May 13, 2014

मंदिरात अंतरात...

"तात्या, आहेस का रे? तुला रीतसर आवतान देतो गाण्याचं.. पोर आज जायची आहे रे अमेरिकेला.."

आत्ता संध्याकाळी बाळासाहेब शिंगोटेंचा फोन.. बाळासाहेब शिंगोटे म्हणजे आमच्या कोपरी गावातलं एक बडं प्रस्थ..

"बाळासाहेब, मी येईन पण आत्ता? अहो आधी तरी सांगायचंत.. मला दोन पेग लावल्याशिवाय गाता येत नाही.."

"अरे तू ये रे..पटकन मार कुठेतरी आणि ये.. मला बील दे.."

मग मी तिथे कोपरीतल्याच एका बार मध्ये एक बॅगपायपर क्वार्टर मारली आणि कोपरी गावातल्या बाळासाहेबांच्या घरी हजर झालो...

तिथे कुणी हौशी तबला-पेटीवाले होतेच..बाळासाहेबांच्या घरचीच पाच-पंचवीस मंडळी होती.. मग मी बैठक मारली.. बाबूजी, अण्णांचं स्मरण केलं आणि,

"मंदिरात अंतरात तोच नांदत आहे..नाना देहि, नाना रुपी तुझा देव आहे.."

आणि,

"टाळ बोले चिपळीला.."

हे दोन अभंग मस्त रंगवून, ताना वगैरे घेऊन म्हटले.. पब्लिक सालं खुश..! :)

जास्त वेळ गायचंच नव्हतं.. कारण बाळासाहेबांची एकुलती एक लेक आणि जावई आज रात्री उशिराच्या विमानाने अमेरीकेला जायचे आहेत.. आमच्या हौशी-हळव्या बाळासाहेबांनी लेकीचा send off ठेवला होता..तात्याचं गाणं ठेवलं होतं..!.

"बाळासाहेब.. येतो मी..तुमचं चालू द्या.."

"अरे असं कसं तात्या.. दोन घास खाऊन जा.."

गरमगरम पावभाजी आणि आंबा-आइसक्रीम चा बेत होता..

त्यानंतर मला बाळासाहेबांनी आतल्या खोलीत बोलावला.. क्वार्टरचे दोनशे रुपये आणि १००१ रुपये बिदागी माझ्या हातावर ठेवली.. आम्ही खोलीच्या बाहेर आलो...

"सुमन..तात्या निघाले.. पाया पड.."

बाळासाहेबांच्या डोळ्यात पाणी.. मुलीचा बाप हो.. फारच हळवा..

मग सुमन आणि जावई माझ्या पाया पडले..

"सुखी राहा.. खूप खूप यशस्वी व्हा.."

"भटाचा आशीर्वाद आहे गं सुमन.. " - बाळासाहेबांच्या डोळ्यात पुन्हा पाणी.. माझ्याही डोळ्याच्या कडा ओलावलेल्या..!

सासरी गेलेल्या.. आणि आता परदेशी चाललेल्या एकुलती एक मुलीबद्दलची माया, ओढ.. कशात मोजायची..?

बाळासाहेबांच्या डोळ्यातला एक एक अश्रू अनमोल होता..!

-- तात्या अभ्यंकर..

April 20, 2014

कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे...

कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे
आम्हासि का दिली वांगली रे...

येथे ऐका - http://www.youtube.com/watch?v=Nc16cBewztM

शरीररुपी वस्त्र.. कबीर याला चादर म्हणतात.. तर माउली या करता घोंगडी हा लोभसवाणा शब्द वापरतात..

जसं आपण एखाद्या घोंगडीने आपल्या शरीराला झाकतो.. तसं आपलं शरीर ही देखील एक घोंगडीच आहे जी आपल्या आत्म्याला झाकते.. 

ते त्यांच्या कान्होबाला, विठुरायाला विचारत आहेत की अरे विठुराया.. हे जे आमचं शरीर आहे.. ते सर्व व्याधीविकारांनी ग्रस्त आहे.. अरे तू आम्हाला तुझ्यासारखी घोंगडी का नाही दिलीस?.. आम्हाला का वांगली घोंगडी दिलीस? आमचं घोंगडं तुझ्यासारखं का नाही रे..?

स्व-गत सच्चितानंदे मिळोनि
शुद्ध सत्व गुणे विणली रे..

स्व- गत, सोहम.. ब्रह्म, सच्चितानंद.. किंवा आपण ज्याला आत्मानंद म्हणतो अशांनी मिळून, तुझी चादर ही शुद्ध, सात्विक गुणांनिशी विणलेली आहे.. !

षड्गुण गोंडे रत्नजडित तुज
श्यामसुंदरा शोभली रे..

आणि म्हणूनच हे विठोबा.. तुझी ही चादर रत्नजडीत आहे.. षट्गुण हीच्या त्या चादरीची रत्न आहेत, तिचे गोंडे आहेत आणि अशी चादर तुला शोभून दिसते.. कुठली आहेत ही सहा रत्न..? ज्ञान, ऐश्वर्य, बल, स्फूर्ती, वीरता, आणि तेज..!

षड-विकार, षड-वैरी मिळोनि
तापत्रयाने विणली रे..

आणि आम्हाला तू जी घोंगडी दिली आहेस ती कशी आहे रे? ती षड-विकार, षड-वैरी, आणि तापत्रयाने विणलेली आहे.. 

कुठले षडविकार?  अस्तित्व, जन्म, वाढ, तारुण्यावस्था वा प्रौढावस्था, क्षय किंवा जर्जरता आणि मृत्यू..!

कुठले षड-वैरी..? काम, क्रोध, मद, मोह, मत्सर आणि लोभ..!

आणि कुठले तीन ताप किंवा तापत्रय? आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक किंवा आधि-आत्मिक..

बघ कान्होबा.. कशी घोंगडी तू आम्हाला दिली आहेस.. हिला 'वांगली' नाही म्हणायचं तर दुसरं काय म्हणायचं? 

नवा ठायी फाटुनि गेली
ती त्वा आम्हासि दिधली रे..

अशी ठिकठिकाणी फाटलेली घोंगडी तू आम्हाला का दिलीस? अशी घोंगडी कशी पुरी पडणार आमच्या आत्म्याकरता? अशा घोंगडीमुळे आत्मशुद्धी मिळेल का.?

ऋषि मुनी ध्याता मुखि नाम गाता
संदेह वृत्ती नुरली रे...

मोठमोठे संतसज्जन, ऋषिमुनी जेव्हा तुझी ध्यानधारणा करतात.. तुझं नाम गातात.. तेव्हा खरंच रे कान्होबा असं वाटतं की तू आणि मी एकच आहोत..

अखेर तो नाम-महिमाच असा आहे की तू माझ्यात आहेस आणि मी तुझ्यात आहे या अद्वैताची खात्री पटते. कुठलाही संदेह रहात नाही..

