September 03, 2010

शाहीन..!

"लौकरच तुझ्यावर मी एक लेख लिहिणार आहे. तुझ्या फोटोसकट. तुझी परवानगी आहे का?" -- मी.
"माझं आयुष्य म्हणजे एक ओपन कार्ड आहे तात्या.. माझी फुल्ल परवानगी आहे" - शाहीन.


दिलिपअन्ना शेट्टी. मुलुंडच्या शास्त्री मार्गावर उमापॅलेस नावाचा एक डान्स बार आहे, त्याचा चालक-मालक. त्या सा-या शेट्टी फॅमिलीचा मी आयुर्विमा दलाल. त्याची बायको, दोन मुली - सा-यांच्या आयुर्विमा पॉलिसीज उतरवण्याचे काम माझ्याकडे. माणूस मालदार आहे त्यामुळे सतत कुठल्या ना कुठल्या पॉलिसीज माझ्याकडून घेत असतो. 

असाच एके दिवशी मी पॉलिसीजच्याच काही कामानिमित्त त्याच्याकडे गेलो होतो. शेट्टी बिझी होता. मला म्हणाला, " तात्यासाब बैठो व्हीआयपी रूम मे. क्वार्टरवार्टर पियो.. बाद मे बात करेंगे.."

'चला, फुकट क्वार्टर तर मिळाली!' असं म्हणून मी व्ही आय पी रूममध्ये बसलो आणि ब्लॅकलेबलची ऑर्डर दिली. 'चमचम करता..' हे गाणं मोठ्यानं सुरू होतं. माझ्या आजुबाजूला मुलुंड आणि आसपासच्या परिसरातले अमिरजादे गुज्जूभाई बसले होते.. समोर तरण्याताठ्या खुबसुरत पोरी थिरकत होत्या..

माझ्या शेजारीच एक गुज्जू आपल्या पुढ्यात साधारण ५० ते ६० हजार रुपये घेऊन बसला होता. २० च्या, ५० च्या, १०० च्या को-या करकरीत नोटा. उडवत होता भोसडीचा बेभान होऊन समोर नाचत असलेल्या एका पोरीवर. माझा जीव जळत होता.. साला, आयुर्विमा दलालीच्या आशेनं तिथं मी गेलेला.. मुलखाचा गरीब..!
त्याच्यासमोर नाचणारी मुलगी मात्र खरंच कुणीही पागल व्हावं अशी होती.. झक्कास ठुमकत होती..

जरा वेळानं मला शेट्टीनं बोलावणं पाठवलं व मी उठून त्याच्या कॅबिन मध्ये गेलो. आम्ही कामाचं बोललो. शेट्टीनं आता खायला मागवलं आणि एका वेटरला म्हणाला, "शाहीन को अंदर भेजो..":

ती मगासची त्या आमिरजाद्या म्होरं नाचणारी छोकरी आत आली. क्लासच दिसत होती.

" तात्यासाब, ये शाहीन है"

"हम्म. तुम्हारा नंबर दो एकदुसरे को. तात्यासाब, ये लडकी का इन्शुरस्न वगैरा करवा दो. मुझे पुछ रही थी. तुम जब टाईम मिले तो तात्यासाबको फोन करना. चलो भागो.." शेट्टीनं तिला पिटाळली..

'चला, बरं झालं. अजून काही विम्याचा धंदा मिळाला तर बरंच..' असं म्हणून मीही तेथून सटकलो.

दोनचार दिवसातच माझा फोन वाजला. शाहीनचा फोन होता. ती ठाण्याच्या घोडबंदर रोडला राहते. जवळच्याच एका हाटेलात चा पिण्याकरता आणि विम्याचं बोलण्याकरता मी शाहीनला भेटायला गेलो..आम्ही भेटलो. चा सँडविच वगैरे मागवलं. साला बया दिसायला लै भारी होती, आव्हानात्मक होती.

चा पिता पिता मी तिला विम्याबद्दल माहिती दिली. सारा तपशील सांगितला. ती तिचा आणि तिच्या बहिणींचा विमा घ्यायला तैय्यार झाली. मी पुढच्या फॉर्म वगैरे भरण्याच्या कारवाईला लागलो..लौकरच ती माझी अशील बनली..

त्यानंतर थोडाबहुत टाईम गेला असेल.. माझा फोन वाजला. शाहीनचा होता..पुढे पिक्चरमध्ये वगैरे घडतं तसं घडणार होतं याची मला कल्पना नव्हती..

"तात्यासेठ, एल आय सी के बारेमे कुछ बात करनी है.. शाम को मिलोगे? आज मेरी छुट्टी है..फलाना जगह रुकना.. मै मिलने आउंगी.."

मी ठरल्यावेळी ठरल्या ठिकाणी तिची वाट पाहात उभा राहिलो.. थोड्याच वेळात एक होन्डा सिटी गाडी माझ्या पुढ्यात थांबली.. मागचं दार उघडलं गेलं.. आत श्वेतवस्त्र परिधान केलेली, केवळ सुरेख दिसणारी शाहीन बसली होती. मी गाडीत दाखल झालो.. "ड्रायवर, चलो, वरली..!" शाहीननं हुकूम सोडला..

साला डान्सबार मध्ये नाचणारी शाहीन ब-यापैकी मालदार होती..

"वरली सीफेस चलेंगे. खानावाना खाएंगे..!" शाहीनंच ठरवलं सगळं..

साला, मी मुलखाचा भिकारचोट.. मुंबैचा बाजार फिरलेला. माझी कशाला ना असणारे?

