March 20, 2007

आणि दीपस्तंभ ढासळला...

राम राम मंडळी,

ही गोष्ट असेल १९९०-९१ सालची. मी तेव्हा प्रभादेवी येथे असलेल्या जी एम ब्रेवरीज या सरकारमान्य देशी दारूच्या कंपनीत लेखा विभागात नोकरी करत होतो. नोकरी, गाणं, खाणं, मित्रमंडळी असं अगदी झकास आयुष्य सुरू होतं. (तसं ते आजही सुरू आहे म्हणा!;)

आमची म्हातारी अगदी सुगरण हो. त्यामुळे खाण्यापिण्याच्या शौकाला अगदी घरातूनच खतपाणी मिळालं. घरी आईच्या हातचं अगदी उत्तम, सुग्रास खायला मिळायचंच, शिवाय बाहेरही कुठे काय चांगलं मिळतं अशी ठिकाणं शोधणे, त्या ठिकाणांना नियमितपणे भेटी देणे, हाही माझा एक छंदच. बरं, शिवाय गाणं ऐकण्याचाही शौक. त्या निमित्ताने बहुतेक शनिवार-रविवार अगदी यथास्थित गाणंही ऐकणं व्हायचं. चांगलं गाणं ऐकलं की खाणंही अधिक चवदार लागतं, आणि चांगलंचुंगलं खाऊन गाण्याची मैफल ऐकली की ते गाणंही अधिक सुरेल, लयदार वाटतं! असं हे गाण्या-खाण्याचं सुष्टचक्र! ;)

इथे काय अण्णांची मैफल आहे, चला! तिथे काय मालिनीबाईंचं गाणं आहे, चला! आज काय किशोरीताई, उद्या काय वीणाताई, परवा काय आमच्या उल्हासकाकांचंच गाणं आहे, चला! बरं गाण्याची मैफल संपल्यावर मित्रमंडळींबरोबर पुन्हा मग एकदा यथास्थित कुठेतरी खाणंही व्हायचं. आहाहा, काय तो अण्णांचा शुद्धकल्याण, किंवा काय किशोरीताईंनी आज सुरेख अहीरभैरव मांडलाय, क्या बात है असं म्हणत म्हणत गाण्यानंतर खादाडीही अगदी यथास्थित व्हायची. गाणं आवडल्याच्या आनंदात दोन घास जास्तच जायचे! ;)


तर मंडळी, असा अगदी सुखाचा काळ चालला होता. पण काही लोकांना मी संपादन केलेली शारीरिक माया बघवेना;) मग लागले मला सल्ले द्यायला. 'तात्या, अरे किती जाड्या झाला आहेस. जरा डाएट कर की. नाहीतर तरुण वयातच नाना व्याधी होऊन मरशील ना लेका फुक्कट!' असं घाबरवायचे. कॅलरीजची, आणि त्या प्रमाणातल्या श्रमांची, वजना-उंचीची आणि कसली कसली आकडेमोड करून दाखवायचे.
मग मंडळी, मी पण ठरवलं एक दिवस, की बास्स.. उद्यापासून माझं डाएट सुरू. अगदी मोजकंच खायचं, सात्त्विक खायचं. तिखट, तेलकट, मटण, मासे, पान, तंबाखू, सगळं बंद! गाणंही बंद. म्हणजे मग अनायसे खाणंही जास्त होणार नाही. हे सगळे मोह टाळायचे. बास्स ठरलं, आता दाखवतोच जगाला, तात्या काय करू शकतो ते!


दुसरा दिवस उजाडला. सकाळी लवकर उठून दुकानातून गायीचं दूध घेऊन आलो. म्हशीच्या दुधात फॅटस् जास्त असतात म्हणे. नकोच ते. सकाळचा चहाही प्यायलो नाही. फक्त अर्धा कप गायीचं दूध. तेही साखर न घालता. आईला काही कळेचना. तिने आदल्या रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांचे तूप-गूळ घालून लाडू केले होते हो. मी ओरडलोच तिच्या अंगावर. "तुला कळत कसं नाही? मुलगा हवाय की नको? आजपासून माझं डाएट आहे. सकाळचा नाष्टाफिष्टा सगळं बंद. तू पटकन मला दोन फुलके आणि सोबत थोडी गाजराची कोशिंबीर, असाच डबा भरून दे. रात्रीही माझ्याकरता फक्त दोन फुलके आणि मुगाची कोशिंबीर एवढंच जेवण कर."

