दोनचार दिवसांपूर्वीच हा लेख टाकण्याविषयी आणि तिचा फोटू टाकण्याविषयी सिमरनची पूर्ण परवनगी घेतली आहे. सबब, वाचकांनी कृपया या विषयावर चर्चा न केल्यास ते सूज्ञपणाचे ठरेल!
या पूर्वी -
लेबल - 'तात्या अभ्यंकराच्या आयुष्यातील स्रिया' -
रौशनी
नीलम
शबनम
शाहीन
सिमरन...
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मुंबैतल्या जुहू विभागातला एक महागडा बार. मालक - अरिवंदस्वामी शेट्टी. माझा अशील.
बारचे स्वरूप - फ्री सर्विस..
बर्यापैकी अंधारलेला बार.. गिर्हाईक बारमध्ये शिरतं.. आत शिरताच इतका अंधार की आलेल्या गिर्हाईकाला कुणी वेटर बॅटरी दाखवून तिच्या प्रकाशात एका टेबलापाशी बसवतो. स्टुवर्ड त्याची ऑर्डर घेतो. बारचे रेट तिप्पट-चौपट. बाहेर २० रुपायांना मिळणार्या कोल्ड्रिंकची किंमत इथे चक्क २५० रुपये..!
गिर्हाईक त्याला पाहिजे असलेल्या मद्याची ऑडर देतो. थोड्याच वेळात दिलेली ऑर्डर घेऊन एक तरुणी त्या टेबलापाशी येते व अंधारातच त्या गिर्हाईकाच्या शेजारी त्याला खेटून बसते. त्याला दारू सर्व्ह करते. मग दारू पिता पिता ते गिर्हाईक जवळ खेटून बसलेल्या त्या तरुणीशी अगदी हवे ते चाळे करते. त्याकरता सुरवातीलाच तिला पाचशे-हजार रुपायांची टीप दिली जाते. काही तरुणींच्या बाबतीत ही किमान टीप रु २००० देखील असते. मग त्या अंधारात चुम्माचाटी तसेच अन्य अनेक चाळे करून अजून ५००-१००० रुपायांची त्या तरुणीला वरटीप देऊन ते गिर्हाईक बारच्या बाहेर पडते..! हा अगदी रोजचा दिनक्रम. सॉरी, संध्याक्रम..!
"तात्यासाब, जरा बैठो आरामसे.. क्वार्टर-वार्टर मारो. बादमे धंदेकी बात करेंगे..!" - इति अरविंदस्वामी.
'आपल्याला काय, चला बसू. चकटफू दारू मिळते आहे!' - माझं स्वगत.
मला एका अंधारलेल्या टेबलपाशी आणलं जातं.. फुकट असल्यामुळे माझी डायरेक्ट ब्लॅकलेबलची ऑर्डर..!
थोड्याच वेळात एक मुलगी एका ट्रेमध्ये दारू, सोडा, तळलेले काजू, बिसलेरी अशी ऑर्डर घेऊन माझ्या टेबलापाशी येते व अंधारात माझ्या बाजूला अगदी मला खेटून बसते. ती माझा गिल्लास भरते..
"सेठ, ५०० रुपिया दो.."
"५०० रुपये? कसले? माझ्याकडे असे पैसे नाहीत. तुम मत बैठो यहा!"
"बोहोनी करो ना..!"
'आपल्याला साला शेठने येथे बसवला. पण या मुलीची तर ही रोजीरोटी आहे!' असा विचार करून मी खिशातनं पन्नास रुपायाची एक नोट काढली.
"ये लो. मेरी इतनीही हैसियत है.."
सिमरन मनमोकळी हसली. माझ्यासारख्या गिर्हाईकाची फक्त ५० रुपायांचीच लायकी पाहून थोडी कुत्सितही हसली..(तिचं नाव सिमरन आहे हे मला नंतर कळलं..)
वास्तविक ती तेथून उठून जाऊ शकत होती. परंतु तिला काय वाटलं कोण जाणे, तिने ते पन्नास रुपये घेतले व मला अजूनच खेटली. दोन पेग पोटात गेले. सोबत खेटून बसलेली सिमरन. तरूण वय. नको ते विचार मनात येऊ लागले. सिमरनच्या शरीरावर इथे-तिथे हात जाऊ पाहात होता..!
पण जमलं मला! केरसुणीनं समुद्राची लाट अडवणं जमलं मला..!
