June 13, 2010

अल्लाजान..

त्याला सारे अल्लाजान असं म्हणायचे. कोण होता तो? एका घरवालीचा हरकाम्या. कुणाचा? रौशनी नावाच्या एका घरवालीचा हरकाम्या.. रौशनीआपा आणि तिच्या साऱ्या वेश्या मुली यांचा हरकाम्या. अजून एक हरकाम्या होता मन्सूर. आणि हा अल्लाजान. रौशनीआपाचा वेश्याव्यवसाय चालायचा फोरासरोडला.

तिथे हरकाम्या होता अल्लाजान..

आणि काय ओळख होती या अल्लाजानची? स्त्री? नाही. पुरुष? नाही! अल्लाजान तृतीयपंथी होता.
उभट, किंचित दाढीचे खुंट वाढलेला काळसर बायकी चेहरा.. हावभावही बायकी.. अंगात सदैव कुठलातरी मळका पंजाबी ड्रेस घालायचा.. डोक्याचं साफ टकलं त्यामुळे एक कुठली तरी मळकट ओढणी नेहमी डोक्यावर ओढलेली असायची! चेहऱ्यावर तसं निरागसच परंतु सततचं एक लाचार हास्य! खूप दयनीय दिसायचा अल्लाजान.. माझ्या पोटात नेहमी खूप तुटायचं त्याच्याकडे पाहून!

त्याचं अल्लाजान हे नाव खरं की पडलेलं? तो त्या वस्तीत केव्हापासून आला, कसा हरकाम्या झाला? मला माहीत नाही! या जगात एका दमडीचीही किंमत नसलेल्या अल्लाजानची माहिती कोण ठेवतो? आणि कशाकरता??

रौशनीच्या चाळीशेजारीच झमझम हा देशी दारूचा बार. मी तिथे कॅशियर कम मॅनेजर. एके दिवशी हा अल्लाजान डायरेक्ट बारमध्येच घुसला आणि एकदम माझ्या काउंटरपाशीच भिडला!.. अंगाला जाम वास मारत होता त्याच्या. दळिद्रतेचा, गरिबीचा, लाचारीचा! मला किळसच आली त्याची..

"दो बोईल अंडा पार्सल! "

लाचारीने हसत अल्लाजानने बोईल अंड्यांची पार्सल ऑर्डर दिली..

"आप तात्यासाब है ना? मन्सूरने बताया! " पुन्हा एकदा लाचारी.. बोलताना स्वत:ची लाळ गळते आहे याचीदेखील त्याला लाज नव्हती, शुद्ध नव्हती..!

"शी! कुठल्या घाणेरड्या वस्तीत आपण काम करतो आहोत? ते देखील पोटाकरता? " माझं सुसंस्कृत पांढरपेशी स्वगत!

हरकाम्या म्हणजे कामं तरी को़णकोणती करायचा हा अल्लाजान? पडतील ती कामं करायचा. वेश्यांना लागणाऱ्या पिना-पावडरी-कंगव्यांपासूनच्या साऱ्या वस्तू बाजारातून आणणे, चहापाणी, भुर्जी-आम्लेट पार्सल आणून देणे.. झाडूपोता करणे.. 

वेश्यांचे कपडे धुणे.. त्यात घाणेरडी, पिवळसर डाग पडलेली त्यांची अंतर्वस्त्रं देखील जमा! साऱ्या जगाची वासना जिथे सांडायची त्या वासनेचे वेश्यांच्या अंतर्वस्त्रांना पडलेले डाग अल्लाजान धुवायचा..!

अगदी पडेल ती कामं करायचा अल्लाजान!

त्या बदल्यात वेश्या त्याला ५-१० रुपयांची रोजी द्यायच्या.. त्या रोजीत अल्लाजान खूश असायचा. आता खूश असायचा असंच म्हटलं पाहिजे..

दुपारच्या फावल्या वेळात, म्हणजे जेव्हा वेश्यांना वासनेचे दणकट घाले सहन करण्यापासून थोडा निवांतपणा मिळायचा त्या वेळेस कधी व्हरांड्यात सगळ्या वेश्या एकत्र जमून अल्लाजानशी हसीमजाक करायच्या.. अल्लाजानही तेव्हा जमेल तसा नाचेपणा करून हसायचा, हसवायचा, खिदळायचा. त्या दुनियेतले हेच काय ते जरा करमणुकीचे, सांस्कृतिक कार्यक्रम!

