January 25, 2011

काका हलवायाकडची जिलबी..

लिहायला बसलो आहे, परंतु खरं तर काहीच लिहायला सुचत नाही..सारा दिवस कसाबसा गेला परंतु आता रात्र मात्र अंगावर येऊ पाहाते आहे.

अक्षरश: ओक्साबोक्षी रडावसं वाटत आहे, पण धड रडूही येत नाही. गेल्या दोनचार दिसापूर्वी मीच त्यांच्याकरता मारे विमान वगैरे मागवलं होतं, अर्थात त्यांचा त्रास, अंथरुणातल्या हालअपेष्टा संपाव्यात म्हणून. परंतु वास्तव इतकं सोपं नसतं. आज जेव्हा खरोखरच विमान आलं आणि त्यांना तुकोबांच्या पंक्तित घेऊन गेलं तेव्हा त्या वास्तवातली प्रखरता जाणवली..!

नाही पचवू शकत आहे ते वास्तव. मीही सामान्यच..! ना त्यांच्यासारखा योगीसाधक, ना तुकोबांसारखा परब्रह्म कळलेला..!

अगदी १९८८-८९ पासूनच्या त्यांच्या आठवणी, त्यांचा सहवास, त्यांचा अत्यंत साधा सादगीभरा स्वभाव..सारं काही मनात रेंगाळत आहे..

प्रयत्न करतोय पण सूत्ररुपात नेमकेपणाने मांडता येत नाहीयेत त्या आठवणी या क्षणी..!

तसे अबोल होते ते..! पण कधी कधी आपणहून बोलायचे. ख्यालाबद्दल, गाण्याबद्दल, जुन्या गायकांबद्दल, त्यांच्या गायकीबद्दल भरभरून बोलायचे..

कधी कधी थट्टाही करायचे,

"काय अभ्यंकर, काय म्हणतंय तुमचं गाणं? काय रियाजवगैरे..?"

"छे हो अण्णा, मी कुठला गातोय? मी दगड आहे अजून.."

"तेही नसे थोडके..! तुम्ही दगड आहात हे स्वतःहून कबूल करताय, ही एक चांगली सांगितिक खूण आहे. परंतु काही लोकांना आपण दगड आहोत हेच कळत नाही, ही गोष्ट मात्र संगीताला घातक आहे..! दगड असण वाईट नाही परंतु आपण दगड आहोत हे न समजणं, हे मात्र घातक..

असं अगदी नेमकं आणि मार्मिक बोलायचे..!

"वा..! काका हलवायाकडची जिलेबी का? तुम्ही अगदी न चुकता आणता बरं..!"

कधी असं कौतुक करायचे.. मग ते पंजाबात जलंधरला असताना तिथे कशी जिलेबी मिळायची ते सांगायचे..

जलंधरलाच कडाक्याच्या थंडीत पहाटे उठून जोरबैठका आणि नंतर डायरेक्ट विहिरीत उडी मारून केलेली अंघोळ..!

आठवणीत रमून जायचे.

मग त्या बोलण्यात हाफिजअली यायचे, बिस्मिल्लाखा यायचे, सिद्धेश्वरीदेवी, रसूलनबाई यायच्या..!

कधी विदाऊट तिकिट रेल्वेप्रवासाची गोष्ट..

विदाऊट तिकिट रेल्वेप्रवासाला अण्णा 'फ्री पास होल्डर' असं गंमतीने म्हणत..!

कधी तंबोरा कसा लावावा, जवारी कशी काढावी, तंबोरा जवारदार कसा वाजला पाहिजे याचे धडे नेहरू सेन्टरच्या किंवा बिर्ला मातुश्रीच्या ग्रीनरूममध्ये मिळायचे..!

खूप आठवणी आहेत, पण वर म्हटल्याप्रमाणे आत्ता धड काही सुचत नाहीये..

पण ते सारं सूत्ररुपाने लिहायचं आहे एकदा..

क्षमा करा, तूर्तास इथेच थांबवतो या ओबधधोबड ओळी..

तात्या.

January 22, 2011

जीवन डोर तुम्ही संग बांधी..


