राम राम मंडळी,
पं भाई गायतोंडे! राहणारे आमच्या ठाण्यातलेच. संगीत क्षेत्रातलं एक मोठं नांव. त्यांचं खरं नांव सुरेश. 'भाई' हे त्यांचं टोपणनाव. सर्वजण त्यांना याच नांवाने ओळखतात. त्यांचा माझा खूप चांगला परिचय हे माझं भाग्य! त्यांना मी माझ्या गुरूस्थानी मानतो. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं, अजूनही बरंच काही शिकायचं आहे. मंडळी, भाईंबद्दल विचार करायला लागलो की किती लिहू आणि किती नाही असं होतं!
भाईंची तबला क्षेत्रातली कारकीर्द पाहिली की मन थक्क होतं. भाई मूळचे कोकणातले. कणकवली/कुडाळ भागातले. भाईंचे वडील व्यवसायाने डॉक्टर. त्याकाळी त्या लहानश्या गावातच त्यांची डॉक्टरकी चालायची. डॉक्टर स्वतः उत्तम पेटी वाजवायचे, गाण्याला साथसंगतही करायचे. त्यामुळे संगीताची आवड भाईंच्या घरातच होती. हौस म्हणून लहानश्या सुरेशनेही तबला शिकण्यास सुरवात केली.
त्यानंतर शिक्षणाकरता, आणि नोकरी-धंद्याकरता भाई कोल्हापुरात दाखल झाले. इंजिनीअरिंगच्या परीक्षेचा अभ्यास त्यांनी कोल्हापुरातच केला. पण मन एकीकडे संगीतात, तबल्यात गुंतलं होतं. त्याला भरपूर खाद्य मिळालं ते कोल्हापुरातल्या देवल क्लबमध्ये. देवल क्लबात अनेक दिग्गजांची नेहमी गाणी-वाजवणी व्हायची. भाईंमधला गुणी विद्यार्थी ते सगळं टिपू लागला. भाईंची आणि भीमण्णांची प्रथम भेट कोल्हापुरातच झाली. एकीकडे तबल्याचा रियाज सुरू होताच. ऐकणं-वाजवणंही सुरू होतं. तरीदेखील कशाची तरी कमतरता होती. काहीतरी अजून हवं होतं! मंडळी, ती कमी होती एका चांगल्या गुरुची. कारण अजून खूप काही शिकायचं होतं/शिकायला हवं होतं. पण कोणाकडे?
आणि अशातच एक दिवस जगन्नाथबुवा पुरोहित हे भाईंना गुरू म्हणून लाभले. हिऱ्यालादेखील पैलू पाडणारा कोणीतरी लागतो! तो भाईंना जगन्नाथबुवांच्या रूपाने मिळाला. जगन्नाथबुवा तेव्हा कोल्हापुरातच होते. संगीतक्षेत्रात तेव्हा बुवांचा विलक्षण दबदबा होता. आग्र्याची घराणेदार गायकी, आणि तबला या दोन्ही क्षेत्रात बुवांचा अधिकार. लोक अंमळ वचकूनच असत बुवांना. अशातच एके दिवशी भाई गुरूगृही पोहोचले आणि तबला शिकायची इच्छा व्यक्त केली. बुवांनीही शिकवण्याचे मान्य केले.
आणि आपल्या 'गुरू-शिष्य' या वैभवशाली परंपरेनुसार रीतसर तालीम सुरू झाली. रियाज सुरू झाला. तबल्यातील मुळाक्षरांचा रियाज! अगदी चार चार, सहा सहा तास हा रियाज चाले. जगन्नाथबुवा समोर बसून शिकवत, आणि खडा रियाज करून घेत. तबल्यातील अक्षरांच्या निकासावर बुवांचा जबरदस्त भर असे. कायदे, गती नंतर! आधी अक्षरं! अक्षरं नीट वाजलीच पाहिजेत, दुगल असो की चौगल असो की आठपट असो. कुठल्याही लयीत तेवढ्याच सफाईने अक्षरांचा निकास झाला पाहिजे. शिकवणीबरोबरच बुवांनी स्वतः समोर बसून हा रियाज भाईंकडून करून घेतला हे बुवांचे डोंगराएवढे उपकार मानताना आजही भाईंचे डोळे पाणावतात! ८ ते ९, ९ ते १० असा गाण्याचा क्लास नव्हता तो. बुवा सांगतील तेवढा वेळ रियाज करावा लागे. कुठलंही क्रमिक पुस्तक भाईंच्या हाताशी नव्हतं. बुवांचा करडा चेहरा हेच क्रमिक पुस्तक! शिष्याचं कौतुक वगैरे करणे हा प्रकार तर बिचाऱ्या जगन्नाथबुवांना माहीतही नव्हता. कितीही जीव तोडून वाजवा, बुवा साधं 'ठीक!' एवढंही म्हणत नसत! पण बुवा आमच्या कोकणातल्या फणसासारखे होते. आतून अतिशय प्रेमळ आणि गऱ्यासारखे गोड आणि बाहेरून काटेरी.
