February 14, 2012

मधुबालाच्या जन्मदिनाच्या आणि प्रेमदिनाच्या सर्वांना शुभेच्छा...!

आज १४ फेब्रुवारी - 'व्हॅलेन्टाईन डे', अर्थात प्रेमदिन. त्याचप्रमाणे भारतीय रजतपटावरील निस्सिम सौंदर्याचा आणि मोहक हास्याचा मानबिंदू - मधुबाला हिचाही आज जन्मदिन. आणि म्हणूनच या निमित्ताने आम्ही आज हा प्रेमदिन - 'जागतिक सौंदर्य दिन' म्हणूनही साजरा करत आहोत. तरी आमच्या सर्व वाचकांना, हितचिंतकांना प्रेमदिनाच्या आणि जागतिक सौंदर्य दिनाच्या अनेकोत्तम शुभेच्छा..!


सोबत मधुबालाला अत्यंत प्रिय असलेले मथुरा-पेढे आपल्या सर्वांकरता येथे देत आहे.. :)


-- तात्या अभ्यंकर.

February 04, 2012

इस दर्द को लेकर जिता है, इस दर्द को लेकर मरता है.. (भाग - ३)

या पूर्वी -


...घटकेपूर्वी हसून मला डोळा मारणार्‍या दाईमाच्या डोळ्यात कधी पाणी उभं राहिलं हे तिचं तिलाही कळलं नाही..!

त्यानंतर दोनचारदा तरी दाईमाकडे गेलो असेन. दाईमादेखील माझ्यासारख्या अभ्यागतासोबत मनमोकळेपणाने बोलली, अगदी बरंच काही..

दाईमा, वेळोवेळी अनेक ठिकाणी छापून आलेल्या अनेक मान्यवरांच्या आठवणी, टाईम्सच्या हापिसातली काही जुनी विंग्रजी वृत्तपत्र, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय इत्यादी अनेक ठिकाणांहून मधुबालेबद्दल माहिती घेतली खरी परंतु ही लेखमाला लिहिताना मात्र गडबडून गेलो आहे. तिचं हास्य, तिची बुद्धीमत्ता, तिचा वक्तशीरपणा, तिचं अभिनय सामर्थ्य, तिच्या आयुष्याची सर्वाथाने वाट लावणारा तिचा कर्दनकाळ बाप, तिची दानशूरता, तिचं प्रेमप्रकरण, तिची मानसिकता, गर्दीपासून नेहमी दूर राहण्याचा तिचा स्वभाव, तिची अत्यंत साधी राहणी, एकाच वेळी बाहेरून अगदी विलक्षण अल्लड तर आतून तर अगदी अंतर्मुख आणि कमालीची विवेकी.. किती कंगोरे असावेत या शापित यक्षिणीच्या व्यक्तिमत्वाला? या सगळ्याबद्दल इतकं भरभरून वाचायला मिळालं तरी याचं संकलन कसं करावं, सुरवात कुठून करावी आणि संपवावं कुठे याबद्दल भांबावून गेलो आहे..  तरीही बघतो प्रयत्न करून...

देव आनंदला जिथे जिथे तिच्याबद्दल काही लिहायची, बोलायची वेळ आली तेव्हा तेव्हा त्याने तिच्याबद्दल अत्यंत आदरपूर्वक गौरवोद्गारच काढलेले पाहायला मिळाले. देवच्या 'कालापानी'च्या चित्रिकरणाच्या वेळची गोष्ट. कुठल्याही चित्रपटाचं शुटींग असो, सकाळी ठीक ९ वाजता स्टुडीयोत हजर रहाणं आणि काहीही झालं तरी संध्याकाळी ठीक ६ वाजता घरी परतणं हा मधुबालेचा पायंडा बराच प्रसिद्ध होता. इतका की मधुबाला हजर झाली किंवा निघाली की त्यानुसार आसपासची लोकं अनुक्रमे ९ व ६ वाजताची स्वत:ची घड्याळे जुळवत असत! परंतु देव काही तिच्या या शिस्तीला सरावलेला नव्हता. त्यामुळे कालापानीच्या पहिल्याच दिवशी देवची गाडी जरा उशिरानेच फाटकात शिरली. पाहतो तर तिथेच मधुबाला उभी.. 

"आ गये मालिक? अभी कुछ काम भी किया जाए..?! :)

हे तिनं गंमतीनं म्हटलं. सोबत तिचं नेहमीचंच 'मारडाला -मोहक' हास्य.. 

देवने त्याच्या नेहमीच्या ष्टाईलने तिला म्हटलं, 'हमे 'मालिक' नही बुलाना. हम आपको दोस्त समझते है..' त्यावर 'वह तो आपका बढःपन है. लेकिन इस वक्त, इस जगह आप हमारे प्रोड्युसरसाब है, अन्नदाता है, मालिक है..!" - पुन्हा एकदा छानसं हास्य! :)

हृदयविकाराने तिचा अंत झाल्यावर टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत देवसाब तिच्याबद्दल म्हणतात -

Her smile was veritable celebration of living. She was the beautiful fountain of laughter. She was robust, full of life and energy. One could never conceive that she was ill. She enjoyed her work. She was always laughing. Then out of the blue one day, she disappeared..!

अनेक प्रश्न, शंकाकुशंका विचारून दिग्दर्शकाकडून भूमिका पूर्णत: समजून घेण्याची तिची वृत्ती खरोखरंच कौतुकास्पद होती. त्यामुळेच 'महल' मधली अद्भूत स्त्री, 'कालापानी' तली पत्रकार, 'चलती का नाम गाडी' मधली एक अल्लड खोडकर मुलगी, 'मोगलेआझम' मधली राजपुत्र सलीमची एक यःकश्चित 'कनीज' असलेली पराजित प्रेयसी, तर कधी 'तराना'मधील अत्यंत सुरेख असलेली परंतु एक खेडवळ अशिक्षित मुलगी. किती विविध भूमिका आणि तेवढीच तिच्या अभिनयातील विविधता..!

'मोगलेआझम' हा तिच्या आयुष्यातला आणि एकंदरीतच भारतीय चित्रसृष्टीतला एक माईलस्टोन चित्रपट. हा चित्रपट म्हणजे मधुच्या आयुष्यातलं एक मोठ्ठं प्रकरणच. याबद्दल जमल्यास पुढे विस्तृत लिहिणारच आहे. जवळजवळ ८-१० वर्ष या चित्रपटाची निर्मिती सुरू होती. परंतु या संपूर्ण काळातील तिच्यातील दोन टोकाची (एक - दिलिपकुमारसोबतचं बहरीला आलेलं प्रेम आणि दोन - त्या प्रेमाचा संपूर्णपणे चक्काचूर, बी आर चोपडा ने तिच्यावर केलेली न्यायालयीन कारवाई आणि त्या कारवाईत दिलिपची तिच्या विरोधातील साक्ष - त्याबाबतही जमल्यास नंतर लिहीन,) मानसिक स्थित्यंतरं, असे एकूणच या काळातील तिच्या आयुष्यातले अनेकानेक चढउतार.. परंतु या सगळ्याचा तिच्या अभिनय क्षमतेवर कुठेही परिणाम नाही.. अर्थात, तिचं जगप्रसिद्ध हास्य किंचित लोप पावू लागलं होतं असं तिच्या जवळचे सांगायचे. 