(या वाक्याचं ऋण - आचार्य - नाटक- तुझे आहे तुजपाशी)
मी अगदी प्रयत्नपूर्वक कोणतीही चाळे न करता तिच्याशी 'तुम कहासे हो?', 'यहा कैसे आ गयी?' या स्वरुपात तिच्याशी गप्पा सुरू केल्या. तिला विश्वसात घेतलं..!
सिमरनही अखेर एक स्त्रीच! तिच्यातली बारटेन्डर दूर गेली व स्त्री जागी झाली. थोड्याच वेळात मी तिला बोलती केली, किंबहुना ती बोलती झाली..!
"मी मूळची इंदूरची. पैसे कमावण्याकरता मुंबैला आले. माझा बाप माझ्या सख्ख्या मावशीच्या नवर्याचं बरंच देणं लागतो. माझा मावसा म्हणजे साक्षात कर्दनकाळ. एक नंबरचा गुंड. त्यानेच धाकधपडशा दाखवून मला मुंबैला आणलं. धंद्याला लावलं आणि आता माझ्या पैशांवर चैन करतो आहे. सुरवातीला मी एकदोनदा कडवा विरोधही केला तेव्हा त्याने माझ्या बापावर खुनी हल्ला केला. ठार मारलं नाही पण वेळ आल्यास मारुही शकतो हे मला दाखवून दिलं..!"
गप्पांच्या ओघात सिमरन हे सगळं ओकली भडाभडा..!
थोड्या वेळानं मी तिथून निघालो. सिमरनचा नंबर घेतला. सिमरन आवडली होती मला..!
पुढे काहीच दिवसात दोन ऑक्टोबर होता. मोहनरावांची जयंती. ड्रायडे होता. मी दुपारच्या सुमारास सिमरनला फोन केला.
"गेटवेपे मिलोगी? खाना खाएंगे..!"
संध्याकाळी साडेसहा सातच्या सुमारास आम्ही गेटवेला भेटलो. मनमोकळं बोललो.. गप्पा मारल्या..भेळपुरी खाल्ली..साखरपुडा झाल्यासारखे गेटवेच्या बांधावर बसून समुद्राकडे पाहात एकमेकांना खेटून बसलो..!
"हा इसम तसा बरा आहे!." हे सिमरनचं स्वगत असावं..
एकंदरीत सिमरन मला चक्क पटली होती हे नक्की..!
"इंदौरमे कंप्युटर सिखा था. थोडा बहुत काम जानती हू.. अंग्रेजीमे बोलने और छोटामोटा लेटर टाईप करनेमे कुछ प्रॉब्लेम नही..!" सिमरनकडनं गप्पांच्या ओघात ही माहीती कळली. पोरगी खरंच चुणचुणीत होती, हुशार होती..!
बापू सोनावणेला सांगून मुंबै क्राईम ब्रॅन्चच्या डीसीपी अर्जुनराव शितोळेंशी ओळख काढली. सिमरनची सारी कहाणी त्यांच्या कानी घातली. सारी सूत्र भराभर फिरली व एका भलत्याच केसमधे अडकवून सिमरनच्या मावश्याला ८-१० वर्षांकरता गजाआड पाठवला..!
'अबक' या मोबाईल कंपनीत माझा मित्र अशोक सातपुते 'जनरल म्यॅनेजर - वेस्टर्न झोन' या पदावर कार्यरत आहे. त्याचं अंधेरीला हापिस आहे. 'ऑफिस एक्झिक्युटीव्ह' या पदावार तेथे सिमरनला चिकटवली. शंकर दयानंद हलवाई हा जौनपूर-भदोईचा भैय्या माझा मित्र कम अशील. चेंबूरचा जागादलाल..त्याला सांगून त्याच्या ओळखीनं महिना हजार-दीड हजार भाड्यावर सिमरनला एक सिंगलरूम घेऊन दिली..
आता सिमरन सुखात आहे. कष्ट करते. एका ओळखीच्या सी ए च्या मदतीने तिला टॅक्स रिटर्नचेही जुजबी काम शिकवले. त्यातही तिला बर्यापैकी चार पैशे भेटतात..
"तात्यासाब, आपको ट्रीट देनी है. खाना खिलाना है..!"
सायनच्या पेनिन्सुला या पॉश हाटेलात सिमरनं मला दारू पाजली, भरपेट जेऊखाऊ घातलं..त्या क्षणीचाच हा फोटू..
आयुष्यात काय मिळवलं, काय गमावलं हे मला माहीत नाही.. परंतु सिमरनच्या बाबतीत मात्र मी समाधानी आहे, कृतकृत्य आहे..!
-- तात्या अभ्यंकर.