आजच्या तरूण पिढीतील अभिजात संगीत गायिका वरदा गोडबोले यांनी गायलेले -
'गुरुरेको जगति त्राता..'
(येथे ऐका)
मूळ मराठी गाणे - (दुर्दैवाने कुठेही उपलब्ध नाही)
सुखाच्या क्षणात, व्यथांच्या घणात
उभा पाठिशी एक अदृष्य हात
गुरू एक जगती त्राता...(शब्द येथे वाचता येतील)
संस्कृत भाषांतर - (सौ अदिती जमखंडीकर)
सुखानां क्षणेषु व्यथानामाघातेषु
तिष्ठति पृष्ठे एकोऽदृष्यो हस्तः
गुरुरेको जगति त्राता....(शब्द येथे वाचता येतील)
मूळ गाण्याला बाबुजींची पुरियाकल्याण रागातील सुरेख चाल. तीच चाल वरील संस्कृत गाण्याकरताही वापरली आहे.
किराणा घराण्याची उत्तम तालीम मिळालेल्या वरदाने हे गाणं खूपच छान गायलं आहे. सुंदर आवाज, उतम स्वरलगाव, सुरेल आलापी, लयतालावर चांगली पकड, दाणेदार तान ही वरदाच्या गाण्यातली वौशिष्ठ्ये म्हणता येतील.
राग पुरियाकल्याण. हा राग म्हणजे किराणा घराण्याचीच खासियत! आलापप्रधान गायकी गाता येण्याजोगा एक खानदानी राग. पुरियाकल्याण म्हणजे पुरिया आणि कल्याण या दोन रागांचं अद्वैत. पुरियाचा स्वभाव तसा गंभीर. पुरिया म्हणजे एखाद्या जबाबदार, बुजुर्ग अशा अनुभवसंपन्न व्यक्तिचं मनोगतच! पण पुरियाची सगळी सत्ता फक्त पूर्वांगातच. अवखळ, लोभसवाणा 'कल्याण' त्याला उत्तरांगात नेमकेपणाने गाठतो आणि त्याचा छानसा 'पुरियाकल्याण' होतो!
आपल्या घरात अशीच एखादी अनुभवसंपन्न, पण थोडी गंभीर अशी बुजूर्ग व्यक्ती असते. कुणी फारसं तिच्याजवळ गप्पाबिप्पा मारायला जात नाही. पण तिच्या नातवाला मात्र नेमकं कळतं की आजोबांना काय आवडतं आणि काय नाही ते! नातू अवखळपणाने धावत त्यांना बिलगतो आणि या गंभीर आजोबांच्या चेहऱ्यावर पटकन स्मित हास्य उमटतं!
तद्वत, उत्तरांगात कल्याणाने गाठल्यावर 'पुरिया' त्या आजोबांसारखाच काही क्षणाकरता स्वत:चा स्वभाव विसरतो आणि त्याचा 'पुरियाकल्याण' बनतो!-- तात्या अभ्यंकर.
No comments:
Post a Comment