'मोगलेआझम' गाणी हा त्या चित्रपटाचा प्राण. आणि त्या गाण्यातली मधुबालाची अदाकारी केवळ 'लाजवाब', 'क्या केहेने' अशी..! 'मोहे पनघट पे' मधली घायाळ करणारी अनारकली, 'प्यार किया तो डरना क्या' मधली बिनधास्त अनरकली, किंवा दीदीच्या केवळ अद्भूत स्वरांच्या साथीत 'मोहोब्बत की झुठी कहानी पे रोए' या गाण्यातली, गळ्यात-अंगाखंद्यावर जाडजूड साखळदंड असलेली एक थकलेली, हारलेली अनारकली..!

कधी वाटतं, ती इतिहासातली अनारकली आणि मधुबाला या दोघी एकच तर नव्हेत? सारख्याच दुर्दैवी?!

बोलीभाषा अन् त्याच्या बारकाव्यांबद्दलचा तिचा अभ्यास असे आणि त्याकरता ती विशेष प्रयत्न करत असे. 'मोगलेआझम' ची निर्मिती सुरू असतांनाच एकीकडे ती 'हावडा ब्रिज'चंही चित्रिकरण करत होती. पण आपल्या लक्षात येईल की 'मोगलेआझम' मधलं उर्दू-फारसीचं वर्चस्व असणारं तिचं एका 'कनीज'चं अदबशीर हिंदी, तर 'हावडा ब्रिज' मधलं तिचं 'ए तुम क्या बोलता है, हमको समझमे नही आता..' असं अँग्लोइंडियन ढंगाचं हिंदी..! 'मोहोब्बत की झुठी कहानी पे रोए' तली हारलेली ती, तर 'आईये मेहेरबा..' मधली समोरच्याचं अगदी सहजच काळीज घायाळ करणारी तिची अदाकारी..!

खूप मेहनत घ्यायची हो ती. खूप लगन होती तिची..!



१९६४ मध्ये तिचा 'शराबी' हा चित्रपट प्रसिद्ध झाला तेव्हा त्या चित्रपटाची जाहिरात अशी होती -

The poet saw
Beauty

The sculptor carved her
Image

They named her
Venus

We call her
Madhubala…!

(क्रमश:...) 

-- तात्या अभ्यंकर.

January 06, 2012

इस दर्द को लेकर जिता है, इस दर्द को लेकर मरता है.. (भाग - २)

हिंदुस्थानी घराणेदार रागसंगीत, नारायणराव बालगंधर्व, अब्दुल करीमखासाहेब, भीमसेनअण्णा, बापुराव पलुस्कर, भाईकाका, बाबूजी, दीदी, पंचमदा, किशोरदा, मधुबाला, वहिदाआपा.. इ इ अनेक, हे सारे आमचे जबरदस्त दुखरे बिंदू. त्यांचा अभ्यास आणि त्यांच्यावरची भक्ति ही कधीही न संपणारी आहे!
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
या पूर्वी -
इस दर्द को लेकर जिता है, इस दर्द को लेकर मरता है.. (भाग - १)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

वसंता पोतदार तसा वेडझवाच होता, परंतु दोस्त होता आपला. भीमण्णा हा आमच्या दोस्तीतला दुवा. एकेदिवशी केव्हातरी वसंताचा फोन आला,

"तात्या, मधुबालेवर प्रेम करतोस ना..?"

"हो..काही कोटींपैकी मीही एक.." मी उत्तरलो.

"एक पत्ता लिहून घे..."

संशोधन करणं हे वसंताचं व्यसन होतं. त्यामुळे वसंता जे काही सांगेल ते ऑथेन्टिकच असेल म्हणून मी पत्ता लिहू लागलो. वसंताने 'दाईमा' नावाच्या कुणा स्त्रिचा पत्ता मला दिला. ही दाईमा मधुबालेच्या शेवटच्या काळातील तिची नोकर होती. तिचा पत्ता म्हणजे डोंगरी अग्निशमन दलाजवळची कुठलीशी एक चाळ होती. वसंताने दिलेल्या पत्त्यावर मी पोहोचलो. मधुबालेची आवडती गुलाबाची काही फुलं आणि तिला अत्यंत प्रिय असलेला कलाकंद सोबत घेतला होता. चाळ शोधून काढली. दारावर टकटक केली. साधारण ८० च्या आसपास असलेल्या एका वृद्ध स्त्रिने दरवाजा उघडला. तीच दाईमा होती.

"नमस्ते. मंझली आपा के बारे मे कुछ जानना है.." (मधुबालेला बरेचजण 'मंझली आपा' या नावाने ओळखत.)

दाईमाच्या चेहेर्‍यावर स्मितहास्य उमटलं ( मधुबालेच्या संगतीत राहिल्यामुळे तेही गोडच होतं! :) ) आणि तिनं मला घरात घेतलं. पाणी विचारलं. मी गुलाबाची फुलं आणि कलाकंद तिला दिला. दाईमाचं अस्पष्ट बोलणं आणि तिचं हिंदी, हे मला प्रयत्नपूर्वक समजून घ्यायला लागत होतं. प्रास्ताविक झालं आणि कुठलेच आढेवेढे न घेता म्हातारी भूतकाळात हरवली. वय बरंच असल्यामुळे तिच्या बोलण्यात सुसंगतेचा थोडा अभावच होता. ती माझ्याशी हिंदीतच बोलत होती, पण इथे मी ते मराठीत लिहिणार आहे..

"ती खूप म्हणजे खूपच खोडकर होती.."  दाईमा आता सांगू लागली..

काही वेळेला आपल्या मधाळ सौंदर्याचा उपयोग ती काही लोकांची गंमत करण्यासाठी करत असावी. पटकन कुणाच्याही प्रेमात पडावं इतकी काही ती नासमझ नव्हती. तिनं मनापासून प्रेम केलं ते फक्त युसुफमियावर.. किशोरबाबावर पण तिचा जीव होता, नाही असं नाही! पण एकंदरीत अवखळ वृत्ती, खळाळून हसणं हा तिचा स्थायीभाव होता. पटकन हास्याच्या कारंज्यात शिरायला तिला काही विशेष कारण लागत असे असं नाही.. पुष्कळदा शक्ति सामंता, देवसाब सारखे लोक तिचं हसू थांबायची वाट पाहात असत. "झालं का गं बये तुझं पोटभर हसून? म्हणजे आम्हालाही काही तुझ्याशी बोलता येईल." असं ते म्हणायचे.. :)

आपल्या आवडत्या व्यक्तिला गुलाबाचं फूल द्यायची तिची एक सवय होती.

"पण त्या फुलासोबत 'तू मला खूप आवडतोस. माझ्याशी लग्न करणार असलास तर हे फूल स्विकार कर.. - अशी एक चिठ्ठीही द्यायची ना..?"  -- मी दाईमाला विचारलं.

त्यावर दाईमा स्वत:च खळखळून हसली.

"हम्म.. पण तशी चिठ्ठी प्रत्येक वेळेलाच द्यायची असं नाही. एक बार ऐसा मजाक उसने प्रेमनाथ के साथ किया था..! बेचारा प्रेमनाथ. बुद्दू कहिका..!" :) -- इति दाईमा.

"बेटा, चाय पियोगे..? रुको, 'मंझली आपा' को प्यारी तुलसीपत्तेवाली चाय बनाके लाती हू.."

