March 13, 2008

शिंत्रेगुरुजी..२

शिंत्रेगुरुजी..२

>>असं यजमानांनाच दरडावणारे नामजोशी गुरुजी! मग शिंत्रेगुरुजीच धंद्यात असे मागे का? इतके हडकुळे का?
काहीच कळत नव्हतं!<<

त्यानंतर ८-१० दिवसातच घडलेली एक घटना. आमच्या घराच्या मागच्या गल्लीत राहणारे कोठावळे आजोबावारले. म्हातारा तसा आजारीच असायचा. मिटलेन त्याने एकदाचे डोळे. मंडळी मर्तिकाच्या तयारीला लागली. मीतसा पट्टीचा मुडदेफरास. ताटी बांधण्यापासून ते लाकडावर ठेवण्यापर्यंत सगळ्या कामात तरबेज. कुणाच्यामर्तिकाची बातमी समजली, की न विसरता एखादी ब्लेड खिशात टाकून घराबाहेर पडणारा. का? तर ताटी बांधतानासुंभ कापावा लागतो तेव्हा नेमकी ब्लेड लागते आणि तिथे नेमकं गाडं अडतं! असो..

'तात्या, स्मशानात गुरुजींना बोलवायचं तेवढं तुम्ही बघा!' अशी जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. 'कुणालाबरं सांगावं?' असा विचार करत होतो तेवढ्यात शिंत्रेगुरुजींचं नांव सुचलं. लगेच मी त्यांच्या घरी गेलो, दार ठोठावलं.

शिंत्रेगुरुजींनीच दार उघडलं. 'अरे तात्या तुम्ही? या, बसा."

शिंत्रेगुरुजींचं घर अगदीच कळकट होतं. अनेक अनावश्यक असा जुन्यापान्या वस्तूंनी भरलेलं. भिंतींचा रंग साफउडालेला. घरभर एक कुबट्ट वातावरण!

"बोला, काय काम काढलंत?" शिंत्रेगुरुजी.

"अहो माझ्या ओळखीतले एक गृहस्थ थोड्या वेळापूर्वीच वारले. तासाभरातच त्यांना उचलायचं आहे. तुम्ही यालका स्मशानात मंत्राग्नी द्यायला?"

तेवढ्यात आतल्या खोलीतून भेसूर ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकू आला. मला काही कळेचना. 'जराबसा हां, आलोच मी.' असं म्हणून शिंत्रेगुरुजी घाईघाईने आतल्या खोलीत गेले.

'अगं असं काय गं करतेस तू शकू? मी तुला पडून रहायला सांगितलं होतं की नाही? बरं नाही ना वाटत माझ्याबाळाला, ताप आला आहे ना? शाणी की नाही माझी बाळ ती? मग शांतपणे झोपून रहा बघू! आलोच हां मी. बाहेरपाहुणे आले आहेत ना आपल्याकडे राणी!'

असा संवाद मला आतल्या खोलीतून ऐकू आला. तेवढ्यात पुन्हा एकदा एक भेसूर आरोळी ऐकू आली! मला अगदीराहवेना म्हणून मी उठून आतल्या खोलीत डोकावलो. चौदा-पंधरा वर्षांची एक मुलगी खाटेवर बसली होती. बेढबशरीर, वेडेवाकडे दात, डोळ्यात काहीसे शून्य, काहीसे आकलन होत असल्याचे भाव. तोंडातून लाळ गळत होतीतिच्या. शिंत्रेगुरुजी तिला प्रेमाने थोपटत होते, शांत करत होते. तिची लाळ पुसत होते. ते अनपेक्षित दृश्य पाहूनसरसरून काटाच आला माझ्या अंगावर!

"तात्या, ही मुलगी माझी. काय नशीब पहा. मंदबुद्धी निपजली. चौदा वर्षांची आहे. आईही नाही बिचारीला.."

शिंत्रेगुरुजी मला माहिती पुरवत होते!

"शकू, नमस्कार कर पाहू काकांना! कसा करायचा नमस्कार? मी शिकवलाय की नाही तुला? काका आहेत ते. तुलाछान गोष्ट सांगतील, खाऊ देतील!शाणी की नाही आमची शकू? हसून दाखव पाहू काकांना!"

शकूने माझ्याकडे बघितलं. डोळ्यात अनोळखी भाव. किंचित वेडगळशी हसली. निष्पाप, निरागस! जरा वेळानेपुन्हा तसंच भेसूरसं ओरडली. तिचं ते रूप पाहून मला भडभडून आलं.

"आज हीचं जरा बिनसलंच आहे. तसं विशेष काही नाही हो. थोडा ताप, सर्दीखोकला आहे. औषधं घ्यायला नकोतहिला मुळीच." शिंत्रेगुरुजी सांगू लागले.

जरावेळाने शकू शांत झाली, तिला झोप लागली.

"या तात्या, बाहेरच्या खोलीत बसूया." आम्ही बाहेरच्या खोलीत आलो.

"बोला, काय काम काढलंत?"

"क्षमा करा गुरुजी, पण तुम्हाला अशी मुलगी आहे...." मी थोडा अडखळलो.

".....हे तुम्हाला माहीत नव्हतं, असंच ना?"

"हो, म्हणजे..." मी पुन्हा निरुत्तर.

"काय विशेष? कशाकरता आला होतात?" शिंत्रेगुरुजी.

शिंत्रेगुरुजींना बहुतेक शकूबद्दल माझ्याशी काहीच बोलायचं नव्हतं. मीही विषय वाढवला नाही. त्यांना कोठावळेआजोबा गेल्याची बातमी सांगितली. साधारणपणे त्यांना किती वाजता स्मशानात पोहोचावं लागेल तेही सांगितलं. त्यांनी यायचं कबूल केलं आणि मी तिथून निघालो.

कोठवळे आजोबांच्या मर्तिकाची सगळी तयारी झाली. येणारे सगळे आले, आणि आम्ही आजोबांचं मयत उचललं. स्मशानात शिंत्रेगुरुजी हजर होते. त्यांना पाहून मला पुन्हा एकदा शकूची आठवण झाली. शिंत्रेगुरुजी आत्ता इथेस्मशानात आहेत, 'मग घरी आजारी शकूपाशी कोण? शिंत्रेगुरुजींच्या गैरहजेरीत ती पुन्हा एकदा तसं भेसूर ओरडूलागली तर? कोण पाहील तिच्याकडे, तिची समजूत काढून कोण शांत करेल तिला?' असे अनेक प्रश्न माझ्यामनात येऊन गेले!

"गेले त्यांचं नांव काय? गोत्र कुठलं? गेले ते आपले वडीलच ना?..."

शिंरेगुरुजी कोठवळे आजोबांच्या मुलाला प्रश्न विचारत होते. मर्तिकाचे विधी सुरू झाले होते. थोड्याच वेळात रीतसरमंत्राग्नी मिळून कोठवळे म्हातारा पंचतत्त्वांत विलीन झाला!

काय दोन-चारशे रुपये दक्षिणा मिळाली असेल ती घेऊन शिंत्रेगुरुजीही घरी निघून गेले होते. माझ्या डोळ्यासमोरूनमात्र शकूचा तो निष्पाप, निरागस चेहरा जाईना. तिचं ते माझ्याकडे पाहून वेडगळसं हसणं मनांत घर करून गेलंमाझ्या!
घरी येऊन कोठवळे आजोबांच्या नांवाने अंघोळ केली.

काहीच सुचत नव्हतं. मतिमंद मुलं तशी अनेक असतात. पण शिंत्रेगुरुजींच्या घरी आलेला अनुभव अगदीअनपेक्षित होता. मला शकूला पुन्हा एकदा भेटावसं वाटत होतं. शिंत्रेगुरुजींना खूप काही विचारावसं वाटत होतं.

"हे काका खाऊ देतील तुला..."

शिंत्रेगुरुजींचं हे बोलणं मला आठवलं. तसाच उठलो. दुकानातून चांगलीशी मिठाई घेतली, आणि पुन्हा एकदाशिंत्रेगुरुजींच्या घरी पोहोचलो. दार ठोठावलं.

क्रमश:(अंतिम भाग- लवकरच.)

--तात्या.

शिंत्रेगुरुजी... १

राम राम मंडळी,
पटवर्धनांचं घर. एक नावाजलेलं घर. बडी मंडळी, पैसेवाली. गाडी, बंगला सगळ्याची अगदी रेलचेल. स्वत: दादापटवर्धन, दोन मुलं, सुना सगळी कर्तबगार मंडळी. स्वकष्टाने वरती आलेली. हे सगळं कुटुंबच्या कुटुंब माझं अशीलआहे. त्यांचे समभाग बाजारातील सर्व आर्थिक व्यवहार मी पाहतो. त्यामुळे कधी त्यांच्या हापिसात, तर कधीत्यांच्या घरी माझं येणंजाणं सुरूच असतं. त्या दिवशीही मी असाच काही कामानिमित्त त्यांच्या घरी गेलो होतो.

तो सर्वपित्रि-अमावास्येचा दिवस होता. भाद्रपदातील अमावास्या. या दिवशी पितरमंडळी आपापल्या घरी जेवायलायेतात म्हणे. भाताची खीर, भाजणीचे वडे, गवार-भोपळ्याची भाजी, आमसुलाची चटणी असा जोरदार बेत असतोबऱ्याचशा घरांत. बरीच मंडळी या दिवशी श्राद्धपक्ष वगैरे करतात. ब्राह्मणभोजन घातलं जातं, दक्षिणा दिली जाते. माझ्यासारखे, जे काहीच करत नाहीत ते या दिवशी दुपारी बाराच्या सुमाराला कावळ्याला पान ठेवतात. पितरमंडळी कावळ्याच्या रुपात येऊन या बेतावर ताव मारतात आणि आपापल्या वंशजांना भरल्यापोटानेआशीर्वाद देऊन परत जातात! ;) असं म्हणे हो!

मी पटवर्धनांच्या घराची बेल वाजवली. स्वत: दादा पटवर्धनांनी दार उघडलं. दादा पटवर्धन. एक जंक्शन माणूस! 'अरे या तात्या. काय म्हणतांय तुमचं शेअरमार्केट? आमच्या नाड्या काय बाबा, तुमच्या हातात' असं नेहमीचंबोलणं दादांनी मिश्कीलपणे सुरू केलं. दादा सोवळ्यातच होते. उघडेबंब, गोरेपाऽन आणि देखणे. कपाळाला खास यादिवशी लावलं जाणारं गोपिचंद गंध लावलेलं! दिवाणखान्याच्या एका कोपऱ्यात श्राद्धविधीचा कार्यक्रम नुकताचआटपलेला दिसत होता. पिंडदानही झालं होतं. शिंत्रेगुरुजी श्राद्धाचं जेवायला बसले होते.

शिंत्रेगुरुजी!

एक हडकुळी व्यक्ती. पन्नाशीच्या पुढची. उभट चेहरा, अर्धवट पिकलेले केस. काही दात पडलेले, आणि जे होते तेपुढे आलेले. वर्ण मळकट काळा. मळकट धोतर नेसलेले, त्याहूनही मळकट जानवं. असा सगळा शिंत्रेगुरुजींचाअवतार.
या गुरुजी मंडळींचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे सत्यनारायण, लग्न-मुंज, इत्यादी शुभकार्ये करणारे, आणियांची दुसरी जमात म्हणजे मर्तिकं, श्राद्धपक्ष हे विधी करणारी. शिंत्रेगुरुजी दुसऱ्या जमातीतले. शिंत्रेगुरुजींशीमाझीही अनेक वर्षांपासून ओळख आहे. शिंत्रेगुरुजी आमच्याही घरी कधी श्राद्धपक्षाच्या निमित्ताने आले आहेत.

पटवर्धनांच्या घरी शिंत्रेगुरुजी मन लावून जेवत होते. त्यांची जेवायची पद्धतदेखील गलिच्छच. काही मंडळींना आधीजीभ पुढे काढून त्यावर घास ठेवायचा आणि मग जीभ आत घ्यायची, अशी सवय असते. शिंत्रेगुरुजीही त्यातलेच. हावऱ्या हावऱ्या जेवत होते. दुष्काळातून आल्यासारखे! मी पटवर्धनांच्या घरी पोहोचलो तेव्हा माझ्याकडे पाहून तेओळखीदाखल लाचार हसले होते. 'काय तात्या, कसं काय?' अशी माझी चौकशीही केली होती.

"वहिनी, थोडी खीर आणा बरं काऽऽ" असं त्यांनी म्हटलं आणि पटवर्धन वहिनींनी खीर वाढायला आणली.

"नाहीतर असं करा, थोडीशी डब्यातच द्या. घरी घेऊन जाईन!"

पटवर्धन वहिनींनी खिरीचा डबा भरला आणि शिंत्रेगुरुजींना दिला. पटवर्धन पती-पत्नींना काय हो, त्यांनाशिंत्रेगुरुजींना खीर बांधून देण्यात समाधानच होतं. आपल्या घरी आलेला ब्राह्मण जेवुनखाऊन तृप्त होऊन गेल्याशीकारण. त्या दिवसापुरता का होईना, त्यांच्या पितरांचाच प्रतिनिधी तो!

मला मात्र शिंत्रेगुरुजींचा रागही आला होता आणि दयाही आली होती!

एकीकडे माझं दादा पटवर्धनांशी कामासंबंधी बोलणं सुरू होतं. नेहमीचंच बोलणं. कुठले शेअर घेतले, कुठले विकलेयाबद्दलचा हिशेब मी त्यांना देत होतो. एकीकडे शिंत्रेगुरुजींचं जेवणही आटपत आलं होतं.दादांकडचं काम संपवूनमी निघालो. त्यांच्या घराबाहेर पडलो. समोरच पानवाला होता. म्हटलं जरा पान खावं म्हणून पानवाल्याच्यादुकानापाशी गेलो. तेवढ्यात शिंत्रेगुरुजीही विड्या घ्यायला तिथे आले. पटवर्धनांकडे एवढे टम्म जेवलेले असूनही तेहडकुळे आणि उपाशीच दिसत होते!

"काय गुरुजी, कुठली विडी घेणार?" मी.

"आपली नेहमीचीच. मोहिनी विडी!"

