नेनेसाहेब तसा मध्यमवर्गीय, नोकरदार माणूस. पुण्यातल्याच कुठल्याश्या उपनगरातील एका कंपनीत नोकरीला. माझ्या ना नात्याचा, ना गोत्याचा. मग असं काय बरं विशेष होतं नेनेसाहेबांच्यात की ज्यामुळे त्यांचे माझे जन्माचे ऋणानुबंध जोडले गेले? कारण एकच. नेनेसाहेबांकडे शास्त्रीय संगीताच्या प्रत्यक्ष कार्यक्रमांच्या (लाईव्ह रेकॉर्डींग) ध्वनिफितींचा प्रचंड संग्रह होता. प्रचंड म्हणजे शब्दश: प्रचंड! आणि रसिक मंडळींना तो ते कधीही ऐकवायला अगदी हसतमुखाने तयार असत. ठाण्याचे माझे मित्र नंदन म्हसकर यांनी प्रथम त्यांची माझी गाठ घालून दिली.
नेनेसाहेबांच्या घरी म्हसकरांबरोबर मी अगदी प्रथम गेलो तो दिवस मला अजूनही आठवतो. "हे माझे मित्र तात्या अभ्यंकर. गाण्याचे खूप शौकीन आहेत." म्हसकरांनी ओळख करून दिली.
नेनेसाहेबांचं घर म्हणजे सदाशिवपेठेतल्या एका वाड्याची एक लहानशी खोली. त्यात दोन कपाटं, एक खाट, आणि उरलेल्या जागेत ओटा असल्यामुळे त्या जागेला स्वयंपाकघर म्हणायचं. कोपऱ्यातच एक लहानशी मोरी! बास..! एवढाच होता नेनेसाहेबांचा संसार. एकूलती एक मुलगी लग्न होऊन सासरी नांदायला गेलेली.
"बोला काय ऐकवू?" नेनेसाहेबांनी सवाल टाकला. एकदम हा प्रश्न आल्यामुळे मी थोडा गडबडूनच गेलो. "काहीही ऐकवा. अण्णांचं काही लाईव्ह ध्वनिमुद्रण असेल तर मला ऐकायला आवडेल!" मी.
"अरे वा! आत्ता ऐकवतो," असं म्हणून नेनेसाहेब उठले आणि त्यांनी एक जाडजूड रजिस्टरच माझ्या हाती ठेवलं. बाडच म्हणा ना!
"ही पहिलीच काही पानं बघा. तुम्हाला त्यांच्या ध्वनिमुद्रणांची सगळी यादीच पहायला मिळेल. पहिला मान अर्थातच भीमसेनजींचा! बोला, कोणतं ध्वनिमुद्रण लावू? अगं ऐकलंस का? कॉफी टाक पाहू झकासपैकी, आणि काहीतरी खायलाही दे! हे माझे मित्र ठाण्याहून आले आहेत. भीमसेनप्रेमी आहेत!"
पहिल्या भेटीतच मला 'मित्र' असं संबोधून नेनेसाहेब मोकळे झाले होते! त्यांची 'अगं' तिथेच ओट्याजवळ उभी होती. ह्या बाईंचा स्वभाव अगदी गरीब असणार हे त्यांच्या चेहऱ्यावरून अगदी कुणीही ओळखावं. त्यासुद्धा नेनेसाहेबांसारख्याच अगदी हसतमुख होत्या.
नेनेसाहेबांनी माझ्या हाती ठेवलेलं ते जाडजूड बाड मी उलगडून पाहू लागलो. ते पाहताना मला फक्त चक्कर यायचीच बाकी होती. भीमण्णा, किशोरीताई, मालिनीबाई, आमिरखा, कुमारगंधर्व,.... यादी लांबतच चालली होती. त्यांच्या संग्रहात जुना-नवा कुठला कलाकार नव्हता असं नव्हतंच! आणि प्रत्येकाची एखाद दोन नव्हेत तर अक्षरश: शेकड्यांनी ध्वनिमुद्रणं होती. सगळीच्या सगळी प्रत्यक्ष मैफलीतली! बाजारात व्यावसायिक स्तरावर मिळणारं एकही ध्वनिमुद्रण त्यात नव्हतं! मंडळी, ते बाड पाहताना मला किती आनंद झाला हे मी शब्दात नाही सांगू शकणार!
