September 14, 2009

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (१०) -- गुरुरेको जगति त्राता


आजच्या तरूण पिढीतील अभिजात संगीत गायिका वरदा गोडबोले यांनी गायलेले -

'गुरुरेको जगति त्राता..'
(येथे ऐका)

मूळ मराठी गाणे - (दुर्दैवाने कुठेही उपलब्ध नाही)

सुखाच्या क्षणात, व्यथांच्या घणात
उभा पाठिशी एक अदृष्य हात
गुरू एक जगती त्राता...
(शब्द येथे वाचता येतील)

संस्कृत भाषांतर - (सौ अदिती जमखंडीकर)

सुखानां क्षणेषु व्यथानामाघातेषु
तिष्ठति पृष्ठे एकोऽदृष्यो हस्तः
गुरुरेको जगति त्राता....
(शब्द येथे वाचता येतील)

मूळ गाण्याला बाबुजींची पुरियाकल्याण रागातील सुरेख चाल. तीच चाल वरील संस्कृत गाण्याकरताही वापरली आहे.

किराणा घराण्याची उत्तम तालीम मिळालेल्या वरदाने हे गाणं खूपच छान गायलं आहे. सुंदर आवाज, उतम स्वरलगाव, सुरेल आलापी, लयतालावर चांगली पकड, दाणेदार तान ही वरदाच्या गाण्यातली वौशिष्ठ्ये म्हणता येतील.

राग पुरियाकल्याण. हा राग म्हणजे किराणा घराण्याचीच खासियत! आलापप्रधान गायकी गाता येण्याजोगा एक खानदानी राग. पुरियाकल्याण म्हणजे पुरिया आणि कल्याण या दोन रागांचं अद्वैत. पुरियाचा स्वभाव तसा गंभीर. पुरिया म्हणजे एखाद्या जबाबदार, बुजुर्ग अशा अनुभवसंपन्न व्यक्तिचं मनोगतच! पण पुरियाची सगळी सत्ता फक्त पूर्वांगातच. अवखळ, लोभसवाणा 'कल्याण' त्याला उत्तरांगात नेमकेपणाने गाठतो आणि त्याचा छानसा 'पुरियाकल्याण' होतो!

आपल्या घरात अशीच एखादी अनुभवसंपन्न, पण थोडी गंभीर अशी बुजूर्ग व्यक्ती असते. कुणी फारसं तिच्याजवळ गप्पाबिप्पा मारायला जात नाही. पण तिच्या नातवाला मात्र नेमकं कळतं की आजोबांना काय आवडतं आणि काय नाही ते! नातू अवखळपणाने धावत त्यांना बिलगतो आणि या गंभीर आजोबांच्या चेहऱ्यावर पटकन स्मित हास्य उमटतं! Smile

तद्वत, उत्तरांगात कल्याणाने गाठल्यावर 'पुरिया' त्या आजोबांसारखाच काही क्षणाकरता स्वत:चा स्वभाव विसरतो आणि त्याचा 'पुरियाकल्याण' बनतो!

-- तात्या अभ्यंकर.

June 15, 2009

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (९) -- हाथ छुटे भी तो..

स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (१) -- आमार श्वप्नो तुमी

'काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे'चे पहिले काही भाग उपक्रम या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत. परंतु तिथे अधिक काही लिहावं अशी माझी लायकी नाही, म्हणून यापुढील सर्व भाग मी येथे प्रकाशित करणार आहे..!

हाथ छुटे भी तो..!




'पिंजर' चित्रपटातलं उतम सिंग यांचं संगीत असलेलं जगजित सिंग यांनी गायलेलं हे गाणं. केवळ अप्रतीम..!




हाथ छुटे भी तो रिश्ते नही छुटा करते,
वक्त की शाख से लम्हे नही टुटा करते!


पुरियाधनाश्रीचे बेचैन स्वर! 'वक्त की शाख से लम्हे..' या ओळीतील 'लम्हे'वर कोमल धैवत विसावतो, उदास सायंकालच्या सावल्या लांबतात आणि ते 'लम्हे' काळजात घर करतात..!

जिसने पैरों के निशा भी नही छोडे पिछे,उस मुसाफिर का पता भी नही पुछा करते..!
क्या केहेने..! बहुतही बढिया लिखा है. या ओळीचं चित्रिकरण तर विशेष सुरेख आहे!


जिसने पैरो के..' ही ओळ जेव्हा तार षड्जाला स्पर्ष करते तिथे पुरियाधनाश्री जीव कासावीस करतो. ते पुरियाधनाश्रीचं समर्पण! आणि त्यानंतरची पंचामवरची अवरोही विश्रांती! हा खास पुरियाधनाश्रीतील पंचम. प्रार्थनेचा पंचम..!


'छुट गये यार ना छुटी यारी मौला..' चा कोरस सुंदर. कोरसचं सरगम गायनही अगदी परिणामकारक. गाण्याच्या चित्रिकरणातील उर्मिला अभिनयात, दिसण्यात नेहमीप्रमाणेच लाजवाब!

जगजित सिंग सारख्या अत्यंत सुरेल, तरल, ओल्या गळ्याच्या धनीने या गाण्याचं सोनं केलं नसतं तरच नवल होतं! हे गाणं ऐकलं की काव्य, संगीत आणि गायन या सर्वार्थाने एक अत्यंत उच्च दर्जाचं गाणं ऐकल्याचं समाधान मिळतं, जीव तृप्त होतो!

-- तात्या अभ्यंकर.

मिसळपाव डॉट कॉम या संकेतस्थळाचे मुखपृष्ठ म्हणून आज हा लेख प्रसिद्ध झाला आहे!

June 12, 2009

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (८) -- दो हंसोका जोडा

स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (१) -- आमार श्वप्नो तुमी
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (२) -- प्रथम धर घ्यान दिनेश
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (३) -- मनमोहना बडे झुटे
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (४) -- मेरी सांसो को जो

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (५) -- केनू संग खेलू होली
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (६) -- अनाम वीरा
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (७) -- मथुरानगरपती काहे तुम.


'काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे'चे पहिले काही भाग उपक्रम या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत. परंतु तिथे अधिक काही लिहावं अशी माझी लायकी नाही, म्हणून यापुढील सर्व भाग मी येथे प्रकाशित करणार आहे..!


दो हंसोका जोडा... (इथे ऐका)

सारंगीचे हृदयाला हात घालणारे सूर सुरू होतात आणि तिचा गळा भैरवीचे स्वर्गीय सूर गाऊ लागतो. सगळ्याच सुरांचं तिच्या गळ्याशी सख्य! नव्हे, गेली अनेक दशके हे सगळे सूर तिच्या गळ्यातच वस्तीला आहेत, तिच्या पुढ्यात हात जोडून उभे आहेत आणि त्यातला प्रत्येक सूर तिला विचारतो
आहे, "मेरे लायक कुछ सेवा?!"

तिचं नांव लता मंगेशकर!

मोरा सुखचैन भी, जीवन भी मोरा छीन लिया
पापी संसारने साजन भी मोरा छीन लिया!

