May 30, 2007

आकाशाशी जडले नाते..

राम राम मंडळी,

http://mr.upakram.ऑर्ग/ या नांवाचे एक संकेतस्थळ आहे. त्यावर शरद कोर्डे नांवाच्या सद्गृहस्थांनी http://mr.upakram.org/node/356 येथे एक चर्चाप्रस्ताव मांडला आहे. आम्ही त्याला एक प्रतिसाद लिहिला. परंतु उपक्रम हे संकेतस्थळ फक्त माहिती आणि विचारांची देवाणघेवाण करणारे संकेतस्थळ आहे, ही गोष्ट कोर्डे यांच्या चर्चाप्रस्तावाला प्रतिसाद देताना आमच्या लक्षात राहिली नाही. आम्ही जसं सुचेल तसं भावनेच्या भरात लिहीत गेलो. परंतु माहिती आणि विचारांच्या देवाणघेवाणीमध्ये भावनेला शून्य किंमत असते हे आमच्या ध्यानात यायला हवे होते ते आले नाही, ही आमची चूकच झाली. आता निवांतपणे मित्रांसोबत दोन पेग विदेशी व्हिस्की प्यायल्यावर ही चूक आमच्या ध्यानात आली आणि आम्ही त्वरीत तेथील प्रतिसाद काढून टाकून तो इथे आमच्या हक्काच्या जागेवर चिकटवत आहोत. एकतर कुठलीही माहिती लोकांना द्यावी इतका आमचा अभ्यास नाही, आणि काही देवाणघेवाण होण्याइतपत आमचे विचारही प्रगल्भ नाहीत! माहिती आणि विचारांची देवाणघेवाण करणार्‍या तद्न्य अन हुश्शार सभासदांच्या उपक्रमी मांदियाळीत आम्ही पूर्णत: unfit आहोत हेच खरे!

'तार्कीक कोडी' आणि 'ळ' कसा लिहावा यांसारख्या मोलाच्या चर्चेत आमचा प्रतिसाद म्हणजे ग्रहमालेच्या सभेत एखाद्या लहानश्या पिवळट बल्बने हजेरी लावण्यासारखे आहे! सबब आम्ही तो प्रतिसाद आता तेथून काढून टाकत आहोत व इथे देत आहोत. तो येथे हिरव्या अक्षरात देत आहोत! कोर्डेसाहेबांच्या चर्चेतील आम्ही संदर्भाकरता घेतलेली वाक्ये लाल अक्षरात देत आहोत.


आपणास माझ्या या किंचित् संशोधनाबद्दल काय वाटते?

लय भारी वाटते!

कोर्डेसाहेब, आपले चिंतन स्पृहणीय आहे. अश्या चिंतनातून बर्‍याचदा काही चांगलंच निष्पन्न होतं असा माझा विश्वास आहे.
आता थोड्या विस्ताराने संत तात्याबांचे भाष्य बरं का! ;)



आकाश (परिस्थिति?);

'आकाश' या शब्दाचा अर्थ 'परिस्थिती' या अर्थानेही काही वेळेला घेतला जातो ही कल्पना व्यक्तिशः मला अत्यंत सुंदर वाटते.

'एखाद्यावर आकाश कोसळले', 'आकाश भरून आले', 'मळभ दूर झाले', 'आभाळच फाटले तिथे ठिगळं काय लावणार?' या अर्थाची परिस्थितीशी निगडीत काही वाक्ये आपण बर्‍याचदा ऐकतो. एखाद्या माणसाच्या मानसिकतेचे वर्णन करताना 'आभाळाएवढं मोठं मन', आभाळासारखी माया' यासारखे शब्द वापरले जातात.


'आकाशी झेप घे रे पाखरा,
सोन्याचा पिंजरा'

'Sky is the limit' या इंग्रजी वाक्याचा अर्थ वरील दोन ओळीत फार व्यापकतेने सांगितला आहे असं मला वाटतं!
(मला काव्यातलं फारसं कळत नाही असं काही लोक म्हणतात तो भाग वेगळा! ;)


कोर्डेसाहेब, एकंदरीतच आभाळ ही फार सुरेख गोष्ट आहे. स्वच्छ निरभ्र आकाश, मळभ असलेलं आकाश, काळ्या ढगांनी भरून आलेलं आकाश, कातरवेळची पश्चिमेची लाली दाखवणारं आभाळ, ही आकाशाची सगळी रुपं कुठेना कुठेतरी मनाशीच निगडीत आहेत असं वाटतं. अवघं एक आकाशच आपल्याला खूप काही शिकवून जातं यात वाद नाही!

कोर्डेसाहेब, आकाश या शब्दाचा अर्थ निश्चितच खूप व्यापक असावा व म्हणूनच कदाचित थोरल्या आबासाहेबांसारख्यांच्या बाबतीत गगनाला मिठी मारणे, किंवा गगनभरारी, यांसारखे शब्द शोभून दिसतात!

'इवलेसे रोप लावियले द्वारी
तयाचा वेलू गेला गगनावेरी'

ओळीतलं माउलीला अभिप्रेत असलेलं आभाळ समजून घेणं ही फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं!
आपले महानोरसाहेब, मनाचीच एक अवस्था सांगतांना 'नभ उतरू आलं' असे शब्द लिहून जातात! 'पर्वतांची दिसे दूर रांग, काजळाची जणू दाट रेघ' यातली काजळाची दाट रेघ दाखवायला आशाताईंचाच स्वर हवा!

गदिमा स्वयंवराचं वर्णन करतांना,

'आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे,
झाले सीतेचे'

या ओळी लिहून जातात!

कोर्डॅसाहेब, वरील ओळींचे संगीतकार व आमचे मानसगुरू बाबुजी जायच्या आदल्या दिवशीच्या भकास संध्याकाळी आम्ही त्यांना भेटायला हिंदुजा रुग्णालयात गेलो होतो तेव्हा आमच्या मनाने भरून आलेल्या, अन् काळवंडलेल्या आकाशाचा अनुभव घेतला होता!

असो!

आपल्या या चर्चेच्या निमित्ताने आम्हालाही थोडे चिंतन करावेसे वाटले आणि हा चार ओळींचा प्रतिसाद लिहावासा वाटला! आकाश या विषयावर एखादा विस्तृत लेख लिहायचा विचार बर्‍याच दिवसांपासून माझ्या मनात होता. पण म्हटलं उपक्रमाच्या माहिती आणि विचारांच्या देवाणघेवाणीत ते लेखन बसेल न बसेल! ;)

सदर चर्चेमुळे काही अंशी ही इच्छा पूर्ण झाली याबद्दल आपले आभार. अजूनही लिहिण्यासारखं बरंच काही आहे, पण सध्या इथेच थांबतो!


-- तात्या अभ्यंकर.