मी पानाचे आणि विड्यांचे पैसे दिले आणि तिथेच दोन मिनिटं पान चघळत घुटमळत उभा राहिलो. शिंत्रेगुरुजीहीआता सुखाने विडीचे झुरके घेऊ लागले. जरा वेळाने आम्ही दोघेही आपापल्या मार्गाने चालते झालो. मीदिवसभरातल्या इतर कामांच्या मागे लागलो, पण शिंत्रेगुरुजींचा विचार डोक्यातून जाईना! मी त्यांना गेली अनेकवर्ष हे असच पहात आलोय.

अहो अलीकडे मरणही महाग झालंय म्हणतात. कुणी मेला की नातेवाईकांना दिवसवारे करायचा खर्चही आताशाखूप येतो. पहिल्या दिवसाच्या मंत्राग्नी पासून ते तेराव्यापर्यंत दहा-बारा हजाराच्या घरात कंत्राट जातं म्हणतात. मर्तिकाची, श्राद्धापक्षाची कामे करणारी भिक्षुक मंडळी हल्ली 'शेठजी' झालेली मी पाहिली आहेत. मग आमचेशिंत्रेगुरुजीच असे मागे का? छ्या! शिंत्रे गुरुजींना धंदा जमलाच नाही. नाहीतर आमच्याच गावातले नामजोशीगुरुजी बघा! हातात तीन तीन अंगठ्या, गळ्यात चांगला जाडसर गोफ. पृथ्वीला लाजवील अशी ढेरी!

नामजोशी गुरुजींच्या घरी मर्तिकाचा निरोप घेऊन कुणी गेलं की,

'तेराव्या दिवसापर्यंतचं काम देता का बोला? तरच आत्ता स्मशानात येतो. आणि हो, इतके इतके पैसे होतील हो. नाही, आधीच सांगितलेलं बरं! अहो फुकटच्या अंघोळी कोण करणार?!'

असं यजमानांनाच दरडावणारे नामजोशी गुरुजी! मग शिंत्रेगुरुजीच धंद्यात असे मागे का? इतके हडकुळे का?

काहीच कळत नव्हतं!

क्रमश:

--तात्या अभ्यंकर.

March 11, 2008

नान्या..!

"तात्या, पोष्टाजवळचा टकल्या सातपुते खपला रे. वेळ असेल तर ये!"

रात्री अकराच्या सुमारास जरा कुठे डोळा लागतो न लागतो तोच नान्याचा फोन!

शिवनाथ पांडुरंग नवाथे, ऊर्फ नाना नवाथे, ऊर्फ नान्या! हा प्राणी मला कधी भेटला, कधी आमची घट्ट दोस्तीजमली आणि कधी हा माझा झाला ते कळलंच नाही.

नान्याला मर्तिकं पोचवायची भारी हौस. छंदच म्हणा ना! जरा ओळखीपाळखीतलं कुणी मरायचा अवकाश, नान्यात्या घरात सर्वात पहिल्यांदा हजर! नुकतीच पोरगी पटलेल्या एखाद्या युवकाने ज्या लगबगीने तिच्याबरोबर सहाचाशो पाहायला जावं, त्याच उत्साहाने नान्या कुणाच्याही मयताला निघतो!

मग काय हो, ज्या घरी मयत झालेलं असेल त्या घरच्या मयताच्या तयारीचं पुढारीपण आपसुकच नान्याकडे येतंआणि नान्याच सगळी सूत्र हलवायला घेतो. कुठल्या स्मशानात जायचं, लाकडं की विद्युतदाहिनी, भटजी ठरवणे यासगळ्या गोष्टी नान्याच बघतो. हे नान्याला कुणी सांगायला लागत नाही आणि नान्या कुणी सांगण्याची वाटहीपाहात नाही. एकतर त्या घरची मंडळी हे सगळं ठरवायच्या मनस्थितीत नसतात, बरं मर्तिकातलं सगळंच काहीसगळ्यांना माहिती असतं असंही नव्हे. उलट कुठून सुरवात करायची, कुणी पुढाकार घ्यायचा हा जरा प्रश्नच असतो. आणि तिथे नेमका आमचा नान्या सगळी सूत्र हातात घेतो आणि मंडळी मनातल्या मनात हुश्श करतात!

"काय रे नान्या, तू एरवी जसा मोठमोठ्याने आणि भसाड्या आवजात बोलतोस तसाच मयताच्या घरीही बोलतोसका रे?" मी एकदा गंमतीत नान्याला विचारलं होतं!

"अर्रे! त्यावेळचा बोलण्याचा खास दबका आवाज आपण राखून ठेवला आहे!"

एखाद्या मुरब्बी नटाच्या थाटात नान्या उत्तरला!

नान्याचं बोलावणं आलं आणि मी चूपचाप टकल्या सातपुतेच्या घरी हजर झालो. टकल्या सातपुते त्याच्यानेहमीच्या खत्रूड चेहेर्यानिशीच घोंगडीवर विसावला होता. ‍

"बरं झालं तू आलास!" नान्याने मला हळूच एका कोपर्यात घेऊन म्हटलं. ‍

"आयला, हा टकल्या सातपुते म्हणजे एक नंबरचा भिकारचोट माणूस! आयुष्यभर सगळ्यांशी तुसडेपणाने वागला. लेकाच्या मर्तिकाला कोण आलंय का बघ! अरे चार डोकी तरी हवीत ना मयताला? म्हणून मुद्दामच तुला बोलावूनघेतला. अरे चार माणसं जमवताना माझी कोण पंचाईत झाल्ये म्हणून सांगू! छ्य्या..!"

अर्थात, टकल्या सातपुतेच्या मयताला चार डोकी जमवायची जिम्मेदारी कुणीही नान्याकडे दिलेली नव्हती, तरहौशी नान्याने ती आपणहून अंगावर घेतली होती हे वेगळे सांगणे न लगे!

"काय करणार काकू? आता जे झालं त्याला काय इलाज आहे सांगा पाहू! तुम्ही धीर सोडू नका. अहो मरण कायकुणाच्या हातात असतं का? बरं, वसू निघाल्ये का पुण्याहून? तुम्ही काही काळजी करू नका. मी आलोय ना आता, मी सगळं बघतो सातपुतेकाकांचं!"

नान्या टकल्या सातपुतेच्या बायकोला धीर देत होता. एकिकडे टकल्या सातपुतेला 'भिकारचोट' अशी माझ्याकडेखासगीत शिवी देणारा परंतु त्याच्या बायकोशी बोलताना मात्र, "काय करणार काकू, आता जे झालं त्याला कुणाचाकाही इलाज आहे का? मी सगळं बघतो सातपुतेकाकांचं!"असं बोलणार्या नान्याचं मला हसूही आलं आणिकौतुकही वाटलं! :) ‍

वास्तविक टकल्या सातपुतेला रात्री मुद्दाम उठून अगदी हटकून पोचवायला वगैरे जावं इतकी काही त्याची आणिमाझी घसट नव्हती. पण काय करणार, आमचे नान्यासाहेब पडले मर्तिकसम्राट! त्यांच्या दोस्तीखातर मला जावंलागलं होतं!

"अखेर टकल्या सातपुते अत्यंत गरीब परिस्थितीतच गेला रे!" नान्या पुन्हा एकदा दबक्या आवाजात हळहळला!

"गरीब परिस्थिती? अरे त्याचं हे घर तर चांगलं सधन दिसतंय. आणि मी तर अलिकडेच टकल्या सातपुतेला सॅन्ट्रोकारने जाताना-येताना पाहात होतो! मग टकल्या गरीब कसा काय? काय कर्जबिर्ज होतं की काय त्याच्याडोक्यावर?" मी.

"च्च! तसा गरीब नाही रे!" (बर्याचदा बोलण्याच्या सुरवातीला 'च्च' असा उच्चार करायची नान्याची खास ष्टाईलबरं का! :)‍

"पैशे खूप आहेत रे टकल्याकडे. पण आता तू बघतो आहेस ना? अरे चार डोकी तरी आपुलकीने, आस्थेने जमलीआहेत का त्याच्या मयताला? तुला सांगतो तात्या, माणूस गरीब की श्रीमंत हे तो मेल्यावरच समजतं! तशीपैशेवाल्यांच्या मर्तिकाला काही मंडळी स्वार्थापोटी जमतात, किंवा एखाद्या राजकारण्याच्या मर्तिकाला पुढे पुढेकरायला मिळावं म्हणून कार्यकर्तेही जमतात, तो भाग वेगळा! परंतु तुझ्यामाझ्यासारख्या सामान्य माणसाच्यामयताला उत्स्फूर्तपणे चार माणसं जमतात आणि हळहळतात ना, ती खरी त्या माणसाची श्रीमंती समजावी!"

अच्छा! म्हणजे नान्या या अर्थाने टकल्या सातपुतेला गरीब ठरवत होता! माणसाला गरीब किंवा श्रीमंत ठरवायचानान्याचा हा निकष काही औरच होता!

"आता तुझ्या त्या देशपांडेचंच उदाहरण घे. तो खरा श्रीमंत! अगदी सामान्यातला सामान्य माणूस त्यालाआपुलकीने पोचवायला गेला होता!"

"कोण देशपांडे?" मी.

"अरे तुझा तो भाई देशपांडे रे!"

??

"अरे तुझा तो भाईकाका देशपांडे रे! टीव्हीवर शो करून सगळ्यांना हासवायचा ना? तो! काय गर्दी रे त्याच्यामयताला! टीव्हीवर दाखवत होते ना!"

मी मनातल्या मनात भाईकाकांची त्यांच्या एकेरी उल्लेखाबद्दल माफी मागितली आणि म्हटलं, "भाईकाका, आमच्या नान्याला एकेरी उल्लेखाबद्दल मोठ्या मनाने क्षमा करा. मनानं तसा निर्मळ आहे तो. तुमच्या अंतयात्रेलाझालेल्या उत्स्फूर्त गर्दीवरून तो तुम्हाला श्रीमंत ठरवतोय! तुमच्यातल्या माणूसवेडाला ही त्याची दाद समजा!"

एका बाबतीत मात्र नान्या खरंच सुखी होता. त्याला संगीत, कला, साहित्य वगैरे कश्शाकश्शात इंटरेस्ट नव्हता! पुलंनादेखील तो लेखक वगैरेच्या ऐवजी, 'टीव्हीवर ते कार्यक्रम करायचे' इतपतच ओळखत होता!

"हॅलो, कोण टिल्लूगुरुजी का? मी नाना नवाथे बोलतोय. पोष्टाजवळचे सातपुते वारले. तुम्ही अमूक अमूक वाजताडायरेक्ट स्मशानात पोहोचा. आम्ही त्याच सुमारास मयत घेऊन तिकडे येऊ!"

नान्या आता पुढच्या उद्योगाला लागला होता. नान्याची फोन डायरी जर तपासली असती तर त्यात मर्तिकाची कामंकरणार्या किमान पाचपन्नास भटजींची नांवं तरी सहज सापडली असती! :) ‍

"काय करणार तात्या, अरे ऐनवेळेस लोकांना भटजी कुठून बोलवायचा, कुणी बोलवायचा, कोण कोण भटजी अशीकामं करतात हे देखील माहीत नसतं! त्यामुळे साला मला या भटजी मंडळींशी कॉन्टॅक्टस् ठेवावे लागतात!"

एखाद्या गब्बर बिल्डरचे जसे महापालिका आयुक्त, नगरसेवक वगैरे मंडळींशी कॉन्टॅक्टस् असतात त्याच थाटातनान्या मर्तिकाच्या भटजींशी आपले कॉन्टॅक्टस् आहेत हे सांगत होता!

अंगापिंडाने काटक-सडपातळ, उभेल्या चेहेर्याचा, रंगाने सावळा, नाकीडोळी चांगला तरतरीत स्मार्ट, मध्यमउंचीचा, नेहमी साध्या शर्ट प्यँटीत असलेला नान्या गावात मुडदेफरास म्हणून प्रसिद्ध आहे. नान्या रेल्वेतइलेक्ट्रिकल कामगार या पदावर नोकरीला आहे. प्रसन्न चेहेर्याची, वृत्तीने अत्यंत समाधानी अशी पत्नी नान्यालालाभली आहे. तिचं नांव सुधा. नान्या तीन मुलींचा बाप आहे. सर्वात धाकटी स्नेहा आता ५-६ वर्षांची आहे. मी तिलाचिऊ म्हणतो. कधीही नान्याच्या घरी जा, आमची चिऊ जिथे असेल तिथनं भुर्रकन येऊन तात्याकाकाला येऊनबिलगते!‍ ‍

"गधडे, तू तात्याकाकाकडेच राहिला जा! तोच तुझं कन्यादान करील!" असं नान्या चिऊला म्हणतो! :)

नान्याचं सगळं घरच अगदी प्रसन्न आणि हसतमुख चेहेर्याचं आहे. रेल्वेची नोकरी सांभाळून नान्या घरगुतीइलेक्ट्रिक वायरींग दुरुस्तीची वगैरे कामही कामं घेतो. भरपूर कष्ट करतो. बायकोमुलींवर बाकी नान्याचा भलताचजीव! अत्यंत कुटुंबवत्सल स्वभाव आहे नान्याचा.‍

पण नान्याचा आवडीचा छंद किंवा विरंगुळा मात्र एकच. तो म्हणजे लोकांच्या मर्तिकाला जाणे! :) नान्या एकवेळकुणाच्या लग्नामुंजीला जायचा नाही, पण ओळखीत कुठे मर्तिक असल्याचं कळलं की सर्वात पहिला नान्या हजर! मग अगदी शेवटपर्यंत तिथे थांबणार. अगदी सामान आणण्यापासून ते तिरडी बांधण्यापर्यंत, डॉक्टरचं सर्टिफिकेट, स्मशानात सुपूर्द करायची कागदपत्र, लाकडं रचणार्या इसमाशी "काय रे बाबा, लाकडं ओली नाहीत ना? मीठआणि रॉकेल आहे ना?" इत्यादी गोष्टी कम्युनिकेट करणे, पळीपात्र, काळे तीळ, दर्भ, इथपासून भटजींच्यासामानाची अप्टुडेट तयारी करणे या सगळ्यात नान्याचं हात धरणारं गावात दुसरं कुणी नाही! ‍

गणपतीच्या दिवसात नान्याकडे खरी धमाल असते. नान्याकडे पाच दिवसांचा गणपती बसतो.

