December 25, 2008

मम सुखाची ठेव...

ती आली, तिनं पाहिलं, तिनं जिंकलं!

ती स्वरलता आहे, ती गानसम्राज्ञी आहे, ती मेलडीक्वीन आहे.....!

षड्ज पंचम भावातला सुरेल जुळलेला तानपुरा,
अन् त्यातला नैसर्गिक शुद्ध गंधार..
तो तर तिच्या गळ्यातच आहे...!
नव्हे, तर त्या गंधाराचं तंबोर्यातलं स्वयंभूत्व
हे तिच्या गळ्यानेच सिद्ध केलेलं आहे...!

कोमल अन् शुद्ध रिखभ, हे एरवी एकमेकांचे वैरी,
स्वभावाने अगदी एकदुसर्याच्या विरुद्ध,
परंतु दोघेही तिचेच आहेत...!

तोडीत दिसणारं कोमल गंधाराचं कारुण्य
हे तिनंच दाखवलं आम्हाला...
आणि बागेश्रीतला शृंगारिक कोमल गंधारही
तिनंच शिकवला आम्हाला...!

तिने स्वर लावल्यावर
तीव्र मध्यमातली अद्भुतता दिसली आम्हाला...
आणि शुद्ध मध्यमाचं गारूडही तिनंच घातलं आम्हाला...!

तिच्या पंचमातली अचलता आम्ही अनुभवली...
महासागराच्या ऐन मध्यावर एखाद्या जहाजाला
जसा एक आश्वासक सहारा मिळावा,
तसा सहारा, तसा आधार हा तिचाच पंचम देतो....!
हा पंचम एक आधारस्तंभ स्वर आहे,
आरोही-अवरोही हरकतींचं ते एक अवचित विश्रांतीस्थान आहे,
हे तिनं गायल्यावरच पटतं आम्हाला...!

तिच्याइतका सुरेख, तिच्या इतका गोड
शुद्ध धैवत गाऊच शकत नाही कुणी....
आणि तिच्याइतकं कुणीच दाखवू शकत नाही,
कोमल धैवताचं प्रखरत्व आणि त्याचं समर्पण....!

कोमल निषादाचं ममत्व अन् देवत्व,
तिच्यामुळेच सिद्ध होतं...
आणि तिच्या शुद्ध निषादामुळेच कळली आम्हाला
गाण्यातली मेलडी...!

आणि तिचा तार षड्ज?

गायकी म्हणजे काय, पूर्णत्व म्हणजे काय,
गाण्याचा असर म्हणजे काय,
हे तिथंच कळतं आम्हाला, तिथंच जाणवतं...तिच्या तार षड्जात..!

तिचा तार षड्जच पूर्ण करतो आमच्या
सगुण-निर्गुणाच्या अन् आध्यात्माच्या व्याख्या...
आणि तोच भाग पाडतो आम्हला,
ईश्वरी संकल्पनेवर विश्वास ठेवायला....!



ती गाते आहे, आम्ही ऐकतो आहोत...

सलीलदा, सचिनदा, पंचमदा, मदनमोहन, नौशादमिया
अन् कितीतरी अनेक..
तिच्या गळ्याकरताच केवळ,
पणाला लावतात आपली अलौकिक प्रतिभा...!
अन् तिच्याकडे पाहूनच
खुला करतात बाबुजी
"ज्योती कलश छलके"चा अमृतकुंभ...!

तिचं गाणं हा आमचा अभिमान आहे...
तिचं गाणं हा आमचा अहंकार आहे...
तिचं गाणं ही आमची गरज आहे...
तिचं गाणं ही आमची सवय आहे....
तिचं गाणं हे आमचं व्यसन आहे....
तिचं गाणं हे आमचं औषध आहे...
तिचं गाणं ही आमची विश्रांती आहे...
आणि
तिचं गाणं हेच आमचं सुख-समाधान आहे...

इतकंच म्हणेन की,

अन्न, वस्त्र, निवारा ह्या आमच्या मूलभूत गरजा.
त्यात आता तिच्या गाण्याचीही भर पडली आहे...!

शब्द खूप तोकडे आहेत,
तेव्हा पुरे करतो आता हे शाब्दिक बुडबुडे...

शेवटी एवढंच सांगून थांबतो की तिचं गाणं ही
"मम सुखाची ठेव" आहे!
"मम सुखाची ठेव" आहे!

--(तिचा भक्त, तिचा चाहता, तिचा प्रेमी!) तात्या अभ्यंकर.

हेच लेखन येथेही वाचता येईल..

‍‍

November 12, 2008

प्रभात राग रंगती...

भल्या पहाटे 'ललत'
षड्ज मध्यमी मूर्च्छना
चालली 'भटियारा'ची
प्रभातरंगी अर्चना

डमडम डमरूची
आली 'भैरवा'ची स्वारी
तीव्र मध्यम वाढवी
'रामकली'ची खुमारी

कारुण्यमय 'तोडी'ची
'आसावरी'शी संगती
'अहिरभैरवा' संगे
प्रभात राग रंगती..!

-- तात्या अभ्यंकर.

हीच कविता इथेही वाचता येईल..

November 06, 2008

माझे काही "पाहण्याचे" कार्यक्रम... :)

राम राम मंडळी,

(ह्या लेखातल्या ष्टोर्‍या या सूर्याइतक्या सत्य आहेत. परंतु पात्रांची नावे मात्र बदलली आहेत!)

तसा मी वृत्तीने खुशालचेंडूच! आजपर्यंत लग्नकार्य वगैरे काही केलं नाही. नाही, म्हणजे एक मुलगी तशी मला खूप आवडली होती परंतु तिच्याशी काय आपलं लग्न जमलं नाय बुवा! आमच्या हृदयावर पाय का काय म्हणतात तो देऊन एक भल्या इसमाशी विवाह करून ती बया माझ्या लाईफमधून कायमची चालती झाली. परमेश्वर त्या दोघांना सुखी ठेवो. असो, तो विषय डिटेलमंदी पुन्ना केव्हातरी.

तर काय सांगत होतो? हां! तर आपण अजूनपर्यंत लगीनकार्य वगैरे काय केलेलं नाही. अलिकडे एकेका विवाहीत पुरुषांचे हताश, निराश, न्यूनगंडग्रस्त, वैफल्यग्रस्त, भितीग्रस्त चेहेरे पाहिले की मी लगीन केलं नाय, हे एका अर्थी बरंच झालं असं अजूनही मला वाटतं! साला, आपण आपले अद्याप खुशालचेंडू 'भवरा बडा नादान' आहोत तेच बरं आहे!

पण बरं का मंडळी, अद्याप जरी मी लग्न केलेलं नसलं तरी मुली पाहण्याचे कार्यक्रम मात्र आपण अगदी चिक्कार केले बरं का! ती हौसच होती म्हणा ना आपल्याला! मुली पाहण्याचे कार्यक्रम करत होतो तेव्हा लगीन करायचंच नाही असं काय ठरवलं नव्हतं. च्यामारी बगू, आवडलीच एखादी, समजा अगदीच भरली मनात आणि तिनंही जर आपल्याला पसंद केलं तर करूनदेखील टाकू लग्न! हा विचार मनात होताच. साला आता चाळीशीत खोटं कशापायी बोला? पण तो काय योग आला नाय. काही मुली मला पसंद पडल्या नाहीत आणि एखाद दोन मुली मला प्रथमदर्शनी पसंद पडल्या, परंतु च्यामारी त्यांना काय आपलं थोबाड आवडलं नाय!

ते असो. परंतु मुली पाहण्याचे जे काही कार्यक्रम केले ते काही अणुभव मात्र खरोखरीच मजेशीर होते. आमचे पिताश्री चचलेले आणि म्हातारी जरा पायाने अधू, त्यामुळे मुलगी पाहायला मी नेहमी एकटाच जात असे.

आता मंडळी, मला सांगा की मी तिच्यायला जन्मजात थोराड दिसतो, दोन पोरांचा बाप दिसतो हा काय माझा दोष झाला का? अहो दिसणं काय कुणाच्या हातात असतं का? साला, आम्ही म्यॅट्रिक पास झालो तेव्हाच बीकॉम झाल्यासारखे दिसत होतो त्याला आता आमचा काय इलाज? मग बीकॉम नंतर दोन वर्षांनी तर आम्ही अजूनच थोराड दिसत असणार! त्याचा अनुभव मला लवकरच एक मुलगी पाहायला गेलो होतो तेव्हा आला. एका भल्या मुलीच्या भल्या बापाने त्याच्या नकळतच आमच्या थोराडपणाचे धिंडवडे काढले होते!

बोरिवलीचं एक स्थळ होतं. जुजबी पत्रिका जुळली, फोनाफोनी झाली आणि एका रविवारी भल्या सकाळी मी त्या स्थळाचा बोरिवलीचा पत्ता हुडकत हुडकत त्या बिल्डिंगपाशी पोहोचलो. खाली नावांच्या पाट्या पाहिल्या. आमचं भावी सासर दुसर्‍या मजल्यावर होतं. पहिला मजला चढलो. जिन्यासमोरच्याच एका ब्लॉकचं दार उघडं होतं. बाहेरच्याच खोलीत कुणी काकू काही निवडत टीव्ही पाहात बसल्या होत्या. आमची नजरानजर झाली. माझ्या चेहेर्‍यावर नवख्या माणसाचे भाव होते. दुसरा मजला चढण्याकरता म्हणून मी वळलो तर मागून त्या काकूंची हाक ऐकू आली.

"कोण पाहिजे?"

"जोशी दुसर्‍या मजल्यावर राहतात ना? त्यांच्याकडे जायचंय."

"हो, हो, दुसरा मजला, ब्लॉक नंबर १०" काकू हासत हासत म्हणाल्या आणि आत वळल्या. मी तीन-चार पायर्‍या चढलो असेन नसेन, तोच मला त्या काकूंचा संवाद ऐकू आला. त्या बहुधा आपल्या 'अहों'शी बोलत असणार,

"बहुधा आरतीला पाहायला आले असावेत!"

छ्या! साला मी त्या आरतीला पाहायला जाणारा कुणी असेन किंवा तिच्या बापावर कोर्टाचं समन्स बजावणारा कुणी असेन! ह्या काकूला करायचंय काय!

दुसर्‍या मजल्यावर पोहोचलो. १० नंबरचा ब्लॉक जोश्यांचाच होता. मी दार ठोठावलं. एका सद्गृहस्थानं दार उघडलं. तो बहुतेक स्वत: जोश्याच असावा.

"नमस्कार. मी अभ्यंकर."

"या, या! आम्ही तुमचीच वाट पाहात होतो!" जोश्या शक्य तितक्या अदबीनं म्हणाला.

मी घरात शिरलो. जोश्या 'बसा' म्हणाला. पुढचा क्षण हा नियतीने आमच्या थोराडपणावर घातलेला घाला होता!

"हे काय? मुलगा कुठे आहे? तो नाही का आला?" जोश्याने आपलेपणाने, भोळेपणाने विचारलंन, परंतु आपण नक्की कुठला बाँब टाकला आहे याची त्या बिचार्‍या जोश्याला कल्पना नव्हती!

"मुलगा? अहो मीच मुलगा आहे!" :)

"हो का? वा वा वा!" जोश्या मनसोक्त हासत उद्गारला! :) :)

पुढची ष्टोरी सांगवत नाही!

तिथनं सुटलो आणि जिने उतरू लागलो. त्या पहिल्या मजल्यावरच्या तांदूळ निवडणार्‍या काकू दारातच उभ्या होत्या. त्या मला खो खो हासत आहेत असा उगाचंच मला भास झाला!

------------------------------------------------------------------------------------------------

बिवलकर! मुलुंडचं एक स्थळ. दुपारची ५ ची वेळ. ठरल्या वेळेनुसार मुलगी पाहायला म्हणून मी त्या घरी पोहोचलो. दारावरची बेल दाबली.

एका आठवी-नववीतल्या पोरसवदा मुलीने दार उघडलं. बहुधा नवर्‍या-मुलीची धाकटी बहीण असावी. पत्रिकेत दिलेल्या माहितीनुसार मुलीला एक धाकटी बहीण आणि भाऊ आहेत हे मला आठवलं!

"नमस्कार. मी अभ्यंकर."

ती मुलगी दार उघडून खुदकन हासत आत पळाली. बहुधा ताईला "भावी जिज्जाजी आले बरं का!" हे सांगायला गेली असावी!

"या या!"

बिवलकराने माझं स्वागत केलं. खाली कारपेटवर उघड्या अंगाचा बिवलकर बसला होता. बसला कसला होता, पसरलाच होता जवळजवळ! पट्ट्यापट्ट्याची अर्धी चड्डी आणि उघडाबंब! छ्या! या बिवलकराला अगदीच सेन्स नव्हता. अरे तुझ्या मुलीला पाहायला मंडळी येणार आहेत ना? अरे मग निदान लेंगा आणि एखादा साधा शर्ट घालून तरी बस ना! पण मंडळी, मला तरी तो बिवलकर तसाच आवडला होता! सेन्सबिन्स गेला खड्ड्यात!

"बसा! काय म्हणताय? घर सापडलं ना पटकन? की शोधायला काही त्रास झाला?"

बिवलकरने जुजबी संभाषण सुरू केलं.

"छ्या! सालं मुंबईत काय भयानक उकडतं हो आजकाल!" एका टॉवेलनं मानेवरचा घाम पुसत बिवलकर म्हणाला! बिवलकराने एव्हाना माझ्यातला व्यक्तिचित्रकार जागा केला होता!

एकंदरीत ते घर मला फार आवडलं होतं, बिवलकर आवडला होता. अवघडलेपण जाऊन मीही तिथे अगदी लगेच रुळलो. आतल्या खोलीतून खाण्याचा सुंदर वास येत होता. हम्म! खायचा बेत कहितरी जोरदार असणार!

थोड्या वेळाने नवरीमुलगी आतल्या खोलीतून बाहेर आली. सोबत बिवलकरकाकूही होत्या. घरगुती साडीतल्या, दात अंमळ पुढे असलेल्या बुटक्याश्या बिवलकरकाकू तेवढ्याच साध्या आणि सालस वाटत होत्या.

"नमस्कार मेहेंदळे!" बिवलकरकाकू म्हणाल्या.

"मेहेंदळे??" साला, आता हा मेहेंदळ्या कोण? मला काही कळेना!

"आग्गं! कम्माल आहे तुझी पण!" बिवलकर डाफरलाच जवळजवळ!

"अगं हे मेहेंदळे नाहीत, अभ्यंकर आहेत!"