"अरे मग तुला हे तूप-गूळ-पोळीचे लाडू केले आहेत ते नकोत? असं काय रे करतोस. खा की रे एखादा!"
काय सांगू मंडळी, पाणी तरारलं हो त्या माउलीच्या डोळ्यात! देव काही कुठे फार लांब नसतो हो, आपल्या घरातच असतो! असो...


कार्यालयात पोहोचलो. आमचा दत्तोबा शिपाई माझा अगदी लाडका. तो चहा घेऊन आला. झालं! मी जवळ जवळ खेकसलोच त्याच्या अंगावर. "परत घेऊन जा हा चहा. नकोय तो मला. तू चहात साखर जरा जास्तच घालतोस. आणि हो, आजपासून मी चहा सोडला आहे. पुन्हा माझ्याकरता चहा घेऊन येऊ नकोस."
वाईट वाटलं हो बिचाऱ्याला. काही बोलला नाही, चुपचाप परत गेला. नेहमी प्रसन्न असणारा तात्या आज असं का वागला, हे कळेचना त्याला.

जरा वेळाने पुन्हा टेबलापाशी आला. एक झकासपैकी मोतीचुराचा लाडू माझ्यापुढे करत म्हणाला, "घ्या तात्या. लाडू घ्या. कालच माझ्या बहिणीचा साखरपुडा झाला."

लाडू पाहून माझ्या डाएटचं गळू पुन्हा एकदा ठणकायला लागलं होतं. पण ते गीतेत कुठेसं म्हटलं आहे ना, 'क्रोधात भवति संमोह.. का कायसं, म्हणून यावेळी मी क्रोध आवरला. तो बापडा आपल्या बहिणीचा साखरपुडा झाल्याबद्दल कार्यालयातील प्रत्येकालाच मोठ्या प्रेमाने लाडू वाटत होता हो. मी शक्य तितक्या सौम्य शब्दात त्याला म्हटलं. "अरे आजपासून मी डाएटवर आहे. मला फक्त त्यातला एक कण दे आणि तुझ्या बहिणीला माझ्या शुभेच्छा सांग".

तेवढ्यात माझा आणि दत्तोबाचा संवाद कुणीतरी ऐकला आणि "अरे तात्या डाएटवर आहे रेऽऽऽ..." असं आख्ख्या कार्यालयभर तो मनुष्य ओरडत सुटला. कसला कुत्सित हर्षोन्माद त्याला झाला होता कुणास ठाऊक! ;) सगळं कार्यालयच खी खी करत माझ्याकडे पाहून हसायला लागलं.

मी मात्र अगदी शांत होतो. एखाद्या दीपस्तंभासारखा!! मनातल्या मनात म्हणत होतो, 'देवा त्यांना क्षमा कर. ते कुणाला हसताहेत हे त्यांना कळत नाही.'

दुपार झाली. सगळ्यांनी आपापले डबे उघडले. शिवा माहिमकर हा माझा खास दोस्त. कार्यालयात माझ्या शेजारीच बसायचा. त्यानेही आपला डबा उघडला. माझं लक्ष नकळत त्याच्या डब्याकडे गेलं. शिवाच्या डब्यात सुंदरशी बैदाकरी दिसत होती.

"काय तात्या, बैदाकरी खाणार काय? मस्त आहे एकदम."

एक नाही, नी दोन नाही. मी शिवाला काहीच उत्तर दिलं नाही. चुपचाप माझा डबा उघडला. बघतो तर काय? दोन फुलके आणि गाजराची कोशिंबीर तर होतीच, पण शिवाय बेसनाच्या दोन वड्याही होत्या. कालच आईने केल्या होत्या. 'मुलगा फक्त अर्धा कप दूध पिऊन कामावर निघालेला, शिवाय डब्यात फक्त दोन फुलके आणि गाजराची कोशिंबीर. कसं व्हायचं त्याचं?' राहवलं नसेल हो त्या माउलीला! म्हणून तिने माझ्या नकळत त्या वड्या डब्यात दिल्या असतील!