"अरे तात्या, तुझं ते भजनीमंडळ घेऊन गणपतीत अमूक अमूक दिवशी माझ्या घरी ये रे. मस्तपैकी गाण्याचाकार्यक्रम करू!"

वास्तविक नान्याला संगीताचीही फारशी काही समज किंवा आवड नाही, पण गणपतीत घरी गाण्याचा कार्यक्रमझालाच पाहिजे ही हौस मात्र दांडगी! दरवर्षी नान्याच्या घरी माझं गाणं ठरलेलं, कारण मीच काय तो एकमेव गायकनान्याच्या ओळखीचा! पण मला खरंच कौतुक वाटतं नान्याचं. त्याच्या त्या दोन खोल्यांच्या रेल्वे क्वार्टर्समध्येपाचपंचवीस माणसं गाणं एकायला अगदी दरवर्षी जमतात. ही सगळी नान्याच्या गणगोतातली माणसं! मलाअभिमन वाटतो की मी देखील नान्याच्या गणगोतातीलच एक आहे!

गणपतीत दरवर्षी ठरल्याप्रमाणे मी माझा तब्बलजी आणि पेटीवाला घेऊन नान्याच्या घरी हजर होतो. नान्यातेव्हा कोण मुलखाच्या गडबडीत असतो! मग त्यानंतर अगदी यथास्थित, पाय दुखेस्तोवर अर्धापाऊण तासआरती! आरती झाली की गणपती बाप्पा मोरया या आरोळी पाठोपाठच, "देवा गणपतीराया सगळ्यांना मुक्ति मिळूदे रे बाबा! कुणाचा जीव तरंगत रहायला नको!" हे देखील नान्या ओरडतो! :)

छ्या! या नान्याचं मर्तिकाचं खूळ केव्हा जाणारे कुणास ठाऊक! गणपतीच्या दिवशीही "सगळ्यांना मुक्ति मिळू दे रेबाबा!" या आरोळीच्या रुपाने ते खूळ नान्याच्या पायात पाय घालायला येतंच तिच्यायला! ते सुद्धा नान्याच्यानकळत! कारण आपण असं काही बोललो हे देखील नान्याच्या गावी नसतं! :) मला तर एखाद् वर्षी "देवागणपतीराया, या वर्षी लाकडं जरा स्वस्त होऊ देत रे बाबा!" असंही नान्या ओरडेल की काय अशी भिती वाटते! :))

"हं तात्या, इथे सतरंजी घातल्ये. तुम्ही मंडळी इथे बसा आणि सुरू करा गाणं! मंडळी, सर्वांनी बसून घ्या रे. आतागाणं ऐकायचंय! सुधा, खिचडीच्या प्लेटा भरल्यास का?" नान्याची तोंडपाटिलकी सुरूच असते!

"तात्या, काय सुपारी-तंबाखू, पानबिन हवं तर सांग रे. लेका मोठा गवई तू!" एवढं म्हणून नान्या पुन्हा इतरलोकांच्यात कुणाला काय हवं नको ते पाहायला मिसळतो! मग मी आणि माझी साथीदार त्या गर्दीतच स्थानापन्नहोऊन वाद्यबिद्य जुळवू लागतो. कुठलीही औपचारिकता वगैरे न पाळता नान्या मला हुकून सोडतो,

"सुरू कर रे तात्या. तुझं ते 'जो भजे हरि को सदा' होऊन जाऊ दे जोरदार!"

मैफलीच्या सुरवातीलाच गायकाला भैरवीची फर्माईश करणारा नान्या हा जगातला एकमेव श्रोता असेल! :)

मग मी देखील नान्याच्या घरी अगदी मन लावून, यथेच्छ गातो. तसा काही मी कुणी मोठा गवई नव्हे. बाथरूमसिंगरच म्हणा ना! पण नान्याच्या घरी गायला जी मजा येते ती कुठेच येत नाही! देव आहे की नाही हे मला माहितीनाही, पण नान्याच्या घरी गाताना मात्र मला इश्वरी वास जाणवतो!

बरं एवढं करून देखील नान्या तिथे गाणं ऐकायला थोडाच थांबेल? ते नाही! तो लगेच आलेल्या मंडळींना गरमागरमसाबुदाण्याची खिचडी आणि उत्तम मावा बर्फीचा तुकडा असलेली प्लेट द्यायला उठणार! नान्या, त्याची तीप्रसन्नमुखी बायको सुधा, आणि तीन निरागस मुली सगळ्यांच्या सरबराईत लागलेल्या असतात. गातांना मध्येचधाकटी चिऊ माझ्या मांडीवर येऊन बसणार! "तात्याकाका, मी पण गाणार!" असं मला म्हणणार! :)

"खरंच रे तात्या, चिऊला गाणं शिकवण्याकरता लेका मी तुझ्याचकडे पाठवणार आहे. तिला आपण मोठ्ठी गायिकाकरूया!" नान्या हे सांगत असताना सुधावहिनीही कौतुकाने चिऊकडे बघणार! मंडळी, खरंच किती साधी माणसंआहेत ही! नान्याच्या घरची गणपती मूर्ती जशी प्रसन्न दिसते तशी कुठलीच मूर्ती मला दिसत नाही! अहो देवसुद्धाशेवटी निरागसतेचा, साधेपणाचाच भुकेला आहे!

पण मंडळी, एका बाबतीत मात्र मी नान्याचा नेहमीच धसका घेतलेला आहे!

अहो काय सांगावं, रात्री अपरात्री कधीही नान्याचा फोन यायची भिती असते,

"तात्या अमका अमका खपला रे तिच्यायला! मोकळा असशील तर ये! अरे मयताला चार डोकी तरी जमवायलाहवीत ना!"

-- तात्या अभ्यंकर.

हाच लेख येथेही वाचता येईल...


January 26, 2008

कुणी मत देता का मत?

कुणी मत देता का मत?
एका गायकाला कुणी मत देता का मत?
खरं सांगतो बाबांनो, गायक आता लाचार झाला आहे!
झी, सोनी, आणि स्टारप्लस

आणि कुणी कुणी त्याला लाचार केला आहे...!
कुणी मत देता का मत?
एका गायकाला कुणी मत देता का मत?
कुणी सांगितलं की कलाकार एखादाच असतो, अभिमानी असतो?
कुणी सांगितलं की त्याचं फक्त कलेशीच इमान असतं म्हणून?
खरं सांगतो बाबांनो, 

गायक आताशा एस एम एस मुळेच लहानमोठा ठरतो!
कुणी सांगितलं की एस एम एस मुळे वाहिन्यांना लाख्खो रुपये मिळतात?
कुणी सांगितलं की संगीतकला ही वाहिन्यांच्या दारातली
एक बाजारबसवी रांड झाली आहे म्हणून?
तसं काही नाही बाबांनो, संगीतकला खूप थोर आहे!
खूप खूप थोर आहे!!
दीड दमडींच्या एस एम एस ची मिंधी असली म्हणून काय झालं?
संगीतकला खरंच खूप थोर आहे!
कुणी मत देता का मत?
एका गायकाला कुणी मत देता का मत?
बरं का बाबांनो, बरं का दादांनो, बरं का तायांनो,
गायकाचा कोड नंबर 'अबक' आहे.
त्याला प्लीज प्लीज प्लीज मत द्या, 

तुमच्या एस एम एस ची भीक द्या!
कारण त्याला व्हायचंय अजिंक्यतारा!
त्याला व्हायचंय इंडियन आयडॉल!
आणि अश्याच अजून काही पदव्या त्याला मिळवायच्या आहेत!
म्हणूनच सांगतो बाबांनो, एका गायकाला मत द्या मत!
त्याला वाढा तुमच्या एस एम एस चा जोगवा!
पण जोगवा तरी कसं म्हणू बाबांनो?
त्या शब्दात तर एक पवित्रता आहे,
त्या शब्दात तर अंबाबाईची पूजा आहे,
तुळजाईचा गोंधळ आहे!
जोगवा म्हणजे भीक नव्हे, नक्कीच नव्हे!
एस एम एस मागणे ही मात्र भीक आहे, नक्कीच आहे!
पण भीक मागितली म्हणून काय झालं?
कुणी सांगितलं की कलाकाराने कुणाकडे भीक मागू नये म्हणून?
कुणी सांगितलं की कलाकार भिकारी नसतो म्हणून?
म्हणूनच सांगतो बाबांनो, गायकाला मत द्या मत!
त्याचा कोड नंबर 'अबक' आहे! त्याला मत द्या मत!
कारण त्याला व्हायचंय अजिंक्यतारा!
त्याला व्हायचंय इंडियन आयडॉल!
आणि अश्याच अजून काही पदव्या त्याला मिळवायच्या आहेत!
म्हणूनच सांगतो बाबांनो, गायकाला मत द्या मत!
त्याचा कोड नंबर 'अबक' आहे! त्याला मत द्या मत!
पण त्याला गायक तरी कसं म्हणायचं?
काय म्हणालात?
"हरकत नाही, भिकारी म्हणूया!"??
ठीक आहे बाबांनो, भिकारी तर भिकारी!
एका भिकार्‍याला मत द्या मत!
तुमच्या एस एम एस ची भीक त्याला घाला!
घालाल ना नक्की?
कारण त्याला व्हायचंय इंडियन आयडॉल!
त्याला व्हायचंय अजिंक्यतारा!
-- तात्या अभ्यंकर.

January 21, 2008

रौशनी.. ५

'>>साली दुनिया गेली बाझवत!' असा विचार करून आज मी तिच्यासोबत व्हिस्की पिणार होतो, तिच्या हातची बिर्याणी खाणार होतो आणि मला ती तिच्या पूर्वायुष्याबद्दल सगळं सांगणार होती!<<


मी पुन्हा एकदा रौशनीची माडी चढत होतो. पुन्हा तसंच त्या चाळीतून दोन्ही बाजूंनी उभ्या असलेल्या रांडांमधून वाट काढत चोरट्यासारखा रौशनीच्या खोलीकडे चाललो होतो. रौशनीची खोली मात्र नेहमीप्रमाणे स्वच्छ आणि प्रसन्न, आणि तीच ती समोर कोचावर बसलेली प्रसन्न रौशनी!

हसतमुखाने तिने पुन्हा माझं स्वागत केलं. नाहीतरी मी आज ठरवलेलंच होतं, आज साला हिच्याकडे बैठकच मारायची. नाहीतरी हिने मला दहा वेळा आग्रहाने जेवायला बोलावलंच आहे ते आज हिच्याकडून जेवूनच जायचं! साला काय होईल ते होईल!

रौशनीने स्वत:हून माझा पेग भरला, माझ्या ग्लासात सोडा ओतला, सोबत खारे काजू ठेवले! आतल्या खोलीतून बिर्याणीचा घमघमाट सुटला होता. फॉकलंड रोडच्या आमच्या जाफरभाईकडच्या
बिर्याणीसारखाच! :)

"शरमाना नही तात्या, आज आप हमारे मेहमान है!"

आपण तर साला रौशनीच्या जवळजवळ प्रेमातच पडल्यात जमा होतो!

"और सुनाओ तात्या. कसं चाललं आहे? आमच्या कृष्णाचं कुठे काही जमतंय का?"

रौशनीने आता माझ्याशी दिलखुलास बोलायला सुरवात केली. वर्षानुवर्षाची ओळख असल्यासारखी!

आमचं जुजबी बोलणं झालं. कृष्णाच्या कामाचं मी पाहतो आहे, पण अजून कुठे काही जमत नाहीये. एकदोन लोकांशी त्याच्या नौकरीबद्दल बोलून ठेवलं आहे, बघू!' अशी तिला थाप मारली!

रौशनीने आपलाही पेग भरला होता.

मी पुन्हा 'एखाद पेग मारून, थोडं जेवून तिथून चालू पडावं' या विचाराप्रत आलो होतो. पण रौशनी मात्र आता गप्पा मारायच्या मूडमध्ये दिसत होती!

"आपको पता है तात्या?, अमिता कृष्णाकरता लहानपणी 'धीरे से आजा री अखियन मे' ही लोरी फार छान गायची! मीच शिकवलं होतं अमिताला थोडंफार गायला. मैने बचपनमे थोडाबहुत गाना सिखा था!"

'लेकर सुहाने सपनो की कलिया
आके बसा दे पलको की गलिया
पलको की छोटीसी गलियन मे
निंदिया आजा री आ जा'

क्या बात है! रौशनीने या चार ओळी इतक्या सुंदर गुणगुणून दाखवल्या! कालपरवा आतमध्ये माझ्याकडे पाहात खिदळत, बाहेर घुटमळत असलेल्या रांडांना 'मादरचोद' ही कचकचीत शिवी देणारी हीच का ती रौशनी?? मनुष्य आणि मनुष्यस्वभाव हे इतकं अजब रसायन असू शकतं?

"तात्या, मी मुळची ग्वाल्हेरची. चांगल्या खात्यापित्या घरातली. संस्कार, परंपरा मानणारं घर होतं माझं! आमचा थोडाफार जमीनजुमला होता, घर माणसांनी, सोन्याचांदीनी भरलेलं होतं. कोई भी चीज की हमे कमी नही थी! आम्ही त्या काळातले मोठे सराफ होतो ग्वाल्हेरातले. बडे खानदानी लोग थे हम! मेरे पिताजी और उनके सब भाई और उनके परिवारवाले, हम सब साथ मै रेहेते थे. आजही ते घर ग्वाल्हेरात आहे, मतलब...असेल!"

रौशनी बोलत होती, मी ऐकत होतो!

"माझे वडील म्हणजे ग्वल्हेरातली एकदम जबरदस्त आसामी! त्यांना गाण्याची अतिशय आवड! गावातच असलेल्या एका गायनमास्तरांकडे मी गाणं शिकत होते. मलाही देवदयेने ती कला थोडीफार आत्मसात होऊ लागली. तात्या, आप ख्यालगायकी जानते है? कभी सुनी है आपने?"

रौशनी हा प्रश्न ज्याचे मानसगुरू साक्षात भीमसेनजी आहेत अश्या माणसला विचारत होती! :)

"हां, जानता हू थोडीबहुत! ये कोने मे रखा हुआ तानपुरा आपका है? कभी वक्त मिला तो जरूर सुनेंगे आपका गाना! क्या सुनाएगी आप? ग्वलियर, आग्रा, जयपूर, या किराना? वैसे तो आप ग्वालियरमे पलीबढी है, ग्वालियर का ख्याल गाती हो? आपके गुरुजी किनके शागीर्द थे?"