बिवलकर आता बायकोवर चांगलाच वैतागला होता. आईने केलेल्या नावाच्या घोटाळ्यामुळे नवर्‍यामुलीचा चेहराही एव्हाना कसनुसा झाला होता.

"अभ्यंकर? अरे हां हां! बरोबर! अभ्यंकरच. सॉरी हां, माझा जरा घोटाळा झाला. मेहेंदळे सात वाजता यायच्येत!"

असं म्हणून भाबडेपणाने, मोकळेपणाने हासत काकू उद्गारल्या! छ्या! मला तर आता त्या मुलीपेक्षा काकूच जास्त आवडू लागल्या होत्या!

इथे बिवलकराच्या कपाळावर पुन्हा एकदा आठ्या चढल्या होत्या. वेंधळ्या बायकोने मेहेंदळे नावाची कुणी अजून एक पार्टी त्यांच्या मुलीला पाहायला सात वाजता येणार आहे ही माहिती उगाचंच उघड केली होती!

नवर्‍यामुलीशी, बिवलकर फ्यॅमिलीशी माझ्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या. जरा वेळाने मात्र त्या बिवलकरकाकूंचा मी आजन्म ऋणी राहीन असा बेत पुढ्यात आला. अप्रतीम चवीचा वांगी-भात, सोबत तितकीच सुंदर काकडीची कोशिंबिर आणि घरी केलेली अतिशय सुरेख अशी नारळाची वडी! माझ्यातला लाजराबुजरा नवरामुलगा केव्हाच पळाला होता आणि रसिक खवैय्या जागा झाला होता. मी मनमुराद दाद देत त्या बेतावर तुटून पडलो! स्वत: बिवलकर आणि बिवलकर काकू मला आग्रहाने खाऊ घालत होते. वांगीभाताचा आग्रह सुरू होता, नको नको म्हणता दोनपाच नारळाच्या वड्याही झाल्या होत्या!

"अहो घ्या हो अभ्यंकर! अहो लग्न जमणं, न जमणं हे होतच राहील. पण तुम्ही इतकी दाद देत आपुलकीने खाताय हीच आमच्याकरता खूप मोठी गोष्ट आहे!" बिवलकरकाकूंमधली अन्नपूर्णा प्रसन्नपणे मला म्हणाली!

मंडळी, बिवलकरांच्या मुलीने मला पसंद केलं की नाही किंवा मी तिला पसंद केलं की नाही हा भाग वेगळा, परंतु आजही वांगीभात म्हटलं की मला बिवलकरकाकू आठवतात! तसा खमंग आणि चवदार वांगीभात मी पुन्हा कधीच खाल्ला नाही!

-- तात्या अभ्यंकर.

हेच लेखन येथेही वाचता येईल...

November 01, 2008

आमचे मधुभाई...!

काही वर्षांपूर्वी डोंबिवलीच्या सर्वेश सभागृहात मधुभाईंची एक अत्यंत रंगलेली मैफल. तबल्याच्या साथीला तालयोगी पं सुरेश तळवलकर. श्रोतृवर्गात पद्मा तळवलकर, शुभदा पराडकर, पं अरूण कशाळकर, पं उल्हास कशाळकर आणि यांसारखे अनेक उत्तम कलाकार. यमन रागाने मैफलीला सुरवात व पुढे संपूर्ण मैफलच चढत्या भाजणीने रंगत गेलेली! यमन, सावनी, बसंतबहार असे एकापेक्षा एक सुरेख राग मघुभाईंनी लीलया पेश केले व श्रोत्यांना स्वरलयीच्या आनंदात अक्षरश: न्हाऊ घातले. मी त्या मैफलीचा साक्षिदार होतो. मधुभाईंच्या काही मोजक्याच मैफली ऐकण्याचं परमभाग्य मला लाभलं आहे!

"बाजुबंद खुली खुली जाए.."

मधुभाईं अगदी रंगात येऊन भैरवीच्या सुरांची लयलूट करत होते. 'बाजुबंद...' मधल्या एकसे एक खानदानी, थेट 'दिलसे' आलेल्या जीवघेण्या जागा! जागा कसल्या, बाजुबंद, पाटल्या-तोडेच त्या! श्रोते मंडळी अक्षरश: चुकचुकत होती, हळहळत होती, रडत होती आणि त्या शापित यक्षाला दाद देत होती!

मधुकर गजानन जोशी, ऊर्फ पं मधुकर जोशी, ऊर्फ आमचे मधुभाई! गाण्यातला एक शापित यक्ष!
मुक्काम पोस्ट - डोंबिवली.

विलक्षण सांगितिक प्रतिभा लाभलेला एक गुणी कलाकार. पण लौकिक अर्थाने फारसा पुढे न आलेला, फारसा कुणाला माहीत नसलेला!

मधुभाईंना घरातनंच संगीताचं बाळकडू मिळालेलं. आजोबा पं अंतुबुवा जोशी. थोरल्या पलुसकरांच्या शिष्यपरंपरेतले ग्वाल्हेर गायकीचे एक दिग्गज गवई! वडील पं गजाननबुवा जोशी. ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर गायकी पचवलेले एक अत्यंत प्रतिभावन गवई आणि तेवढेच थोर गुरू! पं उल्हास कळाळकर, पं अरूण कशाळकर, विकास कशाळकर, पद्मा तळवलकर, शुभदा पराडकर यांसारख्या गायकांना ज्यांनी घडवलं असे गजाननबुवा! घरातच गाणं असल्यामुळे साहजिकच संगीताचे सूर मधुभाईंच्या कानावर जन्मापासूनच पडलेले.

कुशाग्र बुद्धीचा मधु भराभर गाणं उचलू लागला, टिपू लागला. भूप, यमन, मुलतानी, हमीर, छायानट, शंकरा, बिहाग, बसंत, सोहोनी आदी राग मधुभाईंच्या गळ्यावर चढू लागले आणि खास ग्वाल्हेर परंपरेचं अष्टांगप्रधान गाणं मधुभाई गाऊ लागले. गजाननबुवांना ग्वाल्हेरसोबतच आग्रा आणि जयपूरचीही अतिशय उत्तम तालीम मिळालेली, त्यामुळे मधुभाईंनाही साहजिकच या गायकींचं बाळकडू घरातच मिळालं! रायसा कानडा, ललिता गौरी, शुद्धनट, बसंतीकेदार यांसरखे एकापेक्षा एक सुरेख व दिग्गज राग मधुभाईही लीलया गाऊ लागले, मांडू लागले! सूरलयतालावर मधुभाईंची अफाट हुकुमत निर्माण झाली. बालपणीची काही वर्ष आजोबांकडूनही, म्हणजे अंतुबुवांकडूनही मधुभाईंना तालीम मिळाली. त्यानंतर वडिलांचं,म्हणजे गजाजनबुवांचं गाणं मधुभाईंनी अक्षरश: टिपलं, वेचलं! मुळात घरात गाणं, रक्तात गाणं, त्यात उत्तम तालीम आणि त्याला जोड म्हणून मधुभाईंची कुशाग्र बुद्धी! मधुभाईंमधला उत्तम गवई घडवायला या गोष्टी पुरेश्या होत्या!

गाण्याच्या सोबतीनेच व्हायोलीनचाही छंद मधुभाईना जडला आणि मधुभाई व्हायोलीनदेखील अतिशय उत्तम वाजवू लागले. गजाननबुवा स्वत:ही अगदी उत्तम व्हायोलीन वाजवायचे. लेकाने वडिलांचा हाही गूण अगदी सहीसही उचलला. पुढे काही वर्ष व्हायोलीनवादक म्हणून स्टाफ आर्टिस्ट या पदावर मधुभाईंनी मुंबई आकाशवाणीवर नोकरीही केली! मधुभाई व्हायोलीनही फार सुरेख वाजवतात!

मला मधुभाईंची मुलुंड मध्ये झालेली एक गाण्याची मैफल आठवते. मधुभाईंनी तेव्हा भूप मांडला होता. इतका अप्रतीम भूप मी त्यानंतर आजतागायत ऐकलेला नाही! ग्वाल्हेर पद्धतीने सादर केला गेलेला अगदी ऑथेन्टिक भूप! भूपासारख्या अत्यंत अवघड रागाचं शिवधनुष्य मधुभाईंनी अगदी लीलया पेललं होत! त्याच मैफलीत मधुभाईंनी तेवढ्याच सुंदरतेने ललितागौरी मांडला. 'प्रितम सैया..' ही ललितागौरीतली पारंपारिक बंदिश! ओहोहो, क्या बात है! मधुभाईंच्या ललितागौरीतल्या त्या "प्रितम सैया, दरस दिखा..."च्या त्या विलक्षण सुरांनी त्या संध्याकाळी अक्षरश: अंगावर काटा आणला. सगळी मैफलच त्या ललितागौरीने मंत्रमुग्ध होऊन गेली! आधी ग्वाल्हेर परंपरेतला भूप, ग्वाल्हेर गायकीच्या सौंदर्याची उधळण करत गाणारा हा शापित यक्ष नंतर जेव्हा त्याच ताकदीने जयपूर गायकीही तेवढ्याच समर्थपणे मांडत ललितागौरीही गाऊ लागला तेव्हा श्रोतृवर्ग अक्षरश: थक्क झाला. आजही ती मैफल मला आठवते आणि मी बेचैन होतो!

मंडळी, माझं भाग्य हे की मला मधुभाईंचा अगदी भरपूर सहवास लाभला. त्यांच्याकडून मला गाण्यातलं खूप काही शिकायला मिळालं आहे, आजही मिळतं आहे! अगदी कधीही त्यांच्या घरी जा, मधुभाई अगदी हसतमुखाने स्वागत करणार! मंडळी तुम्हाला काय सांगू, आमचे मधुभाई स्वभावानेही अगदी साधे हो! वास्तविक इतका विद्वान गवई परंतु त्या विद्वत्तेचा कुठेही गर्व नाही की शिष्टपणा नाही!

"मधुभाई, जरा ती यमनमधली "नणंदीके बचनवा सहे ना जाय.." ही बंदिश दाखवा ना!" असं नुसतं म्हणायचा अवकाश की लगेच मधुभाईंनी केलीच सुरू ती बंदिश! आणि मग ती गातांना तिचं सौंदर्य कुठे आहे, कुठे आघात द्यावा, शब्दांचा कसा कुठे उच्चार करावा, एखाद्या रागाकडे कसं बघावं, रागात काय मांडावं, कसं मांडावं, तालालयीचे हिशेब कसे साभाळावेत, कुठल्या रागाचं किती पोटेन्शियल आहे ते ओळखून कसं गावं, इत्यादी अनेक गोष्टींवर मधुभाई अगदी भरभरून बोलतात, हातचं काहीही राखून न ठेवता शिकवतात!

"अरे ताला-लयीशी खेळा रे, पण तिच्याशी मारामार्‍या नका करू! सम कशी सहज आली पाहिजे, तिला मुद्दामून ओढून-ताणून आणू नये! हां, आणि समेवर येण्यात वैविध्य पाहिजे, एकाच एक पद्धतीने समेवर येऊ नये! तुम्ही एखाद्याशी बोलताय, संवाद साधताय असं गायलं पाहिजे!"

मधुभाई सांगत असतात, शिकवत असतात, आम्ही शिकत असतो!

एका शिष्येला गाण्याची तालीम देताना मधुभाई -



आमच्या मधुभाईंचा स्वभावही अत्यंत बोलका आहे. सतत गाण्यातल्या कुठल्या ना कुठल्या विषयावर गप्पा मारतील, गजाननबुवांच्या, अंतुबुवांच्या, अन्य जुन्याजाणत्या बुजुर्गंच्या आठवणी सांगतील. मधुभाईंनी गाण्यातला खूप मोठा जमाना बघितला आहे, अनेक दिग्गज गवई अगदी भरभरून ऐकले आहेत. जगन्नाथबुवा, अण्णासाहेब रातंजनकर, मिराशीबुवा, कितीतरी गवयांची गाणी मधुभाईंनी अगदी भरभरून ऐकली आहेत! आणि घरात काय, साक्षात अंतुबुवा आणि गजाननबुवा! या सग़ळ्या मंडळींकडून मधुभाई खूप काही शिकत गेले, शिकले!

"अरे गजाननबुवांना मी फार घाबरायचो बरं का! खूप मार खाल्ला आहे मी बुवांच्या हातचा!" मधुभाई मोठ्या मिश्किलपणाने आपल्या वडिलांबद्दल बोलत असतात!

"काय सांगू तुला लेका, आमच्या नानांच्या (गजाननबुवांच्या) वार्‍यालाही मी फारसा उभा रहात नसे. शिक म्हटलं की चुपचाप शिकत असे. उल्हासला, पद्माला किंवा त्यांच्या इतर शिश्यांना तालीम द्यायचे तेव्हा मीदेखील तिथे हळूच जाऊन बसत असे आणि काय गातात,कसं गातात या सगळ्या गोष्टी टिपत असे! पण मी भाग्यवान रे, मला शेवटची काही वर्ष वडिलांची सेवा करण्याचं भाग्य मिळालं! म्हातारपणी त्यांच्या हातापायांना मालिश करावं लागत असे तेव्हा त्यांना मीच लागायचो. दुसरी कुणी भावंडं गेली की म्हणायचे, तुम्ही नको, मधुला बोलवा!" तीच सेवा आज थोडीफार उपयोगी पडते आहे आणि चार स्वर गाता येत आहेत!"

खरंच मंडळी, गाण्याची अन् गाणार्‍यांची ही विलक्षणच दुनिया आहे. भाईकाकांच्या भाषेत सांगायचं तर या दुनियेतली कुळं निराळी, इथले कुळाचार निराळे! मधुभाईंसारख्या जिनियस गवयाचा उल्लेख मी काही वेळा 'शापित यक्ष' असा का केला आहे याची कारणमिमांसा मी इथे करणार नाही! पण कारणमिमांसा जरी करणार नसलो तरी तो एक शापित यक्ष आहे हे नाकारता येणार नाही व म्हणून फक्त तसा उल्लेख मात्र मला करणं भाग आहे, नव्हे तो मी मुद्दामून केला आहे! परंतु बस इतकंच! लौकिक अर्थाच्या दुनियेत या शापित यक्षाचं स्थान काय आहे, काय नाही याच्याशी मला काही एक देणंघेणं नाही! माझा मतलब आहे तो त्यांची गायकी, त्यांचे सूर आणि त्यांची लयकारी, सरगमवरची त्यांची विलक्षण हुकुमत, याच्याशी! मधुभाईंसारखे गवई कुठच्या एका अज्ञात परंतु विलक्षण अश्या तिडिकेतून गातात, कुठली एक कसक त्यांच्यात संचारते आणि ते स्वरलयींची अप्रतीम अशी शिल्प घडवतात त्या तिडिकेबद्दल, त्या अज्ञात शक्तिबद्दल मी पुन्हा केव्हातरी बोलेन! अगदी भरभरून आणि मनमोकळेपणाने! हातचं काही राखून ठेवता! एक गोष्ट मात्र खरी की मधुभाईंसारखे काही गवई, काही कलाकार, हे लौकिक अर्थांच्या चौकटीत नाही बसत आणि त्यांना तसं बसवूही नये! कारण सगळ्याच प्रश्नांची उत्तरं काही आपल्याला माहीत नसतात! करायचंच असेल तर आपण फक्त त्याच्या कलेला वंदन करावं! असो...!

