राम राम मंडळी,
आमच्या ठाण्याचे डॉ विद्याधर ओक, आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ओक यांचं घर मला परकं नाही. डॉ विद्याधर ओक यांच्यावर सवडीने एखादा विस्तृत लेख लिहिणारच आहे, आत्ता त्याबद्दल फार लिहीत नाही.
गेल्या वर्षीची गोष्ट. गोकुळअष्टमीचा दिवस होता. संध्याकाळच्या सुमारास मला आदित्य ओकचा फोन आला, "तात्या, जिवंत आहेस का? साडेआठ नऊच्या सुमारास माझ्या घरी पोच. गाण्याची मैफल आहे."
झालं! आपली काय चैनच झाली. मी ठरल्यावेळेला गाण्याची मैफल ऐकायला गेलो. अगदी घरगुती स्वरूपाची मैफल होती. गिने-चुने श्रोते, त्यातच मी एक. मैफल अगदी मस्तच रंगली होती. मंडळी, मोठ्या मैफलींची मजा वेगळी, पण खाजगी, घरगुती स्वरूपाच्या मैफली नेहमीच अधिक रंगतात हा माझा आजपर्यंतचा अनुभव. 'रंगमंच' हा प्रकार नाही, गवई आणि श्रोते एकाच सतरंजीवर. एखाद्या चपखल समेला अगदी गवयाचा हात हातात घेऊन दाद देता यावी असा हा संवाद असतो. ही मैफलही तशीच अगदी छान जमली होती.
"दरस मोहे राम" ही झपतालातली बंदिश. मधुकंस फार सुरेखच जमला होता. अगदी छान लयदार, आणि सुरेल काम सुरू होतं! कोण बरं गात होतं?
मंडळी, ती मैफल होती एका तरुणाची. विलक्षण प्रतिभावंत, अवलिया कलाकार पं वसंतराव देशपांडे यांच्या नातवाची. त्याचं नांव राहुल देशपांडे.
राहुल हा आजच्या तरुण पिढीतला एक उमेदीचा कलाकार. गाणं तर रक्तातच. पण राहुलला आजोबांकडून तालीम घ्यायचा कधी योग आला नाही. कारण राहुल अवघा तीन-चार वर्षांचा असतानाच वसंतराव गेले. पण जाताना तो प्रेमळ आजा आपल्या नातवाच्या डोक्यावर हात ठेवूनच गेला. वसंतरावांचा गाण्यातला वैभवशाली वारसा राहुलला मिळाला आहे हे खरंच. पण मंडळी, गाण्यात नुसता पिढीजात वारसा असून चालत नाही. गाणं हे जरी रक्तातच असलं तरी ते शिकावं लागतं, त्याला श्रवण, चिंतन, मनन याचीही पुरेपूर जोड लागते. शिक्षण, श्रवण, आणि सततचे चिंतन व मनन असेल तरच मुळात असलेला गानझरा अधिक प्रसन्नतेने वाहू लागतो, प्रवाही होतो. राहुलच्या बाबतीत असंच झालं.
राहुलमध्येही गाणं होतंच, पण त्यानेही किराण्याचे पं गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडे गाण्याची रीतसर तालीम घ्यायला सुरवात केली. गंगाधरबुवांनंतर, पं मधुसूदन पटवर्धन यांच्याकडे राहुलने तालीम घेतली. कुमारजींच्या शिष्या उषाताई चिपलकट्टी यांच्याकडेही राहुल जवळ जवळ सात वर्ष गाणं शिकला. अजूनही त्याचं संगीतशिक्षण सुरूच आहे. आजही तो कुमारजींचेच शिष्य पं पंढरीनाथ कोल्हापुरे, कुमारजींचे चिरंजीव पं मुकुल शिवपुत्र यांच्याकडे गाण्याची तालीम घेत आहे. परंपरेचं गाणं न गाणाऱ्या वसंतरावांच्या नातवाचा ओढा कुमारजींनी सुरू केलेल्या दुसऱ्या अपारंपरिक गानप्रवाहाकडे असणं हे साहजिकच आहे!
मी राहुलची परवाची मैफल ऐकली आणि त्याच्या गाण्यातला सच्चेपणा मला जाणवला. राहुलने मैफलीची सुरवात छायानट या रागाने केली. मंडळी, छायानट हा खास करून ग्वाल्हेर परंपरेत गायला जाणारा राग. या रागाचा मला अपेक्षित असणारा विस्तार राहुलने केला नाही, पण ती वेळेची घडी झाली असे आपण म्हणू. कुमारांच्याच भाषेत सांगायचं तर एखाद्या रागातून प्रत्येक वेळेला हवं तसं मनोगत व्यक्त करता येतच असं नाही. छायानट नंतर राहुलने मधुकंस सुरू केला आणि तिथे मात्र राहुल छान रमला. मधुकंस म्हणजे काय विचारता मंडळी! शृंगाररसातील मधुरता ज्याच्यात पुरेपूर भरली आहे असा मधुकंस! जमला तर भारीच जमतो बुवा. राहुलने मधुकंस मस्तच जमवलान. सुरवातीचा विलंबित झपताल आणि 'आजा रे पथिकवा' ही द्रुत बंदिश छानच रंगली होती.
