March 31, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (30) - पान खाए सैंया..


उडत्या रंगाढंगाचं झक्कास गाणं -
पान खाए सैंया हमारो..
(येथे ऐका)

आशाताईंच्या गायकीकरताच केवळ जन्माला आलेलं गाणं.. त्यामुळे त्याला आशाताईंनी न्याय दिला नाही तरच नवल! काय सुंदर आवाज लागला आहे आशाताईंचा.. ! क्या केहेने..!


'सावली सुरतीया होठ लाल लाल..' या ओळीनंतर येणारे 'हाय हाय..' हे शब्द आशाताईंनी ज्या अंदाजाने गायले आहेत तिथे संगीतातल्या सार्‍या पदव्या, सारी बिरुदं अक्षरश: कुर्बान..!

ढंगदार गायकी म्हणजे काय, रंगतदार गायकी कशी असते, हे आशाताईंकडूनच ऐकावं.. त्यांच्या गाण्यातील हरकती, मुरक्या, नखरे..हे सारं केवळ लाजवाब.. आणि हे सारं करतांना सुरलयीवर तेवढीच जबदरस्त हुकुमत..!

जर्दायुक्त पानासारखीच रंगलेली ही उत्तर हिंदुस्थानी देहाती नौंटंकी क्लासच.. वहिदा रेहमान तर अशी दिसली आहे की कुणाचंही दिल फिदा व्हावं..केवळ खल्लास!
आशाताईंच्या गायकीला आणि वहिदाच्या सौंदर्याला सलाम..!

-- तात्या अभ्यंकर.

March 26, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (२९) -जबसे तेरे नैना..


सावरीया शिणेमातलं 'जबसे तेरे नैना.. '(येथे ऐका)
मध्यमातलं एक छान गाणं.. 'नैना' शब्दाचा शुद्ध धैवतावरचा न्यास आगळावेगळा..! एकट्या शुद्ध धैवतामुळे गाणं तरलं आहे, नव्हे छान झालं आहे. ही जादू स्वरांची! 'लागे रे.. 'वरचा षडज अगदी समाधानकारक. नि़ध़सा.. वा! एकंदरीत मुखड्याचा फील छानच आहे. गाण्याचं एरेजिंग, ठेका, कोरस इत्यादी सर्व गोष्टीही उत्तम!..

गाण्याच्या चित्रिकरणाबाबत मात्र न बोललेलंच बरं. रणबीर कपूर नामक प्राणी हा धड 'He मॅन'ही दिसत नाही आणि धड 'She मॅन'ही दिसत नाही.. आमच्या ऋषी आणि नितू या गुणी दांपत्याच्या पोटी हे असं अंमळ खुळं कार्ट कसं काय निपजलं देव जाणे!
जब से तेरे नैना मेरे नैनों से लागे रे
तबसे दीवाना हुआ, सबसे बेगाना हुआ
रब भी दीवाना लागे रे..

या ओळी छान.. मात्र,

जबसे तेरा आँचल ढला, तबसे कोई जादू चला..


ही ओळ जरा उथळच वाटते.. कवीला जळ्ळी बाईचा पदर ढळण्यात कसली जादू वाटते देव जाणे..! खरी जादू, खरा शृंगार हा पदराआडच आहे, झाकलेल्यातच आहे हे हल्लीच्या उघड्याबागड्या दुनीयेला कळत नाही हेच खरं! Smile अनीलची मुलगी सोनम मात्र चांगली दिसते हो!
Smile

असो, एकंदरीत गाणं म्हणून विचाराल तर छानच गाणं!
Smile

-- तात्या अभ्यंकर.

March 23, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (२८) - होली के दिन..



युगायुगांचे नाते आपुले...
(येथे ऐका..)

'तू तिथे मी..' चित्रपटातलं एक सुंदर गाणं..
युगायुगांचे नाते आपुले नको दुरावा
सहवासाची ओढ निरंतर, नको दुरावा..


छान, संथ लयीतलं, शांत चालीचं सुंदर गाणं..प्रियकर-प्रेयसीतलं, पतीपत्नीतलं युगायुगांचं अतूट नातं सांगणारं!

'नाते आपुले नको दुरावा' मधल्या रिषभ, गंधार आणि मध्यमाची गुंफण खूप सुंदर..आनंद मोडकांनी खूपच हळवा बांधला आहे गाण्याचा मुखडा.. अगदी मनाची पकड घेणारा!
भासे सारे सुने तुझ्यावीण, तुझ्याचसाठी आसुसले मन
तोडून बेड्या सर्व जगाच्या, कधी आपुले होईल मिलन
उन सावल्या झेलत हासत जन्म सरावा!

अंतराही अगदी क्लास बांधला आहे..गाणं लिहिलंही छान आहे. प्रशांत दामले, कविता लाड, मोहन जोशी आणि सुहास जोशी यांच्यावरील चित्रिकरण सुंदर.. त्यांच्या भावमुद्राही अगदी चालीला साजेश्या! व्हायलीन आणि बासरीचे तुकडे सुरेखच. ओव्हरऑल जमून गेलं आहे गाणं..!