(येथे ऐका)

'जीवन डोर..' च्या पंचमामधली सहजता पाहा. 'तुम्ही..' या शब्दातलं आर्जव पाहा, मार्दव पाहा. 'बांधी..' या शब्दातला षड्ज पाहा. 'दैवी..' हा शब्ददेखील तोकडा पडावा असा षड्ज..! 'क्या तोडेंगे इस बंधन को..' मधला विश्वास पाहा, त्यातले भाव पाहा. 'जगके तुफां आंधी..' नंतरचा शुद्ध गंधारावरचा न्यास पाहा. तानपुर्‍यातला नैसर्गिक शुद्ध गंधार आणि दिदीचा शुद्ध गंधार दोन्ही एकच..! हौशी संगीतज्ञांनी अगदी श्रुतीन् श्रुती तपासून पाहावी. आपला ओपन चायलेन्ज..! 'डोर..' शब्दावरची अतिनाजूक, अतिहळवी जागा पाहा....!
ही सारी गायकी अवघ्या दोन ओळीतली..!

गाणं कसं मांडावं, शब्द कसे टाकावेत, त्यातले भाव कसे जपावेत, आवाजाचा लगाव कसा हवा, लयीला अगदी अलगदपणे, बेमालूमपणे कसं सांभाळावं, या सार्‍या प्रश्नांची उत्तरं केवळ,

'जीवन डोर तुम्ही संग बांधी,
क्या तोडेंगे इस बंधन को
जगके तुफां आंधी रे आंधी..'


या दोन-तीनच ओळीत मिळतात. पुढलं गाणं म्हणजे सगळा बोनस. 'देता किती घेशील दो करांनी..' अशी अवस्था..!

गाणं ऐकून अगदी कुणीही यमनातल्या एखाद्या 'नी़रेपम'रेगरेनी़ध़नी़रेसा..' सारख्या संगतीने सहज गुणगुणायला सुरवात करावी..! खूप पोटेन्शिअल असलेली चाल. अर्थात, ही श्रीमंती यमनची.

'चाहे घिरे हो बादल सारे,
फिरभी रहुंगी तुम्हारी तुम्हारी..!'


यातलं भिडणारं आश्वासन आणि पुन्हा एकदा शुद्ध गंधार..! शब्दच संपतात..!

-- तात्या अभ्यंकर.

January 16, 2011

येऊ देत आता अजून एक विमान...!

देवा परमेश्वरा,


आज सकाळीच ते अत्यवस्थ असल्याची बातमी कानावर आली..!

देवा, आता पुरे झालं. ने त्यांना आता तुझ्या घरी. अगदी शांतपणे, त्रास न होता डोळे मिटू देत..!

ते वयोवृद्ध आहेत, गलितगात्र आहेत, खूप आजारी आहेत. गेल्या बर्‍याच काळापासून अक्षरश: अंथरुणातच आहेत.

माझ्यासारखे त्यांचे सामन्य भक्त, प्रशंसक, सगेसोयरे, हितचिंतक सारे त्यांच्या भोवती आहेत रे, पण तरीही ते मात्र पूर्णत: परावलंबी आहेत, असहाय्य आहेत..

आता अश्या अवस्थेत नाही पाहावत त्यांना..!

याचसाठी केला होता अट्टाहास,
शेवटचा दिस गोड व्हावा..!

त्यांच्या या अभंगाचे स्वर कानी घोळताहेत..!

दहा वर्षाचा एक मुलगा कलेचं वेड घेऊन घरातून पळाला. खूप खस्ता खाल्या, अपार कष्ट केले. पुढे त्याचं फळ मिळालं, त्याचा वेलू गगनावेरी गेला. अक्षरश: न्हाऊ घातलं सर्वांना त्या अलौकिक सुरांनी.

'भारतरत्न..' या पदवीचा सन्मान झाला..!

'एकामेवाद्वितिय..', 'परंतु या सम हा..' ही सारी बिरुदं रोजचीच झाली, सवयीची झाली..!

या वेदशास्त्रसंपन्न महामहोपाध्यायांनी 'सवाईगंधर्व संगीत महोत्सव..' हा संगीताचा महायज्ञ सुरू ठेवला. पन्नास वर्षांहून अधिक काळ..!

लौकिकार्थाने आयुष्यभर एखाद्या बादशहासारखे, सम्राटासारखे वावरले ते...! परंतु व्यक्तिगत जीवनात मात्र तेवढेच साधे आणि सादगीभरे राहिले..!

परंतु आता मात्र नको हा वनवास, नकोत त्या अंथरुणातल्या हालअपेष्टा..!

काहीच दिसांपूर्वी त्यांच्या दर्शनाकरता गेलो होतो त्यांच्या घरी..!
देवा, विश्वास ठेव, मला काय म्हणाले माहित्ये?