उस्ताद अहमदजान थिरखवाखासाहेब यांचीही भाईंना फार उत्तम तालीम मिळाली. खासाहेबांकडून भाईंनी काय नी किती घेतलं याची काही गणतीच नाही. पण थिरखवासाहेबाचं आणि जगन्नाथबुवांचं नेमकं उलटं होतं. बुवा स्वतः लक्ष घालून तासंतास शिकवीत तसे खासाहेब शिकवत नसत. 'मी वाजवतोय. त्यातून तुम्हाला काय घ्यायचंय ते घ्या! जमलं तर ठीक, नाहीतर सोडून द्या!' अशीच खासाहेबांची भूमिका असे! पण भाईंनी अक्षरशः एखाद्या टीपकागदाने टिपाव्यात तश्या तबल्यातील बंदिशी, त्यातील सौंदर्यस्थळं टिपली. खासाहेबांचीही हळूहळू भाईंवर मर्जी बसू लागली. पेणचे पं विनायकबुवा घांग्रेकर यांच्याकडे भाई केवळ झपतालातल्या खासियती शिकण्याकरता गेले आणि तिथे झपतालाचे धडे गिरवले, तालीम घेतली.
हे सगळं करताना भाईंना विशेष अडचण वाटली नाही. कारण हात तयार होता. जगन्नाथबुवांकडे तासंतास केलेल्या अक्षरांच्या रियाजाचं हे फळ होतं! कुठलीही नवी बंदिश ऐकली की ती तशीच्या तशी त्यांच्या हातातून अगदी सहजपणे आणि तेवढ्याच सुंदरतेने वाजू लागली.
एक शिष्य घडत होता, गुरू-शिष्य परंपरा धन्य होत होती!
"आज आमच्या भाईंनी इतकं सुरेख वाजवलंय की 'घरी गेल्यावर भाईची नको, पण त्याच्या हातांची एकदा दृष्ट काढून टाका!' असं मी वहिनींना सांगणार आहे."!
वरील उद्गार कविवर्य विंदा करंदीकर यांचे आहेत. प्रसंग होता वांद्रे येथील कलामंदीरात झालेला भाईंच्या एकल-तबलावादनाच्या (तबला-सोलो) कार्यक्रमाचा. विंदा आणि भाईंची चांगली मैत्री. त्यांनीही पं विनायकबुवा घांग्रेकरांकडून काही काळ तबल्याचं शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे त्यांना तबल्यातली उत्तम जाण आहे. विंदा राहतातही साहित्य-सहवासात. त्याच्या बाजूलाच कलामंदीर. त्यामुळे ते आवर्जून भाईंच्या कार्यक्रमाला आले होते. त्या कार्यक्रमाला माझ्या सुदैवाने मीही हजर होतो आणि भाईंच्या मागे तानपुऱ्याला बसलो होतो. त्यादिवशी भाईंनी झपताल इतका अप्रतिम वाजवला की कार्यक्रम संपल्यावर श्रोत्यात बसलेले विंदा न राहून उठले आणि रंगमंचावर येऊन बोलू लागले. त्यादिवशी विंदा भाईंबद्दल खूप भरभरून बोलले. अगदी कोल्हापुरापासूनच्या आठवणी निघाल्या. विंदाही काही काळ कोल्हापुरात होते. बरं का मंडळी, करवीर ही केवळ चित्रनगरी नव्हती, तर देवलक्लबमुळे ती काही काळ संगीतनगरीही झाली होती! (मिसळनगरी तर ती आहेच!:)
गाण्याला साथसंगत तर भाई उत्तम करतातच, त्याशिवाय एकल तबलावादन हा तर भाईंचा हातखंडा आणि जिव्हाळ्याचा विषय.