दाईमा आता स्वत:च मुडात येऊ लागली होती..

पहिल्या दिवसापासूनच प्रेमनाथने मधुबालेवरती गोंडा घोळायला सुरवात केली होती. म्हणून मग गंमत म्हणून मधुबालेनं गुलाबाचं फूल आणि चिठ्ठी त्याला दिली.. प्रेमानाथ बिचारा उभ्याउभ्याच जमिनीवर कोसळून पडायचा बाकी होता.. सार्‍या दुनियेतली सर्वात सुंदर स्त्री आपल्याला फूल देते आहे..! ओहोहो..! :)

पुढे मग काही दिवस प्रेमानाथचं आणि मधुबालेचं प्रेमप्रकरण हा चित्रसृष्टीतला एक चर्चेचा विषय ठरला. पण तुला अंदरकी बात सांगते - प्रेमनाथच्या गोंडा घोळण्याच्या स्वभावामुळे मधुबालेनेच त्याची मस्करी केली होती. तिला भोगू पाहणारे खूप म्हणजे खूप होते रे तेव्हा आजूबाजूला. पण मंझलीआपा त्या सर्वांची वस्ताद होती. त्या सगळ्यांची ती मस्तपैकी फिरकी घ्यायची. मनमुराद हसत आणि एन्जॉय करत! :)

काही दिवसांनी काय झालं कोण जाणे, प्रेमनाथ दुरावला तिला.. एकदा केव्हातरी प्रेमनाथने म्हणे त्या गुलाबाची अन् चिठ्ठीची हकिकत मोठ्या विश्वासाने अशोककुमारला सांगितली. त्यावर अशोलकुमार त्याला चमकून म्हणला,

"काय सांगतोस..? अरे पण अशी चिठ्ठी आणि गुलाबाचं फूल तिनं मलाही दिलं आहे..!"

एवढं सांगून दाईमा तोंडातलं बोळकं दाखवत मोकळी हसली आणि तिनं माझ्याकडे पाहून आपला म्हातारा मिचमिचा डोळा मारला.. ;)

"पण खर सांगू का तुला, खर्‍या प्रेमाकरता ती नेहमी भुकेली राहिली आणि भुकेलीच मेली रे.."



घटकेपूर्वी हसून मला डोळा मारणार्‍या दाईमाच्या डोळ्यात कधी पाणी उभं राहिलं हे तिचं तिलाही कळलं नाही..!

(क्रमश: ..)

-- तात्या अभ्यंकर.

January 05, 2012

इस दर्द को लेकर जिता है, इस दर्द को लेकर मरता है.. (भाग - १)

लेखाधार - अनेकांकडून तिच्याबद्दल लिहिले गेलेले आठवणीवजा लेख.

अलिकडेच केव्हातरी ठाण्याजवळच्या घोडबंदर रस्त्यावरून चाललो होतो. आता या घोडबंदर परिसराचा संपूर्ण कायापालट झाला आहे. लांबलचक रुंद रस्ता आणि आजुबाजूला मोठमोठे घरप्रकल्प आणि सर्वत्र सिमेन्टचं जंगल. परंतु एकेकाळी मात्र इथे अगदी भरपूर वनश्री होती, झाडंझुडपं होती. सर्व परिसरच अत्यंत रमणीय होता.

गुरुदत्तच्या मिस्टर अँड मिसेस ५५ चित्रपटाचं काम सुरू होतं आणि गुरुदत्तने चित्रपटाचा काही भाग चित्रित करण्यासाठी याच रमणीय परिसराची निवड केली होती. चित्रपटाचे संवादलेखक अब्रार अल्वीही सोबत होते. वास्तविक चित्रिकरणाच्यावेळी त्यांचं काहीच काम नव्हतं परंतु केवळ गुरुदत्तच्या आग्रहाखातर ते ऐन उन्हाळा असूनही सोबत आले होते. चित्रिकरणस्थळी पोहोचल्यावर त्यांनी एक छानसी हवेशीर सावली पाहून एका झाडाखाली निवांत बैठक मारली. एकिकडे चित्रिकरणाची लगबग सुरू होती तेवढ्यात 'ती' अल्वींच्या शेजारी आली आणि 'अरे वा! यहा बैठे हो आरामसे, आपके तो मजे है..' असं म्हणत तिनेही त्यांच्या शेजारीच मस्त बैठक मारली. मनमोकळं, निरागस, अल्लड, जीव खलास करणारं हास्य, मोहक अदा....! मूर्तीमंत सौंदर्यच अल्वींच्या शेजारी काही क्षण विसावलं होतं!



काही दिवसांपूर्वी अल्वींची ही आठवण वाचनात आली होती.

मालाडला बाँबे टॉकिजच्या लगतची झोपडपट्टी. तिथे अताउल्लाखान नावाचा एक पठाण राहायला आला होता. सोबत त्याच्या बायकोचा व ८-९ पोरांचा कुटुंबकबिला. त्यापैकीच एक बेबी मुमताज. बेबी मुमताज दिसायला सुरेख, वागण्याबोलण्यात चांगलीच चंट आणि हुशार. गायचीही आवड. बेकार असलेल्या अताउल्लाखानने लेकीचं नशीब आजमावण्याकरता आणि त्यायोगे उत्पन्नाची काही सोय होते का ते पाहायला बेबी मुमताजला शेजारीच असलेल्या बाँबे टॉकिजात नेलं. तिथं त्यांची गाठ पडली बाँबे टॉकिजचे अध्वर्यू हिमांशू राय आणि देविकाराणी यांच्याशी. त्यांनी पाहताचक्षणी बेबी मुमताजला पसंद केलं आणि लगोलग तिचं 'बसंत' ह्या चित्रपटातून भारतीय रजतपटावर पहिलावहिलं आगमन झालं. ८-१० वर्षाच्या एका मोहक चिमुरडीनं रंगमंचावरून 'मेरे छोटेसे मन मै छोटीसी दुनिया रे...' हे गाणं गायलं आणि गाण्यानंतर 'आप लोग कल आईये तो और सुनाउंगी गाना..' असं म्हणत चटकन एक छानशी अर्धगिरकी घेऊन मागे वळली. ती तिची पहिली मोहक अदा..!

ते वर्ष होतं १९४२. तेव्हापासून प्रवास सुरू झाला एका निस्सीम मनमोहक सौंदर्याचा. प्रवास सुरू झाला एका जीवघेण्या मोहक हास्याचा, प्रवास सुरू झाला मधाळतेचा अन् मादकतेचा.. 'प्रेम' या संकल्पनेवरच जिनं जिवापाड प्रेम केलं अशा एका शापित यक्षिणीचा प्रवास सुरू झाला. देविकाराणीने त्या बेबी मुमताज, अर्थात मुताज जहान बेगम दहलवीचं 'मधुबाला' असं नामकरण केलं आणि....

Venus of Indian Cinema चा उदय झाला..!

अत्यंत प्रतिभाशाली अन् नैसर्गिक अभिनय क्षमता, लहान वयापासूनच असलेला विलक्षण आत्मविश्वास, जगाला वेड लावणारं हास्य - कधी स्मितं तर कधी अल्लड खळखळणारं, आणि सार्‍या विश्वात एकमेवाद्वितीय ठरावं असं सौंदर्य.. या सगळ्याचं बेमालूम मिश्रण म्हणजे ती..! १४ फेब्रुवारी हा तिचा जन्मदिन. सारी दुनिया तो दिवस 'प्रेमदिन' म्हणून साजरा करते.. माझ्या मते १४ फेब्रुवारी हा जसा प्रेमदिन आहे तसाच तो 'The Devine Beauty Day..' म्हणूनही तिच्या नावे सार्‍या जगभरात, निदान भारतात तरी साजरा व्हावा..!