" परमेश्वराने माझी क्रूर थट्टा चालवली आहे...!"

देवा, थांबव आता ही क्रूर थट्टा..!

देवा, लोकांना कदाचित माझी ही प्रार्थना आवडणार नाही. दुषणं देतील मला लोकं..! परंतु पर्वा नाही. कारण माझं त्यांच्यावर अत्यंत प्रेम आहे अन् त्याहूनही अधिक निस्सीम अशी डोळस श्रद्धा आहे...!

"अणुरणिया थोकडा.." लिहिंणार्‍या तुकोबांकरता देवा तू विमान पाठवलं होतंस..

त्याच ओळीतल्या भावार्थात आणि त्यातल्या मालकंसाच्या दैवी सुरात कोट्यावधीच्या जनसमुदायाला डोलायला लावणार्‍या, समाधीस्त करणार्‍या भूतलावरच्या एका योग्याकरताही विमान पाठव..

येऊ देत आता अजून एक विमान...!

-- तात्या.

January 13, 2011

मकरसंक्रांती पेश्शल - प्पत्तंग उडवीत होते..! :)


राम राम मंडळी,

सर्वांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा.

तीळगुळ घ्या अन् ग्वाड बोला..!

मकरसंक्रांती दाराशी उभी आहे. या दिवसाचं आणि पतंग उडवण्याचं काही वेगळंच नातं. खास करून अहमदाबाद आदी गुज्जू शहरात याचं खास महत्व. त्या मानाने आपल्या महाराष्ट्रात कमी. परंतु या पतंग उडवण्यावर मात्र एक झक्कास लावणी आपल्याकडे आशाताईंनी गाऊन ठेवली आहे.

प्पत्तंग उडवीत होते..!
(कृपया येथे ऐका)

च्यामारी, सुरवातच लै ठसकेबाज आहे. उच्चारी अगदी प ल प आणि त ल त जोडलेला आहे. लावणीच्या सुरवातीलाच 'पतंग' हा शब्द असा काही पडला आहे की क्या बात है..! मंडळी, अगदी गंमत म्हणून तुम्हीच गुणगुणून पाहा. आधी नुसतं 'पतंग उडवीत होते..' हे गुणगुणा. अगदी मिळमिळीत मुगडाळ खिचडीची चव लागेल. परंतु त्यानंतर लगेच 'प्पत्तंग उडवीत होते..' हे म्हणून पाहा.. झणझणीत, ठसकेबाज मिसळीची मजा येईल..! Smile

पतंग शब्दाचा 'प्पत्तंग' हा उच्चार हे या लावणीचं मला भावलेलं मर्मस्थान..! गाणं ऐकावं हे अर्थातच महत्वाचं, परंतु ते कसं एकावं हे अधिक महत्वाचं..!

चढाओढीनं चढवीत होते,
गं बाई मी प्पत्तंग उडवीत होते..!

आहाहा काय साला सीन आहे..!

'चढाओढीनं चढवीत होते..!'

मंडळी, आणा पाहू डोळ्यासमोर, एक झक्कास मर्‍हाटमोळी ठसकेबाज बया, नऊवारीबिव्वारी नेसून मस्त मोकळ्या हवेत प्पत्तंग बदवते आहे, चढवते आहे. मोप वारं सुटल आहे तिच्यायला. बाईचा पदर मस्त वार्‍यावर फडफडतो आहे, कपाळावर जीवघेणी बट मस्त खेळते आहे अन् बाई प्पत्तंग उडवत आहे..!

किती कौतुक करावं गदिमांचं आणि आशाताईंचं..!

होता झक्कास सुटला वारा
वर प्पत्तंग अकरा बारा
एकमेकांना अडवीत होते..

डोळ्यासमोर अक्षरश: चित्र उभं करण्याचं कसब तो देशस्थ रांगडा गडी गदिमाच करू जाणे..!

काटाकाटीस आला गं रंग
हसू फेसाळे घुसळीत अंग..!

आता प्पत्तंग उडीवतांना काटाकाटी ही चालायचीच की राव. नायतर काय मजा? Smile

दैव हारजीत घडवीत होते.!

मंडळी, हे आमचे अण्णा माडगुळकर. 'दैवजात दु:खे भरता..' लिहिणारे हेच अण्णा मडगुळकर..!

दैव काय अन् नियती काय..! तिथे जीत कमी. त्या मानाने हारच जास्त..!

मंजूर हाय आमास्नी ही हारजीत...!