साथसंगत करताना तबलावादकाला नुसता तबला येऊन चालत नाही, तर त्याला गाण्याचीही उत्तम जाण असावी लागते. शिवाय ज्याच्या गाण्याला साथ करायची आहे त्या गवयाच्या गायकीची, त्याच्या घराण्याची तबलजीला थोडीफार तरी माहिती असावी लागते. साथसंगतीचा तबला वाजवताना भाईंनी या सगळ्यावर अगदी बारकाईने विचार केला आहे. आपण कोणाला साथ करतो आहोत? त्याचं गाणं कसं आहे? किराण्याच्या संथ आलापीचं आहे, की ग्वाल्हेर अंगाचं तालाशी खेळणारं आहे, की जयपूरची लयप्रधान गायकी आहे, की बोलबनाव करत बंदिशीच्या अंगाने जाणारी आग्रा घराण्याची गायकी आहे? या सगळ्याचा विचार तबलजीच्या साथीत दिसला पाहिजे आणि त्या अंगानेच त्याची साथ झाली पाहिजे. तरच ते गाणं अधिक रंगतं. भाईंनी आजतागायत अनेक मोठमोठ्या गवयांना साथ केली आहे. यात पं रामभाऊ मराठे, पं कुमार गंधर्व, पं यशवंतबुवा जोशी यांची नावं तर अगदी आवर्जून घ्यावी लागतील.
एकदा एका मैफलीत ग्वाल्हेर घराण्याचे पं शरदचंद्र आरोलकर यांच्याबरोबर भाईंना साथ करायची होती. तस पाहता भाईंना गाण्यातलं ग्वाल्हेर अंग चांगलंच परिचयाचं होतं. पण मंडळी, ग्वाल्हेरातदेखील दोन पाती आहेत. एक विष्णू दिगंबरांचं आणि एक कृष्णराव शंकर पंडितांचं. (तज्ज्ञांनी अधिक खुलासा करावा.) तर काय सांगत होतो? आरोलकरबुवा दुसऱ्या पातीचे! (सध्या अधिक तपशिलात शिरत नाही.)
बरं का मंडळी, ग्वाल्हेरवाला गवई पटकन हमीर गातो असं म्हणणार नाही. तो म्हणणार, चला जरा झुमरा गाऊया आणि झुमऱ्यातलं 'चमेली फुली चंपा' सुरू करणार. तेच आग्रावाला म्हणणार 'चलो, जरा 'चमेली फुली चंपा' गायेंगे!' तोही 'हमीर' गातो असं म्हणणार नाही. वर 'हम राग नही गाते, हम बंदिश गाते है!' असंही म्हणणार :) याउलट आमचे किराण्याचे अण्णा 'ग म (नी)ध नी.ऽ प अशी अत्यंत सुरेल आलापी करून एका क्षणात हमिराचं फार मोहक दर्शन घडवणार! प्रत्येक घराण्याची वेगळी खासियत! असो..
तर कुठे होतो आपण मंडळी? हां, तर आरोलकरबुवांची मैफल होती. आपल्याला त्यांच्याबरोबर वाजवायचं आहे, ते वादन नीट त्यांच्या मनासारखंच झालं पाहिजे ही भाईंची भावना. भाई कलेशी इतके प्रामाणिक, की आदल्या दिवशी चक्क आरोलकरांच्या घरी गेले आणि म्हणाले, "बुवा, उद्या आपल्याबरोबर वाजवायचंय. आत्ता बसूया का जरा वेळ? आपल्याला काय हवं नको ते सांगा"!
मला सांगा मंडळी, आज किती लोकांजवळ हा गूण आहे? तसे भाईही साथसंगतीत तयार होतेच की. तशीच जर वेळ आली असती तर ऐनवेळेला प्रत्यक्ष मैफलीतही त्यांनी आरोलकरबुवांना अगदी उत्तमच साथसंगत केलीच असती की! मग अशी काय मोठी गरज होती की ते आरोलकरबुवांच्या घरी गेले?
मंडळी, मला वाटतं इथेच भाईंची संगीतकलेविषयीची तळमळ दिसते!
धीऽ क्ड्धींता तीत् धागे धीं....
सभागृह श्रोत्यांनी भरलं होतं. भाईंच्या एकल वादनाचा (तबला-सोलो) कार्यक्रम सुरू झाला आणि भाईंनी वरील पेशकार सुरू केला. आहाहा, मंडळी काय सांगू तुम्हाला!
