१९९३/९४ सालचा सुमार असेल, तेव्हाची गोष्ट.
"ग्रँटरोडचा नॉव्हेल्टी सिनेमा माहीत आहे ना? त्याच्याजवळच रेल्वे हॉटेल म्हणून आहे आणि त्याच्याजवळ एस पी सेन्टर म्हणून साड्यांचं दुकान आहे. तीच बिल्डिंग! ये हां नक्की, मी घरीच आहे!"
दस्तुरसाहेब मला फोनवरून पत्ता सांगत होते!
पं फिरोज दस्तूर आणि त्यांच सुंदर गाणं!
या माणसाच्या मी गेली अनेक वर्ष प्रेमात होतो. त्यांना एकदा भेटावं असं मला खूप वाटत होतं. आणि एके दिवशी तो योग आला. त्यांनी सांगितलेल्या पत्त्यानुसार मी ग्रँटरोडला त्यांच्या घरी पोहोचलो. लाकडी गोलाकार जिने असलेल्या त्या बिल्डिंगमधलं त्यांचं ते टिपिकल पारशी पद्धतीचं घर. भिंतीवरचं घड्याळ, खुर्च्या, सोफे, कपाटं, अगदी सगळं सगळं पारशी पद्धतीचं, ऍन्टिकच म्हणा ना! मला एकदम विजयाबाईंच्या पेस्तनजी सिनेमाचीच आठवण झाली.
गुलाबीगोर्या वर्णाचे दस्तुरबुवा समोर बसले होते. मी प्रथमच त्यांना इतक्या जवळून पाहात होतो. सवाईगंधर्वांचे लाडके शिष्य, किराणा गायकीचे ज्येष्ठ गवई, माझे मानसगुरू भीमण्णा यांचे ज्येष्ठ गुरुबंधू! मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं!
"ये, बस!"
दस्तुरांनी माझ्या पाठीवरून हात फिरवत म्हटलं. त्यांचं गाणं जितकं गोड होतं तेवढेच तेही अगदी सुरेख होते, गोडच दिसत होते!
"काय, कुठून आला? गाणं शिकतोस का कुणाकडे?"
दस्तुरबुवा अगदी मोकळेपणानी माझी विचारपूस करू लागले, माझ्याशी बोलू लागले. अगदी साधं-सुस्वभावी बोलणं होतं त्यांचं. जराही कुठे अहंकार नाही, की शिष्ठपणा नाही! गुजराथी-पारशी पद्धतीचं मराठी बोलणं! मला ते ऐकायला खूप गंम्मत वाटत होती. आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. थोड्या वेळाने दस्तुरबुवांनी त्यांच्या स्वयपाक्याला माझ्याकरता चहा करायला सांगितला. घरात ते दोघेच होते. ते आणि त्यांचा स्वयंपाकी. ह्या पारश्याने लग्न केलं नव्हतं! नातेवाईंकांचा गोतावळा खूपच कमी. त्यांचा एक पुतण्या तेवढा होता, तो तिकडे अमेरिकेत होता. दस्तुरबुवा अधनंमधनं त्याच्याकडे रहायला जायचे.
पहिल्या भेटीतच मला दस्तुरांनी त्यांच्याकडची त्यांचं एक यमनचं लाईव्ह रेकॉर्डिंग असलेली कॅसेट ऐकायला दिली. "अरे माझ्याकडे एवढी एकच कॉपी आहे. तू वाटल्यास टेप करून घे आणि ही मला परत आणून दे हां!" खूप भाबडेपणाने दस्तुरसाहेब म्हणाले. त्यांच्या आवाजात जात्याच कमालीचा मृदुपणा होता. त्यांना मुद्दामून मृदु बोलण्याची गरजच नव्हती!
घाटकोपरच्या एका मैफलीतलं यमन रागाचं फार सुंदर रेकॉर्डिंग होतं ते! किराणा पद्धतीची, सवाईगंधर्वांच्या तालमीखाली तावूनसुलाखून निघालेली फार अप्रतीम गायकी होती त्यांची! किराणा पद्धतीनुसार एकेका स्वराची बढत करून विकसित केलेला राग, अतिशय सुरेल अन् जवारीदार स्वर, स्वरांचं अगदी छान रेशमी नक्षिकाम करावं अशी आलापी! खरंच, दस्तुरबुवांचं गाणं म्हणजे सुरेल, आलापप्रधान गायकीची ती एक मेजवानीच असे! असो! दस्तुरबुवांच्या गायकीवर लिहायला मी अजून खूप लहान आहे. आणि त्यांच्या गाण्यावर कितीही जरी भरभरून लिहिलं तरी त्यांच गाणं शब्दातीत होतं हेच खरं!