काटाकाटी होईल. त्यात कदाचित आपला पतंग गूल होईल, काटला जाऊन झोकांड्या खाईल..!

दैव हारजीत घडवीत होते

तरीही,

प्पत्तंग उडवीत राहिलं पाहिजे, हेच महत्वाचं..!

-- तात्या अभ्यंकर.

January 10, 2011

केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर...

आज बर्‍याच दिवसांनी सुमन कल्याणपुरांचं एक भावगीत कानी पडलं आणि मी खूप वर्ष मागे गेलो.
कुठलं होतं ते भावगीत?


'केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर!'

अगदी साधंसुधंच परंतु हृदयाला हात घालणारं असं हे भावगीत! पूर्वी आकाशावाणी मुंबई 'ब' नांवाचा एक प्रकार होता. त्यावर कामगारविश्व, आपली गाणी, इत्यादी कार्यक्रमात अशी भावगीतं लागायची हे मला आठवतंय. खूप सुख वाटायचं ही गाणी ऐकताना. साधारणपणे ८०-८५ चा तो काळ असेल! किंवा त्याही आधीचा. साधारणपणे ७५ ते ८५ चं दशक असावं. तेव्हा दूरदर्शनचं आगमन झालं होतं. पण आकाशवाणी मुंबई 'ब' चा तेव्हा बराच प्रभाव होता एवढं मला आठवतंय. माझ्या शालेय काळातील ही सगळी वर्ष. दुपारी काहीतरी बारा-साडेबाराची शाळा असे. अकरा वाजता कामगारविश्वातील गाणी लागली की हळूहळू शाळेचं दप्तर वगैरे भरायला लागायचं. मग त्यानंतर काय असेल ते पोळीभाजीचं साधंसुधं जेवण आणि नंतर गणवेष घालून शाळेत जाणे!

दोन तीन वर्ष आमची शाळा सकाळची होती. तेव्हा सकाळी ६ वाजता आमची आई आकाशवाणी मुंबई ब सुरू करायची. मला आठवतंय, अण्णांचे माझे माहेर पंढरी, पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा हे अभंग हमखास कानावर पडायचे. सकाळी सातच्या बातम्यात 'सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत' म्हणून बातम्या सांगणार्‍या कुणी बाई यायच्या. त्यांचा तो आवाज इतका फॅमिलियर झाला होता की सुधा नरवणे आपल्या घरातल्याच कुणीतरी वाटत! अलिकडे मी रेडियो लावतो पण मला तो आपलासा नाही वाटत! काय रेडियो मिर्ची काय, नी काय काय! त्यातल्या उठवळ निवेदकांची ना धड हिंदी, ना धड विंग्रजी अशी अखंड बडबड! काय म्हणतात बरं त्यांना? व्ही जे की टीजे असलं काहीतरी म्हणतात! मला या शब्दांचे अर्थही अजून माहीत नाहीत. त्या मानाने आमच्या सुधा नरवणे मला खूप आपल्या वाटायच्या, घरातल्या वाटायच्या! इतक्या की त्यांनी कधी चुकून त्यांच्या खणखणीत आवाजात 'सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत' असं रेडियोतून म्हणायच्या ऐवजी, 'अभ्यासाला बस पाहू आता' असं जरी म्हटलं असतं तरी ते मला वेगळं वाटलं नसतं!
कुठे गेली ही सगळी मंडळी? सकाळी कामगार विश्वात ज्वारी, बाजरीचे आणि कुठले कुठले बाजारभाव सांगत. त्यात नंदूरबारचा उल्लेख हमखास असायचा! इतका, की ते कधीही न पाहिलेलं नंदूरबारदेखील मला खूप आपलसं वाटायचं!

साला खूप साधा काळ होता तो! केतकीच्या वनी तिथे.. या गाण्याइतकाच साधा! तिन्ही सांजा सखे मिळाल्या, प्रिया आज माझी, स्वर आले दुरूनी, तुझे गीत गाण्यासाठी, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, पाहुनी रघुनंदन सावळा, हृदयी जागा तू अनुरागा, श्रावणात घन निळा बरसला, नाविका रे, मृदुल करांनी छेडित, अशी अनेक एकापेक्षा एक गोड गाणी तेव्हा कानावर पडायची.