माझे एकदम एवढे प्रश्न ऐकून रौशनी अंमळ चकीतच झाली!

"बहोत अच्छे! आपने तो बडे बुजूर्गोका गाना काफी सुना हुवा लगता है. मी आपल्याला काय ऐकवणार तात्या? फिर भी कभी फुरसद मिलेगी तो जरूर गाऊंगी आपके लिये. और कुछ नही, लेकिन लोग समझेंगे की रौशनीने आजकल कोठा शुरू किया है!" :)

असं म्हणून रौशनी मिश्कील हसली! खरंच प्रत्येक माणसाला स्वत:ला किती एक्स्प्रेस करावंसं वाटतं! रौशनी भरभरून बोलत होती. फोरासरोडच्या त्या माहोल मध्ये, या पद्धतीचा संवाद खरंच कित्येक वर्षात तिने कधी कुणाशी साधलेला दिसत नव्हता! तहानलेल्याला पाणी मिळवं अश्या समधानी मुद्रेने ती माझ्याशी आपुलकीने बोलत होती, गप्पा मारत होती! रंडीबाजारातील मावश्यांनाही मन असतं, तीही माणसंच असतात, हे मला कुठेतरी जाणवत होतं!

रौशनीकडे बसलो असताना मध्येच एकदम मी भानावर यायचो. माझा माहोल, माझा पांढरपेशी सुसंस्कृत समाज मध्येच मला, मी कुठे बसलो आहे, का बसलो आहे, हे प्रश्न विचारायचा, त्यांची जाणीव करून द्यायचा! पण मी आज रौशनीला बोलू देणार होतो, तिचं सगळं म्हणणं ऐकून घेणार होतो. आणि मी का भीड बाळगू माझ्या सुसंस्कृत पांढरपेशी समाजाची? माझ्यासमोर बसलेली बयाही माझी लेखी सुसंस्कृतच होती!

तिला खूप खूप बोलायचं होतं माझ्याशी. ती बोलतही होती. आपलं म्हणणं कुणीतरी ऐकून घेतंय याचंच तिला खूप समाधान वाटत असणार! नाहीतर फोरासरोडवरच्या त्या रंडीबाजारातल्या मावशीशी एरवी कोण गप्पा मारणार? कोण एकून घेणार तिच्या कथा, व्यथा? मी आपला तिला बरा सापडलो होतो गप्पा मारायला. हा खूप सेन्सिबल माणूस आहे, सभ्य माणूस आहे, सुसंस्कृत माणूस आहे असा कुठेतरी तिला विश्वास वाटत असणार माझ्याबद्दल! फक्त पैशांची आणि वासनेची भाषा समजणार्‍या त्या वस्तीत तिला या भाषेव्यतिरिक्त इतरही भाषा बोलायची होती आणि त्याकरताच तिने मला अचूक हेरला होता, मन्सूरमार्फत बोलावून माझ्याशी मुद्दाम ओळख करून घेतली होती, पोटच्या पोराप्रमाणे प्रेम असलेल्या कृष्णाला माझ्या हाती सोपवू पाहात होती!

आणि खरं सांगायचं तर मलाही तिच्या व्यक्तिमत्वाने भुरळ घातली होती. आमची वेव्हलेन्थ जुळली होती, जुळत होती!

"मै तो मेरे पिताजी की जान थी. खूप जीव होता त्यांचा माझ्यावर! तुम्हाला एक गंमत सांगू तात्या, लहानपणी मी खूप म्हणजे खूपच खुबसूरत होते. मी इतकी लख्ख गोरीगुलाबी होते की माझे वडील कौतुकाने माझ्याकडे पाहून म्हणायचे, 'मेरी बेटी, मानो सूरज की रौशनी है, उसकी सुबहकी सुनहरी किरने है!' तेव्हापासूनच माझं रौशनी हे नांव पडलं तात्या!" :)

असं म्हणून रौशनी प्रसन्नपणे हसली. सुरेख दंतपंक्ति, सुरेख जिवणी! मला रौशनीच्या बोलण्यात जराही अतिशोयोक्ती वाटत नव्हती! कारण माझ्यासमोर बसलेली रौशनी पन्नाशीतही तशीच गोरीपान होती, सुरेख होती!

रौशनीकडची माझी मैफल आता रंगली होती. बाहेरचा माहोल तोच होता. त्याच त्या धंद्याला उभ्या असलेल्या मुली, गिर्‍हाईकंची वर्दळ, नेहमीच्या शिव्या, ओव्या, तेच ते सगळं नेहमीचं. रौशनी माझ्याशी बोलताना मध्येच सांधा बदलून इतर कुणाशी तरी बोलत असे आणि लगेच माझ्याशी बोलणं सुरू ठेवत असे.

"तात्या, ग्वाल्हेरात आमच्या घरी, दुकानी रामनाथजी नांवाचा एक कारिगर यायचा. उसको हिरोंकी बडी अच्छी पेहेचान थी. तो हिर्‍यांना पैलू पाडायचं काम करत असे. दहा-पंधरा दिवसातनं एकदा तरी त्याची ग्वाल्हेरात चक्कर असायची. घरी येऊन वडिलांशी, घरातल्यांशी खूप गप्पा मारायचा. मला खूप आवडायचा तो!"

तेवढ्यात हातात बिर्याणीचं ताट घेऊन कृष्णा आणि त्याच्यासोबत एक नऊ-दहा वर्षांची छानशी गोड, नक्षिदार परकरपोलकं घातलेली, चेहेर्‍यावर मिश्किल, निष्पाप भाव असलेली एक मुलगी, आतल्या खोलीतून बाहेर आली!

"तात्या, यह नीलम है! मेरी बेटी!"

???

रौशनीला मुलगी आहे? या गोड मुलीचं हिनं पुढे काय करायचं ठरवलं आहे? कुणाची मुलगी ही? त्या रामनाथजीची की काय? आणि ग्वाल्हेरातल्या इतक्या संपन्न, खानदानी घरातील ही रौशनी इथे मुंबईच्या फोरासरोडवर कशी काय पोहोचली? अशी कशी काय अवस्था झाली हिची?

पुन्हा एकदा सगळे प्रश्न!

मंडळी खरंच सांगतो, त्या गोड मुलीकडे पाहून, रौशनीकडे पाहून मला अगदी प्रथमच खूप वाईट वाटलं, भडभडून आलं! आणि तो भाबड्या चेहेर्‍याचा कृष्णा आणि त्याच्या डोळ्यातून माझ्याकडे पाहणारी, मी कधीही न पाहिलेली ती अमिता! छ्या, आपण तर साला सुन्नच होऊन गेलो!

"लिजीये तात्यासाब. बिर्याणी खा. हमारे गरीबखाने का दानापानी स्वीकार करे!"

असं म्हणून रौशनी स्वत: उठून मला बिर्याणी वाढू लागली!

ती गोड मुलगी, थोड्याश्या उत्सुकतेने, थोड्याश्या आश्चर्याने माझ्याकडे पाहात तिथेच उभी होती. मला उठून त्या मुलीला जवळ घ्यावसं वाटलं, क्षणभर तिचे लाड करावेसे वाटले. काहीही झालं तरी आमच्या रौशनीची मुलगी होती ती! माझ्या मैत्रिणीची मुलगी होती ती!

पण ते मगासचे प्रश्न? त्यांची उत्तरं मला कधी मिळणार होती?

क्रमश:

-- तात्या अभ्यंकर.

December 31, 2007

सालस...

नमस्कार मंडळी,
ही एक जुनी हकिगत आहे. आत्ता केबलवर "त्रिदेव" नावाचा हिंदी चित्रपट लागला होता, तो जरा बघत बसलो होतो. पण त्यामुळे माझ्या काही पूर्वस्मृती जाग्या झाल्या. म्हटलं, त्या तुमच्याबरोबर share कराव्या.

१९८७-८८ सालचा सुमार असेल. आम्ही मित्रमंडळी कॉलेजचे रमणीय दिवस फारसा अभ्यास-बिभ्यास न करता फार मजेत व्यतीत करत होतो. मस्तपैकी रोज सकाळी कॉलेजांत टाईमपास करायचा, जोक्स सांगायचे, गाणी म्हणायची आणि धमाल करायची. त्यांत मी म्हणजे काय, एकदम फेमस! "तात्या जरा म्हण रे गाणी" असं कोणी म्हटलं की मी लगेच त्या हरबऱ्याच्या झाडावर चढायचो आणि गायचो. मग काय, सगळ्या मुलामुलींचा घोळका साला आपल्याभोवती!! मग काय विचारता, कँटीनमध्येच रोज एक छोटीशी मैफलच रंगायची. एहेसान तेरा होगा, अभी ना जाओ छोडकर, दिवाना हुआ बादल, हम प्यार मे जलनेवालोको वगैरे गाण्यांच्या फैरी झडायच्या.

तसा मी यथातथाच गायचो. पण च्यामारी मैफल मारून नेण्यांत आपण पटाईत! अहो, चांगल्या चांगल्या, छान छान दिसणाऱ्या मुलीसुध्दा कौतुकानं कम प्रेमानं म्हणायच्या, "कोण तात्या ना, क्या बात है, छानच गातो!" साला आपण खुष!!
वर्गांत कमीच बसायचो. सदैव कँटीन मध्येच पडलेला असायचो. आमचा कँटीनवाला बबल्या शिंदे सामोसे फक्कड करायचा. तोही माझा भक्त कम दोस्त होता. आमच्याच वयाचा बबल्या खरंच खूप छान मुलगा होता. मिष्कील होता. त्याला syjc मधली वैशाली जोगळेकर फार आवडायची. तसं त्यानं एकदा मला हळूच सांगीतलंही होतं. "च्यामारी तात्या, काय नशीब बघ माझं! साला कँटीनवाल्या पोऱ्याला कोण पोरगी पटणांर?, जाऊ दे" असं म्हणायचा!! पण कधी कधी वैशाली कँटीनमध्ये आलेली असायची तेव्हा बबल्या सामोसे जरा जास्तंच खरपूस आणि अधिक प्रमाने तळायचा! मध्येच माझ्या सुरू असलेल्या मैफलीत डोकावायचा, आणि तात्या, "चैनसे हमको कभी, आपने जिने ना दिया" हे गाणं म्हण, एक सामोसा फ्री देईन अशी ऑफरही द्यायचा!

एकूण काय, सगळी धमाल चालायची. गायचो-बियचो बरा, त्याच्या जोडीला बोलबच्चनगीरी, त्यामुळे काही मुलीं सुध्दा आमच्या गोटांत सामील झाल्या होता. त्याही आमच्या बरोबर खुप मजा करायच्या. मी त्या सगळ्या ग्रुपचा म्होरक्या!! अगदी "तात्या म्हणेल तसं" इतपत मी माझं प्रस्थं माजवलं होतं! असो. (गेले ते दिवस आता. हल्ली गेले ते दीन गेले हे गाणं खरंच फारच सुरेख म्हणतो मी! वेदनेतून गाणं जन्माला येतं म्हणतांत ना, ते असं!!)

संध्याकाळी पुन्हा सगळेजण (फक्त मुलंच) न चुकता ठरलेल्या नाक्यावर हजर! आमच्या ठाण्याच्या गोखले रोडला संध्याकाळी फार सुंदर हिरवळ असायची. (आजही आहे, पण हल्ली मुली मला "काका, जरा वाजले किती ते सांगता?" असं विचारतांत!, असो.) नाक्यावर उभं राहून आमची भरपूर थट्टा-मस्करी चालायची. शिवाय आमच्यातला प्रत्येकजण आपापला सभ्यपणा जपत, लाईनी मारत असे. ते वयच तसं होतं. एक मात्र खरं, की आमच्यापैकी कधी कोणी असभ्यपणा केला नाही. येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींवर फालतू कॉमेंटस् पास करणे, आचकट विचकट हावभाव करणे असले प्रकार आम्ही कधीच केले नाहीत. पण हळूच एखादीकडे बघणे, लाईन मारणे इतपतच आमची पापभिरू हिरोगिरी चालायची! त्यातच मजा असायची.

रोज संध्याकाळी सात-सव्वासातच्या सुमाराला त्या रस्त्यावरून एक मुलगी जायची. रोजचा क्लासबीस संपवुन जात असेल घरी. तुम्हांला खरं सांगतो मंडळी, मला ती मुलगी अतिशय आवडायची! तशी ती दिसायला फार सुरेख वगैरे नव्हती पण एकंदरीत फारच आकर्षक व्यक्तिमत्व होतं तीचं. आपण तर बाबा मरायचो तिच्यावर. अत्यंत सालस दिसायची. पण तीचं तर नांवही आम्हाला माहीती नव्हतं, पण सालस दिसायची म्हणून तिचं नांवही आम्ही "सालस" हेच ठेवलं. ती येतांना दिसली की सगळे म्हणायचे, "अरे तात्या, लेका तुझी सालस येत्ये बघ!". "तात्या, तुझी सालस!" झालं, मी लगेच लाजेने चूरचूर व्हायचो! मग मी हळूच तिच्याकडे बघायचो. मंडळी, काय सागू तुम्हांला. खल्लास दिसायची हो ती! आहाहा, आत्ता हा लेख लिहितांना सुध्दा डोळ्यात पाणी आलं बघा!! दिवसभरच्या व्यापातून(?) संध्याकाळी एकदा का सालसचं दर्शन झालं की धन्य वाटायचं. एव्हढं होईपर्यंत ७.३०-७.४५ वाजलेले असायचे. सिगरेटचे झुरके आणि कटिंग मारून आम्हा मित्रांची पांगापांग व्हायची. मीदेखील सालसच्या आणि माझ्या सुखी संसाराची स्वप्नं रंगवत रंगवत घरच्या वाटेला लागायचो!!

असा रोजचा दिनक्रम सुरू होता. दिवस फार मजेत चालले होते. दिवसेंदिवस मी सालसच्या अधिकच प्रेमांत पडत चाललो होतो. सालस ही जगातली सर्वांत देखणी, सर्वांत आकर्षक, सर्वांत गुणी मुलगी वाटायची मला. पण सालसला त्याचा पत्ताच नव्हता!