मंडळी, दस्तुरबुवांच्या घरी जाण्याचा, त्यांना भेटण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा अनेकदा योग आला हे माझं भाग्य! मी जरी समोरसमोर बसून त्यांची तालीम घेतली नसली तरी एका अर्थी ते माझे गुरूच होते. किराणा गायकीबद्दल, आलापीबद्दल, गाणं कसं मांडावं, राग कसा मांडावा, घराण्याची गायकी कुठे अन् कशी दिसली पाहिजे इत्यदी अनेक विषयांवर ते माझ्याशी अगदी भरभरून बोलत! त्यांची जुनी ध्वनिमुद्रणं मला ऐकवत! आपण कुणीतरी मोठे गवई आहोत असा भाव त्यांच्या बोलण्यात कधीही म्हणजे कधीही नसे!
एकंदरीत खूपच साधा आणि सज्जन माणूस होता. अतिशय सोज्वळ आणि निर्विष व्यक्तिमत्व! बोलणं मात्र काही वेळेला मिश्किल असायचं!
एकदा असाच केव्हातरी त्यांच्या घरी गेलो होते. नोकराने दार उघडलं.
"दस्तुरसाब है?"
तेवढ्यात, "अरे ये रे. किचनमध्येच ये डायरेक्ट! चहा पिऊ!" असा आतूनच दस्तुरसाहेबांचा आवाज आला. त्यांच्या स्वयंपाक्याने आमच्या पुढ्यात चहा ठेवला. टेबलावर लोणी, ब्रेड ठेवलेलं होतं! दस्तुरबुवांनी स्वत:च्या हाताने लोणी लावून दोन स्लाईस माझ्या पुढ्यात ठेवले! आम्ही लोणीपाव खाऊ लागलो. तेवढ्यात स्वयंपाकघराच्या एका कोपर्यातून दोन मोठे उंदीर इकडून तिकडून पळत गेले! च्यामारी, घरात दोन दोन मोठाले उंदीर! त्यांना पाहताच मी दचकलोच जरा! मला दचकलेला पाहून दस्तुरसाहेबांनी एकदम मिश्किलपणे म्हटलं,
"अरे ते मामा लोक आहेत! खेळतात बिचारे. त्यांना तरी माझ्याशिवाय दुसरं कोण आहे?!"
आमच्या दस्तुरसाहेबांना विडी ओढायची सवय होती बरं का मंडळी! फार नाही, पण अधनंमधनं म्हातारा अगदी चवीने ती खाकी विडी ओढायचा! "दस्तुरसाहेब, विडी चांगली नाही बरं प्रकृतीला! जास्त ओढायची नाही!" असा मी त्यांना जरा माझ्या लहानपणाचा फायदा घेऊन एकदा प्रेमळ दम दिला होता!
"बरं बरं! यापुढे एकदम कमी ओढीन. मग तर झालं?!" मी घेतलेला लहान तोंडी मोठा घास त्यांनी तेवढ्याच मोठेपणाने आणि खिलाडीवृत्तीने मला परतवला होता! त्यानंतर काहीच दिवसांनी नेमका मी फोर्टमधल्या कुठल्यातरी दुकानात गेलो होतो, तिथे मला हमदोनो पिक्चरमध्ये असतो तसा एक म्युझिकल सिग्रेट लायटर मिळाला. त्या लायटरचे स्वर खूप छान होते. तो लायटर पाहिल्यावर मला एकदम दस्तुरसाहेबांचीच आठवण आली. मी तो त्यांना मुद्दाम प्रेझेंट म्हणून देण्याकरता त्यांच्या घरी गेलो. त्यांनाही तो लायटर खूप आवडला!
"अरे खूप महाग असेल रे! कशाला एवढे पैसे खर्च केलेस? असं कुणी काही प्रेझेंट दिलं की मला खूपच अवघडल्यासारखं वाटतं! आणि काय रे, एकिकडे मला विडी कमी ओढा म्हणून दम देतोस आणि दुसरीकडे हा लायटर पण देतोस? आता तू हा इतका सुंदर लायटर दिल्यावर माझी विडी कशी कमी होणार सांग बरं!"
हे म्हणतांना त्यांच्या चेहेर्यावर जे निरागस मिश्किल भाव होते ते मी आजही विसरू शकत नाही! खरंच, देवाघरचा माणूस!
त्यांचे गुरू सवाईगंधर्व, यांच्याबद्दल तर ते नेहमीच भरभरून बोलत. त्यात केवळ अन् केवळ भक्तिच असे. सवाईगंधर्वांच्या काही आठवणी त्यांनी मला सांगितल्या होत्या. एक आठवण सांगतांना त्यांच्या डोळ्यात नेहमी पाणी यायचं!