वरील ओळीतील 'पापी संसारने साजनभी मोरा छीन लिया' म्हणताना 'साजन' शब्दावर जीवघेणी हरकत घेऊन त्यातील सूक्ष्म लयीला अत्यंत लीलया सांभाळत ती ज्या तर्हेने 'छीन' या शब्दावरील समेवर येते, तो संगीत क्षेत्रातला अद्भूत चमत्कार म्हटला पाहिजे!

रातकी आस गयी, दिनका सहाराभी गया
मोरा सूरजभी गया मोरा सितारा भी गया!

'मोरा सितारा भी गया' या शब्दांमधून भैरवीचं जे अगदी सहजसुंदर, नैसर्गिक रुपडं दिसतं त्याला तोड नाही!

अर्थपूर्ण शब्द, मन डोलायला लावणारा सुंदर ठेका, सारंगी-सतारीचा सुरेख वापर, सगळंच अप्रतीम! गजब, जुलम, रतिया बिताऊ, असूवन, मुशकील,डगरिया, उमरिया, इत्यादी शब्दांचे देहाती उच्चार केवळ दिदीनेच करावेत आणि केवळ तिनेच उभा करावा अवघ्या तीन मिनिटात भैरवीचा राजमहाल!

हे केवळ एक गाणं नव्हे! हा आहे जीवन समृद्ध करणारा आणि आयुष्यभर पुरणारा भैरवीचा अनमोल ठेवा! तुम्हाआम्हाला हा ठेवा भरभरून वाटणार्या त्या कवीला, नौशादमियांना, लतादिदीला आणि तबला-सारंगी-सतारीच्या त्या अज्ञात वादकांना सलाम..!

-- तात्या अभ्यंकर.


मिसळपाव डॉट कॉम या संकेतस्थळाचे मुखपृष्ठ म्हणून आज हा लेख प्रसिद्ध झाला आहे!
‍‍

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (७) -- मथुरानगरपती काहे तुम.



काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (१) -- आमार श्वप्नो तुमी
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (२) -- प्रथम धर घ्यान दिनेश
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (३) -- मनमोहना बडे झुटे
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (४) -- मेरी सांसो को जो
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (५) -- केनू संग खेलू होली
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (६) -- अनाम वीरा


'काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे'चे पहिले सहा भाग उपक्रम या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत. परंतु तिथे अधिक काही लिहावं अशी माझी लायकी नाही, म्हणून हा सातवा आणि यापुढील सर्व भाग मी येथे प्रकाशित करणार आहे..!



-- तात्या अभ्यंकर.


काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे ()





मथुरानगरपती काहे तुम...
(येथे ऐका किंवा येथे ऐका)
(शब्द - रितुपर्णो घोष, संगीत - देबोज्योती मिश्रा)



रेनकोट चित्रपटातलं शुभा मुद्गलचं एक अप्रतीम गाणं. एक अतिशय सुरेख विरहिणी! वर वर पाहता एखाद्याला हे गाणं लोकगीतासारखंही भासू शकेल, परंतु या गाण्याला शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीताची भारीभक्कम बैठक लाभली आहे.

सुबह का ख्याल आज

वापस गोकूल चल मथुरा राज..!

रागाच्या चौकटीतलं हे गाणं. यातला कोमल गंधार थेट हृदयालाच जाऊन भिडतो इतका हळवा आहे. 'वापस गोकूल चल मथुरा राज' या ओळीतल्या 'चल' या शब्दावरील शुद्ध रिषभ आणि पंचमाची संगती जीव लावून जाते!



धीरे धीरे पहुचत जमुना के तीर


सुनसान पनघट मृदुल समीर


क्या बात है! अगदी डोळ्यासमोर दृष्य उभं रहातं! गाण्याचे शब्द तर सुरेखच आहेत. 'धीरे धीरे पहुचत जमुना के तीर' ही ओळ त्यातील शुद्ध गंधारामुळे अगदी उल्हासदायक, ताजी टवटवीत वाटते, परंतु पुढल्याच 'सुनसान पनघट मृदुल समीर' या ओळीतला सुनेपणा कोमल गंधार तेवढ्याच परिणामकारकतेने दाखवून देतो. ही ताकद केवळ स्वरांचीच! कोमल आणि शुद्ध या दोन्ही गंधारांमुळे हे गाणं विशेष श्रवणीय झालं आहे.



मनोहर वेष, पी कुकुल, अकूल, पूर नारी, व्याकुल नयन, कुसुम सज्जा, कंटक शयन, मृदुल समीर, हे शब्द कानाला खूप छान लागतात, गोड लागतात!



शुभा मुद्गलचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, इतक्या सुरेख रितीने तिनं हे गाणं गायलं आहे. अभिजात संगीताची उत्तम बैठक लाभलेल्या शुभाला स्वच्छ, मोकळा परंतु तितकाच सुरेल आवाजही लाभला आहे.



हल्ली आपल्याकडच्या गाण्यांना ऑस्कर पुरस्कार मिळण्याचा जमाना आहे, आयटम साँगचा जमाना आहे! या पुरस्कारांच्या आणि आयटम साँगस् च्या भाऊगर्दीत असं एखादं सुरेख, जीवाला लागणारं गाणं ऐकलं की खूप बरं वाटतं!



जय हो...!

-- तात्या अभ्यंकर.









December 25, 2008

मम सुखाची ठेव...

ती आली, तिनं पाहिलं, तिनं जिंकलं!

ती स्वरलता आहे, ती गानसम्राज्ञी आहे, ती मेलडीक्वीन आहे.....!

षड्ज पंचम भावातला सुरेल जुळलेला तानपुरा,
अन् त्यातला नैसर्गिक शुद्ध गंधार..
तो तर तिच्या गळ्यातच आहे...!
नव्हे, तर त्या गंधाराचं तंबोर्यातलं स्वयंभूत्व
हे तिच्या गळ्यानेच सिद्ध केलेलं आहे...!

कोमल अन् शुद्ध रिखभ, हे एरवी एकमेकांचे वैरी,
स्वभावाने अगदी एकदुसर्याच्या विरुद्ध,
परंतु दोघेही तिचेच आहेत...!

तोडीत दिसणारं कोमल गंधाराचं कारुण्य
हे तिनंच दाखवलं आम्हाला...
आणि बागेश्रीतला शृंगारिक कोमल गंधारही
तिनंच शिकवला आम्हाला...!

तिने स्वर लावल्यावर
तीव्र मध्यमातली अद्भुतता दिसली आम्हाला...
आणि शुद्ध मध्यमाचं गारूडही तिनंच घातलं आम्हाला...!

तिच्या पंचमातली अचलता आम्ही अनुभवली...
महासागराच्या ऐन मध्यावर एखाद्या जहाजाला
जसा एक आश्वासक सहारा मिळावा,
तसा सहारा, तसा आधार हा तिचाच पंचम देतो....!
हा पंचम एक आधारस्तंभ स्वर आहे,
आरोही-अवरोही हरकतींचं ते एक अवचित विश्रांतीस्थान आहे,
हे तिनं गायल्यावरच पटतं आम्हाला...!