"बोला तात्या बोला! काय ऐकायचंय?" नेनेसाहेबांच्या या प्रश्नानी मी एकदम भानावर आलो. काय सांगणार होतो मी त्यांना? अहो किती ऐकावं आणि किती नाही अशी माझी परिस्थिती झालेली! त्यादिवशी थोडंफार ध्वनिमुद्रण ऐकून आम्ही तेथून निघालो. "पुन्हा या नक्की. अगदी केव्हाही या. मस्तपैकी गाणं ऐकू." असा आम्हाला नेनेसाहेबांनी हसतमुखानी निरोप दिला.
त्यानंतर मी जेव्हा जेव्हा पुण्याला गेलो तेव्हा नेनेसाहेबांच्या घरी फेरी झाली नाही, असं कधी झालंच नाही. कुणाचं गाणं नाही ऐकलं मी त्यांच्याकडे? अरे बापरे माझ्या! मोठ्ठी यादीच होईल त्याची. भीमण्णा, किशोरीताई, कुमारजी, अभिषेकीबुवा, उल्हास कशाळकर, राशिदखान, अजय चक्रवर्ती, वीणाताई, प्रभाताई, रामभाऊ, हे मी प्रत्यक्ष ऐकलेले कलाकार. त्यांचं तर ध्वनिमुद्रण होतंच. त्याशिवाय मास्तर, निवृतीबुवा, गजाननबुवा, मिराशीबुवा, फैयाजखा, आमिरखा, खादिमहुसेनखा, विलायतहुसेनखा, सवाईगंधर्व, या जुन्या मंडळींचीही बरीच ध्वनिमुद्रणं त्यांच्याकडे ऐकायला मिळाली. अगदी मनमुराद, समाधान होईस्तोवर!
नेनेसाहेबांच्या घरच्या प्रत्येक फेरीत मी अगदी मनसोक्त गाणं ऐकत होतो. मनात साठवत होतो, शिकत होतो. अक्षरशः आयुष्यभरची कमाई होती ती नेनेसाहेबांची. मला ते नेहमी म्हणायचे,
"अहो तात्या, हे सगळं मी कसं जमवलं माझं मला माहीत! कुठे कुठे म्हणून नसेन फिरलो मी याच्याकरता? किती पैसे खर्च केले असतील पदरचे! पण आज हा संग्रह पाहिला की माझं मलाच समाधान वाटतं. तुमच्यासारखे चार रसिक घरी ऐकायला येतात, बरं वाटतं! आता नोकरीतून लवकरच निवृत्त होणार आहे. मग काय, फक्त संगीत आणि मीच! अहो पुढचं सगळं आयुष्यभर ऐकत बसलो तरी संपणार नाही एवढं अफाट ध्वनिमुद्रण जमवून ठेवलं आहे मी!
नेनेसाहेबांचा हा अभिमान अगदी सार्थ होता!
खरंच, आमचे नेनेसाहेब म्हणजे खूप मोठा माणूस हो.. मुलखावेगळाच! स्वत: कष्ट करून जमवलेली ध्वनिमुद्रणे लोकांना हौशिहौशीने स्वत:च्याच घरी बोलावून ऐकवणार, वर त्यांची चहापाण्याचीही सरबराई करणार! या माणसाची हौसच दांडगी. मी इतक्या वेळा त्यांच्याकडे गेलो असेन पण कधीही त्यांच्या चेहऱ्यावर कंटाळा बघितला नाही. संध्याकाळी सहा वाजता गेलो की रात्रीचे दहा कधी वाजायचे ते समजायचंच नाही. " बसा हो तात्या, काय घाई आहे? जाल सावकाश! आता जेवुनच जा!" असा आग्रहही नेहमी व्हायचा.
असाच एक दिवस. मी नेनेसाहेबांच्या घरी गेलो होतो. बाडातून भीमण्णांच्या यमनचं साठ सालातलं एक ध्वनिमुद्रण लेलेसाहेबांना ऐकवायला सांगितलं. त्यावर ते म्हणाले,
"ठीक आहे. काढून आणतो. पुढच्या वेळेला आलात की नक्की ऐकवतो!"
"काढून आणतो? मी समजलो नाही नेनेसाहेब!"
"तात्या, त्याचं काय आहे की काही काही खास ध्वनिमुद्रणं मी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवली आहेत. खूप जपायला लागतात ती. तुम्ही म्हणता तो अण्णांचा यमन तसाच अगदी खास आहे.!!!
