहे याचं वर्णन निदान मी तरी करू शकत नाही..!

धन्यवाद...

-- तात्या अभ्यंकर..

November 26, 2014

प्राणसाहेब..

संगीतक्षेत्रातले भीमण्णा, बाबूजी, पंचमदा आणि सिनेक्षेत्रातले दादामुनी, प्राणसाहेब, हृषिदा, ओमप्रकाश, उत्पल दत्त, हंगलसाहेब यांचं जाणं मी कधी पचवूच शकलो नाही.. रोज ही कुणी ना कुणी मंडळी माझ्यासोबत असतात..माझी छान सोबत करतात..!

प्राणसाहेब जायच्या फक्त एक महिना आधी मी एक पोस्ट लिहिली होती.. आज प्राणसाहेबांची खूप आठवण येते आहे म्हणून ती पोस्ट पुनर्प्रकाशित करत आहे..आदल्या दिवशीच मी प्राणसाहेबांना भेटून आलो होतो..

-----------------------------------------------------------------------------------------------------------

(पुनर्प्रकाशित)

माझा जुन्यात रमण्याचा स्वभाव मला स्वस्थ बसू देत नाही..

काल पुन्हा एकदा काही कामाकरता खारला जाणे झाले आणि अक्षरशः माझ्या नकळतच माझे पाय युनिअन पार्काकडे वळले..

२५ युनिअन पार्क, खार. प्राणसाहेबांचं निवासस्थान..

मला नाही वाटत भीड. फार तर काय होईल, हाकलून लावतील ना? फाशी तर देणार नाहीत? प्रत्येकाच्या काही अडचणी असतात, त्यामुळे प्रत्येकाने मला भेटलंच पाहिजे आणि न भेटलं तर त्यांनी माझा फार मोठा अपमान वगैरे केला असं मी मुळीच मानत नाही.. पण नशीब बलवत्तर असेल तर मात्र भेटता येतं माझ्या आवडीच्या काही आसामींना..

काल असंच झालं. इमारतीखालच्या वॉचमनने पहिला अपमान केला. तरीही त्याला मी हट्टाने प्राणसाहेबांच्या घरी इंटरकॉम जोडायला सांगितला. त्यांची मुलगी होती फोनवर. 'मी प्राणसाहेबांचा एक सामान्य चाहता आहे, दुरून आलो आहे. मला फक्त २ मिनिटं त्यांना भेटू दिलंत तर मेहेरबानी होईल. मी त्यांच्या पाया पडून लगेच जाईन..' असं मी सांगितल्यावर तिने अगदी थोडे आढेवेढे घेत मला घरी यायची परवानगी दिली..

प्राणसाहेब काल खूपच थकलेले वाटले. त्यांना थोडे बसते करून ठेवले होते. अगदी हळू आवाजात जेमतेमच बोलत होते.

'तुमचा एक चाहता तुम्हाला भेटायला आला आहे..' असं मुलीने त्यांच्या जवळ जाऊन सांगितल्यावर त्यांनी हातानेच मला जवळ बसायची खूण केली..

त्यांच्या थकलेल्या चेहेर्‍यावर हास्य उमटलं.त्यांनी प्रेमाने माझ्या पाठीवरून हात फिरवला.. विलक्षण समाधान मिळालं..!

तब्येत कशी आहे वगैरे जुजबी बोललो.

'अभी थोडे फ्रेश लग रहे है.. आप बैठिये थोडी देर. कोई बात नही..'

असं मला त्यांची मुलगी पिंकी भल्ला म्हणाली..

पण मी त्यांच्याशी काय बोलणार? शेवटी काहितरी बोलायचं म्हणून मग मीच त्यांना त्यांनीच एकदा सांगितलेल्या आठवणीची याद दिली आणि प्राणसाहेबांच्या चेहेर्‍यावर पुन्हा एकदा समाधानाचं हास्य पसरलं..

'हम सब चोर है..' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानची गोष्ट. त्यात शम्मी कपूर आणि प्राणसाहेब होते. चित्रीकरण सुरू असताना एके दिवशी ईस्ट बंगाल आणि मोहन बगान (चूभूदेघे) असा फुटबॉलचा सामना होता. शम्मी कपूर आणि प्राण, या दोघांनाही तो सामना बघायचा होता म्हणून त्यांनी त्या चित्रपटाचे निर्माते शशधर मुखर्जी यांच्याकडे चित्रीकरण सोडून जाण्याची परवानगी मागितली. मुखर्जींनी ती नाकारली..

"फुटबॉल वगैरे काही नाही.. तुम्ही चला. दिग्दर्शक जोहर तुम्हाला दृष्य समजावून सांगेल. मी एक काम आटपून येतोच आहे..."

परंतु शम्मी कपूर आणि प्राणसाहेबांनी मनोमन काय ते ठरवलं..

त्यानंतर शम्मी कपूर धावत येऊन एका टेबलावरून उडी मारतो असं एक दृष्य चित्रीत करायचं होतं..

ठरल्याप्रमाणे शम्मी कपूर धावत येऊन उडी मारतो आणि बेशुद्ध पदल्याचं नाटक करतो..