तिच्याइतका सुरेख, तिच्या इतका गोड
शुद्ध धैवत गाऊच शकत नाही कुणी....
आणि तिच्याइतकं कुणीच दाखवू शकत नाही,
कोमल धैवताचं प्रखरत्व आणि त्याचं समर्पण....!

कोमल निषादाचं ममत्व अन् देवत्व,
तिच्यामुळेच सिद्ध होतं...
आणि तिच्या शुद्ध निषादामुळेच कळली आम्हाला
गाण्यातली मेलडी...!

आणि तिचा तार षड्ज?

गायकी म्हणजे काय, पूर्णत्व म्हणजे काय,
गाण्याचा असर म्हणजे काय,
हे तिथंच कळतं आम्हाला, तिथंच जाणवतं...तिच्या तार षड्जात..!

तिचा तार षड्जच पूर्ण करतो आमच्या
सगुण-निर्गुणाच्या अन् आध्यात्माच्या व्याख्या...
आणि तोच भाग पाडतो आम्हला,
ईश्वरी संकल्पनेवर विश्वास ठेवायला....!



ती गाते आहे, आम्ही ऐकतो आहोत...

सलीलदा, सचिनदा, पंचमदा, मदनमोहन, नौशादमिया
अन् कितीतरी अनेक..
तिच्या गळ्याकरताच केवळ,
पणाला लावतात आपली अलौकिक प्रतिभा...!
अन् तिच्याकडे पाहूनच
खुला करतात बाबुजी
"ज्योती कलश छलके"चा अमृतकुंभ...!

तिचं गाणं हा आमचा अभिमान आहे...
तिचं गाणं हा आमचा अहंकार आहे...
तिचं गाणं ही आमची गरज आहे...
तिचं गाणं ही आमची सवय आहे....
तिचं गाणं हे आमचं व्यसन आहे....
तिचं गाणं हे आमचं औषध आहे...
तिचं गाणं ही आमची विश्रांती आहे...
आणि
तिचं गाणं हेच आमचं सुख-समाधान आहे...

इतकंच म्हणेन की,

अन्न, वस्त्र, निवारा ह्या आमच्या मूलभूत गरजा.
त्यात आता तिच्या गाण्याचीही भर पडली आहे...!

शब्द खूप तोकडे आहेत,
तेव्हा पुरे करतो आता हे शाब्दिक बुडबुडे...

शेवटी एवढंच सांगून थांबतो की तिचं गाणं ही
"मम सुखाची ठेव" आहे!
"मम सुखाची ठेव" आहे!

--(तिचा भक्त, तिचा चाहता, तिचा प्रेमी!) तात्या अभ्यंकर.

हेच लेखन येथेही वाचता येईल..

‍‍

November 12, 2008

प्रभात राग रंगती...

भल्या पहाटे 'ललत'
षड्ज मध्यमी मूर्च्छना
चालली 'भटियारा'ची
प्रभातरंगी अर्चना

डमडम डमरूची
आली 'भैरवा'ची स्वारी
तीव्र मध्यम वाढवी
'रामकली'ची खुमारी

कारुण्यमय 'तोडी'ची
'आसावरी'शी संगती
'अहिरभैरवा' संगे
प्रभात राग रंगती..!

-- तात्या अभ्यंकर.

हीच कविता इथेही वाचता येईल..

November 06, 2008

माझे काही "पाहण्याचे" कार्यक्रम... :)

राम राम मंडळी,

(ह्या लेखातल्या ष्टोर्‍या या सूर्याइतक्या सत्य आहेत. परंतु पात्रांची नावे मात्र बदलली आहेत!)

तसा मी वृत्तीने खुशालचेंडूच! आजपर्यंत लग्नकार्य वगैरे काही केलं नाही. नाही, म्हणजे एक मुलगी तशी मला खूप आवडली होती परंतु तिच्याशी काय आपलं लग्न जमलं नाय बुवा! आमच्या हृदयावर पाय का काय म्हणतात तो देऊन एक भल्या इसमाशी विवाह करून ती बया माझ्या लाईफमधून कायमची चालती झाली. परमेश्वर त्या दोघांना सुखी ठेवो. असो, तो विषय डिटेलमंदी पुन्ना केव्हातरी.

तर काय सांगत होतो? हां! तर आपण अजूनपर्यंत लगीनकार्य वगैरे काय केलेलं नाही. अलिकडे एकेका विवाहीत पुरुषांचे हताश, निराश, न्यूनगंडग्रस्त, वैफल्यग्रस्त, भितीग्रस्त चेहेरे पाहिले की मी लगीन केलं नाय, हे एका अर्थी बरंच झालं असं अजूनही मला वाटतं! साला, आपण आपले अद्याप खुशालचेंडू 'भवरा बडा नादान' आहोत तेच बरं आहे!

पण बरं का मंडळी, अद्याप जरी मी लग्न केलेलं नसलं तरी मुली पाहण्याचे कार्यक्रम मात्र आपण अगदी चिक्कार केले बरं का! ती हौसच होती म्हणा ना आपल्याला! मुली पाहण्याचे कार्यक्रम करत होतो तेव्हा लगीन करायचंच नाही असं काय ठरवलं नव्हतं. च्यामारी बगू, आवडलीच एखादी, समजा अगदीच भरली मनात आणि तिनंही जर आपल्याला पसंद केलं तर करूनदेखील टाकू लग्न! हा विचार मनात होताच. साला आता चाळीशीत खोटं कशापायी बोला? पण तो काय योग आला नाय. काही मुली मला पसंद पडल्या नाहीत आणि एखाद दोन मुली मला प्रथमदर्शनी पसंद पडल्या, परंतु च्यामारी त्यांना काय आपलं थोबाड आवडलं नाय!

ते असो. परंतु मुली पाहण्याचे जे काही कार्यक्रम केले ते काही अणुभव मात्र खरोखरीच मजेशीर होते. आमचे पिताश्री चचलेले आणि म्हातारी जरा पायाने अधू, त्यामुळे मुलगी पाहायला मी नेहमी एकटाच जात असे.

आता मंडळी, मला सांगा की मी तिच्यायला जन्मजात थोराड दिसतो, दोन पोरांचा बाप दिसतो हा काय माझा दोष झाला का? अहो दिसणं काय कुणाच्या हातात असतं का? साला, आम्ही म्यॅट्रिक पास झालो तेव्हाच बीकॉम झाल्यासारखे दिसत होतो त्याला आता आमचा काय इलाज? मग बीकॉम नंतर दोन वर्षांनी तर आम्ही अजूनच थोराड दिसत असणार! त्याचा अनुभव मला लवकरच एक मुलगी पाहायला गेलो होतो तेव्हा आला. एका भल्या मुलीच्या भल्या बापाने त्याच्या नकळतच आमच्या थोराडपणाचे धिंडवडे काढले होते!