आमच्या मधुभाईंना नॉनव्हेज जेवण फार प्रिय बरं का मंडळी! मी कधी डोबिवलीला त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेलो की मुद्दामून म्हणतो,

"बुवा, आज जेवायला बाहेर जाऊया बरं का! सत्कार हॉटेलात मालवणी जेवण फार झकास मिळतं तिथे जाऊया!"

हे ऐकल्यावर बुवांच्या चेहेर्‍यावर एक निरागस आनंद पसरतो परंतु मला म्हणतात,

"अरे कशाला तुला उगाच खर्च? बरं चल, म्हणतोस तर जाऊया! पण पैसे मी देईन हो!"

"ते आपण बघुया बुवा! तुम्ही चला तर खरे!"

"बरं चल!"

असा आमचा संवाद होतो आणि आम्ही बाहेर जेवायला जातो. रस्त्याने एका दिग्गज गवयासोबत चालल्याची ऐट असते माझ्या चेहेर्‍यावर!

तात्या आणि मधुभाई मालवणी मटणाचं जेवत आहेत!



"आज सुरमई घेऊ या का रे? ताजी दिसते आहे!"

थोड्याच वेळात सुरमईची कढी आणि तळलेली तुकडी असलेली ताटं आमच्या पुढ्यात येतात!

"आणि बरं का रे, मटणसुद्धा मागव रे! आज जरा मन लावून मटणही खाईन म्हणतो!"

एखाद्या लहान मुलाने ज्या निरागसतेने चॉकलेट मागावं ना, अगदी तीच निरागसता मटण मागवताना आमच्या बुवांच्या चेहेर्‍यावर असते! त्यांची मटणाची फर्माईश पुरी करायला मला अगदी मनापासून आवडतं! कारण मी त्यांना फक्त तेवढंच देऊ शकतो! त्यांनी मला आजतागायत किती भरभरून दिलं आहे त्याची काही गणतीच नाही!

-- तात्या अभ्यंकर.

October 30, 2008

अवघा रंग एक झाला....

'अवघा रंग एक झाला,
रंगी रंगला श्रीरंग..'

रघुनंदन पणशीकरांनी भैरवीतला हा अभंग सुरू केला आणि समस्त श्रोतृसमुदाय दिवाळीच्या मुहूर्तावर त्या भैरवीच्या अभ्यंगस्नानात नाहून निघाला, तृप्त झाला..!

रघुनंदन पणशीकर..

'तो मी नव्हेच..' मधल्या निप्पाणीतल्या तंबाखूच्या व्यापार्‍याचा - लखोबा लोखंडेंचा, अर्थात नटवर्य प्रभाकरपंत पणशीकरांचा सुपुत्र. गानसरस्वती किशोरी अमोणकरांचा शागीर्द! आजच्या तरूण पिढीतला एक अतिशय चांगला, कसदार आणि प्रॉमिसिंग गवई, ज्याच्याकडून अजून मोप मोप ऐकायला मिळणार आहे असा..!

रधुनंदन पणशीकर माझ्या अगदी चांगल्या परिचयाचे. मी त्यांना रघुनंदनराव किंवा रघुबुवा असं संबोधतो. एक चांगला रसिक आणि जाणकार श्रोता म्हणून रघुनंदनराव मला मान देतात, त्यांच्या बैठकीत बसवतात, मित्र म्हणून माझ्या खांद्यावर हात ठेवतात हा त्यांचा मोठेपणा! असो.

औचित्य होतं मुलुंडमधील महाराष्ट्र सेवा संघ या सांस्कृतिक कार्याला वाहून घेतलेल्या एका संस्थेने आज आयोजित केलेल्या
दिवाळी-पहाट या कार्यक्रमाचं! सुंदर सकाळची वेळ. तानपुरे जुळत होते, तबला लागत होता, मंचावर रघुनंदनराव गाण्याकरता सज्ज झाले होते.

'हे नरहर नारायण...' या बिभासमधल्या विलंबित रूपक तालातल्या पारंपारिक बंदिशीने गाण्याला सुरवात झाली. राग बिभास. शुद्ध धैवत, कोमल धैवत, दोन्ही अंगाने गायला जाणारा सकाळच्या प्रहरचा एक जबरदस्त इन्टेन्स्ड राग. बिभास हा तसा गंभीर तरीही आपल्याच मस्तीत हिंडणारा राग आहे. 'तुम्हाला असेल माझी गरज तर याल माझ्यापाठी!' असं म्हणणारा आहे. रघुबुवांनी बिभासची अस्थाई भरायला सुरवात केली. कोमल रिखब, शुद्धगंधार, पंचम, दोन्ही धैवतांचा अत्यंत बॅलन्स्ड वापर करत रघुबुवांनी बिभासमध्ये रंग भरायला सुरवात केली. सगळा माहोल बिभासमय झाला. 'हे नरहर नारायण..' ने एक सुंदर दिवाळी पहाट उजाडली..! विलंबितानंतर 'मोर रे मीत पिहरवा..' ही पारंपारिक द्रुत बंदिश अतिशय सुंदर गाऊन बिभासची सांगता झाली!

बिभासने पूर्वा उजळली होती, छान केशरी झाली होती. आता तिच्यावर रंग चढले ते हिंडोलचे. राग हिंडोल. एक जादुई, अद्भूत असा राग. त्यातल्या तीव्र मध्यमामुळे हिंडोलचा एक विलक्षणच दरारा पसरतो. त्याचं जाणं-येणं हे अक्षरश: एखाद्या हिंदोळ्यासारखंच असतं. 'तोडी, ललत, भैरव, रामकली हे असतील सकाळचे काही दिग्गज राग, लेकीन हमभी कछू कम नही..!' असा रुबाब असतो हिंडोलचा!

रघुबुवांनी आज हिंडोल चांगला जमूनच गायला, कसदार गायला. हिंडोलातल्या अद्भूततेला रघुबुवांनी आज अगदी पुरेपूर न्याय दिला.

"बन उपवन डोल माई,
ऋतुबसंत मन भावन
सब सखीयन खेल हिंडोले.."

ही मध्यलय एकतालातली मोगुबाई कुर्डिकरांची बंदिश. ही बंदिश आज रघुबुवांनी फारच सुरेख गायली. पाहा मंडळी, आपल्या रागसंगीताला, त्यातल्या रचनांनादेखील गुरुशिष्य परंपरेचा कसा सुंदर वारसा असतो ते! मोगुबाई या किशोरीताईंच्या माता व गुरू. त्यामुळे त्यांच्याकडनं ही बंदिश किशोरीताईंना मिळाली, व तीच तालीम किशोरीताईंनी रघुबुवांना दिली आणि म्हणूनच या थोर गुरुशिष्य परंपरेमुळेच ही सुंदर बंदिश आज तुमच्या-माझ्या पिढीला ऐकायला मिळाली/मिळत आहे!

हिंडोल नंतर रघुबुवांनी मध्यलय एकतालातला तोडी रागातला एक पारंपातिक तराणादेखील सुंदर रंगवला. त्यानंतर रंगमंचावर अवतरली ती आपली समृद्ध संगीत रंगभूमी. 'दिन गेले हरिभजनावीण..' हे कट्यारमधलं नाट्यपद रघुबुवांनी सुरू केलं! दारव्हेकर मास्तरांच्या अन् वसंतखा देशपांड्यांच्या कट्यारमधली सगळीच पदं अतिशय सुरेख आणि एकापेक्षा एक बढिया! सुंदर गंधर्व ठेका आणि अत्यंत कल्पक आणि प्रतिभावंत असं अभिषेकीबुवांचं संगीत असलेलं "दिन गेले.." हे पददेखील त्याला अपवाद नाही. रघुबुवा हे पद गाऊन श्रोत्यांना मराठी संगीत रंगभूमीच्या त्या वैभवशाली काळात घेऊन गेले असंच मी म्हणेन..!

त्यानंतर सारी मैफलच चढत्या भाजणीने रंगत गेली. रघुबुवांनी स्वत: बांधलेलं यमन रागातलं अतिशय सुरेख असं मधुराष्टक,
बोलावा विठ्ठल-करावा विठ्ठल, पद्मनाभा नारायणा, अवघा रंग एक झाला, हे अभंग रघुबुवांनी अतिशय उत्तम व कसदार गायले. श्रोत्यांची मनमुराद दाद मिळत होती. भैरवीतल्या 'अवघा रंग एक झाला..' मुळे खरोखरच अवघा रंग एक झाल्यासारखे वाटले. आजची ही मैफल म्हणजे गवई आणि रसिक श्रोते यांच्यातला एक उत्तम संवाद होता, एक अद्वैत होतं!

रघुबुवांची जमलेली मैफल..




खरंच मंडळी, रघुबुवांच्या आजच्या या संस्मरणीय मैफलीमुळे माझी दिवाळी अगदी उत्तम साजरी झाली. आजवरच्या माझ्या श्रवणभक्तिच्या मर्मबंधातल्या ठेवींमध्ये अजून एक मोलाची भर पडली, मी अजून श्रीमंत झालो, समृद्ध झालो!

दुग्धशर्करा योग -

मंडळी, आज माझं भाग्य खरंच खूप थोर होतं असंच म्हणावं लागेल. आजच्या रघुबुवांच्या मैफलीत मला भाईकाकांचे मधु कदम भेटले! भाईकाकांसोबत वार्‍यावरची वरात, रविवारच्या सकाळमध्ये चिपलूनच्या रामागड्याचं फार सुंदर काम करणारे मधु कदम! साक्षात भाईकाकांसोबत मराठी रंगभूमीवर,

"निघाली, निघाली, निघाली वार्‍यावरची वरात..!"

असं मनमुराद गाणारे मधु कदम!

मधुकाका आणि रघुनंदनराव यांच्यासोबत तात्या...




मधु कदम मुलुंडमध्येच राहतात. तेही आज मुद्दाम रघुबुवांच्या मैफलीचा आनंद लुटण्याकरता आले होते. मध्यंतरात ग्रीनरूममध्ये आम्ही बसलो होतो तेव्हा मधुकाकाही तिथे आले. रघुबुवांनी आणि मी त्यांना वाकून नमस्कार केला. मध्यंतरानंतर मधुकाकांनी आपणहून बोलावून मैफलीत मला त्यांच्या शेजारी बसवून घेतले. रघुबुवांच्या एखाद्या छानश्या समेला तो म्हातारा माझ्या हातात हात घेऊन दाद देऊ लागला! मंडळी, जेव्हा एक श्रोता दुसर्‍या श्रोत्याचा हातात हात घेऊन दाद देतो ना तेव्हा अभिजात संगीतातला तो क्षण खरोखरच अनुभवण्यासारखा असतो एवढंच सांगू इच्छितो..!

रघुबुवांचं अभंगगायन ऐकून म्हातारा हळवा होत होता, मनोमन सुखावत होता!

बोलताबोलता साहजिकच भाईकाकांच्या आठवणी निघाल्या.

"भाई? आता काय सांगू तुला? अरे आमच्यात सख्ख्या भावापेक्षाही जवळचं नातं होतं रे! ते माझे बंधु,सखा, गुरू.. अगदी सबकुछ होते रे.."

डोळ्याच्या कडा ओलावत म्हातारा माझ्याशी बोलत होता..!

"एकदा घरी ये ना रे माझ्या! अगदी भरपूर गप्पा मारू. इथे जवळच राहतो मी मुलुंडला.."

'पुलकीत' माणसं कशी असतात ते मी जवळून पहात होतो. आतल्या आत रडत होतो..!

मंडळी, इथे डिटेल्स देत नाही, परंतु आज मधुकाकांना एक कौटुंबिक दु:ख आहे हे मला माहीत आहे. काळाच्या ओघात केव्हाच मागे पडलेल्या या कलाकाराची आर्थिक परिस्थितीही खूप बेताची आहे. परंतु आज म्हातारा अगदी सगळं विसरून रघुबुवांचं गाणं ऐकत होता, त्यातल्या लयीसुरांशी एकरूप झाला होता!

ही एकरूपता, ही रसिकता कशात मोजणार? वरातीच्या निमित्ताने ' पुलं ' या मराठी सारस्वताच्या अनभिषिक्त सम्राटासोबत त्यांनी घालवलेला तो वैभवशाली काळ, ती श्रीमंती आज तुमच्याआमच्या नशीबी येणार आहे का?

असो,

अवघा रंग एक झाला.. या भैरवीतल्या अभंगाने मैफल संपली. मी रघुबुवांचा आणि मधुकाकांचा निरोप घेऊन निघालो..

निघतांना माझ्या कानात भैरवीचे सूर तर होतेच, परंतु मधुकाकांचे शब्दही होते..

"एकदा घरी ये ना रे माझ्या! अगदी भरपूर गप्पा मारू. इथे जवळच राहतो मी मुलुंडला.."

-- तात्या अभ्यंकर.

हेच लेखन येथेही वाचता येईल..

October 29, 2008

दिपावलीच्या शुभेच्छा...

सर्व मराठी आंतरजालकर्मीना व ब्लॉगकर्मींना माझ्या व्यक्तिगत व आमच्या संपूर्ण मिसळपाव परिवारातर्फे दिपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...

तात्या अभ्यंकर,
मिसळपाव डॉट कॉम.

बापू सोनावणे...!

बापू सोनावणे!

एक काळा ढुस्स माणूस. कोळश्याच्या रंगाची आणि बापूच्या रंगाची स्पर्धा केली असती तर बापू अगदी सहज जिंकला असता. गोलमटोल चेहेरा, देहयष्टीही तशीच गोलमटोल. बुटका. सोनेरी काड्यांचा चष्मा, गळ्यात जाडजूड सोन्याची चैन (बापू चेनचा उच्चार 'चैन' असाच करतो,), मनगटात सोन्याचं ब्रेसलेट, दोन्ही हातातल्या बोटात मिळून पाचसहा चांगल्या जाडजूड सोन्याच्या आंगठ्या. बापूचा काळा ढुस्स रंग आणि त्याच्या अंगावरल्या सोन्याचा पिवळाजर्द रंग या काळ्या-सोनेरी रंगाच्या चमत्कारिक कॉम्बिनेशनमध्येच लोकांना बापूला पाहायची सवय होती!