एव्हाना मालाडच्या झोपडीतून तिचं कुटुंब पेडररोडवरच्या अपमार्केट मध्ये राहायला आलं होतं. एकाच वेळेला अनेकानेक चित्रपटांचं चित्रिकरण सुरू झालं होतं आणि सुरेन्द्र, सप्रू, सुरेश इत्यादींपासून ते अशोककुमार, देवसाब, आरके यासारख्या नामवंतांसोबत ती अगदी लीलया सराईतपणे आपला ठसा उमटवीत होती. परंतु लहान वयापासूनच चित्रपटात काम सुरू केल्यामुळे फॉर्मल शिक्षण म्हणून जे असतं ते तिच्याजवळ नव्हतं. त्यामुळे डॉ सुशिलाराणी पटेल यांच्याकडे संभाषणात्मक इंग्रजीचे धडे गिरवायला तिने सुरवात केली..

बाबुराव पटेल हे 'फिल्म इंडिया' या पहिल्या सिमेमासिकाचे संपादक तसंच सिनेदिगदर्शक. त्यांच्या पत्नी डॉ सुशिलाराणी पटेल याही लेखक, अभिनेत्री तसंच पत्रकारही. या पटेल दाम्पत्याचा तिच्यावर विलक्षण लोभ.. सुशिलाराणींनी आठवण सांगितली होती - 'त्या काळात रोज संध्याकाळी चित्रिकरण संपलं की तेवढ्याच उत्साहाने ती आमच्या घरी यायची. जेवढी सुरेख-मोहक, तेवढीच अल्लड आणि निष्पाप मनमोकळ्या स्वभावाची होती ती. घरच्या गरिबीपायी फॉर्मल शिक्षण नव्हतं परंतु बुद्धीमत्ता होतीच. त्यामुळेच ती माझ्याकडे अवघ्या ३ महिन्यात अगदी उत्तम इंग्रजी बोलायला शिकली. बर्‍याचदा तिचं आमच्याकडे खाणं-पिणंही व्हायचं.. त्यातून ' गरमागरम पकोडे' हे तिचे विशेष लाडके! Smile

ती जेव्हा अगदी प्रथम त्यांच्या घरी आली तेव्हा सुशिलाराणींनी लिहून ठेवलं आहे -

"She was wearing no make up. Her dazzling smile and lovely olive complexion required no artificial help. She was well built and complete natural..!"

असो..

तूर्तास थोडा हळवा झालो आहे म्हणून इथेच थांबतो. साक्षात कर्दनकाळ असलेल्या बापालाही 'नो रिग्रेटस्' असं म्हणून माफ करणारा तिचा स्वभाव, तिची दानशूरता, तिचं आणि दिलिपकुमारचं प्रेमप्रकरण, तिचं आणि किशोरदाचं बस्तान न बसलेलं लग्न, सार्‍या दुनियेची हृदयं काबीज करणारी ती, परंतु तिचा स्वत:चा मात्र जीवघेणा हृदयरोग आणि त्यानंतरचं भयानक एकाकीपण व त्यातच तिचं अकाली जाणं...! अजून खूप काही लिहिन म्हणतो. जमेल की नाही ते सांगता येणार नाही..!

'मेरे छोटेसे मन मै छोटीसी दुनिया रे...' या गाण्याचा उल्लेख वर केला आहे. याच गाण्याच्या काही ओळी आहेत,

'छोटी सी दुनिया की छोटी छोटी बाते,
छोटे छोटे दिन और छोटी छोटी राते..
छोटी उमरिया रे.."

कसा योगायोग असतो पाहा.. 'छोटी उमरिया रे..' असं म्हणून ते कडवं संपतं. पण तीच ओळ तिच्याबाबतीतही 'छोटी उमरिया रे..' म्हणून खरी ठरते आणि मुमताज जहान बेगम दहलवी अवघ्या ३६ व्या वर्षीच या जगाचा निरोप घेते..!



(पुढील भाग सवडीने)

-- तात्या अभ्यंकर.

January 02, 2012

आप के हसीन रुख..

आप के हसीन रुख.. (येथे ऐका)



यमन रागाच्या पार्श्वभूमीवरचं नय्यरसाहेबांचं रफिसाहेबांनी गायलेलं एक शांत, तरल, सुरेख गाणं..

गिटारने दिलेली लय आणि पियानोचे सुंदर तुकडे. मोजका वाद्यमेळ. तरीही नय्यरसाहेबांची अत्यंत अनोखी आणि प्रतिभाशाली धून आणि रफिसाहेबांचा रसाळ, सुरीला आवाज या अवघ्या दोन भक्कम बाजुंमुळे गाण्याचं सोनं झालं आहे. किंचित ठाय असलेली 'एक-दो,एक-दो' ही खास नय्यर ठेवणीतली लय आणि त्या लयीचा अक्षरश: गालावरून मोरपीस फिरावं इतकाच आटोपशीर, संयत आघात. काय बोलावं नय्यरसाहेबांच्या चिरतरूण प्रतिभेबद्दल..?!

'खुली लटोकी छाव में खिला खिला ये रूप है..'

'रूप है..' शब्दावरचा शुद्ध गंधार कायच्या काय सुरीला. तानपुर्‍यातल्या गंधाराची आठवण करून देणारा..!

'घटा से जैसे छन रही सुबह सुबह की धूप है..'

या ओळीतून उलगडत जाणार्‍या यमनबद्दल काय बोलावं महाराजा..? ही अत्यंत स्वाभाविक आणि नैसर्गिक अशी यमनची स्वरसंगती. परंतु तेवढीच ताजी व नवी वाटणारी!
'घटा', 'से', 'जैसे', 'छन', 'रही' हे शब्द फक्त कसे पडले आहेत ते पाहा म्हणजे नय्यरसाहेबांनी 'लय' ही गोष्ट किती पचवली होती हे लक्षात येईल. पुढे 'जिधर नजर मुडी..' तली तोड आणि त्यानंतरचा पॉज..! नय्यरसाहेबांच्या प्रतिभेला मी शब्दात कसं बांधू..?!

गाण्याच्या चित्रीकरणातली माला सिन्हा आम्हाला विशेष पसंत नाही, परंतु तनुजावर आम्ही प्रेम करतो.. ऐन जवानीत काय दिसायची तनुजा! व्वा.. वा..!

आणि अगदी कोवळ्या तरूण वयातला धर्मा मांडवकर काय सुरेख दिसतो.. अगदी हँडसम...! 'त्याला फारसा अभिनय येत नाही', 'नाचता येत नाही..' असे त्याच्यावर आरोप केले जातात. परंतु आम्हाला मात्र या गाण्यातला लाजराबुजरा आणि शोलेत टाकीवर चढून बसंती आणि मौसीला पटवणारा बिनधास्त बेधडक धर्मा मांडवकर अत्यंत प्रिय आहे! Smile

एकंदरीत गाणं ऐकून तृप्ती होते, जीव शांत होतो.