बोरिवलीचं एक स्थळ होतं. जुजबी पत्रिका जुळली, फोनाफोनी झाली आणि एका रविवारी भल्या सकाळी मी त्या स्थळाचा बोरिवलीचा पत्ता हुडकत हुडकत त्या बिल्डिंगपाशी पोहोचलो. खाली नावांच्या पाट्या पाहिल्या. आमचं भावी सासर दुसर्‍या मजल्यावर होतं. पहिला मजला चढलो. जिन्यासमोरच्याच एका ब्लॉकचं दार उघडं होतं. बाहेरच्याच खोलीत कुणी काकू काही निवडत टीव्ही पाहात बसल्या होत्या. आमची नजरानजर झाली. माझ्या चेहेर्‍यावर नवख्या माणसाचे भाव होते. दुसरा मजला चढण्याकरता म्हणून मी वळलो तर मागून त्या काकूंची हाक ऐकू आली.

"कोण पाहिजे?"

"जोशी दुसर्‍या मजल्यावर राहतात ना? त्यांच्याकडे जायचंय."

"हो, हो, दुसरा मजला, ब्लॉक नंबर १०" काकू हासत हासत म्हणाल्या आणि आत वळल्या. मी तीन-चार पायर्‍या चढलो असेन नसेन, तोच मला त्या काकूंचा संवाद ऐकू आला. त्या बहुधा आपल्या 'अहों'शी बोलत असणार,

"बहुधा आरतीला पाहायला आले असावेत!"

छ्या! साला मी त्या आरतीला पाहायला जाणारा कुणी असेन किंवा तिच्या बापावर कोर्टाचं समन्स बजावणारा कुणी असेन! ह्या काकूला करायचंय काय!

दुसर्‍या मजल्यावर पोहोचलो. १० नंबरचा ब्लॉक जोश्यांचाच होता. मी दार ठोठावलं. एका सद्गृहस्थानं दार उघडलं. तो बहुतेक स्वत: जोश्याच असावा.

"नमस्कार. मी अभ्यंकर."

"या, या! आम्ही तुमचीच वाट पाहात होतो!" जोश्या शक्य तितक्या अदबीनं म्हणाला.

मी घरात शिरलो. जोश्या 'बसा' म्हणाला. पुढचा क्षण हा नियतीने आमच्या थोराडपणावर घातलेला घाला होता!

"हे काय? मुलगा कुठे आहे? तो नाही का आला?" जोश्याने आपलेपणाने, भोळेपणाने विचारलंन, परंतु आपण नक्की कुठला बाँब टाकला आहे याची त्या बिचार्‍या जोश्याला कल्पना नव्हती!

"मुलगा? अहो मीच मुलगा आहे!" :)

"हो का? वा वा वा!" जोश्या मनसोक्त हासत उद्गारला! :) :)

पुढची ष्टोरी सांगवत नाही!

तिथनं सुटलो आणि जिने उतरू लागलो. त्या पहिल्या मजल्यावरच्या तांदूळ निवडणार्‍या काकू दारातच उभ्या होत्या. त्या मला खो खो हासत आहेत असा उगाचंच मला भास झाला!

------------------------------------------------------------------------------------------------

बिवलकर! मुलुंडचं एक स्थळ. दुपारची ५ ची वेळ. ठरल्या वेळेनुसार मुलगी पाहायला म्हणून मी त्या घरी पोहोचलो. दारावरची बेल दाबली.

एका आठवी-नववीतल्या पोरसवदा मुलीने दार उघडलं. बहुधा नवर्‍या-मुलीची धाकटी बहीण असावी. पत्रिकेत दिलेल्या माहितीनुसार मुलीला एक धाकटी बहीण आणि भाऊ आहेत हे मला आठवलं!

"नमस्कार. मी अभ्यंकर."

ती मुलगी दार उघडून खुदकन हासत आत पळाली. बहुधा ताईला "भावी जिज्जाजी आले बरं का!" हे सांगायला गेली असावी!

"या या!"

बिवलकराने माझं स्वागत केलं. खाली कारपेटवर उघड्या अंगाचा बिवलकर बसला होता. बसला कसला होता, पसरलाच होता जवळजवळ! पट्ट्यापट्ट्याची अर्धी चड्डी आणि उघडाबंब! छ्या! या बिवलकराला अगदीच सेन्स नव्हता. अरे तुझ्या मुलीला पाहायला मंडळी येणार आहेत ना? अरे मग निदान लेंगा आणि एखादा साधा शर्ट घालून तरी बस ना! पण मंडळी, मला तरी तो बिवलकर तसाच आवडला होता! सेन्सबिन्स गेला खड्ड्यात!

"बसा! काय म्हणताय? घर सापडलं ना पटकन? की शोधायला काही त्रास झाला?"

बिवलकरने जुजबी संभाषण सुरू केलं.

"छ्या! सालं मुंबईत काय भयानक उकडतं हो आजकाल!" एका टॉवेलनं मानेवरचा घाम पुसत बिवलकर म्हणाला! बिवलकराने एव्हाना माझ्यातला व्यक्तिचित्रकार जागा केला होता!

एकंदरीत ते घर मला फार आवडलं होतं, बिवलकर आवडला होता. अवघडलेपण जाऊन मीही तिथे अगदी लगेच रुळलो. आतल्या खोलीतून खाण्याचा सुंदर वास येत होता. हम्म! खायचा बेत कहितरी जोरदार असणार!

थोड्या वेळाने नवरीमुलगी आतल्या खोलीतून बाहेर आली. सोबत बिवलकरकाकूही होत्या. घरगुती साडीतल्या, दात अंमळ पुढे असलेल्या बुटक्याश्या बिवलकरकाकू तेवढ्याच साध्या आणि सालस वाटत होत्या.

"नमस्कार मेहेंदळे!" बिवलकरकाकू म्हणाल्या.

"मेहेंदळे??" साला, आता हा मेहेंदळ्या कोण? मला काही कळेना!

"आग्गं! कम्माल आहे तुझी पण!" बिवलकर डाफरलाच जवळजवळ!

"अगं हे मेहेंदळे नाहीत, अभ्यंकर आहेत!"

बिवलकर आता बायकोवर चांगलाच वैतागला होता. आईने केलेल्या नावाच्या घोटाळ्यामुळे नवर्‍यामुलीचा चेहराही एव्हाना कसनुसा झाला होता.

"अभ्यंकर? अरे हां हां! बरोबर! अभ्यंकरच. सॉरी हां, माझा जरा घोटाळा झाला. मेहेंदळे सात वाजता यायच्येत!"

असं म्हणून भाबडेपणाने, मोकळेपणाने हासत काकू उद्गारल्या! छ्या! मला तर आता त्या मुलीपेक्षा काकूच जास्त आवडू लागल्या होत्या!

इथे बिवलकराच्या कपाळावर पुन्हा एकदा आठ्या चढल्या होत्या. वेंधळ्या बायकोने मेहेंदळे नावाची कुणी अजून एक पार्टी त्यांच्या मुलीला पाहायला सात वाजता येणार आहे ही माहिती उगाचंच उघड केली होती!