संदेह वृत्ती नुरली रे...!

माउलीची शब्दयोजना काय अप्रतिम आहे पाहा..!

बाप-रखुमा देवीवरु विठ्ठलु
त्वत् पदी वृत्ति मुरली रे..

हे विठोबा, रखुमाईच्या वरा.. तुझ्या चरणी, तुझ्या पदी माझी सारी वृत्ती मुरली आहे, मी तिला तुझ्या पदी अर्पण केली आहे..!

देवा रे माझ्या..ज्ञानबामाउलीचं हे फक्त एक काव्य हाच मुळी डॉक्टरेटचा विषय आहे.. अजून सबंध ज्ञानेश्वरी तर दूरच राहिली..! :)

संदेह वृत्ती नुरली रे
त्वत पदी वृत्ती मुरली रे..

याला काव्य म्हणतात..!!!! 



मंडळी, ज्ञानोबांच्या ह्या ओळींचं मी माझ्या पात्रतेनुसार हे थोडंफार तुच्छ विवेचन केलं आहे..माउलीचं काव्य हे सार्‍या ब्रह्मांडाला व्यापून आहे.. कुणाकुणाला त्याचा कसा अर्थ लागेल, ते त्याचं याहूनही कितीतरी पटीने अधिक रसाळ विवेचन करू शकतील याची मला नम्र जाणीव आहे.. कारण मुळातच माउलीच्या काव्याबद्दल काही लिहिताना आपल्यातला "मी" हा बाजूला ठेवायला लागतो.. तरच दोन शब्द लिहिणं जमू शकतं..!

आणि अण्णांची गायकी..? मी काय बोलू? अहो साक्षात माउलींचाच आशीर्वाद असल्यशिवाय अशी गायकी येणार नाही.. स्वयंभू साक्षात्कारी, अधिक गुरुकडील विद्या, अधिक नारायणराव बालगंधर्वांचे संस्कार..!

षड-विकार षड-वैरी मिळोनि.. - यातला थोडा ललत बघा, किंवा नंतर पंचमासहितचा थोडा ललत-भटियार बघा..

किंवा नंतर याच शब्दांना अण्णांनी अचानक जोगियामध्ये कसं विणलं आहे ते बघा.. अण्णांच्या कोमलधैवतातलं दैवी समर्पण बघा.. 

काय बोलावं.. ? !

बाप-रखुमा देवीवरु विठ्ठलु.. या शब्दातली मध्यमाची गायकी पाहा.. अण्णांनी अचानक यमनमध्ये जाऊन कसं सुखावलं आहे ते पाहा.. काय बोलावं आणि लिहावं तरी काय..!

माझं भाग्य की अण्णांची अभंगवाणी खूपदा ऐकायला मिळाली.. अगदी चार चार-पाच पाच तास अण्णा गायचे..आणि दोन अभंगांच्यामध्ये कविवर्य वसंत बापट सरांचं रसाळ निरुपण.. श्रोत्यांना प्रश्न पडायचा की अण्णांचं गाणं ऐकावं की बापटसरांचं निरुपण ऐकावं...!

अण्णा जेव्हा विठ्ठलाला 'बाप रखुमा देवी वरु विठ्ठलु..' असं म्हणून साद घालायचे तेव्हा तो सावळा आपली घोंगडी आणि काठी घेऊन त्या सभागृहातच कुठेतरी ऐकत बसलेला असायचा..!

-- तात्या अभ्यंकर..

January 18, 2014

दु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनात..?

भाईकाकांचा गजा खोत हा हार्मोनियमवर 'उगीच का कांता..' हे पद वाजवायचा प्रयत्न करतो आणि त्या नादात 'उगीच..' या शब्दातील उ गी च ही अक्षरं हार्मोनियमच्या बटणांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो.. :)

वास्तविक कुठलीही अक्षरं ही त्या त्या स्वरांमध्येच वाजतात आणि स्वर तर फक्त सातच आहेत हे आपल्याला माहीत आहे.. सारेगमपधनीसां.. या ७ स्वरातला हा सारा खेळ आहे..

परंतु गाण्याचा अभ्यास करताना मला हे जाणवलं की क्वचित काही योग असेही येतात जेव्हा काव्यातलं एखादं अक्षर हे नेमकं सारेगमपधनीसां या स्वरात बसतं आणि तेव्हा तो माझ्या मते 'सोने पे सुहागा..' असा योग असतो..

सांगतो कसं ते.

गीत रामायणतल्या 'पराधीन आहे जगती..' या अजरामर गाण्यामधल्या एका कडव्यातल्या ओळी आहेत..

जरा मरण यातून सुटला कोण प्राणिजात
दु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनात..?

आता गंमत बघा.. की 'दु:खमुक्त जगला का रे..' या ओळीतल्या 'रे' या अक्षरावर नेमका शुद्ध रिषभ पडला आहे.. शुद्ध रिषभ म्हणजे 'सारेगमपधनीसां..' मधला रे..!

म्हणजे मूळ काव्यातलं अक्षरही 'रे' आणि त्याचा स्वरही 'रे' च..!

आणि रे या अक्षरावर असलेला रे हा स्वर मला विलक्षण आकर्षित करतो, खूप काही सांगून जातो..!

कुणाकडे मयत झालं तर आपण काय करतो..? त्या घरातल्या लहान-थोरांची,

'काय इलाज आहे सांगा पाहू? जन्माला आलेला प्रत्येक जण जाणारच आहे की नाही? तुम्ही असा धीर सोडू नका.. होईल सगळं काही ठीक.. आम्ही आहोत ना तुमच्यासोबत.."

असं काहितरी म्हणून आपण त्या कुटुंबियांचं सांत्वन करतोच की नाही?

नेमकं तेच सांत्वन इथे श्रीराम भरताचं करताहेत.. त्याची समजूत काढताहेत.. आणि ती समजूत काढताना ते म्हणताहेत..

"दु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनात..?"

आणि या ओळीतलं ते 'रे' हे अक्षर आणि त्यावरचा 'रे' हा स्वर.. मला खूप खूप इंटिमेन्ट वाटतो.. भावनेच्या खूप जवळ घेऊन जातो..

काय सांगतो तो रे हा स्वर..?

हेच की श्रीराम खूप म्हणजे खूप प्रगल्भ विचारांचे आहेत.. ते भरताच्या पाठीवरून हात फिरवून त्याची समजूत काढत आहेत, त्याला धीर देत आहेत..

"दु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनात..?..!'

मंडळी, म्हणूनच असं नेहमी म्हटलं जातं की गाणं ही अनुभवायची गोष्ट आहे..

काल मी कुसुमाग्रजांच्या 'सरणार कधी रण..' या गाण्याबद्दल दोन ओळी लिहिल्या होत्या.. आज पुन्हा 'पराधीन आहे जगती..' याबद्दल दोन ओळी लिहिल्या..