आजुबाजूची माणसंदेखील तेव्हा खूप साधी होती. देशीच होती, ग्लोबल झाली नव्हती! मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यात आपुलकीची उठबस असायची. कुणीही कुणाकडे पटकन उठून जाऊ शकत होती. हल्लीसारखं आधी फोन करून यायची पद्धत तेव्हा विकसित झाली नव्हती! किंबहुना, प्रत्येक कुटुंबातील प्रायव्हसी तेव्हा थोडी जास्त उदारमरवादी होती असं आपण म्हणू हवं तर! आणि जळ्ळे बोंबलायला तेव्हा एवढे घरोघरी फोन तरी कुठे होते? एका कुटुंबातली चार माणसं पटकन उठून कुणाकडे गेली तरी, "अरे वा वा! या या" असंच हसतमुखाने स्वागत व्हायचं! लगेच जेवायची वगैरे बाहेर ऑर्डर दिली जात नसे. ८-१० माणसांचा आमटीभात, पाचपंचवीस पोळ्या, गोडाचा शिरा तेव्हा आमच्या आया-मावश्या सहज करू शकत होत्या. सोबतीला पापड, कुर्डया, सांडगी मिरची तळली जायची, साधी कांदाटोमॅटोचीच, पण वर फोडणी वगैरे दिलेली झकास कोशिंबिर केली जायची! सगळी मंडळी हसतमुखाने, मोकळेपणाने जेवायची, अगदी यथास्थित गप्पाटप्पा व्हायच्या !
यजमानांच्या मनात, 'काय यांना काही मॅनर्स वगैरे आहेत की नाही? न कळवता जेवायला आले?' असा विचार यायचा काळ नव्हता तो!

पटकन, 'आमचा अमूक काका ना, तो फार पैसेवाला आहे बुवा, किंवा तमूक नातेवाईक ना, तो तर काय करोडपती आहे!' अशी आजच्या इतकी सर्रास भाषा लोकांच्या तोंडी असलेली मला तरी आठवत नाही. समोरच्या माणसाला पैशावरून लहानमोठा ठरवायची पद्धत आजच्या इतकी तरी नक्कीच विकसित झाली नव्हती!

कुणी कुणाकडे पाच-पंचवीस हजार रुपये मागितले तर एक तर दिले जात किंवा न दिले जात, तो भाग वेगळा, परंतु त्या नकारातदेखील पैसे नसत म्हणून नकार दिला जाई. समोरचा माणूस परत देईल की नाही, किंवा च्यामारी कशाला फुक्कट याला मदत करा? पुन्हा मागायला आला तर? हा संशय त्या नकारात नसे! कुठेतरी माणसामाणसातली माणूसकी, आपुलकी जागी होती असं वाटतं!

हे सगळं लेखन खरं तर एखाद्याला खूप ऍबस्ट्रॅक्ट वाटेल किंवा असंबद्धही वाटेल, हे मी नाकारत नाही. पण 'केतकीच्या वनी तिथे' मधला एकंदरीतच जो साधेपणा आणि सात्विकपणा आहे ना, तो आज तरी मला खूप हरवल्यासारखा वाटतो. आपल्याला माहित्ये, की एखादं गाणं हे बर्‍याचदा एखादा प्रसंग, एखाद्या व्यक्तिशी निगडीत असतं. ते ते गाणं लागलं की माणसाला त्या गाण्याशी निगडीत असलेल्या गोष्टी आपोआप आठवायला लागतात. मी वर उल्लेख केलेली जी गाणी आहेत ना, ती सगळी गाणी मला केवळ एखादी व्यक्ति किंवा एखादा प्रसंगच नव्हे, तर संपूर्ण एका ठराविक काळाची आठवण करून देतात! कारण एका ठराविक काळात ही गाणी वारंवार कानावर पडायची. आणि तेच सगळं मी शब्दात मांडायचा वेडा प्रयत्न करतो आहे!

साला आज सगळीकडे पाहतो तर काय चाल्लंय हे माझं मलाच समजत नाही. कुणाला कुणाकडे बघायला वेळ नाही. मॉल, मल्टिप्लेक्स, हे शब्द हल्ली वारंवार कानावर पडतात परंतु मला ते अजूनही अपरिचित वाटतात, आपले वाटत नाहीत! अहो कसला आलाय मॉलफॉल? वाण्याकडून दीड दोन रुपायाला नारळाची वाटी विकत आणणारा मी! महिन्याचं सामान यादी करून वाण्याकडून मांडून आणायचं. म्हणजे वाणी ते सामान घरी आणून देत असे. पण मांडूनच! त्याचे पैसे मागाहून दिले जात. त्याला 'मांडून आणणे' असं म्हणत असत!
हल्लीच्या मॉल संस्कृतीमध्ये, साला आमचा 'मांडून आणणे' हा वाक्प्रचारच नाहीसा झाला! रोकडा, किंवा क्रेडिट अथवा डेबिट कार्ड असल्याशिवाय मॉलवाले उभे करतील का? पण आमचा वाणी मात्र बापडा आठ आठ दिवस देखील थांबायचा हो! पैशांची गरज त्यालाही असे, नाही असं नाही.