नवर्‍यामुलीशी, बिवलकर फ्यॅमिलीशी माझ्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या. जरा वेळाने मात्र त्या बिवलकरकाकूंचा मी आजन्म ऋणी राहीन असा बेत पुढ्यात आला. अप्रतीम चवीचा वांगी-भात, सोबत तितकीच सुंदर काकडीची कोशिंबिर आणि घरी केलेली अतिशय सुरेख अशी नारळाची वडी! माझ्यातला लाजराबुजरा नवरामुलगा केव्हाच पळाला होता आणि रसिक खवैय्या जागा झाला होता. मी मनमुराद दाद देत त्या बेतावर तुटून पडलो! स्वत: बिवलकर आणि बिवलकर काकू मला आग्रहाने खाऊ घालत होते. वांगीभाताचा आग्रह सुरू होता, नको नको म्हणता दोनपाच नारळाच्या वड्याही झाल्या होत्या!

"अहो घ्या हो अभ्यंकर! अहो लग्न जमणं, न जमणं हे होतच राहील. पण तुम्ही इतकी दाद देत आपुलकीने खाताय हीच आमच्याकरता खूप मोठी गोष्ट आहे!" बिवलकरकाकूंमधली अन्नपूर्णा प्रसन्नपणे मला म्हणाली!

मंडळी, बिवलकरांच्या मुलीने मला पसंद केलं की नाही किंवा मी तिला पसंद केलं की नाही हा भाग वेगळा, परंतु आजही वांगीभात म्हटलं की मला बिवलकरकाकू आठवतात! तसा खमंग आणि चवदार वांगीभात मी पुन्हा कधीच खाल्ला नाही!

-- तात्या अभ्यंकर.

हेच लेखन येथेही वाचता येईल...

November 01, 2008

आमचे मधुभाई...!

काही वर्षांपूर्वी डोंबिवलीच्या सर्वेश सभागृहात मधुभाईंची एक अत्यंत रंगलेली मैफल. तबल्याच्या साथीला तालयोगी पं सुरेश तळवलकर. श्रोतृवर्गात पद्मा तळवलकर, शुभदा पराडकर, पं अरूण कशाळकर, पं उल्हास कशाळकर आणि यांसारखे अनेक उत्तम कलाकार. यमन रागाने मैफलीला सुरवात व पुढे संपूर्ण मैफलच चढत्या भाजणीने रंगत गेलेली! यमन, सावनी, बसंतबहार असे एकापेक्षा एक सुरेख राग मघुभाईंनी लीलया पेश केले व श्रोत्यांना स्वरलयीच्या आनंदात अक्षरश: न्हाऊ घातले. मी त्या मैफलीचा साक्षिदार होतो. मधुभाईंच्या काही मोजक्याच मैफली ऐकण्याचं परमभाग्य मला लाभलं आहे!

"बाजुबंद खुली खुली जाए.."

मधुभाईं अगदी रंगात येऊन भैरवीच्या सुरांची लयलूट करत होते. 'बाजुबंद...' मधल्या एकसे एक खानदानी, थेट 'दिलसे' आलेल्या जीवघेण्या जागा! जागा कसल्या, बाजुबंद, पाटल्या-तोडेच त्या! श्रोते मंडळी अक्षरश: चुकचुकत होती, हळहळत होती, रडत होती आणि त्या शापित यक्षाला दाद देत होती!

मधुकर गजानन जोशी, ऊर्फ पं मधुकर जोशी, ऊर्फ आमचे मधुभाई! गाण्यातला एक शापित यक्ष!
मुक्काम पोस्ट - डोंबिवली.

विलक्षण सांगितिक प्रतिभा लाभलेला एक गुणी कलाकार. पण लौकिक अर्थाने फारसा पुढे न आलेला, फारसा कुणाला माहीत नसलेला!

मधुभाईंना घरातनंच संगीताचं बाळकडू मिळालेलं. आजोबा पं अंतुबुवा जोशी. थोरल्या पलुसकरांच्या शिष्यपरंपरेतले ग्वाल्हेर गायकीचे एक दिग्गज गवई! वडील पं गजाननबुवा जोशी. ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर गायकी पचवलेले एक अत्यंत प्रतिभावन गवई आणि तेवढेच थोर गुरू! पं उल्हास कळाळकर, पं अरूण कशाळकर, विकास कशाळकर, पद्मा तळवलकर, शुभदा पराडकर यांसारख्या गायकांना ज्यांनी घडवलं असे गजाननबुवा! घरातच गाणं असल्यामुळे साहजिकच संगीताचे सूर मधुभाईंच्या कानावर जन्मापासूनच पडलेले.

कुशाग्र बुद्धीचा मधु भराभर गाणं उचलू लागला, टिपू लागला. भूप, यमन, मुलतानी, हमीर, छायानट, शंकरा, बिहाग, बसंत, सोहोनी आदी राग मधुभाईंच्या गळ्यावर चढू लागले आणि खास ग्वाल्हेर परंपरेचं अष्टांगप्रधान गाणं मधुभाई गाऊ लागले. गजाननबुवांना ग्वाल्हेरसोबतच आग्रा आणि जयपूरचीही अतिशय उत्तम तालीम मिळालेली, त्यामुळे मधुभाईंनाही साहजिकच या गायकींचं बाळकडू घरातच मिळालं! रायसा कानडा, ललिता गौरी, शुद्धनट, बसंतीकेदार यांसरखे एकापेक्षा एक सुरेख व दिग्गज राग मधुभाईही लीलया गाऊ लागले, मांडू लागले! सूरलयतालावर मधुभाईंची अफाट हुकुमत निर्माण झाली. बालपणीची काही वर्ष आजोबांकडूनही, म्हणजे अंतुबुवांकडूनही मधुभाईंना तालीम मिळाली. त्यानंतर वडिलांचं,म्हणजे गजाजनबुवांचं गाणं मधुभाईंनी अक्षरश: टिपलं, वेचलं! मुळात घरात गाणं, रक्तात गाणं, त्यात उत्तम तालीम आणि त्याला जोड म्हणून मधुभाईंची कुशाग्र बुद्धी! मधुभाईंमधला उत्तम गवई घडवायला या गोष्टी पुरेश्या होत्या!

गाण्याच्या सोबतीनेच व्हायोलीनचाही छंद मधुभाईना जडला आणि मधुभाई व्हायोलीनदेखील अतिशय उत्तम वाजवू लागले. गजाननबुवा स्वत:ही अगदी उत्तम व्हायोलीन वाजवायचे. लेकाने वडिलांचा हाही गूण अगदी सहीसही उचलला. पुढे काही वर्ष व्हायोलीनवादक म्हणून स्टाफ आर्टिस्ट या पदावर मधुभाईंनी मुंबई आकाशवाणीवर नोकरीही केली! मधुभाई व्हायोलीनही फार सुरेख वाजवतात!