मी आजतागायत गाणं आणि खास करून गीतरामायण या विषयावर भरपूर डोकेफोड केली आहे, सततचं चिंतन-मनन केलं आहे आणि त्यातूनच क्वचित असे काही माणिक-मोती हाती लागतात. सतत त्या प्रशांत महासागरात न कंटळता श्रद्धेने डुबक्या मारत रहायचं हेच आपलं काम..!

माझ्या मते 'सरणार कधी रण..' किंवा 'पराधीन आहे जगती..' ही केवळ गाणी नाहीत, तर हे संदर्भ ग्रंथ आहेत.. सर्जनशील, सृजनशील आयुष्याच्या ह्या पोथ्या आहेत.. यांना एखाद्या धर्मग्रंथाइतकं मोल आहे..!

-- (बाबूजींचा शिष्य) तात्या अभ्यंकर.

January 05, 2014

लय म्हणजे काय हो? :)

तात्याचं गाणं.. या कार्यक्रमातील तात्यांचे लय-ताल विषयक अगदी साधेसोपे विचार..

गाण्यातली लय म्हणजे काय?

मुळात लय म्हणजे काय?

ढोबळ मानाने सांगायचं तर लय म्हणजे एक ठराविक गती. घड्याळाची टिकटिक, नाडीचे ठोके..

एखाद्या निरांजनातली ज्योत शांतपणे तेवत असते तेव्हा तिच्यातही एक लय असतेच की.. एक शांत, सुंदर लय..!

मुळात लय म्हणजे सजीवता, लय म्हणजे जिवंतपणा.. परंतु गती मात्र ठराविक..

तुम्ही तळ मजल्याला उभे असता तेव्हा तुमच्या नाडीचे ठोके ७२ असतात. आता धावत तीन जिने चढा पाहू.. लगेच लय बदलते..! :)

"अहो बातमी ऐकून काळजाचा ठोकाच चुकला हो.." असं आपण म्हणतो ना..तेव्हा चुकलेली असते ती लयच..!

रोजच्या व्यवहारात तर लयीची किंवा लयबद्धतेची अनेक उदाहरणं देता येतील. मग एखाद्या राजधानी एक्स्प्रेसने आता दोन तास कुठल्याच स्थानकात थांबा नाही म्हणून झकासपैकी पकडलेला स्पीड असो. तो स्पीडसुद्ध छान लयदार असतो.. गाडीचा वेग, चाकं आणि रूळ यांचं आपसात एक छान लयदार नातं जमतं.. किंवा मग अत्यंत मोहक अशी घोड्यांच्या टापांची लय असो.. मग हीच लय ओ पी नैय्यरसारख्या एखाद्या प्रतिभावंताला आकर्षित करते आणि तो 'मांग के साथ तुम्हारा, मैने मांग लिया संसार..' हे रफी-आशाचं एक सुरेख गाणं बांघून जातो..!

एवढंच कशाला.. एखादा हलवाई चुलीवर मोठी कढई ठेवून रबडी करण्याकरता म्हणून दूध आटवत असतो.. तुम्ही बघा..मोठ्या झार्‍याने कढईतलं ते दूध तो ढवळत असतो त्याला देखील एक छान लय असते.. ती लय बिघडली तर सबंध रबडीच बिघडेल ना..! :)

एखादा राजबिंडा गरूड अवघे दोन-चार पंख लयीत फडकवतो आणि उंच आभाळी जातो.. ह्याला लयीचं एक छान इग्निशन नाही म्हणायचं तर दुसरं काय म्हणायचं..?

लय बदलणं किंवा लय बिघडणं हे फारसं चांगलं नव्हे.. गाण्यात तर नव्हेच नव्हे..!

आता गाण्यातली लय म्हणजे काय हो?

स्वर, लय आणि ताल ही कोणत्याही गाण्यातली दत्तमूर्ती.. पण मुळात स्वर आणि लय हे वेगळे नाहीतच, असूच शकत नाहीत.. लयीला स्वरापासून किंवा स्वराला लयीपासून वेगळं काढता येतच नाही.. मग तुम्ही एखाद्या सेकंदापुरता षड्जाचा उच्चार करा.. किंवा चांगलं मिनिटभर षड्ज लावून ठेवा.. लय त्याच्या अंगभूतच असते.. राहता राहिला ताल.. तर तो त्या लयीचं एक मीटर ठरवतो.. तो त्या लयीला एक बंधन घालतो..जणू तो लयीला म्हणतो,

"बाई गं.. हा चार मात्रांचा केरवा.. लक्ष ठेव आणि पटकन परत ये.. बाई गं हा सात मात्रांचा रुपक बरं का.. लक्ष ठेव जरा.. बाई गं हा बारा मात्रांचा विलंबित एकताल किंवा १६ मात्रांचा विलंबित त्रिताल.. ये जरा निवांतपणे फिरून..!" :)

असो..

लयीचे आघात, लयीचे पॉज या विषयी पुन्हा केव्हातरी..

गाण्यातले स्वर, ताल किंवा शब्द हे आपल्याला ऐकू येतात.. त्यामुळे ते तसे सगुण म्हटले पाहिजेत.. परंतु लय ही अदृष्य असते, निर्गुण असते.. तिचा शोध म्हणजे अनंताचा शोध.. आणि या अनंताच्या शोधाकरताच गाण्याची अखंड साधना करावी लागते.. एरवी गाणं हा प्रकार खूपच सोप्पा आहे..! :)

असो..

सदरच्या लयविषयक दोन ओळी भीमण्णा, बाबूजी, पुलं आणि कुसुमाग्रज यांना समर्पित..!

-- (संगीताचा विद्यार्थी) तात्या.

December 23, 2013

लक्ष्मी..

काल फोरासरोडला गेलो होतो तेव्हा लक्ष्मी गेल्याचं कळलं..

लक्ष्मी..

फोरासरोडवर दिवसरात्र एक गोणपाट घेऊन फिरणारी, रस्त्यावरच्या काही वस्तू उचलून भंगारात विकणारी एक बाई. मी ज्या देशीदारूच्या बारमध्ये नौकरी करत असे तिथनं अगदी जवळच होतं लक्ष्मीचं चंद्रमौळी खोपटं..!

लक्ष्मीचा नवरा एक नंबरचा बेवडा. वेठबिगार होता कुठेतरी. दारू पिऊन पोरं काढायची, एवढं एकच काम त्याला येत होतं. त्याला आणि लक्ष्मीला तीन मुलं होती. त्यातलं एक लहानपणीच वारलं होतं. लक्ष्मीचा हा नवरा असून नही के बराबर होता. सतत घराबाहेर असे. दिवसभर वेठबिगारीचं काही काम करायचा आणि दारू प्यायचा..