हल्ली मात्र आमची रसिकताच लाचार झाली आहे त्यामुळे आम्ही 'मुन्नी बदनाम', 'शीला की जवानी.' यासारख्या अत्यंत फालतू आणि 'कोलावरी..' सारख्या अत्यंत सामान्य गाण्यावरच समाधान मानतो..!

चालायचंच.. कालाय तस्मै नम:

रफीसाहेबांना आणि नय्यरसाहेबांना मात्र मानाचा मुजरा..!

-- तात्या अभ्यंकर.

November 10, 2011

वाजंत्री वाजतात, वाड्यात काय झालं?

राम राम मंडळी,

मासिक धर्म सुरू होणं ही कुठल्याही मुलीच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना. निसर्गाने तिला बहाल केलेलं ते सन्माननीय स्त्रीत्व. आजच्या काळात मासिक धर्म सुरू होऊन जेव्हा एखादी मुलगी वयात येते, ते तिच्या आईशिवाय कुणालाच फारसं कळत नाही. फार तर तिच्या वडिलांना किंवा मोठ्या ताईला हे कळणं शक्य आहे. या व्यतिरिक्त ती घटना फारशी कुणाला कळावी किंवा तिचा गाजावाजा व्हावा असं त्यात विशेष काही नाही. ती एक नैर्सर्गिक गोष्ट आहे.

परंतु दादासाहेब फाळके पारितोषक विजेत्या २२ जून १८९७ या सुंदर चित्रपटात दाखवलं गेल्याप्रमाणे मुलीचं हे ऋतुचक्र सुरू झालं की त्या घरात एक छोटेखानी समारंभवजा प्रसंगच साजरा केला जात असे. एक तर त्या काळात मुलगी वयात यायच्या आधीच तिचं लग्न केलं जात असे, (किंबहुना मुलगी वयात येईपर्यंत बिनलग्नाची राहिल्यास तो एक चर्चेचा विषय होई आणि प्रसंगी तिची व तिच्या आईवडिलांची कुचंबणाही होत असे - संदर्भ - शिरुभाऊंची तुंबाडचे खोत ही कादंबरी) त्यामुळे जेव्हा मुलगी वयात येत असे तेव्हा ती आईऐवजी सासूच्याच सान्निध्यात असे.

२२ जून १८९७ या चित्रपटात मात्र चाफेकरांच्या घरातील एक सूनबाई सीता, (बहुधा चाफेकर बंधुंपैकी वासुदेव हरि तथा बापुराव चाफेकर यांची पत्नी) जेव्हा वयात येते तो समारंभवजा प्रसंग चित्रित केला आहे आणि सोबत एक छान गाणंही आहे. माझा हा लेख मुख्यत्वेकरून त्या गाण्याबाबत आहे. त्या काळात मुलगी वयात आली म्हणजे तिला 'न्हाणं' अथवा 'नहाण आलं', 'ती मखरात बसली', 'तिला पदर आला', इत्यादी शब्दप्रयोग वापरात असायचे. त्यापैकीच 'न्हाणं आलं' हे शब्द सदर गाण्यात वापरले आहेत..

सीताबाईला चाफेकळीला न्हाणं आलं.. (येथे ऐका - चित्रफितीतील गाण्याची सुरवात ४ मिनिटे व १८ सेकंदांनी)

आता मंडळी, खरं सांगायचं म्हणजे या गाण्यात काही गहन अर्थबिर्थ आहे असं मुळीच नाही. आपण फार तर याला माजघरातलं एक गाणं, असं म्हणू शकतो. तरीही या गाण्याची चाल छान आहे, शब्द साधे परंतु मस्त आहेत आणि विशेष म्हणजे यातली यमकं एकदम फक्कड आहेत. लयीची गुंफण तर झकासच आहे. सोबत तालाकरता फक्त एक चौघडाटाईप वाद्य आणि चाळ किंवा घुंगरू. तरीही हे गाणं जमून गेलं आहे..! :)

हम्म. पुण्यातल्या एका रस्त्यावरून मी चाललो आहे. वाटेत खास सदाशिवपेठी एक वाडा लागला आहे. पण त्यातून हा वाजंत्य्रांचा कसला आवाज येतो आहे? काही लग्नबिग्न आहे क्काय त्या वाड्यात..?

छे हो..!

वाजंत्री वाजतात वाड्यात काय झालं?
सीताबाईल चाफेकळीला न्हाणं आलं..! :)

'वाड्यात काय झालं..' मधली 'पपप मगरेग' संगती एकदम मस्त! आणि 'न्हाणं आलं' चा षड्जावरचा न्यास एकदम खणखणीत बरं का. कुणी गायलंय ते माहीत नाही, पण बाईचा आवाज सुरेल आहे, मोकळा आहे. अगदी चित्पावनी आहे असं म्ह्टलंत तरी चालेल! :)

पहिल्यानं न्हाणं आलं सासू वाटिते साखर
सीताबाई हिचा दीर गुंफितो गं मखर..!

सूनबाईला न्हाणं आलं म्हणून आता सासू काय काय वाटते आहे पाहा. सर्वप्रथम ती साखर वाटते आहे. सीताबाईचा दीर आपल्या भावजयीला मखरात बसण्याकरता तिच्याकरता मखर गुंफतो आहे. इथे साखर आणि मखर हे साधं शिंपल यमक जुळवलं आहे. बाय द वे, दीर या शब्दातली 'मध' ही संगती अंमळ सुरेखच..! :)

पहिल्यानं न्हाणं आलं सासू वाटिते बत्तासे
सीताबाई जरी तुझ्या मखरी आरसे..!

साखर झाली. आता बत्तासे! मज्जा आहे बॉ सीताबाईची. मंडळी बाकी काय पण म्हणा, बत्तासे मात्र चवीला झकासच लागतात हो! आणि आरसे/बत्तासे हे यमकही मस्त! :)

बाय द वे, 'सीताबाई जरी तुझ्या मखरी आरसे..!' ह्या ओळीची लय मात्र विशेष सुरेख आहे. आणि सोबत छुन छुन छुन असा घुंगरांचा ठेका.. सी ता बा ई जरी तुझ्या मखरी आरसे हे शब्द किती सुरेख लयीत पडले आहेत पाहा..!

ह्या गाण्याची चाल कुणी बांधली आहे ते माहीत नाही. की पारंपारिकच आहे..?

पहिल्यानं न्हाणं आलं सासू करिते सोहळा
सीताबाई तरी नेस पाटव गं पिवळा..

अगो सीताबाई, अगो रांडच्ये तुझी सासू तुला न्हाणं आलं म्हणून एवढा सोहळा करत्ये, अगो तो पिवळा पाटव तरी नेस गो बये..! :)

मला 'पाटव' या शब्दाचा एक्झॅक्ट अर्थ माहीत नाही परंतु हा शब्द मात्र एकदम मस्त वाटतो. पुन्हा सोहळा-पिवळा हे यमक झकास..! :)

पिव्ळं पिवळं गं पातळ सार्‍यांना सांगितलं
सीताबाई हिला न्हाणं आलं आईकलं..!

धत तेरीकी..! अहो तिला नहाण आल्याचा एवढा सोहळा केलात आणि वर म्हणता काय? तर,

सीताबाई चाफेकरणीला नहाण आलं असं ऐकलं खरं! :)

'पिवळं पिवळं पातळ' हे शब्द लयीत छान बसावेत म्हणून 'पिव्ळं पि व ळं पातळ' असे टाकले आहेत. या गाण्याची सांगितिक बाजू वरकरणी जरी साधी सोपी वाटली, तरी तिला सुरालयीचा भक्कम पाया लाभला आहे हे निर्विवाद..!