मला मधुभाईंची मुलुंड मध्ये झालेली एक गाण्याची मैफल आठवते. मधुभाईंनी तेव्हा भूप मांडला होता. इतका अप्रतीम भूप मी त्यानंतर आजतागायत ऐकलेला नाही! ग्वाल्हेर पद्धतीने सादर केला गेलेला अगदी ऑथेन्टिक भूप! भूपासारख्या अत्यंत अवघड रागाचं शिवधनुष्य मधुभाईंनी अगदी लीलया पेललं होत! त्याच मैफलीत मधुभाईंनी तेवढ्याच सुंदरतेने ललितागौरी मांडला. 'प्रितम सैया..' ही ललितागौरीतली पारंपारिक बंदिश! ओहोहो, क्या बात है! मधुभाईंच्या ललितागौरीतल्या त्या "प्रितम सैया, दरस दिखा..."च्या त्या विलक्षण सुरांनी त्या संध्याकाळी अक्षरश: अंगावर काटा आणला. सगळी मैफलच त्या ललितागौरीने मंत्रमुग्ध होऊन गेली! आधी ग्वाल्हेर परंपरेतला भूप, ग्वाल्हेर गायकीच्या सौंदर्याची उधळण करत गाणारा हा शापित यक्ष नंतर जेव्हा त्याच ताकदीने जयपूर गायकीही तेवढ्याच समर्थपणे मांडत ललितागौरीही गाऊ लागला तेव्हा श्रोतृवर्ग अक्षरश: थक्क झाला. आजही ती मैफल मला आठवते आणि मी बेचैन होतो!

मंडळी, माझं भाग्य हे की मला मधुभाईंचा अगदी भरपूर सहवास लाभला. त्यांच्याकडून मला गाण्यातलं खूप काही शिकायला मिळालं आहे, आजही मिळतं आहे! अगदी कधीही त्यांच्या घरी जा, मधुभाई अगदी हसतमुखाने स्वागत करणार! मंडळी तुम्हाला काय सांगू, आमचे मधुभाई स्वभावानेही अगदी साधे हो! वास्तविक इतका विद्वान गवई परंतु त्या विद्वत्तेचा कुठेही गर्व नाही की शिष्टपणा नाही!

"मधुभाई, जरा ती यमनमधली "नणंदीके बचनवा सहे ना जाय.." ही बंदिश दाखवा ना!" असं नुसतं म्हणायचा अवकाश की लगेच मधुभाईंनी केलीच सुरू ती बंदिश! आणि मग ती गातांना तिचं सौंदर्य कुठे आहे, कुठे आघात द्यावा, शब्दांचा कसा कुठे उच्चार करावा, एखाद्या रागाकडे कसं बघावं, रागात काय मांडावं, कसं मांडावं, तालालयीचे हिशेब कसे साभाळावेत, कुठल्या रागाचं किती पोटेन्शियल आहे ते ओळखून कसं गावं, इत्यादी अनेक गोष्टींवर मधुभाई अगदी भरभरून बोलतात, हातचं काहीही राखून न ठेवता शिकवतात!

"अरे ताला-लयीशी खेळा रे, पण तिच्याशी मारामार्‍या नका करू! सम कशी सहज आली पाहिजे, तिला मुद्दामून ओढून-ताणून आणू नये! हां, आणि समेवर येण्यात वैविध्य पाहिजे, एकाच एक पद्धतीने समेवर येऊ नये! तुम्ही एखाद्याशी बोलताय, संवाद साधताय असं गायलं पाहिजे!"

मधुभाई सांगत असतात, शिकवत असतात, आम्ही शिकत असतो!

एका शिष्येला गाण्याची तालीम देताना मधुभाई -



आमच्या मधुभाईंचा स्वभावही अत्यंत बोलका आहे. सतत गाण्यातल्या कुठल्या ना कुठल्या विषयावर गप्पा मारतील, गजाननबुवांच्या, अंतुबुवांच्या, अन्य जुन्याजाणत्या बुजुर्गंच्या आठवणी सांगतील. मधुभाईंनी गाण्यातला खूप मोठा जमाना बघितला आहे, अनेक दिग्गज गवई अगदी भरभरून ऐकले आहेत. जगन्नाथबुवा, अण्णासाहेब रातंजनकर, मिराशीबुवा, कितीतरी गवयांची गाणी मधुभाईंनी अगदी भरभरून ऐकली आहेत! आणि घरात काय, साक्षात अंतुबुवा आणि गजाननबुवा! या सग़ळ्या मंडळींकडून मधुभाई खूप काही शिकत गेले, शिकले!

"अरे गजाननबुवांना मी फार घाबरायचो बरं का! खूप मार खाल्ला आहे मी बुवांच्या हातचा!" मधुभाई मोठ्या मिश्किलपणाने आपल्या वडिलांबद्दल बोलत असतात!

"काय सांगू तुला लेका, आमच्या नानांच्या (गजाननबुवांच्या) वार्‍यालाही मी फारसा उभा रहात नसे. शिक म्हटलं की चुपचाप शिकत असे. उल्हासला, पद्माला किंवा त्यांच्या इतर शिश्यांना तालीम द्यायचे तेव्हा मीदेखील तिथे हळूच जाऊन बसत असे आणि काय गातात,कसं गातात या सगळ्या गोष्टी टिपत असे! पण मी भाग्यवान रे, मला शेवटची काही वर्ष वडिलांची सेवा करण्याचं भाग्य मिळालं! म्हातारपणी त्यांच्या हातापायांना मालिश करावं लागत असे तेव्हा त्यांना मीच लागायचो. दुसरी कुणी भावंडं गेली की म्हणायचे, तुम्ही नको, मधुला बोलवा!" तीच सेवा आज थोडीफार उपयोगी पडते आहे आणि चार स्वर गाता येत आहेत!"

खरंच मंडळी, गाण्याची अन् गाणार्‍यांची ही विलक्षणच दुनिया आहे. भाईकाकांच्या भाषेत सांगायचं तर या दुनियेतली कुळं निराळी, इथले कुळाचार निराळे! मधुभाईंसारख्या जिनियस गवयाचा उल्लेख मी काही वेळा 'शापित यक्ष' असा का केला आहे याची कारणमिमांसा मी इथे करणार नाही! पण कारणमिमांसा जरी करणार नसलो तरी तो एक शापित यक्ष आहे हे नाकारता येणार नाही व म्हणून फक्त तसा उल्लेख मात्र मला करणं भाग आहे, नव्हे तो मी मुद्दामून केला आहे! परंतु बस इतकंच! लौकिक अर्थाच्या दुनियेत या शापित यक्षाचं स्थान काय आहे, काय नाही याच्याशी मला काही एक देणंघेणं नाही! माझा मतलब आहे तो त्यांची गायकी, त्यांचे सूर आणि त्यांची लयकारी, सरगमवरची त्यांची विलक्षण हुकुमत, याच्याशी! मधुभाईंसारखे गवई कुठच्या एका अज्ञात परंतु विलक्षण अश्या तिडिकेतून गातात, कुठली एक कसक त्यांच्यात संचारते आणि ते स्वरलयींची अप्रतीम अशी शिल्प घडवतात त्या तिडिकेबद्दल, त्या अज्ञात शक्तिबद्दल मी पुन्हा केव्हातरी बोलेन! अगदी भरभरून आणि मनमोकळेपणाने! हातचं काही राखून ठेवता! एक गोष्ट मात्र खरी की मधुभाईंसारखे काही गवई, काही कलाकार, हे लौकिक अर्थांच्या चौकटीत नाही बसत आणि त्यांना तसं बसवूही नये! कारण सगळ्याच प्रश्नांची उत्तरं काही आपल्याला माहीत नसतात! करायचंच असेल तर आपण फक्त त्याच्या कलेला वंदन करावं! असो...!