'अरे क्या हुआ? बेहोश हो गये.. इसे मै अभी के अभी अस्पताल लेके जाता हू..' असं म्हणत प्राणसाहेबांनी बोंबाबोंब केली आणि घाईघाईत शम्मी कपूरना घेऊन ते तिथून गाडी घेऊन जे निघाले ते थेट फुटबॉलचा सामना पाहायला मैदानात पोहोचले..मोहन बगानचा सामना सुरू होता..

पण थोड्याच वेळात त्या गर्दीत प्राणसाहेबांच्या खांद्यावर हात पडला. वळून बघतात तो ते शशधर मुखर्जी स्वत:च होते. प्राणसाहेब, शम्मी कपूर आणि शशधर मुखर्जी तिघेही दिलखुलास हसले आणि पुढचा सामना पाहू लागले..

हा खूप जुना म्हणजे १९५४/५५ च्या आसपासचा किस्सा. पुढे हाच किस्सा हृषिदा, अर्थात हृषिकेश मुखर्जींना कळला आणि त्यांनी आपल्या पद्धतीने हाच किस्सा गोलमाल चित्रपटात वापरला.

अमोल पालेकर 'आईला बरं नाही..' अशी उत्पल दत्तला थाप मारून फुटबॉलचा सामना बघायला जातो. उत्पल दत्तही त्या सामन्याला आलेला असतो तिथे त्याला अमोल पालेकर दिसतो. पुढे आपलं बिंग फुटू नये म्हणून मग अमोल पालेकर जुडवा भाईचं नाटक करतो ही कथा आपल्या सर्वांनाच माहित आहे..

काल मी ह्या किश्श्याची प्राणहेबांना याद दिली आणि खरंच खूप खुलला त्यांचा चेहरा..

त्यांना आता जास्त बोलवत नाही परंतु त्यांचा चेहरा आजही खूप काही बोलून जातो..

समोर ठेवलेली काजूकतली खाऊन झाली होती. आता निरोपाची वेळ. मी त्यांना नमस्कार केला आणि निघालो. तर त्यांनी त्या काजूकतलीच्या प्लेटकडे पाहून मला खूण केली..

"माझ्यातर्फे अजून थोडी काजुकतली खा..असं ते म्हणताहेत" - त्यांची मुलगी मला म्हणाली..

मी प्लेटमधला अजून एक तुकडा उचलला आणि प्राणसाहेबांनी थंब्सअप ची खूण करत फक्त 'जियो..!' इतकंच म्हणाले..!



परतीच्या वाटेला लागलो.. त्यांची तब्येत मात्र खरंच खूप उतरली आता. वरचेवर आजारी असतात.

माझ्या डोळ्यासमोर मात्र 'यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी..' असं गात मस्तीभरे नाचणारे प्राणसाहेबच सतत येत होते...!

-- तात्या.

November 21, 2014

आवाज.. नाद..!

त्याला वेड होतं वेगवेगळ्या आवाजांचं, त्याला वेड होतं नादाचं, त्याला वेड होतं रिदमचं..

आवाज.. वेगवेगळे आवाज.. मग ते कुठलेही असोत.. कधी वा-याचा आवाज, तर कधी कुठल्या भांड्यांचा आवाज.. कधी आगगाडीची धडधड तर कधी चक्क एखाद्या कंगव्यामधून निघणारा आवाज..!

कुठलाही.. अक्षरश: कुठलाही आवाज.. कुठलाही नाद...

तो सोनं करत असे त्या आवाजाचं.. 

सत्ते पे सत्ता चित्रपटात जेव्हा बाबूची एन्ट्री असते तेव्हा एक वेगळाच आवाज आला आहे.. हा आवाज कसला आहे..? त्याने चक्क एका बाईला गुळण्या करायला लावल्या आहेत.. तो आवाज त्या गुळण्याचा आहे..!

एखादी भन्नाट स्वरवेल आणि त्यात वेगवेगळ आवाज, नाद आणि त्याचा विलक्षण लयदार रिदम..

आवाजांचा, स्वरांचा, नादाचा, लयीचा एक विलक्षण शोध.. एक ध्यास.. 

या ध्यासाचं नांव..या वेडाचं नांव..

R D Burman.. अर्थात पंचमदा...

____/\____

-- (पंचमभक्त) तात्या..

November 15, 2014

काहीच नको शिकुया..

तिथे पुण्यात वेडझव्यासाराखा पाउस पडतोय म्हणे..
इथे मुंबईत भयानक, विचित्र उकडताय कोंडल्यासारखं.. जीवघेण..

कापून काढा डोंगरच्या डोंगर..
अजून करा बेसुमार वृक्षतोड..
चालवा २४ तास वाहने, मोटारी आणि ट्रक
आणि सतत सोडा हवेमध्ये विष..!

निसर्गाचा समतोल जेवढा ढाळता येईल
तेवढा ढाळू आपण सर्वजण.. अगदी कसोशीने..!

२६ जुलैच्या महाप्रलायातून काहीच नको शिकूया..
केदारेश्वरकडून काहीच नको शिकूया..
माळीण गावाकडून काहीच नको शिकूया..

-- (मुक्तछंद कवी) तात्या अभ्यंकर..