'ऐकलं' या शब्दाकरता 'आ ई क लं' ही चार लयदार अक्षरं गाण्यात अधिक छान शोभतात..! :)

पण मंडळी, क्षणभर यातला मजेचा वा सांगितिक भाग सोडून द्या, पण ज्या पार्श्वभूमीवर हे गाणं चित्रित केलं आहे ती पार्श्वभूमी खूप गंभीर आणि भयानक आहे. चाफेकरांच्या घरातल्या आणि इतर चार घरच्या लेकीसुना हा नहाण प्रसंग त्याकाळची एक रीतभात म्हणून निभावतात खरा परंतु,

थोरले चाफेकर दामोदर हरि चाफेकर फासावर गेले आहेत, त्यांची विधवा गाण्यातल्या एका चित्रात सुन्न बसलेली दाखवली आहे. इतर दोघा चाफेकर बंधुंची फाशीही निश्चित आहे. एकाच घरातील तीन तीन तरूण मुलं फासावर जात आहेत त्या बापाची अवस्था काय असेल..? एक साधा कीर्तनकार तो. उद्या मुलं कीर्तन शिकतील, काही कामधंदा करतील यावरच सारी मदार असणारा..! गाण्यातल्या एका चित्रात तो खिन्न, हारलेला, हताश बापही बसलेला दाखवला आहे..!



असो..

कुठून विषय सुरू केला होता, अन् कुठे येऊन पोहोचलो पाहा..!

आता अधिक काही लिहित नाही.. माझा त्या तिघा चाफेकर बंधुंना मानाचा मुजरा..!

-- तात्या अभ्यंकर.

November 01, 2011

..पर अंधेरे से डरता हु मै मां..!

मेरी मां.. (येथे ऐका)


"आई नको ना गं मला इथे एकट्याला ठेऊन जाऊस! मी तसं कधी बोलून दाखवत नाही पण मी अंधाराला खूप घाबरतो गं आई. इथे खूप अंधार आहे.
हो, आहे मी थोडासा खोडकर, पण तू मला खूप आवडतेस आणि मला तुझी खूप काळजीही वाटते. आता हे कसं तुला समजावून सांगू..? पण तुला तर हे सगळं माहित्ये ना आई? मग मला इथे एकट्याला का ठेऊन जातेस? आता खरंच मी चांगला वागेन. मस्ती, द्वाडपणा करणार नाही. प्रॉमिस..! पण मला इथे नाही रहायचं..!"

tjp

"इथे सगळी खूप अनोळखी मुलं आहेत. मला भिती वाटते इथली.. मला इथे ठेऊन जाऊ नकोस. ही गर्दी आहे ना, ती मला काहितरी करेल मग मी परत घरी कसा येऊ शकेन..? मला तुझ्यापासून इतका दूर करू नकोस की माझी आठवणही तुला येणार नाही.. खरंच मी इतका वाईट आहे का गं आई..? सांगा ना..!"

"आई, मला माहित्ये मी तुझा खूप लाडका आहे. बाबा जेव्हा जेव्हा मला जोरांने ओरडतात ना, तेव्हा तू येऊन माझी बाजू घेशील, मला सांभाळशील याची खात्री असते मला! तू जवळ असलीस ना आई, की खूप सुरक्षित वाटतं मला! पण मी बाबांना हे काही सांगू शकत नाही. तुला हे सगळं माहित्ये ना आई..? मला भिती वाटते त्यांची. खरंच भिती वाटते.."

tjp

चवथी-पाचवी पर्यंत आईच्या पदराखाली लाडाकोडात वाढलेला ईशान अवस्थी. एक खोडकर मुलगा. अक्षरं/आकडे समजण्याची आकलनशक्ती क्षीण असलेला, ती समजून घेतांना गडबड होणारा आणि त्यामुळेच 'लेटर्स आर डान्सिंग' असं म्हणणारा ईशान.. तो सुधारावा म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला आता शाळेतून काढून लांब बोर्डिंग शाळेत ठेवला आहे. तिथे सगळं नवीन. मुलं/सवंगडी नवीन. जाड चश्मावाले अन् मिश्यावाले कडक मास्तर. तिथे आता लाड करणारी आई नाही..!

हे गाणं म्हणजे त्या लहानग्याचं मनोगत..! आईवेडं पोर आहे ते. गाण्याचं चित्रिकरण केवळ अप्रतिम...रडवेलं झालेलं ते पोरगं, आता एकटं, एकाकी. आत्तापर्यंत अगदी सकाळी उठवण्यापासून ते पायात मोजे-बुट चढवणारी आई होती. आता हे लाड नाहीत. कडक मास्तरांच्या निगराणीखाली सगळं आपलं आपण करायचं! आत्तापर्यंत कौतुकानं गरम गरम भरवायला आई होती, आता मेसच्या शिस्तीत आपलं आपण जेवायचं! :)

पोरगं खरंच बावरलं आहे, घाबरलं आहे. शेवटी नळ सोडून आपला रडवेला चेहेरा घुतं आणि चुपचाप झोपतं आणि आईविना पहिला दिवस संपतो..! :)

'तारे जमी पर'. एक सुरेख, देखणा, अप्रतिम चित्रपट आणि त्यातलं शंकर महादेवन ने गायलेलं हे अप्रतिम गाणं. जियो..!

पण खरंच मंडळी, हे गाणं ऐकताना/पाहताना पोटात कुठेतरी खूप तुटतं..पडद्यावर हे गाण पाहताना कुठेतरी आपल्या आईची आठवण होते आणि पडद्यावरचं चित्र क्षणभर धुसर होतं.. परमेश्वराने आई अन् तिचं लेकरू हे नक्की कसलं नातं निर्माण करून ठेवलं आहे हे खरंच समजत नाही...!

-- तात्या अभ्यंकर.

October 31, 2011

हाल ए दिल..

राम राम मंडळी,

हाल ए दिल.. (येथे ऐका)

श्री अमिताब बच्चन ऊर्फ अमिताब श्रीवास्तव (यूपीतल्या इलाहाबादच्या या भैय्याचं 'श्रीवास्तव' हे मूळ आडनांव, जे हरिवंशरायांनी 'बच्चन' असं बदलून घेतलं), ऊर्फ बीग बी, ऊर्फ बच्चनसाहेब हा खरोखर एक अजब माणूस आहे. अत्यंत गुणी कलाकार, एक मोठा कलाकार, एक निर्विवाद दिग्गज! गेली ४० दशकं हा बुढ्ढा म्हातारा होतच नाहीये. त्याचा अभिनय, त्याचा आवाज सगळंच जबरा! आणि मुख्य म्हणजे आजही सर्व जुन्या नव्या माणसांना जमवून घेत हा इसम पुढेपुढेच चालला आहे. मग त्याचा केबीसीचा चौथा की पाचवा सीजन असो, की अलिकडेच प्रदर्शित झालेला 'बुढ्ढा होगा तेरा बाप' हा चित्रपट असो..इतका मोठा कालावधी प्रकाशाच्या झोतात रहाणं आणि लौकिकार्थाने 'नंबर वन' पदावर रहाणं फारच कमी लोकांना जमतं त्यापैकीच बच्चन साहेब एक.