अशीच एक छानशी संध्याकाळ. मस्तपैकी आमचा अड्डा जमला होता. सालस यायची वेळ झालेलीच होती. च्यामारी जी मुलगी आपल्याला एवढी आवडते, तिच्याशी आपली साधी ओळखदेखील नसावी, याचं मला राहून राहून वाईट वाटत होतं. एरवी मी अनेकींना माझ्या झुरणाऱ्या मित्रांबद्दल बिनधास्त अगदी भर रस्त्यात गाठून, कुठूनतरी ओळख काढून विचारलं होतं. पण सालसशी कसं बोलायचं? अरे यार, वो तो लाखोमे एक थी.. आहाहा, काय दिसायची हो.. छान सावळा रंग, आकर्षक, बोलकी चेहरेपट्टी.. मंडळी, काय सांगू तुम्हाला!

एकीकडे माझे मित्र मला म्हणत होते, "काय तात्या? अरे एवढा शूर तू. एका मुलीशी बोलायला घाबरतोस? च्यामारी, भीड बिनधास्त! अरे एवढा बोलबच्चन तू! आपल्या कॉलेजातल्या मुलींवर सफाईने शाईन मारतोस! फार फार तर काय होईल? नडेल, आखडेल! अरे यार, खरं काय ते एकदा कळू तरी देत. असा किती दिवस झुरणार तू?!"

गणेश सुतावणे नावाचा एक खट्याळ पोरगा आमच्या ग्रुपमध्ये होता. आम्ही त्याला गण्या म्हणायचो. महा खट्याळ कार्ट! नेहमी कुजबुजल्यासारखं बोलायचा. सदैव कुचकट टोमणे मारायचा, आणि स्वतःशीच खट्याळपणे हसायचा. तो एकदा मला गंभीर आवाजात म्हणाला," हे बघ तात्या, पू होऊन पिकायच्या आधीच कोणतंही गळू फोडलेलं बरं..!!! ...काय? तू एकदा तिला विचारूनच टाक...!!"

प्रसाद भणगे नावाचा आमच्या ग्रुपमध्ये एक मुलगा होता. माझा अगदी विशेष भक्त! त्याचं तर भलतंच निरीक्षण! तो तर एकदा मला म्हणाला, "तात्या, अरे ऐक माझं. मला खात्री आहे, तिलाही तू जाम आवडतोस!! अरे ती जेव्हा आपल्यासमोरून पास होते ना, तेव्हा तीही हळूच तुझ्याकडे बघते. मी स्वतः पाहिलंय!!":) "तू नुसतं एकदा तिला विचारायची हिंमत कर! बस! अरे, तुला सालस नक्की पटेल आणि तसं झालं तर मी अख्ख्या ठाण्याला पेढे वाटीन आणि बिल्डिंगला लाईटींग करीन..!!"

अहो कसलं काय मंडळी, हे सगळं प्रसादची माझ्यावरची भक्ती, मला धीर देण्याकरता बोलत होती. म्हणे तूही तिला जाम आवडतोस! छ्या..!! तिनं आजतागायत एकदाही ढुंकूनही माझ्याकडे पाहिल्याचं मला आठवत नव्हतं!

एके दिवशी मात्र मी ठरवलंच! च्यामारी, आज तिच्याशी ओळख काढायचीच. बिनधास्त बोलायचं. जो होगा देखा जायेगा! घरातल्या घरातच आरशासमोर दोन-तीन रिहर्सल केल्या, डायलॉग पाठ केले! आणि पक्का निश्चय करूनच नाक्यावर गेलो. हळूहळू बाकीचीही मित्रमंडळी नाक्यावर जमली. नेहमीच्या गप्पा, कटींगचाय, सिगरेट सुरू झाली. आज मी तिच्याशी ओळख काढणार आहे, डायरेक्ट भिडणार आहे याबाबत मी कुणालाच थांगपत्ता लागू दिला नव्हता. पण जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी माझी फाटायला लागली! आज ती आलीच नाही तर फार बरं होईल असासुद्धा एक पळपुटा विचार माझ्या मनांत येऊन गेला! तेवढ्यात गण्या कुजबुजला, "तात्या, तुझी सालस...!!"

लांबूनच ती येताना दिसत होती. छानसा पांढऱ्या शुभ्र रंगाचा पंजाबी ड्रेस! चेहऱ्यावरती नेहमी दिसणारा एक आत्मविश्वास!! क्षणभर मनात विचार आला, जाऊ दे! आज नकोच हिला विचारायला!! आज ही इतकी छान दिसत्ये की आपल्याला नक्की नाहीच म्हणेल!! :) उगाच रिस्क कशाला घ्या! :)

"अरे! तात्याची सालस आली वाटतं!" "अरे यार तात्या, आज खरंच काय मस्त दिसत्ये रे!" विन्या म्हणाला.
एव्हाना ती येताना इतरही मित्रांना दिसली होती. पण तिला आज भिडण्याचा मी मनोमन प्लॅन केला आहे, हे कुणालाच माहीत नव्हतं.

तेवढ्यात सुरेशचं माझ्यावरचं प्रेम उचंबळून आलं! तो हिंदीत म्हणाला, "चल तात्या, आज तेरे वास्ते आपून भिडता है उसको..!!"

"नको रे बाबा. तू वाटच लावशील माझी!" आमचा सुऱ्या म्हणजे एक अवतारच होता. हे जीवन म्हणजे एक हिंदी पिक्चरच सुरू आहे असं त्याला सदैव वाटायचं! उगाच काहीतरी तिच्यापुढे बरळायचा, आणि सगळं मुसळ केरात जायचं!!

कशी माहीत नाही, पण माझ्या मनातली घालमेल गण्याला कळली. तो नेहमीप्रमाणे हळूच कुजबुजला, "तात्या, ती येत्ये बघ! आज हे गळू फोडूनच टाक एकदाचं..!!" असं म्हणाला आणि हलकेच फीस्स्स करून हसला..!!
छ्या! हा गण्या म्हणजे खरंच एक हलकट माणूस होता...!! :)

'बस्स! ठरलं! नकोच ते! आज नाहीच विचारायचं! आज तिला नुसतं एक स्माईल देऊन बघावं काय होतंय ते..!!' असा मी ऐनवेळी निर्णय घेतला!! च्यामारी मंडळी, बघा काय पण माझी निर्णयक्षमता..!! आहे की नाही वाखाणण्याजोगी..!! :)
'काय सांगावं? कदाचित तीही मला उत्तरादाखल प्रतिस्माईल देईल.!!' या गण्याला नाही अक्कल! नुसत्या गोळ्या घेऊन भागत असताना मला ऑपरेशन (गळवाचं हो...!!) करायला सांगत होता...!! :)

हुश्श!! पण या निर्णयाने किती बरं वाटलं माझं मलाच!! :)

तिचं माझ्याकडे लक्ष जाईल, माझा चेहरा तिला स्पष्ट दिसेल हे पाहून मी थोडा ऍडजस्ट होऊन उभा राहिलो. नाहीतर मी नुसताच स्माईल द्यायचो, आणि ती आपल्याकडे बघायचीच नाही! साला, आपलं स्माईल फुक्कट!! :) शिवाय, पचका वेगळाच..!!

आता मात्र ती आमच्या खूपच जवळ आली होती, आणि ५-१० सेकंदातच आमच्या समोरून पास होणार होती, आणि मी तिला एक छानसा (माझ्या परीने..!!) स्माईल देणार होतो. आणि आज कधी नव्हे ती आमची नजरानजर झाली!

पक्षांची किलबिल थांबली, वारा स्तब्ध झाला, साऱ्या जगानं क्षणभर एक पॉज घेतला, आणि.....

(क्रमशः)--

तात्या.

December 21, 2007

सुगम रूप सुहावे...

राम राम मंडळी,

गाणं शिकणार्‍या काही हौशी मंडळींकरता, तर काही विद्यार्थ्यांकरता एक छोटेखानी शिबिर नुकतेच ठाण्यामध्ये आयोजित केले गेले होते. त्या शिबिरात आयोजकांनी अस्मादिकांनाही दोन शब्द बोलायला आमंत्रित केले होते. कार्यक्रम तसा घरगुती स्वरुपाचाच होता. म्हटलं तर शिबीर, म्हटलं तर घरगुती स्वरुपाच्या गप्पाटप्पा आणि गाण्याची मैफल! अस्मादिकांनी त्यात नेहमीप्रमाणेच खूप भाव वगैरे खाऊन घेतला. 'तात्या अभ्यंकर' म्हणजे काय विचारता महाराजा? एकदम संगीततज्ञ की हो!!' अशी आमची प्रतिमा कायम राखण्यात आम्ही कालही यशस्वी झालो! :) विशारद, अलंकार शिकणारे काही होतकरू विद्यार्थी कार्यक्रम संपल्यानंतर चक्क आमच्या पायाबिया पडले! अर्थात, आम्हीही एक विद्यार्थीच असल्यामुळे ते सर्व नमस्कार आम्ही मुखाने गोविंद गोविंद म्हणत भीमण्णांच्या पायाशी रुजू केले!

पण मंडळी, एकंदरीतच कार्यक्रमाला खूप मजा आली. त्या कार्यक्रमात काही विद्यार्थी खरोखरंच चांगले गाणारे होते, मेहनत करणारे होते ही मला समाधानाची बाब वाटली. असो..

कालचा माझा विषय होता,
'

यमन रागातील बंदिशींचे सौंदर्य आणि विविधता!'

मंडळी, आजपर्यंत आंतरजालावर अनेक वेळेला मी यमनचे, यमनकल्याणचे अगदी भरभरून गोडवे गायले आहेत. तो रागच तसा आहे. अगदी अवीट. स्वभावाने अत्यंत तरल, हळवा आणि प्रसन्न! गेली अनेक वर्षे या रागाने संगीतकारांवर, गायकांवर, बंदिशकारांवर अक्षरश: मोहिनी घातली आहे. आमच्या अभिजात संगीताच्या दुनियेत तर असं मानलं गेलं आहे की ज्याला यमन गाता आला त्याला गाणं आलं! तसे आपल्या रागसंगीतात शेकडो राग आहेत. प्रत्येक कलाकार त्यातला प्रत्येक राग सादर करतोच असं नाही. परंतु असा क्वचितच कुणी कलाकार असेल की ज्याने यमनची साधना केली नाही, ज्याला यमनने भुरळ घातली नाही. म्हणूनच अभिजात संगीताच्या मैफलींतून आजही प्रत्येक लहानथोर गायक यमन गातो, यमनची साधना करतो. आमच्या भीमण्णांसारखा वयोवृद्ध कलाकार मैफलीच्या सुरवातीला आजही पटकन यमनची आलापी करू लागतो! असो..

तर मंडळी, अश्या या यमन रागात अभिजात संगीताच्या दुनियेत अनेक बंदिशी आहेत. माझ्यासारख्या यकश्चित कलाकारापासून ते अगदी दिग्गज कलाकारांपर्यंत प्रत्येकाला यमनमध्ये काही ना काही बांधावसं वाटलं, त्याच्या स्वरांच्या माध्यमातून काही ना काही अभिव्यक्त करावंसं वाटलं. कालच्या शिबिरात मी यमन आणि यमनकल्याणमधील एकंदरीत चार वेगवेगळ्या बंदिशींबद्दल विस्तृत बोललो, त्याचं सौदर्य, त्यातल्या जागा श्रोत्यांना उलगडून दाखवायचा प्रयत्न केला. अभिजात ख्याल संगीत अतिशय उत्तम रितीने सादर करणारी ठाण्यातली माझी मैत्रिण वरदा गोडबोले हिने मोठ्या मनाने मला मदत केली व वानगीदाखल त्या चारही बंदिशींचे प्रात्यक्षिक दाखवण्याचे मान्य केले. त्या चारही बंदिशी तिने अतिशय उत्तम तर्‍हेने गाऊन दाखवल्या. त्या चारही बंदिशींबद्दल मी इथे दोन शब्द लिहिणार आहे आणि ऐकवणार आहे. हां हां. घाबरू नका मंडळी, मी स्वत: गाणार नाहीये तर युट्युबच्या साहाह्याने वरदाने गायलेल्या आपल्याला ऐकवणार आहे! :)

सुरवातीला मी तानपुरा उत्तम तर्‍हेने कसा लावावा, त्यात कोणकोणत्या गोष्टींना महत्व असतं याबद्दल दोन शब्द बोललो. एका विद्यार्थ्याने त्याचं लहानसं चित्रण केलं आहे ते आपल्याला खाली पाहा. मंडळी, तानपुरा कसा लागलाय ते ऐकून सांगा बरं का! जोड, खर्ज, पंचम सगळं बरोबर आहे ना बघा! :) असो..



=====================================================================================

पहिली बंदिश आहे -


अस्थाई -

मतवारी हू आज मै
स्वच्छंद मंद स्वर सुगंध
देत हृदय आनंद

अंतरा -

दिनरंग की कृपा
मोपे है आसिस
तब होवे ग्यान सुलभ
श्रुति, सूर, लय, राग


ऐका ही बंदिश!



मंडळी, ही बंदिश आग्रा गायकीचे बुजुर्ग असलेल्या पं दिनकरराव कायकिणींनी बांधली आहे. मुळात आग्रा गायकी ही उत्तमोत्तम बंदिशींकरता प्रसिद्ध. त्यात यमन रागातील बंदिश नसेल तरच नवल! कायकिणीबुवांनी या बंदिशीत काय सुरेख एकताल ठेवला आहे पाहा. 'मतवारी'त ल्या 'वा' वरच्या गंधारावर सम कशी अलगद येते! हा गंधार किती सुरेख आहे! 'स्वच्छंद मंद स्वर सुगंध' हे शब्द आरोही पद्धतीने किती सुंदर रितीने पुढे जातात! आणि 'देत हृदय आनंद' मधील 'आनंद' या शब्दात कायकिणीबुवांनी किती सुरेख शुद्ध मध्यम ठेवला आहे! क्या बात है.. 'आनंद' या शब्दात यमनातला हळवा भाव प्रकट होऊन तिथे यमनकल्याणची छानशी सावली पडते! अंतर्‍यातील 'दिनरंग की कृपा, मोपे है आसिस' या ओळीतील 'आसिस' शब्दावरील जागा कशी ठेवली आहे बघा! आणि श्रुति, सूर, लय, राग हे शब्द सुटे सुटे असून किती उत्तम तर्‍हेने चालीत बसले आहेत! मंडळी, माझं भाग्य हे की ही बंदिश खुद्द कायकिणीबुवांकडूनही मी मैफलीत ऐकली आहे...