'बनराई बोराय लागे'! ओहोहो, राहुलने मधुकंस नंतर 'सोहनी-बसंत' सुरू केला. त्यातलीच 'बनराई..' ही बंदिश. 'सोहोनी-बसंत' ही खास कुमारांची रचना. तसं पहायला गेलं तर सोहोनी आणि बसंत हे दोन्हीही दिग्गज राग. त्यांच्यात योग्य तो समतोल साधत हा जोड राग गाणं हे कठीणच. राहुलने मात्र ह्या रागांचं बेअरींग छानच सांभाळलंन असं म्हणावं लागेल. राहुलचा सोहोनी-बसंत ऐकताना मजा आली.
'सोहोनी-बसंत' नंतर राहुलने राजकल्याण रागातील 'ऐसी लाडलीकी..' ही द्रुत बंदिश सुरू केली. क्या बात है, राहुलचं 'ऐसी लाडलीकी' छानच जमलं होतं. मंडळी, राजकल्याण ही खास वसंतरावांची खासियत. राजकल्याण म्हणजे पंचम विरहित यमन. तरीही राजकल्याणचं वेगळं असं चलन आहे आणि ते सांभाळूनच तो राग गावा लागतो. पंचम न लावता नुसताच यमन गायचा असा याचा अर्थ नव्हे! एकंदरीत राहुलचं 'ऐसी लाडलीकी' छानच चाललं होतं. जमून गेलं.
त्यानंतर राहुलने जनसंमोहिनी रागातली एक बंदिश म्हटली. हा राग मला व्यक्तिशः फारसा भावला नाही. कलावती रागात शुद्ध रिषभ, यापलीकडे मला तरी या रागात फारसं काही सापडलं नाही, जाणवलं नाही. सरतेशेवटी 'सुनता है गुरूग्यानी' या कुमारांच्या निर्गुणी भजनाने राहुलने मैफलीची सांगता केली. हे निर्गुणी भजनदेखील राहुलने अगदी तल्लीनतेने सादर करून श्रोत्यांना अंतर्मुख केलं. श्री समय चोळकर यांनी तबल्यावर आणि आदित्य ओक यानी संवादिनीवर अगदी रंगतदार साथ करून मैफलीत मजा आणली.
असो. मंडळी, एकंदरीत राहुल देशपांडे या माझ्या मित्राकडून मला बऱ्याच अपेक्षा आहेत. अगदी सुरेल गातो, ताला-लयीची अतिशय चांगली समज आहे. जे गातो ते स्वतःचं गातो, स्वतःच्या बुद्धीने गातो. त्याच्या गाण्यात मला विचारांचा, बुद्धीचा भाग बराच दिसला. सरगम गायकीवरही त्याची चांगली पकड आहे. आलापी सुरेल असून ताना निश्चितच खूप कल्पक आहेत. त्याचं गाणं अत्यंत प्रवाही आहे, सतत पुढे जाणारं आहे. बुद्धीवादी आहे. अर्थात ही त्याच्या आजोबांचीच खासियत. पण कधीतरी, कुठेतरी राहुलने आलापीतही जरा जास्त वेळ रमावं, त्यामुळे त्याचं गाणं अधिक समृद्ध होईल असं मला वाटतं. तानेतले, किंवा सरगमातले लहान लहान झरे, प्रवाह नक्कीच छान वाटतात, पण कधीतरी आलापीचा एखाद मोठा जलाशयही बघायला खूप सुरेख वाटतो. राहुलशी बोलताना ही बाब मी त्याला सांगितली होती, आणि त्यालाही ती पटली असावी असा माझा अंदाज आहे!
असो. आज राहूलसारखी तरूण मंडळी कुणाकडेही sms ची भि़क्षा न मागता रियाज करत आहेत, संगीताची साधना करत आहेत, ही गोष्ट मला खूप मोठी वाटते!
मंडळी, राहुलचं गाणं ऐकून मला जे जाणवलं ते मी इथे मोकळेपणानी लिहिलं आहे. त्याच्यातली मला जाणवलेली सर्वात मोठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे 'मी वसंतरावांचा नातू आहे म्हणून मला मोठं म्हणा' असा भाव त्याच्याकडे मुळीच नाही. वास्तविक एवढ्या मोठ्या गायकाचा नातू म्हणजे लोकांच्याही अपेक्षा बऱ्याच असतात. त्याचं दडपण राहुलला येत नसेल, असंही नाही. पण त्याच्या गाण्यातून ते मला जाणवलं नाही. तो जे काय गातो ते अगदी सहज आणि त्याचं स्वतःचं गातो. आणि मंडळी, मलातरी हीच गोष्ट मोठी वाटते. अर्थात, त्याच्या गाण्यात वसंतरावांचा ढंग निश्चितच आहे. आणि ते साहजिकही आहे. पण जे काय आहे ते अस्सल आहे. कुठेही नक्कल नाही.
असो, राहुलला त्याच्या भविष्यातील गानकारकीर्दीकरता मी अनेक अनेक शुभेच्छा देतो, सुयश चिंतितो. आज राहुलचं वय अवघं २७-२८ वर्ष आहे. अजून त्याला गाण्यात खूप काही करायचं आहे, शिकायचं आहे आणि अधिकाधिक उत्तम गायचं आहे. या सगळ्याकरता त्याला अगदी मनापासून शुभेच्छा! आज मी राहुल देशपांडेची मैफल ऐकली, अजून ३० वर्षांनंतर मला पं राहुल देशपांडे यांची एखादी जबरदस्त रंगलेली मैफल ऐकायला मिळावी हीच सदिच्छा! ;)
मला घाई नाही, मी थांबायला तयार आहे. कारण मला बऱ्याच आशा आहेत!
--तात्या अभ्यंकर.