बँकेच्या लॉकरमध्ये? आणि ध्वनिमुद्रणं???? मंडळी, मी खाटेवरून पडायच्याच बेतात होतो. पण ती वस्तुस्थिती होती. लोक साधाराणपणे सोनं-चांदी-हिरे-मोती बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतात. पण जिवापाड मेहनत घेऊन जमवलेलं एकन्एक ध्वनिमुद्रणाचं मोल आमच्या नेनेसाहेबांकरता कुठल्याही हिऱ्यापेक्षा कमी नव्हतं हेच खरं!
नेनेसाहेबांचं कुटुंब कधी बाहेरगावी गेलेलं असलं की शनिवार-रविवारची सुट्टी पाहून आम्ही चार मित्र तर अक्षरश: धमालच करायचो. मी, म्हस्करसाहेब, सुधांशु वझे हे आमचे पुण्यातलेच आणखी एक मित्र, आणि स्वत: नेनेसाहेब. शनिवारी संध्याकाळी ५-६ च्या सुमारास आम्ही सगळे नेनेसाहेबांच्या घरी जमत असू. त्यानंतर मग रात्री साडेआठ, नऊपर्यंत श्रवणभक्ती. त्यानंतर मग बादशाही, किंवा पुना गेस्टहाऊस सारख्या एखाद्या ठिकाणी जाऊन रात्रीचे फर्मास भोजन. भोजन झालं की जरा शतपावली, पानबिन खाऊन आमचा डेरा पुन्हा नेनेसाहेबांच्या घरी पडायचा तो अगदी पहाटेपर्यंत!
काय सांगू तुम्हाला मंडळी मी! खूप धमाल यायची हो. कुणाला काय हवं ते नेनेसाहेब ऐकवायचे. ऐकणाराने फक्त बाड उघडून हुकूम करायचा. त्या दोन दिवसात तर नेनेसाहेबांचा उत्साह अगदी ओसंडूनच वहात असायचा! भरपूर गाणं ऐकणं व्हायचं. गप्पाही अगदी भरपूर. मग रात्री दोन-अडीच वाजता नेनेसाहेब स्वत: झकासपैकी कॉफी करायचे!
कोण होते हो नेनेसाहेब? एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस. १० बाय १० च्या अवघ्या एका खोलीत राहणारा! पण खरं सांगतो मंडळी, नेनेसाहेबांची ती त्या लहानश्या खोलीतली संपत्ती कुणा बंगलेवाल्याकडेही नसेल!
आज नेनेसाहेबांवर दोन शब्द लिहायला बसलो आणि मन अगदी भरून आलं. अशी माणसं पुन्हा पुन्हा होत नाहीत. १९६० सालात संस्मरणीय ठरेल असा यमन गाणारे आमचे अण्णा तर मोठे आहेतच, पण तेच यमनचं ध्वनिमुद्रण बॅकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवणारे आमचे नेनेसाहेबही मोठेच!
सर्वात दुर्दैवाची गोष्ट अशी की निवृत्त झाल्यानंतर एवढं अफाट गाणं ऐकायला, जरा निवांतपणे त्याचा आनंद लुटायला नेनेसाहेब पुढचे अवघे तीन महिनेही जगले नाहीत. किती क्रुर वागली नियती नेनेसाहेबांशी! मधुमेहाचं दुखणं. पायाला जखम झाल्याचं निमित्त झालं आणि आमचे नेनेसाहेब कायमचे निघून गेले ते कधीही परत न येण्याकरता!
मंडळी, संगीतातले ऋणानुबंध खूप त्रास देऊन जातात हेच खरं!
मला एकदा ते गंमतीने म्हणाले होते, "तात्या, तुम्ही एवढे अण्णांचे भक्त. मी मरतांना माझ्याकडील अण्णांच्या काही ध्वनिमुद्रिका तुमच्या नावावर करून जाईन हो!" एखादी इस्टेटच माझ्या नांवावर करावी अशा थाटात मोठ्या मिश्किलपणे हे उद्गार त्यांनी काढले होते!
आज मात्र त्यांना एवढंच सांगावसं वाटतं, 'की नको नेनेसाहेब. तुमची इस्टेट तुमच्याकडेच राहू द्या. फक्त एखाद्या शनिवारी-रविवारी पुन्हा एकदा घरी बोलवा हो आम्हा सगळ्यांना. रात्रभर अगदी मनसोक्त गाणं ऐकू!!!