या भागात आपण एक एकल तबलावादक म्हणून भाई कसे आहेत हे पाहणार आहोत. एकल तबलावादनात भाईंचं नांव विशेषत्वाने घेतलं जातं. भीमण्णा जसे यमन गाताना त्याच्या ख्यालातून तो राग फार सुंदरपणे दाखवतात, त्यांचे विचार मांडतात, तसंच आहे एकल तबलावादनाचं. एकल तबलावादनात एखाद्या कलाकाराचा तबल्यातील विचार दिसतो. त्याची दृष्टी कशी आहे हेही कळतं. हाताची तयारी दिसते. लयीवरचं प्रभुत्व दिसतं.
आयुष्यभर तबल्यावर केलेला विचार, चिंतन, आणि रियाज ह्या सगळ्या गोष्टी भाईंच्या एकल तबला वादनातून अगदी पुरेपूर दिसतात. मंडळी, भाईंचं एकल तबलावादन ऐकायला मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. अक्षरशः एखादा यज्ञ सुरू आहे असं वाटतं. नादब्रह्मच ते! अहो वर उल्लेखलेला पेशकार नुसता सुरू झाला तरी सभागृह भारून जातं. एखादा सार्वभौम राजा सोन्याची अंबारी असलेल्या हत्तीवर बसून जात आहे आणि दुतर्फा माणिकमोती उधळत आहे असं भाईंचा पेशकार सुरू झाला की वाटतं!
धींऽ धाऽग्ड् धा तत् धाऽग्ड्धातीं ताक्ड् ता तत् धाग्ड्धा
ओहोहो, मंडळी हाही एक पेशकाराचाच प्रकार. हा प्रकार थिरखवाखासाहेबांनी बांधला आहे. हा खेमट्या अंगाचा पेशकार. तसं म्हटलं तर खेमटा हा लोकसंगीतातीलच एक तालप्रकार. यावरूनच हा पेशकार खासाहेबांनी बांधला आहे. आपल्या रागसंगीताचं, शास्त्रीय संगीताचं कुठेतरी आपलं लोकसंगीत हेच मूळ आहे असं म्हणतात ते पटतं! हा पेशकार जेव्हा भाईंच्या हातातून वाजू लागतो तेव्हा सभागृह अक्षरशः डोलू लागतं. काय हाताचं वजन, दाह्याबाह्याचं किती सुरेख बॅलंसींग़! दादऱ्या अंगाचा रेला हा तर केवळ भाईंनीच वाजवावा! रेला वाजवताना लयीवरचं आणि अक्षराच्या निकासावरचं त्यांचं प्रभुत्व पाहिलं की थक्क व्हायला होतं. भाईंची पढंतही अत्यंत रंजक आणि नाट्यपूर्ण असते. अगदी ऐकत राहावीशी वाटते. अहो तबल्यावरचे हातदेखील अगदी देखणे दिसले पाहिजेत असं भाई म्हणतात.
मंडळी, भाईंनी नेहमी वेगवेगळ्या गतींना, बंदिशींना एक काव्य मानलं. 'ही बंदिश बघ, ही गत बघ. अरे यार सुरेख कविता आहे रे ही" असं भाई म्हणतात. आणि खरंच मंडळी, आज अशी अनेक काव्य भाईंच्या हातात सुरक्षित आहेत. नव्हे, ती त्यांनी आयुष्यभर जपली आहेत.
आपल्या गुरुंव्यतिरिक्त, घराण्याव्यतिरिक्त इतरही अनेक दिग्गजांचा आणि घराण्यांचा भाईंचा अभ्यास आहे. आमिरहुसेनखासाहेबांकडे भाई कधी शिकले नाहीत, पण खासाहेबांचा भाईंवर फार जीव! अल्लारखासाहेबांचं भाईंवर अतिशय प्रेम होतं. भाईकाकांनी, कुमारांनी भाईंच्या तबल्यावर मनापासून प्रेम केलं. आज उ झाकीर हुसेन, पं सुरेशदादा तळवलकर, पं विभव नागेशकर, यांच्यासारखी दिग्गज मंडळी भाईंना खूप मानतात.
अर्जुन शेजवलांसारखे अत्यंत थोर पखवाजिया भाईंचा फार आदर करीत. अलीकडच्या पिढीतले ओंकार गुलवडी, योगेश समसी यांच्यासारखे गुणी तबलजी भाईंकडे एक आदर्श म्हणून पाहतात. याचं कारण एकच. ते म्हणजे भाईंचा रियाज आणि तबल्यावरचा विचार. काय नी किती लिहू भाईंबद्दल!