=====================================================================================

मंडळी, गेल्या वर्षी होळीनिमित्त मी, माझ्या मैत्रिणी धनश्री लेले व वरदा गोडबोले, आम्ही तिघांनी मिळून मुंबईत काही ठिकाणी होळीवरील बंदिशिंचे कार्यक्रम केले होते. सवडीने मी या बंदिशींवर इथे विस्तृत लिहिणारच आहे. या सर्व बंदिशी धनश्री लेलेने रचल्या होत्या, मी त्या स्वरबद्ध केल्या होत्या आणि वरदाने त्या गायल्या होत्या. त्यात यमनकल्याण रागातलीही एक बंदिश होती. परवाच्या शिबिरात आम्ही प्रत्यक्षिकाकरता ही बंदिशदेखील घेतली होती. ही बंदिश मी अध्ध्या त्रितालात बांधली आहे. तात्या अभ्यंकरांनी धनश्रीच्या शब्दांना चाल कशी लावली आहे तेही सांगा हो! :)

ऐका ही बंदिश -




सजधज रंगत झुमे ब्रिजवा
नंदसुत खेलत होरी संगवा..

ठुमकत नाचत आवत गिरिधर..
लुपतछुपत सब गोपी राधा.
बिनती करत अब,
छेडो ना मनवा, छोडोरी संगवा, डारो ना रंगवा,
पीत, हरीत, नील, धुमल, पाटल.


क्या बात है, धनश्रीने किती सुंदर शब्द लिहिले आहेत! डोळ्यासमोर बृजवासात होळीची धमाल सुरू आहे, नंदसुत कन्हैय्या गोपींसमवेत होळी खेळत आहे, छेडखानी करत आहे असं चित्र उभं राहतं. 'नंदसुत' हा शब्द मला अतिशय आवडला. 'झुमे' शब्दावरल्या पंचमाचे आणि 'खेलत' या शब्दातल्या शुद्ध गंधाराचे सौंदर्य पाहा.

'ठुमकत नाचत आवत गिरिधर'!

'ठुमकत नाचत'! किती छान शब्द आहेत हे! 'आवत गिरिधर' मधली वरदाच्या आवाजातली तार सप्तकातील गंधारापर्यंतची सहजता पाहा! ठुमकत, नाचत येणार्‍या गिरिधराला पाहून धनश्री पुढे लिहिते,


'लुपत छुपत सब गोपी राधा!'

'क्या बात है.... त्या सगळ्या गोपी कृष्णाला लाडिकपणे विनवत आहेत, की बाबारे आमच्यावर उगाच रंगांची उधळण करू नकोस! (म्हणजे खरं तर उधळण कर! :)

कुठले रंग?


'पीत, हरित, नील, धुमल, पाटल!...:)

वरदाने किती सुंदर तर्‍हेने या सगळ्या रंगांची नावं गायली आहेत!

मंडळी, धनश्रीची ही बंदिश म्हणजे केवळ रंगांचीच उधळण नव्हे तर यमनच्या स्वरांचीदेखील उधळण आहे! रचनाकार आमची धनश्री असो, वा कविकुलगुरू कालिदास असो, वा अगदी माडगुळ्याचे महाराष्ट्र वाल्मिकी असोत, आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतामध्ये कुठल्याही रचनेला सामावून घ्यायची ताकद आहे हेच खरं!

असो, मंडळी तात्या अभ्यंकरांचं हे कॉम्पोझिशन आपल्याला कसं वाटलं ते ऐकून अभिप्राय द्या बरं का! :)


=====================================================================================

त्यानंतर प्रात्यक्षिकादाखल आम्ही पं यशवंतबुवा महाले यांची एक बंदिश घेतली होती. तिचे शब्द आहेत,


जियरा नही माने,
उनबिन, जियरा नही माने...
कैसे कटे अब घडी पलछिन दिन

कासे कहू अब
जियाकी बिथा मोरी
चैन नाही मोहे, उनके दरस बिन..


ऐका ही बंदिश -



मंडळी, पं यशवंतबुवा महाले हे आग्रा परंपरेतलेच. अण्णासाहेब रातंजनकरांचे शिष्य. पण महालेबुवांचा परिचय एवढ्या दोन ओळीतच पुरा होत नाही, होणार नाही. महालेबुवांवर एक विस्तृत लेखच मी लिहिणार आहे. गाण्यातला खूप मोठा माणूस. आमच्या महालेकाकूही उत्तम गाणार्‍या. पं गजाननबुवा जोश्यांच्या शिष्या. महालेबुवांचं आणि काकूंचं मला खूप प्रेम लाभलं हे माझं भाग्य!

महालेबुवा एकदा राजधानी एक्सप्रेसने दिल्लीला चालले होते तेव्हा त्याना ही बंदिश सुचली. राजधानीने द्रुत लयीत अगदी सुरेखसा ठेका पकडला असणार आणि महालेबुवांनी अगदी बिनचूकपणे ती लय पकडली असणार असंच ही बंदिश ऐकताना वाटतं! अश्या वेळेस 'गाडीची लय म्हणजे 'कशासाठी पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी!' असं भाईकाका म्हणतात ते पटतं! :)


'जियरा नही माने..'

बंदिशीचा मुखडा तानेतला आहे. 'जियरा' शब्दावर बोलतान असून तिचं समेवर विसर्जन होतं! मंडळी, मुखड्यात तान असलेल्या बंदिशींचं सौंदर्यच वेगळं!

'कैसे कटे अब, घडी पलछिन दिन'

'कैसे कटे अब' मधल्या 'कैसे' तला फर्म पंचम आणि 'कटे' तला छानसा शुद्धमध्यम! या बंदिशीची अस्थाई ऐकताना असं वाटतं की 'जियरा'च्या तानेतल्या मुखड्यानंतर ही बंदिश 'कैसे कटे अब' च्या फलाटावर आमच्या शुद्धमध्यमाला गाडीत चढू देण्याकरता क्षणभर विसावली आहे! :) पण अगदी क्षणभरच बरं का! त्यानंतर लगेच समेला ऑफबिट पकडून 'घडी पलछिन दिन, जियरा नही माने' असं म्हणत बंदिशीतल्या राजधानीने पुन्हा आपली मूळ लय पकडली असावी!

'कासे कहू अब, जिया की बिथा मोरी' मधला तार षड्ज फारच सुरेख. 'चैन नाही मोहे' मधली अस्वस्थता पुढे 'उनके दरस बिन..'मधून फारच उत्तम रितीने अभिव्यक्त होते आणि त्याला जोडूनच गाडी पुन्हा 'जियरा नही माने..' या तानेतल्या मुखड्यावर येते! क्या केहेने..!

खरंच मंडळी, गाण्याकडे आपण जसं पाहू तसं आपल्याला गाणं दिसतं! फक्त गाण्याकडे पाहण्याची नजर हवी! आणि ती नजर बुजूर्ग कलाकारांना ऐकूनच मिळते, सतत गाण्यात राहूनच मिळते, गाण्यावर विचार करूनच मिळते! महालेबुवांनी किती सुरेख बंदिश बांधली आहे आणि वरदानेही ती तेवढीच छान गायली आहे. सध्या वरदाला महालेबुवांचीच तालीम मिळत आहे.

=====================================================================================

And now, Last but not the least...


सुगम रूप सुहावे, सलोने
माई, सुगम रूप सुहावे..
जलक ज्योत चित चोरत नित
सखिया संग मिल गाओ, रिझाओ
माई सुगम रूप सुहावे

जो देखेत चित, सोहिरी झरत
बिन देखे अमर, जिया आकुलावे,
माई सुगम रूप सुहावे....


मंडळी, ऐका ही भेंडीबाजार घराण्यातली पारंपारिक बंदिश!



इस बंदिश के बारेमे क्या केहेने! माझी ही अत्यंत आवडती बंदिश आहे. या बंदिशीचा मूड किती सुरेख आहे बघा! क्या बात है..

मंडळी, राग जरी एकच असला तरी त्यातल्या वेगवेगळ्या बंदिशींमुळे त्याच रागाच्या विविध छटा आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक बंदिशीचा एक मूड असतो, एक स्वभाव असतो हेच मी या लेखातून सांगायचा प्रयत्न केला आहे. आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातील 'आग्रा गायकी' म्हणजे बंदिशींचा खजिनाच. भातखंडेबुवा, रातंजनकरबुवा, जगन्नाथबुवा, कायकिणीबुवा, गिंडेबुवा अश्या एकापेक्षा एक दिग्गजांच्या बंदिशींमुळे आग्रा गायकी समृद्ध झाली आहे, संपन्न झाली आहे.

बंदिशींमधली ही विविधता पाहिली की 'हम राग नही, बंदिश गाते है' असं आग्रावाली मंडळी नेहमी म्हणतात ते पटतं. वर आपण दिनकररावांच्या 'मतवारी आज मै..' मधला प्रासदिकपणा पाहिला, 'सजधज रंगत झुमे ब्रिजवा' मध्ये वृंदावनातली होळी अनुभवली, 'जियरा नही माने..' मधली अस्वस्थता, ओढ पाहिली. त्याचप्रमाणे 'सुगर रूप सुहावे..' मधल्या अनामिक ओढीवर मला तरी जान निछावर कराविशी वाटते!

जेव्हा जेव्हा मी ही बंदिश ऐकतो तेव्हा तेव्हा एका निवांत अश्या एखाद्या फार्महाऊसवरची सुंदर संध्याकाळ माझ्या डोळ्यासमोर येते. तिन्ही सांजांची वेळही उलटली आहे. बाहेरच्या लॉनवरच खुर्ची टाकून मंद दिव्याच्या प्रकाशात आपण बसलो आहोत, समोर जीव ओवाळून टाकावा अशी लावण्यवती बसली आहे. समोरच्या प्याल्यातली ग्लेनफिडिच मला म्हणते आहे,

'अरे तात्या, तुझ्या समोर बसलेली लावण्यवती जेवढी सुरेख आहे, तेवढीच मीही सुरेख सोनेरी आहे रे! माझं माहेर स्कॉटलंड! तेथील मावळतीने मला हा सोनेरी रंग बहाल केला आहे! मला ऑन द रॉक्सच पी, त्यात सोडा किंवा पाणी टाकून माझी सोनेरी छटा, माझं 'स्कॉचपण' गढूळ नको करूस रे! :)

'सुगम रूप सुहावे..' या बंदिशीतल्या मध्यलयाची चैन जिवाला वेड लावते. या बंदिशिचा मूड थोडासा गझलेकडे झुकणारा आहे. पतियाळा, भेंडिबाजार गायकीचा खास बाज या बंदिशिला आहे. या बंदिशीचा नुसता अस्थाई-अंतरा मांडणं देखील वाटतं एवढं सोपं नाही. परंतु वरदाने मात्र ही बंदिश चांगलीच मांडली आहे. किराणा, पतियाळा गायकीचे बुजूर्ग कलाकार पं अजय पोहनकर ही बंदिश अतिशय सुरेख गातात. वरदालादेखील काही काळ पोहनकरांची तालीम मिळाली असल्यामुळे त्यांचाकडून तिने ह्या बंदिशींचे विधिवत शिक्षण घेतले आहे!

'रंजिश ही सही..' चा जो मूड आहे ना, तोच या बंदिशीचा मूड आहे. 'सुहावे' हा शब्द काय ठेवलाय! वा वा! 'सलोने माई' मधल्या पंचमाचा, रिषभाचा आणि गंधाराचा आपापसातला समजूतदारपणा पाहा! मंडळी, माणसं जर एकमेकांशी या स्वरांप्रमाणे समजुतदारपणे वागू लागली तर अजून काय पाहिजे?

जाऊ द्या मंडळी, या बंदिशीबद्दल किती लिहू आणि किती नको! आणि कितीही लिहिलं तरी ते कमीच पडणार आहे! या बंदिशीच्या सौंदर्यापुढे माझं शब्दसामर्थ्य अगदीच तोकडं आहे!

असो..

तर असा एकंदरीत हा बंदिशींच्या दुनियेतला प्रवास.. आपलं रागसंगीत आणि त्यातल्या बंदिशी हा कधीही न संपणारा एक अनमोल खजिना! ऐकणार्‍याने अगदी मनसोक्त ऐकत रहावं, बंदिशींच्या माध्यमातून रागांचे विविध रंग न्याहाळावेत, अनुभवावेत..!

मंडळी, या बंदिशींच्या दुनियेतला, रागसंगीताच्या दुनियेतला मी एक आनंदयात्री! काही प्रमाणात आपल्या सारख्या रसिकांनाही ही आनंदयात्रा घडावी याच हेतूने हा लेख लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे. परंतु एकंदरीतच गाणं ही अनुभवायची गोष्ट आहे हेच खरं! कारण जिथे शब्द संपतात, तिथे सूर सुरू होतात! ह्या बंदिशी मला जश्या दिसल्या ते मी शब्दात मांडायचा प्रयत्न केला आहे. माझे शब्द आपल्याला कदचित आवडतील, न आवडतील. परंतु ह्या बंदिशी मात्र ऐकून कश्या वाटल्या हे अगदी अवश्य सांगा!

आपलाच,
(गाण्यातला!) तात्या अभ्यंकर.

December 20, 2007

मेरे मन ये बता दे तू...

राम राम मंडळी,

'मेरे मन ये बता दे तू..मितवा' या गाण्यातली मला दिसलेली सांगितिक सौंदर्यस्थळे सांगण्याचा हा एक प्रयत्न!




'मेरे मन ये बता दे तू
किस ओर चला है तू..'


'मेरे' तल्या शुद्ध गंधाराने श्रीगणेशा. 'मन', 'ये' चा पंचमावरील सुरेख ठेहेराव. 'ये बता' मधली 'पसां' संगती गाण्यातला स्वाभाविक 'षड्ज-पंचम' भाव दाखवते. 'बता' या अक्षरांनी तार षड्जापाशी केलेले मंजूळ knocking! या ठिकाणी लयीचा फार नाजूक टच जाणवतो आणि अक्षरशः सुखावून जातो. क्या बात है..