आमच्या बारमधला रघू आम्हा नोकर लोकांकरता डाळ-भात बनवायचा. रोज रात्री मी रघूने बनवलेला तो डाळभात जेवायचो..

एकेदिवशी रात्री असाच एकदा बारच्या आतल्या खोलीत मी डाळभात जेवत होतो. बारच्या मागील बाजूस जे दार होतं ते नेहमी उघडंच असायचं. मी जेवत असताना अचानक माझी नजर दाराबाहेर गेली. समोर लक्ष्मी उभी होती. मला काहितरी सांगत होती...

मी रघूला सांगून तिला आत बोलावली..

""सेठ, कुछ खाने को दो ना.. आज कुछ भी पैसा नही मिला. मुझे और बच्चोंको भोत भूक लगा है.."

रघू आम्हा ५-६ नौकर मंडळींकरताच डाळभात बनवायचा पण भरपूर बनवायचा..

मी रघूला ती व तिच्या आणि दोन मुलांना पुरेल इतका भात आणि एका मोठ्या वाडग्यात डाळ अशी थाळी तिला द्यायला सांगितलं..

ती डाळभाताची भरलेली थाळी लक्ष्मीने लगबगीने घेतली आणि आपल्या खोपटात घेऊन गेली..

जरा वेळाने ती रिकामी थाळी घेऊन ती परत आली. मला म्हणाली,

"सेठ.. पेटभर खाना मिला. बदले मे कुछ काम है तो बताओ. झाडू-पोता, साफसफाई, बर्तन धोना..कुछ भी बताओ..."

मला खूप कौतुक वाटल लक्ष्मीचं. तिला फुकट खाणं नको होतं. त्या बदल्यात ती काम करायला तयार होती.."

पण लक्ष्मीने पुढचं वाक्य जे म्हटलं ते ऐकून मात्र माझी मलाच लाज वाटली..

"सेठ, कुछ भी काम बताओ.. लेकीन मै सोती नही.."

???????

लक्ष्मीची चूक नव्हती. हा त्या फोरासरोडचाच गुण की वाण? जिथे प्रत्येक गोष्टीची किंमत किंवा मोबदला हा फक्त "झोपणे" या एकाच क्रियेशी बांधलेला होता..!

वास्तविक मी लक्ष्मीला तो डाळभात केवळ दयेपोटी दिला होता.. कुठलीही अपेक्षा न करता..!

परंतु मी त्या बदल्यात आता लक्ष्मीसोबत झोपायला मागतो की काय अशी त्या बिचारीला शंका आली. ती झाडूपोता, साफसफाई वगैरे इतर सर्व कामं करायला तयार होती..पण त्या रस्त्याच्या गुंणधर्मामुळे मी डाळभाताच्या बदल्यात तिच्यासोबत झोपायला मागेन अशी अनामिक भितीही तिला होती..!

"क्या बकवास करती है? मै तेरेको सोने के लिये पुछा क्या?"

मीही चिडून विचारलं..

"माफ करो सेठ, आप वैसा आदमी नही है.. गलती हुआ.."

"सेठ, मै भी डाल बानाना जानती. आप कभी बोलेगा तो मै खाना बनाएगी.."

मी ठीक है इतकंच म्हटलं आणि तो विषय तिथेच संपला..

त्यानंतर असाच एकदा मी काही कामाकरता बारच्या आतल्या खोलीत गेलो होतो. रघू डाळभाताच्या तयारीत होता. समोर लक्ष्मी उभी होती..

अचानक मी रघूला सांगूल तिला आत बोलावली..

"तू खाना बनाना जानती है ना? डाल बनाएगी..?"

"हा सेठ.. मै बनाएगी.."

'आज इसको डाल बनाने दे..' असं मी रघुला म्हटलं..

तिनं फटाफट कांदा-टोमॅटो चिरला. मिरच्या चिरल्या. राई, जिरा वगैरे टाकून उत्तम फोडंणी केली. त्यात कांदा-टोमॅटो-कढीपत्ता चांगला परतून घेतला, आलं अगदी पातळ चिरून ते घातलं आणि डाळ फोडणीला घातली. अगदी सराईतपणे चवीनुसार मीठ घातलं.. उग्रपणा मारण्याकरता चवीपुरती साखर घातली..!

अगदी थोड्याच वेळात त्या बाईने अगदी चवदार डाळ बनवली होती. त्या मानाने आमचा रघ्या अगदीच कामचलाऊ डाळ करायचा..

त्या दिवशी त्या भंगारवालीच्या हातचा डाळभात मी अगदी चवीन जेवलो... जाताना तिने स्वत:करता आणि आपल्या लेकरांकरता तो डाळभात नेला..!

गरम डाळभात.. !

ही गोष्ट इतकी मौल्यवान असते हे त्या दिवशी मला प्रथम कळलं. त्याची किंमत कळली..!

त्यानंतरही लक्ष्मी अधनंमधनं यायची, डाळभात बनवायची आणि स्वतःकरताही घेऊन जायची.. पण ती रोज येत नसे.. बाई खूप खुद्दार होती. रोज येत नसे. ज्या दिवशी खरोखरच तिला भंगारातून काही कमाई होत नसे तेव्हाच यायची..!

लक्ष्मी या भंगारवालीमध्ये कुठून आले हे संस्कार? कुठून आली तिच्या हाताला चव? य:कश्चित डाळभाताकरता 'झोपणार नाही..' असं म्हणण्याचा सुसंस्कृतपणा कुठून आला तिच्याजवळ..?

मला या प्रश्नांची उत्तरं माहीत नाहीत. मला इतकंच माहित्ये की मी भंगारवाल्या लक्ष्मी नावाच्या एका सत्शील, सुसंस्कृत अन्नपूर्णेच्या हातचा डाळभात जेवलो होतो..!

खूप काळ लोटला या गोष्टीला. माझा फोरासरोड सुटूनही खूप वर्ष झाली..

काल कुणाकडून तरी लक्ष्मी गेल्याचं कळलं म्हणूनच खूप उदास वाटलं..

"दाने दाने पर लिखा है खानेवाले का नाम" असं म्हणतात.. आमच्या बारच्या अन्नावर तिचं नाव लिहिलं होतं हे जितकं खरं होतं तितकंच तिच्या हातचा सुग्रास डाळभात खाण्याचं माझ्या नशीबी होतं हेही तितकंच खरं होतं..!

-- तात्या अभ्यंकर.

November 20, 2013

पायल... :)

काल विम्याच्या काही कामानिमित्त एकाला भेटण्याकरता मुंबैला गेलो होतो. ठरल्याप्रमाणे आम्ही बोरीबंदर स्थानकाबाहेरच भेटलो. विम्यासंबंधी बोलणी केली. त्याच्याकडून त्याच्या विमा-हप्त्याचा धनादेश घेतला.