हायवेवरून मुलुंड गेलं असेल नसेल, शाहीन मला खेटली. मी समजलो, पोरगी डेंजर वाटते..!
थोड्याच वेळात शाहीन साता जन्माची ओळख असल्यासारखी गप्पा मारू लागली. ती चालू वगैरे आहे हा माझा गैरसमज हळूहळू दूर होत होता.. हां, पण चालू नसली तरी बिनधास्त मात्र होती.. फ्री होती.  

ती मूळची दिल्लीची.. कनाट प्लेसमधल्या शाळेत काही बुकं शिकलेली. उफराटं रूप.. आली पैका कमवायला मुंबैला.. त्या सुमारास मुंबैत डान्सबार जोरात सुरू होते. शाहीन लौकरच मुंबैचे तोरतरीके शिकली. आयटम बनली.. साला, मोप पैका उडू लागला तिच्यावर.. पोरीचे पाय मुंबैच्या चारआठ बार मध्ये थिरकले आणि पैका जमला. घोडबंदर रोडला तिनं फ्लॅट घेतला, आणि आपल्या आजारी व बेकार असलेल्या वडिलांना, आईला व दोन धाकट्या बहिणींना मुंबैला घेऊन आली.. चार जणांची पोशिंदी बनली..!

पुढे ती व मी खूप वेळा भेटलो.. मस्त आहे ती.. अगदी बोलघेवडी.. पण मनानं खूप चांगली..

असाच एकदा तिच्यासोबत वरळी सीफेसवर बसलो होतो. शाहीन तेवढी मूडात नव्हती..

'उस की मा का..!"

शाहीनच्या तोंडात शिवी उमटली.. अहमदाबादचा एक कुणी गुज्जू.. गेले काही दिस मोप पैका उडवत होता तिच्यावर.. आणि दोनच दिसांपूर्वी त्यानं साहजिकच तिला 'बाहर आती है क्या रुममे?" असं विचारलं होतं..

"मग काय चुकलं त्याचं? तुझ्यावर साला तो पैसे उडवतो.. तुला भोगायला मिळावं म्हणूनच ना?" मी.

"तो मत उडाए पैसा.. ! मुझे नही जाना है उसके साथ..! साला टिचकी वाजवून मला म्हणतो..'चल किसी होटल के रूम मे.. २५००० फेकुंगा..! भिकारी साला, २५००० मे मुझे खरीदने चला..!"

"मग काय तुला २५ लाख हवेत?"

आणि एकदम शाहीनच्या चेह-यावर खुलं हसू उमटलं.. "जानू, तू चल ना मेरे साथ.. चल, तेरेको फोकोटमे..!" सुरेखसा डोळा मारला तिनं...!

आपण साला क्लीन बोल्ड..! मी तिचा 'जानू..' केव्हा झालो?!

मीही तसा हरामखोरच. शाहीनसोबत कधी कुठल्या हाटेलच्या रुममध्ये गेलो नसलो तरी तिच्या ए सी गाडीच्या बंद अंधा-या काचेत डायवरला बाहेर चा प्यायला पाठवून चुम्माचाटी मात्र भरपूर केली.. सा-या वासना असणारा माणसासारखा माणूस मी. मी विवेकानंद नव्हतो की समर्थ नव्हतो.. काकाजी नसलो तरी केरसुणीनं समुद्राच्या लाटा परतवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा आचार्यही नव्हतो..!

एके दिवशी शाहीनच्या घरी एक विमापावती देण्याकरता गेलो होतो.. पत्ता होता माझ्याकडे. प्रथमच तिच्या घरी जात होतो..स्वच्छ, टापटीप आवरलेलं घर.. शाहीनच्या आईनं कोण कुठले विचारलं.. आतल्या खोलीतून शाहीन बाहेर आले.. माझं मनमोकळं स्वागत केलं.. बसा म्हटलं..

"तात्यासाब, अंदर आईये..इधरही बात करते है.."

मी आत गेलो आणि जे दृष्य पाहिलं ते पाहून मला भरून आलं खूप..

आपल्या पक्षाघाती अपंग बापाला शाहीन कसलंसं खिमट भरवत होती.. ते भरवता भरवता त्याचाशी आपुलकीनं बोलत होती. मध्येच त्याच्या तोंडातून खिमट बाहेर येत होतं ते पुन्हा चमच्याने नीट त्याला भरवत होती..म्हात-याच्या चेह-यावर फक्त कृतज्ञता होती पोरीबद्दल..!

मी ते दृष्य पाहात होतो.. भारावला गेलो होतो.. भक्तिमार्गाचा एक नमुना पाहात होतो..!



आणि शाहीनच्या एका अवखळ प्रश्नाने माझी समाधी भंग पावली..

"क्यो तात्यासाब, जमाईराजा बनोगे इस बुढ्ढेके?!" Smile

शाहीनबद्दल अजून खूप काही लिहायचं आहे.. लिहीन कधितरी..!

-- तात्या अभ्यंकर.

5 comments:

प्रभाकर कुळकर्णी said...

तात्या , तुम्ही लई भारी मानुस. प्रामाणिक पनाचा कळस आहे राव तुम्ही.

hemant said...

तात्या एकदम बॉम्ब टाकलात की हो

epundit said...

पायाच पडायला पाहिजे...कधी भेटता तात्या??मी येतो आहे पुण्याला २८ जानेवारी ला ..सध्या ब्रिस्बेन ला आहे.पण तुम्हाला भेटायची भयंकर इच्छा आहे.८-१० दिवस असेन पुण्यात..येत का जेवायला घरी?

Abhishek said...

तात्या, शाहीन चा अर्थ काय होतो हो?

Sunny's........... said...

Tatya 1ch no ho.........