"अरे बापू, तू असा काळाकुट्ट आणि त्यावर ते पिवळंजर्द सोनं हे काहिच्याकाहीच दिसतं बघ! छ्या! शोभत नाही तुला सोनं!"

असं मी म्हटलं की बापूचं त्यावर पिचक्या आवाजातलं तुटक उत्तर,

"दिसू दे ना कायच्याकाय! काय फरक पडतो?!"

बापूला अशी तुटक आणि लहान लहान वाक्य बोलायची सवय आहे. आवाजाचा टोन अत्यंत लहान, बर्‍याचदा आत गेलेला,पिचका! सफारीसूट हा बापूचा नेहमीचा पोषाख.. सोन्यानाण्याने मढलेला काळाकभिन्न बापू सफारीसुटारच सगळीकडे फिरतो!

बापू हा माझा शाळेपासूनचा मित्र. त्याची आणि माझी अगदी खास गट्टी. गळ्यात गळे घालून ती कधी आम्हाला दाखवता आली नाही परंतु आजही अगदी दोनचार दिवसात एकमेकांना भेटलो नाही तर आम्हाला चैन पडत नाही. माझा फोन नाही गेला, तरी बापूचा हमखास येतोच. तोही तुटक. "संध्याकाळी भजीपाव खायला भेट रे..!" इतकाच.

शाळेमधल्या संस्कृत, गणीत, भाषा, व्याकरण, वह्यांची टापटीप इत्यादी गोष्टींचा मला आणि बापूला अगदी मनसोक्त तिटकारा. तरीही शाळेत त्या गोष्टींना फाट्यावर मारून चालत नसे. झक मारत, लक्ष देऊन सगळा अभ्यास करावा लागे. त्यामुळे बापू हा माझा समदु:खी होता. तसे आम्ही दोघेही 'ढ' आणि 'उनाड' याच कॅटॅगिरीत जमा. "अभ्यास करून कुंणाचं भलं झालंय?" हे आम्हा दोघांना जोडणारं कॉमन तत्वज्ञान! त्यातूनच आमची गट्टी जमली असावी. मी जातपात मानत नाही, परंतु जन्माने ब्राह्मण असल्याचा टिळा होताच माझ्या कपाळावर. परंतु वर्गातल्या इतर हुशार ब्राह्मण मुलांनी मला कधीच जवळ केलाच नाही. ती मुलं माझ्याशी सतत एक अंतर राखूनच असायची. त्यामुळे सोनावणे, शिंदे, कोळी, नाखवा याच मुलांनी मला जवळ केला, याच मंडळीत मी मनापासून रमलो. बापूही त्यांच्यातला एक.

"भडव्या तू भट, आणि इतका 'ढ' कसा रे?" हा तुटक प्रश्न तेव्हासुद्धा मला बापू अनेकदा विचारी!

आज बापू हा माझा शेयरबाजाराच्या धंद्यातील अशील आहे. त्याच्या सगळा पोर्टफोलियो मीच सांभाळतो.

"बापू, हे तुझं स्टेटमेन्ट. अमूक शेयर घेतले, अमूक विकले. सध्या मार्केट खूप पडलं आहे त्यामुळे घेतलेल्या शेयरचे भाव सध्या खाली असून ते शेयर नुकसानीत आहेत.."

"मार्केट पडलं?", "मग तुझा उपयोग काय?", झक मारली आणि तुला काम दिलं!"

पिचक्या आवाजात नेहमीप्रमाणे बापूने दोनचार तुटक वाक्य टाकली! जणू काही मार्केट मीच पाडलं असाच बापूचा समज असावा!

"आता मार्केट बरंच खाली आहे. अजून काही पैशे असतील तर दे. चांगला चांगला माल सस्त्यात मिळतो आहे. एखाद लाख असले तरी पुष्कळ आहेत.."

अनेक तेज्यामंद्या बघितल्यामुळे, शिवाय माझी मुळातली जन्मजात तेजडिया वृत्ती, आणि आज ना उद्या घेतलेल्या गुणी शेयरना मजबूत भाव येईल, असा मार्केटवरचा दृढ विश्वास मला गप्प बसू देईना!

"एक लाख?", माझ्या बापाचा माल की तुझ्या रे?"

"बघ बुवा! असतील तर दे..!"

असा आमचा संवाद झाला. बापूला भेटून मी घरी आलो. अर्ध्यापाऊण तासातच बापूचा १२ वर्षाचा छोकरा माझ्या दारात हजर. त्याने एक पाकिट माझ्या हातात दिलं. आत बघतो तर लाखाचा चेक!

दहावी नापास झाल्यावर बापूने अक्षरश: अनेक धंदे केले. आंबे विक, फटाके विक, वडापावची गाडी लाव, कुठे मुल्शीपाल्टीच्या होर्डिंग्जचा सबएजंट हो, कुठे पेन्टिंगची लहानमोठी कामं घे, अश्या अनेक धंद्यात बापू आजही आहे. पण बापूच्या हाताला यशच भारी! भरपूर पैसा मिळत गेला, आजही मिळतो आहे. आज बापू ही बिल्डर लायनीतली एक बडी आसामी आहे. बड्या बड्या राजकारण्यात नी सरकारी अधिकार्‍यात बापूची उठबस आहे. बापू ही नक्की काय नी किती पोहोचलेली चीज आहे याची एक लहानशी झलक मला एकदा मिळाली तो किस्सा..

मी एकदा असाच सहज गप्पा मारायला म्हणून बापूच्या घरी गेलो होतो. हेल्मेट न घालता स्कूटर चालवल्याबद्दल माझं लायसन हवालदाराने पकडलं होतं. गाडीचे पेपर्सही जवळ नव्हते. 'ऑफीसला येऊन पेपर दाखवा, दंड भरा आणि लायसन घेऊन जा..' असा हवालदाराने दम दिला होता! बोलता बोलता हा सगळा किस्सा मी सहज बापूला सांगितला.

"हेल्मेट नाय?", डोसकं फोडून घेशील केव्हातरी!"

बापूची नेहमीची तुटक वाक्य सुरू झाली. जरा वेळाने बापूने डायरी पाहून एक फोन नंबर फिरवला.

"साळूके साहेब आहेत का? द्या जरा!"

"नमस्कार साळूंकेसाहेब. सोनावणे बोलतो. काय नाय, एक लायसन सोडवायचं होतं. अभ्यंकर नावाचा आरोपी आहे . जरा बघाता का?"

बापूने पोलिसातल्या कुठल्यातरी इसमाला फोन लावला होता.

"धन्यवाद साहेब. आत्ता लगेच पाठवतो अभ्यंकरला."

"जा आत्ता लगेच. साळूंकेना भेट. ट्रॉफिकला पीएसाअय आहेत. त्यांचाकडन लायसन घे!"

पोलिसांच्या मगरमिठीतून एक नवा पैसा न देता, बसल्या जागी एक फोन करून लायसन सोडवणारा बिल्डरलाईनमधला बापू हा सामान्य इसम नव्हे याची मला खात्री होतीच! ट्रॉफिकच्या साळूंकेने एका मिनिटात माझं लायसन माझ्या हातावर ठेवलं अन् तिथून मी निसटलो.

"ट्रॉफिक", "चैन", हे बापूचे खास उच्चार. दारूच्या पेगचा उच्चारदेखील बापू "प्याग" असाच करतो.

बापूचं घर आज भरलेलं आहे. बिल्डरलाईनमधल्या बापूने बक्कळ पैका कमावला आहे. चाळीशीच्या बापूला चांगली चार मुलं आहेत. बापूची बायको सदा हसतमुख. बापू मला कधी कधी रविवारचा त्याच्या घरी जेवायला बोलावतो. मला मटणातल्या नळ्या आवडतात हे बापूला माहीत आहे. जेवायच्या आधी बापू बाटली काढणार. स्वत:चा, माझा पेग भरणार! लगेच सोबत खाण्याकरता बायकोला ऑर्डर - "ए, सुकं मटन आण.." मटणाचा उच्चार बापू 'मटन' असा करतो.

जरा वेळने,

"ए, ताटं आण."

त्याचा तो पिचका, खोल गेलेला आवाज बापूच्या बायकोला मात्र बरोब्बर ऐकू जातो!

मी जेवायला बसलो की बापू बायकोला म्हणणार,

"ए, त्याला नळी दे!"

"नको रे बापू, ऑलरेडी दोन नळ्या आहेत माझ्या पानात! तू घे की.."

बापूच्या बायकोनं केलेलं फस्क्लास मटण आणि त्यातल्या नळ्या चापण्यात मी गुंग असतो. काळा ढुस्स बापू गालातल्या गालात मिश्किलपणे हासत मला मटण चापताना पाहून खुश होतो. वर पुन्हा,

"साल्या, तू खाऊन खाऊनच मरणार..." अश्या शुभेच्छाही देतो!

माझ्या गणगोतातला हा बापू रंगवताना तो कुणी संत, महात्मा, सज्जन, पापभिरू माणूस आहे असा माझा मुळीच दावा नाही. नगरसेवक मंडळीत, मुल्शीपाल्टीत, सरकारदफ्तरी, "वजन" ठेवणे व आपलं काम साधून घेणे ही बिल्डरलाईनमधली अपरिहार्यता बापूलाही चिकटली आहे. हल्लीच्या जगात ती लाईनच तशी आहे, त्याला बापूचाच काय, कुणाचाच विलाज नाही. नायतर धंदा करणंच मुश्किल, अशातली गत!

तरीही आमचा बापू खूप गुणी आहे, अत्यत कष्टातून वर आलेला आहे. बापूचा बाप चांभार होता. रस्त्याच्या कडेला बसून चांभारकी करून बापूच्या बापाचा सात मांणसांचा संसार झाला. बापू हा तिसरा की चवथा! परंतु लहान वयातच वडापाव, आंबे, फटाके, असे नाना धंदे करून बापूने सगळ्या घरादाराला हातभार लावला. सुदैवाने बापूच्या पदरात यशाचं मापही अगदी भरपूर पडत गेलं. हा हा म्हणता दिवस बदलले. ठाण्या-मुबई-पुण्यात बापूचे काही प्रोजेक्ट्स उभे राहिले. बापू चांगला पैसेवाला झाला, पण कधी कुणाशी माजोरीपणे वागला नाही. बापाच्या पश्चात भावाबहिणींचं अगदी यथास्थित केलंन, कुणाला काही कमी पडू दिलं नाही.

"काय बापू? दोन दिवस कुठे होतास? तुझा मोबाईलही लागत नव्हता.."

"आयटमला घेऊन खंडाळ्याला गेलो होतो. गेम वाजवायला!"

बापूने हे उत्तर अगदी सहज दिलं!

"अरे काय रे हे बापू? अरे चांगली चार पोरं तुझ्या पदरात आहेत, चांगली बायको आहे घरी! शोभतात का तुला हे असले धंदे?"

"मग काय झालं? मला मजा करायची होती. म्हणेल ते पैशे टाकून नेली एका पोरीला! त्यात बिघडलं कुठे?" जुलुम जबरदस्तीचा सौदा थोडीच केलाय?"

पिचक्या आवाजात चारपाच तुटक वाक्यात समर्थन करून बापू मोकळा!

"साला आपला काही पैसा कष्टाचा, काही हरामाचा. त्यातला हरामाचा पैसा हा असाच जाणार! तो थोडाच टिकणार आहे?!"

खरं सांगतो मंडळी, नीती-अनिती, व्यभिचार, या शब्दांच्या व्याख्याही बापूला माहीत नाहीत. खरंच माहीत नाहीत. पण हरामाचा पैसा टिकत नाही, तो असाच या ना त्या मार्गाने खर्च होतो हे तत्वज्ञान बापूला कुणी शिकवलं होतं कुणास ठाऊक?

चालायचंच! बापू जो आहे, जसा आहे, माझा आहे! प्रत्येक माणसात गुणदोष असतात, तसे बापूतही आहेत. आमच्या मैत्रीवर त्याचा काहीच फरक पडत नाही! "चूतमारिच्या, एक नंबरचा कंजूष तू! चल, दारू पाज..!" असं मला म्हणणारा, "आयटमला घेऊन गेम वाजवायला खंडाळ्याच्या बंगल्यावर गेलो होतो.." असं म्हणणारा बापू, बांधकाम साईट सुरू असलेल्या कुणा कामगाराची आई सिरियस झाली, तेव्हा रात्री दोन वाजता खिशात काही पैसे घेऊन तिला हास्पिटलात ऍडमिट करायलाही जातो..!

असो, बापू सोनावणे ही काळी, बुटकी, जाडजूड अजब व्यक्ति मला आवडते आणि तिचाही माझ्यावर अत्यंत जीव आहे एवढंच मला ठाऊक आहे!

गेल्या तीनचार दिवसात बापू भेटला नाही. आज बहुदा त्याचा फोन येईल,

"तात्या, संध्याकाळी भजीपाव खायला भेट रे..!"

-- तात्या अभ्यंकर.

हेच लेखन येथेही वाचता येईल..

June 02, 2008

गोपाला मेरी करूना...

१९९३/९४ सालचा सुमार असेल, तेव्हाची गोष्ट.

"ग्रँटरोडचा नॉव्हेल्टी सिनेमा माहीत आहे ना? त्याच्याजवळच रेल्वे हॉटेल म्हणून आहे आणि त्याच्याजवळ एस पी सेन्टर म्हणून साड्यांचं दुकान आहे. तीच बिल्डिंग! ये हां नक्की, मी घरीच आहे!"

दस्तुरसाहेब मला फोनवरून पत्ता सांगत होते!

पं फिरोज दस्तूर आणि त्यांच सुंदर गाणं!

या माणसाच्या मी गेली अनेक वर्ष प्रेमात होतो. त्यांना एकदा भेटावं असं मला खूप वाटत होतं. आणि एके दिवशी तो योग आला. त्यांनी सांगितलेल्या पत्त्यानुसार मी ग्रँटरोडला त्यांच्या घरी पोहोचलो. लाकडी गोलाकार जिने असलेल्या त्या बिल्डिंगमधलं त्यांचं ते टिपिकल पारशी पद्धतीचं घर. भिंतीवरचं घड्याळ, खुर्च्या, सोफे, कपाटं, अगदी सगळं सगळं पारशी पद्धतीचं, ऍन्टिकच म्हणा ना! मला एकदम विजयाबाईंच्या पेस्तनजी सिनेमाचीच आठवण झाली.

