December 25, 2008

मम सुखाची ठेव...

ती आली, तिनं पाहिलं, तिनं जिंकलं!

ती स्वरलता आहे, ती गानसम्राज्ञी आहे, ती मेलडीक्वीन आहे.....!

षड्ज पंचम भावातला सुरेल जुळलेला तानपुरा,
अन् त्यातला नैसर्गिक शुद्ध गंधार..
तो तर तिच्या गळ्यातच आहे...!
नव्हे, तर त्या गंधाराचं तंबोर्यातलं स्वयंभूत्व
हे तिच्या गळ्यानेच सिद्ध केलेलं आहे...!

कोमल अन् शुद्ध रिखभ, हे एरवी एकमेकांचे वैरी,
स्वभावाने अगदी एकदुसर्याच्या विरुद्ध,
परंतु दोघेही तिचेच आहेत...!

तोडीत दिसणारं कोमल गंधाराचं कारुण्य
हे तिनंच दाखवलं आम्हाला...
आणि बागेश्रीतला शृंगारिक कोमल गंधारही
तिनंच शिकवला आम्हाला...!

तिने स्वर लावल्यावर
तीव्र मध्यमातली अद्भुतता दिसली आम्हाला...
आणि शुद्ध मध्यमाचं गारूडही तिनंच घातलं आम्हाला...!

तिच्या पंचमातली अचलता आम्ही अनुभवली...
महासागराच्या ऐन मध्यावर एखाद्या जहाजाला
जसा एक आश्वासक सहारा मिळावा,
तसा सहारा, तसा आधार हा तिचाच पंचम देतो....!
हा पंचम एक आधारस्तंभ स्वर आहे,
आरोही-अवरोही हरकतींचं ते एक अवचित विश्रांतीस्थान आहे,
हे तिनं गायल्यावरच पटतं आम्हाला...!

तिच्याइतका सुरेख, तिच्या इतका गोड
शुद्ध धैवत गाऊच शकत नाही कुणी....
आणि तिच्याइतकं कुणीच दाखवू शकत नाही,
कोमल धैवताचं प्रखरत्व आणि त्याचं समर्पण....!

कोमल निषादाचं ममत्व अन् देवत्व,
तिच्यामुळेच सिद्ध होतं...
आणि तिच्या शुद्ध निषादामुळेच कळली आम्हाला
गाण्यातली मेलडी...!

आणि तिचा तार षड्ज?

गायकी म्हणजे काय, पूर्णत्व म्हणजे काय,
गाण्याचा असर म्हणजे काय,
हे तिथंच कळतं आम्हाला, तिथंच जाणवतं...तिच्या तार षड्जात..!

तिचा तार षड्जच पूर्ण करतो आमच्या
सगुण-निर्गुणाच्या अन् आध्यात्माच्या व्याख्या...
आणि तोच भाग पाडतो आम्हला,
ईश्वरी संकल्पनेवर विश्वास ठेवायला....!



ती गाते आहे, आम्ही ऐकतो आहोत...

सलीलदा, सचिनदा, पंचमदा, मदनमोहन, नौशादमिया
अन् कितीतरी अनेक..
तिच्या गळ्याकरताच केवळ,
पणाला लावतात आपली अलौकिक प्रतिभा...!
अन् तिच्याकडे पाहूनच
खुला करतात बाबुजी
"ज्योती कलश छलके"चा अमृतकुंभ...!

तिचं गाणं हा आमचा अभिमान आहे...
तिचं गाणं हा आमचा अहंकार आहे...
तिचं गाणं ही आमची गरज आहे...
तिचं गाणं ही आमची सवय आहे....
तिचं गाणं हे आमचं व्यसन आहे....
तिचं गाणं हे आमचं औषध आहे...
तिचं गाणं ही आमची विश्रांती आहे...
आणि
तिचं गाणं हेच आमचं सुख-समाधान आहे...

इतकंच म्हणेन की,

अन्न, वस्त्र, निवारा ह्या आमच्या मूलभूत गरजा.
त्यात आता तिच्या गाण्याचीही भर पडली आहे...!

शब्द खूप तोकडे आहेत,
तेव्हा पुरे करतो आता हे शाब्दिक बुडबुडे...

शेवटी एवढंच सांगून थांबतो की तिचं गाणं ही
"मम सुखाची ठेव" आहे!
"मम सुखाची ठेव" आहे!

--(तिचा भक्त, तिचा चाहता, तिचा प्रेमी!) तात्या अभ्यंकर.

हेच लेखन येथेही वाचता येईल..

‍‍