मराठी चित्रसंगीतात अशीच चांगली गाणी यापुढेही व्हावी एवढीच इच्छा..

-- तात्या अभ्यंकर.

March 16, 2010

कर सुमिरन मन..


सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! Smile

वर्षाची सुरवात 'सुमिरन' करूनच करायची, तीही साक्षात यमनमध्ये!
गुढीपाडव्याच्या दिवशी पानात श्रीखंड असावं आणि कानात यमन असावा! अजून काय पाहिजे?
Smile

यमनाबद्दल काय बोलावं? रागांचा राजा यमन! हळव्या स्वभावाचा प्रसन्न यमन! माणसाचं माणूसपण म्हणजे यमन!

कर सुमिरन मन.. (येथे ऐका)

हिंदुस्थानी संगीतातील आजच्या तरूण पिढीच्या, लयदार-पेचदार अश्या जयपूर गायकीची उत्तम तालीम लाभलेल्या अत्यंत गुणी गायिका सौ अश्विनी भिडे देशपांडे यांनी ही बंदिश गायली आहे..अगदी भावपूर्णतेने! अश्विनीताईंना उत्तम आवाज लाभला आहे आणि गातातही अगदी मन लावून, हळवेपणाने!

कर सुमिरन मन मेरो
व्याप,ताप, संताप सब नासे..

खूप सुंदर शब्द आहेत या बंदिशीचे. गंधारावर अलगद उतरणारी सम असलेली मुखड्याची पहिली ओळ अगदी शांत..आणि त्यानंतर 'व्याप ताप..'चं अगदी तार षड्जा/रिषभापर्यंत जाणारं आणि 'नीपरेसा' या अवरोही संगतीने पुरं होणारं सुंदर नक्षिकाम!

आन पडी मझधार,
हरिनाम केवटही पार करे
तोरी नैय्या, भवसागर उतार!

अंतराही सुरेख! मत्ततालातली मध्यलयीची ही बंदिश स्वत: अश्विनीताईंनीच बांधली आहे..मत्तताल हा सहसा गायला न जाणारा तसा अनवट ताल. त्यामुळे ही बंदिश ऐकायला जरी सहजसोपी वाटली तरी ताला-लयीला तशी अवघडच आहे, अनवट आहे. आणि म्हणूनच अश्विनीताईंच्या या बंदिशीचं विशेष कौतुक वाटतं!

भागवत धर्मात सांगितलेलं नामस्मरणाचं जे महत्व, अगदी तेच महत्व यमनचं! ईश्वरप्राप्ती अगदी निश्चित!

सर्वांना गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा शुभेच्छा! Smile

-- तात्या अभ्यंकर.

March 01, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (२७) - होली के दिन..


होली के दिन..(येथे ऐका)

जय आणि वीरूने नुकतंच कालिया आणि मंडळींना हाकलून लावलं आहे त्यामुळे रामगढचे गावकरी आता खुशीने होळी खेळताहेत. गळ्यात हार वगैरे घातलेला देखणा वीरू आणि गोडगुलाबी अशी आमची बसंतीभाभी या जोडीचं हे होळीचं गाणंदेखील अतिशय सुरेख! पंचमदांच्या संगीताचा परीसस्पर्श लाभला आणि हे गाणं होळीच्या रंगात उत्साहाने रंगून गेलं..दिदि आणि किशोरदा खण्डवेवाल्यांची स्वर्गीय गायकी!

गोरी तेरे रंग जैसा थोडासा मै रंग बनालू
आ तेरे गुलाबी गालोसे थोडासा मै गुलाल चुरालू!


वीरूदादा बसंतीवर बाकी जामच फिदा आहेत..
:)

जा रे जा दिवाने तू होली के बहाने तू
छेड ना मुझे बेसरम!...


'बेसरम' या शब्दाचा उच्चार केवळ आमच्या दिदिनेच करावा! एकाकी जयदादाला देखील गावकरी आग्रहाने रंगात नाचायला बोलावतात आणि जयदादाही दोन घटका अगदी छान नाचतात.. इमामचाचाही खुश होऊन होळीचा नजारा पाहताहेत.. सारं गाव खुशीत आहे..इकडे रंगबेरंगी होळी सुरू आहे आणि तिकडे ठाकूरची पांढर्‍या साडीतली विधवा सून उभी आहे.. जयदादांचा जीव आहे तिच्यावर! :)

शोले शिणेमातलं काय गाजलं नाही? अभिनय, संवाद, गाणी, पात्रांची नावं..! एखाद्याने अगदी डॉक्टरेट करावी असा शिणेमा! मारे ऑस्कर्ड विजेते शिणेमे जगभर निघाले, अजूनही निघतील.. पण जयवीरूच्या दोस्तीचा, ठाकूर-गब्बरच्या दुश्मनीचा, बसंती-धन्नो-मौसीचा, सांभा-कालिया-रामलालचा हा सिनेमा पुन्हा होणे नाही! :)

-- तात्या अभ्यंकर.