गुलाबीगोर्‍या वर्णाचे दस्तुरबुवा समोर बसले होते. मी प्रथमच त्यांना इतक्या जवळून पाहात होतो. सवाईगंधर्वांचे लाडके शिष्य, किराणा गायकीचे ज्येष्ठ गवई, माझे मानसगुरू भीमण्णा यांचे ज्येष्ठ गुरुबंधू! मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं!

"ये, बस!"

दस्तुरांनी माझ्या पाठीवरून हात फिरवत म्हटलं. त्यांचं गाणं जितकं गोड होतं तेवढेच तेही अगदी सुरेख होते, गोडच दिसत होते!

"काय, कुठून आला? गाणं शिकतोस का कुणाकडे?"

दस्तुरबुवा अगदी मोकळेपणानी माझी विचारपूस करू लागले, माझ्याशी बोलू लागले. अगदी साधं-सुस्वभावी बोलणं होतं त्यांचं. जराही कुठे अहंकार नाही, की शिष्ठपणा नाही! गुजराथी-पारशी पद्धतीचं मराठी बोलणं! मला ते ऐकायला खूप गंम्मत वाटत होती. आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. थोड्या वेळाने दस्तुरबुवांनी त्यांच्या स्वयपाक्याला माझ्याकरता चहा करायला सांगितला. घरात ते दोघेच होते. ते आणि त्यांचा स्वयंपाकी. ह्या पारश्याने लग्न केलं नव्हतं! नातेवाईंकांचा गोतावळा खूपच कमी. त्यांचा एक पुतण्या तेवढा होता, तो तिकडे अमेरिकेत होता. दस्तुरबुवा अधनंमधनं त्याच्याकडे रहायला जायचे.

पहिल्या भेटीतच मला दस्तुरांनी त्यांच्याकडची त्यांचं एक यमनचं लाईव्ह रेकॉर्डिंग असलेली कॅसेट ऐकायला दिली. "अरे माझ्याकडे एवढी एकच कॉपी आहे. तू वाटल्यास टेप करून घे आणि ही मला परत आणून दे हां!" खूप भाबडेपणाने दस्तुरसाहेब म्हणाले. त्यांच्या आवाजात जात्याच कमालीचा मृदुपणा होता. त्यांना मुद्दामून मृदु बोलण्याची गरजच नव्हती!

घाटकोपरच्या एका मैफलीतलं यमन रागाचं फार सुंदर रेकॉर्डिंग होतं ते! किराणा पद्धतीची, सवाईगंधर्वांच्या तालमीखाली तावूनसुलाखून निघालेली फार अप्रतीम गायकी होती त्यांची! किराणा पद्धतीनुसार एकेका स्वराची बढत करून विकसित केलेला राग, अतिशय सुरेल अन् जवारीदार स्वर, स्वरांचं अगदी छान रेशमी नक्षिकाम करावं अशी आलापी! खरंच, दस्तुरबुवांचं गाणं म्हणजे सुरेल, आलापप्रधान गायकीची ती एक मेजवानीच असे! असो! दस्तुरबुवांच्या गायकीवर लिहायला मी अजून खूप लहान आहे. आणि त्यांच्या गाण्यावर कितीही जरी भरभरून लिहिलं तरी त्यांच गाणं शब्दातीत होतं हेच खरं!



मंडळी, दस्तुरबुवांच्या घरी जाण्याचा, त्यांना भेटण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा अनेकदा योग आला हे माझं भाग्य! मी जरी समोरसमोर बसून त्यांची तालीम घेतली नसली तरी एका अर्थी ते माझे गुरूच होते. किराणा गायकीबद्दल, आलापीबद्दल, गाणं कसं मांडावं, राग कसा मांडावा, घराण्याची गायकी कुठे अन् कशी दिसली पाहिजे इत्यदी अनेक विषयांवर ते माझ्याशी अगदी भरभरून बोलत! त्यांची जुनी ध्वनिमुद्रणं मला ऐकवत! आपण कुणीतरी मोठे गवई आहोत असा भाव त्यांच्या बोलण्यात कधीही म्हणजे कधीही नसे!

एकंदरीत खूपच साधा आणि सज्जन माणूस होता. अतिशय सोज्वळ आणि निर्विष व्यक्तिमत्व! बोलणं मात्र काही वेळेला मिश्किल असायचं!

एकदा असाच केव्हातरी त्यांच्या घरी गेलो होते. नोकराने दार उघडलं.

"दस्तुरसाब है?"

तेवढ्यात, "अरे ये रे. किचनमध्येच ये डायरेक्ट! चहा पिऊ!" असा आतूनच दस्तुरसाहेबांचा आवाज आला. त्यांच्या स्वयंपाक्याने आमच्या पुढ्यात चहा ठेवला. टेबलावर लोणी, ब्रेड ठेवलेलं होतं! दस्तुरबुवांनी स्वत:च्या हाताने लोणी लावून दोन स्लाईस माझ्या पुढ्यात ठेवले! आम्ही लोणीपाव खाऊ लागलो. तेवढ्यात स्वयंपाकघराच्या एका कोपर्‍यातून दोन मोठे उंदीर इकडून तिकडून पळत गेले! च्यामारी, घरात दोन दोन मोठाले उंदीर! त्यांना पाहताच मी दचकलोच जरा! मला दचकलेला पाहून दस्तुरसाहेबांनी एकदम मिश्किलपणे म्हटलं,

"अरे ते मामा लोक आहेत! खेळतात बिचारे. त्यांना तरी माझ्याशिवाय दुसरं कोण आहे?!"

आमच्या दस्तुरसाहेबांना विडी ओढायची सवय होती बरं का मंडळी! फार नाही, पण अधनंमधनं म्हातारा अगदी चवीने ती खाकी विडी ओढायचा! "दस्तुरसाहेब, विडी चांगली नाही बरं प्रकृतीला! जास्त ओढायची नाही!" असा मी त्यांना जरा माझ्या लहानपणाचा फायदा घेऊन एकदा प्रेमळ दम दिला होता!

"बरं बरं! यापुढे एकदम कमी ओढीन. मग तर झालं?!" मी घेतलेला लहान तोंडी मोठा घास त्यांनी तेवढ्याच मोठेपणाने आणि खिलाडीवृत्तीने मला परतवला होता! त्यानंतर काहीच दिवसांनी नेमका मी फोर्टमधल्या कुठल्यातरी दुकानात गेलो होतो, तिथे मला हमदोनो पिक्चरमध्ये असतो तसा एक म्युझिकल सिग्रेट लायटर मिळाला. त्या लायटरचे स्वर खूप छान होते. तो लायटर पाहिल्यावर मला एकदम दस्तुरसाहेबांचीच आठवण आली. मी तो त्यांना मुद्दाम प्रेझेंट म्हणून देण्याकरता त्यांच्या घरी गेलो. त्यांनाही तो लायटर खूप आवडला!

"अरे खूप महाग असेल रे! कशाला एवढे पैसे खर्च केलेस? असं कुणी काही प्रेझेंट दिलं की मला खूपच अवघडल्यासारखं वाटतं! आणि काय रे, एकिकडे मला विडी कमी ओढा म्हणून दम देतोस आणि दुसरीकडे हा लायटर पण देतोस? आता तू हा इतका सुंदर लायटर दिल्यावर माझी विडी कशी कमी होणार सांग बरं!"

हे म्हणतांना त्यांच्या चेहेर्‍यावर जे निरागस मिश्किल भाव होते ते मी आजही विसरू शकत नाही! खरंच, देवाघरचा माणूस!

त्यांचे गुरू सवाईगंधर्व, यांच्याबद्दल तर ते नेहमीच भरभरून बोलत. त्यात केवळ अन् केवळ भक्तिच असे. सवाईगंधर्वांच्या काही आठवणी त्यांनी मला सांगितल्या होत्या. एक आठवण सांगतांना त्यांच्या डोळ्यात नेहमी पाणी यायचं!

दस्तुरबुवा १४-१५ वर्षांचे असतानाची गोष्ट. सवाईंचा नाटककंपनीसोबत जेव्हा मुंबईत मुक्काम असे तेव्हा सवाई त्यांना त्यांच्या घरी येऊन गाणं शिकवायचे. एकदा असेच पावसाळ्याचे दिवस होते. रस्त्यावर खूपच चिखल आणि पाणी साचलं होतं. त्या पावसातही सवाईगंधर्व त्यांच्या घरी शिकवणीकरता आले. गुरूने शिष्याला चांगली तास, दोन तास तालीम दिली अन् सवाईगंधर्व जायला निघाले! दारापाशी आले व स्वत:च्या चपालांकडे पाहून त्यांनी क्षणभर दस्तुरांच्या आईकडे अत्यंत कृतज्ञतेच्या भावनेनं बघितलं, हात जोडले, थोडे हसले आणि घराबाहेर पडले! झालं होतं असं की बाहेरच्या पावसा-चिखलामुळे सवाईंच्या चपला खूपच बरबटलेल्या होत्या. मुलाची शिकवणी होईस्तोवर त्या माऊलीने सवाईंच्या चपला स्वच्छ धुऊन, तव्यावर वाळवून कोरड्या करून ठेवल्या होत्या!!

इंडियन आयडॉल, अजिंक्यतारा, महागायक, महागुरू, एस एम एस चा जमाना नव्हता तो!!

सवाईगंधर्व महोत्सवात शेवटच्या दिवशी पहाटे गंगूबाई हनगल, दस्तुरबुवा आणि शेवटी अण्णा हा गाण्याचा क्रम गेली अनेक वर्ष होता. 'गोपाला मेरी करूना' ही अब्दुलकरिमखासाहेबांची ठुमरी आणि दस्तुरबुवांचं काय अजब नातं होतं देवच जाणे! सवाईगंधर्व महोत्सवात त्यांना दरवर्षी न चुकता 'गोपाला...' गाण्याची फर्माईश व्हायची आणि दस्तुरबुवही अगदी आवडीने ते गात! फारच अप्रतीम गायचे! साक्षात अब्दुलकरीमखासाहेबच डोळ्यासमोर उभे करायचे!

अण्णा आणि दस्तुर! दोघेही सवाईगंधर्वांचे शिष्य. त्या अर्थाने दोघेही एकमेकांचे गुरुबंधू होते. आणि तसंच त्यांचं अगदी सख्ख्या भावासारखंच एकमेकांवर प्रेमही होतं! सवाई महोत्सवात एके वर्षी दस्तुर गुरुजींनी कोमल रिषभ आसावरी तोडी इतका अफाट जमवला की तो ऐकून अण्णा दस्तुरांना म्हणाले, "फ्रेडी, आज मला गाणं मुश्किल आहे. आज तुमचेच सूर कानी साठवून मी घरी जाणार!"

अण्णा नेहमी प्रेमाने दस्तुरांना 'फ्रेडी' या नावाने हाक मारायचे!

असो..!

अजून काय लिहू? आता फक्त दस्तुरबुवांच्या आठवणीच सोबतीला उरल्या आहेत! त्या आठवणींतून बाहेर पडवत नाही. खूप भडभडून येतं. अलिकडेच दस्तुरसाहेब वारले. एका महत्वाच्या कामाकरता, एक महत्वाची कौटुंबिक जबाबदारी निभावण्याकरता त्या दिवशी मी पुण्यात होतो. मला तातडीने मुंबईला परतणं शक्य नव्हतं. दस्तुरांचं अंत्यदर्शन मला मिळालं नाही हे माझं दुर्भाग्य म्हणायचं! दुसरं काय? काल संध्याकाळी थोडा वेळ होता म्हणून मुद्दाम ग्रँटरोडला गेलो होतो. त्या इमारतीपाशी गेलो. पण दस्तुरांच्या घरी जाण्याची हिंमत होईना! खूप भरून आलं. पुन्हा काही आठवणी ताज्या झाल्या. मी दिलेला लायटर असेल का हो अजून त्या घरात? मी येऊन गेल्याचं कळलं असेल का हो आमच्या त्या पारशीबाबाला?

रस्त्यावर नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू होती. लोकं आपापल्या उद्योगात होते. मी मात्र एकटा, एकाकी उगाच त्यांच्या घराबाहेर घुटमळत होतो. मनात 'गोपाला मेरी करूना'चे सूर रुंजी घालत होते!

--तात्या अभ्यंकर.

हाच लेख इथेही वाचता येईल!

June 01, 2008

आज़ जाने की जि़द ना करो...

राम राम मंडळी,

आज़ जा़ने की जि़द ना करो.. हे गाणं आपल्याला
इथे ऐकता येईल आणि इथेही ऐकता येईल!फ़रिदा खा़नुमने गायलेलं एक अतिशय सुरेख गाणं! बर्‍याच दिवसापासून या गाण्यावर दोन शब्द लिहायचा बेत होता, आज जरा सवड मिळाली.




आज़ जा़ने की जि़द ना करो,
यू ही पेहेलू मै बैठे रहो..

आज़ जा़ने की जि़द ना करो.. !


क्या बात है, एक अतिशय शांत स्वभावाचं, परंतु तेवढंच उत्कट गाणं! भावनेचा, स्वरांचा ओलावाही तेवढाच उत्कट! यमन रागाचं हे एक वेगळंच रूप!

मंडळी, आजपर्यंत हा यमन किती वेगवेगळ्या रुपाने आपल्या समोर यावा? मला तर अनेकदा प्रश्न पडतो की या रागाचं नक्की पोटेन्शियल तरी किती आहे?! 'जिया ले गयो जी मोरा सावरीया', 'जा रे बदरा बैरी जा' मधला अवखळ यमन, 'समाधी साधन' मधला सात्विक यमन, 'जेथे सागरा धरणी मिळते' मधला जीव ओवाळून टाकायला लावणारा यमन, 'दैवजात दु:खे भरता' मधला ईश्वरी अस्तित्वाची साक्ष पटवणारा यमन, अभिजात संगीतातल्या निरनिराळ्या बंदिशींमधून प्रशांत महासागराप्रमाणे पसरलेला अफाट आणि अमर्याद यमन, आणि 'रंजिश ही सही' किंवा 'आज़ जा़ने की जि़द ना करो' सारख्या गाण्यांतून अत्यंत उत्कट प्रेमभावना व्यक्त करणारा यमन! किती, रुपं तरी किती आहेत या यमनची?! गाणं कुठल्याही अर्थाने असो, यमन प्रत्येक गाण्याच्या शब्दांना त्याच्या अलौकिक सुरावटीचे चार चांद लावल्यावाचून रहात नाही!