त्याच्यासोबत एक कुणीतरी लै भारी बाई होती. छान रसरशीत, गोरीगोमटी. अर्थात, ती त्याची बायको नव्हती कारण त्याच्या बायकोला मी ओळखतो. आता ही बया कोण याच्याशी मला काय देणंघेणं? असेल त्याची मैत्रिण वगैरे किंवा हापिसातली असेल कुणी..!

पण बाई खरंच छान होती. बिनबाह्यांचा डिरेस घातलेली. तिचे सुंदर गोरेपान दंड.. व्वा..!

"come Tatyaa, पावभाजी खाऊया.." तो म्हणाला.

आम्ही जवळच्याच शिवाला हाटेलात गेलो. त्याने पावभाजी ऑर्डर केली..

"पा, What about you? Jain, khaDa or cheej?"

हा प्रश्न त्या बाईला होता..

पा? हा या बाईला पा का म्हणतो? मल कळेचना..!

"तात्या, तुला काय रे? कुठली पावभाजी? पावभाजी चालेल ना? की दुसरं काही मागवू?"

"नको रे, मी फक्त चहा घेईन.."

"अरे लेका उगाच भाव नको खाऊस. त्यापेक्षा पावभाजी खा.. "

असं म्हणून तो मनमुराद हसला..

"बरं, मागव एक पावभाजी. साधीच मागव..". (मी साला भिकारचोट. कशाला उगाच चीज वगैरे नखरे करायचे? आणि तसंही मला जरा त्यांच्या कंपनीमध्ये अवघडल्यासारखंच वाटत होतं. ती हायफाय बया, तोही हायफाय. मी आपला साधा दाढी वाढलेला गरीब विमा एजंट!)

"You know Pa, right now we are having the great Marathi writer with us.."

मी दचकून श्री ना पेंडसे, पुलं, जयवत दळवी वगैरे आजुबाजूला कुठे बसले आहेत का हे पाहिलं..!

"Meet my dear friend Tatyaa. तात्या ही माझी बॉस पायल ओबेरॉय..!"

बापरे. ओबेरॉय ह्या आडनावालाच मी घाबरतो. छ्या, साला काही काही नुसती नावंही चामारी जाम श्रीमंत असतात. ओबेरॉय नावाचा माणूस किंवा बाई म्हणजे हायफायच असणार. पटकन पाहुणे आलेत म्हणून चहा टाकायचा आहे आणि ऐन वेळेस साखर संपली आहे म्हणून कधी कुठल्या ओबेरॉय वहिनी थोडी साखर आणण्याकरता शेजार्‍याची बेल वाजवत आहेत असं चित्रं तुम्हाला कधीच दिसणार नाही..!

"Ohh..hi Tatyaa.. nice to meet you. The gr8 Marathi writer.. wow..!"

पायलने माझ्याशी हात मिळवत म्हटलं. माझ्या हाताला लोण्यात माखलेल्या पावाचं लोणी होतं म्हणून पटकन डावा हात पुढे केला. मग परत ओशाळून लोण्याच्या उजव्या हातानेच हात मिळवला. साला, बाईच्या त्या गोर्‍या पारदर्शी सौंदर्यापुढे पारच भांबावून गेलो होतो मी..!

छ्या! काय लोभसवाणी बाई होती हो. अगदी निष्पाप मनाने मनमुराद कौतुकाने बोलली माझ्याशी..!

"So you write for Marathi films.. wow..!"

च्यायला झालं होतं असं की ही ओबेरॉय बया विंग्रजीशिवाय दुसरं काहीच बोलत नव्हती. आणि आम्ही सायबाच्या भाषेत थोडे कच्चे..!

"No, but you know Pa, he will make miracles if he writes for Marathi films..!"

आमच्या दोस्ताला मात्र माझं खरंच कौतुक होतं. जरा जास्तच होतं, पण मनापासून होतं हो..!

अखेर आमची पावभाजी खाऊन झाली. वर ज्यूसही झाला आणि आम्ही हाटेलाच्या बाहेर पडलो..

Anyways Payal, nice to meet you, Where u stay?

असं मी त्या बाईला विचारणार होतो. पण तो प्रश्न मी आतल्या आतच गिळला. चामारी एकतर आपली त्या बाईशी ओळख नाही. तिला डायरेक्ट पायल असं कसं म्हणणार? बरं, पायल जी वगैरे प्रकार मला आवडत नाहीत, बरं, मी तिला परस्पर पा असंही म्हणू शकत नाही.. सगळीच पंचाईत तिच्यायला..!

बरं, "चला तुम्ही कुर्ल्याला बैलबाजाराच्या जवळ राहता ना? मी ठाण्यालाच चाललो आहे, कुर्ल्यापर्यंत एकत्रच लोकलने जाऊ.." असंही म्हणायची शक्यता नाही. कारण ओबेरॉय नावाची माणसं भांडूप, कुर्ला, परळ, लालबाग अशा ठिकाणी रहात नाहीत..!

छ्या..!

तेवढ्यात आलीच एक सुंदर काळ्या रंगाची ऐसपैस आलीशान गाडी. तिचीच गाडी होती ती. ती बया आमच्या दोस्ताला महालक्षुमीला सोडून पुढे खार वेस्टला जायची होती. मग बरोबर, चामारी ओबेरॉय नावाची माणसं अशाच ठिकाणी राहायची. आणि मी लेकाचा मध्यरेल्वेवरचा कनिष्ठ मध्यमवर्गीय, तिला कुर्ल्याच्या बैलबाजारात घेऊन चाललो होतो..!

जाताना पुन्हा एकदा पा ने माझ्याशी हात मिळवला आणि विलक्षण गोड आणि मधाळ हसली. या वेळेस मात्र माझे हात स्वच्छ होते..!:)

ती दोघेही मला बाय बाय करून निघून गेली आणि मला जरा हायसं वाटल. चामारी बनारसी भोला पान खाऊन भर रस्त्यातच पचाक करून एक भक्कम पिंक टाकली तेव्हा जरा कुठे बरं वाटलं..!

पुन्हा बोरीबंदरला आलो आनि मग दी ग्रेट मराठी रायटर ठाण्याला जाणार्‍या लोकलची वाट पाहू लागले..!

आपला,
तात्या ओबेरॉय..

छ्य्या..! 'तात्या ओबेरॉय' हे नाव कायच्या कायच वाटतं..

तुमचा,
तात्या..

हेच आपलं बरं आहे.. 

November 18, 2013

कोकणातला मास्तर...

कोकणातलं कुठलं तरी अत्यंत रिमोट, दुर्गम असं खेडं असावं. दिवसाला एखादीच लाल डब्याची तालुक्याच्या गावाला जाणारी एस टी..

टुमदार डॉगरावरचं गाव. डोंगरावरून खाली पाहिलं की दूरवर दिसणारी सुरुची झाडं आणि त्यापलीकडचा तो तालुक्याच्या गावातला समुद्र..!