आमच्या मधुभाईंना नॉनव्हेज जेवण फार प्रिय बरं का मंडळी! मी कधी डोबिवलीला त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेलो की मुद्दामून म्हणतो,

"बुवा, आज जेवायला बाहेर जाऊया बरं का! सत्कार हॉटेलात मालवणी जेवण फार झकास मिळतं तिथे जाऊया!"

हे ऐकल्यावर बुवांच्या चेहेर्‍यावर एक निरागस आनंद पसरतो परंतु मला म्हणतात,

"अरे कशाला तुला उगाच खर्च? बरं चल, म्हणतोस तर जाऊया! पण पैसे मी देईन हो!"

"ते आपण बघुया बुवा! तुम्ही चला तर खरे!"

"बरं चल!"

असा आमचा संवाद होतो आणि आम्ही बाहेर जेवायला जातो. रस्त्याने एका दिग्गज गवयासोबत चालल्याची ऐट असते माझ्या चेहेर्‍यावर!

तात्या आणि मधुभाई मालवणी मटणाचं जेवत आहेत!



"आज सुरमई घेऊ या का रे? ताजी दिसते आहे!"

थोड्याच वेळात सुरमईची कढी आणि तळलेली तुकडी असलेली ताटं आमच्या पुढ्यात येतात!

"आणि बरं का रे, मटणसुद्धा मागव रे! आज जरा मन लावून मटणही खाईन म्हणतो!"

एखाद्या लहान मुलाने ज्या निरागसतेने चॉकलेट मागावं ना, अगदी तीच निरागसता मटण मागवताना आमच्या बुवांच्या चेहेर्‍यावर असते! त्यांची मटणाची फर्माईश पुरी करायला मला अगदी मनापासून आवडतं! कारण मी त्यांना फक्त तेवढंच देऊ शकतो! त्यांनी मला आजतागायत किती भरभरून दिलं आहे त्याची काही गणतीच नाही!

-- तात्या अभ्यंकर.

October 30, 2008

अवघा रंग एक झाला....

'अवघा रंग एक झाला,
रंगी रंगला श्रीरंग..'

रघुनंदन पणशीकरांनी भैरवीतला हा अभंग सुरू केला आणि समस्त श्रोतृसमुदाय दिवाळीच्या मुहूर्तावर त्या भैरवीच्या अभ्यंगस्नानात नाहून निघाला, तृप्त झाला..!

रघुनंदन पणशीकर..

'तो मी नव्हेच..' मधल्या निप्पाणीतल्या तंबाखूच्या व्यापार्‍याचा - लखोबा लोखंडेंचा, अर्थात नटवर्य प्रभाकरपंत पणशीकरांचा सुपुत्र. गानसरस्वती किशोरी अमोणकरांचा शागीर्द! आजच्या तरूण पिढीतला एक अतिशय चांगला, कसदार आणि प्रॉमिसिंग गवई, ज्याच्याकडून अजून मोप मोप ऐकायला मिळणार आहे असा..!

रधुनंदन पणशीकर माझ्या अगदी चांगल्या परिचयाचे. मी त्यांना रघुनंदनराव किंवा रघुबुवा असं संबोधतो. एक चांगला रसिक आणि जाणकार श्रोता म्हणून रघुनंदनराव मला मान देतात, त्यांच्या बैठकीत बसवतात, मित्र म्हणून माझ्या खांद्यावर हात ठेवतात हा त्यांचा मोठेपणा! असो.

औचित्य होतं मुलुंडमधील महाराष्ट्र सेवा संघ या सांस्कृतिक कार्याला वाहून घेतलेल्या एका संस्थेने आज आयोजित केलेल्या
दिवाळी-पहाट या कार्यक्रमाचं! सुंदर सकाळची वेळ. तानपुरे जुळत होते, तबला लागत होता, मंचावर रघुनंदनराव गाण्याकरता सज्ज झाले होते.

'हे नरहर नारायण...' या बिभासमधल्या विलंबित रूपक तालातल्या पारंपारिक बंदिशीने गाण्याला सुरवात झाली. राग बिभास. शुद्ध धैवत, कोमल धैवत, दोन्ही अंगाने गायला जाणारा सकाळच्या प्रहरचा एक जबरदस्त इन्टेन्स्ड राग. बिभास हा तसा गंभीर तरीही आपल्याच मस्तीत हिंडणारा राग आहे. 'तुम्हाला असेल माझी गरज तर याल माझ्यापाठी!' असं म्हणणारा आहे. रघुबुवांनी बिभासची अस्थाई भरायला सुरवात केली. कोमल रिखब, शुद्धगंधार, पंचम, दोन्ही धैवतांचा अत्यंत बॅलन्स्ड वापर करत रघुबुवांनी बिभासमध्ये रंग भरायला सुरवात केली. सगळा माहोल बिभासमय झाला. 'हे नरहर नारायण..' ने एक सुंदर दिवाळी पहाट उजाडली..! विलंबितानंतर 'मोर रे मीत पिहरवा..' ही पारंपारिक द्रुत बंदिश अतिशय सुंदर गाऊन बिभासची सांगता झाली!

बिभासने पूर्वा उजळली होती, छान केशरी झाली होती. आता तिच्यावर रंग चढले ते हिंडोलचे. राग हिंडोल. एक जादुई, अद्भूत असा राग. त्यातल्या तीव्र मध्यमामुळे हिंडोलचा एक विलक्षणच दरारा पसरतो. त्याचं जाणं-येणं हे अक्षरश: एखाद्या हिंदोळ्यासारखंच असतं. 'तोडी, ललत, भैरव, रामकली हे असतील सकाळचे काही दिग्गज राग, लेकीन हमभी कछू कम नही..!' असा रुबाब असतो हिंडोलचा!

रघुबुवांनी आज हिंडोल चांगला जमूनच गायला, कसदार गायला. हिंडोलातल्या अद्भूततेला रघुबुवांनी आज अगदी पुरेपूर न्याय दिला.

"बन उपवन डोल माई,
ऋतुबसंत मन भावन
सब सखीयन खेल हिंडोले.."