आज़ जा़ने की जि़द ना करो,
यू ही पेहेलू मै बैठे रहो..


'यू ही पेहेलू मे बैठे रहो..' मध्ये काय सुंदर शुद्ध मध्यम ठेवलाय! क्या बात है..! 'पेहेलू' या शब्दात ही खास शुद्ध मध्यमाची जागा आहे बरं का मंडळी! 'कानडाउ विठ्ठलू..' आठवून पाहा, आपल्याला हाच शुद्ध मध्यम दिसेल! अहो शेवटी समुद्र हा सगळा एकच असतो हो, फक्त त्याची नांव वेगवेगळी असतात!

'बैठे रहो' हे शब्द किती सुंदररित्या ऑफबिट टाकले आहेत!

हाये मर जाएंगे, हम तो लुट जाएंगे
ऐसी बाते किया ना करो!
आज़ जा़ने की जि़द ना करो,

हाये मर जाएंगे, हम तो लुट जाएंगे..!!


ओहोहो! खल्लास...

'हाये' मधला पंचम पाहा मंडळी! साला, त्या यमनापुढे आणि फ़रिदा खा़नुमपुढे जा़न कुर्बान कराविशी वाटते! हा 'हाये' हा शब्द कसला सुरेख म्हटला आहे या बाईने! छ्या, ऐकूनच बेचैन व्हायला होतं! माझ्या मते इथे या गाण्याची इंटेन्सिटी आणि डेप्थ समजते!

'हम तो लुट जाएंगे..' मधल्या 'हम' वरची जागा पहा!

'मर जाएंगे', 'लुट जाएंगे' मधील 'जाएंगे' या शब्दाचा गंधारावर काय सुरेख न्यास आहे पहा! गंधारावर किती खानदानी अदबशीरपणे 'मर जाएंगे', 'लुट जाएंगे' हे शब्द येतात! मंडळी, हा खास यमनातला गंधार बरं का! अगदी सुरेल तंबोर्‍यातून ऐकू येणारा, गळ्यातला गंधार म्हणतात ना, तो गंधार! आता काय सांगू तुम्हाला? अहो या एका गंधारात सगळा यमन दिसतो हो! यमनाचं यमनपण आणि गाण्याचं गाणंपण सिद्ध करणारा गंधार!

'हाये मर जाएंगे, हम तो लुट जाएंगे' ची सुरावट काळीज घायळ करते! क्या केहेने.. साला आपली तर या सुरावटीवर जान निछावर!

'ऐसी बाते किया ना करो..'!

वा वा! 'किया' या शब्दावरची जागा पाहा. 'करो' हा शब्द कसा ठेवलाय पाहा फंरिदाबाईने! सुंदर..!

खरंच कमाल आहे या फ़रिदा खानुमची. या बाईच्या गाण्यात किती जिवंतपणा आहे, किती आर्जव आहे! खूपच सुरेल आवाज आहे या बयेचा. स्वच्छ परंतु तेवढाच जवारीदार आवाज! आमच्या हिंदुस्थानी रागसंगीतात आवाज नुसताच छान आणि सुरेख असून चालत नाही तर तो तेवढाच जवारीदारही असावा लागतो. फंरिदाबाईचा आवाज असाच अगदी जवारीदार आहे. तंबोरादेखील असाच जवारीदार असला पाहिजे तरच तो सुरेल बोलतो आणि हीच तर आपल्या रागसंगीताची खासियत आहे मंडळी! सुरेलतेबरोबरच, बाईच उर्दूचे उच्चार देखील किती स्वच्छ आहेत! क्या बात है...!

असो, तर मंडळी असं हे दिल खलास करणारं गाणं! बरेच दिवस यावर लिहीन लिहीन म्हणत होतो, अखेर आज टाईम गावला! एखादं गाणं जमून जातं म्हणतात ना, तसं हे गाणं जमलं आहे. अनेक वाद्यांचा ताफा नाही, की कुठलं मोठं ऑर्केस्ट्रेशन नाही! उतम शब्द, साधी पेटी-तबल्याची साथसंगत, यमनसारखा राग आणि फ़रिदाबाईची गायकी, एवढ्यावरच हे गाणं उभं आहे! मी जेव्हा 'फ़रिदाबाईची गायकी' हे शब्द वापरतो तेव्हा मला नेमकं काय म्हणायचं आहे हे कदाचित हिंदुस्थानी रागसंगीतात जाणणारी मंडळी अधिक चांगल्या रितीने समजू शकतील! बाईने दिपचंदी सारख्या ऑड तालाचं वजन काय छान सांभाळलंय! हार्मिनियमचं कॉर्डिंगही खासच आहे. तबलजीनेही अगदी समजून अत्यंत समर्पक आणि सुरेल ठेका धरला आहे! जियो...!

साला, या गाण्याचा माहोलच एकंदरीत फार सुरेख आहे!

आसुसलेली संध्याकाळ आहे, ग्लासात सोनेरी, मावळतीच्या रंगाच्या सोनेरी छटांच्या रंगाशी नातं सांगणारी आमच्या सिंगल माल्ट फ्यॅमिलीतली ग्लेनफिडिच आहे, छानपैकी गाद्या-गिर्द्या-लोड-तक्क्यांची बिछायत पसरली आहे, मजमुहा अत्तराचा मादक सुवास अंगावर येतो आहे, सगळा माहोल रंगेल करतो आहे, तंबोरा जुळतो आहे, सारंगी त्याच्याशी मिळतंजुळतं घ्यायच्या प्रयत्नात आहे, तबल्याच्या सुरांची आस तंबोर्‍याच्या स्वराशी एकरूप होऊ पाहते आहे आणि काळजावर अक्षरश: कट्यार चालवणारी अशी एखादी ललना मादक आणि बेभान स्वरात,

'आज़ जाने की जि़द ना करो..' असं म्हणते आहे!

क्या बात है...!

--तात्या अभ्यंकर.

हाच लेख इथेही वाचता येईल..

April 10, 2008

कुणी मत देता का मत?

कुणी मत देता का मत?
एका गायकाला कुणी मत देता का मत?

खरं सांगतो बाबांनो, गायक आता लाचार झाला आहे!
झी, सोनी, आणि स्टारप्लस आणि कुणी कुणी त्याला लाचार केला आहे...!

कुणी मत देता का मत?
एका गायकाला कुणी मत देता का मत?

कुणी सांगितलं की कलाकार एखादाच असतो, अभिमानी असतो?
कुणी सांगितलं की त्याचं फक्त कलेशीच इमान असतं म्हणून?

खरं सांगतो बाबांनो, गायक आताशा एस एम एस मुळेच लहानमोठा ठरतो!

कुणी सांगितलं की एस एम एस मुळे वाहिन्यांना लाख्खो रुपये मिळतात?
कुणी सांगितलं की संगीतकला ही वाहिन्यांच्या दारातली
एक बाजारबसवी रांड झाली आहे म्हणून?

तसं काही नाही बाबांनो, संगीतकला खूप थोर आहे!
खूप खूप थोर आहे!!
दीड दमडींच्या एस एम एस ची मिंधी असली म्हणून काय झालं?
संगीतकला खरंच खूप थोर आहे!

कुणी मत देता का मत?
एका गायकाला कुणी मत देता का मत?

बरं का बाबांनो, बरं का दादांनो, बरं का तायांनो,
गायकाचा कोड नंबर 'अबक' आहे.
त्याला प्लीज प्लीज प्लीज मत द्या, तुमच्या एस एम एस ची भीक द्या!

कारण त्याला व्हायचंय अजिंक्यतारा!
त्याला व्हायचंय इंडियन आयडॉल!
आणि अश्याच अजून काही पदव्या त्याला मिळवायच्या आहेत!

म्हणूनच सांगतो बाबांनो, एका गायकाला मत द्या मत!
त्याला वाढा तुमच्या एस एम एस चा जोगवा!

पण जोगवा तरी कसं म्हणू बाबांनो?

त्या शब्दात तर एक पवित्रता आहे,
त्या शब्दात तर अंबाबाईची पूजा आहे,
तुळजाईचा गोंधळ आहे!

जोगवा म्हणजे भीक नव्हे, नक्कीच नव्हे!

एस एम एस मागणे ही मात्र भीक आहे, नक्कीच आहे!

पण भीक मागितली म्हणून काय झालं?
कुणी सांगितलं की कलाकाराने कुणाकडे भीक मागू नये म्हणून?
कुणी सांगितलं की कलाकार भिकारी नसतो म्हणून?

म्हणूनच सांगतो बाबांनो, गायकाला मत द्या मत!
त्याचा कोड नंबर 'अबक' आहे! त्याला मत द्या मत!

कारण त्याला व्हायचंय अजिंक्यतारा!
त्याला व्हायचंय इंडियन आयडॉल!
आणि अश्याच अजून काही पदव्या त्याला मिळवायच्या आहेत!

म्हणूनच सांगतो बाबांनो, गायकाला मत द्या मत!
त्याचा कोड नंबर 'अबक' आहे! त्याला मत द्या मत!

पण त्याला गायक तरी कसं म्हणायचं?

काय म्हणालात?

"हरकत नाही, भिकारी म्हणूया!"??

ठीक आहे बाबांनो, भिकारी तर भिकारी!

एका भिकार्याला मत द्या मत!
तुमच्या एस एम एस ची भीक त्याला घाला!

घालाल ना नक्की?

कारण त्याला व्हायचंय इंडियन आयडॉल!
त्याला व्हायचंय अजिंक्यतारा!

-- तात्या अभ्यंकर.

हाच लेख इथेही वाचता येईल.

March 13, 2008

शिंत्रेगुरुजी..२

शिंत्रेगुरुजी..

>>असं यजमानांनाच दरडावणारे नामजोशी गुरुजी! मग शिंत्रेगुरुजीच धंद्यात असे मागे का? इतके हडकुळे का?
काहीच कळत नव्हतं!<<

त्यानंतर -१० दिवसातच घडलेली एक घटना. आमच्या घराच्या मागच्या गल्लीत राहणारे कोठावळे आजोबावारले. म्हातारा तसा आजारीच असायचा. मिटलेन त्याने एकदाचे डोळे. मंडळी मर्तिकाच्या तयारीला लागली. मीतसा पट्टीचा मुडदेफरास. ताटी बांधण्यापासून ते लाकडावर ठेवण्यापर्यंत सगळ्या कामात तरबेज. कुणाच्यामर्तिकाची बातमी समजली, की विसरता एखादी ब्लेड खिशात टाकून घराबाहेर पडणारा. का? तर ताटी बांधतानासुंभ कापावा लागतो तेव्हा नेमकी ब्लेड लागते आणि तिथे नेमकं गाडं अडतं! असो..

'तात्या, स्मशानात गुरुजींना बोलवायचं तेवढं तुम्ही बघा!' अशी जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. 'कुणालाबरं सांगावं?' असा विचार करत होतो तेवढ्यात शिंत्रेगुरुजींचं नांव सुचलं. लगेच मी त्यांच्या घरी गेलो, दार ठोठावलं.

शिंत्रेगुरुजींनीच दार उघडलं. 'अरे तात्या तुम्ही? या, बसा."

शिंत्रेगुरुजींचं घर अगदीच कळकट होतं. अनेक अनावश्यक असा जुन्यापान्या वस्तूंनी भरलेलं. भिंतींचा रंग साफउडालेला. घरभर एक कुबट्ट वातावरण!

"बोला, काय काम काढलंत?" शिंत्रेगुरुजी.

"अहो माझ्या ओळखीतले एक गृहस्थ थोड्या वेळापूर्वीच वारले. तासाभरातच त्यांना उचलायचं आहे. तुम्ही यालका स्मशानात मंत्राग्नी द्यायला?"

तेवढ्यात आतल्या खोलीतून भेसूर ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकू आला. मला काही कळेचना. 'जराबसा हां, आलोच मी.' असं म्हणून शिंत्रेगुरुजी घाईघाईने आतल्या खोलीत गेले.

'अगं असं काय गं करतेस तू शकू? मी तुला पडून रहायला सांगितलं होतं की नाही? बरं नाही ना वाटत माझ्याबाळाला, ताप आला आहे ना? शाणी की नाही माझी बाळ ती? मग शांतपणे झोपून रहा बघू! आलोच हां मी. बाहेरपाहुणे आले आहेत ना आपल्याकडे राणी!'

असा संवाद मला आतल्या खोलीतून ऐकू आला. तेवढ्यात पुन्हा एकदा एक भेसूर आरोळी ऐकू आली! मला अगदीराहवेना म्हणून मी उठून आतल्या खोलीत डोकावलो. चौदा-पंधरा वर्षांची एक मुलगी खाटेवर बसली होती. बेढबशरीर, वेडेवाकडे दात, डोळ्यात काहीसे शून्य, काहीसे आकलन होत असल्याचे भाव. तोंडातून लाळ गळत होतीतिच्या. शिंत्रेगुरुजी तिला प्रेमाने थोपटत होते, शांत करत होते. तिची लाळ पुसत होते. ते अनपेक्षित दृश्य पाहूनसरसरून काटाच आला माझ्या अंगावर!

"तात्या, ही मुलगी माझी. काय नशीब पहा. मंदबुद्धी निपजली. चौदा वर्षांची आहे. आईही नाही बिचारीला.."

शिंत्रेगुरुजी मला माहिती पुरवत होते!

"शकू, नमस्कार कर पाहू काकांना! कसा करायचा नमस्कार? मी शिकवलाय की नाही तुला? काका आहेत ते. तुलाछान गोष्ट सांगतील, खाऊ देतील!शाणी की नाही आमची शकू? हसून दाखव पाहू काकांना!"

शकूने माझ्याकडे बघितलं. डोळ्यात अनोळखी भाव. किंचित वेडगळशी हसली. निष्पाप, निरागस! जरा वेळानेपुन्हा तसंच भेसूरसं ओरडली. तिचं ते रूप पाहून मला भडभडून आलं.

"आज हीचं जरा बिनसलंच आहे. तसं विशेष काही नाही हो. थोडा ताप, सर्दीखोकला आहे. औषधं घ्यायला नकोतहिला मुळीच." शिंत्रेगुरुजी सांगू लागले.

जरावेळाने शकू शांत झाली, तिला झोप लागली.

"या तात्या, बाहेरच्या खोलीत बसूया." आम्ही बाहेरच्या खोलीत आलो.

"बोला, काय काम काढलंत?"

"क्षमा करा गुरुजी, पण तुम्हाला अशी मुलगी आहे...." मी थोडा अडखळलो.

