या वर्षीच्या गणपतीत एके दिवशी दरवर्षीप्रमाणे अगदी पोटभर जेवून तृप्त होऊन आलो आमच्या साधनेकडून..
साधना कोळीण..
मी गेलो की भर मासळी बाजारत.."आला गं बाई माझा भट.." असं ओरडणारी साधना कोळीण..
दरवर्षी गणपतीत तिच्याकडे जेवायला जातो मी. आमच्या साधनेचं घर म्हणजे मूर्तीमंत उत्साह, प्रसन्नता..
अगदी थाटात गणपती बसवला होता साधनेनं. सगळी फुलांची सजावट..त्यामध्ये खास कोलीलोकांचा रंगीबेरंगीपणा. थोडा भडकपणा. गणपतीच्या दोन्ही बाजूल जिवंत चिंबोर्या (खेकडे) टांगलेल्या..!
ही चिंबोर्या टांगण्याची पद्धतच आहे सोनकोल्यांची.. महादेव कोली आणि सोनकोली..
"आला गं बाई माझा भट. ये भटा.. बस.. "
आजदेखील तसंच दणकून स्वागत.. मुळात ह्या कोळणींचे आवाज चढे असतात.. त्यात साधनेचा आवाज म्हणजे काय विचारायलच नको..!
घरात एक-दोघी म्हातार्या.. घट्ट कोली पद्धतीचं लुगडं नेसलेल्या..पोराबाळांची लगबग, धावपळ.. घरात सणाचं अगदी छान, प्रसन वातावरण..
खुद्द आमची साधना काय सुरेख दिसत होती आज.. ती खास कोलीलोकांची साडी...गळ्यात-हातात-कानात दगिने, मोठं ठसठशीत कुंकू, केसांमध्ये ती टिप्पीकल कोल्यांची वेणी..
"भटा..दर्शन घे.. मग जेवायला वाढते तुला...ओ, जरा भटाकडे लक्ष द्या.. त्याला प्रसाद द्या.."
ही सूचना महेन्द्रला.. महेन्द्र म्हणजे साधनेचा घो.. अगदी छान माणूस..आणि तितकाच साधा..
मल नेहमीच खूप आपलेपणा वाटतो साधनेच्या घरात. मी मनापासून रमतो अशा लोकांमध्ये. शाळेतदेखील घनसोलीचा अव्या पाटील, काल्या शिंदे, नाखवा, एकनाथ तांडेल.. हीच माझी जवळची मित्रमंडळी.. प्रतिष्ठित, व्हाईट-कॉलर्ड भटाब्राह्मणांच्या मुलांनी मला कधी फारसा जवळ केलाच नाही. मी मनापासून रमलो तो या आगरी-कोली पोरांच्यातच..!
काय सुंदर सैपाक केला होता आमच्या साधनेने..!
आज घरात गणपती असल्यामुळे सगळं शाकाहारी. गरमगरम चपात्या, उत्तम टोमॅटो-फ्लॉवर-बटाट्याचा रस्सा, काकडीची फर्मास कोशींबीर, खीर, वाफाळलेला भात, वरण ..
"पोटभर जेव रे भटा माझ्या.. देव बसलेत घरात..आज तूच आमचा भट.."
"मी कसला गं भट? तुझ्याकडनंच तर मांदेली-बोंबिल नेतो..."
"मग? तं काय झालं? रक्त भटाचंच ना रे बाबा..!"
आमच्या साधनेचे सोवळ्या-ओवळ्याचे, शुचिर्भूततेचे नियम खूप सोपे होते, साधे होते. त्यात जराही बेगडी कर्मठपणा नव्हता..!
"अरे घे गरम चपाती अजून एक..!"..असं म्हणत तिनं ती पोळी डायरेक्ट तव्यावरून माझ्या पानात वाढलीदेखील..!
तिच्याकडची कुणी एक म्हातारी कोळीण मावशी जेवताना माझ्याजवळ येऊन बसली होती. तीही आग्रह करत होती. महेन्द्र उभा होता कडेला कृतज्ञतेने..!
जेवण झालं. महेन्द्रने, त्या भल्या माणसाने माझ्याकरता १२० पान आणून तयार ठेवलं होतं..!
"पुन्हा ये रे भटा.. ओ, तुमी काय बोला की..!"
पुन्हा महेन्द्रला दटावणी. महेन्द्र बापडा कसनुसा! दोन शब्द बोलला माझ्याशी..
"तुमी नेमी सणावारीच येता.. बाकी पन कदी या. थोडी पिवाला बसू. बोंबिल तलुया तुमच्याकरता. आता गणपतीनंतर म्हावरं चांगलं भेटल..!"
मला मजा वाटली महेन्द्रच्या त्या प्रेमळ 'पिवाला' बोलावण्याची..
साधना कोळीण..!
मला माहीत नाही कुठल्या जन्मीचे हे आम्हा भावा-भैणीचे छान ऋणानुबंध आहेत ते..! एका टिप्पीकल सोनकोळणीचा मी चित्पावन कोकणस्थ भाऊ..
"आला गं बाई माझा भट.." असं भर मासळीबाजारात प्रेमानं स्वागत होणारा कदाचित मी एकमेव चित्तपावन असेन..!
-- तात्या अभ्यंकर.
सदर लेख माझे गुरु भाईकाकांना समर्पित...