ही मध्यलय एकतालातली मोगुबाई कुर्डिकरांची बंदिश. ही बंदिश आज रघुबुवांनी फारच सुरेख गायली. पाहा मंडळी, आपल्या रागसंगीताला, त्यातल्या रचनांनादेखील गुरुशिष्य परंपरेचा कसा सुंदर वारसा असतो ते! मोगुबाई या किशोरीताईंच्या माता व गुरू. त्यामुळे त्यांच्याकडनं ही बंदिश किशोरीताईंना मिळाली, व तीच तालीम किशोरीताईंनी रघुबुवांना दिली आणि म्हणूनच या थोर गुरुशिष्य परंपरेमुळेच ही सुंदर बंदिश आज तुमच्या-माझ्या पिढीला ऐकायला मिळाली/मिळत आहे!

हिंडोल नंतर रघुबुवांनी मध्यलय एकतालातला तोडी रागातला एक पारंपातिक तराणादेखील सुंदर रंगवला. त्यानंतर रंगमंचावर अवतरली ती आपली समृद्ध संगीत रंगभूमी. 'दिन गेले हरिभजनावीण..' हे कट्यारमधलं नाट्यपद रघुबुवांनी सुरू केलं! दारव्हेकर मास्तरांच्या अन् वसंतखा देशपांड्यांच्या कट्यारमधली सगळीच पदं अतिशय सुरेख आणि एकापेक्षा एक बढिया! सुंदर गंधर्व ठेका आणि अत्यंत कल्पक आणि प्रतिभावंत असं अभिषेकीबुवांचं संगीत असलेलं "दिन गेले.." हे पददेखील त्याला अपवाद नाही. रघुबुवा हे पद गाऊन श्रोत्यांना मराठी संगीत रंगभूमीच्या त्या वैभवशाली काळात घेऊन गेले असंच मी म्हणेन..!

त्यानंतर सारी मैफलच चढत्या भाजणीने रंगत गेली. रघुबुवांनी स्वत: बांधलेलं यमन रागातलं अतिशय सुरेख असं मधुराष्टक,
बोलावा विठ्ठल-करावा विठ्ठल, पद्मनाभा नारायणा, अवघा रंग एक झाला, हे अभंग रघुबुवांनी अतिशय उत्तम व कसदार गायले. श्रोत्यांची मनमुराद दाद मिळत होती. भैरवीतल्या 'अवघा रंग एक झाला..' मुळे खरोखरच अवघा रंग एक झाल्यासारखे वाटले. आजची ही मैफल म्हणजे गवई आणि रसिक श्रोते यांच्यातला एक उत्तम संवाद होता, एक अद्वैत होतं!

रघुबुवांची जमलेली मैफल..




खरंच मंडळी, रघुबुवांच्या आजच्या या संस्मरणीय मैफलीमुळे माझी दिवाळी अगदी उत्तम साजरी झाली. आजवरच्या माझ्या श्रवणभक्तिच्या मर्मबंधातल्या ठेवींमध्ये अजून एक मोलाची भर पडली, मी अजून श्रीमंत झालो, समृद्ध झालो!

दुग्धशर्करा योग -

मंडळी, आज माझं भाग्य खरंच खूप थोर होतं असंच म्हणावं लागेल. आजच्या रघुबुवांच्या मैफलीत मला भाईकाकांचे मधु कदम भेटले! भाईकाकांसोबत वार्‍यावरची वरात, रविवारच्या सकाळमध्ये चिपलूनच्या रामागड्याचं फार सुंदर काम करणारे मधु कदम! साक्षात भाईकाकांसोबत मराठी रंगभूमीवर,

"निघाली, निघाली, निघाली वार्‍यावरची वरात..!"

असं मनमुराद गाणारे मधु कदम!

मधुकाका आणि रघुनंदनराव यांच्यासोबत तात्या...




मधु कदम मुलुंडमध्येच राहतात. तेही आज मुद्दाम रघुबुवांच्या मैफलीचा आनंद लुटण्याकरता आले होते. मध्यंतरात ग्रीनरूममध्ये आम्ही बसलो होतो तेव्हा मधुकाकाही तिथे आले. रघुबुवांनी आणि मी त्यांना वाकून नमस्कार केला. मध्यंतरानंतर मधुकाकांनी आपणहून बोलावून मैफलीत मला त्यांच्या शेजारी बसवून घेतले. रघुबुवांच्या एखाद्या छानश्या समेला तो म्हातारा माझ्या हातात हात घेऊन दाद देऊ लागला! मंडळी, जेव्हा एक श्रोता दुसर्‍या श्रोत्याचा हातात हात घेऊन दाद देतो ना तेव्हा अभिजात संगीतातला तो क्षण खरोखरच अनुभवण्यासारखा असतो एवढंच सांगू इच्छितो..!

रघुबुवांचं अभंगगायन ऐकून म्हातारा हळवा होत होता, मनोमन सुखावत होता!

बोलताबोलता साहजिकच भाईकाकांच्या आठवणी निघाल्या.

"भाई? आता काय सांगू तुला? अरे आमच्यात सख्ख्या भावापेक्षाही जवळचं नातं होतं रे! ते माझे बंधु,सखा, गुरू.. अगदी सबकुछ होते रे.."

डोळ्याच्या कडा ओलावत म्हातारा माझ्याशी बोलत होता..!

"एकदा घरी ये ना रे माझ्या! अगदी भरपूर गप्पा मारू. इथे जवळच राहतो मी मुलुंडला.."

'पुलकीत' माणसं कशी असतात ते मी जवळून पहात होतो. आतल्या आत रडत होतो..!

मंडळी, इथे डिटेल्स देत नाही, परंतु आज मधुकाकांना एक कौटुंबिक दु:ख आहे हे मला माहीत आहे. काळाच्या ओघात केव्हाच मागे पडलेल्या या कलाकाराची आर्थिक परिस्थितीही खूप बेताची आहे. परंतु आज म्हातारा अगदी सगळं विसरून रघुबुवांचं गाणं ऐकत होता, त्यातल्या लयीसुरांशी एकरूप झाला होता!

ही एकरूपता, ही रसिकता कशात मोजणार? वरातीच्या निमित्ताने ' पुलं ' या मराठी सारस्वताच्या अनभिषिक्त सम्राटासोबत त्यांनी घालवलेला तो वैभवशाली काळ, ती श्रीमंती आज तुमच्याआमच्या नशीबी येणार आहे का?

असो,

अवघा रंग एक झाला.. या भैरवीतल्या अभंगाने मैफल संपली. मी रघुबुवांचा आणि मधुकाकांचा निरोप घेऊन निघालो..

निघतांना माझ्या कानात भैरवीचे सूर तर होतेच, परंतु मधुकाकांचे शब्दही होते..

"एकदा घरी ये ना रे माझ्या! अगदी भरपूर गप्पा मारू. इथे जवळच राहतो मी मुलुंडला.."

-- तात्या अभ्यंकर.

हेच लेखन येथेही वाचता येईल..

October 29, 2008

दिपावलीच्या शुभेच्छा...

सर्व मराठी आंतरजालकर्मीना व ब्लॉगकर्मींना माझ्या व्यक्तिगत व आमच्या संपूर्ण मिसळपाव परिवारातर्फे दिपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...

तात्या अभ्यंकर,
मिसळपाव डॉट कॉम.