एकीकडे पोटातली खवळती भूक, आणि दुसरीकडे मारे 'तात्या, काय आहे हे जगाला दाखवूनच देतो' काय, नी 'दीपस्तंभासारखा उभा होतो' काय अशी सगळी पोकळ वाक्य! मारे डाएट करायला निघालो होतो, मोह टाळायला निघालो होतो.

'ख्रिस्ताला जमलं, बुद्धाला जमलं, आम्हीही हुरळून गेलो. पण ते दीपस्तंभ होते. आम्ही मात्र केरसुणीने समुद्राच्या लाटा परतवायला निघालो होतो!' हे गुरुवर्य भाईकाकांच्या 'तुझं आहे तुजपाशी' नाटकातलं एक वाक्य उगाचच आठवून गेलं!

मंडळी खरं सांगतो, आईने डब्यात दिलेल्या, छानशी चारोळीची तीट लावलेल्या त्या बेसनाच्या वड्या पाहिल्या आणि अगदी भरून आलं हो. भूकसुद्धा अगदी फारच लागली होती. बास्स! पुरे झाली ही डाएटची थेरं असं मनाशी म्हटलं आणि, आणि....

दीपस्तंभ ढासळला.........!! ;)


"दत्तोबाऽऽऽ.." अशी मोठ्याने हाक मारली. "कुठायत ते मगासचे लाडू? घेऊन ये मला."

"शिवा, तुझा डबा आण इकडे, त्यातली बैदाकरी मला या फुलक्यांबरोबर खायची आहे."

"दत्तोबा, हे एवढेसे दोन फुलके मला पुरणार नाहीत. समोरच्या हॉटेलमधून गरमागरम पुरीभाजी माझ्याकरता बांधून घेऊन ये. त्याला म्हणावं, "पुऱ्या जरा छान लालसर तळ."

आणि काय सांगू मंडळी, ते मगासचं सुतकी वातावरण क्षणात बदललं. जिवाचा जीवलग शिवा मला म्हणाला, "अरे तात्या, सगळी बैदाकरी संपवलीस तरी चालेल रे!"

फुलक्यांबरोबर बैदाकरी हाणली. सोबतीला गाजराची कोशिंबीर छान लागत होती! ;) दत्तोबाने पुरीभाजी बांधून आणली. ती उडवली. मोतीचुराचा लाडू खाल्ला, आईने दिलेल्या बेसनाच्या वड्या खाल्ल्या! घरी फोन लावला, "आई, रात्री मी व्यवस्थित जेवणार आहे. तू सगळं जेवण कर. सोबतीला थोडी शेवयांची खीरही कर!"

लंचटाइम संपला. दत्तोबाने आणलेल्या बनारसी १२० जाफरानी पत्तीच्या पानाचा तोबरा भरला, आणि "पियू पलन लागी मोरी अखिया" ही गौडसारंग मधली बापुराव पलुसकरांची बंदिश गुणगुणत पुन्हा कामाला लागलो. सकाळी आकडेमोड करण्याकरता कॅल्क्युलेटर लागत होता, आता मात्र पटापट तोंडीच हिशेब जमत होते!

दीपस्तंभ ढासळला होता, पण आत्माराम शांत झाला होता.....

-तात्या अभ्यंकर.

8 comments:

Anonymous said...

तात्या,

सहीच लिहिलं आहे.

> "अरे मग तुला हे तूप-गूळ-पोळीचे लाडू केले आहेत ते नकोत? असं काय रे करतोस. खा की रे एखादा!"
काय सांगू मंडळी, पाणी तरारलं हो त्या माउलीच्या डोळ्यात! देव काही कुठे फार लांब नसतो हो, आपल्या घरातच असतो! <

वा तात्या! आज खूप दिवसांनी तुमचा एक सुरेख लेख वाचायला मिळाला,

राजेंद्र भावे, पुणे.