मोजकीच घरं. काही ब्राह्मणांची, एक-दोन कुडाळदेशकर, दोनचार भंडारी, दोनचार कोळी. एखादा बाटलेला मुसल्मान. घरातल्या गणपतीची चोरून पूजा करणारा..!

गावातल्या चिल्ल्यापिल्लांना भूतांच्या गोष्टी सांगणारी एखादी म्हातारी. सर्दीखोकला, ताप, जुलाब इतपतच औषधं माहिती असणारा, तालुक्याच्या गावात कंपौंडरी करणारा एखादा शाणा किसन कंपौंडर. कुठे मण्यार-फुरसं-कांडोर चावली तर कुठलासा पाला आणि कुठलीशी बुटी उगाळून लावणारा एक कुणी भिवा भंडारी, आणि स्वतःच्या घरीच पुढल्या खोलीत फुटकळ किराणासामानापासून ते मेणबत्त्या, भुत्ये, पानतंबाखू, तेलं, कंगवे असं सगळं ठेवणारा एक कुणीतरी बबन्या भुसारी..!

गावात एक पोलिसांचं आऊटपोस्ट, गावचा पोलिसपाटीलच एकदा केव्हातरी ती खोली उघडणार. गावात एक पोस्टाचा लाल डबा. तालुक्याच्या गावातून पत्र घेऊन येणारा पोस्टमन. तोच पोस्टमन तो लाल डबा उघडून त्यात पडलेली पत्र तालुक्याच्या गावाला घेऊन जाणार..!

गावात एखादा गणपती आणि समर्थांनी स्थापलेला एखादा मारुती..! तो मारुतीच त्या गावचा वेतोबा वगैरे आहे अशी त्या मारुतीला जोडली गेलेली एखादी दृष्टांतकथा. वर्षातनं हनुमानजयंतीला त्याचा होणारा उत्सव..!

उतरत्या डोंफरावर रातांबे, काजू, करवंद याची मनमुदार झाडं. कुठे मोगरा, रातराणी. त्यांचा सुंगंध. त्यातच मिसळेला रातांब्यांचा सुगंध..! मनमुराद रानफुलं, त्यावरचे चतूर..!

जेमतेम चारच खोल्यांची प्राथमिक शाळा, शाळेत एकच मास्तर. पहिली ते चौथी शिकणारी चिल्लीपिल्ली त्या शाळेत येणार. मास्तर त्यांना अ आ इ ई पासून ते चवथीपर्यंतचं गणीत शिकवणार. छान गाणीगोष्टी सांगून मुलांवर संस्कार करणार..

आषाड-श्रावणातला कोकणातला तो समोरचंही दिसणार नाही असा पाऊस..

तो शाळेतला मास्तर त्या चिल्लापिल्लांसोबर वर्षातले सगळे सण साजरे करणार. चणे वगैरे आणून त्या लेकरांसोबत अगदी श्रावणी शुक्रवार पासून, गणपती वगैरे सगळे सगळे सण साजरे करणार, कोजागिरीला गावातल्याच कुणा परसूला सांगून दूध सांगणार, ते चुलीवर आटवणार, रात्री शाळेत सगळ्या मुलांना बोलावून कोजागिरीचा चंद्र पाहात ते दूध पाजणार. पोरांना गोळा करून एखादं शिवाजीचं नाटक बसवणार..त्यातल्या त्यात जाड्या मुलाला अफजलखानाची भूमिका करायला सांगणार..! :)

असा त्या रम्य प्राथमिक शाळेतला तो मास्तर व्हायचं आहे मला...!

मला नको ते शहर, नको ती पुढारलेली दुनिया, नको ते मोबाईल, नको ते मॉल, नको ते पेज थ्री..!

मला त्या शाळेतला मास्तर व्हायचंय, मला नकोत ती माणसं आणि नको ती गर्दी..

त्या शाळेतल्या त्या पाचपंचवीस चिल्लापिल्लांसोबतच रमायचं आहे मला आयुष्यभर..!

-- तात्या अभ्यंकर.

November 13, 2013

श्रीकला..

वरळी सीफेसवरची एक संध्याकाळ. मी आणि श्रीकला बसलो होतो एकमेकांना लगटून. त्या दिवशी भरतीचा जोर जरा जास्तच होता. लाटांचे छान तुषार उडत होते अंगावर..

तुळू मातृभाषा असलेली श्रीकला. काळीसावळी, परंतु जबरदस्त उभार बांध्याची. एकदा तहानलेली अशी आली होती आमच्या बारच्या दाराबाहेर. 

"साब, पानी पिलाव ना.."

मी पोर्‍याला सांगून, दोन बर्फाचे खडे टाकून थंडगार पाण्याचा गिल्लास बाहेर तिच्याकडे पाठवला. पाहताच क्षणी प्रेमात पडलो होतो तिच्या. विलक्षण बोलके डोळे..!

वास्तविक ती पाणी पिऊन लगेच गेलीसुद्धा असती. परंतु मीच विलक्षण खेचला गेलो होतो तिच्याकडे..

"अंदर आओ, थोडा चाय पी के जाव. रौशनीआपा, नसीमआपा और फैझानाआपा के पास आती हो ना सामान बेचने?"

श्रीकला बारमध्ये आली. मी तिच्याकरता पेश्शल पानीकम चाय मागवला..

चूतमारीचा मन्सूर माझ्याकडे पाहून छद्मीपणे हासला होता. मन्सूर हा माझ्यासकट तिकडच्या सर्व आपांचा आणि वेश्यांचा हरकाम्या. साला वेश्यांच्या पाठीला साबण चोळणारा तुंग्रुस..! चांगलाच तैयार गडी होता. रांडेचा तात्या श्रीकलामध्ये विरघळला आहे हे चाणाक्ष मन्सूरने क्षणात ताडलं असावं..! :)

मन्सूर काय, चरसी डबलढक्कन काय.. तिकडच्या विलक्षणच वल्ली ह्या.. एकदा लिहिणार आहे त्यांच्यावरही..! चरसी डबल ढक्कनला तर मीच मुंबै मर्कन्टाईल बँकेचा डेली कलेक्शन एजंट बनवला होता. मन्सूरला एकदा बच्चूच्या वाडीतले कबाब खायला नेला होता.. :)

असो..

फोरासरोडवरच्या तमाम वेश्यांकरता पिना, पावडरी, भडक लिप्स्टिका आणि अजून कोणकोणती चेहेरा रंगवण्याची द्रव्य असं सगळं विकायचं काम श्रीकला करायची. तिच्या हातामध्ये एक मोठी रबरी पिशवी असे. त्यात हा सगळा माल भरलेला असे. कामाठीपुर्‍यामधल्या त्या त्या इमारतीत जाऊन तेथील वेश्यांना हे रंगरंगोटीचं साहित्य विकणारी सेल्सगर्ल होती श्रीकला. तिथून जवळच नागपाड्याला राहायची.