तूर्तास मी हे अमिताब पुराण इथेच आवरतं घेतो आणि वळतो एका छानश्या गाण्याकडे. 'बुढ्ढा होगा..' चित्रपटातलंच विशाल-शेखरचं संगीत असलेलं आणि खुद्द बचन साहेबांनी गायलेलं 'हाल ए दिल..' हे यमन रागातलं गाणं. यमन आला रे आला की माझ्यासारख्या यमनभक्तांची समाधी लागलीच म्हणून समजा. मग तो यमन मदनमोहनच्या अनपढ मधला 'जिया ले गयो जी मोरा सावरिया असो', की बाबूजींच्या 'समाधी साधना' तला असो की विशाल-शेखर च्या 'हाल ए दिल..' मधला असो. यमनला तोड नाही, यमनला पर्याय नाही. आपल्या अभिजात रागसंगीताला पर्याय नाही. फक्त काही वेळेस खंत एकाच गोष्टीची वाटते की अलिकडचे संगीतकार त्याची ताकद, त्यातलं अफाट-अनंत असं पोटेन्शियल ओळखू शकत नाहीत, पाहू शकत नाहीत, किंबहुना त्यांची कुवतदेखील कुठेतरी कमी पडत असावी. मला नक्की माहीत नाही.. असो..

या पार्श्वभूमीवर विशाल-शेखरचं नक्कीच कौतुक आणि अभिनंदन की त्यांनी हा छोटेखानी यमन आम्हाला दिला..

हाल ए दिल तुमसे कैसे कहू..

स्वभावत:च हे गाणं म्हणजे एक गुणगुणणं आहे. स्वत:शीच साधलेला संवाद आहे. माझं 'हाल ए दिल..' बाई गं तुला कसं सांगू? 'नी़रेग' ही यमनची अगदी 'बेसिक लेसन' असलेली संगती छानच गायली आहे बच्चनसाहेबांनी. त्याच 'हाल ए दिल' ची 'प परे' ही अजून एक संगती. आणि 'कैसे कहू..' तला षड्ज. व्वा बच्चबबुवा!

यादो मे ख्वाबों मे..

डायरेक्ट धैवतावर न्यास असलेली 'यादो मे' तली 'गपध' संगती पुन्हा छान आणि 'ख्वाबो मे' तली 'धनीनीध..' ही सुरावट घेऊन बच्चनसाहेब ज्या रितीने पंचमावर स्थिरावतात ते केवळ सुरेख आणि कौतुकास्पद. हा पंचम अत्यंत सुरीला..!

'आपकी छब मे रहे..'

इथे 'आप की' शब्दातली पपम' संगती. हा तीव्र मध्यम यमनाची खुमारी वाढवतो, जादुई तीव्र मध्यम हा..! आणि 'छब मे रहे..' मध्ये हळूच लागलेला शुद्ध मध्यम आणि शुद्ध गंधारावरचा नाजूक न्यास! हा शुद्ध मध्यम आल्यामुळे मात्र आमचा यमन हळूच लाजतो आणि क्षणात त्याचा 'यमनकल्याण..' होतो. सांगा पाहू, कोणता बरं हा शुद्ध मध्यम? 'क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा..' ही ओळ आठवा पाहू क्षणभर. यातल्या 'मेळ' या शब्दात तुम्हाला हाच शुद्ध मध्यम सापडेल. हे आपले उगीच तात्यामास्तरांच्या शिकवणीतले दोन बोल, जे वाचक संगीताचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता बर्र् का! :)

'आठवणीत आणि स्वप्नात मी तुझ्याच 'छब' मध्ये राहतो गं बये. आता काय नी कसं सांगू तुला..!' :)

आणि ही बया तरी कोण..? तर साक्षात ड्रीमगर्ल हेमा. हो, आमच्या धर्मा मांडवकाराची हेमा! खरंच कमाल आहे बुवा या बाईची. इतकं वय झालं तरी अजूनही काय दमखमातली दिसते!


तर अशी ही दमखमातली हेमा आणि आमचा पिकल्या फ्रेन्च कट मधला गॉगल लावलेला बुढ्ढा जवान बच्चन यांच्यावरचं या गाण्याचं चित्रिकरणही छान. आणि सोबत बच्चनचा सादगीभरा सुरीला आवाज, छान सुरेल लागलेले यमनाचे स्वर आणि हाल ए दिल सांगणारे शब्द..!

विशाल शेखर, तुमचं अभिनंदन आणि कौतुक. अशीच चांगली चांगली गाणी, सुरावटी अजूनही बांधा रे बाबांनो. थांबू नका. हल्लीच्या काळात चांगलं सिनेसंगीत ऐकायला मिळत नाही. आम्ही भुकेले आहोत. चांगली चांगली गाणी बांधा, तुमच्या उष्ट्याकरता नक्की येऊ..!

-- तात्या अभ्यंकर.

October 26, 2011

मोरा गोरा रंग..

माझ्या सर्व मायबाप वाचकांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!

मोरा गोरा रंग.. (येथे ऐका)


थोरल्या बर्मनदांचं बंदिनी चित्रपटातलं एक अप्रतीम गाणं. दिग्दर्शक बिमलदा, गीत- गुलजारसाहेब, संगीतकार थोरले बर्मनदा, सोज्वळ सौंदर्यवती नूतन आणि मा दिनानाथरावांची थोरली हृदया, अर्थात लतादिदि मंगेशकर. (आपल्या महितीसाठी - दिदिचं पाळण्यातलं नांव - 'हृदया' हे होय.)

सगळी टीमच भन्नाट. फक्त आणि फक्त उत्कट कलेशी बांधिलकी असलेली. यातलं ना कुणी त्या बापुडवाण्या झी/सोनी वहिनीच्या उथळ इंडियन आयडॉलच्या स्पर्धेतलं, ना कुणी महागायक/महागयिका, महाराष्ट्राचा गौरव इत्यादी समस चा लाचारी जोगवा मागणर्‍या खेदजनक स्पर्धेतलं. तरीही सारेच अव्वल..!

मोरा गोरा अंग लइ ले
मोहे शाम रंग दइ दे
छुप जाऊँगी रात ही में
मोहे पी का संग दइ दे

एका तरुणीचं मनोगत. लइ ले आणि दइ दे ही क्रियापदं अगदी वळणदार..किती सुरेख शब्द आहेत या गाण्यात! हिंदी भाषेचा गोडवा काही औरच आणि त्यातले लइ दे, दइ दे, हमका बताइ दे इत्यादी उच्चार केवळ दिदिनेच करावेत..

एक लाज रोके पैयाँ
एक मोह खींचे बैयाँ

क्या बात है! जेवढा मोठा मोह, तितकीच मोठी अदब आणि संस्कार..! मोहाने बाही खेचली जातेय परंतु संस्कार पाउलांना थांबवताहेत..! 'एक मोह खिचे पैया' तल्या दिदिच्या कोमल गंधाराबाबत काही भाष्य करायला मी फार छोटा माणूस आहे! 'बैयाँ' शब्दातली 'नीसां' संगती केवळ लाजवाब. आणि त्यानंतरचं दिदिचं 'हाए..!'