संजीव कुलकर्णी said...

तात्या, मनोगतवर हा लेख वाचला होता पण त्या वेळी फारसा छळ झाला नव्हता. गेले चार दिवस डाएटवर आहे. रात्री फक्त मोड आलेली कडधान्ये, कोबी, टोमॅटो आणि ताक एवढेच घेतो. पोटात कायमस्वरूपी खड्डा पडला आहे. जगण्यात रस वाटत नाही. स्वप्नात गरमागरम बिर्याणी, थंडगार सोलकढी, तुपाने चपचपीत भिजलेली पुरणपोळी असे काहीबाही येते आणि घामाने थबथबून दचकून जागा होतो. हँगरवर लावलेल्या पँटीकडे बघून 'काय तुझा तेगार, तुला दोन महिन्यात आल्टर करायला शिंप्याकडे नेलं नाही तर नावाचा सन्जोप नाही' असं काहीतरी बडबडत असतो असं लोक म्हणतात. पत्नीने चांगल्या मानसोपचारतज्ञाचा शोध सुरु केला आहे म्हणे! काय दिवस आले पहा! त्यात आज हा लेख वाचला. ऑफिसातल्या सहकारिणीने आजच रसगुल्ले आणले होते. 'माझ्या मना बन दगड' असे म्हणत फक्त चारच खाल्ले. माझा दीपस्तंभ ढासळू नये म्हणून 'गण गण गणात बोते' असा जप करत कपालभाति प्राणायम करतो आहे!

Tatyaa.. said...

राव साहेब,

>>जगण्यात रस वाटत नाही. स्वप्नात गरमागरम बिर्याणी, थंडगार सोलकढी, तुपाने चपचपीत भिजलेली पुरणपोळी असे काहीबाही येते आणि घामाने थबथबून दचकून जागा होतो.

हा हा हा! सही है भिडू..

>>ऑफिसातल्या सहकारिणीने आजच रसगुल्ले आणले होते.

क्या बात है! कोण हो ही हापिसातली सहकारिणी? दिसायलाही रसगुल्ला आहे का? ;) च्यामारी घरी आमच्या बहिणाबाईकडून मोड आलेली कडधान्ये आणि कोबी खाता आणि हापिसात सहकारिणीसोबत रसगुल्ले उडवता?? काय रे कर्णा, तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म? काय रे संजोपा, तेव्हा कुठे गेलं होतं तुझं डाएट?? ;)

>>माझा दीपस्तंभ ढासळू नये म्हणून 'गण गण गणात बोते' असा जप करत कपालभाति प्राणायम करतो आहे!

करा करा! प्राणायाम करा! गजानन महाराज तुमचं भलं करतील! ;)

तात्या.

संजीव कुलकर्णी said...

हपिसातली सहकारीण 'बेंगॉली' आहे. 'आमार शोनार बोंगला'.काय ते डोळे! छळ आहे महाराजा! 'सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्कप्लेस' वर एक नवीन कायदा आजपासूनच अमलात आला आहे, म्हणून तूर्त एवढेच लिहितो! बाकी 'तपशील' समक्ष भेटीत सांगीन!

Trending News Team said...

झक्कास तात्या
नेहमी प्रमाने एकदम सही, क्या बात है.

सुहास.

zakasrao said...

तात्या सही लिहिलय. मी पण असच काहितरी करायला जातो पण लवकरच मोहात पडतो.
आज काल मायबोलीवर येत नाही हो?
कुठे गायब आहात? की मासळी गावली एखादी फ़क्कडपैकी? :)

Unknown said...

Tatyasaheb,
For people like you and me, who put on weight "effortlessly", dieting is a "lifelong" project with many temptations scuttling your noble intentions and then again you get angry and restart. This cycle is unending!
So carry on. Get fat and slim alternately.
K B Kale

Tatyaa.. said...

प्रतिक्रियांबद्दल सर्व वाचक रसिकजनांचे अनेक आभार..

तात्या.