पण त्या मांडून आणण्यातली गरीबी आता कुठे दिसत नाही हे मात्र खरं! चांगलंच आहे ते म्हणा..!

आणि कसलं तुमचं ते डोंबलाचं मल्टिप्लेक्स हो? दिवार, जंजीर, त्रिशूल यासारखे सिनेमे पाच दहा रुपायात आमच्या ठाण्याच्या मल्हार किंवा आराधना सिनेमागृहात पाहायला मिळायचे! त्यात सुद्धा शनिवार किंवा रविवारी शिणेमा पाहायचा असेल तर मंङळवार बुधवार पासूनच ऍडव्हान्स बुकिंग करावं लागे. आता काय, दूरदर्शन सुरू केले की कुठेना कुठे सिनेमे सुरूच असतात! पण त्यात 'आम्हाला डॉनची रविवारी दुपारी ३ च्या शोची तिकिटं मिळाली बरं का!' हे सांगण्यातला जो काय एक आनंद होता ना, तो आता मिळत नाही!

दूरदर्शनदेखील किती घरगुती होतं, आपलं होतं! संध्याकाळी सहा ते दहा-साडेदहा! त्यात गुरुवारी छायागीत, शनिवारी मराठी शिणेमा आणि रविवारी हिंदी शिणेमा! आणि रविवार सकाळची साप्ताहिकी! ही साप्ताहिकी बघायला मात्र मजा यायची! ती पाहिल्यावर मग ठरायचं की येत्या आठवड्यात काय काय पाहण्यासारखं आहे? कुठले कुठले चांगले कार्यक्रम आहेत ते! तेव्हा दूरदर्शन वरील कार्यक्रमसुद्धा किती चांगले असत! विनायक चासकर, विनय आपटे, सुहासिनी मुळगावकरांसारखे लोक अतिशय उत्तमोत्तम कार्यक्रम द्यायचे!

सुहासिनीबाईंचा गजरा हा कार्यक्रम तर खूपच चांगला असे. बबन प्रभू, याकूब सईद सारखी गुणी लोकं खूप चांगले कार्यक्रम करायची, नाटकं करायची. साडेसातच्या बातम्यातली अनंत भावे, प्रदीप भिडे, ही मंडळी खूप आपलीशी वाटायची! 'फिल्मस डिव्हिजन की भेंट' नावाचा एक अतिशय सुरेख कार्यक्रम लागायचा. त्यातला तो भाई भगतांचा ठराविक आवाज! जाम मजा यायची तो भाई भगतांचा आवाज ऐकायला!

असो! मी इथे हे जे काही बरळतोय त्याचा संदर्भ आपल्यापैकी किती वाचकांना लागेल हे मला माहिती नाही!
आज साला मी डी डी सह्याद्री बघतो तर मला काहीच बघावंसं वाटत नाही. बघावं तेव्हा सारख्या कुठल्या ना कुठल्या गाण्याच्या स्पर्धा, 'मला प्लीज प्लीज प्लीज एसेमेस करा सांगणारे रोज कुत्र्यांच्या छत्र्यांसारखे उगवणारे ते गाणारे स्पर्धक, मग त्यातला एक कोण तरी अजिंक्यतारा किंवा इंडियन आयडॉल होणार, बाकीचे स्पर्धक रडणार, प्रेक्षकात बसलेले त्यांचे आईवडील रडणार! छ्या.. सगळाच उठवळपणा तिच्यायला!

माझ्यासारख्या जुनाट माणसाला ह्यतलं काहीच पटत नाही बुवा!

असो! जे काही मनात आलं ते भरभरून लिहावसं वाटलं! हल्ली 'गारवा नवा नवा' किंवा 'ऐका दाजिबा' ह्या गाण्यांचा काळ आहे. नाही, नसतीलही हो ही गाणी वाईट! पण मला मात्र त्यातला 'गारवा नवा नवा' नाही सोसत!

त्यापेक्षा 'केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर' या गाण्याची उबच मला पुरेशी आहे, अद्याप पुरत आहे!

--तात्या अभ्यंकर.