दस्तुरबुवा १४-१५ वर्षांचे असतानाची गोष्ट. सवाईंचा नाटककंपनीसोबत जेव्हा मुंबईत मुक्काम असे तेव्हा सवाई त्यांना त्यांच्या घरी येऊन गाणं शिकवायचे. एकदा असेच पावसाळ्याचे दिवस होते. रस्त्यावर खूपच चिखल आणि पाणी साचलं होतं. त्या पावसातही सवाईगंधर्व त्यांच्या घरी शिकवणीकरता आले. गुरूने शिष्याला चांगली तास, दोन तास तालीम दिली अन् सवाईगंधर्व जायला निघाले! दारापाशी आले व स्वत:च्या चपालांकडे पाहून त्यांनी क्षणभर दस्तुरांच्या आईकडे अत्यंत कृतज्ञतेच्या भावनेनं बघितलं, हात जोडले, थोडे हसले आणि घराबाहेर पडले! झालं होतं असं की बाहेरच्या पावसा-चिखलामुळे सवाईंच्या चपला खूपच बरबटलेल्या होत्या. मुलाची शिकवणी होईस्तोवर त्या माऊलीने सवाईंच्या चपला स्वच्छ धुऊन, तव्यावर वाळवून कोरड्या करून ठेवल्या होत्या!!
इंडियन आयडॉल, अजिंक्यतारा, महागायक, महागुरू, एस एम एस चा जमाना नव्हता तो!!
सवाईगंधर्व महोत्सवात शेवटच्या दिवशी पहाटे गंगूबाई हनगल, दस्तुरबुवा आणि शेवटी अण्णा हा गाण्याचा क्रम गेली अनेक वर्ष होता. 'गोपाला मेरी करूना' ही अब्दुलकरिमखासाहेबांची ठुमरी आणि दस्तुरबुवांचं काय अजब नातं होतं देवच जाणे! सवाईगंधर्व महोत्सवात त्यांना दरवर्षी न चुकता 'गोपाला...' गाण्याची फर्माईश व्हायची आणि दस्तुरबुवही अगदी आवडीने ते गात! फारच अप्रतीम गायचे! साक्षात अब्दुलकरीमखासाहेबच डोळ्यासमोर उभे करायचे!
अण्णा आणि दस्तुर! दोघेही सवाईगंधर्वांचे शिष्य. त्या अर्थाने दोघेही एकमेकांचे गुरुबंधू होते. आणि तसंच त्यांचं अगदी सख्ख्या भावासारखंच एकमेकांवर प्रेमही होतं! सवाई महोत्सवात एके वर्षी दस्तुर गुरुजींनी कोमल रिषभ आसावरी तोडी इतका अफाट जमवला की तो ऐकून अण्णा दस्तुरांना म्हणाले, "फ्रेडी, आज मला गाणं मुश्किल आहे. आज तुमचेच सूर कानी साठवून मी घरी जाणार!"
अण्णा नेहमी प्रेमाने दस्तुरांना 'फ्रेडी' या नावाने हाक मारायचे!
असो..!
अजून काय लिहू? आता फक्त दस्तुरबुवांच्या आठवणीच सोबतीला उरल्या आहेत! त्या आठवणींतून बाहेर पडवत नाही. खूप भडभडून येतं. अलिकडेच दस्तुरसाहेब वारले. एका महत्वाच्या कामाकरता, एक महत्वाची कौटुंबिक जबाबदारी निभावण्याकरता त्या दिवशी मी पुण्यात होतो. मला तातडीने मुंबईला परतणं शक्य नव्हतं. दस्तुरांचं अंत्यदर्शन मला मिळालं नाही हे माझं दुर्भाग्य म्हणायचं! दुसरं काय? काल संध्याकाळी थोडा वेळ होता म्हणून मुद्दाम ग्रँटरोडला गेलो होतो. त्या इमारतीपाशी गेलो. पण दस्तुरांच्या घरी जाण्याची हिंमत होईना! खूप भरून आलं. पुन्हा काही आठवणी ताज्या झाल्या. मी दिलेला लायटर असेल का हो अजून त्या घरात? मी येऊन गेल्याचं कळलं असेल का हो आमच्या त्या पारशीबाबाला?
रस्त्यावर नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू होती. लोकं आपापल्या उद्योगात होते. मी मात्र एकटा, एकाकी उगाच त्यांच्या घराबाहेर घुटमळत होतो. मनात 'गोपाला मेरी करूना'चे सूर रुंजी घालत होते!
--तात्या अभ्यंकर.
हाच लेख इथेही वाचता येईल!
2 comments:
खरंच दस्तूर बुवांचं काय सुंदर व्.क्तिचित्र रेकाटलंय तुम्ही. न बघताच डोळ्या समोर ते त्यांच्या किचन मधेच दिसले. फारच छान.
माझ्या घराच्या येवढे ते जवळ रहात असुन मी कायमचाच करंटा राहिलो.
पं बबनराव हळदणकरांचा मुलगा माझा शाळॆतला खास मित्र. त्यांच्या घरे माझे जाणॆ येणे पण.
Post a Comment