".....हे तुम्हाला माहीत नव्हतं, असंच ना?"

"हो, म्हणजे..." मी पुन्हा निरुत्तर.

"काय विशेष? कशाकरता आला होतात?" शिंत्रेगुरुजी.

शिंत्रेगुरुजींना बहुतेक शकूबद्दल माझ्याशी काहीच बोलायचं नव्हतं. मीही विषय वाढवला नाही. त्यांना कोठावळेआजोबा गेल्याची बातमी सांगितली. साधारणपणे त्यांना किती वाजता स्मशानात पोहोचावं लागेल तेही सांगितलं. त्यांनी यायचं कबूल केलं आणि मी तिथून निघालो.

कोठवळे आजोबांच्या मर्तिकाची सगळी तयारी झाली. येणारे सगळे आले, आणि आम्ही आजोबांचं मयत उचललं. स्मशानात शिंत्रेगुरुजी हजर होते. त्यांना पाहून मला पुन्हा एकदा शकूची आठवण झाली. शिंत्रेगुरुजी आत्ता इथेस्मशानात आहेत, 'मग घरी आजारी शकूपाशी कोण? शिंत्रेगुरुजींच्या गैरहजेरीत ती पुन्हा एकदा तसं भेसूर ओरडूलागली तर? कोण पाहील तिच्याकडे, तिची समजूत काढून कोण शांत करेल तिला?' असे अनेक प्रश्न माझ्यामनात येऊन गेले!

"गेले त्यांचं नांव काय? गोत्र कुठलं? गेले ते आपले वडीलच ना?..."

शिंरेगुरुजी कोठवळे आजोबांच्या मुलाला प्रश्न विचारत होते. मर्तिकाचे विधी सुरू झाले होते. थोड्याच वेळात रीतसरमंत्राग्नी मिळून कोठवळे म्हातारा पंचतत्त्वांत विलीन झाला!

काय दोन-चारशे रुपये दक्षिणा मिळाली असेल ती घेऊन शिंत्रेगुरुजीही घरी निघून गेले होते. माझ्या डोळ्यासमोरूनमात्र शकूचा तो निष्पाप, निरागस चेहरा जाईना. तिचं ते माझ्याकडे पाहून वेडगळसं हसणं मनांत घर करून गेलंमाझ्या!
घरी येऊन कोठवळे आजोबांच्या नांवाने अंघोळ केली.

काहीच सुचत नव्हतं. मतिमंद मुलं तशी अनेक असतात. पण शिंत्रेगुरुजींच्या घरी आलेला अनुभव अगदीअनपेक्षित होता. मला शकूला पुन्हा एकदा भेटावसं वाटत होतं. शिंत्रेगुरुजींना खूप काही विचारावसं वाटत होतं.

"हे काका खाऊ देतील तुला..."

शिंत्रेगुरुजींचं हे बोलणं मला आठवलं. तसाच उठलो. दुकानातून चांगलीशी मिठाई घेतली, आणि पुन्हा एकदाशिंत्रेगुरुजींच्या घरी पोहोचलो. दार ठोठावलं.

क्रमश:(अंतिम भाग- लवकरच.)

--तात्या.

शिंत्रेगुरुजी... १

राम राम मंडळी,
पटवर्धनांचं घर. एक नावाजलेलं घर. बडी मंडळी, पैसेवाली. गाडी, बंगला सगळ्याची अगदी रेलचेल. स्वत: दादापटवर्धन, दोन मुलं, सुना सगळी कर्तबगार मंडळी. स्वकष्टाने वरती आलेली. हे सगळं कुटुंबच्या कुटुंब माझं अशीलआहे. त्यांचे समभाग बाजारातील सर्व आर्थिक व्यवहार मी पाहतो. त्यामुळे कधी त्यांच्या हापिसात, तर कधीत्यांच्या घरी माझं येणंजाणं सुरूच असतं. त्या दिवशीही मी असाच काही कामानिमित्त त्यांच्या घरी गेलो होतो.

तो सर्वपित्रि-अमावास्येचा दिवस होता. भाद्रपदातील अमावास्या. या दिवशी पितरमंडळी आपापल्या घरी जेवायलायेतात म्हणे. भाताची खीर, भाजणीचे वडे, गवार-भोपळ्याची भाजी, आमसुलाची चटणी असा जोरदार बेत असतोबऱ्याचशा घरांत. बरीच मंडळी या दिवशी श्राद्धपक्ष वगैरे करतात. ब्राह्मणभोजन घातलं जातं, दक्षिणा दिली जाते. माझ्यासारखे, जे काहीच करत नाहीत ते या दिवशी दुपारी बाराच्या सुमाराला कावळ्याला पान ठेवतात. पितरमंडळी कावळ्याच्या रुपात येऊन या बेतावर ताव मारतात आणि आपापल्या वंशजांना भरल्यापोटानेआशीर्वाद देऊन परत जातात! ;) असं म्हणे हो!

मी पटवर्धनांच्या घराची बेल वाजवली. स्वत: दादा पटवर्धनांनी दार उघडलं. दादा पटवर्धन. एक जंक्शन माणूस! 'अरे या तात्या. काय म्हणतांय तुमचं शेअरमार्केट? आमच्या नाड्या काय बाबा, तुमच्या हातात' असं नेहमीचंबोलणं दादांनी मिश्कीलपणे सुरू केलं. दादा सोवळ्यातच होते. उघडेबंब, गोरेपाऽन आणि देखणे. कपाळाला खास यादिवशी लावलं जाणारं गोपिचंद गंध लावलेलं! दिवाणखान्याच्या एका कोपऱ्यात श्राद्धविधीचा कार्यक्रम नुकताचआटपलेला दिसत होता. पिंडदानही झालं होतं. शिंत्रेगुरुजी श्राद्धाचं जेवायला बसले होते.

शिंत्रेगुरुजी!

एक हडकुळी व्यक्ती. पन्नाशीच्या पुढची. उभट चेहरा, अर्धवट पिकलेले केस. काही दात पडलेले, आणि जे होते तेपुढे आलेले. वर्ण मळकट काळा. मळकट धोतर नेसलेले, त्याहूनही मळकट जानवं. असा सगळा शिंत्रेगुरुजींचाअवतार.
या गुरुजी मंडळींचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे सत्यनारायण, लग्न-मुंज, इत्यादी शुभकार्ये करणारे, आणियांची दुसरी जमात म्हणजे मर्तिकं, श्राद्धपक्ष हे विधी करणारी. शिंत्रेगुरुजी दुसऱ्या जमातीतले. शिंत्रेगुरुजींशीमाझीही अनेक वर्षांपासून ओळख आहे. शिंत्रेगुरुजी आमच्याही घरी कधी श्राद्धपक्षाच्या निमित्ताने आले आहेत.

पटवर्धनांच्या घरी शिंत्रेगुरुजी मन लावून जेवत होते. त्यांची जेवायची पद्धतदेखील गलिच्छच. काही मंडळींना आधीजीभ पुढे काढून त्यावर घास ठेवायचा आणि मग जीभ आत घ्यायची, अशी सवय असते. शिंत्रेगुरुजीही त्यातलेच. हावऱ्या हावऱ्या जेवत होते. दुष्काळातून आल्यासारखे! मी पटवर्धनांच्या घरी पोहोचलो तेव्हा माझ्याकडे पाहून तेओळखीदाखल लाचार हसले होते. 'काय तात्या, कसं काय?' अशी माझी चौकशीही केली होती.

"वहिनी, थोडी खीर आणा बरं काऽऽ" असं त्यांनी म्हटलं आणि पटवर्धन वहिनींनी खीर वाढायला आणली.

"नाहीतर असं करा, थोडीशी डब्यातच द्या. घरी घेऊन जाईन!"

पटवर्धन वहिनींनी खिरीचा डबा भरला आणि शिंत्रेगुरुजींना दिला. पटवर्धन पती-पत्नींना काय हो, त्यांनाशिंत्रेगुरुजींना खीर बांधून देण्यात समाधानच होतं. आपल्या घरी आलेला ब्राह्मण जेवुनखाऊन तृप्त होऊन गेल्याशीकारण. त्या दिवसापुरता का होईना, त्यांच्या पितरांचाच प्रतिनिधी तो!

मला मात्र शिंत्रेगुरुजींचा रागही आला होता आणि दयाही आली होती!

एकीकडे माझं दादा पटवर्धनांशी कामासंबंधी बोलणं सुरू होतं. नेहमीचंच बोलणं. कुठले शेअर घेतले, कुठले विकलेयाबद्दलचा हिशेब मी त्यांना देत होतो. एकीकडे शिंत्रेगुरुजींचं जेवणही आटपत आलं होतं.दादांकडचं काम संपवूनमी निघालो. त्यांच्या घराबाहेर पडलो. समोरच पानवाला होता. म्हटलं जरा पान खावं म्हणून पानवाल्याच्यादुकानापाशी गेलो. तेवढ्यात शिंत्रेगुरुजीही विड्या घ्यायला तिथे आले. पटवर्धनांकडे एवढे टम्म जेवलेले असूनही तेहडकुळे आणि उपाशीच दिसत होते!

"काय गुरुजी, कुठली विडी घेणार?" मी.

"आपली नेहमीचीच. मोहिनी विडी!"

मी पानाचे आणि विड्यांचे पैसे दिले आणि तिथेच दोन मिनिटं पान चघळत घुटमळत उभा राहिलो. शिंत्रेगुरुजीहीआता सुखाने विडीचे झुरके घेऊ लागले. जरा वेळाने आम्ही दोघेही आपापल्या मार्गाने चालते झालो. मीदिवसभरातल्या इतर कामांच्या मागे लागलो, पण शिंत्रेगुरुजींचा विचार डोक्यातून जाईना! मी त्यांना गेली अनेकवर्ष हे असच पहात आलोय.

अहो अलीकडे मरणही महाग झालंय म्हणतात. कुणी मेला की नातेवाईकांना दिवसवारे करायचा खर्चही आताशाखूप येतो. पहिल्या दिवसाच्या मंत्राग्नी पासून ते तेराव्यापर्यंत दहा-बारा हजाराच्या घरात कंत्राट जातं म्हणतात. मर्तिकाची, श्राद्धापक्षाची कामे करणारी भिक्षुक मंडळी हल्ली 'शेठजी' झालेली मी पाहिली आहेत. मग आमचेशिंत्रेगुरुजीच असे मागे का? छ्या! शिंत्रे गुरुजींना धंदा जमलाच नाही. नाहीतर आमच्याच गावातले नामजोशीगुरुजी बघा! हातात तीन तीन अंगठ्या, गळ्यात चांगला जाडसर गोफ. पृथ्वीला लाजवील अशी ढेरी!

नामजोशी गुरुजींच्या घरी मर्तिकाचा निरोप घेऊन कुणी गेलं की,

'तेराव्या दिवसापर्यंतचं काम देता का बोला? तरच आत्ता स्मशानात येतो. आणि हो, इतके इतके पैसे होतील हो. नाही, आधीच सांगितलेलं बरं! अहो फुकटच्या अंघोळी कोण करणार?!'

असं यजमानांनाच दरडावणारे नामजोशी गुरुजी! मग शिंत्रेगुरुजीच धंद्यात असे मागे का? इतके हडकुळे का?

काहीच कळत नव्हतं!

क्रमश:

--तात्या अभ्यंकर.

March 11, 2008

नान्या..!

"तात्या, पोष्टाजवळचा टकल्या सातपुते खपला रे. वेळ असेल तर ये!"

रात्री अकराच्या सुमारास जरा कुठे डोळा लागतो लागतो तोच नान्याचा फोन!

शिवनाथ पांडुरंग नवाथे, ऊर्फ नाना नवाथे, ऊर्फ नान्या! हा प्राणी मला कधी भेटला, कधी आमची घट्ट दोस्तीजमली आणि कधी हा माझा झाला ते कळलंच नाही.

नान्याला मर्तिकं पोचवायची भारी हौस. छंदच म्हणा ना! जरा ओळखीपाळखीतलं कुणी मरायचा अवकाश, नान्यात्या घरात सर्वात पहिल्यांदा हजर! नुकतीच पोरगी पटलेल्या एखाद्या युवकाने ज्या लगबगीने तिच्याबरोबर सहाचाशो पाहायला जावं, त्याच उत्साहाने नान्या कुणाच्याही मयताला निघतो!

मग काय हो, ज्या घरी मयत झालेलं असेल त्या घरच्या मयताच्या तयारीचं पुढारीपण आपसुकच नान्याकडे येतंआणि नान्याच सगळी सूत्र हलवायला घेतो. कुठल्या स्मशानात जायचं, लाकडं की विद्युतदाहिनी, भटजी ठरवणे यासगळ्या गोष्टी नान्याच बघतो. हे नान्याला कुणी सांगायला लागत नाही आणि नान्या कुणी सांगण्याची वाटहीपाहात नाही. एकतर त्या घरची मंडळी हे सगळं ठरवायच्या मनस्थितीत नसतात, बरं मर्तिकातलं सगळंच काहीसगळ्यांना माहिती असतं असंही नव्हे. उलट कुठून सुरवात करायची, कुणी पुढाकार घ्यायचा हा जरा प्रश्नच असतो. आणि तिथे नेमका आमचा नान्या सगळी सूत्र हातात घेतो आणि मंडळी मनातल्या मनात हुश्श करतात!

"काय रे नान्या, तू एरवी जसा मोठमोठ्याने आणि भसाड्या आवजात बोलतोस तसाच मयताच्या घरीही बोलतोसका रे?" मी एकदा गंमतीत नान्याला विचारलं होतं!

"अर्रे! त्यावेळचा बोलण्याचा खास दबका आवाज आपण राखून ठेवला आहे!"

एखाद्या मुरब्बी नटाच्या थाटात नान्या उत्तरला!

नान्याचं बोलावणं आलं आणि मी चूपचाप टकल्या सातपुतेच्या घरी हजर झालो. टकल्या सातपुते त्याच्यानेहमीच्या खत्रूड चेहेर्यानिशीच घोंगडीवर विसावला होता. ‍

"बरं झालं तू आलास!" नान्याने मला हळूच एका कोपर्यात घेऊन म्हटलं.

"आयला, हा टकल्या सातपुते म्हणजे एक नंबरचा भिकारचोट माणूस! आयुष्यभर सगळ्यांशी तुसडेपणाने वागला. लेकाच्या मर्तिकाला कोण आलंय का बघ! अरे चार डोकी तरी हवीत ना मयताला? म्हणून मुद्दामच तुला बोलावूनघेतला. अरे चार माणसं जमवताना माझी कोण पंचाईत झाल्ये म्हणून सांगू! छ्य्या..!"