सालं तरूण वय होतं तेव्हा. श्रीकलाही चामारी मुसमुसलेलीच होती. खेचलेच गेलो आम्ही एकमेकांकडे...!

आठवड्यातून दोन-तीन फेर्‍या तरी श्रीकला मारायची त्या बाजारात. पण पाणी प्यायला म्हणून मुद्दामून माझ्या बारमध्ये यायची. साला निसर्ग कोणालाच सोडत नाय..!

आणि यामागे केवळ शारिरिक वासना होती असं मुळीच नाही. मला त्या मुलीला खूप समजून घ्यावसं वाटत होतं आणि तिलाही तिच्या मनातलं खूप काही सांगायला कुणातरी हवं होतं. शारिरिक वासना हा तर एन्ड गेम झाला. पाणी पडलं की गेम ओव्हर..! आणि मी तर त्या बाजारात सतत शारिरिक वासनेचेच धिंडवडे पाहात होतो. छ्या..! मनाची भूक त्यापेक्षा कायच्या काय मोठी असते भिडू..! शारिरिक वासना.. माय फूट..! 

आणि एके दिवशी जमलं आमचं. मी हिंमत करून भिडलो तिला. 

"कल शाम को घुमने जाएंगे? ताडदेव के सरदार के पास पावभाजी खाएंगे..हाजिअली ज्यूस सेंटर पे ज्यूस पिएंगे.. बाद मे वरली सी फेस जाएंगे. चलेगी..?"

एकदोन आढेवेढे घेऊन श्रीकला "हो" म्हणाली. ती "हो" म्हणणारच होती..!

तिचे आईवडील तिकडे उडुपीजवळच्या एका गावातले. ती नागपाड्याला तिच्या मामाकडे राहायची. मामा कुणा एका शेट्टीच्या हॉटेलात वेटर. श्रीकला आठ नऊ बुकं शिकलेली होती. विंग्रजीपण थोडं थोडं यायचं तिला.. 

कधी नव्हे ते मुंबईत छान गार वार सुटलं होतं. वरळीसीफेसवर बसल्या बसल्या श्रीकला मला हे सगळं सांगत होती.

त्यानंतरही आम्ही एकदोनदा भेटलो असू. पण त्यानंतर सम-हाऊ मी तिला टाळू लागलो मुद्दामून. तिला एखाद्या लॉजवर न्यायचं पाप आलं होतं माझ्या मनात. तीही नक्की आली असती. वय सालं वेडं असतं..! पण आपण पडलो खुशालचेंडू. लग्न तर करायचं नव्हतं..! 

पण कुठेतरी श्रीकलाचा माझ्यावरचा विश्वास मध्ये आडवा आला. कुठेतरी भटाच्या घरातले संस्कार आडवे आले आणि मी तिला भेटायचं टाळू लागलो. तिला नुसतीच एखाद्या लॉजवर नेऊन मजा मारायची, नासवायची आणि मग सोडून द्यायची ही कल्पना पचत नव्हती मला..!

आणि मी एकेदिवशी तिला हे सगळं ओपनली सांगितलं आणि आपणहून बाजूला झालो..!

पण पोरगी क्लास होती. मनात भरली होती माझ्या..!

खूप वर्ष झाली या गोष्टीला..

रौशनीआपा, नसीमआपा, मन्सूर, डबलढक्कन आणि श्रीकला.. या सगळ्यांची याद मात्र नेहमी येते...!

भन्नाट मुंबै आणि मुंबैची भन्नाट एक काळोखी दुनिया..!

-- तात्या अभ्यंकर.

November 11, 2013

मेहेंदी...

....तिचं नाव मेहेंदी... 

फोरासरोडवर अंजुमन बिल्डिंमध्ये नसीमआपाकडे मेहेंदी धंदा करायची. दिसायला इतर वेश्यांपेक्षा थोडी बरी, थोडी रेखीव, थोडी उजळ..

आमच्या झमझम देशीदारूच्या बारसमोरच नसीमआपाचा कुंटणखाना होता. नसीमआपा यायची आमच्या बारमध्ये पार्सल न्यायला. कधी आमलेट-पाव, तर कधी भूर्जीपाव, तर कधी दालफ्राय आणि रोट्या.. तिच्यामुळेच माझी मेहेंदीशी ओळख झाली. मी मेहेंदीचा 'न्यूजनरक्षा पॉलीसी' हा विमा उतरवला होता..

चार पैशे बरे भेटायचे मेहेंदीला. तिला कुणापासून तरी एक अनौरस मुलगाही होता. त्याला सगळे दिपू म्हणायचे. मुंबैच्या फोरासरोडवर शरीरविक्रयाचा धंदा करून, नसीमआपाचं भाडं देऊन उरलेल्या पैशांमध्ये मेहेंदी स्वत:चं आणि तिच्या दिपूचं पोट भरत असे..

कुठल्याही दुकानात तो शंभर-दिडशे रुपयांपर्यंत पॅ पॅ वाजणारा कॅसिओचा छोटा डबडा मिळतो बघा.. दिपूला बरेच दिवसांपासून तो डबडा हवा होता..परंतु मेहेंदीचं पैशांचं गणित काही जुळेना..

त्यानंतर मेहेंदी आजारी पडली. विषमज्वराने अगदी सणसणीत आजारी पडली. आमच्या फोरासरोडवरचाच एक सेक्स स्पेशालीस्ट डॉ बशीर याची तिला ट्रीटमेन्ट सुरू झाली. 

मुंबैचा फोरासरोड काय, फॉकलंड रोड काय.. इथे सेक्स स्पेशालिस्टांचे दवाखाने बरेच आहेत. त्यातले बरेचसे डॉक्टर हे चक्क बोगस आहेत. पण बशीर मात्र खरोखरंच वेल क्वालीफाईड होता. पंधरा-वीस दिसांमध्ये मेहेंदी पूर्ण बरी झाली. इतर वेश्या आणि नसीमआपा यांनी सगळी तिची देखभाल केली. काय सांगू तुम्हाला, मी ती सगळी माणूसकी, जगण्याची आणि एकमेकांना जगवण्याची धडपड खूप जवळून पाहिली आहे..!

आमच्या झमझम बार मध्ये आम्हा नोकरांच्या चहापाण्याकरता जे दूध येत असे, त्यातलंच एक गरमागरम कपभर दूध मी मेहेंदीकडे ती आजारी असेपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली होती. तिला औषधं गरम पडत असत.. दूध प्यायलं की बरं वाटे..!

मेहेंदी बरी झाली. पुन्हा धंद्याला लागली. कुठ-कुठल्या ओळखीच्या, अनोळखी बेवड्यांसमोर, मदांधांसमोर पाय फाकवायला तयार झाली. अशातच मेहेंदीचा विम्याचा तिमाही हप्ता आला. ३५० रुपये..!