मंडळी, आमचे भाई स्वभावानेही अगदी साधे, निगर्वी आणि प्रसिध्दीपऱमुख आहेत. आमच्या उषाकाकूही अगदी साध्या आहेत. भाईंचे चिरंजीव डॉ दिलिप गायतोंडे हे ठाण्यातले एक यशस्वी नेत्रशल्यविशारद आहेत. तेही फार छान पेटी वाजवतात. त्यांनी पं बाबुराव पेंढारकरांकडे पेटीची रीतसर तालीम घेतली आहे.
आजही काही अडलं की कोणीही भाईंकडे जावं. ती व्यक्ती विन्मुख परत येणं शक्य नाही. गेली अनेक वर्ष भाई तबल्याची विद्या सर्व शिष्यांना मुक्तहस्ते वाटत आहेत. ते नेहमी सर्वांना सांगतात, "बाबानो माझ्याकडे जे काय आहे ते मी द्यायला, वाटायला तयार आहे. तुम्ही या आणि घ्या!" अगदी भाई स्वतःदेखील आत्ता आत्ता पर्यंत पुण्याच्या पं लालजी गोखल्यांकडे मार्गदर्शनाकरता जायचे. लालजी आता नाहीत.
वयाच्या पंचाहत्तरीतदेखील भाईंचा स्टॅमिना आणि उत्साह वाखाणण्याजोगा आहे. आजपर्यंत भारतभर तबल्याच्या अनेक शिबिरांत, प्रात्यक्षिक-व्याख्यानासारख्या कार्यक्रमांत भाईंनी आवर्जून उपस्थिती लावली आहे. आपले विचार लोकांना ऐकवले आहेत. काही काही वेळेला जोडून सुट्टी वगैरे आली की सर्व शिष्यांना घेऊन भाई बाहेरगावी जातात. तिथे त्यांच्याकडून ३-३ दिवस रियाज करून घेतात. जगन्नाथबुवांनी भाईंकडून असाच रियाज करून घेतला होता. भाई आज तेच करत आहेत. गुरू शिष्य परंपरा!!
मला माझ्या सुदैवाने भाईंचं खूप प्रेम मिळालं. गाण्यातल्या, तबल्यातल्या अनेक गोष्टींवर भाई माझ्याशी अगदी भरभरून बोलले आहेत. कधीही भेटलो की कौतुकाने "काय तात्या, काय म्हणतोस" असं विचारणार. मग मी हळूच त्यांचं पान त्यांना देणार. मग मला म्हणणार "क्या बात है! आणलंस का पान! अरे पण तंबाखू फार नाही ना घातलास?:)
त्यांच्या एकलतबलावादनात त्यांच्या मागे मी अनेकदा तंबोऱ्याला बसलो आहे. तंबोरा छान लागला की लगेच "क्या बात है" असं म्हणून कौतुक करणार! इतक्या मोठ्या मनाचे आहेत आमचे भाई. ठाण्यात माझा एक बंदिशींचा कार्यक्रम झाला होता. त्याला ते आवर्जून आले होते. "चांगल्या बांधल्या आहेस बंदिशी" असं कौतुक केलं आणि पाठीवरून हात फिरवला. "नेहमी असंच काम करत रहा" असं प्रोत्साहनही दिलं!
मंडळी, अनेकदा भाईंशी बोललो आहे. पण बोलता बोलता भाई मनानं कोल्हापुरात जातात आणि पुन्हा एकदा हा शिष्य जगन्नाथबुवांच्या आठवणीने हळवा होतो. स्वतःच्या वडिलांचादेखील मृत्यू अगदी धीराने घेणारा हा माणूस, पण जगन्नाथबुवा गेले तेव्हा मात्र हमसाहमशी रडला होता. आजही त्यांचे डोळे पाणावतात. मला म्हणतात, "कोणाच्याही मृत्युचं विशेष काही नाही रे तात्या. तो तर प्रत्येकाला येणारच आहे एके दिवशी. पण जगन्नाथबुवा गेले तेव्हा असं वाटलं की आता आपल्याला काही अडलं तर विचारणार कोणाला? हे चूक, हे बरोबर, असं कर, असं करू नको हे सांगणारं कोणी राहिलं नाही रे तात्या. असं वाटतं की पुन्हा एकदा जगन्नाथबुवांसमोर बसावं आणि अक्षरांचा रियाज करावा, अगदी त्यांचं समाधान होईपर्यंत!"
--तात्या अभ्यंकर.