असं 'हाए' गेल्या दहा हज्जार वर्षात झालं नाही आणि पुढे होणार नाही..! (जाता जाता - तेच 'हाए' अनुराधा या अप्रतीम चित्रपटात पं रवीशंकरांनी दिदिच्या 'कैसे दिन बिते कैसे बिती रतिया..' या गाण्यात घेतलं आहे!)



जाऊँ किधर न जानूँ
हम का कोई बताई दे

'जाऊँ किधर न जानूँ..' या ओळीतलं कोमल निषाद आणि शुद्ध धैवताचं तसं अनोखं परंतु छान अद्वैत..आणि त्याच नीध चं 'हम का कोई बताई दे' या ओळीनं पंचमावर न्यास करून केलेलं छान समाधान..!

बदरी हटा के चंदा
चुप के से झाँके चंदा

हम्म! इतका वेळ ढगाआड लपलेला चंदा आता हळूच त्या मुलीचं मनोगत ऐकायला आला आहे. प्रकट झाला आहे.

तोहे राहू लागे बैरी
मुस्काये जी जलाइ के

पण तिला ते तेवढंसं आवडलेलं नाहीये. तिच्या चेहेर्‍यावरचा तो लटका राग केवळ क्लास! आणि मग 'तोहे राहू लागे बैरी..' असं म्हणून त्या चंद्राला 'तुझ्यामागे राहूचं शुक्लकाष्ट लागो..' अशी दिलेली प्रेमळ धमकी!

आपले गुलजारसाहेब शनीच्या ऐवजी बहुधा राहूला अधिक घाबरत असावेत. म्हणूनच ते नायिकेकरवी चंद्राच्या मागे चक्क राहूची पीडा लावू इच्छितात..! :)

कुठे अवखळपणा तर कुठे थोडा नखरा, कुठे लटकेपणा तर कुठे 'मोहे पी का संग..' किंवा 'तोहे राहू लागे बैरी..' तली मनलुभावणी मेलडी. एखादं गाणं किती देखणं असावं, सुरेख असावं..?

कहाँ ले चला है मनवा
मोहे बाँवरी बनाइ के

क्या केहेने! इथे किती मोठी गोष्ट सांगून गेलेत गुलजारसाहेब! प्रत्येक तरुणीच्या आयुष्यात असं एक वेडं वय येतं जेव्हा कुणीतरी भेटावसं वाटतं, कुणासोबततरी हातात हात धरून कुठेसं जावसं वाटतं. मस्त वार्‍यावर फडफडणारं मन. अगदी खरोखर 'बाँवरी' बनवणारं ते वय..!

मंडळी, एखादं गाणं आपल्याला ऐकायला आवडतं, कानांना गोड वाटतं. परंतु मी इथे इतकंच सांगेन की आपण त्याही पुढे जाऊन त्या गाण्याकडे कसं बघतो, त्यातल्या स्वरसंगती, न्यासस्वर, लयतालाची बाजू, त्यातले शब्द अन् त्याची चाल कशी समजून घेतो हेही महत्तवाचं आहे. त्यामुळे ते गाणं आपल्याला निश्चितच अधिकाधिक आनंद देऊन जाईल..

उगाच कुठेही गोंगाट नसलेला कमीतकमी वाद्यमेळ, सुंदर शब्द, वजनदार ठेका, तरीही अगदी भरपूर मेलडी असलेलं हे गाणं. नूतनची मोहक छबी आणि तिचा सहजसुंदर गाण्यानुरूप अभिनय. का माहीत नाही परंतु नूतनकडे बघताना मला उगाचंच आमच्या मुमताज जहान बेगम दहलवी 'आपा'ची आठवण झाली! :)

आता कुठे गेली हो अशी गाणी? खरंच, कुठे गेली..? :(

आहे तो केवळ बराचसा गोंगाट अन् मेलडीचा अभाव असलेले भडक वाद्यमेळ..!

असो..

-- (दिदिची व्यक्तिपूजा, विभूतीपूजा करणारा तिचा एक लोटांगणवादी चाहता) तात्या अभ्यंकर.

October 10, 2011

हाथ छुटे भी तो...


आज पुन्हा एकदा खूप काही हरवलं आहे. पोटात खूप काही तुटतं आहे. जगजीत सिंग साहेबांसारख्या एका मनस्वी सुरील्या, भावतरल गळ्याच्या धन्याला आज आपण मुकलो आहोत. एक खूप मोठा कलाकार आज आपल्यातून निघून गेला आहे.

जगजित सिंग यांच्याच एका गाण्याचे रसग्रहण करण्याचा माझा हा एक प्रयत्न. हीच माझी त्यांना विनम्र आदरांजली..!

हाथ छुटे भी तो..!
(इथे ऐका)

'पिंजर' चित्रपटातलं उतम सिंग यांचं संगीत असलेलं जगजित सिंग यांनी गायलेलं हे गाणं. केवळ अप्रतीम. हे गाणं ऐकलं की काव्य, संगीत आणि गायन या सर्वार्थाने एक अत्यंत उच्च दर्जाचं गाणं ऐकल्याचं समाधान मिळतं, जीव तृप्त होतो!

हाथ छुटे भी तो रिश्ते नही छुटा करते,
वक्त की शाख से लम्हे नही टुटा करते!

पुरियाधनाश्रीचे बेचैन स्वर. राग पुरियाधनाश्री. समाधीचा राग..!

'वक्त की शाख से लम्हे..' या ओळीतील 'लम्हे'वर कोमल धैवत विसावतो, उदास सायंकालच्या सावल्या लांबतात आणि ते 'लम्हे' काळजात घर करतात..!

जिसने पैरों के निशा भी नही छोडे पिछे,
उस मुसाफिर का पता भी नही पुछा करते..!

क्या केहेने..! या ओळीचं चित्रिकरण तर विशेष सुरेख आहे!

जिसने पैरो के..' ही ओळ जेव्हा तार षड्जाला स्पर्ष करते तिथे पुरियाधनाश्री जीव कासावीस करतो. ते पुरियाधनाश्रीचं समर्पण! आणि त्यानंतरची पंचामवरची अवरोही विश्रांती. हा खास पुरियाधनाश्रीतील पंचम. प्रार्थनेचा पंचम..! आणि ही सारी जगजितसिंग साहेबांच्या सुरांची आणि त्यांच्या विलक्षण भावपूर्णता असलेल्या ओल्या रसिल्या गळ्याची किमया..!

'छुट गये यार ना छुटी यारी मौला..' चा कोरस सुंदर. कोरसचं सरगम गायनही अगदी परिणामकारक. गाण्याच्या चित्रिकरणातील उर्मिला अभिनयात, दिसण्यात नेहमीप्रमाणेच लाजवाब!

प्रिय जगजित सिंग साहेब,

हाथ छुटे भी तो रिश्ते नही छुटा करते,
वक्त की शाख से लम्हे नही टुटा करते!

खरं आहे आपण म्हणता ते. आज आपण आम्हा सर्वांचा हात सोडून निघून गेला आहात, परंतु आपल्यातलं सुराच नातं कधीही तुटणार नाही. आम्हाला तृप्ती, समाधान आणि आनंद देणर्‍या आपल्या अनेक मैफलींमधले, गायकीमधले लम्हे कधीही पुसले जाणार नाहीत, विसरले जाणार नाहीत.

सुरांनी बांधलेली नाती कधीही तुटत नाहीत हेच खरं..!

-- तात्या अभ्यंकर.