'दे' वरील पंचम व 'तू' वरील शुद्ध धैवत यांची कानाला अत्यंत गोड लागणारी 'पध' ही संगती. याच संगतीमुळे 'मेरे मन ये बता दे तू' मधला 'दे तू' कमालीचा गोड आणि लोभसवाणा वाटतो! शिवाय 'पध' ही आरोही संगती 'मेरे मन ये बता दे तू' या वाक्याचा उत्तरार्ध कायम ठेवते आणि श्रोत्यांना, आता पुढे काय ? अशी उत्सुकता लावते! ;)

'किस ओर चला है तू' हे त्याचं उत्तर लगेचंच मिळतं! फक्त इथे 'है तू' तली 'पप' ही संगती आणि तिच्यातील इनबिल्ट पंचमावरील न्यास ह्या गोष्टी पूर्वीच्या 'दे तू' तल्या 'पध' संगतीसारखी श्रोत्यांची उत्सुकता अधिक ताणून न धरता श्रोत्यांचे समाधान करतात! विशेषत: 'चला' या शब्दावरील जागा फारच सुरेख आणि तरल आहे. क्या बात है.. ;)

'मेरे मन ये बता दे तू
किस ओर चला है तू.. '

वा! किती गोडवा आणि हळवेपणा आहे या ओळींत! साला ऐकूनच दिल खुष होतो. आता पुढच्या ओळी पाहू..

'क्या पाया नही तूने,क्या ढुंड रहा है तू'

वा, किती साधे पण सुंदर शब्द आहेत! सरगम बरीचशी वरच्यासारखीच. तोच 'पध' आणि 'पप' चा संवाद. एक महत्वाचा फरक असा की 'क्या पाया नही तूने' मधली 'नही' ही तार सप्तकातल्या शुद्ध रिषभावरून तार षड्जावर स्थिरावलेली 'रेंसा' ही संगती आहे. 'नही' तल्या 'ही' या अक्षरावरचा बेहलावा ऐका काय सुरेख आहे! मस्त वाटतं ऐकायला..

'क्या ढुंड रहा है तू' मधला 'है' ही असाच सुखावह आहे! आणि त्यानंतर किंचितसा ऑफबीट टाकलेला 'तू'! वा..

मंडळी, खूप मजा येते हे गाणं ऐकतांना. हा लेख ज्यांना थोडीफार स्वरांची, लयीची ओळख आहे त्यांना अधिक चांगल्या रितीने समजू शकेल असे वाटते! अर्थात, ज्यांना स्वर समजत नाहीत त्यांचंही काहीच अडत नाही. कारण गाणं हे भावल्याशी कारण व हृदयाला भिडल्याशी कारण! ;)

पुढे जाऊया!

'जो है अनकही, जो है अनसुनी,वो बात क्या है बता...'

यातल्या 'वो बात क्या है बता' मध्ये पहा कसा एक एक स्वर ठेवला आहे! 'वो', 'क्या' आणि 'बता' तल्या 'ता' वर धीम्या केरव्यातल्या समेची कशी छान टाळी येते पहा. मस्त...!

आगे बढेंगे!

'मितवा....कहे धडकने तुझसे क्या!'

मंडळी, 'वो बात क्या है बता...' या ओळीनंतर हे गाणं 'पनीसां' ही संगती घेऊन डायरेक्ट तार षड्जाला अनपेक्षितपणे भिडतं! एकदम वळण घेतं. इतका वेळ सुरातल्या सुरात डुंबणारं हे गाणं ताल तोच असला तरी लयीच्या दुगुनचौगुन मध्ये शिरतं! तालाच्या एका छानश्या लयबद्ध पकडीत जातं! क्या बात है मंडळी, खरंच क्या बात है! शंकर महादेवनसारखा विलक्षण प्रतिभावान कलावंत आपल्याला लाभला ही मी अत्यंत भाग्याची गोष्ट समजतो!

दिल्ली स्थानकाला भले १० फलाट असतील. १० नंबरच्या फलाटाहून मुंबईकडे येणारी पंजाबमेल सुटते. दिल्ली स्थानकाबाहेर पडते. दिल्ली स्थानका बाहेरही रुळांची गर्दी असते. त्यातून एक एक रूळ बदलत, ओलांडत अखेर ती मुंबईकडे जाणार्‍या ठाराविक रुळावर येते आणि मग एका लयबद्ध रितीने धावू लागते. या गाण्यातल्या मितवावरही थोडंफार असंच होतं बरं का मंडळी! ;)

'मेरे मन ये बता दे तू, किस ओर चला है तू.. '
'क्या पाया नही तूने,क्या ढुंड रहा है तू'
'जो है अनकही, जो है अनसुनी,वो बात क्या है बता...'

या छानपैकी गुणगुणाव्याश्या वाटणार्‍या ओळी ओलांडून गाठलेला,

'मितवा....कहे धडकने तुझसे क्या!' हा टप्पा खासच! ;)

आणि मग पुन्हा वरील सर्व ओळी आणि मितवा हे सगळं एकाच लयीत धावू लागतं.

'मितवा....कहे धडकने तुझसे क्या,मितवा....ये खुदसे ना तू छुपा'

बाकी 'मितवा' हा शब्द सुरेखच आहे! का माहीत नाही, पण हा शब्द कानी पडला की एकदम आपलेपणा वाटतो. 'मितवा'वरच्या चार आवर्तनांच्या तार षड्जावरच्या ठेहेरावानंतर 'कहे धडकन' मधल्या 'कहे' तल्या 'हे' वर इतकावेळ पिक्चर मध्ये नसलेला कोमल निषाद अचानक प्रवेश करतो आणि या गाण्याला एक वेगळंच फिलिंग येतंम् एक वेगळाच टच येतो. खरंच मंडळी, स्वरांची जादू काही औरच! क्या बात है..

'मितवा' तल्या 'वा' वर घेतलेल्या आकारच्या जागाही सुरेख आहेत. सरगमही छान केली आहे. गाणं लिहिलंही उत्तम आहे. त्याचा अर्थ मनाला भिडतो. गाण्यातल्या दोन कडव्यांमधले टाकलेले सांगितिक तुकडे आणि त्याचं ऍरेंजिंगही मस्त आहे. मंडळी, गाण्याचं ऍरेंजिंग हेदेखील संगीत दिग्दर्शनाइतकंच महत्वाचं असतं तरच चालीचा परिणाम उत्तमरीत्या साधला जाऊ शकतो. एकंदरीतच या गाण्याची भट्टी मस्तच जमली आहे हे निर्विवाद!

शाहरुख आणि राणीवर चित्रित झालेलं हे गीत. आमची राणी बाकी काय छान दिसते हो, क्या बात है! आपंण तर साला तिच्या प्रेमातच आहोत!

श्शश्श शाहरुख हा प्राणीदेखील आपल्याला आवडतो. तसा टॅलेंटेड आहे! :)

शंकर महादेवन जेव्हा सरगम गातो तेव्हा बाकी राणी मस्तच नाचली आहे हो! वा..! शंकरने सरगम छानच गायली आहे!

जीवन डगर मे, प्रेम नगर मे
आया नजर मे जबसे कोई है,
तू सोचता है, तू पुछता है
जिसकी कमी थी, क्या ये वही है?

राणीकडे पाहता पाहता मितवाचा हा स्वतःच्या मनाशीच चाललेला संवाद सुंदर आहे. जिसकी कमी थी, क्या है वही है? या प्रश्नाचं उत्तर मितवा लगेचंच देतो..

हा ये वही है, हा ये वही है
तू इक प्यासा, और ये नदी है

मग? :)

काहे नही इसको तू खुलके बता?..

अरे भाई, अगर छोकरी अच्छी लगती है तो बोल दे ना बॉस!

काहे नही, इसको तू, खुलके बता या सर्वांमधला ऑफबिट छानच टाकला आहे!

अरे बाबा माझ्या मितवा, मनोगता,

ये जो है अनकही, हो है अनसुनी
वो बात क्या है बता, मितवा....

मेरे मन ये बता दे तू,
किस और चला है तू
क्या पाया नही तुने,
क्या ढुंड रहा है तू..

बा माझिया मना, सांगून टाक एकदा तू नक्की कुठे चालला आहेस? तुला काय हवं आहे अन् तू काय शोधतो आहेस :)

मस्त गाणं आहे! गाण्याचं चित्रिकरण आणि लोकेशनस् ही छान आहेत. हिंदी चित्रपटांत अशी छान छान गाणी यापुढेही यावीत हीच इच्छा!

असो! मंडळी सध्या इथेच थांबतो. माझं हे खूप आवडतं गाणं आहे म्हणून यातल्या काही गोष्टी आपल्याशी शेअर कराव्याश्या वाटल्या.

हा लेख मी माझा मित्र राजीव देसाई याला समर्पित करत आहे. छ्या! कधी कधी ही NRI लोकं खूप त्रास देतात. राजीव आता लंडनला असतो. अलिकडेच नोकरीधंद्यानिमित्त बदली होऊन तिकडे गेला. मुंबईत होता तेव्हा नेहमी मला आग्रहाने घरी बोलवायचा. 'ये रे तात्या, काय भाव खातो? मस्तपैकी गप्पा मारू ' असं त्याने अक्षरशः अनेकदा बोलावलं असेल! पण कामाच्या व्यापात मलाच त्याच्याकडे कधी जायला जमलं नाही. किंबहुना मी गेलो नाही असं म्हणूया!
का माहीत नाही, पण आज अचानक राजीवची खूप आठवण झाली. त्याला खरंच आज मी खूप मिस करतोय! आज संध्याकाळी राजीवकडे जांण्यासाठी खरं तर वेळही होता. भरपूर गप्पा मारल्या असत्या त्याच्याशी आणि उर्मिलाशी! पण आता राजीवच मुंबईत नाही! त्याने १० वेळा प्रेमाने बोलावलंन तेव्हा गेलो नाही, आता वाटून काय उपयोग? ;)

शेवटी माणसं जपली पाहिजेत हेच खरं. गाणं तरी माणसाला अजून वेगळं काय शिकवतं?!

पुन्हा एकदा,

'मेरे मन ये बता दे तू
किस ओर चला है तू.. '

या दोन ओळी गुणगुणतो आणि हा लेख संपवतो! ;)

आपलाच,
तात्या मितवा! :)

December 17, 2007

खूप काही हरवलं आहे!

राम राम मंडळी,

आज बर्‍याच दिवसांनी सुमन कल्याणपुरांचं एक भावगीत कानी पडलं आणि मी खूप वर्ष मागे गेलो.

कुठलं होतं ते भावगीत?

'केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर!'

अगदी साधंसुधंच परंतु हृदयाला हात घालणारं असं हे भावगीत! पूर्वी आकाशावाणी मुंबई 'ब' नांवाचा एक प्रकार होता. त्यावर कामगारविश्व, आपली गाणी, इत्यादी कार्यक्रमात अशी भावगीतं लागायची हे मला आठवतंय. खूप सुख वाटायचं ही गाणी ऐकताना. साधारणपणे ८०-८५ चा तो काळ असेल! किंवा त्याही आधीचा. साधारणपणे ७५ ते ८५ चं दशक असावं. तेव्हा दूरदर्शनचं आगमन झालं होतं. पण आकाशवाणी मुंबई 'ब' चा तेव्हा बराच प्रभाव होता एवढं मला आठवतंय. माझ्या शालेय काळातील ही सगळी वर्ष. दुपारी काहीतरी बारा-साडेबाराची शाळा असे. अकरा वाजता कामगारविश्वातील गाणी लागली की हळूहळू शाळेचं दप्तर वगैरे भरायला लागायचं. मग त्यानंतर काय असेल ते पोळीभाजीचं साधंसुधं जेवण आणि नंतर गणवेष घालून शाळेत जाणे!

दोन तीन वर्ष आमची शाळा सकाळची होती. तेव्हा सकाळी ६ वाजता आमची आई आकाशवाणी मुंबई ब सुरू करायची. मला आठवतंय, अण्णांचे माझे माहेर पंढरी, पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा हे अभंग हमखास कानावर पडायचे. सकाळी सातच्या बातम्यात 'सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत' म्हणून बातम्या सांगणार्‍या कुणी बाई यायच्या. त्यांचा तो आवाज इतका फॅमिलियर झाला होता की सुधा नरवणे आपल्या घरातल्याच कुणीतरी वाटत! :) अलिकडे मी रेडियो लावतो पण मला तो आपलासा नाही वाटत! काय रेडियो मिर्ची काय, नी काय काय! त्यातल्या उठवळ निवेदकांची ना धड हिंदी, ना धड विंग्रजी अशी अखंड बडबड! काय म्हणतात बरं त्यांना? व्ही जे की टीजे असलं काहीतरी म्हणतात! मला या शब्दांचे अर्थही अजून माहीत नाहीत. त्या मानाने आमच्या सुधा नरवणे मला खूप आपल्या वाटायच्या, घरातल्या वाटायच्या! इतक्या की त्यांनी कधी चुकून त्यांच्या खणखणीत आवाजात 'सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत' असं रेडियोतून म्हणायच्या ऐवजी, 'अभ्यासाला बस पाहू आता' असं जरी म्हटलं असतं तरी ते मला वेगळं वाटलं नसतं! :)

कुठे गेली ही सगळी मंडळी? सकाळी कामगार विश्वात ज्वारी, बाजरीचे आणि कुठले कुठले बाजारभाव सांगत. त्यात नंदूरबारचा उल्लेख हमखास असायचा! इतका, की ते कधीही न पाहिलेलं नंदूरबारदेखील मला खूप आपलसं वाटायचं! :)

साला खूप साधा काळ होता तो! केतकीच्या वनी तिथे.. या गाण्याइतकाच साधा! तिन्ही सांजा सखे मिळाल्या, प्रिया आज माझी, स्वर आले दुरूनी, तुझे गीत गाण्यासाठी, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, पाहुनी रघुनंदन सावळा, हृदयी जागा तू अनुरागा, श्रावणात घन निळा बरसला, नाविका रे, मृदुल करांनी छेडित, अशी अनेक एकापेक्षा एक गोड गाणी तेव्हा कानावर पडायची.