""तात्यासाब, अगर मै ये हप्ता थोडा लेट देगी तो चलेंगा? इस बार पैसा नही है, भोत तंगी है.."

एल आय सी मध्ये हप्ता भरण्याकरता ड्यू डेटपासून एक महिना ग्रेस पिरियड मिळतो..

"हा चलेंगा, लेकीन एक महिने के अंदर पैसा भरो.."

"हां हां.. एक महिने में मै पक्का भर सकेगी.." - मेहेंदी आनंदाने म्हणाली..

त्याच दिवशी रात्री आठच्या सुमारास मेहेंदी आणि तिच्या दिपूला घेऊन आमच्या बारमध्ये आली. मी गल्ल्यावर बसलो होतो. दिपूच्या हातात त्या कॅसिनोचं पार्सल होतं..!

"तात्यासाब. हप्ता नही भरना था ना, तो मैने उन पैसोंसे थोडा पैसा आपा को दिया और दिपू के लिये ये बाजा लेके आयी.." - मेहेंदीच्या चेहेर्‍यावर निरागसता होती. 

"मन देवाचे पाऊल..' या ओळीचा अर्थ मला त्या दिवशी कळला..!

दिपू आणि मेहेंदी.. दोघेही माझ्याकडे निरागसपणे पाहात होते. ते कॅसिनोचं खेळणं मिळाल्याचा दिपूच्या चेहेर्‍यावरचा आनंद..!

मूर्त तू मानव्य का रे
बालकाचे हास्य का
या इथे अन त्या तिथे रे 
सांग तू आहेस का?

त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का....!

मला तरी Art of Living ची इतपतच व्याख्या समजते.. इतर पंचतारांकीत आणि सप्ततारांकीत व्याख्या मला माहीत नाहीत..!

-- तात्या अभ्यंकर.

November 04, 2013

केसरिया बालम...

केसरिया बालमा आओनी पधारो म्हारे देस..

हे राजस्थानी लोकगीत अनेक कलाकार, अनेक शब्द वापरून गातात. काही चित्रपटातूनही हे गाणं आपल्याला ऐकायला मिळतं.. 

केसरिया.. ज्याची कांती केशरी रंगाची. केशरासारखी आहे असा.. शिवाय केशरी रंग हे शुद्धतेचं आणि शौर्याचं प्रतिक.. 

ज्याची कांती केशरी रंगाची आहे, ज्याचं मन केशरासारखं शुद्ध आहे आणि ज्याच्या ठायी शौर्य आहे असा केसरिया बालमा किंवा केसरिया बालम.

देशांतराला, लढाईला गेलेल्या मांगनियार राजस्थान्याची प्रेयसी/पत्नी त्याला बोलवत आहे.. 

पधारो म्हारो देस..

राजस्थानातल्या पुरातन, प्राचिन हवेलीतलं प्रशस्त संगमरवरी अंगण किंवा सूक्ष्म कोरीव काम केलेल्या त्या हवेलीतला एखादा झरोका किंवा अनेक पायर्‍या असलेल्या विहिरीच्या एखाद्या पायरीवरून किंवा गरम वाळूच्या एखाद्या टेकडीवरून फुलणारं हे गाणं..

हे वर्णन माझे मित्र डॉ अग्रवाल यांचं..



या लोकगीताची तशी बरीच वेगवेगळी कडवी गायली जातात.. शेवटी हे गाणं म्हणजे एक साद आहे.. कधी कुठला रचनाकार त्याच्या प्रतिभेनुसार आणि कल्पनेनुसार ही पधारण्याची साद घालेल हे सांगता यायचं नाही.. राजस्थानातलं हे पारंपारिक लोकगीत, त्यामुळे कुणा एका रचनाकाराची यावर मालकी नाही..

परंतु मूळ गाण्यात काही सुंदर पंक्ति आहेत..त्या अलीकडे कुणी म्हणताना आढळत नाहीत..

जसे,

मारू थारे देस में निपूजे तीन रतन
एक ढोलो, दूजी मारवन , तीजो कसूमल रंग
पधारो म्हारे देस...

केसर सू पग ला धोवती घरे पधारो जी..
पधारो म्हारे देस...

और बढ़ाई क्या करू पल पल वारूगी
पधारो म्हारे देस आओ म्हारे देस...

आणि या ओळी तर सुरेखच आहेत..

आंबा मीठी आमरी,
चोसर मीठी छाछ.
नैना मीठी कामरी
रन मीठी तलवार

पधारो म्हारे देस नि...

आमच्या एका दोस्ताच्या लग्नाला जोधपूरला गेलो होतो तेव्हा ही डॉ अग्रवाल नावाची आसामी मला भेटली. डॉक्टरसाहेब राजस्थानी लोकगीताचे गाढे अभ्यासक. खूप गप्पा झाल्या त्याच्याशी. अगदी मोकळाढाकळा गप्पीष्ट माणूस. झकास मैफल रंगली त्यांच्यासोबत. खूप जोधपूर फिरलो आम्ही. सोबत डालबाटी आणि राजस्थानी मिठाई..! :)

त्याच्याकडून अगदी भरभरून ऐकायला मिळालं या गाण्याबद्दल.. आपल्याला आश्चर्य वाटेल, त्या अग्रवालांनी मला या गाण्याच्या एकूण ६ निरनिराळ्या चाली ऐकवल्या..!

आपलं भारतीय संगीत किती म्हणजे किती समृद्ध असावं? इतकी राज्यं, इतक्या भाषा.. प्रत्येक मातीतलं गाणं वेगळं आणि तेवढंच ढंगदार..मग ती मराठमोळी लावणी किंवा ठाकरगीत असू दे, किंवा राजस्थानातलं केसरिया असू दे, किंवा मध्यप्रदेशातल्या माळव्यातलं लोकगीत असू दे, किंवा पंजाबातल्या रंगेल मातीतल्या टप्प्याशी दोस्ती करणारं कुठलं कुडी-मुंडाचं प्रेमगीत असू दे.. किती वैभवशाली आहे आपलं संगीत..! विचार करू लागलो की मन थक्क होतं. ह्या सा-याचा अभ्यास करायला सातच काय, सातशे जन्म देखील पुरणार नाहीत.. पुन्हा पुन्हा या भारतीय मातीत जन्म घ्यावा लागेल..!

जोधपूरहून परतीच्या सूर्यनगरी एक्सप्रेसने निघालो. जानेवारीचे दिवस. संध्याकाळ उलटलेली. गाडी सुसाट मुम्बैकडे निघाली होती. बोचरं वारं होतं..आणि सोबत शब्दवेल्हाळ 'केसरिया बालम..' चे स्वर कानात रुंजी घालत होते...!

-- तात्या अभ्यंकर.