अर्थात, टकल्या सातपुतेच्या मयताला चार डोकी जमवायची जिम्मेदारी कुणीही नान्याकडे दिलेली नव्हती, तरहौशी नान्याने ती आपणहून अंगावर घेतली होती हे वेगळे सांगणे लगे!

"काय करणार काकू? आता जे झालं त्याला काय इलाज आहे सांगा पाहू! तुम्ही धीर सोडू नका. अहो मरण कायकुणाच्या हातात असतं का? बरं, वसू निघाल्ये का पुण्याहून? तुम्ही काही काळजी करू नका. मी आलोय ना आता, मी सगळं बघतो सातपुतेकाकांचं!"

नान्या टकल्या सातपुतेच्या बायकोला धीर देत होता. एकिकडे टकल्या सातपुतेला 'भिकारचोट' अशी माझ्याकडेखासगीत शिवी देणारा परंतु त्याच्या बायकोशी बोलताना मात्र, "काय करणार काकू, आता जे झालं त्याला कुणाचाकाही इलाज आहे का? मी सगळं बघतो सातपुतेकाकांचं!"असं बोलणार्या नान्याचं मला हसूही आलं आणिकौतुकही वाटलं! :) ‍

वास्तविक टकल्या सातपुतेला रात्री मुद्दाम उठून अगदी हटकून पोचवायला वगैरे जावं इतकी काही त्याची आणिमाझी घसट नव्हती. पण काय करणार, आमचे नान्यासाहेब पडले मर्तिकसम्राट! त्यांच्या दोस्तीखातर मला जावंलागलं होतं!

"अखेर टकल्या सातपुते अत्यंत गरीब परिस्थितीतच गेला रे!" नान्या पुन्हा एकदा दबक्या आवाजात हळहळला!

"गरीब परिस्थिती? अरे त्याचं हे घर तर चांगलं सधन दिसतंय. आणि मी तर अलिकडेच टकल्या सातपुतेला सॅन्ट्रोकारने जाताना-येताना पाहात होतो! मग टकल्या गरीब कसा काय? काय कर्जबिर्ज होतं की काय त्याच्याडोक्यावर?" मी.

"च्च! तसा गरीब नाही रे!" (बर्याचदा बोलण्याच्या सुरवातीला 'च्च' असा उच्चार करायची नान्याची खास ष्टाईलबरं का! :)

"पैशे खूप आहेत रे टकल्याकडे. पण आता तू बघतो आहेस ना? अरे चार डोकी तरी आपुलकीने, आस्थेने जमलीआहेत का त्याच्या मयताला? तुला सांगतो तात्या, माणूस गरीब की श्रीमंत हे तो मेल्यावरच समजतं! तशीपैशेवाल्यांच्या मर्तिकाला काही मंडळी स्वार्थापोटी जमतात, किंवा एखाद्या राजकारण्याच्या मर्तिकाला पुढे पुढेकरायला मिळावं म्हणून कार्यकर्तेही जमतात, तो भाग वेगळा! परंतु तुझ्यामाझ्यासारख्या सामान्य माणसाच्यामयताला उत्स्फूर्तपणे चार माणसं जमतात आणि हळहळतात ना, ती खरी त्या माणसाची श्रीमंती समजावी!"

अच्छा! म्हणजे नान्या या अर्थाने टकल्या सातपुतेला गरीब ठरवत होता! माणसाला गरीब किंवा श्रीमंत ठरवायचानान्याचा हा निकष काही औरच होता!

"आता तुझ्या त्या देशपांडेचंच उदाहरण घे. तो खरा श्रीमंत! अगदी सामान्यातला सामान्य माणूस त्यालाआपुलकीने पोचवायला गेला होता!"

"कोण देशपांडे?" मी.

"अरे तुझा तो भाई देशपांडे रे!"

??

"अरे तुझा तो भाईकाका देशपांडे रे! टीव्हीवर शो करून सगळ्यांना हासवायचा ना? तो! काय गर्दी रे त्याच्यामयताला! टीव्हीवर दाखवत होते ना!"

मी मनातल्या मनात भाईकाकांची त्यांच्या एकेरी उल्लेखाबद्दल माफी मागितली आणि म्हटलं, "भाईकाका, आमच्या नान्याला एकेरी उल्लेखाबद्दल मोठ्या मनाने क्षमा करा. मनानं तसा निर्मळ आहे तो. तुमच्या अंतयात्रेलाझालेल्या उत्स्फूर्त गर्दीवरून तो तुम्हाला श्रीमंत ठरवतोय! तुमच्यातल्या माणूसवेडाला ही त्याची दाद समजा!"

एका बाबतीत मात्र नान्या खरंच सुखी होता. त्याला संगीत, कला, साहित्य वगैरे कश्शाकश्शात इंटरेस्ट नव्हता! पुलंनादेखील तो लेखक वगैरेच्या ऐवजी, 'टीव्हीवर ते कार्यक्रम करायचे' इतपतच ओळखत होता!

"हॅलो, कोण टिल्लूगुरुजी का? मी नाना नवाथे बोलतोय. पोष्टाजवळचे सातपुते वारले. तुम्ही अमूक अमूक वाजताडायरेक्ट स्मशानात पोहोचा. आम्ही त्याच सुमारास मयत घेऊन तिकडे येऊ!"

नान्या आता पुढच्या उद्योगाला लागला होता. नान्याची फोन डायरी जर तपासली असती तर त्यात मर्तिकाची कामंकरणार्या किमान पाचपन्नास भटजींची नांवं तरी सहज सापडली असती! :) ‍

"काय करणार तात्या, अरे ऐनवेळेस लोकांना भटजी कुठून बोलवायचा, कुणी बोलवायचा, कोण कोण भटजी अशीकामं करतात हे देखील माहीत नसतं! त्यामुळे साला मला या भटजी मंडळींशी कॉन्टॅक्टस् ठेवावे लागतात!"

एखाद्या गब्बर बिल्डरचे जसे महापालिका आयुक्त, नगरसेवक वगैरे मंडळींशी कॉन्टॅक्टस् असतात त्याच थाटातनान्या मर्तिकाच्या भटजींशी आपले कॉन्टॅक्टस् आहेत हे सांगत होता!

अंगापिंडाने काटक-सडपातळ, उभेल्या चेहेर्याचा, रंगाने सावळा, नाकीडोळी चांगला तरतरीत स्मार्ट, मध्यमउंचीचा, नेहमी साध्या शर्ट प्यँटीत असलेला नान्या गावात मुडदेफरास म्हणून प्रसिद्ध आहे. नान्या रेल्वेतइलेक्ट्रिकल कामगार या पदावर नोकरीला आहे. प्रसन्न चेहेर्याची, वृत्तीने अत्यंत समाधानी अशी पत्नी नान्यालालाभली आहे. तिचं नांव सुधा. नान्या तीन मुलींचा बाप आहे. सर्वात धाकटी स्नेहा आता - वर्षांची आहे. मी तिलाचिऊ म्हणतो. कधीही नान्याच्या घरी जा, आमची चिऊ जिथे असेल तिथनं भुर्रकन येऊन तात्याकाकाला येऊनबिलगते!‍ ‍

"गधडे, तू तात्याकाकाकडेच राहिला जा! तोच तुझं कन्यादान करील!" असं नान्या चिऊला म्हणतो! :)

नान्याचं सगळं घरच अगदी प्रसन्न आणि हसतमुख चेहेर्याचं आहे. रेल्वेची नोकरी सांभाळून नान्या घरगुतीइलेक्ट्रिक वायरींग दुरुस्तीची वगैरे कामही कामं घेतो. भरपूर कष्ट करतो. बायकोमुलींवर बाकी नान्याचा भलताचजीव! अत्यंत कुटुंबवत्सल स्वभाव आहे नान्याचा.

पण नान्याचा आवडीचा छंद किंवा विरंगुळा मात्र एकच. तो म्हणजे लोकांच्या मर्तिकाला जाणे! :) नान्या एकवेळकुणाच्या लग्नामुंजीला जायचा नाही, पण ओळखीत कुठे मर्तिक असल्याचं कळलं की सर्वात पहिला नान्या हजर! मग अगदी शेवटपर्यंत तिथे थांबणार. अगदी सामान आणण्यापासून ते तिरडी बांधण्यापर्यंत, डॉक्टरचं सर्टिफिकेट, स्मशानात सुपूर्द करायची कागदपत्र, लाकडं रचणार्या इसमाशी "काय रे बाबा, लाकडं ओली नाहीत ना? मीठआणि रॉकेल आहे ना?" इत्यादी गोष्टी कम्युनिकेट करणे, पळीपात्र, काळे तीळ, दर्भ, इथपासून भटजींच्यासामानाची अप्टुडेट तयारी करणे या सगळ्यात नान्याचं हात धरणारं गावात दुसरं कुणी नाही!

गणपतीच्या दिवसात नान्याकडे खरी धमाल असते. नान्याकडे पाच दिवसांचा गणपती बसतो.

"अरे तात्या, तुझं ते भजनीमंडळ घेऊन गणपतीत अमूक अमूक दिवशी माझ्या घरी ये रे. मस्तपैकी गाण्याचाकार्यक्रम करू!"

वास्तविक नान्याला संगीताचीही फारशी काही समज किंवा आवड नाही, पण गणपतीत घरी गाण्याचा कार्यक्रमझालाच पाहिजे ही हौस मात्र दांडगी! दरवर्षी नान्याच्या घरी माझं गाणं ठरलेलं, कारण मीच काय तो एकमेव गायकनान्याच्या ओळखीचा! पण मला खरंच कौतुक वाटतं नान्याचं. त्याच्या त्या दोन खोल्यांच्या रेल्वे क्वार्टर्समध्येपाचपंचवीस माणसं गाणं एकायला अगदी दरवर्षी जमतात. ही सगळी नान्याच्या गणगोतातली माणसं! मलाअभिमन वाटतो की मी देखील नान्याच्या गणगोतातीलच एक आहे!

गणपतीत दरवर्षी ठरल्याप्रमाणे मी माझा तब्बलजी आणि पेटीवाला घेऊन नान्याच्या घरी हजर होतो. नान्यातेव्हा कोण मुलखाच्या गडबडीत असतो! मग त्यानंतर अगदी यथास्थित, पाय दुखेस्तोवर अर्धापाऊण तासआरती! आरती झाली की गणपती बाप्पा मोरया या आरोळी पाठोपाठच, "देवा गणपतीराया सगळ्यांना मुक्ति मिळूदे रे बाबा! कुणाचा जीव तरंगत रहायला नको!" हे देखील नान्या ओरडतो! :)

छ्या! या नान्याचं मर्तिकाचं खूळ केव्हा जाणारे कुणास ठाऊक! गणपतीच्या दिवशीही "सगळ्यांना मुक्ति मिळू दे रेबाबा!" या आरोळीच्या रुपाने ते खूळ नान्याच्या पायात पाय घालायला येतंच तिच्यायला! ते सुद्धा नान्याच्यानकळत! कारण आपण असं काही बोललो हे देखील नान्याच्या गावी नसतं! :) मला तर एखाद् वर्षी "देवागणपतीराया, या वर्षी लाकडं जरा स्वस्त होऊ देत रे बाबा!" असंही नान्या ओरडेल की काय अशी भिती वाटते! :))

"हं तात्या, इथे सतरंजी घातल्ये. तुम्ही मंडळी इथे बसा आणि सुरू करा गाणं! मंडळी, सर्वांनी बसून घ्या रे. आतागाणं ऐकायचंय! सुधा, खिचडीच्या प्लेटा भरल्यास का?" नान्याची तोंडपाटिलकी सुरूच असते!

"तात्या, काय सुपारी-तंबाखू, पानबिन हवं तर सांग रे. लेका मोठा गवई तू!" एवढं म्हणून नान्या पुन्हा इतरलोकांच्यात कुणाला काय हवं नको ते पाहायला मिसळतो! मग मी आणि माझी साथीदार त्या गर्दीतच स्थानापन्नहोऊन वाद्यबिद्य जुळवू लागतो. कुठलीही औपचारिकता वगैरे पाळता नान्या मला हुकून सोडतो,

"सुरू कर रे तात्या. तुझं ते 'जो भजे हरि को सदा' होऊन जाऊ दे जोरदार!"

मैफलीच्या सुरवातीलाच गायकाला भैरवीची फर्माईश करणारा नान्या हा जगातला एकमेव श्रोता असेल! :)

मग मी देखील नान्याच्या घरी अगदी मन लावून, यथेच्छ गातो. तसा काही मी कुणी मोठा गवई नव्हे. बाथरूमसिंगरच म्हणा ना! पण नान्याच्या घरी गायला जी मजा येते ती कुठेच येत नाही! देव आहे की नाही हे मला माहितीनाही, पण नान्याच्या घरी गाताना मात्र मला इश्वरी वास जाणवतो!

बरं एवढं करून देखील नान्या तिथे गाणं ऐकायला थोडाच थांबेल? ते नाही! तो लगेच आलेल्या मंडळींना गरमागरमसाबुदाण्याची खिचडी आणि उत्तम मावा बर्फीचा तुकडा असलेली प्लेट द्यायला उठणार! नान्या, त्याची तीप्रसन्नमुखी बायको सुधा, आणि तीन निरागस मुली सगळ्यांच्या सरबराईत लागलेल्या असतात. गातांना मध्येचधाकटी चिऊ माझ्या मांडीवर येऊन बसणार! "तात्याकाका, मी पण गाणार!" असं मला म्हणणार! :)

"खरंच रे तात्या, चिऊला गाणं शिकवण्याकरता लेका मी तुझ्याचकडे पाठवणार आहे. तिला आपण मोठ्ठी गायिकाकरूया!" नान्या हे सांगत असताना सुधावहिनीही कौतुकाने चिऊकडे बघणार! मंडळी, खरंच किती साधी माणसंआहेत ही! नान्याच्या घरची गणपती मूर्ती जशी प्रसन्न दिसते तशी कुठलीच मूर्ती मला दिसत नाही! अहो देवसुद्धाशेवटी निरागसतेचा, साधेपणाचाच भुकेला आहे!

पण मंडळी, एका बाबतीत मात्र मी नान्याचा नेहमीच धसका घेतलेला आहे!

अहो काय सांगावं, रात्री अपरात्री कधीही नान्याचा फोन यायची भिती असते,

"तात्या अमका अमका खपला रे तिच्यायला! मोकळा असशील तर ये! अरे मयताला चार डोकी तरी जमवायलाहवीत ना!"

-- तात्या अभ्यंकर.

हाच लेख येथेही वाचता येईल...