अल्लाजानशी थट्टामस्करी हीच त्या वेश्यांची करमणूक आणि त्या वेश्या, त्यांची कामं, आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या चार दमड्या हीच अल्लाजानची दुनिया!

"तात्यासाब... पहला पानी पिओ... घबराव मत. पोलिस अब उस मादरचोदकी चमडी उधेडेगा! " असं म्हणून अल्लाजानने पाण्याचा ग्लास माझ्या पुढ्यात धरला होता..

दारू पिऊन, विना पैसे देता बारमधून निघून जाणाऱ्या फोरासरोडवरील एका गुंडाशी माझी हातापायी झाली होती.. मी त्याला जाम मारला होता, त्यानेही मला धुतला होता.. लगेचच तिथे पोलिस आले.. आमचा हप्ता बांधलेला असल्यामुळे त्या गुंडाचा जबरदस्त बंदोबस्त होणार होता..

मी रस्त्यात धुळीत किंचित कोलमडलो होतो. थोडं खरचटलंही होतं. बावरलो होतो, घाबरलो होतो.. अश्या परिस्थितीत भर रस्त्यात माझ्या पुढ्यात पाण्याचा गिल्लास धरला होता तो अल्लाजानने!

तेव्हा कुठे गेली होती माझी किळस? लाज वाटली होती तिला.. तेव्हा मला त्याच्या अंगाचा दर्प आला नाही.. त्याच्या. दळिद्रतेचा, गरिबीचा, लाचारीचा दर्प नाही जाणवला मला! दिसली ती फक्त निरागसता, आणि माणूसकी!. कुठल्याही मिनरल, बिसलेरीच्या बाटलीतल्या पाण्यापेक्षा अल्लाजानने पुढे केलेल्या त्या ग्लासातलं पाणी अधिक स्वच्छ होतं, शीतल होतं, निर्मल होतं!

अजून काय लिहू? अल्लाजानबद्दल अधिक भरभरून लिहावं असं काही नाही माझ्याकडे.. आणि ज्याच्यावर पानंच्या पानं संपवावीत असं अल्लाजानचं व्यक्तिमत्त्वही नव्हतं..

"तात्यासाब, चिकनका प्लेट और दो रोटी कितनेको? "

मी रक्कम सांगितली.. हातातल्या पैशांची जुळवाजुळव करत अल्लाजान पुन्हा एकदा लाचार हसला होता आणि थोडा वेळ रेंगाळून निघून गेला होता. त्याला चिकन खायचं होतं पण त्याच्यापाशी पैसे होते ते पुरेसे नव्हते, जुळत नव्हते..

असेच काही दिवस गेले. चार दमड्या माझ्या खिशात होत्या. मला अचानक आठवण झाली ती अल्लाजानची.. तो रौशनीआपाच्या चाळीच्या बाहेरच रेंगाळत बसला होता..

"ए अल्लाजान... " मी हाक मारली..

"बोलो तात्यासाब" तो धावतच माझ्यापाशी आला..

"चल मेरे साथ.. "

टॅक्सी केली आणि जवळच असलेलं दिल्ली दरबार गाठलं..

मी आणि एक मळकट, गलिच्छ तृतीयपंथी असे दोघे दिल्ली दरबार मध्ये जेवत होतो..

चिकन मसाला, बिर्याणी, गरमागरम रोट्या, सोबत दहीकांद्याची कोशिंबीर..

हाटेलातले सारे लोक अत्यंत चमत्कारिक नजरेने आमच्याकडे पाहात होते..

सुरवातीला लाजलेला, मुरकलेला अल्लाजान नंतर अगदी मनसोक्त जेवत होता..

धुळीत पडलेल्या तात्याला पाणी आणून देणारा अल्लाजान मनसोक्त जेवत होता..!

-- तात्या अभ्यंकर.

1 comment:

Anonymous said...

khuup chaan khup bhavala allajaan