आजुबाजूची माणसंदेखील तेव्हा खूप साधी होती. देशीच होती, ग्लोबल झाली नव्हती! मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यात आपुलकीची उठबस असायची. कुणीही कुणाकडे पटकन उठून जाऊ शकत होती. हल्लीसारखं आधी फोन करून यायची पद्धत तेव्हा विकसित झाली नव्हती! किंबहुना, प्रत्येक कुटुंबातील प्रायव्हसी तेव्हा थोडी जास्त उदारमरवादी होती असं आपण म्हणू हवं तर! आणि जळ्ळे बोंबलायला तेव्हा एवढे घरोघरी फोन तरी कुठे होते? एका कुटुंबातली चार माणसं पटकन उठून कुणाकडे गेली तरी, "अरे वा वा! या या" असंच हसतमुखाने स्वागत व्हायचं! लगेच जेवायची वगैरे बाहेर ऑर्डर दिली जात नसे. ८-१० माणसांचा आमटीभात, पाचपंचवीस पोळ्या, गोडाचा शिरा तेव्हा आमच्या आया-मावश्या सहज करू शकत होत्या. सोबतीला पापड, कुर्डया, सांडगी मिरची तळली जायची, साधी कांदाटोमॅटोचीच, पण वर फोडणी वगैरे दिलेली झकास कोशिंबिर केली जायची! सगळी मंडळी हसतमुखाने, मोकळेपणाने जेवायची, अगदी यथास्थित गप्पाटप्पा व्हायच्या !

यजमानांच्या मनात, 'काय यांना काही मॅनर्स वगैरे आहेत की नाही? न कळवता जेवायला आले?' असा विचार यायचा काळ नव्हता तो!

पटकन, 'आमचा अमूक काका ना, तो फार पैसेवाला आहे बुवा, किंवा तमूक नातेवाईक ना, तो तर काय करोडपती आहे!' अशी आजच्या इतकी सर्रास भाषा लोकांच्या तोंडी असलेली मला तरी आठवत नाही. समोरच्या माणसाला पैशावरून लहानमोठा ठरवायची पद्धत आजच्या इतकी तरी नक्कीच विकसित झाली नव्हती!

कुणी कुणाकडे पाच-पंचवीस हजार रुपये मागितले तर एक तर दिले जात किंवा न दिले जात, तो भाग वेगळा, परंतु त्या नकारातदेखील पैसे नसत म्हणून नकार दिला जाई. समोरचा माणूस परत देईल की नाही, किंवा च्यामारी कशाला फुक्कट याला मदत करा? पुन्हा मागायला आला तर? हा संशय त्या नकारात नसे! कुठेतरी माणसामाणसातली माणूसकी, आपुलकी जागी होती असं वाटतं!

हे सगळं लेखन खरं तर एखाद्याला खूप ऍबस्ट्रॅक्ट वाटेल किंवा असंबद्धही वाटेल, हे मी नाकारत नाही. पण 'केतकीच्या वनी तिथे' मधला एकंदरीतच जो साधेपणा आणि सात्विकपणा आहे ना, तो आज तरी मला खूप हरवल्यासारखा वाटतो. आपल्याला माहित्ये, की एखादं गाणं हे बर्‍याचदा एखादा प्रसंग, एखाद्या व्यक्तिशी निगडीत असतं. ते ते गाणं लागलं की माणसाला त्या गाण्याशी निगडीत असलेल्या गोष्टी आपोआप आठवायला लागतात. मी वर उल्लेख केलेली जी गाणी आहेत ना, ती सगळी गाणी मला केवळ एखादी व्यक्ति किंवा एखादा प्रसंगच नव्हे, तर संपूर्ण एका ठराविक काळाची आठवण करून देतात! कारण एका ठराविक काळात ही गाणी वारंवार कानावर पडायची. आणि तेच सगळं मी शब्दात मांडायचा वेडा प्रयत्न करतो आहे! :)

साला आज सगळीकडे पाहतो तर काय चाल्लंय हे माझं मलाच समजत नाही. कुणाला कुणाकडे बघायला वेळ नाही. मॉल, मल्टिप्लेक्स, हे शब्द हल्ली वारंवार कानावर पडतात परंतु मला ते अजूनही अपरिचित वाटतात, आपले वाटत नाहीत! अहो कसला आलाय मॉलफॉल? वाण्याकडून दीड दोन रुपायाला नारळाची वाटी विकत आणणारा मी! महिन्याचं सामान यादी करून वाण्याकडून मांडून आणायचं. म्हणजे वाणी ते सामान घरी आणून देत असे. पण मांडूनच! त्याचे पैसे मागाहून दिले जात. त्याला 'मांडून आणणे' असं म्हणत असत! :)

हल्लीच्या मॉल संस्कृतीमध्ये, साला आमचा 'मांडून आणणे' हा वाक्प्रचारच नाहीसा झाला! रोकडा, किंवा क्रेडिट अथवा डेबिट कार्ड असल्याशिवाय मॉलवाले उभे करतील का? :) पण आमचा वाणी मात्र बापडा आठ आठ दिवस देखील थांबायचा हो! पैशांची गरज त्यालाही असे, नाही असं नाही.

पण त्या मांडून आणण्यातली गरीबी आता कुठे दिसत नाही हे मात्र खरं! चांगलंच आहे ते म्हणा..!

आणि कसलं तुमचं ते डोंबलाचं मल्टिप्लेक्स हो? दिवार, जंजीर, त्रिशूल यासारखे सिनेमे पाच दहा रुपायात आमच्या ठाण्याच्या मल्हार किंवा आराधना सिनेमागृहात पाहायला मिळायचे! त्यात सुद्धा शनिवार किंवा रविवारी शिणेमा पाहायचा असेल तर मंङळवार बुधवार पासूनच ऍडव्हान्स बुकिंग करावं लागे. आता काय, दूरदर्शन सुरू केले की कुठेना कुठे सिनेमे सुरूच असतात! पण त्यात 'आम्हाला डॉनची रविवारी दुपारी ३ च्या शोची तिकिटं मिळाली बरं का!' हे सांगण्यातला जो काय एक आनंद होता ना, तो आता मिळत नाही! :)

दूरदर्शनदेखील किती घरगुती होतं, आपलं होतं! संध्याकाळी सहा ते दहा-साडेदहा! त्यात गुरुवारी छायागीत, शनिवारी मराठी शिणेमा आणि रविवारी हिंदी शिणेमा! आणि रविवार सकाळची साप्ताहिकी! ही साप्ताहिकी बघायला मात्र मजा यायची! ती पाहिल्यावर मग ठरायचं की येत्या आठवड्यात काय काय पाहण्यासारखं आहे? कुठले कुठले चांगले कार्यक्रम आहेत ते! तेव्हा दूरदर्शन वरील कार्यक्रमसुद्धा किती चांगले असत! विनायक चासकर, विनय आपटे, सुहासिनी मुळगावकरांसारखे लोक अतिशय उत्तमोत्तम कार्यक्रम द्यायचे! सुहासिनीबाईंचा गजरा हा कार्यक्रम तर खूपच चांगला असे. बबन प्रभू, याकूब सईद सारखी गुणी लोकं खूप चांगले कार्यक्रम करायची, नाटकं करायची. साडेसातच्या बातम्यातली अनंत भावे, प्रदीप भिडे, ही मंडळी खूप आपलीशी वाटायची! 'फिल्मस डिव्हिजन की भेंट' नावाचा एक अतिशय सुरेख कार्यक्रम लागायचा. त्यातला तो भाई भगतांचा ठराविक आवाज! जाम मजा यायची तो भाई भगतांचा आवाज ऐकायला! :)

असो! मी इथे हे जे काही बरळतोय त्याचा संदर्भ आपल्यापैकी किती वाचकांना लागेल हे मला माहिती नाही! :)

आज साला मी डी डी सह्याद्री बघतो तर मला काहीच बघावंसं वाटत नाही. बघावं तेव्हा सारख्या कुठल्या ना कुठल्या गाण्याच्या स्पर्धा, 'मला प्लीज प्लीज प्लीज एसेमेस करा सांगणारे रोज कुत्र्यांच्या छत्र्यांसारखे उगवणारे ते गाणारे स्पर्धक, मग त्यातला एक कोण तरी अजिंक्यतारा किंवा इंडियन आयडॉल होणार, बाकीचे स्पर्धक रडणार, प्रेक्षकात बसलेले त्यांचे आईवडील रडणार! छ्या.. सगळाच उठवळपणा तिच्यायला! माझ्यासारख्या जुनाट माणसाला ह्यतलं काहीच पटत नाही बुवा!

असो! जे काही मनात आलं ते भरभरून लिहावसं वाटलं! हल्ली 'गारवा नवा नवा' किंवा 'ऐका दाजिबा' ह्या गाण्यांचा काळ आहे. नाही, नसतीलही हो ही गाणी वाईट! पण मला मात्र त्यातला 'गारवा नवा नवा' नाही सोसत!

त्यापेक्षा 'केतकीची वनी तिथे नाचला गं मोर' या गाण्याची उबच मला पुरेशी आहे, अद्याप पुरत आहे!

--तात्या अभ्यंकर.

हाच लेख इथेही वाचावयास मिळेल!

December 14, 2007

शब्द आणि स्वर, वक्ता आणि गवई! ..१

राम राम मंडळी,

ख्याल गायन, ज्याला 'ख़याल गायन' असेही म्हटले जाते हे आपल्या भारतीय अभिजात संगीताचं, विशेष करून हिंदुस्थानी रागदारी संगीताचं एक प्रमूख अंग आहे. मैफलीत गाताना गवयाकडून ख़याल (यापुढे ख्याल) गायला जातो, तसाच तो श्रोत्यांकडून ऐकलाही जातो. आता ख्याल किंवा ख़याल म्हणजे विचार. 'आपका क्या ख़याल है', किंवा 'आपका क्या विचार है' हे संवाद आपण नेहमी ऐकतो. मग मंडळी, आता दोन मुख्य प्रश्न असे पडतात की,

१) अभिजात संगीतातला 'ख्याल' म्हणजे काय?
२) आणि जर तो 'ख्याल' असेल तर तो कसा मांडतात? आणि तो व्यक्त करण्याची माध्यमं जरी वेगवेगळी असली (भाषण/वक्तव्य आणि गाणं!) तरीही त्यात काय साम्य आहे किंवा काय फरक आहे?

'वा! काय सुंदर विचार मांडले आहेत!' असं आपण एखाद्या उत्तम वक्त्याचं भाषण ऐकून अगदी सहजच म्हणतो, त्याचप्रमाणे अभिजात संगीताच्या क्षेत्रात देखील 'किशोरीताईंचा ख्याल ना?, वा! ताई काय सुंदर आणि वेगळेच विचार मांडतात!' असंही आपण म्हणतो.

लोकगीत, भावगीत, नाट्यगीत इत्यादी गायनप्रकार जेवढ्या प्रमाणात ऐकले जातात त्या तुलनेत ख्यालगायन ऐकलं जात नाही असं माझं निरिक्षण आहे. त्यामुळे मला कल्पना आहे की हा लेख वाचणारा प्रत्येकच वाचक काही ख्यालगायन ऐकणारा असेल असे नाही. परंतु प्रत्यक्ष जरी कधी मैफलीत बसून ख्यालगायन ऐकले नसले आपल्यापैकी अनेकांच्या कानांवरून 'ख्यालगायन' हा शब्द निश्चितच गेला असावा!

तर मंडळी, 'वक्तृत्वातील ख्याल' आंणि गायनातील ख्याल' यात काय साम्य आहे (बरचंसं साम्यच आहे,) आणि काय फरक आहे हे या लेखातून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. इथे मी 'वक्ता' म्हणजे 'उत्तम वक्ता' (जो दहा हजारात एक असतो असं काहीसं संस्कृत मध्ये म्हणतात तसा!) आणि ख्यालगायक म्हणजे 'उत्तम ख्यालगायक' हे गृहीत धरूनच लिहिणार आहे एवढं आपण कृपया लक्षात घ्या. मला सर्वच नसली, तरी उत्तम वक्त्याची आणि उत्तम ख्यालगायकाची काही लक्षणे माहिती आहेत, त्याचाच आधार मी घेणार आहे.

एखादा वक्ता जेव्हा बोलत असतो तेव्हा 'शब्द' हे त्याचं माध्यम असतं. मैफलीमध्ये एखादा वक्ता जेव्हा गात असतो तेव्हा अर्थातच 'सूर' किंवा 'स्वर' हे त्याचं माध्यम असतं. इथे एक महत्वाचा फरक लक्षात घ्या की शब्द हे सगुणरूप घेऊन श्रोत्यांपुढे येतात तर ख्यालगायनातल्या आलापीचे, लयकारीचे, तानेतले, मंद्र-मध्य-तार सप्तकातले स्वर हे निर्गुणरुपी असतात! ते श्रोत्याला समजून घ्यावे लागतात, जाणून घ्यावे लागतात आणि जरी समजले/जाणता आले नाहीत तरी ते त्याच्या काळजाला भिडावे लागतात! परंतु श्रोता जर जाणकार आणि बहुश्रुत असेल तर त्याला श्रवणाचा आनंद तर मिळेलच परंतु समोरचा गवई काय गातो आहे, कसं गातो आहे हेही तो डोळसपणे पाहू शकेल, गायकीवर काही भाष्यही करू शकेल. परंतु दोन्हीही क्षेत्रात शब्द आणि स्वर ह्यांनाच अनन्यसाधारण महत्व आहे हे निर्विवाद!

मग आता वक्त्याचा शब्द आणि गवयाचा स्वर (वर म्हटल्याप्रमाणे मला येथे अभिजात ख्यालगायन अपेक्षित आहे, ज्यात निर्गुणी स्वरांचं साम्राज्य अधिक असतं.भावगीत नव्हे, ज्यात स्वरांसोबतच शब्दांचंही प्राबल्य असतं आणि जे बरचसं सगुणरूप असतं!) यांनाच जर सर्वाधिक महत्व असेल तर मग उत्तम शब्द आणि उत्तम स्वर यांचे निकष काय? अहो एखाद्या उत्तम गवयाचं गाणं जसं काळजाला भिडतं तसंच एखाद्या उत्तम वक्त्याचं भाषण देखील अक्षरश: रोमांच उभे करणारं असतं, उघड्या मैदानावरील हजारोंचा श्रोतृवृंद स्तब्ध करून टाकणारं असतं!

अर्थातच माध्यमं असतात, शब्द आणि स्वर!

मग कसे असावेत बरं हे शब्द आणि स्वर?

(क्रमश:)

-- तात्या अभ्यंकर.


हाच लेख इथेही वाचायला मिळेल!